May 3, 2023

बाबा बुवा नेते गुरू इत्यादी...

 लोक बाबा, बुवा, अम्मा, दिदी, महाराज, गुरू, नेते यांच्या इतके भजनी कसे काय लागतात? यात बहुसंख्य जनता सामील असते हे विशेष.
इतक्या बहुसंख्येत लोक तर्कहीन वागत असतात? स्वतःच्या  अकलेचा वापर जराही करू शकत नाहीत... इतका बाबा वाक्यं प्रमाणमच्या आहारी जातात..

जीवनाची साधी साधी तत्वे समजायला कोणत्याही बाबा, बुवा, अम्मा दिदीची गरज का भासावी? अगदी निरक्षर माणसे देखील अनेकदा इतका तर्काने विचार करतात की आपण थक्क होतो, याऊलट अगदी डॉक्टर इंजिनिअर झालेले लोक या बाबा बुवांच्या नादी लागताना दिसतात तेव्हाही थक्कच होतो. 

याचा फायदा हे तमाम बाबा न उचलते तरच नवल.. प्रसिद्धी कुणाला नकोय? पुरस्कार कुणाला नकोत? 

दोन महिन्यापूर्वी नाशकात होते. फ्लॅटचा दरवाजा उघडाच असतो. तीन बाया शिरल्या घरात. टिपिकल पेहेराव. साडी. कनिष्ठ मध्यमवर्गीय चेहरे. 

काय हवं विचारलं. काही नको. आम्ही आज एकादशी म्हणून सहज भेटीला आलोय. स्वाध्याय परिवारातर्फे. तसे आम्हाला आदेश असतात. लोकांच्या भेटीगाठी घ्यायच्या...
पण कशाला?

कशाला नाही. असंच. सहज. 

बरं चहा पाणी काही?

नाही कुणाकडे काही घ्यायचं नाही अशी पद्धत आहे आमची. थोडं पाणी चालेल फार तर..

ठिक. पण मी जवळपास नास्तिक आहे. बाबा बुवा वगैरेंवर माझा विश्वास नाही. तूच आहेस तुझा सांगातीवरही माझा विश्वास नाही, कारण मीच आहे माझी सांगाती.

चालेल. ते तुमचे विचार आहेत. मग काही श्लोकांची छापील कागदे दिली. ते कॉमन श्लोक होते. जे साधारण ब्राम्हणी घरांमध्ये सकाळ संध्याकाळ बोलले जातात. 

जवळपास माझा अर्धा पाऊण तास खाऊन गेल्या.

मी विसरले देखील.

दोन महिन्यांनी मी परवा नाशकात परत आले.

तर काल ही तिगोळी परत हजर. शिरल्या घरात. 

तोच प्रकार. 

मी पुन्हा सांगितलं. मी नास्तिक आहे. बाबा महाराज वगैरे मला मानवत नाहीत. 

चालेल. 

मी माझे महत्त्वाचे काम संगणकावर करत होते. त्यांनी विचारलं देखील काम चालू आहे का. मी हो म्हटलं. तरी बसूनच.

मग मला राहवलं नाही. मी विचारलं. तिघीही साडीतच का? हा पेहेराव तुम्हाला कम्फरटेबल वाटतो का? यात पळता, धावता येत नाही, उड्या मारता येत नाहीत. पोहता येत नाही. सायकल चालवता येत नाही. 

आम्हाला साडीच कम्पलसरीली आहे. विशेषतः बैठकीची कामे करताना. 

का.. असं का... 

ते आपले ट्रॅडीशनल पेहेराव हवा, आपली संस्कृती...

अच्छा.. पण ही साडी आपली परंपरा नाहीए. हे तुम्हाला ठाऊक नाही का? नऊ वारी साडी ही आपली परंपरा आहे. ती कम्फर्टेबल देखील आहे. तुम्ही नऊ वारी नेसून घोड्यावर सायकलीवर बसू शकता. धावू शकता. पोहू शकता.

हो पण सध्या हीच साडी चलतीत आहे ना मग हीच नेसायची.

अहो, सध्या सुटसुटीत ड्रेस चलतीत आहेत. त्याच्याशी तुमच्या संस्थेला का वाकडं आहे. 

आम्हीही करतो एरव्ही फॅशन. पण संस्थेत जाण्यासाठी एक तासापुरती नेसायला काय हरकत आहे. आम्हाला आवडते. आमची काही हरकत नाही.

पण का? याचे बंधन का? असा प्रश्न तुम्हाला पडत नाही? एक तास तरी अनकम्फर्टेबल कपड्यांत का वावरायचंय तुम्हाला? आणि मी फॅशन म्हणून सांगतच नाही. सुटसुटीतपणा, सर्व तऱ्हेच्या हालचाली नीट करता येणं ह्यासाठी सांगतेय...


वाद वाढत गेला. भडकल्या. मला म्हणे सगळीकडे क्रांती, विद्रोह करायचा नसतो... 


आता यांनी मला शिकवावं क्रांती वगैरे... ज्या स्वतःच गुलाम आहेत दुसऱ्यांच्या विचारसरणीवर चालणाऱ्या... अक्कल गहाण ठेवून. 

मग विचारलं पुरुषांना काय नेसायला सांगतात. 

त्यांना पॅन्ट शर्ट चालते. 

मग ती पारंपरिक आहे का? त्यांना धोतर का नाही? धोतर ही आपली संस्कृती नाही?

मला ठाऊक होतं. यांच्या मठ्ठ डोक्यात काहीही फरक पडणार नाही.

पण मला न विचारता माझ्या घरात शिरून माझ्या वेळेवर अतिक्रमण करत असतील, तर मीही त्यांची उलटतपासणी घेणं माझा अधिकार आहेच..........
नंतर उठल्या. गेल्या.

परत येणार नाहीत नक्कीच. मलाही तेच हवं होतं. नाहीतर दर एकादशीला मंडळ माझ्या दारी... असं झालं असतं.

आश्चर्य हे वाटले की दोन्ही वेळेस माझ्याच घरात शिरल्या. शेजारणीचं घर उघडं असूनही तिथे नाही शिरल्या. शेजारीण चांगली पारंपरिक आहे. पण कदाचित माझे कपडे पाहून मलाच सुधारावं या हेतून माझ्याच घरात शिरत असाव्यात. 

