Aug 23, 2020

सहज आठवणी -

 सहज आठवणी - पाणी

रायगड जिल्ह्यातल्या ज्या गावात राहात होतो. त्या परिसरात पाऊस प्रचंड. धो धो. अक्षरशः तीन महिने तर तो घरात लॉकडाऊन करून ठेवायचा. हलायचा नाही. कुठे जाणं नाही येणं नाही. 

पण तेवढाच हा भाग पाण्यासाठी दुष्काळी म्हणूनही प्रसिद्ध होता. पावसाचं पाणी सगळं वाहून जायचं. ते साठवून ठेवण्यासाठी काहीही कुणी केलं नव्हतं. 
होळी झाली की, किंवा कधी कधी होळी येण्याआधीच, मार्चमध्ये पाण्याची बोंबाबोंब सुरू व्हायची. ते पाऊस पडेपर्यंत पाण्याचे हाल असायचे. 

गावातली छोटीशी, इवलासा जीव असलेली एक नदी पण आटत आटत संकोचून जायची. नदीचं पाणी असंही प्यायला वापरत नसत लोक. 
गावात जातीप्रमाणे विहिरी होत्या. 
मुसलमानांच्या दोन, हिंदूंच्या दोन, दलित वस्तीत एक. 
यात मुसलमानांची एक विहीर आटायची आणि दुसऱ्या विहिरीत बऱ्यापैकी पाणी उरायचं. निगुतीने वापरलं तर मोहल्ल्याला पुरायचं. पण त्या विहिरीवर बाकी कुणी पाणी भरायला जात नसे. आणि हिंदूंच्या विहिरीवर ते येत नसत. 

तसंच हिंदूंची नेहमीची एक बाव आटून जायची. 

दुसरी गावापासून दीड दोन मैलांवर होती. ती माझ्या पणजोबांनीच बांधून घेतली होती. 

त्या विहीरीला झरा होता खाली. उन्हाळ्यातही तो झरा जिवंत असायचा. 

नेहमीच्या विहीरीला हौदाची बाव म्हटलं जायचं. आज विचार करता वाटतंय की  त्यात हौदाप्रमाणे केवळ पावसाचे पाणी साठून राहायचे आणि झरे आटून जायचे म्हणून हौदाची बाव म्हटलं जात असेल. हौदाची बाव गावाच्या जवळ होती. नदीच्या किनारीच होती. तरी तिचे झरे आटून जायचे उन्हाळ्यात. तर दुसरी जी झऱ्याची बाव होती तिला तळईची बाव म्हटलं जायचं. बहुधा तळाला पाणी मिळायचं म्हणून तळईची बाव. हीच माझ्या पणजोबांनी बांधलेली. पण ती गावाला अर्पण करून टाकलेली. त्यावर सगळ्या गावाचाच नव्हे, तर बाजूच्या गावचा पण हक्क होता. ती गुजराची बाव म्हणून पण ओळखली जायची. 

तशी तर मागच्या परसदारी पण एक विहीर होती. ती माझ्या आजोबांनी बांधायला घेतली.  पण बरीच खोल खणून देखील तिला झरा लागला नाही. शेवटी तिचा वापरही हौदासारखा झाला. पावसाचे पाणी राहायचे. जानेवारी फेब्रुवारी पर्यंत जेमतेम. साचणीचं पाणी पिण्यासाठी उपयोगी नसायचे. धुण्यापुरतं वापरायचं. मग ती न बांधता तशीच खड्ड्यासारखी सोडून दिली होती. पण फार खोल होती. कुणी पडू नये म्हणून वरून लाकडं, लोखंडी पोलचे तुकडे वगैरे टाकून बंद करून ठेवली होती. फक्त पोहऱ्याने पाणी ओढता येईल एवढा चौकोन सोडून. 

लोक तळईच्या विहिरीवरून पाणी आणत. विहीर फार खोल नव्हती. चांगली बांधून घेतलेली होती. उतरायला पायऱ्या होत्या. त्यात खाली उतरून त्या झऱ्याचं साठलेलं पाणी वाटी वाटीने हंड्यात भरून घ्यायचे. मग तो हंडा वरती सोबत आलेल्या दुसऱ्या व्यक्तीच्या हातात द्यायचा. किंवा तसाच कंबरेत घेऊन पायऱ्या चढायच्या. 

तोपर्यंत वरती नंबर लागलेले असत. सगळ्यांना मिळायला हवे. थोडी भांडणंही होत. फार नाही. शेजारच्या छोट्या छोट्या गावांचे लोक पण येत हंडे घेऊन. ते रात्री येत कारण रात्री गावातले लोक फार जात नसत. तेव्हा झऱ्याला पाणी भरपूर साठे. अनेकदा तर बाहेरच्या गावातले लोक येऊन तिथे नंबर लावून कडेच्या रस्त्यांवर झोपून जात रात्री. एवढी पाण्याची हलाखी होती. 
एकदा का पाऊस पडायला लागला की मग कोणी या विहिरीकडे आठ महिने ढुंकूनही बघत नसे. पागोळ्यांनाच इतकं बदाबदा पाणी पडे की एक मोठा पिंप लावून ठेवला की तो सतत भरलेला राही. शिवाय या विहिरीत एका बाईने फार पूर्वी जीव दिला होता. अहिल्या नावं असावं तिचं. कारण आयलीने जीव दिलाय या विहीरीत असं म्हटलं जायचं. पण पाण्याची हलाखी इतकी होती, की त्यापुढे आयलीच्या भुताला घाबरायचे कारण उरले नव्हते. 

काही लोक आपल्या शेतात डवरे खणून ठेवत. असे दहा-पाच डवरे असतील गावात फारतर. ते खाजगी मालकीचे असत. त्यांनी त्या जागा अशा शोधून काढलेल्या होत्या, जिथे छोटासा का होईना झरा लागलेला असायचा. डोहरे वरून डवरे झालं असेल. छोटे छोटे डोह होते. ज्यांच्या मालकीचे असत ते लोक त्याला भवताली काटेरी निवडुंगाचं, थोड्याशा तारेचं कुंपण नि कुलुप लावून ठेवायचे. ते कुलूप फोडून कुणी पाणी चोरत नसे. कारण त्या डोहऱ्यांनाही उन्हाळ्यात एका कुटुंबाची जेमतेम गरज भागवण्याइतकाच जीव असे. चोरून काही उपयोग नसे. फुकट शिव्याशाप खायला लागणार. तळईच्या विहिरीजवळच असा एक एका मुस्लिम कुटुंबाचा डवरा होता. पण कुणी त्यातून पाणी चोरत नव्हतं. 
ठरवलं असतं तर माझे पणजोबा देखील त्या विहिरीला कुंपण घालू शकले असते. स्वतःच्या कुटुंबापुरती ठेवू शकले असते. पण पाण्यात पुण्य शोधणारे गुजराती होते ते. गुजरातमधून येताना देखील ते दुष्काळी भागातूनच आलेले. त्यामुळे पाणी सगळ्यांना मिळायला हवं असे त्यांचे विचार होते. प्याऊ बांधणे हे पुण्याचे काम समजायचे गुजराती मारवाडी लोक. आम्ही गेलो तरी रांगेतच पाणी घेत होतो. आम्हाला कुणी तुमची विहीर आहे, तुम्ही आधी घ्या म्हणत नव्हते.
हे असं गावात वर्षानुवर्ष चालू होतं. बाया आणि काही पुरुष सुद्धा दोन किमीवरच्या विहिरीतून डोक्यावर हंड्यातून पाणी वाहून आणत. नळ आले ते फार उशीरा. म्हणजे मी गाव सोडल्यानंतर. मी साधारण विशीत आल्यावर गावात नळ आले. तेही सार्वजनिक. त्याला दिवसातून मर्यादित वेळ पाणी येत असे. ते शेजारच्या एका गावी जिवंत झऱ्यांच्या तुडुंब विहीरी होत्या तिथून बहुधा पाईप टाकून वाहून आणलेले होते. नक्की माहीत नाही कुठून आले. 

