प्रेमात स्त्रियांना काय हवं असतं, ते अजून नेमकं स्त्रियांनाही कळत नाही. तर बाकीच्यांना काय कळणार..
त्यात स्त्रियांच्या मागे निसर्गाने आणि पितृसत्तेने लावलेली कर्तव्ये, अपेक्षा, अडसर, बंधने, भीती इत्यादी धरून स्त्रियांची मानसिक आणि भावनिक जडणघडण अत्यंत गुंतागुंतीची झालेली आहे. शिवाय ती प्रत्येक स्त्रीची वेगळी असते. सामाजिक स्तराप्रमाणे देखील बदलते.
या सगळ्या सामाजिक जडणघडणीत आणि काही निसर्गाच्या अपेक्षा, यानुसार पुरुषांच्या प्रेमातल्या अपेक्षा आणि स्त्रियांच्या या वेगळ्या होतात. तिथे गोची अजून वाढते. निसर्गाने मानवप्राण्याच्या सेक्शुअल भावना प्राण्यांप्रमाणेच ठेवल्यात, पण माणसाला इतर प्राण्यांच्यापेक्षा बुद्धी आणि भावना या जास्तीच्या देणग्या दिल्याने त्यातली गुंतागुंत आणि भेद वाढत गेलेले आहेत.
त्यात आमच्यासारख्या अर्धे वय उलटत चाललेल्या स्त्रियांची गोची तर अजून वेगळीच आहे. एकीकडे परंपरेचा पगडा, तर दुसरीकडे आधुनिक काळाच्या तनमनाकडून होत असलेल्या लोभस मागण्या..या दोन्हीत ओढाताण होते. जाए तो जाए कहां....
कुणी कितीही मुलामा चढवला, तरी पुरुष प्रेमात आधी सेक्स, शरीर यांच्या अपेक्षा ठेवतो हे सार्वकालिक सत्य अजूनही अबाधित आहे. एवढंच नाही, तर एकाच शरीराला तो लवकर कंटाळतो स्त्रीच्या तुलनेत, हेही सत्य आहेच. एखाद्या स्त्रीच्या मैत्रीत देखील शरीर मिळण्याची शक्यता नसली, तरी तो त्या मैत्रीला कंटाळतो. आणि स्त्रियां हे पटकन ओळखतात. त्यांना नेमके तेच आवडत नाही.
स्त्रियांना सेक्स नको असतो असे नाहीच, पण त्याबरोबर त्या आधी आणि त्या नंतरही त्यांना हजारो गोष्टी हव्या असतात. त्यात त्या सगळ्या प्रत्यक्षात हव्याच असतात असेही नाही, पण प्रेमातला पुरुष त्या द्यायला तयार आहे, द्यायचा प्रयत्न करतोय, एवढेही त्यांना खूप असते. कारण त्या भावनेनेच अधिक गुरफटलेल्या असतात. अर्थात पुन्हा पुरुषाची नाटकी वचने आणि प्रामाणिकपणा हे देखील त्या झटकन ओळखतात. त्यामुळे पुन्हा गफलत होतेच.
उदा. अगदी बेसिक पातळीवर घेतलं, समजा एखादा दागिना स्त्रीला हवाय, पुरुष तो देण्याचे प्रॉमिस स्वतःहून करतोय, मला तुझ्यासाठी हे घ्यायची फार इच्छा आहे असे म्हणतोय हेच त्यांना सुखावतं. प्रत्यक्ष तो ते नाही घेऊ शकला काही कारणाने तरी त्यांना ते चालतंय. त्या समजून घेऊ शकतात. पण आपल्या इच्छेची याला काही पडलेलीच नाही. त्याला ते महत्त्वाचे वाटतच नाही हे पाहून त्या जास्त दुखावतात.
या दागिन्याच्या ठिकाणी काहीही असू शकतंय, फिरायला जाणे, निवांत बसून गप्पा मारणे, सिनेमा नाटकाला जाणे, घर, कपडे, वस्तू खरेदी करणे, सफाई करणे, सजावट करणे, नातेवाईकांकडे जाणे, गाणी ऐकणे, शिजवून खाऊ घालणे.... ही यादी खूप असते. पुरुषाने त्यात रस दाखवावा.. बस. पण बहुधा पुरुषांना तो रसही दाखवायचा नसतोच. कारण त्यांना त्या एकाच स्त्रीबरोबर आणि सातत्याने हे करायचा कंटाळा लगेच येतो. मग ते त्यावर हिडीस विनोद करू लागतात.