बाबा बुवा अम्मा देखील परंपरेच्या विरोधात विद्रोह, बंड करायला शिकवू शकत नाहीत. तेवढी त्यांची क्षमता नसते. साडी नेसा म्हटलं की समाज खुश असतो. रांगोळ्या काढा म्हटलं की बाया हिरीरीने तयार होतात. हे अम्मा बाबांनाही ठाऊक असतं. 

तू भी खुश, मै भी खुश......

और संस्कृती काकू तर खुशच खुश.

Apr 24, 2023

कोकणी मुस्लिम आणि उर्दू

 कोकणात मुस्लिम संख्येने खूप आहेत. विशेषतः समुद्रकिनाऱ्यानजिकच्या गावांत त्यांची बहुसंख्या आहे. अशाच एका गावात माझा जन्म आणि साधारण अठरा वीस वयापर्यंत वास्तव्य झालेलं आहे.

माझ्याही जन्माच्या आधीपासून गावात उर्दू शाळा होती. मुस्लिम बहुसंख्या असलेल्या बहुतांश, नव्हे जवळपास सर्वच गावांत त्यांच्यासाठी उर्दू माध्यमाच्या शाळा आहेत. हिंदूंसाठी मराठी माध्यम, तर मुस्लिम लोकांसाठी उर्दू माध्यमाची शाळा. 

या दोन वेगळ्या शाळांमुळे असे झाले, की आमच्या वर्गात एकही मुस्लिम विद्यार्थी नसे आणि त्यांच्या शाळेत एकही हिंदू  विद्यार्थी नसे. त्यामुळे एकत्र खेळणे, अभ्यास करणे, एकत्र मिळून शाळेत जाणे, गप्पा टप्पा, एकमेकाचं विश्व जाणून घेणे, हे कधी घडतच नव्हते. अजूनही तसेच आहे. बरं शाळाही दोन  वेगळ्या टोकाला. त्यांची मोहल्ल्यात तर आमची दुसरीकडे. 

आम्हीही काही मराठी नव्हतो. घरात गुजराती बोलणारे आम्ही, परंतु बाहेर गुजराती माध्यमाच्या शाळा नसल्याने आम्ही गेली सहा पिढ्यांपासून मराठी माध्यमांच्या शाळेतच शिकत होतो. त्याच्या परिणामी मराठी संस्कृती, खान-पान, साहित्य, प्रादेशिकता इत्यादींशी आमची नाळ आपोआप जुळत गेली. गुजराती घरी बोलण्यापुरती, तर मराठी भाषा ही व्यवहाराची, ज्ञानाची, माहितीची, मनोरंजनाची भाषा झाली. मातृभाषेपेक्षा ती अधिक जवळची झाली.

मात्र मुस्लिम मुलांची हालत अशी झाली, जशी आता इंग्रजी माध्यमातील ग्रामीण मुलांची होते. त्यांची मातृभाषा कोकणी-मराठी बोलीभाषा. पण शिक्षण उर्दूत. त्यामुळे ना मराठी सुधारली, ना उर्दू धड आली. मी कधीही गावातल्या कुठल्या मुस्लिम लोकांना आपसांत उत्तम उर्दूत संभाषण करताना पाहिलेले, ऐकलेले नाही. त्यांच्या कोकणी-मराठीतच ते बोलतात. या कारणाने ते आजही मुख्य धारेपासून वेगळे राहिलेत. ना उत्तम मराठी बोलत, ना उत्तम उर्दू. उर्दू माध्यमात शिकूनही ना तिथे कुणी उर्दू साहित्यिक झाले, ना शायर झाले, ना कधी गजल मुशायरे ऐकले. 

शिवाय शाळा उर्दू माध्यमातील असल्या तरी कॉलेजेस उर्दू माध्यमातील नाहीत. तेव्हा तरी नव्हते. त्यामुळे उच्च शिक्षणासाठी मराठी, किंवा इंग्रजीच घ्यावे लागे. त्या काळात उच्च शिक्षण घेतच नव्हते कुणी. आता घेत असतील, त्यांचे काय हाल असतील, ते त्यांनाच ठावे. 

आता मुस्लिम मराठी साहित्य संमेलने होतात. मी अशा एकाच संमेलनाला हजर होते. त्यात साहित्यावर कमी आणि मुस्लिम म्हणून काय परिस्थिती आहे याची रडगाणीच अधिक होती. त्यात कोकणाबाहेरील साहित्यिक अधिक होते. कारण कोकणाबाहेरील मराठी मुस्लिम बऱ्यापैकी मराठी माध्यमांत शिकणारे आहेत. उदा. सोलापूर, कोल्हापूर इत्यादी ठिकाणी.

माझे ते वेगळे या घेट्टो प्रवृत्तीमुळेही मुख्य धारेत सगळे येत नाहीत. त्याला सामाजिक मानसिकता ही अशी कारणीभूत ठरते. जर हे मुस्लिम मराठी मुस्लिम आहेत, तर त्यांचा नि उर्दूचा खरंतर काय संबंध? उर्दू कुठली पश्चिम उत्तरेकडची भाषा. महाराष्ट्रात काही संबंधच नाही खरं तर... त्यांनी मराठी माध्यमांतूनच शिकायला हवे. तर सामाजिक सलोखा, एकरुपता येण्यास अधिक मदत होऊ शकते. पण तसे झाले नाही, आणि होतही नाही.

२४-४-२३

Mar 1, 2023

टवाळक्या -

 खूपदा, "मला बोलायचंय तुमच्याशी. कधी भेटाल, किंवा कधी कॉल करू?"

असे लोक विचारत असतात.
मग आपण देखील मनात असताना, किंवा नसतानाही, उगाच समोरच्याला आपण भाव खातो असं वाटायला नको म्हणून आपण आपल्या तंद्रितला अमूल्य वेळ काढून त्याला "ये बाबा" म्हणतो.
आणि आल्यानंतर, प्रत्यक्ष किंवा कॉलवरही, ती व्यक्ती काहीच बोलत नाही. घुम्यासारखी एक दोन वाक्ये बोलते. आपल्याकडे बघत बसते.

तो वेळ, ते क्षण फार इरिटेटींग असतात.

मनात चरफडत, "आरे बाबा, बोलायचं होतं ना? मग बोल की तोंड उचकटून भडाभडा..काय ते?"
पण नाही, तो/ती आपल्याकडूनच अपेक्षा ठेवून चुळबुळत बसून राहतात. फोनवर असतील, तर आपल्यालाच म्हणतात, "बोला."

हे तर अजून डोक्यात जातं.

