Showing posts with label स्त्री-सूक्त. Show all posts
Showing posts with label स्त्री-सूक्त. Show all posts

Jan 22, 2023

धुणं -

 शरीफा नेहमीच जुम्म्याची वाट बघत असायची मनोमन. ज्याप्रमाणे नोकरदार लोक रविवारची वाट पाहात असतात तशीच. जुम्मेरातपासून म्हणजे गुरूवारपासूनच तिच्या मनावरचा ताण कमी व्हायला सुरूवात व्हायची. केवळ शुक्रवारच्या इंतजारमध्ये. आणि शनीवारपासून पुन्हा पुढच्या शुक्रवारकडे तिचे डोळे लागून राहायचे. 

शरीफा मजिदची पहिली बायको. दोन मुली झाल्यावर मजिदने गावातल्याच एका मुलीच्या प्रेमात पडून तिच्याशी दुसरे लग्न केले होते. त्या गावात, आणि त्यांच्या धर्मात हे नवलाचे नव्हते. त्यातही एक लग्न घरच्यांच्या मर्जीने तर दुसरं आपल्या मर्जीने असं करणारेही पुरुष होते. तरी देखील अशा प्रकारे दोन लग्न करणारे पुरुष संख्येने कमीच असत. ज्यांची घरं मोठी आहेत, बऱ्यापैकी पैसा आहे आणि मुळात तशी  रंगीन वृत्ती आहे असेच वीर पुरुष विनाकारण दोन लग्ने करत. बाकीचे मात्र मुलगा नसेल, पहिली बायको मेली असेल, किंवा तिला सोडून दिलं असेल कुठल्या कारणाने तरच दुसरं लग्न करत. 
त्यामुळे मजिदने दुसरं लग्न केलं म्हणून शरीफाच्या आयुष्यात काही फार फरक पडला होता असं नाही. मजिद आणि त्याचा भाऊ नासिर हे दोघे आपल्या मोठ्या बहिणीच्या भल्या थोरल्या घरात लहानाचे मोठे झाले, तिथेच आई आणि ते राहिले. बहिणीचा नवरा अपघातात वारला होता, पण मागे बराच पैसा, नुकताच बांधलेला नवीन बंगला आणि बहिणीच्या पदरी पाच मुलं सोडून गेला होता. त्यांची बहीण अमीना हिने देखील सासरच्या माणसांना दूर ठेवून आपला माहेरचा हा सगळा गोतावळा आपल्याजवळ आणून ठेवला. घरात पुरुष माणूस असावा म्हणून हे दोन्ही भाऊ जवळ असलेले बरे होते.  दाम करी काम या न्यायाने भाऊ, आई, दोन्ही भावांच्या दोन दोन मिळून चार बायका या सगळ्या अमिनाच्या शब्दाबाहेर नसायच्या. तशी हिंमत नव्हती. कारण सगळा ऐशोआराम विनासायास तिथे मिळत होता. 

मनात आलं तर दोघे भाऊ आळीपाळीने बोटीवर किंवा गल्फमध्ये नोकरीसाठी अधनमधनं एक दोन वर्ष चक्कर मारून येत. थोडा पैसा कमावून आणत. दोघांनी दोन दोन बायका केल्या तरी अमिनाने त्याना हरकत घेतली नव्हती. कारण एक बाई घरात जास्तीची येणं म्हणजे एवढ्या मोठ्या खटल्यात कामाला बिनपगारी माणूस मिळणं असंच होतं..

दोन भावांच्या चार बायकांपैकी तिघींना कामं वाटून दिलेली होती. एक सदैव चौवीस तास पेटत्या चुलीचे सैपाकघर सांभाळत होती. एक दिवसभर गावाबाहेरच्या विहीरीवरून पाणी भरत होती. तर एक अमिनाची पाच आणि या तिघींची मिळून सातआठ अशी बारा पंधरा पोरं सांभाळत होती. दिवसभर खाटेवर बसून गावभराचं गॉसिप्स करत बसलेल्या अमिनाच्या हातात चहाचे पेले, जेवणाची ताटं आणून देत होती. अमिनाची आई या तिघींवर सुपरवायझरचं काम करत होती. तिला सगळे दादी म्हणत. 
थोडक्यात दादीलाही काम होतं. त्या घरात काम नव्हतं ते फक्त अमिनाला आणि तिच्या मुलांंना. 

यात चौथी जी होती ते प्रकरण हुश्शार होतं. ते म्हणजे मजिदच्या दुसऱ्या बायकोचं. मजिदने तिच्या प्रेमात पडून तिच्याशी दुसरं लग्न केलं खरं, पण ती लग्न करूनही सासरी येऊन राहिली नाही. माहेरीच राहिली. तिचं माहेरही सधन होतं. जोपर्यंत मजिद स्वतःचं घर करून स्वतंत्रपणे राहत नाही तोपर्यंत सासरी येणार नाही असा प्रेमळ धाक तिने घालून ठेवला होता. कारण सासरी जाणं म्हणजे कामाला नोकर म्हणूनच जाणं, त्या तिघींच्या जोडीला. हे तिला पक्कं ठाऊक होतं. ती माहेरी लाडकी होती. माहेरच्यांनी तिला लग्नानंतरही प्रेमाने आपल्याजवळच ठेवून घेतलं  होतं. ती फक्त सणावारी, प्रसंगपरत्वे अमिनाबायच्या बंगल्यात आपली पायधूळ झाडायला येई. तरी तिचं अमिनाबायसह सगळ्यांना कौतुक होतं. तिचं कपाळ भव्य होतं. आणि भव्य कपाळाच्या बाया फार नशीबाच्या, कुटुंबाचं कल्याण करणाऱ्या असतात असं अमिनाबायची मोठी मुलगी मुमताज माझ्याशी बोलताना म्हणायची. मुमताज माझ्या वयाची माझी मैत्रीण होती.  
मुळात तिचं सासरी न येणं चालवून घेतलं जात होतं कारण ती घरची सधन होती. सासरच्यांवर अवलंबून नव्हती. बाकीच्या तिघी मध्यम घरातल्या होत्या. त्यातील एक तर माहेरच्यांचा विरोध पत्करून पळून नासिरबरोबर दुसरी बायको म्हणून लग्न करून आली होती. तिला आता पुन्हा माहेरी स्थान नव्हतं. तिच्याच माथी दिवसभर लागणारं पाणी विहिरीवरून वाहून आणण्याचे काम मारण्यात आले होते. 
दिवसभर ती आमच्या घरासमोरून पाण्याच्या खेपा मारताना दिसे आणि माझी आई म्हणे, "बघा.. प्रेमलग्न केल्याचे  परीणाम. पाण्याचे हंडे वाहून वाहून बिचारीचं टाळकंही झिजलं." खरंतर तीही घरची बरीच होती. पण मुलगी आपल्या मर्जीविरोधात लग्न करते म्हणजे काय? जातीत आणि स्वधर्मातही केलं म्हणून काय झालं? आपली मर्जी पोरी चालवूच कशा शकतात? आता भोग आपल्या कर्माची फळं. सासरचे लोक देखील अशा पोरींना बरोब्बर राबवून घेत. तोंड दाबून बुक्क्यांचा मार. 

पण सगळ्याच मुली अशा नव्हत्या. बऱ्याचशा मुली मजिदच्या दुसऱ्या बायकोसारख्या खमक्या असायच्या. आधी तू देखील घराबाहेर पड मग मीही येते तुझ्याबरोबर पळून. आपण स्वतंत्र राहू अशी अट घालणाऱ्या मुली आणि ती स्वीकारून तसे राहणारे बहाद्दूर गडी देखील होतेच. नव्हते असे नाही. कारण पळून गेले, नि स्वतंत्र राहिले तरी पुरुषांना कुणी त्यासाठी कायमचं वाळीत टाकत नाही. घरचे त्यांना नंतर स्वीकारतातच.
त्यामुळे त्या गावात अमुकच अशी चाल सगळीकडे नव्हती. सहन करणाऱ्या सोशिक स्त्रिया होत्या तशाच त्यांना राबवून घेणाऱ्या नि आपल्याच मस्तीत आपल्या अटीवर टेचात राहणाऱ्या बायाही तिथं होत्याच.  विनाचकारण दोन दोन लग्नं करणारे गडी होते, तसेच अगदी रामाप्रमाणे आयुष्यभर एकपत्नी राहणारेही भरपूर होतेच. दुसरं लग्न केलं नवऱ्याने म्हणून त्याच्याशी बोलणं टाकून एकाच घरात राहून संबंध तोडणाऱ्या बायका होत्या नि प्रेमाने सवतीसोबत एकत्र राहणाऱ्याही होत्या. कुणी नवऱ्याला सोडून माहेरी जाऊन राहणाऱ्या होत्या नि त्यांना सांभाळणारी प्रेमळ माहेरंही होती. तर कुणी प्रेमलग्न केलं म्हणून मुलीला कायमची मेली म्हणून तिच्या नशीबावर सोडणारेही होते.
गावात अशी, यशस्वी झालेली, फसलेली, तुटलेली, विरोधात आत्महत्या करून मेलेली प्रेमप्रकरणं भरपूर असायची. गडी तगडे देखणे होते नि बायाही खमक्या नि देखण्या होत्या. बुरखा नावालाही नव्हता. एकेकीच्या प्रेमकहाणीवर प्रतिभावंत लेखक दीर्घकथा लिहू शकेल नि त्यावर एखादी फिल्म निघू शकेल अशा कहाण्या आमच्या गावात घडत होत्या. गावच प्रेमळ होतं. खातपितं निवांत होतं. त्यामुळे प्रेम करायला सवड होती. 

तर ते असो. 

