Nov 17, 2021

अविकास आणि हिंसा

 सामाजिक राजकिय विकास आणि त्या त्या ठिकाणचा समाज, माणसे यांची प्रगती यांचा थेट संबंध असतो का असा प्रश्न पडतो.

विकास नाही, शैक्षणिक सुविधा नाहीत म्हणून त्या त्या ठिकाणचे किंवा अमुक तमूक समाजाचे लोक हिंसेकडे वळतात यातही कितपत तथ्य आहे?
हिंसा ही प्रवृत्ती असते. ती वैयक्तिक असते, तशीच सामाजिकही असते. तिचा विकास, गरिबी, श्रीमंती याच्याशी फारसा संबंध नसावा. अपवाद वगळता.
विकास नाही म्हणून हिंसा, नक्सलवाद, विकास नाही म्हणून शेतकरी किंवा इतर आत्महत्या, विकास नाही म्हणून आंदोलन, मोर्चे, तोडफोड इत्यादी इत्यादी....
याचा थेट संबंध जोडणं शक्य नाही.
विकास नाही, म्हणून आर्थिक दरिद्री समजल्या जाणाऱ्या कोकणात एकाही शेतकऱ्याची आत्महत्या ऐकीवात आली नाही अन्यथा.
राजस्थान, गुजरात ही एकेकाळची अविकसित राज्ये. राजस्थान तर उजाड, पाण्याचे दुर्भिक्ष्य, वाळवंटी प्रदेश, शालेय शिक्षणाची वानवा. पण दोन्ही राज्यांतील मोठ्या समाजाने देशच नव्हे तर जग पादाक्रांत करत आर्थिक आघाडी मिळवलेली दिसते.
घरदार नि सारा संसार सोडून देशोधडीला लागलेला सिधी समाज मोर्चे, बंद, हरताळ, आरक्षण इत्यादी चळवळी न करता गेला तिथे स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी धडपडला आणि श्रीमंत समाजाच्या यादीत जाऊन बसला.
विकास नसलेल्या यूपी, बिहार सारख्या राज्यांतून अनेक कष्टकरी लोक बाहेर पडून मेहनतीची रोजी रोटी खाऊ लागले. तशीच देशोधडीला लागलेली कश्मीरी पंडीतांची मुलं भारतात लांबलांबच्या राज्यांमध्ये आरक्षणाच्या सीटा मिळवून उच्चशिक्षण घेऊ लागली. कुठेही बदला वृत्ती पाळून हाणामाऱ्या करत बसलेली ऐकिवात नाहीत.
विकास नाही म्हणून हुशार, होतकरू मुलं आक्रस्ताळेपणा न करता देशाबाहेर पडली, आणि परदेशातल्या आर्थिक प्रवाहात जम बसवून राहिली.
विकास दाराशी येत नसेल, तर विकासापर्यंत पोचावं लागतं. स्वतःच विकासाचा स्रोत होऊन वाहावं लागतं. हे अनेक समाजांनी, व्यक्तींनी, प्रांतांनी, परिसरांनी सिद्ध केलेय.
विकास नाही म्हणून मी हिंसा करतो, आत्महत्या करतो, गोंधळ घालतो ही पळवाट आहे, आपल्या परिस्थितीचं खापर दुसऱ्यावर फोडून सुटका मिळवणं आहे.
जीने की तमन्ना हो तो पत्थर फाड के भी पौधे निकलते है और फूल खिलाते है....
हिंसा ही वृत्ती आहे. राजकीय, सामाजिक नेत्यांचा स्वार्थ आहे.
तिचा विकासाशी फारसा संबंध नाही.

Nov 13, 2021

सात सुखांच्या खाली -

    


सात सुखांच्या खाली
दुःखाचा काटा सलतो
भरलेल्या पेल्यावरचा
उरलेला का डुचमळतो..


एकदा एका गोष्टीत तोतया राजकुमारी कोणती आणि खरी कोणती हे ओळखायचं असतं. तेव्हा राजाचा हुशार प्रधान ती जबाबदारी घेतो आणि रात्री त्या दोघींची एकसारख्या बेडरूममध्ये झोपायची सोय करतो. सारखेच शाही पलंग, एकावर एक अशा सात मऊ, रेशमी गाद्या, त्यावर रेशमी चादर, उशी, इत्यादी सारीच सारखी व्यवस्था.