म्हणजे आपणच यांना आपल्या कामासाठी बोलावलंय अशी लाचारीची भावना मनात दाटून येते.
कदाचित त्यांना वाटत असेल, ही बाई रोजच्या रोज फेसबूकवर मनोरंजन पिरसत असते, तशी आज खास फक्त आपल्यासाठी शो करेल काही. समोरासमोर. अगदी आमने सामने.

किंवा ही परकाया प्रवेश करून जशा कविता लिहिते, लोकांच्या मनातलं ओळखते, तसं आपण न बोलताच आपल्या मनातलं सगळं ओळखेल, आणि आपले काऊन्सेलिंग करेल, किंवा न जाणो कविताही करेल आपल्यावर. खरंतर त्यांच्या मनातलं सग्गळं मी ओळखलेलं असतंच. पण ते फुकट का म्हणून सांगायचं मी त्याला? काऊन्सेलर हजार पंधराशे घेतो एका सिटींगचे. हे दळभद्री मला चहाही पाजत नसतात. मीच शेवटी कंटाळून उठून बिल भरते. अनेकदा बिअरचे देखील.

आता बोला.

पुन्हा त्या व्यक्तिशी काहीही संवाद ठेवण्याच्या मूडमध्ये मी राहत नाही. टाळते. 

Feb 23, 2023

टवाळक्या -




ज्यांना ईमोजी टाकल्याशिवाय लेखनातला ह्युमर कळत नाही, असा एक मोठा वर्ग इथं आहे. त्यांची मला भीती वाटते.

वर्गात पुलं, चिंवि इत्यादी शिकवताना मुलांच्या चेहऱ्यावरची रेष हलायची नाही, ते आठवलं.
पुलंनी आणि त्यांच्या फडणीसानी रेखाचित्राऐवजी ईमोजी टाकल्या असत्या, तर बिचारी मुलं हसली तरी असती...😣😣

Feb 14, 2023

स्त्रियांचे प्रेम -

 

प्रेमात स्त्रियांना काय हवं असतं, ते अजून नेमकं स्त्रियांनाही कळत नाही. तर बाकीच्यांना काय कळणार..
त्यात स्त्रियांच्या मागे निसर्गाने आणि पितृसत्तेने लावलेली कर्तव्ये, अपेक्षा, अडसर, बंधने, भीती इत्यादी धरून स्त्रियांची मानसिक आणि भावनिक जडणघडण अत्यंत गुंतागुंतीची झालेली आहे. शिवाय ती प्रत्येक स्त्रीची वेगळी असते. सामाजिक स्तराप्रमाणे देखील बदलते.

  
या सगळ्या सामाजिक जडणघडणीत आणि काही निसर्गाच्या अपेक्षा, यानुसार पुरुषांच्या प्रेमातल्या अपेक्षा आणि स्त्रियांच्या या वेगळ्या होतात. तिथे गोची अजून वाढते. निसर्गाने मानवप्राण्याच्या सेक्शुअल भावना प्राण्यांप्रमाणेच ठेवल्यात, पण माणसाला इतर प्राण्यांच्यापेक्षा बुद्धी आणि भावना या जास्तीच्या देणग्या दिल्याने त्यातली गुंतागुंत आणि भेद वाढत गेलेले आहेत.

त्यात आमच्यासारख्या अर्धे वय उलटत चाललेल्या स्त्रियांची गोची तर अजून वेगळीच आहे. एकीकडे परंपरेचा पगडा, तर दुसरीकडे आधुनिक काळाच्या तनमनाकडून होत असलेल्या लोभस मागण्या..या दोन्हीत ओढाताण होते. जाए तो जाए कहां....

कुणी कितीही मुलामा चढवला, तरी पुरुष प्रेमात आधी सेक्स, शरीर यांच्या अपेक्षा ठेवतो हे सार्वकालिक सत्य अजूनही अबाधित आहे. एवढंच नाही, तर एकाच शरीराला तो लवकर कंटाळतो स्त्रीच्या तुलनेत, हेही सत्य आहेच. एखाद्या स्त्रीच्या मैत्रीत देखील शरीर मिळण्याची शक्यता नसली, तरी तो त्या मैत्रीला कंटाळतो. आणि स्त्रियां हे पटकन ओळखतात. त्यांना नेमके तेच आवडत नाही.

स्त्रियांना सेक्स नको असतो असे नाहीच, पण त्याबरोबर त्या आधी आणि त्या नंतरही त्यांना हजारो गोष्टी हव्या असतात. त्यात त्या सगळ्या प्रत्यक्षात हव्याच असतात असेही नाही, पण प्रेमातला पुरुष त्या द्यायला तयार आहे, द्यायचा प्रयत्न करतोय, एवढेही त्यांना खूप असते. कारण त्या भावनेनेच अधिक गुरफटलेल्या असतात. अर्थात पुन्हा पुरुषाची नाटकी वचने आणि प्रामाणिकपणा हे देखील त्या झटकन ओळखतात. त्यामुळे पुन्हा गफलत होतेच.

उदा. अगदी बेसिक पातळीवर घेतलं, समजा एखादा दागिना स्त्रीला हवाय, पुरुष तो देण्याचे प्रॉमिस स्वतःहून करतोय, मला तुझ्यासाठी हे घ्यायची फार इच्छा आहे असे म्हणतोय हेच त्यांना सुखावतं. प्रत्यक्ष तो ते नाही घेऊ शकला काही कारणाने तरी त्यांना ते चालतंय. त्या समजून घेऊ शकतात. पण आपल्या इच्छेची याला काही पडलेलीच नाही. त्याला ते महत्त्वाचे वाटतच नाही हे पाहून त्या जास्त दुखावतात.

या दागिन्याच्या ठिकाणी काहीही असू शकतंय, फिरायला जाणे, निवांत बसून गप्पा मारणे, सिनेमा नाटकाला जाणे, घर, कपडे, वस्तू खरेदी करणे, सफाई करणे, सजावट करणे, नातेवाईकांकडे जाणे, गाणी ऐकणे, शिजवून खाऊ घालणे.... ही यादी खूप असते. पुरुषाने त्यात रस दाखवावा.. बस. पण बहुधा पुरुषांना तो रसही दाखवायचा नसतोच. कारण त्यांना त्या एकाच स्त्रीबरोबर आणि सातत्याने हे करायचा कंटाळा लगेच येतो.  मग ते त्यावर हिडीस विनोद करू लागतात.