आपण बोलत होतो शरीफाबद्दल. मजिदची पहिली बायको. जिला घरातल्या पंधरा-वीस जणांचं सैपाकघर सांभाळावं लागत होतं. दिवस सारा सैपाकघरात जायचा. एवढ्या लोकांसाठी सकाळसंध्याकाळ 'चावलच्या रोट्या' बडवायच्या, सालन शिजवायचं, सारखा चहा करत राहायचं, मासे बिसे साफ करायचे, धान्यधुन्याची निगुती करायची. यात तिला बाहेरचा तुकडाभर आभाळही बघायला फुरसत नसे. नासिरची दुसरी निदान पाण्याच्या खेपा मारायसाठी तरी दिवसभर बाहेरचं जग बघत होती. चार लोकांबरोबर वाटेत, विहिरीवर गप्पा मारायची संधी तिला मिळायची. थोडं रेंगाळायची पण. शरीफाला मात्र सतत दादीचा पहारा नि सैपाकघर यातून मान वर करायला मिळायची नाही. नवऱ्याशी बोलायचं ते रात्रीच. खोलीत गेल्यावर. शिवाय दिवसभर हे दोघे भाऊ घरातही कमीच असायचे. घरात सगळ्या बाया नि लहान मुलं यांचंच राज्य. गावातल्या बहुतेक घरांत हीच परिस्थिती होती. एखादा पुरुष. बाकी सगळ्या बाया.  बाकीचे पुरुष परदेशी.
म्हणून ती जुम्म्याची वाट बघायची. जुम्म्याला सगळ्यांच्या कंपल्सरी आंघोळी. पाण्याचं दुर्भिक्ष्य होतं गावात. डोक्यावरून एक एक हंडा आणावा लागे. एकदोन किमीची फेरी मारून. त्यात रोज आंघोळ केलीही तरी कपडे मात्र रोज धुवायला टाकले जायचे नाही. दोन तीन दिवस एकच साडी. तेच कपडे. काम करताना त्यावर एप्रन बांधून घेतलं जायचं. त्यामुळे साड्या मळायच्या नाही. पुरुष देखील एक लुंगी चार पाच दिवस पुरवायचे. बाहेर पडताना शर्टावर जन्नत-ए-फिर्दौस शिंपडले की काम झाले. 
जुम्म्याला सगळ्या घराचे आठवडाभराचे कपडे धुवायला निघायचे. ते काम शरीफाकडेच होते. त्या दिवशी तिला सैपाकघराला सुट्टी असायची. भल्या सकाळीच कपड्यांची बोचकी घेऊन नदीवर निघायचं. उशीरा गेलं तर चांगला दगड मिळायचा नाही. नदीवर आधीच गर्दी झालेली असायची बायांची. त्या चांगलं खोल असलेल्या पाण्याची ठिकाणं आणि चांगले गुळगुळीत दगड पटकावून बसायच्या. 
शरीफा याचसाठी शुक्रवारची वाट बघत असायची. आठवड्यातून एक पूर्ण दिवस दादीचा पहारा, चुलीचा ताप सोडून तिला मोकळं वावरायला मिळायचं. चार बायांशी गप्पा टप्पा करायला मिळायच्या. बाहेरची हवा अंगाला लागायची. त्यात पुन्हा नदीवर जाणं हे तर फारच सुखाचं आनंदाचं होतं. गावाला कवेत घेऊन खळखळत वाहणारी ही अगदीच ओढा म्हणावा अशी छोटीशी नदी. उन्हाळ्यात खालून जसजशी आटत जाई तशी वर वर  पाण्याची ठिकाणं शोधत गावापासून दूर जावं लागे कपडे घेऊन. तिथं दोन्हीतीरी भरपूर झाडी, सावली आणि निवांतपणा असायचा.  

तनमन एकदम प्रफुल्लित होऊन जाई शरीफाचं. बोचकी एकदा किनारी टाकली की ती अर्धा घटका आराम करून घेई तिथल्याच एखाद्या खडकावर बसून. आज कोण कोण आलंय कपडे घेऊन, ती नजर फिरवून घेई.एकमेकींना हाकारणं होई.  तिच्या सोबत घरातल्या एकदोन लहान मुली मदतीला असत. त्यांना बोचकी सोडून कपडे काढ, त्यांचे ढीग कर, साबण भिजव अशी छोटी मोठी कामं सोपवून ती निवांत बसून घेई. हे स्वातंत्र्य शरीफाला इतकं प्रिय वाटायचं की त्यापुढे आता दिवसभर कपड्यांची ही बोचकी धुऊन काढायचीत हे कष्ट देखील तिला मामूली वाटायचे. आता दिवसभराची निश्चिती असायची. वाहत्या पाण्यात कपडे धुणं हे तसंही फार कष्टाचं काम नसे.

तिच्यासारख्या अनेक स्त्रिया त्या दिवशी कपड्यांची बोचकी काढून नदीवर हजर असायच्या. नदीचे काठ फुलून जायचे. सोबतच्या लहान लहान मुली-मुलं चिवचिवत असायची. कपडे धुवायचे. काठावरच वाळवायचे आणि ते वाळले नि उन्हं कलायला लागली की त्यांच्या घड्या करून शुभ्र धुतलेले कपडे पुन्हा धुतलेल्या बोचक्यात निगूतीने बांधून सावकाश संध्याकाळी घरी परतायचं. घरून भाजी-भाकरी बांधून आणायची. कपडे धुवून वाळत घातले की दुपारी उशिराने ती खाऊन घ्यायची. झाडाखाली गप्पा मारत बसायचं. सगळ्या गावाची हालहवाल तिथे कळे. माहेरच्या स्त्रियांची भेट होई. सुखदुःखाच्या गोष्टी होत. बहुतेकींचे सासरमाहेर गावातच. गावातच लग्नं होणं हे मानाचं, प्रतिष्ठेचं समजलं जाई. ज्यांच्याबद्दल , खऱ्या खोट्या वावड्या उठलेल्या असत त्यांची गावात लग्नं होणं कठीण असे. त्यांना आजुबाजूच्या गावात स्थळं शोधावी लागत. 


सादिकासारख्या सिनेमांच्या गाण्यांची, शेरोशायरीची, गजलांची आवड असणाऱ्या तिथं मुक्त गळ्याने गाऊन घेत...

ऐ मेरे हमनशीं, चल कहीं और चल... इस चमन में भी अपना गुजारा नहीं.

बात होती गुलों तक तो सह लेते हम... अब तो कांटों पे भी हक हमारा नहीं.....

सादिकाच्या तोंडून ऐकलेल्या गैरफिल्मी गजला अजून जशाच्या तशा आठवताहेत...

माझ्या कडे पाहून म्हणायची..

गोरी चलो न हंस की चाल... जमाना दुश्मन है...

तेरी उमर है सोला साल.....

मी खरंच तेव्हा सोळा-सतराची होते. क्वचित सुट्टीत त्यांच्या ग्रुपमध्ये सामील व्हायची.

नदीचे दोन्ही काठ वाळत घातलेल्या रंगीबेरंगी कपड्यांनी सजायचे. सगळ्यांचे कपडे भारीतले. टेरीनचे इंपोर्टेड शर्टंस, झुळझुळीत साड्या, लहान मुलामुलींचे सुंदर सुंदर झगे, झबले आणि ते सगळे धुण्यासाठी तसेच इंपोर्टेड सुगंधी साबण, पावडरी. ते मी पाहात राहायची. आमच्या धुणेवाल्या बाईंकडे आई मोजून पाचशेएक साबणाचा एक तुकडा कापून देई. तो लावल्यावर आमचे कॉटनचे कपडे पांढरे व्हायच्याऐवजी अजून पिवळे दिसत. आमच्याकडे इंपोर्टेड वस्तू नसायच्या. त्या फक्त मुस्लिम घरांतूनच असायच्या. कारण सारे बोटीवर किंवा गल्फला नोकऱ्यांना. वर्षातून एकदा आले की मोठमोठ्या ट्रंका भरून सामान आणायचे. कमीत कमी शंभरेक झुळझुळीत साड्या, पंचवीसेक छत्र्या, सुऱ्या, कातऱ्या, परफ्युम्स, साबणं नि काय काय.....
आमच्या घरी कपडे धुण्यासाठी बाई होती. तिच्याबरोबर मी अनेकदा नदीवर जायची. शुक्रवारी ती वैतागायची. म्हणायची, 'आज नदीवर जागा सापडायची नाही, दगड मिळायचा नाही चांगला.' अशावेळी एखादा नवीन दगड शोधावा लागे. तो वापरात नसल्याने घासून घासून साफ करावा लागे. तरी त्याचीच घाण कपड्यांना लागे. असे पुन्हा पुन्हा घासून गुळगुळीत झालेले दगड पुन्हा लवकर येणाऱ्या बाया पटकावत. पण कोणाची तक्रार नसे. कारण ही गर्दी फक्त शुक्रवारी. बाकीच्या दिवशी बायांनी घासून मऊ केलेले हे सारे दगड आपापल्या सख्यांची वाट बघत स्वच्छ, पण कोरडे ठाक पडलेले असायचे. आणि त्यांच्या सख्यांनाही शुक्रवारचा इंतजार असायचा.

कपडे घेऊन घरी गेल्यावर त्या दिवशी घरात त्या बाईला फार काम नसे. बिचारी दिवसभर कपडे धुऊन आलेय याबद्दल सहानुभूती असे. संध्याकाळचं जेवणही घरात राहिलेल्या बाईने शिजवायला घेतलेलं असायचं.


फक्त दगडच नव्हे, तर शुक्रवारी नदी देखील आनंदात थबकायची. संथ व्हायची. दोन्ही काठावरच्या बायांच्या गप्पा, गाणी, क्वचित छोटंसं भांडणं, वादावादी ऐकत. त्यांचे कपडे धुवू लागायची.  आठवडाभराचा तिचा एकटेपणाही भरून निघायचा. एरव्ही ती देखील एकटीच दिवसरात्र पाणी वाहत राहायची. नासिरच्या बायकोसारखीच...!

Oct 17, 2022

सौ. मंगळसूत्र साडी इत्यादी....

 सौ. लावणे, मंगळसूत्र घालणे, साडी नेसणे, सण-वार पाळणे...

फेमिनिझममध्ये हे सगळं मागास समजले जाते. ते योग्यही आहे. त्यासाठी कधीतरी टोचेल असं बोलून स्त्रियांना जागृत करण्याचा प्रयत्न जरूर करावा. परंतु प्रत्येक स्त्री ही बदलाच्या कुठल्या ना कुठल्या पायरीवर असते. सगळ्याच स्त्रियांना एकाच वेळी हे सगळं त्यागून बंधमुक्त होणं कठीण आहे.

