Mar 20, 2026

किसी पिछले जनम की बात...

मुगले आजम हा सिनेमा पन्नास वर्षानंतर रंगीत झाला, त्यालाही आता जवळपास 20 एक वर्ष लोटली. 🤦काळ किती भराभर चाललाय...
 
 तेव्हा टीव्हीवर दिलीप कुमारची मुलाखत पाहिली होती. त्यात तो म्हणाला होता, "मुगल ए आजम... ऐसा लगता है कि जैसे किसी पिछले जनम की बात है.."

 खरंच काळ किती भराभर जातोय. मलाही आता बऱ्याच गोष्टी अशा वाटतात की जणू "पिछले जनम की बात हो". यात बालपण शालेय जीवन हे तर सोडाच, पण लग्न, मुलगा होणं, त्याला मी मोठं करणं.. या गोष्टी सुद्धा मला, 'किसी पिछले जनम की बात है' अशा वाटतात. असं वाटतं, की ती मीच होते का?? की कधीतरी कुठेतरी सिनेमात पाहिलेल्या दृश्यांप्रमाणे या घटना घडून गेल्यात...

 असं वाटतं की आपण कुठल्यातरी अदृश्य हातातल्या कळसूत्री बाहुली आहोत आणि आपल्याकडून सगळ्या गोष्टी घडत जातात.. त्याच्या इच्छेप्रमाणे...

 आता या टप्प्यावर भूतकाळात घेतलेल्या कुठल्याही निर्णयांचे फारसे वाईटही वाटत नाही आणि आनंदही होत नाही. असं वाटतं, की यहां नही तो वहां होते.. आखिर तो यही सुबह और शाम होते??
 दिलीप कुमारलाही असंच वाटलं असेल.. क्या मधुबाला.. क्या सायरा. अपनी जगह पर सब ठीक हैं..😄😄

निर्णयांचे नाही पण वर्तनाचे पश्चाताप अनेकदा होतात, पुन्हा हा विचार करते की आपल्या हातात असतच काय?? दोऱ्या जर सगळ्या सूत्रधाराच्या हातात असतात...
म्हणून मग विदांची ती कविता आवडते..

 चुकली दिशा तरीही आकाश एक आहे..
 हे जाणतो तयाला वाटेल तेथ न्या रे..
🤗
----

 पाडव्याच्या शोभायात्रेत आम्ही अधून मधुन योगासनांची प्रात्यक्षिके दाखवत होतो.. अगदी टेम्पोत बसून देखील... 😄 आणि रस्त्यावर देखील 
 त्यातला बराच भाग मी प्राणायामाचे प्रात्यक्षिक दाखवत होते 🤣🤣 म्हणजे मांडी घालून बसून ध्यान धारणेची पोज घेतलेली होती. हलत्या टेम्पोत ते जास्त सोयीचे होते..
 शोभायात्रेत भरपूर आवाज होते, विविध प्रकारचे गोंधळ होते. लेझीम ढोल ताशे लाऊड स्पीकर्स वाजत होते. 
 आणि मी डोळे मिटून ध्यान धरण्याची पोज घेऊन बसत होते.. 
 पण खरंच सांगते ती फक्त पोज राहत नव्हती. मी खरंच आतून शांत होऊन बसत होते. बसू शकत होते. आणि माझं मलाच छान वाटत होतं. शेवटी काय तर बाहेरच्या कोलाहलात सुद्धा मन शांत राहणं, बाहेरचा कोलाहल आत मध्ये येऊ न देणे हाच तर योग आहे... 
 एवढं तर योगाच्या शिक्षणात नक्कीच शिकले होते.... 
पण पुन्हा...
बाहेरचा कोलाहल आत येऊ न देणे हे खूप सोपं आहे..
 मात्र मनातला कोलाहल बाहेर घालवणे फार फार कठीण आहे.. त्यासाठी योगाच्या प्राथमिक पायऱ्या पुरत नाहीत....

Alka aserkar

Oct 23, 2025

.. बीते हुए दिन..!