अगदी माझेच उदाहरण द्यायचे झाले, तर माझ्या नवऱ्याला चांगला सैपाक करता येतो. तो मलाही करून खाऊ घालतो. क्वचित नव्हे, तर अनेकदा. नित्यच म्हटलं तरी चालेल. पण त्याचं म्हणणं असतं की तो सैपाक करताना मी तिथे उभं राहायचं नाही. आणि मी करत असताना तो तिथे येत नाही. आता इथे माझ्या अपेक्षा वेगळ्या असतात. त्याने काही करू नये. फक्त मी सैपाक करत असताना सैपाकघरात बसावं. माझ्याशी गप्पा माराव्यात. एखादी वस्तू लागली तर पटकन हाताशी द्यावी. फळीवरचे डबे काढून द्यावेत. माझी ही रोमान्सची साधी अपेक्षा आहे. त्यातून माझा सहवास त्याला आवडतोय हे प्रतीत होत असतं. पण नेमके तेच करायला त्याला आवडत नाही. त्याला वाटतं मला हाताशी तिथे नोकर हवा असतो... 🙈

नवरा किंवा प्रियकर, जरी असा नीरस असला तरी जिस पे दिल आया है, तिथे स्त्रियांचा नाईलाज होत असल्याने, (कारण असा पटकन त्यांचा दिल कुणावर येत नाही. (कारण त्या फक्त शरीर बघत नाहीत. त्या पैसा बघतात हा देखी आरोप अपवादात्मकच आहे. त्यांना फक्त ती व्यक्ती क्लिक व्हावी लागते. ) त्या त्या पुरुषाला चिकटून राहतात. राहण्याचा प्रयत्न करतात. पुरुषाला वाटते, की ही आपल्याशी एकनिष्ठ आहे, आपल्याशिवाय तिला कुणात रस नाही. ती तशीच असावी असेही त्याला वाटत असतेच. पण प्रत्यक्षात ती राहते कारण तिच्यात सेक्सच्या पलिकडचे वात्सल्यप्रेम शिल्लक असते. सेक्स अबाधित असतोच. पण तो ती परिस्थितीनुसार दडपू शकते. या दडपण्याचे दुष्परिणाम होतातच. पण ते ती झेलते. ती तुमचे प्रेम संपल्यावरही तुम्हाला सहन करत राहते ती करुणेने. वात्सल्याने. प्रेम तिचेही संपलेले असू शकतेच.

पुरुषाला स्त्रीचे कपडे काढण्यात रस असतो. ज्या दिवशी कपडे नेसतानाही पुरुष तिच्याकडे प्रेमाने पाहील, हुक्स काढण्याइतकाच रस हुक्स, साडीची पिन, साडीच्या निऱ्या निट लावून देण्यात दाखविल तेव्हा तिला त्याच्याबद्दल अधिक प्रेम वाटत असते. केस मोकळे करण्याइतकाच रस पुन्हा वेणी घालून, बांधून देण्यात दाखवलेला तिला जास्त आवडतो.  कारण इथं घेणं आणि देणं हा फरक असतो. धुतलेले तिचे केसही टॉवेलने पुसून दिलेत तर तिला का नाही आवडणार ते? 
अरे, कधी तिचे केस धुवून दिलेत, केसांना तेलाचा मसाज करून दिलात, तर त्या दिवशी ती तुम्ही म्हणाल ते करायला तयार होईल. स्त्रियांना केस धुण्याचा कंटाळा येतो. त्यांना ते आयते वायते धुवून हवे असतात. लहानपणी आई धुवून द्यायची तसेच. त्यासाठी त्या पार्लरमध्ये जातात. पैसे खर्च करतात. हे कधीच पुरुष लक्षात तरी घेतात का?  असे पुरुष मोजकेच.


स्त्रिया कृष्णाच्या प्रेमात का असतात? कृष्ण राधेचे केस विंचरून देतो. कृष्ण राधेला, द्रौपदीला एवढंच नव्हे, तर अगदी रुक्मिणीला, सत्यभामेलाही आपला सगळ्यात महत्त्वाचा वेळ देतोय. तिचं ऐकून घेतोय. तिच्याशी मैत्री करतोय. तिच्या खोड्या काढतोय,  कृष्णाच्या शृंगाराच्या कथा थेट सेक्सशी संबंधित कधीच नसतात. तसं असतं, तर सर्व मंदिरांच्या कामशिल्पात कृष्णच दाखवला असता. तसा तो तिथे कधीच दिसत नाही.  हे सर्वसामान्य पुरुष फार क्वचित करतो.

होतं काय, की पुरुषाच्या सेक्सच्या अपेक्षा स्त्री समजून घेते. अनेकदा इच्छा नसली तरी त्याच्यासाठी ती तयार होते. पण स्त्रियांच्या या छोट्या छोट्या रोमान्सच्या अपेक्षा पुरुष समजून घेण्याचा प्रयत्नही करत नाहीत. अनेकदा त्यावर विनोदच केले जातात. 
आणि मग दोघांच्या प्रेमाच्या अपेक्षा दोन वेगळ्या दिशांची वाट धरून चालत राहतात.......


Jan 22, 2023

उरुळीकांचन निसर्गोपचार आश्रम

 खूप जणांनी विचारलं होतं, की उरळीकांचनबद्दल लिही म्हणून

उरळीकांचन हे पुण्याच्या पुढे सोलापूर रस्त्यावर असलेलं गांव. इथं म. गांधीजींनी १९४६ साली स्थापन केलेला आश्रम आहे. या आश्रमात निसर्गोपचार करून बऱ्याच लहानमोठ्या व्याधींपासून सुटका केली जाते. जास्तीचं वजन कमी केलं जातं. 

हा आश्रम जवळपास ३५ एकरावर पसरलेला आहे.

इथं उपचार घेण्यासाठी इथं निवास करावा लागतो. निवासासाठी वेगवेगळ्या प्रकारची संकुलं आहेत. 