 
साधं पोशाखाचं बंधन देखील स्त्रियांना त्यागणं फार कठीण होतं. ब्रिटीशांचं पाहून शंभर वर्षांपूर्वीच पुरुषांनी धोतरं सोडून पॅंटी चढवल्या. मात्र स्त्रियांना नऊवारीतून पॅंन्टीत नि पॅन्टीतून हाफ पॅन्टीत यायला तब्बल सहा पिढ्या लागल्या...नऊवारीला पाचवारीसाठी संघर्ष करावा लागला. टोमणे ऐकावे लागले. पाचवारीला सलवार कमीजसाठी तेच करावं लागलं. सलवारीला पॅन्टसाठी संघर्ष करावा लागला नि पॅन्टवालीला गुडघ्यापर्यंतचा प्रवास करायला एक पिढी लागली. म्हणूनच आजही समाजात एकाच वेळी एकाच शहरात स्त्रिया अजून नऊवारी ते हाफ पॅन्ट या सर्व प्रकारच्या कपड्यांत दिसत असतात... मात्र धोतरवाले पुरुष फार म्हणजे फारच विरळा झाले. 
महाराष्ट्रीयन समाजात मंगळसूत्राचे महत्त्व अतिशयोक्त इतके पहिल्यापासून आहे... त्यामुळे ते अजूनही टाकण्याची स्त्रियांची मानसिकता तयार होत नाही. यात हिंदू वगैरे असण्याचा काडीचा संबंध नाही. हिंदू म्हणून सौभाग्याची लक्षणे प्रत्येक राज्यात वेगळी आहेत. कुठे सिंदूर आहे, तर कुठे मंगळसूत्र आहे.. तर पंजाबसारख्या राज्यात काहीच नाही. कुंकू सुद्धा लावत नाहीत अनेक पंजाबी सरदार बायका. कदाचित तिथे मोगली सत्तेचा प्रभावामुळे कुंकू कमी झालं असू शकेल. तरी बाया सौभाग्याची चिन्हे कवटाळून बसतायत अजून हे खरं आहे. कधी कधी लोकांच्या प्रश्नांना उत्तर नको म्हणून, कधी सामाजिक प्रतिमा अबाधित राहावी म्हणून, कधी सासरच्यांचा धाक म्हणून...

तरी देखील बदलाची ही धीमी गती पुढच्या पिढीत जलद होताना दिसते. अशावेळी बदलाच्या प्रत्येक स्तरावर, प्रत्येक पायरीवर असलेल्या स्त्रीचे स्वागत करायला हवे. तिला स्वीकारायला हवे. समोरच्याचा बदल बघून कदाचित ती बदलणार नाही, पण पुढच्या पिढीसाठी तरी ती सौम्य होईल.

हीच गोष्ट सणावाराची... आज ज्या स्त्रिया, 'मी नाही बाई काही करत असलं..' म्हणत स्वतःतील सुधारणा किंवा वैचारिकता मिरवत असतात, त्या देखील या ना त्या कारणाने पाच पंचवीस वर्षांपूर्वी हे सगळं करतच होत्या. त्यांना लवकर जाग आली, लवकर स्वातंत्र्य मिळालं, घरात तशी पार्श्वभूमी मिळाली हे देखील बदलासाठी तेवढंच कारणीभूत आहे. सर्वांना तशी पार्श्वभूमी, तसे कुटुंब, तसे शहर, सुबत्ता मिळतेच असं नाही... साधं उदाहरण घ्यायचं तर सर्वांनाच तयार फराळ परवडत नाही. त्यांनी घरी केलं तर त्या फुकट राबताहेत म्हणणं कितपत योग्य आहे..? त्यांनी आपल्या मुलाबाळांना करून खायला घालायचे नाही का? अनेक घरात सणावाराची साफसफाई, फराळ, खरेदी यात घरचे पुरुषही भरपूर मदत करत असतात.... 

संविधान हाच धर्म माना... सावित्रीबाईंनी तुम्हाला शिकवलं, त्यानाच पुजा..नवरात्रीत नऊरंग नेसू नका... ह्यॅव नि त्यॅव... अनेक उपदेश बायांना केले जातात. ते जरूर केले जावेत... परंतु त्यासाठी त्यांना हिणवले जाऊ नये.. स्वतःला पुरोगामी समजणाऱ्यांच्या घरातही शंभर टक्के याचे पालन होत नसते. कुठेतरी परंपराशरणता असतेच असते...त्याला वेगवेगळ्या रितीने ते समर्थन करू शकतात, इतकंच.

नटणं, सजणं, चांगलं दिसणं ही मानवी प्रवृत्ती आहे. पुरुष देखील याला अपवाद नाहीत. नाहीतर नैसर्गिक दाढ्या वाढू न देता विविध प्रकारे त्या कोरण्याची पद्धत त्यांनीही स्वीकारली नसती... बाया भुवया कोरतात म्हणून त्यांना हिणवणारे हे बघत नाहीत, की ते दाढ्या का कोरतात मग? का जंगली माणसाप्रमाणे केस, दाढ्या वाढू देत नाहीत?

सजायचं नाही, मेकअप करायचा नाही, लाजायचं नाही, नैसर्गिक राहायचं... ही आधुनिक बंधनं तर टाकली जात नाहीत ना स्त्रियांवर पुन्हा?

त्यामुळेच, प्रत्येक छोट्या बदलाचे देखील स्वागत व्हावे.. ज्यांनी या गोष्टी टाकल्या त्यांचे कौतुक जरूर व्हावे, पण ज्या टाकू शकल्या नाहीत, त्यांना बदलायला वेळ लागतोय, एवढे तरी समजून घ्यायला हवे. कारण आपणही एका रात्रीत बदललेलो नाही... आपल्या एकेका पिढीला बदलत आणलंय स्त्रीवादी चळवळीने... पण ही धीम्या गतीची असली तरी शंभर टक्के पुढे जाणारी चळवळ आहे हे नक्की... तिला आता मागे फिरवता कुणालाच येणार नाही... अगदी कुठल्याच धर्माच्या सनातनी प्रवृत्तीलाही नाही... कारण ईराणसारख्या देशातही स्त्रिया बुरखा जाळू लागल्या.... ही केवढी मोठी गोष्ट आहे..........

स्त्रियांना त्यांच्या गतीने बदलू द्या......पुरुषांत देखील सर्व स्तरावरची विविधता दिसते की... ते तरी कुठे सगळेच्या सगळे पुरोगामी आहेत........

जे पुरोगामी म्हणवतात स्वतःला ते देखील बायस्ड वागताना दिसतात.... पुरोगामींना देखील इस्लामचे नाव घ्यायला भीती वाटते, मग स्त्रियांना सासरच्यांची वाटणार नाही ....? हाहाहाहा........!

Sep 17, 2022

स्त्रियांच्या लेखनावरची सेन्सॉरशीप

 लेखनात काय लिहायचे आणि काय नाही याचे काही अलिखित नियम असतात. त्यातही महिलांसाठी हे नियम अधिक कडक असतात बहुधा.
परवा आकाशवाणीवर कविता सादर करायला गेले होते. एका कवितेत 'साला' शब्द होता. तिथल्या अधिकारी मॅडम म्हणाल्या हा शब्द काढून टाका. मी म्हटलं, अहो, मराठी साहित्याने नामदेव ढसाळ पचवलेत. 'साला' शब्दाने काय मोठं वादळ उठणार आहे?
त्या काही बोलल्या नाही. मी शब्द बदलला नाही. कदाचित त्या ती कविता सादरीकरणाच्या वेळी काढून टाकतील. त्यांनी तशी ती नाही काढली तर मला आनंद होईल.

'ग्राफिटी वॉल' या कविता महाजनच्या लेखांचं पुस्तक वाचताना त्यातील 'कविता आणि कॉण्डम' या लेखातले उतारे खाली देतेय. 





वाचल्यावर खरंच आश्चर्याचा धक्का बसला. कविता महाजन यांची कविता येण्याआधीच नामदेव ढसाळ आणि अनेक विद्रोही कवींनी अतिशय जहाल आणि लैंगिकतेचा उल्लेख केलेल्या कविता येऊन गेल्यात. कवितेत केवळ कॉन्डोमचा उल्लेख आल्याने यात नमूद केलेली, स्वतःला परिवर्तनाच्या वाटेवरचे वाटसरू समजणारी मंडळी जर असा आक्षेप घेऊन ती कविता टाळत असतील तर काय म्हणावे?


म्हणजे हे नियम फक्त स्त्रियांच्याच साहित्याला आहेत म्हणायचे की काय? ही अलिखित सेन्सॉरशीप केवळ स्त्रियांनाच असते का? एरव्ही देखील लेखनात शिव्या, लैंगिकतेसंदर्भातले शब्द जर स्त्रियांच्या लेखनात आले, तर समाज अस्वस्थ होताना दिसतो. एकच वाक्य, पण जर ते पुरुषाने उच्चारले तर त्याकडे सहजपणे बघितले जाते, नव्हे कधी कधी तर कौतुकाने पाहिले जाते. पुरुष असाच असायला हवा, आक्रमक, दांडगाई करणारा, रांगडा. पण तेच वाक्य स्त्रीने लिहिले किंवा उच्चारले, तर, 'काय बाई आहे?' अशा नजरेने पाहिले जाते. अगदी अशी बायको असेल, तर 'नवऱ्याचं बिचाऱ्याचं काय ?' असे तारेही तोडले जातात. 
बाई जर लैंगिक विषयावर लिहीत असेल, शृंगारिक लिहीत असेल, तर तिला गृहीतही धरले जातेच. अव्हेलेबलही समजले जाते. 

अर्थात आता परिस्थिती बदलताना दिसतेय. बाया समाजाच्या नजरेला जुमानत नाहीत आता. त्यांना हवं तसं व्यक्त होऊ लागल्यात. पण समाजपुरुष मात्र अजून बदलायचे नाव घेत नाही.


अशावेळी एक चांगला अनुभव आलेलाही शेअर करावासा वाटतोय. 

'अडकलेला पाऊस' या माझ्या कवितेत मी पावसात भिजत असलेल्या पुरुषाच्या निव्वळ देहाचे शृंगारिक वर्णन केले आहे. एकदा डोंबिवलीच्या गणपती मंदिरात कविसंमेलनात कविता सादर करण्याचे आमंत्रण होते. दोन कविता सादर करायच्या होत्या, त्यात मी ही कविता सादर करण्यासाठी निवडली होती, ती जरा भीत भीतच. लोक आक्षेप घेतील की काय? एक तर मंदिरासारखं सो कॉल्ड पवित्र आणि डोंबिवलीतलं वगैरे ठिकाण, संघासारखे ट्रस्टी.