कपडे धुवायला नदीवर. नदीही आटत आटत वर जायची. ती जितकी वर वर जाईल तिथे पाणी शोधत जायचं. वर.. वर.. तिथून कपडे धुवून आणायचे. 
अतीच झालं तर पाच सात किमीवरच्या उसर या छोट्याशा गावी जायचे. तिथे दोन पाण्याच्या विहिरी बारा महिने तुडुंब भरलेल्या असायच्या. पण रोज एवढ्या लांब जायचं खाऊ काम नव्हतं. पाच किमी जायचं नि पाच किमी यायचं.
पावसाळी भात शेती व्हायची थोडी. गाव डोंगराळ भागात होतं. दुष्काळी होतं, तरीही सधन होतं. कारण मुस्लिम सगळे बोटीवर खलाशी म्हणून किंवा आखाती देशांत नोकरीला असायचे. 

-अलका गांधी-असेरकर.


Aug 18, 2020

पाचा उत्तराची कहाणी -

  

बंडखोर स्त्रिया-

 

रजियाचा फोन आला आज थेट लंडनहून

किती वर्षांनी तिच्याशी बोलणं झालं.. जवळपास तिसेक वर्ष उलटली असतील..

मोबाईल युगामुळे, व्हाट्सप आदी सोशल माध्यमांमुळे हे शक्य झालंय. कुणाकडून तरी तिने माझा नंबर मिळवला आणि थेट फोन करून, "वलख, कोन बोलताय...? साधारण अंदाज आला पण पटकन नाव आठवेना.

ही कुणीतरी गावची मैत्रीण आहे नक्की. कोकणी मुस्लिम मराठी भाषा. पण नाव चटकन तोंडावर येईना. तेवढ्यात तीच म्हणाली, मी रजिया. वलकलास नाय मना?

हो हो ओळखलं ओळखलं. कुठे आहेस कुठे? लंडनलाच की आलेयस इथं गावी?

नाय. लंडनशीच बोलताय. आलू हुतू जनवरीत. मार्चच्या १५लाच परत घरी आलू. नि हा लॉकडाऊन लागला नाय..?

नंतर तिचं धबधब्यासारखं बोलणं सुरू झालं. सगळ्या चौकशा करून झाल्या. आपलं सांगून झालं. माझं विचारून झालं. हा काय करतो, ती काय म्हणते...

तिला तीन मुली नि एक मुलगा. सगळे तिथे छान शिकलेत. दोन मुली डॉक्टर झाल्यात, एक डिझास्टर मॅनेजमेंट शिकलीय, मुलगा वकील झालाय. एक मुलगी एकटीच अमेरिकेत राहून नोकरी करतेय.

वाह, अवघ्या पाचवी सातवी शिकलेल्या रजियाची ही प्रगती खासच होती. केवळ लंडनचा नवरा मिळाल्याने हे शक्य झालं होतं. म्हणजे नवरा तर शेजारच्याच गावचा, पण लंडनला नोकरी करत होता. तोही फार काही शिकलेला होता असं नाही. पण लंडन म्हणजे प्रश्नच नाही ना!... तेही तीस चाळीस वर्षांपूर्वी म्हणजे.... शानच होती.

खूप छान वाटत होतं. बरेच दिवसांनी ही भाषा कानी पडत होती. माझी भाषा बदलली. पण तिची अजून तीच आहे. म्हणजे मी काही ती भाषा बोलत नव्हते. पण गावी असताना आम्ही सगळ्या मुली पण आलो होतो, गेलो होतो असंच म्हणत असू. ते तालुक्याच्या गावी शिक्षणाकरता आले तेव्हाच सुधारलं होतं माझं. आलो होतोचं 'आले होते' झालं. कधीचच.

गाव सोडून तर वर्षे लोटली. ती लग्न होऊन लंडनला गेली. मी मुंबईत आले. तिचं जग वेगळं, माझं वेगळं. ते तेव्हाही वेगळंच होतं. ती माझी खास मैत्रीण होती असं नाही. गाव सोडल्यावरही गावात असणाऱ्या काकांकडे सुट्टीत जायची मी. तेव्हा या कंपूशी नव्याने ओळख झाली.
 

नव्याने अशासाठी, की तसं तर या सगळ्या मुली माझ्या बरोबरीच्या. थोड्या मागे पुढे. शेजारी राहणाऱ्या, पण लहानपणापासून मैत्री नव्हती. पिढ्यानपिढ्या एकत्र राहूनही हिंदूमुस्लिम भेदामुळे एक स्पष्ट असा दुरावा होता. त्यांची शाळा वेगळी. उर्दू माध्यमातली. आमची वेगळी. मराठी माध्यमातली. दोन्ही शाळा सातवी पर्यंतच. मी सातवी झाल्यावर तालुक्याला मामाकडे पुढच्या शिक्षणासाठी आले. या मुली तिथेच राहिल्या.. मग मी सुट्टीत गावी जाऊ लागले, तेव्हा यांच्याशी घसट वाढली. आम्ही सगळ्या तारुण्यात पाऊल टाकत होतो. मी त्यांच्या कंपूत गप्पा मारण्यापुरती सामील होऊ लागले. मुसलमान लोकांशी फार जवळीक करायची नाही,  इत्यादी नियम असण्याचा काळ जरा मागे पडला होता. मुख्य म्हणजे तसा दबाव निर्माण करणारे, रोखणारे जुन्या पिढीतील आजी आजोबा आता राहिले नव्हते.

गाव मुस्लिमबहुल असलं, तरी आमच्या गावात बुरखा नव्हता, पडदाही नव्हता. सगळ्या मुस्लिम मुली, बाया गावभर इतर हिंदूं बायकांप्रमाणेच बिनधास्त फिरत. सगळ्यांशी बोलत. पुरुषांशी गप्पा मारत. पण तरीही शेवटी स्त्रियानी कसं वागावं, कसं बोलावं, चालावं याचे अलिखित नियम सगळ्याच हिंदू मुस्लिम स्त्रियांसाठी होतेच.

पण हा पाचजणींचा कंपू काही वेगळाच होता. हा चारपाचजणींचा कंपू श्रीमंत बापांचा होता. तसं तर गावच बऱ्यापैकी सधन होतं. अशा श्रीमंत बापांच्या मुली काही कमी नव्हत्या दुसऱ्याही. पण या लाडावलेल्या होत्या. मुख्य म्हणजे कामाला आळशी होत्या. तशा तर रुढार्थाने आळशीही म्हणता येणार नाहीत. पण नदीवर धुणं घेऊन जाणे, विहिरीवरून पाणी भरून आणणे अशी श्रमाची कामं त्या करत नव्हत्या. यांच्या घरात बऱ्याच माम्या, काकी, वहिन्या असत. त्या ही कामं करत. दिवसभर राबत. त्यामुळे यांना ती कामं करावीही लागत नव्हती.
बाकीच्या मुली श्रीमंत घरच्या असल्या तरी नम्र असत. सासरी जाऊन कामं करावी लागतील याच्या तयारीत असत.