सर्व प्रकारचे उपचार हे नैसर्गिक आधारावर केले जातात. यात वेगवेगळ्या प्रकारचे मसाज, स्टीम बाथ, ऍक्युपंक्चर, मड थेरपी, सात्विक आहार, रसाहार, काढे, योग, हलका व्यायाम, पंचकर्म, चालणे इत्यादीचा समावेश असतो. नॅचरोपॅथीचा अभ्यास केलेले  डॉक्टर इथे आधी तुमच्या तक्रारी ऐकून घेतात, वजन बीपी शुगर इत्यादी तपासले जाते. त्यानंतर ते तुम्हाला आहार, योगा प्रकार, वेगवेगळ्या थेरपींपैकी तुम्हाला योग्य असणाऱ्या थेरपी लिहून देतात. दुसऱ्या दिवसापासून सकाळपासून या थेरपी सुरू होतात. यात रोजच्या रोज मसाज, स्टीमबाथ, मड थेरपी, सन बाथ इत्यादी सुरू होते. जोडीला त्यांनी सुचवलेले रस किंवा ज्युसेस वेळच्या वेळी दिले जातात. सकाळचे शेडयुल पहाटे पाचपासून सुरू होते. सकाळचे जेवण साडेबाराच्या आत तर संध्याकाळचे साडेसहाच्या आत उरकायचे असते. ते लिमिटेड आणि बिन तिखटाचे बिन तेलाचे असते. तरीही ताजे, गरम आणि चविष्ट असते. 

इथे अतिरिक्त वजन असलेले बरेच लोक वजन कमी करण्यासाठी येतात. आणि त्यांना आश्चर्यजनक रिझल्ट मिळतो. 

सध्याच्या धावपळीच्या, स्पर्धेच्या आणि धकाधकीच्या जीवनात आपला रोजचा दिनक्रम अस्तव्यस्त झालेला असतो. झोपण्याच्या जेवणाच्या वेळा अनैसर्गिक झालेल्या असतात. त्याचेच दुष्परिणाम आपल्या शरीरावर दिसतात. आणि तक्रारी सुरू होतात. त्याच तक्रारी नंतर मोठ्या आजारांना आमंत्रण देतात. त्यामुळे जरी मोठे आजार नसले, तरी बॉडी डिटॉक्स करण्यासाठी, दिनक्रमाची योग्य, नैसर्गिक शिस्त लावून घेण्यासाठी सर्वांनीच इथं काही दिवस राहून जरूर उपचार घ्यायला हवेत. कमीत कमी आठवडा ते महिनाभर इथे राहून उपचार घेतल्यास अतिशय फ्रेश, हलके आणि उत्साही वाटू लागते.. कारण इथे आहार-विहाराची नैसर्गिक शिस्त शरीराला लावली जाते. 

हा सेवाभावी आश्रम असल्याने इथे व्यवसाय म्हणून हे उपचार दिले जात नाहीत. अतिशय माफक दरात या सर्व सेवा आपल्याला इथं मिळतात. साधारण दिवसाला माणशी १०००-१५०० पर्यत खर्च येतो. यात राहणं, जेवण, रसाहार, वेगवेगळ्या थेरपी, डॉक्टरांची तपासणी हे सर्व आले. 

त्यामुळे इथे देशभरातूनच नव्हे, तर परदेशांतूनही लोक उपचार घेण्यासाठी येत असतात. परिसर अतिशय शांत रम्य, भरपूर झाडे, बाग, शुद्ध हवा, आहारात नैसर्गिक रित्या पिकवलेले धान्य, फळं, रस इत्यादीमुळे आपोआप छोट्या मोठ्या शारीरिक तक्रारी दूर होऊ लागतात. 
इथला सर्व स्टाफ विनम्र, सेवाभावी आहे. 
इथं एकावेळी २००-२५० लोक उपचारासाठी राहू शकतील इतकी क्षमता आहे. यात स्त्री-पुरुष दोन्ही आले. थेरपीसाठी पुरुषांना आणि स्त्रियांना वेगवेगळी व्यवस्था आहे. एवढ्या लोकांसाठी लागणारा मोठा स्टाफ आहे. उदा. केवळ स्त्रियांच्या मसाजसाठी ३०-३५ मसाजिस्ट महिला आहेत. 
या आश्रमामुळे इथल्या स्थानिक लोकांना मोठा रोजगार मिळाला आहे. गांधीजींची ग्रामसुधार योजना या आश्रमाचा एक भाग आहे.
इथलं बुकींग ऑनलाईन होतं. त्यासाठी उरुळीकांचन निसर्गोपचार आश्रम असं सर्च केलं की साईट सापडते. 

धुणं -

 शरीफा नेहमीच जुम्म्याची वाट बघत असायची मनोमन. ज्याप्रमाणे नोकरदार लोक रविवारची वाट पाहात असतात तशीच. जुम्मेरातपासून म्हणजे गुरूवारपासूनच तिच्या मनावरचा ताण कमी व्हायला सुरूवात व्हायची. केवळ शुक्रवारच्या इंतजारमध्ये. आणि शनीवारपासून पुन्हा पुढच्या शुक्रवारकडे तिचे डोळे लागून राहायचे. 

शरीफा मजिदची पहिली बायको. दोन मुली झाल्यावर मजिदने गावातल्याच एका मुलीच्या प्रेमात पडून तिच्याशी दुसरे लग्न केले होते. त्या गावात, आणि त्यांच्या धर्मात हे नवलाचे नव्हते. त्यातही एक लग्न घरच्यांच्या मर्जीने तर दुसरं आपल्या मर्जीने असं करणारेही पुरुष होते. तरी देखील अशा प्रकारे दोन लग्न करणारे पुरुष संख्येने कमीच असत. ज्यांची घरं मोठी आहेत, बऱ्यापैकी पैसा आहे आणि मुळात तशी  रंगीन वृत्ती आहे असेच वीर पुरुष विनाकारण दोन लग्ने करत. बाकीचे मात्र मुलगा नसेल, पहिली बायको मेली असेल, किंवा तिला सोडून दिलं असेल कुठल्या कारणाने तरच दुसरं लग्न करत. 
त्यामुळे मजिदने दुसरं लग्न केलं म्हणून शरीफाच्या आयुष्यात काही फार फरक पडला होता असं नाही. मजिद आणि त्याचा भाऊ नासिर हे दोघे आपल्या मोठ्या बहिणीच्या भल्या थोरल्या घरात लहानाचे मोठे झाले, तिथेच आई आणि ते राहिले. बहिणीचा नवरा अपघातात वारला होता, पण मागे बराच पैसा, नुकताच बांधलेला नवीन बंगला आणि बहिणीच्या पदरी पाच मुलं सोडून गेला होता. त्यांची बहीण अमीना हिने देखील सासरच्या माणसांना दूर ठेवून आपला माहेरचा हा सगळा गोतावळा आपल्याजवळ आणून ठेवला. घरात पुरुष माणूस असावा म्हणून हे दोन्ही भाऊ जवळ असलेले बरे होते.  दाम करी काम या न्यायाने भाऊ, आई, दोन्ही भावांच्या दोन दोन मिळून चार बायका या सगळ्या अमिनाच्या शब्दाबाहेर नसायच्या. तशी हिंमत नव्हती. कारण सगळा ऐशोआराम विनासायास तिथे मिळत होता. 