कविता सादर केली. आणि कार्यक्रम संपल्यानंतर दोन मुख्य ट्रस्टी जे चांगलेच वयस्कर होते, त्यांनी येऊन आधी माझं कौतुक केलं. 'तुमची कविता नेहमीपेक्षा हटके होती' हे आवर्जून सांगितलं. तेव्हा आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. 
वरील दोन्ही उदाहरणे  विसंगत वाटतात ना..?. म्हणजे जिथे स्वतःला आधुनिक कवितेच्या वाटेवरचे प्रवासी समजतात, तेच लोक सोवळेपणा दाखवताना दिसतायत. तर जिथे सोवळेपण अपेक्षित होते, त्यांनी मात्र ही बदलाची कविता सहजपणे स्वीकारली. 
थोडक्यात काय, तर काही समजुती आपल्या मनात घट्ट असतात, पण तशा त्या असतातच असं नाही.

---

महिला खूप घाबरतात, जाहीरपणे काही लिहायला, व्यक्त व्हायला. त्यातही त्या प्रामुख्याने घाबरतात त्या आपल्या घरच्यांना, नातेवाईकांना, शेजारच्या पाजारच्या लोकांना. ते काय म्हणतील? आपल्याला काय समजतील? त्यांना काय वाटेल? याचा खूप बाऊ करतात महिला. 
माझ्या एका लेखक मैत्रिणीने कादंबरी लिहायला घेतली. तिचं म्हणणं की ते तिचं आत्मवृत्तच आहे. मी तिला म्हटलं मग ते आत्मवृत्त म्हणूनच लिही. कादंबरी का? त्यावर तिचं म्हणणं होतं की यातली माझ्या आयुष्यातली पात्रं दुखावतील. आता काय बोलायचं? म्हणजे जे भोगलंय, सहन केलंय, आणि ज्यांच्यामुळे भोगलंय, सहन केलंय त्यांनाही न दुखावण्याची इतकी काळजी स्त्रिया घेतात. त्यांची बदनामी समाजात होऊ नये म्हणून काळजी घेतात. हे म्हणजे त्यांनी ्स्वतःच स्वतःवर लादून घेतलेली सेन्सॉरशीपच नव्हे काय?

---

बाया जाहीर भांडू लागल्या तरी त्यांना नावे ठेवली जातात. सोशल मिडीया असो की अजून कुठे, बाया जर पुरुषांच्या गोतावळ्यात वाद घालू लागल्या, आक्रमक होऊ लागल्या तर त्यांना उपहासाला, निंदेला सामोरं जावं लागतं. ही बाई जरा जास्तच दिसते असा ग्रह पुरुषच नाही, तर इतर बायाही करून घेतात. तसं बोलून दाखवतात. आक्रमक पुरुषाचं कौतुक, तर आक्रमक बाईची निंदा हे ठरलेलं असतं. मात्र बाया घरात, नळावर एकमेकींशी भांडत असतील तर मात्र त्यांच्या भांडणांची मजा घेतली जाते, त्यावर विनोद केले जातात, स्त्रीच स्त्रीची शत्रू कशी असते हे हिरीरीने सांगितलं जातं अशावेळी. 

या सगळ्यात शेवटी काय, तर बाईने मृदू शब्द वापरावेत नेहमी. प्रेमाने बोलावे. सेक्सबद्दल बोलू नये, पुरुषांशी वाद घालू नयेत, आक्रमक होऊ नये... थोडक्यात बाईने कुठल्याच बाबतीत पुरुषांच्या वरचढ होण्याचा प्रयत्न करू नये....


- अलका गांधी-असेरकर






Jan 15, 2021

सरस्वती -

 समजा, उद्या माझं कवितांचं पुस्तक लैच गाजलं 😜 आणि त्याला वेगवेगळ्या पुरस्कारांसोबत एखाद्या मुस्लिम गटाकडून देखील पुरस्कार मिळाला 😝आणि त्या पुरस्कारावर उर्दूत (किंवा अरेबीत) 'अल्लाह' असं लिहिलेलं असेल, तर मी पुरस्कार स्वीकारावा की नाही?

काळजीने झोप येत नाहीए... काय निर्णय घ्यावा मी अशावेळी?
-
-
-
सध्या सरस्वतीवर गंडांतर आलंय.
या देशात सरस्वती विद्येची, लक्ष्मी धनाची आणि दुर्गा शक्तीची प्रतिक मानली गेली, पुजली गेली, तरी मध्यंतरीच्या शेकडो वर्षांच्या काळात स्त्रियांनाच (सर्वच वर्णजातीच्या) शिक्षण नाकारलं गेलं, आर्थिक स्वावलंबन नाकारलं गेलं, आणि अबला म्हणून हिणवलं गेलं...
मान्य...
पण त्यात या तिघींचा काय दोष... त्या स्वतःच बिचाऱ्या कैद केल्या गेल्या अंधाऱ्या गाभाऱ्यात.. दागदागिन्यांनी मढवून गोठवल्या गेल्या.
त्यांनी तर सांगितलं नव्हतं की माझी विद्या, माझी शक्ती, माझी संपत्ती कुणाला देऊ नका म्हणून?
कुणाला सोडा... त्यांच्याचकडून या तीन गोष्टी हिरावल्या गेल्या.
त्या बिचाऱ्यांचा राग करून काय उपयोग? अडाणी, निरक्षर बहिणाबाईही म्हणतात - माझी माय सरसोती, मला शिकवते बोली | लेक बहिणाच्या मनी किती गुपितं पेरली||
छोडो कल की बातें...
सरस्वतीच्या मांडीवर छान वीणा आहे... हातात पुस्तक आहे.. बाजूला मोर आहे, हंस आहे... लोभस आहे हे सगळं...
प्रतिकं चांगली असतात, माणसं त्यांचा गैरफायदा घेतात. गैरवापर करतात.
असो...
हिंदूंची सर्वच प्रतिकं नाकारायची, तर हिंदूंच्या कुठल्याच कार्यक्रमात सामील होता येणार नाही, आप्तस्वकीयांच्याही नाही.
उद्या तुमच्या घरात हिंदू मुलगी सून म्हणून आली, तर तुम्ही तिच्या श्रद्धांना नाकारणार? तिला नाकारायची सक्ती करणार?
होय कदाचित. भाऊ कदमने गणपती बसवल्याचा किस्सा आठवला. त्याची बायको जर हिंदू असेल, तर तिने आपल्या प्रथा परंपरा सणवार सोडून देण्याचा आग्रह तुम्ही कराल?
मग उद्या तुमची मुलगी हिंदू घरात गेली, तर तिलाही तिच्या प्रथा बाजूला ठेवायला सांगितले जाईल...
शेवटी तुम्हीही पितृसत्ताक धर्म, विचार यांची बाजू घेणार. अमलात आणणार...
असो - No issues.... थोडा विचार करता मनात आलं, की कदाचित रामाच्या नावाने मला पुरस्कार दिला, किंवा अगदी पुरस्काराच्या कागदावर रामाचं चित्र असेल, तर मीही नाकारेनच कदाचित....पिढ्यानपिढ्या सोसलेले, भोगलेले दुःख बंड करून उठतेच असे... पण पुन्हा मी विचार करेन, की रामावरच टिका केलेल्या माझ्या कविता जर रामभक्त वाचून मला पुरस्कार द्यायला तयार झाले असतील, तर काय हरकत आहे? माझ्याच विचारांचा तो विजय आहे.
पण..
या निमित्ताने माझी एक जुनी कविता -
आदिशक्ती -
त्याने दुर्गेची अमाप, अफाट शक्ती पाहिली
आणि तो घाबरला
त्याने सरस्वतीची अमाप, अचाट बुद्धी पाहिली
आणि तो हतबुद्ध झाला
त्याने लक्ष्मीची अमाप, अमर्याद सत्ता पाहिली
आणि तो हादरलाच..

मग त्याने सुरू केली स्तुती
त्या तिघींच्या
तनुतील सौंदर्याची, उरातील वात्सल्याची, अन्
करातील कार्यक्षमतेची..
अन् बहाल करून टाकलं त्यांना देवत्व...

तेव्हापासून
त्या विसरल्या आपली शक्ती, बुद्धी, संपत्ती
आणि पडल्या प्रेमात
आपल्याच तनुतील सौंदर्याच्या,
उरातल्या वात्सल्याच्या अन् करातल्या कार्यकुशलतेच्या

घडलं हे त्याच्या मनाप्रमाणेच
उचलला याचा अचुक फायदा त्याने
आणि पटकावला ताबा त्यांच्या
शक्ती, बुद्धी, संपत्तीचा

नंतर तर हळू हळू
त्यांचा या गोष्टींवरील
हक्कही नाकारण्याइतपत मजल गेली त्याची

आणि त्या...
त्या आहेत अजूनही खुश
आपल्याला बहाल केलेल्या देवत्वावर
आणि वरून चिकटवण्यात आलेल्या गुणांवर.......... -अलका गांधी-असेरकर
·



Comments

Jan 7, 2021

घर आणि गृहिणी -

 काल मी फेसबूकवर 'घर' ही माझी कविता पोस्ट केली. माझ्या 'कन्या-रास' या आगामी कवितासंग्रहातील ही कविता आहे. याच संग्रहात एक 'गृहीणी' या नावाची कविता देखील आहे. 
मला स्वतःला गृहीणी हे पद आणि ही संकल्पना मान्य आहे. या पदाचं कार्यक्षेत्र फार मोठं आहे आणि या पदाचं केवळ कौटुंबिकच नव्हे, तर सामाजिक आणि राष्ट्रिय महत्त्व देखील मोठंच आहे. 
"स्त्रियांचे कष्ट मोजले जातील, तेव्हा मानवी समाजाची सर्वात मोठी चोरी पकडली जाईल" असं कुणाचं तरी वाक्य आहे. 
स्त्रिया जे घराकरता, कुटुंबाकरता राबतात त्या कष्टाचे पैशात मोल होत नाही. त्या घरात खाऊनपिऊन राबतात. कुटुंबाचा कर्ता श्रीमंत असेल, तर समाज त्या गृहीणीलाही श्रीमंत म्हणतो आणि तिला चांगलंचुंगलं खायला ल्यायला मिळू शकतं. याउलट जर कर्ता गरीब असेल, मध्यमवर्गीय असेल तर त्या प्रमाणातच तिला खायला ल्यायला राहायला मिळू शकतं. इथं तिच्या हातात चॉइस नाही. जोपर्यंत ती स्वतः कमवत नाही तोपर्यंत तिला स्वतःची गरीबी, श्रीमंती नाही. घरातील कर्त्या माणसाची जी आर्थिक स्थिती, तीच तिचीही. 