पण हा कंपू, ‘सासरी राबण्यासाठी जातात का? हॅट!’ या विचारसरणीचा होता.
गावात अशा स्त्रिया, मुली अजूनही भरपूर होत्या. स्वतंत्र बाण्याने जगणाऱ्या. समाजाची फार पर्वा न करणाऱ्या. त्यासाठी टिकाटिप्पण्या सहन करणाऱ्या. तीस चाळीस वर्षांपूर्वी. मुस्लिम असूनही!

गावात प्रेमप्रकरणंही भरपूर होत होती. त्यात सगळे प्रकार असायचे. पळून जाऊन लग्नं करणं, आत्महत्या करणं, श्रीमंत बापाच्या विरोधाला न जुमानता गरीब मुलाशी लग्न करणं, आईबाबा नाही म्हणत असूनही स्वतंत्र बाण्याच्या मुलीशी लग्न करणं, इज्जतीच्या नावाखाली मारून टाकणं. लग्न न करता आजन्म तसंच राहणं, लग्नं झाल्यावरही जबरदस्तीचं लग्न असल्याने नवऱ्याशी फटकून राहणं असे सगळे प्रकार असायचे त्या इवल्याशा गावात देखील. गाव म्हणजे जेमतेम पाचेकशे घराचं गाव असेल.  

एकेकीची कहाणी लिहायची, तर एकेकीवर सिनेमा निघू शकेल एक अख्खा. अशी उदाहरणं तीस चाळीस वर्षांपूर्वी आमच्या गावात होती. त्याच गावच्या पाण्यावर वाढलेली मीही. कदाचित त्यामुळेच ती बंडखोरी माझ्यातही आली असावी.  
गावात पद्धत अशी होती, की मुलींना मुलांकडून मंगनी यावी लागत असे. मगच लग्नं होत. त्यातच मान होता. शिवाय गावातल्या मुलामुलींची लग्नं गावातच होणं यातही मोठेपणा होता. ज्या मुलामुलींची लग्नं गावात जमत नसत, त्यांच्यासाठीच बाजूच्या गावात स्थळं शोधली जात होती. ते कमीपणाचं मानलं जात असे. गावात लग्नं होतायत याचा अर्थ गावात या घराला, त्यांच्या मुलामुलींना प्रतिष्ठा आहे असा त्याचा अर्थ होता. स्थळांना तोटा नव्हता. असंही मुस्लिम लोकांत नात्यानात्यांतही बरीच लग्नं होत. पण मुलामुलींच्या वर्तनावर प्रतिष्ठा होती.

त्यामुळे विशी उलटली तरी या कंपुतल्या मुलींना एकही चांगली मंगनी येत नव्हती. अठरा विशीतल्या इतर नम्र, कामसू, गरीब मुलींना पटापट मंगन्या येऊन त्यांची लग्नं होऊ लागली होती.
हा कंपू अरेला कारे करणारा होता. आपल्याच मर्जीने वागणारा होता. तोरा होता. शान होती.

गावातल्या सगळ्याच तरुण मुलांना या मुली आवडत नव्हत्या असं नाही. मुली श्रीमंत होत्या, सुंदर होत्या, तरुण होत्या, मुख्य म्हणजे हुशार, तल्लख होत्या. पण त्या मुलांच्या आईवडिलांना, पालकांना त्या मंजूर नव्हत्या. ते पालक आपल्या मुलांसाठी यांना मागणी घालणं शक्य नव्हतं.


दिवसभर हिच्या तिच्या घरी अड्डा ठोकून गप्पा मारत बसणे, गावातल्या तरूण, देखण्या, होतकरू मुलांवर डोळा ठेवून राहणे, त्यांच्या मागे पुढे करण्याच्या संधी शोधणे हा उपक्रम धडाक्यात चालू होता यांचा. ही मैत्रीण, ती मैत्रीण, तिचा भाऊ, हिचा काका अशा होतकरू स्थळांवर खडे टाकून बघायचे. त्यातील एकीला शायरीची, सिनेमांच्या गाण्याची आवड होती. ती शायरी म्हणे, गाणी म्हणे. मुख्यतः मी त्यांच्या कंपूत सामील झाले होते ते यासाठीच. तिथेच त्यांच्याबरोबर तेव्हा मी उर्दू लिहायला वाचायला शिकले.

गाव चहाटळ होतं. लोक तरुण मुलांना विचारीत, “काय रं.. शादी नाय करस त्या अमकीशी? म्होप देज मिलंल ना...”
त्यावर तो मुलगा किंवा त्याचे पालक म्हणत, ‘हो, म्होप देज मिलंल, पन आमचा घर नाय ना तवरा म्होटा. त्या असबाब आनतील तो ठेवाय जागा हवी ना..”


या पाची मुलींना त्याची पर्वा नव्हती. म्हणजे लग्न तर करायचं होतं, पण त्यासाठी तत्वं मोडायची नव्हती. ते आपल्याच अटीवर करायचे होते. त्या बिनधास्त होत्या. आवडलेल्या मुलाला स्वतः प्रपोज करीत, विचारीत, “शादी करशील?” मुलगे हसून टाळत. त्यांना यांच्याशी लग्नं करायचं नव्हतं असं नाही. पण आईबाबांना नि घरच्यांना कोण समजावणार?
पण अर्थात कुणीही येरागबाळ्याने मंगनी टाकावी नि त्या मुलींनी किंवा त्यांच्या घरच्यांनी कबूल करावी अशीही परिस्थिती नव्हती. त्यामुळे मंगनी कुणाकडून येते याला महत्त्व होतंच. 

एक मुलगा पाचींच्या नजरेत भरला होता. चांगला होता. त्याचं दुकान होतं. ते दुकान थोडं गावाबाहेर, एकान्तात असं होतं. दिवसभर त्याचा बाबा दुकानात असे. नि हा मुलगा शेतीबितीची कामं बघे. संध्याकाळी त्याचा बाबा नमाज पढायला निघून जाई तो पुन्हा येत नसे. परस्पर घरी जाई त्या वेळेत हा मुलगा येऊन दुकानात बसे.

झालं. या आमच्या पाची मैत्रिणी संध्याकाळी फिरत फिरत त्याच्या दुकानावर पोचत. त्यावेळी फार गर्दी नसे. तिथं गप्पा, हंसीमजाक चाले. दुकानात बाबा दिसला तर लांबूनच कल्टी मारायची. शेवटी तो मासा त्यातील एकीच्या गळाला लागला. बाकीच्या बाजूला झाल्या. मैत्रिणींमध्ये स्पर्धा नको. तिचं भलं झालं. ती गेली. तो खमक्या निघाला. आपल्या घरच्यांना त्याने पटवलं.
दुसरीच्या प्रेमात एक गावातला देखणा, राजबिंडा तरुण पडला. गल्फमध्ये चांगला कमावता. पण त्याच्या घरचे तयार होणं शक्यच नव्हतं. या कंपुतल्या मुली कुणालाच नको होत्या गावात. नाकापेक्षा मोती जड. तो म्हणाला, “पळून जाऊ. अलिबागला जाऊन कोर्टमॅरेज करू.” पण ही तयार नव्हती.