मनात आलं तर दोघे भाऊ आळीपाळीने बोटीवर किंवा गल्फमध्ये नोकरीसाठी अधनमधनं एक दोन वर्ष चक्कर मारून येत. थोडा पैसा कमावून आणत. दोघांनी दोन दोन बायका केल्या तरी अमिनाने त्याना हरकत घेतली नव्हती. कारण एक बाई घरात जास्तीची येणं म्हणजे एवढ्या मोठ्या खटल्यात कामाला बिनपगारी माणूस मिळणं असंच होतं..

दोन भावांच्या चार बायकांपैकी तिघींना कामं वाटून दिलेली होती. एक सदैव चौवीस तास पेटत्या चुलीचे सैपाकघर सांभाळत होती. एक दिवसभर गावाबाहेरच्या विहीरीवरून पाणी भरत होती. तर एक अमिनाची पाच आणि या तिघींची मिळून सातआठ अशी बारा पंधरा पोरं सांभाळत होती. दिवसभर खाटेवर बसून गावभराचं गॉसिप्स करत बसलेल्या अमिनाच्या हातात चहाचे पेले, जेवणाची ताटं आणून देत होती. अमिनाची आई या तिघींवर सुपरवायझरचं काम करत होती. तिला सगळे दादी म्हणत. 
थोडक्यात दादीलाही काम होतं. त्या घरात काम नव्हतं ते फक्त अमिनाला आणि तिच्या मुलांंना. 

यात चौथी जी होती ते प्रकरण हुश्शार होतं. ते म्हणजे मजिदच्या दुसऱ्या बायकोचं. मजिदने तिच्या प्रेमात पडून तिच्याशी दुसरं लग्न केलं खरं, पण ती लग्न करूनही सासरी येऊन राहिली नाही. माहेरीच राहिली. तिचं माहेरही सधन होतं. जोपर्यंत मजिद स्वतःचं घर करून स्वतंत्रपणे राहत नाही तोपर्यंत सासरी येणार नाही असा प्रेमळ धाक तिने घालून ठेवला होता. कारण सासरी जाणं म्हणजे कामाला नोकर म्हणूनच जाणं, त्या तिघींच्या जोडीला. हे तिला पक्कं ठाऊक होतं. ती माहेरी लाडकी होती. माहेरच्यांनी तिला लग्नानंतरही प्रेमाने आपल्याजवळच ठेवून घेतलं  होतं. ती फक्त सणावारी, प्रसंगपरत्वे अमिनाबायच्या बंगल्यात आपली पायधूळ झाडायला येई. तरी तिचं अमिनाबायसह सगळ्यांना कौतुक होतं. तिचं कपाळ भव्य होतं. आणि भव्य कपाळाच्या बाया फार नशीबाच्या, कुटुंबाचं कल्याण करणाऱ्या असतात असं अमिनाबायची मोठी मुलगी मुमताज माझ्याशी बोलताना म्हणायची. मुमताज माझ्या वयाची माझी मैत्रीण होती.  
मुळात तिचं सासरी न येणं चालवून घेतलं जात होतं कारण ती घरची सधन होती. सासरच्यांवर अवलंबून नव्हती. बाकीच्या तिघी मध्यम घरातल्या होत्या. त्यातील एक तर माहेरच्यांचा विरोध पत्करून पळून नासिरबरोबर दुसरी बायको म्हणून लग्न करून आली होती. तिला आता पुन्हा माहेरी स्थान नव्हतं. तिच्याच माथी दिवसभर लागणारं पाणी विहिरीवरून वाहून आणण्याचे काम मारण्यात आले होते. 
दिवसभर ती आमच्या घरासमोरून पाण्याच्या खेपा मारताना दिसे आणि माझी आई म्हणे, "बघा.. प्रेमलग्न केल्याचे  परीणाम. पाण्याचे हंडे वाहून वाहून बिचारीचं टाळकंही झिजलं." खरंतर तीही घरची बरीच होती. पण मुलगी आपल्या मर्जीविरोधात लग्न करते म्हणजे काय? जातीत आणि स्वधर्मातही केलं म्हणून काय झालं? आपली मर्जी पोरी चालवूच कशा शकतात? आता भोग आपल्या कर्माची फळं. सासरचे लोक देखील अशा पोरींना बरोब्बर राबवून घेत. तोंड दाबून बुक्क्यांचा मार. 

पण सगळ्याच मुली अशा नव्हत्या. बऱ्याचशा मुली मजिदच्या दुसऱ्या बायकोसारख्या खमक्या असायच्या. आधी तू देखील घराबाहेर पड मग मीही येते तुझ्याबरोबर पळून. आपण स्वतंत्र राहू अशी अट घालणाऱ्या मुली आणि ती स्वीकारून तसे राहणारे बहाद्दूर गडी देखील होतेच. नव्हते असे नाही. कारण पळून गेले, नि स्वतंत्र राहिले तरी पुरुषांना कुणी त्यासाठी कायमचं वाळीत टाकत नाही. घरचे त्यांना नंतर स्वीकारतातच.
त्यामुळे त्या गावात अमुकच अशी चाल सगळीकडे नव्हती. सहन करणाऱ्या सोशिक स्त्रिया होत्या तशाच त्यांना राबवून घेणाऱ्या नि आपल्याच मस्तीत आपल्या अटीवर टेचात राहणाऱ्या बायाही तिथं होत्याच.  विनाचकारण दोन दोन लग्नं करणारे गडी होते, तसेच अगदी रामाप्रमाणे आयुष्यभर एकपत्नी राहणारेही भरपूर होतेच. दुसरं लग्न केलं नवऱ्याने म्हणून त्याच्याशी बोलणं टाकून एकाच घरात राहून संबंध तोडणाऱ्या बायका होत्या नि प्रेमाने सवतीसोबत एकत्र राहणाऱ्याही होत्या. कुणी नवऱ्याला सोडून माहेरी जाऊन राहणाऱ्या होत्या नि त्यांना सांभाळणारी प्रेमळ माहेरंही होती. तर कुणी प्रेमलग्न केलं म्हणून मुलीला कायमची मेली म्हणून तिच्या नशीबावर सोडणारेही होते.
गावात अशी, यशस्वी झालेली, फसलेली, तुटलेली, विरोधात आत्महत्या करून मेलेली प्रेमप्रकरणं भरपूर असायची. गडी तगडे देखणे होते नि बायाही खमक्या नि देखण्या होत्या. बुरखा नावालाही नव्हता. एकेकीच्या प्रेमकहाणीवर प्रतिभावंत लेखक दीर्घकथा लिहू शकेल नि त्यावर एखादी फिल्म निघू शकेल अशा कहाण्या आमच्या गावात घडत होत्या. गावच प्रेमळ होतं. खातपितं निवांत होतं. त्यामुळे प्रेम करायला सवड होती. 