अर्थात सामाजिक रचना आणि व्यवस्था अशा आहेत की यात कुणालाही काही वावगं वाटत नाही. ना त्या स्त्रीला, ना कुटुंबियांना, ना समाजाला. नवरा राखेल तसंच गृहीणीने राहावं. कमी पगार असेल, तर काटकसर करावी नि अधिक असेल, तर मिरवावं हे अगदी सर्वमान्य आहे, नव्हे तशीच सामाजिक अपेक्षा आहे. 
इथपर्यंत ठिकही आहे. मात्र यात स्त्री ही पूर्णपणे परावलंबी आहे याची जाणीव फार कमी वेळा आणि कमी लोकांना होते. अगदी सगळा पगार जरी घरातला कर्ता पुरुष त्या स्त्रीच्या हातात आणून देत असेल, तिला खर्चाचे, निर्णयाचे स्वातंत्र्य देत असेल, तरीही .. तरीही जेव्हा वेळ येते तेव्हा तिचा त्या पैशांवर काडीचाही हक्क नसतो. ती असते केवळ खजिनदार. एक जबाबदार खजिनदार.!

जेव्हा कुठलीही इमर्जन्सी येते, त्या घरातल्या इतर व्यक्तींशी, विशेषतः घरातल्या कर्त्या व्यक्तीशी उर्फ नवऱ्याशी तिचं पटेनासं होतं, वादावादी होते तेव्हा तिला या सगळ्यावर पाणी सोडावं लागणार असतं. ते खजिनदाराचं पदही सोडावं लागणार असतं. किंबहुना प्रत्यक्ष घर सोडायचं नसेल, किंवा घटस्फोटही घ्यायचा नसेल, केवळ भांडणाच्या वेळी रागात बोलायचं असेल, की मला नाही राहायचं तुझ्याबरोबर... तेव्हा खरंतर त्या स्त्रीलाही माहीत असतं की नाही राहायचं हे खरं, पण एक रात्रही जायचं असेल रागवून तर जायचं कुठं? माहेरी? त्या घरावर तिचा कितपत हक्क असतो हे साऱ्यानाच ठाऊक आहे. माहेरी जायचं ते केवळ पाहुणी म्हणून असा समज आजही पक्का आहे. तेव्हा तिथं जाऊन राहाणं हे म्हणजे ना घर का ना घाट का अशी अवस्था असते हे प्रत्येक स्त्री जाणून असते. त्यात माहेरी फक्त आईबाबा असतील तर जरा तरी राहणं सोपं असतं. पण तिथे भावाचे कुटुंब असेल, तर पुन्हा तेही कठीणच. अगदी पाहुणी म्हणूनही तिथं राहणं किती अवघडलेपणाचं असतं ते एक स्त्रीच सांगू शकते. 
राहिला कायदेशीर हक्काचा प्रश्न. माहेर, सासर किंवा नवऱ्याचे घर यात कायदेशीर हक्क जरूर आहेत पण ते मिळवायचे म्हणजे संघर्ष आला. ते मिळवायचे म्हणजे शेवटचं तोडण्याचं टोक आलं. यात सहज हिस्सा असा कुठं आहे?
बऱ्यापैकी आर्थिक परिस्थिती असेल, तर त्यातल्या त्यात घरावर तिचंही नाव असतं. किंवा इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी तिच्या नावावरही काही मालमत्ता असते. पण त्या मालमत्तेची माहिती, कागदपत्रे इत्यादीचीही किती गृहीणींना माहिती असते आणि त्याचा उपभोग त्या नेमका किती घेतात हा प्रश्नच आहे. 
अनेकदा श्रीमंत घर पाहून मुलींची लग्नं केली जातात. पण ते सासरचं घर तिचं तर सोडाच, तिच्या नवऱ्याच्या नावावरही नसतं. ते असतं सासऱ्याच्या, चुलत सासऱ्याच्या, किंवा आजेसासऱ्यांच्या नावावर. आणि अशी कुटुंबे भारतात आजही बहुसंख्येने आहेत. तिथे तर ती अगदीच परावलंबी जीव असते. 
काल पोस्ट केलेली कविता होती.. 'घर'
या कवितेत प्रामुख्याने रोख होता तो अशा स्त्रियांवर. स्त्रियांना पुरुषांपेक्षा घर अधिक प्रिय असतं. घराची स्वप्नं पुरुषापेक्षा स्त्रीला अधिक मोहवत असतात. घर हे केवळ तिचं स्वप्नं नसतं. तिची सुरक्षितता असते. तिचं स्थैर्य असतं. असं असूनही स्त्रीला स्वतःचं, स्वतःच्या पैशांचं, स्वतःच्या नावावरचं घर असावं असं का वाटत नसेल? वयात आलेल्या प्रत्येक लग्नाळू मुलाच्या घराचा विचार केला जातो. एकतर त्याला त्याचे पालक घर घेण्यास मदत करतात, शक्य असेल, तर त्याला त्याच्या नावाचं स्वतंत्र घर करून देतात. नसेल, तर त्याला त्याच्या कमाईतून, कर्ज काढूनही एक घर घेण्यास अतीआग्रह केला जातो. आणि त्याचं आयुष्य सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र  मुलीच्या बाबतीत आजही हे होत नाही. आपल्या मुलीचं भवितव्य सुरक्षित असावं, तिच्या नावाचं स्वतंत्र घर असावं, तिने ते आपल्या कमाईतून घेण्याचा प्रयत्न करावा असं क्वचितच कुणा पालकांना वाटताना दिसलंय. 
तिच्या लग्नाचा विचार तिच्या लहानपणापासून केला जातो. त्यासाठी पैसे बाजूला काढले जातात. अगदी लाखो रुपये. लग्नाच्या एका दिवसात उडवले जातात. गरीबातला गरीब माणूस पण जास्तीतजास्त पैसे मुलींच्या लग्नावर खर्च करायला तयार असतात. ऋण काढूनही. पण त्याऐवजी त्याच पैशातून तिचं पूर्ण भवितव्य सुरक्षित होईल अशा विचाराने तिच्या नावाने छोटंसंही घर घेतलं जात नाही. अपवाद असतील. आणि यात कुणालाही काही खटकत नाही याचं वाईट अधिक वाटतं. 
माझ्या या संग्रहात तीनचार कविता या विषयावरच्या आहेत. दुसरी 'गृहीणी' या नावाची जी कविता आहे त्याचा अनुभव मी स्वतः अनेकदा घेतला. गृहीणीला तिच्या नावावर तिच्या नवऱ्याने, किंवा कर्त्या पुरुषाने घर घेऊन दिलं तरच ते होऊ शकतं. अन्यथा तिला तिच्या नावावर घरासाठी कर्ज मिळत नाही. तिला कोणत्याच कारणासाठी कर्ज मिळत नाही. इथंच स्त्रीचे गृहीणी या नात्याने असलेले पद पोकळ ठरते. तिच्या कष्टाला मोल नाही हे तेव्हा कळते. ती परावलंबी आहे हे तेव्हा कळते. 
परवाचीच गोष्ट आहे. एके ठिकाणी एक छोटंसं घर बुक करण्याचा प्रयत्न चालू आहे. अगदी विचार केला तर बहुसंख्य कुटुंबांमध्ये हक्काचं घर विकत घेण्यासाठी धडपड त्या कुटुंबातील स्त्रियाच अधिक करतात. त्यासाठी काटकसर करतात, प्लॅनिंग करतात. घरातल्या पुरुषाचा पिच्छा पुरवतात. पण आर्थिक नाड्या तिच्या हातात नसतात. कर्ज इत्यादी घरातील कमवत्या व्यक्तीच्या नावावरच मिळणार असतं. 
मी देखील हक्काचं घर व्हावं म्हणून नवऱ्यापेक्षा अधिक प्रयत्न केले नेहमी. म्हणून हे स्थैर्य कुटुंबाला मिळाले. पैसे जरी नवऱ्याने दिले तरी सारे आयोजन माझेच अधिक होते. धडपड माझीच राहीली. त्यासाठी त्याचं मन वळवणं हे माझंच (अतिशय मानसिक संघर्ष) होतं. आणि घर तर त्याच्याच नावावर झालं. पण मी त्याला नेहमी बोलते, की घर हे केवळ पैशानी होत नाही. हे घर उभं करण्यात माझा वाटा अधिक आहे. पण हे बोलणं व्यावहारिक दृष्ट्या निरर्थक आहे. हे मलाही माहीत आहे.
त्याप्रमाणेच आताही झालं. एके ठिकाणी सेकंड होम म्हणून घर घेण्याच्या इच्छेने प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी मुलाला कर्ज घ्यायला सांगितले आहे. पण त्यात पैसे माझा नवराही टाकणार आहे. साहजिकच आता हे घर माझ्या नावावर असावं असं मला वाटतंय. त्यासाठी फार पूर्वी नवऱ्याने माझ्या नावावर (तेही नाईलाजाने.. कारण काही कारणाने कागदोपत्री त्याला तो प्लॉट त्याच्या नावावर घेणं शक्य नव्हतं म्हणून.) एक छोटा प्लॉट घेऊन ठेवला होता. तो विकून त्याचे पैसेही मी या फ्लॅटमध्ये गुंतवायचे ठरवले. पण आता गोची अशी झाली आहे, की जी व्यक्ती आयुष्यात पहिल्यांदा घर घेईल तिला पंतप्रधान योजनेतून दोन लाख साठ हजार रुपये मदत मिळते. आता योजनेत अशी तरतूद आहे की त्यासाठी ते घर त्या व्यक्तीच्या नावावर असावं किंवा त्याच्याबरोबर त्याच्या बायकोचं चालेल. मात्र आईचं चालणार नाही. कारण आईच्या नवऱ्याचं जे घर आहे तेच तिचंही पहिलं घर आहे. त्यावर तिचं नाव असो की नसो. जर माझं नाव त्या घरावर लावलं तर माझ्या मुलाला ते अडीच लाख रुपये मदत मिळणार नाहीत. अडीच लाखाची रक्कम आमच्या सारख्या मध्यमवर्गीय, ईमानदारीने पगार एके पगारावर आयुष्य काढलेल्या, लाचलुचपतीने पैसा न कमवलेल्या कुटुंबाला मोठीच वाटत आहे. त्यावर पाणी सोडायला मन होत नाही. मात्र तसे केले तर घर हे फक्त मुलाच्या नावाने होणार. माझ्या नाही. 
म्हणजे मला सरकार कर्जही देणार नाही. मदतही देणार नाही. मुल्य कुणाला आहे? तर रोख कमावणाऱ्या व्यक्तीला फक्त. गृहीणी आयुष्यभर झिजत असेल, समाज उभारण्यात, पर्यायाने देश उभारणीसाठी स्थिर कुटुंब देण्यात ती कितीही मोलाचे काम करत असेल, तरी तिची आर्थिक किंमत शून्य आहे. हीच खंत माझ्या या 'गृहीणी' या कवितेत उतरलेली आहे. 
साहजिकच माझ्या पिढीतल्या स्त्रियांनी केली ती चूक पुढील पिढीतल्या मुलींनी करू नये. स्वतःचं हक्काचं घर करावं. नोकरी व्यवसाय करावा. फक्त नवऱ्याच्या घराची स्वप्नं आपण पाहू नये. नवरा लाखांनी कमवत असेल, तरी तुम्ही फक्त गृहीणी म्हणून न राहता चार पैसे हक्काचे मिळवायचा प्रयत्न करावा. आळशी कोकीळेप्रमाणे नवऱ्याच्या घरात अंडी घालून नवऱ्याच्या पैशावर मजा करण्याचे स्वप्नं पाहू नये. कारण ही मजा अधांतरी आहे. परावलंबी आहे. यात स्वाभिमानही नाही. कारण नवरा आणि सासर कितीही श्रीमंत आणि चांगलं असेल, तरी जोवर तुम्ही तिथं त्यांच्या मर्जीने नांदताय तोवरच ते तुमचं असणार आहे. ज्या क्षणी संघर्ष होईल त्या क्षणी तुम्ही कफल्लकच असणार आहात 

गृहीणी -








अलका गांधी-असेरकर



Oct 22, 2020

तलाश है, तलाश है....