गावात अशी प्रेमलग्नं होत होती तेव्हाही. अगदी मुस्लिम गावातही. कारण एकाच धर्मात असलं तरी आईबाबांची परवानगी नसायची. आम्ही असताना परस्पर लग्न ठरवतात म्हणजे काय? आईबाप अडवणुकीचं धोरण अवलंबत. मुलं मग पळून जात. कोर्ट मॅरेज करून आलेल्या मुलांना झक मारत घरात घेत. पण त्या मुलीला आयुष्यभर हाडुतहुडूत केले जाई, पळपुटी म्हणून हिणवले जाई. आईबाबांच्या परवानगीशिवाय आली म्हणून मान मिळत नसे.
यासाठीच ही तयार नव्हती त्याच्याबरोबर पळून जायला. लग्न करायचं असेल, तर आईबाबांना पटव. मंगनी टाक. रितसर लग्न कर.

इकडे हिचा स्वाभिमान जागृत, तिकडे त्याचे आईबाप हट्टी. शेवटी त्याच्या आईबाबांनी गरीब, सालस, कामसू, नम्र अशी आपल्या अपेक्षेत बसणारी मुलगी निवडली आणि त्याचं लग्नं जमवलं.

हिला प्रचंड आघात बसला. डिप्रेशन आलं. मनातल्या भावना व्यक्त करायला फक्त आमचा कंपू होता. तिथे ती रडायची. खरंतर ही सुद्धा त्याच्यासमोर जेमतेम होती दिसायला. तरी म्हणायची, ‘आवरा देखणा, सुनहरे बालोंवाला दुल्हा त्या बावळट बाईच्या दारात बारात घेऊन जाईल. तिच्या अंगणाची शोभा वाढवेल. लायकी तरी हाय काय तिची?’

लग्नाच्या आदल्या रात्री, आमच्या समोर त्याने तिला शेवटचा प्रस्ताव ठेवला, ‘अजूनही चल. पळून जाऊ. अलिबागला जाऊन कोर्टात लग्न करू. आईबाबांचं काय करायचं ते मी बघेन.’ पण ती निश्चयाला ठाम. प्रचंड स्वाभिमानी. पळून येणार नाही. स्वाभिमान गहाण टाकणार नाही. पळून गेलं की आयुष्यभर ऐकावं लागेल. रीतसर झालं तर स्वतःच रुबाबात म्हणता येतं, की तुम्हीच मंगनी टाकली होती मला नि आणली होती.

दुसऱ्या दिवशी त्याचं लग्नं झालं, नी हिने स्वतःला शायरीच्या गममध्ये बुडवून घेतलं. बऱ्याच वर्षांनंतर मग तिला शेजारच्या गावच्या एका थोराड व्यक्तीची मंगनी आली. तिने रुकार दिला आणि ती लग्न होऊन दुसऱ्या गावी निघून गेली.
तिसरी एका मुलाच्या प्रेमात पडली. पण मुलगा निकम्मा होता. हिचे बाबा तयार नव्हते. खरंतर ही एकुलती एक मुलगी त्यांची पण ती पळून गेली त्याच्यासोबत. मग त्यांनी तिच्याशी संबंध तोडले. पण तो चांगला निघाला नाही. सासरी भरपूर जाच झाला. त्रास झाला. नि एक मुलगी लहान पदरात असताना तिने स्वतःला जाळून घेतले. मुलीला तिची आई आपल्या घरी घेऊन आली.

चौथीची कहाणी वेगळीच. ही त्या शायरीवालीची सख्खी लहान बहीणच. हिला काही मंगनी येणार नाही. मंगनीची वाट पाहात वर्षे घालवण्यापेक्षा तिचं घरातल्याच चुलतभावाशी लग्नं ठरवण्यात आलं. तो मुलगा पण गल्फला चांगली नोकरी करत होता. कमवत होता. स्वभावाने सरळ होता. पण हिला ते मंजूर नव्हतं. घरातल्या घरात तिला लग्नं करायचं नव्हतं. पण घरातले ऐकत नव्हते. रोज आमच्या ग्रुपमध्ये बसून ती रडायची. तिला बाकीच्या समजवायच्या, “शादी झैल्यावर वाटंल तो तुला न्हवऱ्यासारखा आपसूक.” मी म्हणायचे, “का नाही म्हणतेस? का नको म्हणतेस त्याला? चांगला तर आहे तो?” पण ती काहीच बोलत नव्हती. फक्त म्हणायची की तो मला भावासारखाच वाटतो. मला त्याच्याबद्दल काही भावना नाही निर्माण होत.

तिचं जबरदस्तीने लग्नं लावण्यात आलं. पण ती नवऱ्याबरोबर एक दिवसही नांदली नाही. लग्न झालं की होईल सगळं नीट, आपसूक असं वाटणाऱ्या सगळ्यांना तिनं खोटं ठरवलं. ती बधली नाही. शेवटी नवऱ्याने दुसरं लग्नं केलं दोनतीन वर्षे वाट पाहून. आणि तो आपल्या दुसऱ्या बायकोला घेऊन गल्फला निघून गेला. ही तशीच राहिली. आईबाबा, काकाकाकी वारले. ही अजूनही एकटीच आहे. मात्र तो तिला खर्चाला पैसे पाठवतो.  
अनेक वर्षांनी कोडं उलगडलं. ज्या देखण्या सुनहऱ्या बालोवाल्यावर मोठ्या आपाचं प्रेम होतं. तोच हिलाही मनोमन आवडत होता. त्या विषयाने पुढे अजून वेगळंच वळण घेतलं. ती कहाणी अजून वेगळीच होईल.
आणि पाचवी ही रजिया. सगळ्यात शेवटी तिचं लग्न झालं. शेजारच्या गावातला लंडनला नोकरीला असलेला मुलगा तिच्या आईने शोधला. तिला वडिल नव्हते. पण वडिलांनी जाताना भरपूर ठेवलेला पैसा होता. ती लग्न करून लंडनला गेली. तिथेच स्थायिक झाली. चार मुलं झाली. ती मुलं, आणि मुलीही इतक्या उच्चशिक्षित झाल्या. काल तिचा फोन आला तेव्हा आवाजात अजूनही बेदरकारी तशीच आहे. आत्मविश्वास तसाच ठासून भरलेला आहे. याचा अर्थ तिचं तिथं सुशेगाद चालू आहे. नवरा मुठीत आहे.
खरंतर या सगळ्या घटना घडत होत्या त्या त्यांच्या विशीपंचवीशीत. सगळ्या तिशीच्या आतच बोहल्यावर चढल्या. पण त्या काळात तो उशीर होता. जिथे अठरा वीस फारतर बावीस वर्षात पोरी उजवल्या जात होत्या. तिथे यांना केवळ आपला स्वभाव, स्वातंत्र्य आणि बंडखोरी यामुळे लग्नासाठी संघर्ष करावा लागत होता. चाहे जो भी हो जाए या झुकायला तयार नव्हत्या. आपल्या तत्वांना मुरड घालायला तयार नव्हत्या. त्या जगल्या, मेल्या त्या आपल्याच मर्जीने, आपल्याच मतांवर ठाम राहून.