तर ते असो. 

आपण बोलत होतो शरीफाबद्दल. मजिदची पहिली बायको. जिला घरातल्या पंधरा-वीस जणांचं सैपाकघर सांभाळावं लागत होतं. दिवस सारा सैपाकघरात जायचा. एवढ्या लोकांसाठी सकाळसंध्याकाळ 'चावलच्या रोट्या' बडवायच्या, सालन शिजवायचं, सारखा चहा करत राहायचं, मासे बिसे साफ करायचे, धान्यधुन्याची निगुती करायची. यात तिला बाहेरचा तुकडाभर आभाळही बघायला फुरसत नसे. नासिरची दुसरी निदान पाण्याच्या खेपा मारायसाठी तरी दिवसभर बाहेरचं जग बघत होती. चार लोकांबरोबर वाटेत, विहिरीवर गप्पा मारायची संधी तिला मिळायची. थोडं रेंगाळायची पण. शरीफाला मात्र सतत दादीचा पहारा नि सैपाकघर यातून मान वर करायला मिळायची नाही. नवऱ्याशी बोलायचं ते रात्रीच. खोलीत गेल्यावर. शिवाय दिवसभर हे दोघे भाऊ घरातही कमीच असायचे. घरात सगळ्या बाया नि लहान मुलं यांचंच राज्य. गावातल्या बहुतेक घरांत हीच परिस्थिती होती. एखादा पुरुष. बाकी सगळ्या बाया.  बाकीचे पुरुष परदेशी.
म्हणून ती जुम्म्याची वाट बघायची. जुम्म्याला सगळ्यांच्या कंपल्सरी आंघोळी. पाण्याचं दुर्भिक्ष्य होतं गावात. डोक्यावरून एक एक हंडा आणावा लागे. एकदोन किमीची फेरी मारून. त्यात रोज आंघोळ केलीही तरी कपडे मात्र रोज धुवायला टाकले जायचे नाही. दोन तीन दिवस एकच साडी. तेच कपडे. काम करताना त्यावर एप्रन बांधून घेतलं जायचं. त्यामुळे साड्या मळायच्या नाही. पुरुष देखील एक लुंगी चार पाच दिवस पुरवायचे. बाहेर पडताना शर्टावर जन्नत-ए-फिर्दौस शिंपडले की काम झाले. 
जुम्म्याला सगळ्या घराचे आठवडाभराचे कपडे धुवायला निघायचे. ते काम शरीफाकडेच होते. त्या दिवशी तिला सैपाकघराला सुट्टी असायची. भल्या सकाळीच कपड्यांची बोचकी घेऊन नदीवर निघायचं. उशीरा गेलं तर चांगला दगड मिळायचा नाही. नदीवर आधीच गर्दी झालेली असायची बायांची. त्या चांगलं खोल असलेल्या पाण्याची ठिकाणं आणि चांगले गुळगुळीत दगड पटकावून बसायच्या. 
शरीफा याचसाठी शुक्रवारची वाट बघत असायची. आठवड्यातून एक पूर्ण दिवस दादीचा पहारा, चुलीचा ताप सोडून तिला मोकळं वावरायला मिळायचं. चार बायांशी गप्पा टप्पा करायला मिळायच्या. बाहेरची हवा अंगाला लागायची. त्यात पुन्हा नदीवर जाणं हे तर फारच सुखाचं आनंदाचं होतं. गावाला कवेत घेऊन खळखळत वाहणारी ही अगदीच ओढा म्हणावा अशी छोटीशी नदी. उन्हाळ्यात खालून जसजशी आटत जाई तशी वर वर  पाण्याची ठिकाणं शोधत गावापासून दूर जावं लागे कपडे घेऊन. तिथं दोन्हीतीरी भरपूर झाडी, सावली आणि निवांतपणा असायचा.  

तनमन एकदम प्रफुल्लित होऊन जाई शरीफाचं. बोचकी एकदा किनारी टाकली की ती अर्धा घटका आराम करून घेई तिथल्याच एखाद्या खडकावर बसून. आज कोण कोण आलंय कपडे घेऊन, ती नजर फिरवून घेई.एकमेकींना हाकारणं होई.  तिच्या सोबत घरातल्या एकदोन लहान मुली मदतीला असत. त्यांना बोचकी सोडून कपडे काढ, त्यांचे ढीग कर, साबण भिजव अशी छोटी मोठी कामं सोपवून ती निवांत बसून घेई. हे स्वातंत्र्य शरीफाला इतकं प्रिय वाटायचं की त्यापुढे आता दिवसभर कपड्यांची ही बोचकी धुऊन काढायचीत हे कष्ट देखील तिला मामूली वाटायचे. आता दिवसभराची निश्चिती असायची. वाहत्या पाण्यात कपडे धुणं हे तसंही फार कष्टाचं काम नसे.

तिच्यासारख्या अनेक स्त्रिया त्या दिवशी कपड्यांची बोचकी काढून नदीवर हजर असायच्या. नदीचे काठ फुलून जायचे. सोबतच्या लहान लहान मुली-मुलं चिवचिवत असायची. कपडे धुवायचे. काठावरच वाळवायचे आणि ते वाळले नि उन्हं कलायला लागली की त्यांच्या घड्या करून शुभ्र धुतलेले कपडे पुन्हा धुतलेल्या बोचक्यात निगूतीने बांधून सावकाश संध्याकाळी घरी परतायचं. घरून भाजी-भाकरी बांधून आणायची. कपडे धुवून वाळत घातले की दुपारी उशिराने ती खाऊन घ्यायची. झाडाखाली गप्पा मारत बसायचं. सगळ्या गावाची हालहवाल तिथे कळे. माहेरच्या स्त्रियांची भेट होई. सुखदुःखाच्या गोष्टी होत. बहुतेकींचे सासरमाहेर गावातच. गावातच लग्नं होणं हे मानाचं, प्रतिष्ठेचं समजलं जाई. ज्यांच्याबद्दल , खऱ्या खोट्या वावड्या उठलेल्या असत त्यांची गावात लग्नं होणं कठीण असे. त्यांना आजुबाजूच्या गावात स्थळं शोधावी लागत. 