 तलाश है...

माझी बायको सालस आहे, माझ्यासारख्या फाटक्या, उनाड, वर्कोहोलिक, अल्कोहोलिक, हरफनमौला, फिरस्त्या, आळशी, छांदिष्ट, करीअरीस्ट, परदेशस्थ, व्यवहारशून्य, घरकामशून्य, जगनमित्र, भोळ्या....इ. इ. यापैकी कोणतीही, किंवा कितीही वैशिष्ट्ये असलेल्या नवऱ्याला तिने सांभाळून घेतले, मी लक्ष दिले नाही, तरी माझी पोरंबाळं, माझी माणसं इत्यादींचे संगोपन केले, सेवा केली, नातेवाईक सांभाळले, व्यवहार सांभाळले, माझा संसार फळाला आणला. तरी कशाची मागणी केली नाही. सर्व काही निरपेक्षपणे केले, कधी कुणाला उलट बोलली नाही, माझ्यासाठी वडाला फेऱ्याच मारल्या, उपास तापास केले, मी दिलेल्या पैशात निमूट संसार केला. फार शिकलेली नसली, तरी व्यवहारचतुर आहे. (किंवा याच्याउलट, फार शिकलेली असून प्रौढी नाही. करीअरीस्ट नाही. असंही) कधी मी नाही दिले, माझी नोकरी गेली, व्यवसाय बुडला, तरी तिने कुठून तरी सोय केली पण घरच्यांना कमी पडू दिले नाही. गरज पडली तेव्हा नोकरी सोडली, गरज पडली तेव्हा नोकरी केली, स्वतःची वैयक्तिक मते ठेवली नाही. छंद ठेवले नाही. घर सोडून एक दिवसही एकटी कुठे गेली नाही. मला रोखलं नाही, टोकलं नाही. माझ्या हो ला हो केलं. तिच्या अशा वेगळ्या आवडी नाहीत. निवडी नाहीत, फॅशन नाही, खर्चिक नाही, कुळाचार सांभाळले, सणवार सांभाळले.. इ. इ. इ.


हुश्श..!!
किती ती यादी... आपलं, किती ते गुण... छत्तीस गुण लाजले...
पहिलं तर, 'अबे, तुला बायको हवी होती, की मुकी कळसुत्री बाहुली? बहुगुणी, आखुडशिंगी, कमी खाणारी, जास्त दूध देणारी म्हैस तुला मिळालीय.. नाही, तसं नाही.. काहीतरी चुकतंय.. मला म्हणायचं होतं की शयनेषु रंभा, भोज्येषु माता, कार्येषु दासी तुला मिळालीय ...(It sounds classic na..).. हे मान्य आहे. कळलं आम्हाला. अशी बायको देऊन वर तुला सासऱ्याने चार चव्वलही दिले. लागलंच तर गाडी दिली, दागिने दिले, तुझ्या घरच्यांचं मानपान केलं... तेरी तो बॉस निकल पडी, तेरी पाँचो उंगलिया घी में है.
पण काय्येय, की ही अशी वर्णनं आम्ही गेली दोन शतके तरी ऐकत आलोय. कर्तृत्ववान असो, की कर्तृत्वशून्य असो, पुरुष अधनंमधनं लाजेकाजेस्तव आपल्या बायकांची अशी जाहीर कौतुके करतात. उदा. एखाद्या पुरुषाला कसला तरी पुरस्कार मिळाला की व्यासपीठावर, "आमची ही आमच्या मागे होती, माझं घराकडे लक्षच नसायचं, तेव्हा हिनेच सगळं सांभाळलं म्हणून मी हे करू शकलो"... असं दोन वाक्य म्हणावं लागतं. कारण ती बाजूलाच बसलेली असते. गाड्याबरोबर नळ्याची यात्रा म्हणत समारंभाचं आमंत्रण बायकोला द्यावंच लागतं. रीतच आहे तशी. मग तीही कृतकृत्य होते. आपण आपल्यासाठी नाही, तर कुटुंबासाठी जगलो याचं समाधान तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहतं. 'गिऱ्हाईकाचं समाधान हाच आमचा फायदा' या चालीवर, 'मालकाचं यश (नवऱ्याचं म्हणा फारतर... चालेल.) हेच आमचं यश' म्हणत त्या सुखावतात. तेवढं हरभऱ्याचं झाडं पुष्कळ होतं त्यांना अख्खं आयुष्य तरून जायला. त्यांचा जन्मच मुळी भारतीय पुरुष आणि त्याची कुटुंबव्यवस्था सांभाळण्यासाठी झालेला असतो. करम किए जा, फल की इच्छा मत कर ऐ इन्सान हे गीतेतलं वाक्य त्या जगत असतात... मान्य.
"अबे, तुला ही मिळाली नसती, तर दुसरी ह्याच छापाची मिळाली असती. भारतात असे छाप खूप आहेत. एकछापी बायका तयार करण्याचा कारखाना आहे भारतीय संस्कृती म्हणजे... त्यामुळे ये नही तो वो सही... की फर्क पैंदा...शिवाय दुसरी तुला झेपली तरी असती का वेगळी? हाही प्रश्न उरतोच ना! "
पण प्रश्न तो नाही. आम्हाला काही जलन नै बावा तुमच्या सुखावर.. तुम्हाला साती जन्म हाच छाप मिळो हिच अल्लापाशी दुआ मागू आम्ही...
आम्हाला तलाश आहे ती म्हणजे, कधीतरी -
"माझी बायको भिंगरी आहे, तिचं घरात लक्षच नसतं, कसले कसले छंद स्वतःचेच जोपासत असते, सकाळी नऊ शिवाय उठत नसते, उठली की काहीतरी लिहीत तरी बसते, नाहीतर वाचत तरी बसते, (नाहीतर गात, नाचत, लष्कराच्या भाकऱ्या भाजत... वगैरे वगैरे काहीही घेऊ शकता या जागी तुम्ही) सैपाकाचा पत्ता नसतो, गेलीच सैपाकघरात, तर नुसते प्रयोग चालू असतात तिचे वेगवेगळ्या पदार्थांचे, भाजीभाकरीच्या नावाने शून्य. तिला कवितेबिवितेत कसले कसले पुरस्कार मिळत असतात. पण चार पैसे कमवायची अक्कल मात्र नाही. मलाच तिचं बघावं लागतं. घरचं दारचं करून ऑफीस गाठावं लागतं. पोरांना शाळेत सोडावं लागतंय. ही फक्त कविता कविता (किंवा त्याजागी अन्य काहीही धरा) करत भटकत असते. व्यासपीठावर तावातावाने कविता, व्याख्यानं इ. झोडत (किंवा गात, नाचत, सामाजिक भाकऱ्या भाजत इ.इ. धरा)असते. शंभर मैत्रिणी जमवून घरात पार्ट्या करत असते. मी ऑफिसमधून आलो की मलाच बसायला जागा नसते, मलाच आवरायला लागतं. पोरं उपाशी असतात, त्यांना करून खायला घालावं लागतं. वर निर्लज्जासारखी तीच माझ्यापाशी चहा मागते. तिच्या काही मैत्रिणी तर बेवड्या आहेत. त्याच हिला बिघडवतात. माझ्यासारखा नवरा मिळालाय म्हणून. दुसरा कुणी असता तर कधीच सोडून गेला असता. हा मित्र, तो मित्र.. मित्रांची हिला नुसती कौतुकं. पण वेळेला त्यातला एकही मदतीला येत नाही तिच्या. शेवटी मीच असतो तिच्या मागे. काय करणार, पदरी पडलं नि पवित्र झालं. पण मला तिचं कौतुक आहे हो. व्यासपीठावर फडाफडा भाषणं द्यायला लागली की तिची दृष्टच काढावी वाटते मला. मला अभिमान आहे, माझी बायको इतर बायकांसारखी नाही, वडाला फेऱ्या मारणारी पौराणिक बाहुली नाही. छोटंसं का होईना, तिचं तिला विश्व आहे, तिचे छंद आहेत, तिची स्वतंत्र मतं आहेत, मी एवढं ऑफीस सांभाळतो, स्टाफ सांभाळतो, तर अशा अनोख्या एका बायकोला सांभाळणं मला काय कठीण नाही. होते जरा तारेवरची कसरत. पण मला छापाची बायको नको, तर अशीच स्वतंत्र प्रज्ञेची बायको जन्मोजन्मी मिळू दे. तिच्यामुळे घरात चैतन्य आहे, घराला शोभा आहे. नुसते कुळाचार नाहीत, तर नवनवीन विचार आहेत. मग मला तिची कितीही सेवा करावी लागली तरी बेहेत्तर. छापाच्या बायका तर घरोघरी असतात. माझीवाली एकदम हट के है....
असं म्हणणाऱ्या, लिहिणाऱ्या नवऱ्याची तलाश आहे...
कुठं घावला, दिसला, भेटला तर मला जरूर कळवा... पत्री पुलावर त्याची खणानारळाने ओटी भरून त्याचा सत्कार करेन मी जाहीर. ता. क. - माझा नवरा लेखक नाही. वक्ताही नाही. सुप्रसिद्ध व्यक्तीही नाही. त्यामुळे तो माझं कुठल्याहीप्रकारे असं जाहीर कौतुक करू शकत नाही. हे लक्षात ठेवून कमेंटावे.
-अलका गांधी-असेरकर.
Like
Comment

Aug 18, 2020

पाचा उत्तराची कहाणी -

  

बंडखोर स्त्रिया-

 

रजियाचा फोन आला आज थेट लंडनहून

किती वर्षांनी तिच्याशी बोलणं झालं.. जवळपास तिसेक वर्ष उलटली असतील..