 

-    अलका गांधी-असेरकर.

 

 

Aug 17, 2020

श्रावण, सोमवार आणि त्यानिमित्ताने बरंच काही...

 श्रावण, सोमवार आणि बरंच काही...

माझं माहेर वैष्णव. तिथं फक्त श्रीकृष्ण भजला जात होता. देवी, शंकर, इतकंच कशाला विष्णूची इतर रुपं पण वर्ज्य होती. राम बिम कुछ नही. श्रीकृष्ण एके श्रीकृष्ण. 'जय श्रीकृष्ण' हे आजही भेटल्यावर बोलायचं गुजराती वैष्णवांचं परवलीचं वाक्य. पण आता ते माझ्या तोंडून येत नाही. कारण मी मराठी झालेय आता.
त्यामुळे घरात बाकी उपास तापास, व्रतं, वैकल्यं, पुजा, कर्मकांडं काही करता काही नव्हतं. एकादशी तीही फक्त घरातले म्हातारे कोतारे करायचे. तेही खाऊन पिऊन. वर म्हणायचं, देहाला कष्ट द्यायचे नाहीत, असं कृष्णाने सांगितलंय.
अर्थातच श्रावण बिवण नव्हता, नि त्यातले कोणते वारही नव्हतेच.
पण कोकणात राहात होतो. त्यामुळे वाण नाही पण गुण लागला होता. गाव तर जवळपास मुस्लिमांचं. एकेकाळी ते हिंदूबहुल असेल कदाचित. कारण गावात तीन मंदिरं होती. एक वरच्या अंगाला मारूतीचं. दुसरं खालच्या अंगाला काळभैरवाचं. नि तिसरं गावच्या कोंडावर. तिथूनही पुढे गावाच्या बाहेर. एक छोट्याशा टेकडीवर शंकराचं.
तिन्ही मंदीरं निवांत होती. कोणी भक्त अकारण सकारण तिन्ही देवांच्या वाटेला जात नव्हते. मारुतीला फक्त चैत्रात जत्रा भरायची त्याच्या नावे म्हणून. काळभैरवाच्या मंदिरात श्रावणात भागवत सप्ताह वाचला जायचा. तेही रात्री. दिवसा कोणी रिकामटेकडे नव्हते. नि शंकराला श्रावणात कदाचित जात असतील लोक. कदाचित एवढ्यासाठी की मी तरी पाहिलं नव्हतं कुणाला जाताना.
मात्र शंकराच्या मंदिराभवती स्मशान होतं. अगदी त्याच्या पायरीला लागूनही पुरलेल्या माणसांच्या समाध्या होत्या.
पुरलेल्या?
बहुधा होच. त्यावेळी त्या गावातले हिंदू सगळे गरीब होते. कुणी मेलं तर जाळायला तेवढी लाकडं नसायची. विकत मिळायला सोय नव्हती. त्यामुळे शंकराच्या टेकडीवर पुरून मोकळं व्हायचं. ज्यांना शक्य होत असेल ते जाळतही असतील कदाचित. देव जाणे. गाव फार लहान. पाचेकशे घरांचं असेल फारतर. मुस्लिम लोकांचं कब्रस्तान लांब होतं फार. हिंदू तर गिनेचुनेच उरले होते.
त्यात आम्हा गुजरात्यांची सात-आठ घरं. श्रीमंत नव्हती. तीही गरीबच होती. पण खाऊन पिऊन होती. आणि गुजरात्यांच्या आवारात मागल्या दारी लाकडांची सोय करून ठेवलेली असायची. घरात म्हातारी कोतारी माणसं असायची. ऐनवेळी लाकडं कुठून आणणार म्हणून. मोठाली लाकडं राखीव ठेवून दिलेली असायची.
आज मागे वळून पाहता वाटतं, किती प्रॅक्टीकल होते तेव्हाचे लोक. आपला क्रूस आपल्यासोबत म्हणतात ते हेच का? अशा त्या खेड्यावर आम्ही एक दोन वर्ष नव्हे, तर पाच पिढ्या राहिलो.
तर विषय होता श्रावणी सोमवारचा. घरात शंकराचं प्रस्थ नव्हतं. पण ज्येष्ठात पाऊस बसला की कंपलसरी लॉकडाऊन असायचा सगळ्यांना. फक्त शेतावर काम करणारे लोक सोडून. म्हणून श्रावणात जरा पाऊस कमी झाला की घरातल्या बायकांना बाहेर पडण्यासाठी एक निमित्त असायचं. चला शंकराच्या मंदिरात जाऊ सोमवारी. मग एका सोमवारी सगळ्या गुजराती बायका निघायच्या. दुपारी चारच्या सुमारास.
सोबत दुकानातलाच नारळ घ्यायचा एक फक्त. बास.
आधी कोंडावर जायचं. कोंडावर ब्राम्हणाचं एक घर. जोशीबुवा, त्यांची बायको आणि एकुलता एक मुलगा.
तेही त्या गावातले नव्हतेच.
लोक आता म्हणतात ब्राम्हणांनी यंव केलं नि त्यंव केलं.
मागे वळून पाहता मला आठवतंय तोपर्यंत मी ब्राम्हणांची घरं फार कमी पाहिलीत माझ्या लहानपणी. त्या खेड्यावर तर पंचक्रोशात एकही ब्राम्हण नाही. एकाच छोट्या खेड्यावर डांगे म्हणून खोत होते. त्यांना गांधीहत्येनंतर उसळलेल्या दंगलीत पळवून लावलेलं. आणि तेही धार्मिक कार्य करणारे ब्राम्हण नव्हतेच. पळाले, तेही घरात तरुण मुलगी होती तिच्या इज्जतीच्या भीतीने पळाले. पण पुन्हा त्या गावात परतलेच नाहीत कधी. त्यांचं मनच उठलं. विटलं. जिथे सोबत राहिलो अशी चार घरंच उलटली, त्या गावात काय जायचं पुन्हा? त्यांची घरं, केळीच्या छोट्या बागा तशाच सोडून गेले.
पंचक्रोशीत ब्राम्हण नव्हते, तर मग धार्मिक कार्य करणार कोण? मुळात धार्मिक कार्य करतच कोण होतं? कुणीच नाही. आमच्या खेड्यावर मी कोणतेच सणवार पाहिले नाहीत तेव्हा. एक जत्रा भरायची नि एक दहीहंडी बारकीशी खेळली जायची. आणि हां, एक होळी. तिन्ही देवळात पुजारी बिजारी नव्हते. गावात जंगमांची घरं होती. त्यातील कुणीतरी संध्याकाळी देवळात दिवा लावून यायचं. बाकी पुजा अभिषेक ... ते काय असतं? अशी स्थिती होती.
पण लग्नकार्य असायचं. त्यात सत्यनारायण असायचा. कुणी गेलं तर दिवसकार्य असायचे थोडे फार. त्यासाठी ब्राम्हण कुठून आणायचा आता?
म्हणून तळा या तालुक्याच्या गावाहून या जोशीबुवांना आमच्या गावच्या कोंडावरच्या ग्रामस्थांनी आग्रहाने आणून ठेवलं होतं. त्यांना रहायला एक रिकामं, मोठं फुकट घर दिलं होतं. शेतात काही भात बित पिकेल, तेही त्यांना दिलं जायचं थोडंफार. ते जोशीबुवा आणि त्यांची बायको अत्यंत सालस, गरीब, अगदी गोष्टीतल्या गरीब ब्राम्हणांसारखे कुटुंब होते. त्या कोंडावर पाच पंचवीस सगळी घरं हिंदू मराठांची होती. तिथे मुस्लिम नव्हते अजून तेव्हा.
तर वर टेकडीवरच्या शंकराला जाताना किंवा येताना त्या जोशीबुवांकडे या सगळ्या बाया (सोबत मी..) थांबायच्या. त्यांना भेटायला. त्यांनाही आनंद व्हायचा. गुजर बाया त्यांना भेटायला आल्या. काकू चहा करायच्या. काहीतरी गोड वडी बिडी सगळ्यांच्या हातावर द्यायच्या. सगळ्यांना कौतुक होतं ते त्यांच्या परसदारात त्यांनी लावलेल्या विविध फुलझाडांचं. वर सगळ्या म्हणायच्या, "ही सगळी ब्राम्हण बायांचीच कामं हो. रांगोळी, फुलं वगैरे..."
शिवाय आमच्या सगळ्यांच्या घरात सोवळं असायचं. कारण गाव सगळं मांसाहारी. त्यात पुन्हा मुस्लिमबहुल. मग विचारायलाच नको. आम्ही पडलो कांदालसूणही वर्ज्यवाले. त्यामुळे कोणाकडेच काही खायचा प्यायचा अनुभव नाही. एकच हे घर होतं जोशीबुवांचं. जिथे या सगळ्या बायका बिन्धास्त चहा प्यायच्या. बसायच्या. काही थोडं खाऊ शकायच्या.
तिथून मग स्वाऱ्या शंकराच्या मंदिराकडे. तिथे जाताना कोंडावरच्या एखाद्या माणसाला सोबत घ्यायचं. मंदिरात गेल्यावर कुणी नारळ फोडायला हवं म्हणून. बायकांनी नारळ फोडायचा नसतो म्हणून.
शंकराची टेकडी चढतानाच भीती वाटायची. सगळीकडे समाध्याच समाध्या. अगदी त्या चुकवत चुकवत पाय ठेवावा लागायचा. भकास मंदिर. प्रसन्न वाटण्यासारखं काही नाही. पिंडी, बाहेर दोन पाच कसकसल्या मुर्त्या. सगळं वातावरण रामसे बंधुंच्या सिनेमाला पुरक असं अगदी...
कधी एकदा या बायांचं आटोपतंय आणि घरी जातोय असं व्हायचं.
त्या दिवशी रात्री लवकर झोप यायची नाही. परसातले रातकिडे, बेडकं यांचा आवाज भयप्रद वाटायचा. काय या बायांना त्या भणंग मंदिरात जायचा सोस तो महादेवच जाणे.
पण त्या आनंदात असायच्या. त्यांची श्रावणी पिकनिक झालेली असायची. आता त्या वाट पाहायच्या कृष्णाष्टमीची. तेवढाच एक उपास आणि थोडा सोहळा असायचा. पुन्हा सगळ्या जमायला. दोन चार भजनं म्हणायला नि कृष्णाचा पाळणा सजवायला. आम्हाला कौतुक असायचं ते रात्री बारा वाजता थेपले आणि तळलेल्या मिरच्या खाऊन उपास साोडण्याचं...
यात प्रश्न एकच पडतो की या सगळ्यात ब्राम्हण कुठून आले शिव्या खायला मध्येच? बिचारे पंचक्रोशीतही नसायचे नावाला.
आणि अचानक देव, धर्म, उपास तापास कुठून वाढले? मंदिरांची प्रस्थं कशी वाढली?
गावात हिंदू देखील बिचारे देवाच्या वाटेला जात नव्हते... तू शांत तिथे तुझ्या देवळात बस. आम्ही आमच्या घरी. दोघंही एकमेकांना त्रास देत नव्हते. कारण दोघांपाशीही एकमेकांना द्यायला काही नव्हतं. दोघेही भणंग.
- अलका असेरकर
Like
Comment