दुसऱ्या दिवशी दोघींना सकाळी तो विचारतो, "झोप लागली ना व्यवस्थित?' तेव्हा त्यातील एकजण म्हणते, 'हो मस्त झोप लागली.' तर दुसरी म्हणते 'नाही, रात्रभर मला गादीखाली काहीतरी टोचत होतं.'
तेव्हा प्रधान सांगतो, 'हीच खरी राजकुमारी. जी शांत झोपली रात्री ती तोतया आहे.'
बात अशी असते, की प्रधानाने रात्री दोघींच्या त्या रेशमी सात मऊ गाद्यांच्या खाली काही वटाण्याचे दाणे टाकून ठेवलेले असतात. खरी राजकुमारी, जिला कोणत्याच अशा गैरसोयींची सवय नसते, सुखासीन आयुष्याचीच सवय असते, तिला ते रात्रभर टोचत राहतात. ती निवांत झोपू शकत नाही. पण जी सामान्य मुलगी तोतया राजकुमारी बनून आली असते तिला मात्र ते ऐश्वर्य सुखाची झोप घेण्यास पुरेसं असतं.
तर आता प्रश्न असा आहे, की त्या राजकुमारीचं दुःख हे खोटं आहे का? तिचा तो माज आहे का?
अनेकदा आपण आपली भावनिक, मानसिक दुःखं, आपल्या समस्या, आपल्या गैरसोयी, अडचणी कुणाला सांगायला जावं, तर त्यांच्याकडून उपदेश येतो, की ज्या लोकांना एवढंही मिळत नाही त्यांच्याकडे पाहा. लोकांना दोन वेळ जेवायला मिळत नाही, रहायला छप्पर नाही, अंगावर कपडा नाही. त्यांची खरी दुःखं! तुम्हाला सुखासुखी सगळं मिळत असताना तुमच्या या समस्या म्हणजे चोचलेच आहेत रिकामपणाचे.
अन्न, वस्त्र, निवारा या तीन मुलभूत गोष्टी नक्कीच महत्त्वाच्या आहेत. त्या प्रत्येक माणसाला मिळायलाच हव्यात हेही तितकंच खरं. या मूलभूत गोष्टीही मिळत नसणारे दुर्दैवी जीव खरेच. अभागीच ते.
पण म्हणून या गोष्टी नीट मिळत असणाऱ्यांची भावनिक, मानसिक दुःखे खोटी कशी ? किंवा गैरसोयीच्या समस्या, खोट्या कशा?. मुलभूत गोष्टी मिळणे ही तर प्रत्येक प्राणीमात्राची गरज. वाघाला देखील शिकार केली की झोपायला गुहा लागतेच. ती मिळायला हवी.
पण या मुलभूत गरजांच्या नंतरच तर खऱ्या अर्थाने मानवी गरजा निर्माण होतात ना. मग सात गाद्यांच्या खालचा वाटाणाही टोचतोच. किंबहुना तो टोचतो तेव्हाच ती व्यक्ती जगण्याच्या प्राणीस्तरावरून जगण्याच्या माणूस स्तरावर पोचलेली असते. वाटाणा न टोचणारी मुलगी अभावातून आलेली आहे. दुर्दैवी आहे. पण म्हणून वाटाणा टोचणारीचं दुःखं हे दुःखच नाही किंवा ते कमी प्रतीचं आहे कसं म्हणायचं? तिने आपली रात्रीची झोप गमावली आहे हे सत्य उरतंच.

० 

Nov 7, 2021

भवताल -

 धार्मिक मंदपणा आणि पिडीत जनता -

विजेच्या काळात वाऱ्यावर लगेच विझणाऱ्या तेलाच्या पणत्या लावून तेल वाया घालवणे आणि दगडी मूर्तीवर दूधाचे अभिषेक करून दूध वाया घालवणे हे धार्मिक मतीमंदत्वाचे लक्षण आहे.
असे सावरकर म्हणून गेले. पण सावरकरांच्या भक्तांनाच ते पटत नसावे. 
नेते सोयीने वापरायचे असतात.

मग सणासुदीला तरी तेलाचे दिवे लावावे म्हणणाऱ्यांनी सणासुदीला तरी गॅस आणि लायटर्सचा वापर न करता दगडावर दगड घासून चकमकीने तीन दगडांची चूल पेटवून कंदमुळे शिजवून खावावीत. पाळायच्या तर सर्वच परंपरा आणि मूळापासून पाळाव्या. अशा अर्धवट कशाला?

असो.
यावरून एक गोष्ट आठवली लहानपणी ऐकलेली.