 भाऊ तालुक्याच्या गावी शिकायला होता. आठवीपासून पुढे. दिवाळीच्या सुट्टीत तो येताना तिथून रांगोळी, रंग, ठिपक्यांचा कागद घेऊन यायचा. रांगोळीचे पुस्तक सुद्धा..

त्या आधी आम्हाला, म्हणजे निदान मला तरी रांगोळी प्रकार माहिती नव्हता.

त्या खेड्यावर, जिथे मुस्लिम अधिक आणि मोजके हिंदू गरीब राहत होते, तिथे रांगोळ्या दृष्टीस पडत नव्हत्या.

हिंदूं बहुजनांच्या शेणाने सारवलेल्या ओटीवर क्वचित तांदूळ पिठाने की चुन्याने कोण जाणे, चित्र रेखाटलेली असत. पण त्याला रांगोळी नाही, तर 'कणा' म्हटले जात असे.

भाऊ रांगोळी काढायचा, आकाश कंदील बनवायचा, फटाके फोडायचा. तो शहरात राहिल्याने आणि मुळातच स्मार्ट होता. मी बुजरी, आत्मविश्वास हरवलेली, तर तो आत्मविश्वासाने भरलेला, सगळ्यांमध्ये मिळून मिसळून वागणारा होता. त्याची लोकांवर छाप पडे. त्या खेड्यात सातवीत असताना त्याने नाटक बसवले होते.

माझ्याकडे कुणी ढुंकून बघत नसे. वयाच्या जवळपास सात आठ वर्षापर्यंत कुणी बोलायला आले तर अंगठ्याचे नख दातात चावत खाली मान घालून गप्प बसणे एवढेच मी करी.

भाऊ सातवीत होता, तेव्हा मी पहिलीत. वर्गात शिकवलेले सारे येई. पण बोलत नसे. अंगठा दातात आणि मान खाली. 🤗

तेव्हा पहिली दुसरीला लेखी परीक्षा नसत. फक्त तोंडी. वार्षिक परीक्षा आली तरी मी वर्गात एकदाही तोंड उचकटले नव्हते. सगळं येत असून गुरुजींसमोर अवाक्षर काढायला तयार नाही पठ्ठी.

गुरुजी म्हणाले सगळ्या मुलांना बाहेर काढतो. मग बोलशील?

मान खालीच..

गावातच मावस बहीण होती. ती होती सतरा अठरा वर्षांची. नुकतीच तालुक्याला राहून मॅट्रिक झालेली. मी तिचं शेपूट होते. दिवसभर तिच्या मागे मागे. गुरुजी म्हणाले, ती घेऊ दे का परीक्षा? तिच्यासमोर बोलशील का?? 

तिला बोलवले. तिने प्रश्न विचारले. 

पण.. उंहू..!

भाऊ घेऊ दे का परीक्षा..

छे...

खाली मान आणि अंगठ्याचे नख दातात..

बोलेन पण समोर गुरुजी नको...🤗

But ऐसा कैसे चलेंगा बेबी...

फिर तो बेबीको नापास करनाही पडेंगा ना...

कुछ तो बोल बेबी... एक लाईन ही पढ दे मेहरबानी कर के..

गावच्या खोतांची बेबी म्हणून बेबीला एवढी सवलत देऊ करून पण बेबी एक अक्षर वाचायला तयार नाही.

घरी मात्र पोपट लाजेल... एवढी बडबड, वादावादी, भावाशी भांडण... 🤦 सर्व कविता पाठ 🤗

बेबी पहिलीतच नापास..

या बेबीने नंतर पुढे जाऊन एम ए च्या मुलांच्या व्हायवा घेतल्या 🤦

गोष्ट रांगोळीपासून सुरू होऊन कुठे पोचली 🤦..

