"ज्या देशात विद्येची देवता सरस्वती आहे, त्याच देशात स्त्रियांना शेकडो वर्षे शिक्षणांपासून वंचित ठेवले गेले."
असे वाक्य मी नेहमी म्हणत असते.
मात्र प्राचीन मंदिरे आणि लेण्या पाहत असताना, त्यात अनेक स्त्रिया एका हातात पेन आणि दुसऱ्या हातात कागद घेऊन लिहितानाच्या मूर्त्या आहेत. अनेक स्त्रिया नृत्य करताना, वाद्ये वाजवताना दिसतात. मुक्त शृंगार करताना दिसतात. अगदी सर्वसामान्य स्त्री आपल्या कडेवर मुल घेऊन रस्त्यावरची मिरवणूक बघते अशा मूर्त्या दिसतात. त्यात तिच्या डोक्यावर पदर नसतो, खालचे वस्त्र फक्त जेमतेम गुडघ्यापर्यंत, आताच्या बर्म्युडासदृश्य असते. अनेक मूर्त्यांच्या उरोभागावर वस्त्र नसते.
प्राचीन मंदिरे, लेणी यातील कुठल्याही मूर्तीच्या चेहऱ्यावर बुरखा, घुंघट, पदर, स्कार्फ सारखे कोणतेही वस्त्र मी अजून तरी पाहिले नाही.
हम्पीसारख्या ठिकाणी खुद्द राजाची पत्नी सणावारी सार्वजनिक ठिकाणी शास्त्रीय नृत्य करत होती याची माहिती गाईड देतो. मग असे नृत्य गरत्या बाईने करू नये, असे केव्हापासून समाजाच्या मनावर बिंबले असेल?
पुराणकथात कुठेही स्त्रिया घरी बसल्यात आणि फक्त पुरुष ऍक्टीव्ह आहेत असे दिसत नाही. पांडवांबरोबर द्रौपदी फिरतेय, रामाबरोबर सीता फिरतेय. अशा जोड्याजोड्याच दिसतात. त्या कृष्णाशी चर्चा करतायत, युद्धावर बोलतायत, वेदना व्यक्त करतायत. जाब विचारतायत.
असे जर असेल, तर नेमकं कुठल्या काळापासून भारतातील स्त्रिया घुंघट, पदर, बुरखा, पडदा घेऊ लागल्या असतील, अशिक्षित राहू लागल्या असतील, असा प्रश्न पडतो. हे अंधारयुग नेमकं कधी आणि का सुरू झालं असेल, यावर अभ्यासपुर्वक मांडणी केली जायला हवी.
मग सरस्वतीला उगा दोष देण्यात काय अर्थ? समाज बाह्य परिस्थीतीने बदलतो, हतबल होतो, असहाय होतो असेही घडू शकते ना?