एका गावात एक सासुरवाशिण राहत होती. तीची सासू तिचा फार छळ करी. पोटभर खाऊपिऊ देत नसे. काम खूप करून घेई.
एके दिवशी सण असतो म्हणून घरात घारगे तळले जातात. मात्र सासू हिला खायला देत नाही. ही त्या घारग्यांच्या पीठातलं थोडं पीठ चोरून आपल्या पदरात लपवून ठेवते. कपडे धुवायला नदी किनारी जाताना नेहमीसारखी गावच्या वेशीवरील मारूतीच्या मंदिरात विश्रांतीला घटकाभर टेकते. 

त्या काळी मंदिरं निवांत असायची. लोक दिवसभर रांगा लावून देवाला निष्कारण त्रास देत नसत. एकदा सकाळी दिवा लावून गुरव गेला की देव निवांत निजायला मोकळा असायचा.
ही देवळात जाते. मारूतीसमोर एक मोठा दगडी दिवा पेटत असतो. तेल चांगले तापलेले असते. ही चोरून आणलेल्या पीठाचे चार वडे त्या दगडी पात्रातील तापलेल्या दिव्यात तळून खाते. 

हे पाहून मारूती राया अचंबित होतो. इतका की त्याचे बोट तोंडात जाते आणि तो चकीत होऊन तिच्याकडे वाकून पाहतो. 
हीचे मारूतीकडे लक्ष नसते. खाऊन झाल्यावर ही निघते. 
दुसऱ्या दिवशी गुरव देवळात येतो. तर त्या भव्य दगडी मारुतीचे बोट तोंडात आणि चेहरा चकीत होऊन खाली बघतोय. तो घाबरला. गावात येऊन त्याने हा चमत्कार सगळ्यांना सांगितला. लोक जमा झाले. हे असं कसं झालं. गावाचं पाप पाहून मारूतीने तोंडात बोट घातलं हे नक्की. कुणीतरी पाप्याने देवळात पाप केलं असणार. आता गावावर संकटं येणार.
 लोक मारूतीची माफी मागतात. पण त्याचं बोट तसंच. नि चेहरा चकीतच!
शेवटी गाववाले बैठक घेतात. ठरवतात की उद्या सकाळी बऱ्या बोलाने ज्याने पाप केलं असेल त्याने मारूतीसमोर जाऊन माफी मागावी. नाहीतर प्रत्येकाने एकेकटं जाऊन माफी मागावी. 
ही सासुरवाशिण घाबरते. पाप तर आपणच केलंय. आता लोकांना आणि मुख्य म्हणजे सासूला कळणार. ती अर्ध्या रात्री उठून लपत छपत देवळात जाते. मारुतीचा सोटा पडलेला असतो त्याच्या पायाशी. तो उचलते आणि मारूतीवर उगारून म्हणते, "मेल्या, मला माझी सासू खायला देत नाही, म्हणून मी दोन वडे तुझ्या तेलात तळून खाल्ले, तर त्यात तुला इतकं आश्चर्य वाटायला काय झालं? बऱ्या बोलाने बोट खाली घेतोस की हाणू हा सोटा तुझ्या डोक्यात?"
तिचे ते बोल ऐकून मारूती दचकतो, घाबरतो आणि पटकन आपले बोट तोंडातून काढून साळसूदासारखा वर पाहू लागतो. 
दुसऱ्या दिवशी लोक पुन्हा देवळात गोळा होतात. तर मारूती आपला निरागस. नेहमीसारखा. लोक हुश्श करतात. चला गावावरची अलाबला टळली.

थोडक्यात काय, अत्याचाराने पिडीत स्त्री मारूतीला सिधा करू शकते, तर महिलांनो आपण काय करू शकत नाही? सोचो... सोचो....

असो
विषय तेल वाया घालवायचा होता. पण कधी कधी मंद लोकांमुळे पिडीत लोकांचा फायदाही होतो. त्यामुळे मंद लोक स्वतःवरच खुश असतात. 