अगदी माझेच उदाहरण द्यायचे झाले, तर माझ्या नवऱ्याला चांगला सैपाक करता येतो. तो मलाही करून खाऊ घालतो. क्वचित नव्हे, तर अनेकदा. नित्यच म्हटलं तरी चालेल. पण त्याचं म्हणणं असतं की तो सैपाक करताना मी तिथे उभं राहायचं नाही. आणि मी करत असताना तो तिथे येत नाही. आता इथे माझ्या अपेक्षा वेगळ्या असतात. त्याने काही करू नये. फक्त मी सैपाक करत असताना सैपाकघरात बसावं. माझ्याशी गप्पा माराव्यात. एखादी वस्तू लागली तर पटकन हाताशी द्यावी. फळीवरचे डबे काढून द्यावेत. माझी ही रोमान्सची साधी अपेक्षा आहे. त्यातून माझा सहवास त्याला आवडतोय हे प्रतीत होत असतं. पण नेमके तेच करायला त्याला आवडत नाही. त्याला वाटतं मला हाताशी तिथे नोकर हवा असतो... 🙈
नवरा किंवा प्रियकर, जरी असा नीरस असला तरी जिस पे दिल आया है, तिथे स्त्रियांचा नाईलाज होत असल्याने, (कारण असा पटकन त्यांचा दिल कुणावर येत नाही. (कारण त्या फक्त शरीर बघत नाहीत. त्या पैसा बघतात हा देखी आरोप अपवादात्मकच आहे. त्यांना फक्त ती व्यक्ती क्लिक व्हावी लागते. ) त्या त्या पुरुषाला चिकटून राहतात. राहण्याचा प्रयत्न करतात. पुरुषाला वाटते, की ही आपल्याशी एकनिष्ठ आहे, आपल्याशिवाय तिला कुणात रस नाही. ती तशीच असावी असेही त्याला वाटत असतेच. पण प्रत्यक्षात ती राहते कारण तिच्यात सेक्सच्या पलिकडचे वात्सल्यप्रेम शिल्लक असते. सेक्स अबाधित असतोच. पण तो ती परिस्थितीनुसार दडपू शकते. या दडपण्याचे दुष्परिणाम होतातच. पण ते ती झेलते. ती तुमचे प्रेम संपल्यावरही तुम्हाला सहन करत राहते ती करुणेने. वात्सल्याने. प्रेम तिचेही संपलेले असू शकतेच.
पुरुषाला स्त्रीचे कपडे काढण्यात रस असतो. ज्या दिवशी कपडे नेसतानाही पुरुष तिच्याकडे प्रेमाने पाहील, हुक्स काढण्याइतकाच रस हुक्स, साडीची पिन, साडीच्या निऱ्या निट लावून देण्यात दाखविल तेव्हा तिला त्याच्याबद्दल अधिक प्रेम वाटत असते. केस मोकळे करण्याइतकाच रस पुन्हा वेणी घालून, बांधून देण्यात दाखवलेला तिला जास्त आवडतो. कारण इथं घेणं आणि देणं हा फरक असतो. धुतलेले तिचे केसही टॉवेलने पुसून दिलेत तर तिला का नाही आवडणार ते?
अरे, कधी तिचे केस धुवून दिलेत, केसांना तेलाचा मसाज करून दिलात, तर त्या दिवशी ती तुम्ही म्हणाल ते करायला तयार होईल. स्त्रियांना केस धुण्याचा कंटाळा येतो. त्यांना ते आयते वायते धुवून हवे असतात. लहानपणी आई धुवून द्यायची तसेच. त्यासाठी त्या पार्लरमध्ये जातात. पैसे खर्च करतात. हे कधीच पुरुष लक्षात तरी घेतात का? असे पुरुष मोजकेच.
स्त्रिया कृष्णाच्या प्रेमात का असतात? कृष्ण राधेचे केस विंचरून देतो. कृष्ण राधेला, द्रौपदीला एवढंच नव्हे, तर अगदी रुक्मिणीला, सत्यभामेलाही आपला सगळ्यात महत्त्वाचा वेळ देतोय. तिचं ऐकून घेतोय. तिच्याशी मैत्री करतोय. तिच्या खोड्या काढतोय, कृष्णाच्या शृंगाराच्या कथा थेट सेक्सशी संबंधित कधीच नसतात. तसं असतं, तर सर्व मंदिरांच्या कामशिल्पात कृष्णच दाखवला असता. तसा तो तिथे कधीच दिसत नाही. हे सर्वसामान्य पुरुष फार क्वचित करतो.
होतं काय, की पुरुषाच्या सेक्सच्या अपेक्षा स्त्री समजून घेते. अनेकदा इच्छा नसली तरी त्याच्यासाठी ती तयार होते. पण स्त्रियांच्या या छोट्या छोट्या रोमान्सच्या अपेक्षा पुरुष समजून घेण्याचा प्रयत्नही करत नाहीत. अनेकदा त्यावर विनोदच केले जातात.
आणि मग दोघांच्या प्रेमाच्या अपेक्षा दोन वेगळ्या दिशांची वाट धरून चालत राहतात.......