Aug 15, 2020

विषय निघालाच आहे तर...

 विषयच निघाला आहे, तर पुन्हा मातृत्वाकडे वळू या..

मुल जन्माला घालणं, गरोदरपण, बाळंतपण इत्यादी सगळं फार कष्टदायक प्रकार आहे मानवी मादीच्या बाबतीत तरी.
म्हणजे आता निदान वैद्यकीय प्रगतीने तरी मदत केलीय म्हणून. अन्यथा पूर्वी बाळंतपणात मरणाऱ्या बायकांचं प्रमाण प्रचंड होतं. आणि नवजात अर्भकांचं. गरोदरपणा, बाळंतपण यातून वाचली तर जगली. नाही तर खपली हे गृहीत धरूनच बाळं जन्मायची. माझ्या घरी माझी विशीतली आत्या बाळंतपणात, तर पंचविशीतली काकी गरोदरपणात मेलेल्या आहेत.
याचाच अर्थ माणसाने आपल्या डोक्याचा वापर करून, विज्ञानाच्या मदतीने बाईमाणसाची बाळंतपणं सुखरूप केली आहेत बऱ्यापैकी. अन्यथा निसर्गाने मानवी मादीच्या बाबतीत तरी बाळंतपण आणि गरोदरपण या गोष्टी तिच्या जीवावर बेतणाऱ्याच करून ठेवलेल्या आहेत. इतर पशुपक्षी प्राण्यांप्रमाणे नैसर्गिक रित्या आपली आपण बाळं जन्माला घालता बाईला येत नाहीत. तिला कुणाची तरी मदत लागते.
आता वैद्यकीय मदती उपलब्ध असल्याने मरणाचे प्रमाण कमी झाले आहे. पण याचा अर्थ त्रासाचे प्रमाण कमी झाले आहे असे आजिबातच नाही.
गरोदर राहिल्या राहिल्या उलट्या होणे, चक्कर येणे, भूक मंदावणे इत्यादी त्रास मानवी बाईच्या बाबतीतच होतात. प्राण्यांमध्ये असे प्रकार दिसत नाहीत. तिथून त्रासाला सुरूवात होते. ती आजन्म पुरते म्हटले तरी चालेल.
त्याच्याही आधी या प्रजननासाठी मासिक पाळीचं चक्र निम्मं आयुष्य वागवावं लागतं. सहन करावं लागतं. त्याच्यातही अनेक समस्या असतात. गरोदरपणा नऊ महिन्याचा नि बाळंतपण तीनेक महिने म्हटलं तर एक पूर्ण वर्ष बाईला या प्रजननासाठी द्यावं लागतं. पुढे मुलाचं संगोपन हा तर वेगळाच विषय. गरोदरपणात सुखाने ऐसपैस झोपता येत नाही. सहाव्या महिन्यानंतर तर कुशीवरही झोपता येत नाही. शेवटचे दोन तीन महिने केवळ पाठीवर उताणंच झोपायचं. अतिशय अवघडलेपण घेऊन वावरावं लागतं. ना खाली वाकता येत, ना नीट बसता येत ना झोपता. शेवटच्या महिन्यात चीडचीड फार वाढते. या अवघडलेपणाने.
साधारणपणे वर वर बघता लोकांना वाटतं, की मुल जन्माला घालणं म्हणजे काही फार मोठे काम नाही. रोज जगात हजारो बाया बाळंत होतात. सगळ्यांना मुलं होतात. तुम्ही एकट्या काही नवलाच्या नाहीत.
पण प्रत्यक्षात चित्र काय आहे ते फक्त बायांनाच माहीत असते. तरी त्या मुकाट सोसत, त्यावर मात करत जगतात. बोलत नाहीत एवढंच.
जी मुलगी माहेरी असेपर्यंत, एक मासिक पाळीचा वेळ सोडल्यास साधं डोकंही दुखत नसतं, जी मुलांच्या बरोबरीने खेळात भाग घेते, उंडारते, उड्या मारते, ती मुलगी लग्नं होऊन एक मुल झालं की कायमची दुखणेकरी होऊन जाते. कंबरदुखी, पाठदुखी, विकनेस कायमचा मागे लागतो. याचे प्रमाण व्यक्तीपरत्वे भिन्न असते, पण असते. कुणाला कमी कुणाला जास्त इतकेच. व्यवस्थित सकस आहार, (बाळंतपणात तूप खाणं म्हणजे सकस आहार नाही.) वैद्यकीय उपचार, व्हिटॅमिन्स मिळाले तर त्यातल्या त्यात ही हानी भरून येते. अन्यथा ती जन्मभर मागे लागते. आणि भारतात सर्वच बायांना बाळंतपणानंतर असा सकस आहार, आराम, सुखसोयी मिळतातच असं नाही. फारतर परंपरेने खूप तूप घालून डिंकाचे लाडू जबरदस्ती खायला घातले जातात. त्यांने फक्त वजन वाढतं. ताकद वाढत नाही.
माझा अनुभव सांगते. मला असं नाही म्हणायचं, की मला आला तसाच अनुभव सगळ्यांना येतो, पण जनरली पहिल्या बाळंतपणात बहुतांश स्त्रियांची हीच परिस्थिती असते.
मला दिवस भरल्यानंतर रात्री अडीच वाजता पोटात बारीक बारीक दुखायला लागलं. सकाळी साडेसात आठला हॉस्पिटलला गेले. कळा खूप येत नव्हत्या म्हणून औषधं इंजेक्शन्स इत्यादी दिले. आणि मला मुलगा झाला तो संध्याकाळी सव्वा पाच वाजता. १२ तास मी कळा देत होते. ठो ठो ओरडत होते. आईने कितीही सांगून ठेवलं होतं, आणि ओरडायचं नाही अशी मानसिक तयारी ठेवली होती, तरीही ते शक्य झालं नव्हतं. एक एक कळ जीवघेणी होती. पाठ कंबर मांड्या सगळं कामातून गेलं होतं. इतक्या तासांत बादलीभर रक्त वाहिलं असेल. कमीतकमी. निदान मला तरी असं वाटत होतं. सगळे कपडे रक्ताने भरले होते. इतके की न धुता ते फेकून देण्यात आले होते थेट.
नंतर डॉक्टरांनी सांगितलं की मुलाची वार त्याच्या गळ्यात अडकली होती म्हणून तो बाहेर येण्याचा प्रयत्न करूनही बाहेर येऊ शकत नव्हता. म्हणून मग त्याला चिमट्याने ओढून काढावा लागला. त्यासाठी योनीमार्गाला आतून बाहेरून चीर देण्यात आली. जवळपास सिझेरियनच. खूप टाके आले मला.