Nov 5, 2021

भवताल -

 गुजरातमध्ये वाणी समाज मोठ्या प्रमाणावर आहे. आणि त्यांच्यात जैन वाणी आणि वैष्णव वाणी असे दोन प्रकार आहेत. दोन्ही समाज व्यापार उद्योगात मोठ्या प्रमाणात आहे. या व्यापार उद्योगाच्या निमित्ताने ते भारतभरच नव्हे, तर जगभरही पसरलेले आहेत.
महाराष्ट्रात ज्याप्रमाणे भटाबामणांचा उल्लेख केला जातो तसाच गुजरातमध्ये वाणियाबामण असा केला जातो. कारण गुजरातमधील वाणी समाज हिंदू धर्माप्रमाणे वैश्य या तिसऱ्या वर्णात मोडत असला, तरी पैशाने ब्राम्हणांपेक्षाही समृद्ध असल्या कारणाने इथं बामणाच्याही आधी वाणीया लोकांचे नाव येते. पैसा बोलता है म्हणतात ते असं. (हे सर्व जातीवर्णांनी लक्षात घेणं योग्य ठरेल. सध्याचे युग हे पैशांचे. पैशाची जात सर्वात श्रेष्ठ. पैसा कमवा. मग तुम्हाला तुमची जात, धर्म विचारून कुणी तुच्छ लेखणार नाही.)
या वाणी, किंवा तिथे म्हटले जाते त्याप्रमाणे वाणिया समाजात बरेच गट आहेत. साधारण तालुका, जिल्हा, प्रांत याप्रमाणे त्यांचे वर्गीकरण होते आणि बरेच गट पडतात. पूर्वी सगळे व्यवहार गटागटातच होत. विशेषतः बेटी व्यवहार. मात्र आता दुसऱ्या गटातही सर्रास होऊ लागलेत. त्यात जैन आणि वैष्णव या दोघांमध्ये पूर्वीपासून बेटीव्यवहार होतात. जरी दोन्ही धर्म वेगळे असले तरी. ज्याप्रमाणे पंजाबमध्ये सिख आणि हिंदूमध्ये बेटीव्यवहार होतो तसेच. जैन वाणिया हे प्रमाणात वैष्णव वाणियांपेक्षा जास्त श्रीमंत आहेत. हिऱ्यांच्या व्यापारात जैन वाणिया मोठ्या प्रमाणात आहेत.
महाराष्ट्रात ज्याप्रमाणे वारकरी समाज आहे, तो शाकाहारी आहे आणि तुळसीमाळ गळ्यात घालतो तसेच श्रीकृष्णाचे विठोबा हे पंढरपूरचे एकमेव दैवत पुज्यनीय मानतो त्याचप्रमाणे गुजरातमधील वैष्णव वाणिया हे तुळसीमाळ घालणारे, शाकाहारी आणि राजस्थानमधील श्रीनाथजी हे श्रीकृष्णाचे एकमेव दैवत पुजणारे. 
या वैष्णवांमध्ये पुन्हा पुष्टिमार्गीय वैष्णव हा एक पंथ आहे. हा पुष्टिमार्ग स्वामी श्री वल्लभाचार्य यांनी पाचेकशे वर्षांमागे स्थापन केलेला आहे. उपरोक्त राजस्थानमधील श्रीनाथजी ही श्रीकृष्णाची मूर्ती जी आहे, ती गोवर्धन पर्वतावर एका गवळ्याला पाचेकशे वर्षांपूर्वी, म्हणजे साधारण अकबराच्या काळात सापडलेली मुर्ती आहे. ही तीन ते चार फूट उंचीची काळ्याभोर पाषाणातली मूर्ती आहे. ती श्रीकृष्णाची आहे असं फक्त समजायचं. रादर समजलं गेलं. नेहमीच्या श्रीकृष्णात आणि हिच्यात साम्य नाही. मात्र ती गोकुळ आणि मथुरेजवळील गोवर्धन पर्वतावर खोदकाम करताना सापडली म्हणून ती श्रीकृष्णाचीच मानली गेली असावी. ती मूर्ती सापडली तेव्हा तिची तिथे स्थापना केली. मात्र तेव्हा इस्लामच्या आक्रमणात मंदिरं मोठ्या प्रमाणावर तोडली जात होती. मुर्त्या फोडल्या जात होत्या म्हणून ती मूर्ती घेऊन एका बैलगाडीत घालून मोगली सरदारांपासून लपत छपत राजस्थानपर्यंत आणली गेली आणि उदयपूरजवळच्या एका गावात तिची स्थापना केली. ते गाव आज श्रीनाथद्वारा म्हणून ओळखले जाते. आणि तिथले हे मंदिर भारतातील अतीश्रीमंत मंदिरांपैकी एक समजले जाते. ती बैलगाडी अजूनही मंदिराच्या प्रांगणात उभी आहे.