सादिकासारख्या सिनेमांच्या गाण्यांची, शेरोशायरीची, गजलांची आवड असणाऱ्या तिथं मुक्त गळ्याने गाऊन घेत...

ऐ मेरे हमनशीं, चल कहीं और चल... इस चमन में भी अपना गुजारा नहीं.

बात होती गुलों तक तो सह लेते हम... अब तो कांटों पे भी हक हमारा नहीं.....

सादिकाच्या तोंडून ऐकलेल्या गैरफिल्मी गजला अजून जशाच्या तशा आठवताहेत...

माझ्या कडे पाहून म्हणायची..

गोरी चलो न हंस की चाल... जमाना दुश्मन है...

तेरी उमर है सोला साल.....

मी खरंच तेव्हा सोळा-सतराची होते. क्वचित सुट्टीत त्यांच्या ग्रुपमध्ये सामील व्हायची.

नदीचे दोन्ही काठ वाळत घातलेल्या रंगीबेरंगी कपड्यांनी सजायचे. सगळ्यांचे कपडे भारीतले. टेरीनचे इंपोर्टेड शर्टंस, झुळझुळीत साड्या, लहान मुलामुलींचे सुंदर सुंदर झगे, झबले आणि ते सगळे धुण्यासाठी तसेच इंपोर्टेड सुगंधी साबण, पावडरी. ते मी पाहात राहायची. आमच्या धुणेवाल्या बाईंकडे आई मोजून पाचशेएक साबणाचा एक तुकडा कापून देई. तो लावल्यावर आमचे कॉटनचे कपडे पांढरे व्हायच्याऐवजी अजून पिवळे दिसत. आमच्याकडे इंपोर्टेड वस्तू नसायच्या. त्या फक्त मुस्लिम घरांतूनच असायच्या. कारण सारे बोटीवर किंवा गल्फला नोकऱ्यांना. वर्षातून एकदा आले की मोठमोठ्या ट्रंका भरून सामान आणायचे. कमीत कमी शंभरेक झुळझुळीत साड्या, पंचवीसेक छत्र्या, सुऱ्या, कातऱ्या, परफ्युम्स, साबणं नि काय काय.....
आमच्या घरी कपडे धुण्यासाठी बाई होती. तिच्याबरोबर मी अनेकदा नदीवर जायची. शुक्रवारी ती वैतागायची. म्हणायची, 'आज नदीवर जागा सापडायची नाही, दगड मिळायचा नाही चांगला.' अशावेळी एखादा नवीन दगड शोधावा लागे. तो वापरात नसल्याने घासून घासून साफ करावा लागे. तरी त्याचीच घाण कपड्यांना लागे. असे पुन्हा पुन्हा घासून गुळगुळीत झालेले दगड पुन्हा लवकर येणाऱ्या बाया पटकावत. पण कोणाची तक्रार नसे. कारण ही गर्दी फक्त शुक्रवारी. बाकीच्या दिवशी बायांनी घासून मऊ केलेले हे सारे दगड आपापल्या सख्यांची वाट बघत स्वच्छ, पण कोरडे ठाक पडलेले असायचे. आणि त्यांच्या सख्यांनाही शुक्रवारचा इंतजार असायचा.

कपडे घेऊन घरी गेल्यावर त्या दिवशी घरात त्या बाईला फार काम नसे. बिचारी दिवसभर कपडे धुऊन आलेय याबद्दल सहानुभूती असे. संध्याकाळचं जेवणही घरात राहिलेल्या बाईने शिजवायला घेतलेलं असायचं.


फक्त दगडच नव्हे, तर शुक्रवारी नदी देखील आनंदात थबकायची. संथ व्हायची. दोन्ही काठावरच्या बायांच्या गप्पा, गाणी, क्वचित छोटंसं भांडणं, वादावादी ऐकत. त्यांचे कपडे धुवू लागायची.  आठवडाभराचा तिचा एकटेपणाही भरून निघायचा. एरव्ही ती देखील एकटीच दिवसरात्र पाणी वाहत राहायची. नासिरच्या बायकोसारखीच...!

Jan 16, 2023

आपले सण आणि उत्सव

संक्रांत आणि अश्विन नवरात्र हे दोन उत्सव भारताच्या बहुतांश सर्व राज्यात साजरे होताना दिसतात.
भारतीय बहुतांश सण उत्सव हे ऋतुचक्र आणि त्यातील बदल यांना अनुसरून असतात, हे जवळपास सगळ्यांना माहीत आहे.
जरी हे सगळे आता अधिकतर हिंदू धर्माला जोडले जात असले, आणि एके काळी त्यांच्यावर सवर्णांनी कब्जा केलेला असला तरी खरं तर हे सगळ्यांच्याच जीवनाशी जोडले गेलेले आहेत, किंवा असायला हवेत. ऋतुमानानुसार आहार, विहार, पोशाख इत्यादी साऱ्याच गोष्टीमध्ये बदल करत आयुष्य सुखकर आणि आनंदी करून घेण्याचा हक्क प्रत्येकाला आहे. त्याचा थेट संबंध धर्माशी ना जोडता, म्हणूनच सर्व धर्मीय भारतीय यांनी त्यात सहभागी व्हायला हवे.
तिळगुळाचे संबंध धर्म आणि जातीशी नसून थंड हवामानात उष्ण आणि स्निग्ध पदार्थ सेवन करण्या शी आहे.
नवरात्रीत हिरवा रंग हा धर्माशी संबंधित नसून धर्तीवर पावसानंतर उगवून आलेल्या संपन्न हिरवाईशी आहे.
दिवाळीत रोषणाईचा संबंध धर्माशी नसून अश्विनातल्या काळोखाशी आहे..
त्यामुळे धर्म आणि पूजा प्रतीके यांना बाजूला ठेऊन सर्व भारतीयांनी आपले भारतीय सण मस्त साजरे करावेत. हे सुंदर सण कुणा एका धर्म किंवा जातीची मक्तेदारी नाही.
- अलका गांधी - असेरकर

किसी पिछले जनम की बात...

मुगले आजम हा सिनेमा पन्नास वर्षानंतर रंगीत झाला, त्यालाही आता जवळपास 20 एक वर्ष लोटली. 🤦काळ किती भराभर चाललाय...    तेव्हा टीव्हीवर दिलीप क...