त्या टाक्यांमुळे जवळपास दीड दोन महिने मला नीट मांडी घालून बसता येत नव्हतं. त्याला घेता येत नव्हतं. विकनेस प्रचंड. इतका की पाण्याचा मोठा तांब्या देखील भरलेला उचलवत नव्हता. हात थरथरायचे. मी घाबरले होते. आईला म्हटलं मी कायम आता अशीच राहणार का. तेव्हा ती धीर देत म्हणाली, नाही गं, हळू हळू भरून निघेल विकनेस.
थोडं थोडं ब्लिडींग महिना पंधरा दिवस चालू होतं.
आता तर इतकं थांबतही नाहीत. बहुतेकजणींचे सिझेरियनच ऐकते. सिझेरियन सोपे फक्त वर वर दिसते कारण तेव्हा कळा सहन कराव्या लागत नाहीत. पण ते एकप्रकारचे ऑपरेशनच असते. टाके येतात. ते दुखत राहतात. ती जागा विक पडते नैसर्गिक मूळ असते त्यापेक्षा. तुम्ही मुळचे राहत नाही.
अर्थात स्त्रिया बाऊ करत नाहीत. आणि वैद्यकीय सुधारणाही खूप झाल्या असतील आता. पण याचा अर्थ असा नाही की त्या सहन करत नाहीत. त्या या सगळ्या चक्रातून जातात. फक्त जाहीर असं बोलत नाहीत. कुणालाच सांगत नाहीत. फारतर आईला सांगतात. त्यामुळे स्त्रिया या प्रजननप्रकारात काय सहन करतात हे कधी ठळकपणे पुरुषांना समजतच नाही अनेकदा.
यापैकी पुरुषाला काहीही सहन करावं लागत नाही. त्याला प्रजननप्रक्रियेत मिळतो तो केवळ आनंद. क्षणिक का असेना. म्हणून डिलीव्हरी होताना लेबररुममध्ये (याला लेबररूम म्हणतात त्यावरूनच ओळखा काय कष्ट करावे लागतात तिथे ते)बाईच्या नवऱ्यालाही हजर ठेवायला हवं. आता बरेच नवरे स्वतःहून हजर राहतात. असे पुरुष पुन्हा दुसरं मुल हवंय, मुलगाच हवा असं जन्मात कधी म्हणणार नाहीत. जर त्यांनी ती प्रक्रिया पाहिली तर...
मी तरी माझ्या पहिल्याच बाळंतपणात, आपल्याला दुसरं मूल नको, हे पक्कं केलं होतं.
हे त्रास नैसर्गिक असल्याने तक्रार कुणापाशी करणार?
त्यातल्या त्यात विज्ञानाने स्त्रियांना खूप मदत केलीय आता, पाळीच्या दुखण्यापासून ते गर्भ हवा, नको, सिझेरियनपर्यंत पर्याय आणि औषधं आता उपलब्ध आहेत. कुठल्याही देवाने, धर्माने ही मदत केलेली नसून केवळ विज्ञानाने ही मदत केलीय. केवळ विज्ञानामुळे बाई या चक्रातून बऱ्यापैकी सुटलेय आणि ती बाहेर पडून करीअर करू शकतेय. हे महत्त्वाचं आहे.
बाळंतपणानंतर वर्ष दीड वर्ष माझी पाठ प्रचंड दुखायची. ज्यांनी बाळंतपण केलं त्याच सर्जनला सांगितलं, तर बायांच्या पाठी दुखतातच असं म्हणून त्याने माझी बोळवण केली. त्यानंतरही अनेक मोठे डॉक्टर केले. पण बरं वाटत नव्हतं. शेवटी एका साध्या एमबीबीएस, छोटी डिस्पेन्सरी चालवणाऱ्या स्त्री डॉक्टरकडे गेले. तिने नेमकं सांगितलं. तुमचं बाळंतपण झालंय, त्याचा विकनेस आहे. व्हिटॅमिनच्या गोळ्या घ्या. त्यांनी लिहून दिल्या. त्या मी महिनाभर घेतल्या आणि पाठदुखी गेली. मी त्यांना म्हटलं, अहो बाळंतपण होऊन वर्ष दिड वर्ष झालं आता.
तेव्हा त्या म्हणाल्या, बाळंतपणातली झीज पूर्ण भरून यायला तीन ते पाच वर्ष लागतात. जेव्हाही विकनेस वाटेल, पाठ दुखेल तेव्हा तेव्हा या गोळ्या पंधराएक दिवस घ्या अधुनमधून.
पण हीच गोष्ट एमडी झालेला पुरुष सांगू शकला नाही मला इतके दिवस.
(आणि लोकांना अजून लगेच मुलं हवी असतात. मुलगा हवा असतो. त्यात मुलगी नको म्हणून ऍबॉर्शन्स सुरू असतात. काही नैसर्गिक मिसकॅरेजेस होत राहतात. बाई पिसत राहते या सगळ्यात. पण कुणाला दया येत नाही. बाईकडे मुलं काढायचं मशीन म्हणूनच पाहिलं जातं.) आताच्या काळातही बाईला दिसताना एक किंवा दोनच मूलं दिसतात सुटसुटीत. पण जवळपास निम्म्या बाया या किती मिसकॅरेजेस, किती ऍबॉर्शन्समधून गेलेल्या असतात ते फक्त त्यांनाच ठाऊक असतं. कदाचित या सगळ्यांमुळेच पूर्वीच्या स्त्रियांना बाहेर कर्तृत्व दाखवता येत नव्हतं. त्या घरात अडकून पडल्या. नि दुर्बल म्हणवल्या गेल्या. ताजमहालमधल्या मुमताजच्या कबरीवर लिहिलेलं आहे, की तिचा चौदाव्या बाळंतपणात वयाच्या ३९व्या वर्षी मृत्यू झाला म्हणून!
स्वतः बाया पण या सगळ्या चक्रात पिसल्या तरी मुलं हवीत म्हणून मरत असतात कारण सामाजिक पगडाच तसा असतो. नैसर्गिक प्रेरणा नसतातच असं नाही, पण ऐंशी टक्के सामाजिक पगडाच अधिक असतो माणसांच्या बाबतीत तरी. कुटुंबव्यवस्थेची दृढताच अशी आहे की मेलो तरी बेहेत्तर पण मुलं हवीतच असा प्रकार असतो.
असो. माझ्यासारखाच अनुभव सगळ्यांचा असेल असं नाही. काहींचा थोडा सौम्य असेल, तर काहींचा याहून भयानक असतो. मी माझ्या घरसखीला हे सांगितलं तेव्हा ती म्हणाली, की ती तर तीन दिवस घरीच कळा देऊन हैराण झाली होती. तिसऱ्या दिवशी तिला मुलगी झाली होती.
मला वाटतं की बायांनी आपले अनुभव अगदी तपशिलासह जाहीर मांडायला हवे. पण त्यांच्यावर असं बिंबवलं गेलेलं असतं, की तू काय एकटी हे सहन करत नाहीस. हे तर नैसर्गिक आहे. हे तर सगळ्याच सहन करतात. यात काय बोलायचं. यात काय सांगायचं?.. - अलका गांधी-असेरकर