तेव्हा या मंदिरात श्रीनाथजीबावांचे पुजारी किंवा सेवेकरी म्हणून वल्लभाचार्य सोबत होते. त्यांनी पुष्टीमार्ग या संप्रदायाची स्थापना केली. भक्तांना नियम आखून दिले. पुजेची पद्धत आखून दिली. ती या काळात आचरणे कठीण आहे, तरी अनेक भक्त ती आचरण्याचा प्रयत्न करतात. या संप्रदायाची भजनं तयार झाली. नैवेद्याचे प्रकार तयार झाले. दंतकथाही भरपूर आहेत या मूर्तीशी जोडलेल्या. वल्लभाचार्यांशी प्रभू स्वतः वार्तालाप करत होते असे भक्त मानतात. मुंबई युनिव्हर्सिटीत या पुष्टी संप्रदायाचा अभ्यासक्रम भारतीय तत्वज्ञान शाखे अंतर्गत समाविष्ट केलेला आहे. 
वल्लभाचार्यांनी देखील तेव्हा शंकराचार्यांप्रमाणे भारतभ्रमण केले. गावोगावी फिरून पुष्टिसंप्रदायाचा प्रसार आणि प्रचार केला. अशी चौऱ्यांशी ठिकाणी त्यांनी व्याख्यानं दिली. त्या चौऱ्याऐंशी ठिकाणाना चौऱ्याऐंशी बैठका म्हटलं जातं. भक्त त्या त्या ठिकाणच्या यात्रा करतात. वल्लभाचार्यांच्या नंतर त्यांच्या वारसांना भारतातील चार ठिकाणच्या प्रमुख मंदिराचे आचार्य बनवण्यात आले. वल्लभाचार्यांचे हे वारस अजूनही वेगवेगळ्या ठिकाणच्या हवेल्यांचे आचार्य म्हणून विराजमान असतात. ते तिथे राहत नाहीत. मुंबईसारख्या शहरांत आलिशान जीवन जगतात. मात्र तिथे जाऊन येऊन असतात. यांना बावाश्री म्हटले जाते. त्यांच्याकडून पुष्टीमार्गाची दिक्षा घेतली जाते. मंत्र घेतला जातो. हा मंत्र म्हणजे एक श्रीनाथजी सोडून मी इतर कोणत्याही देवाचे स्वामित्व मानणार नाही अशा अर्थाचा असतो. एकप्रकारे अनेक देवदेवतांचा बुजबुजाट झालेल्या काळात एका दैवताच्या अधिष्ठानाखाली सगळ्यांना एकत्र आणण्याचा, अहिंसेचं तत्वज्ञान शिकवण्याचा तो स्तुत्य प्रकार होता असं म्हणता येईल.
 जरी ते मंदिर राजस्थानात असले तरी श्रीनाथजींचे भक्त हे अधिकतर गुजराती आहेत. ते तिथे सढळ हस्ताने दान करत असतात. प्रत्यक्ष राजस्थानमध्ये जैन अधिक आहेत ते श्रीनाथजींचे भक्त नाहीत. आणि राजस्थानातील इतर क्षत्रीय इत्यादी हिंदू समाज आहे तो शिवभक्त आहे.
म्हणजेच राजस्थानमधील हे मंदिर श्रीमंत झाले आहे ते गुजराती वैष्णव वाणियांमुळे. तिथे पुरुष पुरुष खोलीच्या चार संगमरवरी टाक्या आहेत त्या सदैव देशी तुपाने भरलेल्या असतात. त्यातून रोजचा नैवेद्य रांधला जातो. या मंदिराबाहेरचे भिकारी देखील हे तुपाचे पदार्थ खाऊन माजलेले तगडे माजलेले असतात. कारण तिथे जाणाऱ्या गुजराती भक्तांना वाटतं की या भिकाऱ्यांना मंदिराचा प्रसाद विकत घेऊन खायला घातला की आपली दोन नंबरची सारी पापं धुवून निघणार... अर्थात सर्वच श्रीमंत मंदिरातील देवांच्या भक्तांच्या ह्याच धारणा असतात. एकेकाळी माझीही अशी होती. 
असो.
हे मंदिर फार जुने आहे. मुख्य म्हणजे याला भारतातील इतर मंदिराशी कोणतेही साम्य नाही. कळस, गाभारा, सभागृह, ओवरी आदी काही नाही. ते मंदिर म्हणजे राजस्थानातील एक जुनी मोठी हवेली आहे. त्यात श्रीनाथजींची स्थापना आहे. त्यामुळेच असेल, की श्रीनाथजींच्या त्या निवासस्थानाला मंदिर म्हटलं जात नाही. हवेली म्हटलं जातं. आणि मग श्रीनाथजींची इतर कुठेही मंदिरं असली, तरी त्यांना हवेलीच म्हणण्याची प्रथा आहे.  मूर्तीला भक्त अभिषेक, गंध, फुलं, नैवेद्या इत्यादी काहीही वाहू शकत नाहीत. इतकंच काय पण मूर्तीच्या जवळही जाऊ शकत नाहीत. पण त्यामुळे एक चांगली गोष्ट अशी झालीय, की ती मूर्ती अजूनही जैसे थे स्थितीत जशीच्या तशी आहे. पंढरपूरच्या विठोबाच्या मूर्तीप्रमाणे तिची झीज झालेली नाही. जे द्यायचे असेल ते मंदिराच्या व्यवस्थापनाकडे जमा करायचे. प्रसाद हवा असेल तर पैसे भरून प्रसाद घ्यायचा. चिमुटभर प्रसाद देखील फुकट मिळत नाही. मात्र भक्त पाच पाच हजाराचे दान करून भरपूर करंड्या भरभरून असली तूपाच्या मिठाया प्रसाद म्हणून घेऊन जातात. 