मोबाईल युगामुळे, व्हाट्सप आदी सोशल माध्यमांमुळे हे शक्य झालंय. कुणाकडून तरी तिने माझा नंबर मिळवला आणि थेट फोन करून, "वलख, कोन बोलताय...? साधारण अंदाज आला पण पटकन नाव आठवेना.

ही कुणीतरी गावची मैत्रीण आहे नक्की. कोकणी मुस्लिम मराठी भाषा. पण नाव चटकन तोंडावर येईना. तेवढ्यात तीच म्हणाली, मी रजिया. वलकलास नाय मना?

हो हो ओळखलं ओळखलं. कुठे आहेस कुठे? लंडनलाच की आलेयस इथं गावी?

नाय. लंडनशीच बोलताय. आलू हुतू जनवरीत. मार्चच्या १५लाच परत घरी आलू. नि हा लॉकडाऊन लागला नाय..?

नंतर तिचं धबधब्यासारखं बोलणं सुरू झालं. सगळ्या चौकशा करून झाल्या. आपलं सांगून झालं. माझं विचारून झालं. हा काय करतो, ती काय म्हणते...

तिला तीन मुली नि एक मुलगा. सगळे तिथे छान शिकलेत. दोन मुली डॉक्टर झाल्यात, एक डिझास्टर मॅनेजमेंट शिकलीय, मुलगा वकील झालाय. एक मुलगी एकटीच अमेरिकेत राहून नोकरी करतेय.

वाह, अवघ्या पाचवी सातवी शिकलेल्या रजियाची ही प्रगती खासच होती. केवळ लंडनचा नवरा मिळाल्याने हे शक्य झालं होतं. म्हणजे नवरा तर शेजारच्याच गावचा, पण लंडनला नोकरी करत होता. तोही फार काही शिकलेला होता असं नाही. पण लंडन म्हणजे प्रश्नच नाही ना!... तेही तीस चाळीस वर्षांपूर्वी म्हणजे.... शानच होती.

खूप छान वाटत होतं. बरेच दिवसांनी ही भाषा कानी पडत होती. माझी भाषा बदलली. पण तिची अजून तीच आहे. म्हणजे मी काही ती भाषा बोलत नव्हते. पण गावी असताना आम्ही सगळ्या मुली पण आलो होतो, गेलो होतो असंच म्हणत असू. ते तालुक्याच्या गावी शिक्षणाकरता आले तेव्हाच सुधारलं होतं माझं. आलो होतोचं 'आले होते' झालं. कधीचच.

गाव सोडून तर वर्षे लोटली. ती लग्न होऊन लंडनला गेली. मी मुंबईत आले. तिचं जग वेगळं, माझं वेगळं. ते तेव्हाही वेगळंच होतं. ती माझी खास मैत्रीण होती असं नाही. गाव सोडल्यावरही गावात असणाऱ्या काकांकडे सुट्टीत जायची मी. तेव्हा या कंपूशी नव्याने ओळख झाली.
 

नव्याने अशासाठी, की तसं तर या सगळ्या मुली माझ्या बरोबरीच्या. थोड्या मागे पुढे. शेजारी राहणाऱ्या, पण लहानपणापासून मैत्री नव्हती. पिढ्यानपिढ्या एकत्र राहूनही हिंदूमुस्लिम भेदामुळे एक स्पष्ट असा दुरावा होता. त्यांची शाळा वेगळी. उर्दू माध्यमातली. आमची वेगळी. मराठी माध्यमातली. दोन्ही शाळा सातवी पर्यंतच. मी सातवी झाल्यावर तालुक्याला मामाकडे पुढच्या शिक्षणासाठी आले. या मुली तिथेच राहिल्या.. मग मी सुट्टीत गावी जाऊ लागले, तेव्हा यांच्याशी घसट वाढली. आम्ही सगळ्या तारुण्यात पाऊल टाकत होतो. मी त्यांच्या कंपूत गप्पा मारण्यापुरती सामील होऊ लागले. मुसलमान लोकांशी फार जवळीक करायची नाही,  इत्यादी नियम असण्याचा काळ जरा मागे पडला होता. मुख्य म्हणजे तसा दबाव निर्माण करणारे, रोखणारे जुन्या पिढीतील आजी आजोबा आता राहिले नव्हते.

गाव मुस्लिमबहुल असलं, तरी आमच्या गावात बुरखा नव्हता, पडदाही नव्हता. सगळ्या मुस्लिम मुली, बाया गावभर इतर हिंदूं बायकांप्रमाणेच बिनधास्त फिरत. सगळ्यांशी बोलत. पुरुषांशी गप्पा मारत. पण तरीही शेवटी स्त्रियानी कसं वागावं, कसं बोलावं, चालावं याचे अलिखित नियम सगळ्याच हिंदू मुस्लिम स्त्रियांसाठी होतेच.

पण हा पाचजणींचा कंपू काही वेगळाच होता. हा चारपाचजणींचा कंपू श्रीमंत बापांचा होता. तसं तर गावच बऱ्यापैकी सधन होतं. अशा श्रीमंत बापांच्या मुली काही कमी नव्हत्या दुसऱ्याही. पण या लाडावलेल्या होत्या. मुख्य म्हणजे कामाला आळशी होत्या. तशा तर रुढार्थाने आळशीही म्हणता येणार नाहीत. पण नदीवर धुणं घेऊन जाणे, विहिरीवरून पाणी भरून आणणे अशी श्रमाची कामं त्या करत नव्हत्या. यांच्या घरात बऱ्याच माम्या, काकी, वहिन्या असत. त्या ही कामं करत. दिवसभर राबत. त्यामुळे यांना ती कामं करावीही लागत नव्हती.
बाकीच्या मुली श्रीमंत घरच्या असल्या तरी नम्र असत. सासरी जाऊन कामं करावी लागतील याच्या तयारीत असत.

पण हा कंपू, ‘सासरी राबण्यासाठी जातात का? हॅट!’ या विचारसरणीचा होता.
गावात अशा स्त्रिया, मुली अजूनही भरपूर होत्या. स्वतंत्र बाण्याने जगणाऱ्या. समाजाची फार पर्वा न करणाऱ्या. त्यासाठी टिकाटिप्पण्या सहन करणाऱ्या. तीस चाळीस वर्षांपूर्वी. मुस्लिम असूनही!

गावात प्रेमप्रकरणंही भरपूर होत होती. त्यात सगळे प्रकार असायचे. पळून जाऊन लग्नं करणं, आत्महत्या करणं, श्रीमंत बापाच्या विरोधाला न जुमानता गरीब मुलाशी लग्न करणं, आईबाबा नाही म्हणत असूनही स्वतंत्र बाण्याच्या मुलीशी लग्न करणं, इज्जतीच्या नावाखाली मारून टाकणं. लग्न न करता आजन्म तसंच राहणं, लग्नं झाल्यावरही जबरदस्तीचं लग्न असल्याने नवऱ्याशी फटकून राहणं असे सगळे प्रकार असायचे त्या इवल्याशा गावात देखील. गाव म्हणजे जेमतेम पाचेकशे घराचं गाव असेल.  

एकेकीची कहाणी लिहायची, तर एकेकीवर सिनेमा निघू शकेल एक अख्खा. अशी उदाहरणं तीस चाळीस वर्षांपूर्वी आमच्या गावात होती. त्याच गावच्या पाण्यावर वाढलेली मीही. कदाचित त्यामुळेच ती बंडखोरी माझ्यातही आली असावी.  
गावात पद्धत अशी होती, की मुलींना मुलांकडून मंगनी यावी लागत असे. मगच लग्नं होत. त्यातच मान होता. शिवाय गावातल्या मुलामुलींची लग्नं गावातच होणं यातही मोठेपणा होता. ज्या मुलामुलींची लग्नं गावात जमत नसत, त्यांच्यासाठीच बाजूच्या गावात स्थळं शोधली जात होती. ते कमीपणाचं मानलं जात असे. गावात लग्नं होतायत याचा अर्थ गावात या घराला, त्यांच्या मुलामुलींना प्रतिष्ठा आहे असा त्याचा अर्थ होता. स्थळांना तोटा नव्हता. असंही मुस्लिम लोकांत नात्यानात्यांतही बरीच लग्नं होत. पण मुलामुलींच्या वर्तनावर प्रतिष्ठा होती.

त्यामुळे विशी उलटली तरी या कंपुतल्या मुलींना एकही चांगली मंगनी येत नव्हती. अठरा विशीतल्या इतर नम्र, कामसू, गरीब मुलींना पटापट मंगन्या येऊन त्यांची लग्नं होऊ लागली होती.
हा कंपू अरेला कारे करणारा होता. आपल्याच मर्जीने वागणारा होता. तोरा होता. शान होती.

गावातल्या सगळ्याच तरुण मुलांना या मुली आवडत नव्हत्या असं नाही. मुली श्रीमंत होत्या, सुंदर होत्या, तरुण होत्या, मुख्य म्हणजे हुशार, तल्लख होत्या. पण त्या मुलांच्या आईवडिलांना, पालकांना त्या मंजूर नव्हत्या. ते पालक आपल्या मुलांसाठी यांना मागणी घालणं शक्य नव्हतं.


दिवसभर हिच्या तिच्या घरी अड्डा ठोकून गप्पा मारत बसणे, गावातल्या तरूण, देखण्या, होतकरू मुलांवर डोळा ठेवून राहणे, त्यांच्या मागे पुढे करण्याच्या संधी शोधणे हा उपक्रम धडाक्यात चालू होता यांचा. ही मैत्रीण, ती मैत्रीण, तिचा भाऊ, हिचा काका अशा होतकरू स्थळांवर खडे टाकून बघायचे. त्यातील एकीला शायरीची, सिनेमांच्या गाण्याची आवड होती. ती शायरी म्हणे, गाणी म्हणे. मुख्यतः मी त्यांच्या कंपूत सामील झाले होते ते यासाठीच. तिथेच त्यांच्याबरोबर तेव्हा मी उर्दू लिहायला वाचायला शिकले.

