Apr 6, 2025

ऊन्हं

सकाळचं ऊन माझ्या घरात कोवळ्या बाळपावलांनी रांगत येतं..किलकिल्या उघड्या फटीतून डोकावतं. अगदी तस्संच, जसं एखादं नवीन आलेल्या शेजा-याचं तान्हं आपला दरवाजा उघडा पाहून हळूच डोकावत राहावं. आपल्या टुकु टुकु डोळ्यांनी न बोलता बघत राहावं..तसं..आणि दुसरं तान्हं बाळ पाहून आपल्या घरातील बाळही ज्याप्रमाणे उड्या मारून खिदळू लागतं; तसंच त्याला पाहून एकलदुकल कुंडीतला कोवळा वसंतही उल्हसित होऊन नाचू लागतो.

मी त्याला आपल्या हातात धरू बघते. त्याच्याशी काही क्षण खेळू पाहते. पण सकाळच्या कामाच्या धबडग्यात एवढा वेळ कुठं असतो त्याच्यात गुंतून राह्यला. मग मी त्याच्याकडे बघितल्या न बघितल्यासारखे करून आपल्या कामाला लागते. 

ते हिरमुसून परत फिरतं. मीही त्याला विसरून जाते. 

हे बाळऊन आता मोठं होत जाईल. पूर्व-पश्चिम योग्य दिशेत नसलेल्या माझ्या तिरपागड्या घरातही वाट वाकडी करून शिरू लागेल. कारण त्याला मी आवडते.. हुं ?..की मला ते आवडतं,  म्हणून असेल कदाचित. ऊन्हावर प्रेम करणारी माणसं वेडीच असतात नाहीतरी...
रंगपंचमीचे वेध त्याला आत्ताच लागू लागलेत. स्वच्छ निळ्या तलम आभाळावर प्रहरांचे रंग उधळू लागलंय. वा-यांच्या लहरींसोबत धुळवड खेळू लागलंय. पळस-पांगारा-काटेसावर त्याच्या स्वागताच्या तयारीत लागलेत. गुलमोहर, बहावा वाट पाहू लागलेत. त्याला पाहून ते अधिक रंगात येतील आणि त्यांना पाहून तेही अजून चमकू लागेल. 
चैत्रात त्याचं बारसं होईल. लोक त्याला उन्हाळा उन्हाळा म्हणू लागतील. कडूनिंबाच्या सावलीत डाळपन्हं खाऊ घालतील. कोकीळ गाऊ लागतील. आम्रमंजि-या डोलू लागतील.

जरा मोठं झालेलं हे व्रात्य ऊन माझ्या घरात सगळीकडे नाचू लागेल. दुपारचं जरा झोपू देणार नाही. मग त्याने घरात येऊ नये म्हणून मी हलकेच पडदे सरकावून घेईन, दारं खिडक्या लोटून घेईन. माझं मन थोडं खाईल, त्याला हे असं हुडूस हाडूस केल्यामुळे. पण आता ते इतकं मोठं झालंय की त्याला त्याचं काही वाटत नाही. कारण त्याला मज्जाव करून हवाहवासा अंधार बेडरूममध्ये करून मी दुपारची सुस्तावून ताणून देते आणि जेव्हा चारच्या ठोक्याला उठून सैपाकघरात चहाचं आधण ठेवायला जाते, तेव्हा ते सैपाकाच्या ओट्यावर पसरलेलं दिसतं. ओट्यावर घासूनपुसून, चमकावून पालथ्या घातलेल्या स्टीलच्या भांड्यांशी ऑंखमिचौली खेळत असतं. मी पुन्हा हरखून जाते. त्यालाही घोटभर चहा पाजते. आता माझ्यापाशी थोडा निवांत वेळ असतो. मी त्याच्याकडे एकटक पाहात राहते. त्याच्याशी गुजगोष्टी करते. त्याने अजून थांबावं म्हणून विनंती करते. पण आता त्याची पावलं पुन्हा त्याच्या घराकडे वळू लागलेली असतात. बराच वेळ खेळल्यानंतर अचानक आईची आठवण येऊन मुलाने घरात पळावं इतक्या घाईत  ते निघून जातं....
पण जाता जाता माझ्या घरात केशरसडा उधळून जाते.......

1 comment:

किसी पिछले जनम की बात...

मुगले आजम हा सिनेमा पन्नास वर्षानंतर रंगीत झाला, त्यालाही आता जवळपास 20 एक वर्ष लोटली. 🤦काळ किती भराभर चाललाय...    तेव्हा टीव्हीवर दिलीप क...