या मंदिराला पारंपरिक, प्राचीन मंदिराचे स्वरूप नसल्याने आणि आता ती हवेली देखील फार जुनी झालेली असल्याने तिथे भव्य मंदिर बांधावे असे भक्तांना नक्कीच वाटते. अंबाणी उद्योगपती हे वैष्णव वाणिया आणि या श्रीनाथजींचे भक्त. अंबाणी भाभीने आपल्या मुलीच्या लग्नात या मंंदिराची प्रतिकृती आपल्या  घरी मुंबईत उभी करून तिथे वैष्णव भजनांवर डान्स करून आपली हौस भागवून घेतली. (युट्यूबवर हे डान्स बघायला मिळतील.)
गांधीजी देखील वैष्णव वाणिया होते. म्हणूनच त्यांना नरसिंह मेहतांचे वैष्णव जन तो ... हे भजन प्रिय होते. गांधीजी हे कच्छी गुजराती होते. गुजरातमधील कच्छ प्रांतात राहणारे लोक कच्छी म्हणून ओळखले जातात. त्यांची कच्छी ही बोली भाषा सिंधी बोलीभाषेशी साम्य दर्शवणारी आहे. दोन्ही प्रांत जवळ असल्याने हे असेल. मात्र कच्छी ही आपल्या इथल्या मालवणीप्रमाणे किंवा अहिराणीप्रमाणे बोलीभाषा आहे. लिखित नाही. 

असे ऐकले की अंबाणी बंधूंनी म्हणे ऑफर दिली, की श्रीनाथजीचे नवीन भव्य मंदिर आम्ही बांधून देऊ, पण त्या मंदिराला नाव श्रीमती कोकीलाबेन धीरूभाई अंबाणी मंदिर असे लावले जाईल. साहजिकच ट्रस्टींनी नकार दिला. म्हणून श्रीनाथजीबावा अजून त्या जुन्या हवेलीतच आहेत. 
मला धोंडो केशव कर्वेंची आठवण झाली. त्यांच्या शाळेला ठाकरसी या श्रीमंत गुजरात्याने मोठी देणगी दिली आणि विद्यालय मोठं करू म्हणून शब्द दिला, मात्र या विद्यालयाला नाव आमच्या आईचे लागेल, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी. कर्वे हे खरे त्यागी. त्यांनी आपल्या नावाला महत्त्व दिले नाही. विद्यालय मोठे होणे महत्त्वाचे. नाव कोणाचे का असेना. आज हे विद्यापीठ नाथीबाई ठाकरसी नावाने ओळखले जाते. त्यामागे कर्वेंचे कष्ट होते हे कुणाला ठाऊकही नाही. 
तद्वतच मंदिर श्रीनाथजींचे राहावे, कोकीलाबेनचे होऊ नये अशी भावना अजून तरी ट्रस्टींची असावी. खरे खोटे श्रीनाथ जाणे.


किसी पिछले जनम की बात...

मुगले आजम हा सिनेमा पन्नास वर्षानंतर रंगीत झाला, त्यालाही आता जवळपास 20 एक वर्ष लोटली. 🤦काळ किती भराभर चाललाय...    तेव्हा टीव्हीवर दिलीप क...