जाऊ दे.. दिवाळीची गोष्ट पुन्हा केव्हा तरी... 🤗


- अलका गांधी - असेरकर 



Jul 8, 2025

साईवाल्या रसिकशेटची मुलगी -

 


ज्या गावात माझा जन्म झाला, आणि जिथे मी पहिली पंधरा-अठरा वर्षे वाढले, त्या माझ्या गावाचे नाव 'साई' आहे. कोकणातील रायगड जिल्ह्यातील हे अगदी छोटेसे गांव. या गावाचे नाव 'साई' का आणि कसे पडले असेल असा प्रश्नही कोणाला पडला नाही, आणि उत्तरही कुणाला माहीत नाही. साईबाबामधील साईचा आणि याचा दुरान्वयानेही संबंध आढळत नाही. ना तिथे त्यांचे कोणते मंदीर आहे, ना त्यांची कोणती दंतकथा त्या परिसरात ऐकायला मिळते.

गुजरातमधील तशाच एका खेड्यातून पंचवीस एक कुटुंबे महाराष्ट्रात व्यवसाय शोधत साधारण सव्वाशे वर्षांपूर्वी स्थलांतरित झाली, त्यातली एक दोन नाही, तर चांगली आठदहा कुटुंबे त्या इवल्याशा साई गावात येऊन राहिली. आणि एक दोन नव्हे, तर चांगली पाच-सहा पिढ्या नांदली.

नांदली हाच शब्द बरोबर आहे. ही कुटुंबे नुसती तिथे राहिली नाही, तर तिथल्या मातीशी एकरुप झाली. तिथल्या भाषेशी, आहारविहाराशी तादात्म्य पावली. त्या मातीवर प्रेम करू लागली. त्यांनी तिथे ऐसपैस कोकणी पद्धतीची, मागे पुढे अंगण, झाडे, विहिरी असलेली घरे बांधली.
काय म्हणून तिथे इतक्या आडनीड ठिकाणी, अगदी खेड्यावर ती आली देव जाणे. सगळ्यांचा एकजात किराणा मालाचा व्यवसाय. तो तिथे भरभरून चालावा अशी काही परिस्थिती नव्हती. पोटापुरतं मिळेल एवढंच होतं. तरी हे लोक तिथे वर्षानुवर्ष राहिले. गुजराती माध्यमाच्या शाळा असण्याचा प्रश्नच नव्हता तिथं. पण इंग्रजीचाही जमाना नव्हता. त्यामुळे सगळ्या पिढ्या मराठी शाळेत शिकल्या. त्यात पुन्हा गावात मुस्लिम बहुसंख्य. हिंदू कमी. कांदा लसूणही वर्ज्य असणारी ही कुटुंबे पूर्ण मांसाहारी, मासेखाऊ गावात पिढ्यानपिढ्या राहिली.


मात्र गुजरातशी धागा जोडून राहिली. मुलामुलींची लग्ने करण्यासाठी गुजरातच गाठायचं.


या कोकणात आणि विशेषतः रायगड जिल्ह्यात या कुटुंबांच्या आधीही मोठ्या प्रमाणात स्थलांतरित झालेली गुजराती कुटुंबे होती. ती दोन टप्प्यांत तिथे आली. आम्ही तिसऱ्या टप्प्यात. आमची अजून गुजरातशी नाळ तुटलेली नव्हती. मात्र या पहिल्या दोन टप्प्यांत आलेली कुटुंबे गुजरातपासून पूर्णपणे तुटलेली होती. त्यांचे तिथे जाणे-येणे तर नव्हतेच. पण माझ्या माहितीप्रमाणे त्यांना गुजरातमधील आपली गावे पण माहीत नव्हती. आपण नेमके कुठून आलो हे माहीत नव्हते.

त्यातील पहिल्या टप्प्यात आलेला गट हा इथं पूर्णपणे मराठी झाला होता. त्यांना गुजराती जराही बोलता येत नव्हते. फक्त मराठी बोलत. मात्र मागच्या पिढीपर्यंत स्त्रिया गुजराती पद्धतीने साडी नेसत. लग्न कार्याचे बरेच रित रिवाज गुजराती पद्धतीचे. आम्ही शिवाजी महाराजांच्या काळात आलो असे ते म्हणतात. तर दुसऱ्या टप्प्यात आलेला गट अजून तोडकं मोडकं गुजराती बोलत होता. मात्र सगळ्याच टप्प्यांतले सारेच लोक बहुतांश किराणा मालाच्या आणि इतर काही जोडधंद्यात होते. आणि सगळेच एकाच जातीतले, वाणिया समाजातले होते. विशेष म्हणजे हे दोन्ही टप्पे इतक्या मोठ्या संख्येत इथे आले की त्यांना आपल्या मुलाबाळांची लग्ने जमवण्यासाठीही गुजरातकडे जावे लागले नाही. इथल्या इथे लग्ने जुळतील इतकी त्यांची संख्या पुरेशी होती. मात्र आमचा तिसरा टप्पा मर्यादित संख्येत होता आणि तो दोन-तीन कुटुंबातून शाखा फुटत गेलेला असा असल्याने लग्नांसाठी मुंबई-गुजरातवर अवलंबून होता.  