Aug 12, 2020

श्रावणाच्या २ कविता -

श्रावण-

माझ्या चष्म्यांच्या काचांवरून डोळ्यात उतरतोय
ओल्या केसांमधून झिरपत
मेंदूची चावी फिरवतोय
आणि स्कूटरवरून बँकेत जायला निघालेली मी
थेट जाऊन पोचतेय
त्या खेड्यावर
जिथून तो मला दरवर्षी
साद घालत राहतो
तिथल्या टेकडीवरच्या
शंभू महादेवाच्या देवळातली
घंटा वाजवत राहतो
ओल्या लुसलुशीत गवतांतून
वहाळांतून
खळाळत राहतो..
गौरींच्या आगमनाची
चाहूल देत राहतो
गच्च रानात फुललेल्या तेरड्यांतून
 
मी भान विसरून फिरत राहते
सैरभैर त्याच्या खाणाखूणांतून
 
दरवर्षी हे असं होतं
दरवर्षी मन पिसं होतं
काम धाम विसरून
वा-यावरती पिसासारखं
श्रावणामागे दूर दूर

भूतकाळात लहरत जातं........

 

-अलका

 

पिवळा ज्वर..


माझ्या गावचा निरोप घेऊन येतात

हलक्या सरींतून..

श्रावण भाद्रपदातले वारे 

सरी सरीतून 

चमकदार पिवळ्या शाईने लिहिलेलं

स्वच्छ वाचता येतं मला

एकदा येऊन जा रे........... !

शब्दा-शब्दांतले त्याचे निश्वास 

रुंजी घालत राहतात

कानापाशी

वाजवत राहतात

चिखलावर पसरलेल्या

भाताच्या सोनसळी पिवळ्या कोंड्यावर

नाचणा-या बाल्यांचे काळपट पितळी चाळ..

सकाळसांज कौलारू घराघरांतून

पिवळा पितांबर कैसा...च्या

तालावरचे लयबद्ध पितळी टाळ


पेरत राहतात मत्त गंध

माझ्या घ्राणेंद्रियांतून

केवड्याच्या पिवळ्याधमक पातीचा

जिच्या पायापाशी वाहिलंय तिला

त्या लखलखणा-या हळदपिवळ्या 

गौरीच्या मुखवट्यावरच्या भेंडीच्या 

पिवळ्या पिवळ्या फुलांचा


बोलवतात खेळायला

हिरव्यापिवळ्या उग्र गवतांवर

चमचमणा-या श्रावणी उन्हांतून

खेळ चतुरांच्या पकडापकडीचा


घेऊन जातात सोमवारी

गावाबाहेरील स्मशानात 

पडक्या जुन्या शंभुमहादेवाच्या मंदिरात

माजलेलं हिरवंगार गवत आणि 

बांधाबांधातून खळाळणा-या पाण्यातून

मला ओढत 


प्रत्येक सोमवारी मग

रात्रीतून जागी होते मी घाबरून

परसातल्या केळीच्या पानांवर टपटपणा-या 

पाण्याच्या आवाजाने..

बेडकांच्या ओरडण्याने

रातकिड्यांच्या किरकिरण्याने....


माडीवर आईच्या कुशीत डोळे गच्च मिटून

झोपण्याचा प्रयत्न करत राहते मी

अन् सकाळी उठल्यावर आरशात पाहते तेव्हा..


....तेव्हा दिसतात

माझ्या केवड्यासारख्याच 

पिवळ्याधमक रेशमी कांतीवर पेरलेल्या..

आईने जाताना एवढ्यातच दिलेल्या....

... दोनचार सुरकुत्या


त्या गावावरही तर उगवल्याच असतील

ना आता तशा..............!


- अलका गांधी-असेरकर

 


किसी पिछले जनम की बात...

मुगले आजम हा सिनेमा पन्नास वर्षानंतर रंगीत झाला, त्यालाही आता जवळपास 20 एक वर्ष लोटली. 🤦काळ किती भराभर चाललाय...    तेव्हा टीव्हीवर दिलीप क...