गाव चहाटळ होतं. लोक तरुण मुलांना विचारीत, “काय रं.. शादी नाय करस त्या अमकीशी? म्होप देज मिलंल ना...”
त्यावर तो मुलगा किंवा त्याचे पालक म्हणत, ‘हो, म्होप देज मिलंल, पन आमचा घर नाय ना तवरा म्होटा. त्या असबाब आनतील तो ठेवाय जागा हवी ना..”


या पाची मुलींना त्याची पर्वा नव्हती. म्हणजे लग्न तर करायचं होतं, पण त्यासाठी तत्वं मोडायची नव्हती. ते आपल्याच अटीवर करायचे होते. त्या बिनधास्त होत्या. आवडलेल्या मुलाला स्वतः प्रपोज करीत, विचारीत, “शादी करशील?” मुलगे हसून टाळत. त्यांना यांच्याशी लग्नं करायचं नव्हतं असं नाही. पण आईबाबांना नि घरच्यांना कोण समजावणार?
पण अर्थात कुणीही येरागबाळ्याने मंगनी टाकावी नि त्या मुलींनी किंवा त्यांच्या घरच्यांनी कबूल करावी अशीही परिस्थिती नव्हती. त्यामुळे मंगनी कुणाकडून येते याला महत्त्व होतंच. 

एक मुलगा पाचींच्या नजरेत भरला होता. चांगला होता. त्याचं दुकान होतं. ते दुकान थोडं गावाबाहेर, एकान्तात असं होतं. दिवसभर त्याचा बाबा दुकानात असे. नि हा मुलगा शेतीबितीची कामं बघे. संध्याकाळी त्याचा बाबा नमाज पढायला निघून जाई तो पुन्हा येत नसे. परस्पर घरी जाई त्या वेळेत हा मुलगा येऊन दुकानात बसे.

झालं. या आमच्या पाची मैत्रिणी संध्याकाळी फिरत फिरत त्याच्या दुकानावर पोचत. त्यावेळी फार गर्दी नसे. तिथं गप्पा, हंसीमजाक चाले. दुकानात बाबा दिसला तर लांबूनच कल्टी मारायची. शेवटी तो मासा त्यातील एकीच्या गळाला लागला. बाकीच्या बाजूला झाल्या. मैत्रिणींमध्ये स्पर्धा नको. तिचं भलं झालं. ती गेली. तो खमक्या निघाला. आपल्या घरच्यांना त्याने पटवलं.
दुसरीच्या प्रेमात एक गावातला देखणा, राजबिंडा तरुण पडला. गल्फमध्ये चांगला कमावता. पण त्याच्या घरचे तयार होणं शक्यच नव्हतं. या कंपुतल्या मुली कुणालाच नको होत्या गावात. नाकापेक्षा मोती जड. तो म्हणाला, “पळून जाऊ. अलिबागला जाऊन कोर्टमॅरेज करू.” पण ही तयार नव्हती.

गावात अशी प्रेमलग्नं होत होती तेव्हाही. अगदी मुस्लिम गावातही. कारण एकाच धर्मात असलं तरी आईबाबांची परवानगी नसायची. आम्ही असताना परस्पर लग्न ठरवतात म्हणजे काय? आईबाप अडवणुकीचं धोरण अवलंबत. मुलं मग पळून जात. कोर्ट मॅरेज करून आलेल्या मुलांना झक मारत घरात घेत. पण त्या मुलीला आयुष्यभर हाडुतहुडूत केले जाई, पळपुटी म्हणून हिणवले जाई. आईबाबांच्या परवानगीशिवाय आली म्हणून मान मिळत नसे.
यासाठीच ही तयार नव्हती त्याच्याबरोबर पळून जायला. लग्न करायचं असेल, तर आईबाबांना पटव. मंगनी टाक. रितसर लग्न कर.

इकडे हिचा स्वाभिमान जागृत, तिकडे त्याचे आईबाप हट्टी. शेवटी त्याच्या आईबाबांनी गरीब, सालस, कामसू, नम्र अशी आपल्या अपेक्षेत बसणारी मुलगी निवडली आणि त्याचं लग्नं जमवलं.

हिला प्रचंड आघात बसला. डिप्रेशन आलं. मनातल्या भावना व्यक्त करायला फक्त आमचा कंपू होता. तिथे ती रडायची. खरंतर ही सुद्धा त्याच्यासमोर जेमतेम होती दिसायला. तरी म्हणायची, ‘आवरा देखणा, सुनहरे बालोंवाला दुल्हा त्या बावळट बाईच्या दारात बारात घेऊन जाईल. तिच्या अंगणाची शोभा वाढवेल. लायकी तरी हाय काय तिची?’

लग्नाच्या आदल्या रात्री, आमच्या समोर त्याने तिला शेवटचा प्रस्ताव ठेवला, ‘अजूनही चल. पळून जाऊ. अलिबागला जाऊन कोर्टात लग्न करू. आईबाबांचं काय करायचं ते मी बघेन.’ पण ती निश्चयाला ठाम. प्रचंड स्वाभिमानी. पळून येणार नाही. स्वाभिमान गहाण टाकणार नाही. पळून गेलं की आयुष्यभर ऐकावं लागेल. रीतसर झालं तर स्वतःच रुबाबात म्हणता येतं, की तुम्हीच मंगनी टाकली होती मला नि आणली होती.

दुसऱ्या दिवशी त्याचं लग्नं झालं, नी हिने स्वतःला शायरीच्या गममध्ये बुडवून घेतलं. बऱ्याच वर्षांनंतर मग तिला शेजारच्या गावच्या एका थोराड व्यक्तीची मंगनी आली. तिने रुकार दिला आणि ती लग्न होऊन दुसऱ्या गावी निघून गेली.
तिसरी एका मुलाच्या प्रेमात पडली. पण मुलगा निकम्मा होता. हिचे बाबा तयार नव्हते. खरंतर ही एकुलती एक मुलगी त्यांची पण ती पळून गेली त्याच्यासोबत. मग त्यांनी तिच्याशी संबंध तोडले. पण तो चांगला निघाला नाही. सासरी भरपूर जाच झाला. त्रास झाला. नि एक मुलगी लहान पदरात असताना तिने स्वतःला जाळून घेतले. मुलीला तिची आई आपल्या घरी घेऊन आली.

चौथीची कहाणी वेगळीच. ही त्या शायरीवालीची सख्खी लहान बहीणच. हिला काही मंगनी येणार नाही. मंगनीची वाट पाहात वर्षे घालवण्यापेक्षा तिचं घरातल्याच चुलतभावाशी लग्नं ठरवण्यात आलं. तो मुलगा पण गल्फला चांगली नोकरी करत होता. कमवत होता. स्वभावाने सरळ होता. पण हिला ते मंजूर नव्हतं. घरातल्या घरात तिला लग्नं करायचं नव्हतं. पण घरातले ऐकत नव्हते. रोज आमच्या ग्रुपमध्ये बसून ती रडायची. तिला बाकीच्या समजवायच्या, “शादी झैल्यावर वाटंल तो तुला न्हवऱ्यासारखा आपसूक.” मी म्हणायचे, “का नाही म्हणतेस? का नको म्हणतेस त्याला? चांगला तर आहे तो?” पण ती काहीच बोलत नव्हती. फक्त म्हणायची की तो मला भावासारखाच वाटतो. मला त्याच्याबद्दल काही भावना नाही निर्माण होत.

तिचं जबरदस्तीने लग्नं लावण्यात आलं. पण ती नवऱ्याबरोबर एक दिवसही नांदली नाही. लग्न झालं की होईल सगळं नीट, आपसूक असं वाटणाऱ्या सगळ्यांना तिनं खोटं ठरवलं. ती बधली नाही. शेवटी नवऱ्याने दुसरं लग्नं केलं दोनतीन वर्षे वाट पाहून. आणि तो आपल्या दुसऱ्या बायकोला घेऊन गल्फला निघून गेला. ही तशीच राहिली. आईबाबा, काकाकाकी वारले. ही अजूनही एकटीच आहे. मात्र तो तिला खर्चाला पैसे पाठवतो.  
अनेक वर्षांनी कोडं उलगडलं. ज्या देखण्या सुनहऱ्या बालोवाल्यावर मोठ्या आपाचं प्रेम होतं. तोच हिलाही मनोमन आवडत होता. त्या विषयाने पुढे अजून वेगळंच वळण घेतलं. ती कहाणी अजून वेगळीच होईल.
आणि पाचवी ही रजिया. सगळ्यात शेवटी तिचं लग्न झालं. शेजारच्या गावातला लंडनला नोकरीला असलेला मुलगा तिच्या आईने शोधला. तिला वडिल नव्हते. पण वडिलांनी जाताना भरपूर ठेवलेला पैसा होता. ती लग्न करून लंडनला गेली. तिथेच स्थायिक झाली. चार मुलं झाली. ती मुलं, आणि मुलीही इतक्या उच्चशिक्षित झाल्या. काल तिचा फोन आला तेव्हा आवाजात अजूनही बेदरकारी तशीच आहे. आत्मविश्वास तसाच ठासून भरलेला आहे. याचा अर्थ तिचं तिथं सुशेगाद चालू आहे. नवरा मुठीत आहे.
खरंतर या सगळ्या घटना घडत होत्या त्या त्यांच्या विशीपंचवीशीत. सगळ्या तिशीच्या आतच बोहल्यावर चढल्या. पण त्या काळात तो उशीर होता. जिथे अठरा वीस फारतर बावीस वर्षात पोरी उजवल्या जात होत्या. तिथे यांना केवळ आपला स्वभाव, स्वातंत्र्य आणि बंडखोरी यामुळे लग्नासाठी संघर्ष करावा लागत होता. चाहे जो भी हो जाए या झुकायला तयार नव्हत्या. आपल्या तत्वांना मुरड घालायला तयार नव्हत्या. त्या जगल्या, मेल्या त्या आपल्याच मर्जीने, आपल्याच मतांवर ठाम राहून.

 

-    अलका गांधी-असेरकर.

 

 

किसी पिछले जनम की बात...

मुगले आजम हा सिनेमा पन्नास वर्षानंतर रंगीत झाला, त्यालाही आता जवळपास 20 एक वर्ष लोटली. 🤦काळ किती भराभर चाललाय...    तेव्हा टीव्हीवर दिलीप क...