तरी या तिन टप्प्यांत आपसात लग्ने फारशी होत नव्हती. जात एक असली, तरी या तिघांच्या पोटशाखा वेगळ्या होत्या म्हणून केवळ!

तर या छोट्याशा साई गावाची नोंद अगदी गुजरातमधील आमच्या समाजात ठळकपणे घेतली गेली आणि जाते. कुठले ऋणानुबंध कुठे जोडले जातात. आमची ही आठ दहा कुटुंबे आणि त्यांची मुलेबाळे ही समाजात साईवाली कुटुंबे म्हणून गावावरून ओळखली जातात. अगदी सुरुवातीला आम्हाला दख्खणी म्हटले जायचे. आमचा उपहासही केला जायचा. याला प्रमुख कारण एक तर इथे राहून आम्ही काही म्हणावा तसा पैसा कमावला नाही, त्यामुळे पैशामुळे येणारी पतही आमच्याजवळ नव्हती, जी प्रामुख्याने गुजराती वाणी समाजात महत्त्वाची असते. शिवाय आम्ही अर्धे मराठळलेले होतो. भाषेत, खाण्यापिण्यात, वर्तनात सगळीकडे मराठीपण ठळकपणे डोकावत होतं. त्यामुळे दख्खणी मुलींवर गुजराती संस्कार नसतात. म्हणून पसंतीसाठी त्या अग्रक्रमावर नसायच्या. तरीही मुलींची लग्ने सहज व्हायची. मात्र मुलांना कुणी इतक्या लांब दख्खनमध्ये मुली द्यायला तयार नसायचे.
हळू हळू पुढच्या पिढीतली मुले शिक्षण घेऊन बाहेर पडली. मुंबईकडे सरकली. साई या गावातला गुजराती टक्का शून्य झाला. हिंदू टक्काही जवळपास संपत आला. कारण गाव हे हळू हळू मुस्लिमबहुल झाले.
शिक्षणाचेही वांधे होते. कोकणात तेव्हा महाविद्यालये संपूर्ण जिल्ह्यात मिळून दोन पाच असायची फारतर. साईला शाळा फक्त सातवीपर्यंत. पुढे पंचाईत. कुणी आपल्या मुलांना गुजरातच्या नातेवाईकांकडे पुढील शिक्षणासाठी पाठवत. कुणी तालुक्याला असणाऱ्या इतर गुजराती समाजात. गुजरातला गेलेल्या मुलांचे साहजिकच अर्धे शिक्षण मराठी तर अर्धे गुजराती माध्यमांत झाले. थोडक्यात फरपटच. मी तालुक्याला राहणाऱ्या माझ्या मामाकडे राहून आठवी ते दहावी शिकले. माझा भाऊ एका गुजराती कुटुंबात पेईंग गेस्ट राहून चार वर्षे शिकला. एक चुलत भाऊ एका मराठी ब्राम्हण कुटुंबात चार वर्षे राहून शिकला. बऱ्याच मुली तेव्हा तशा तालुक्यात असलेल्या आपल्या काकामामांकडे राहून शिकत होत्या. आपल्या भाचरापुतण्यांना सांभाळणे हे त्या काळी कर्तव्यच समजले जात असे. आज एक पाहुणा कुणाच्या घरात चार दिवस सहन होत नाही लोकांना. तेव्हा अशी सख्खी-चुलत भाचरे पुतणे इतकेच नव्हे, तर ओळखीतले लोकही हक्काने येऊन राहत. महीने-वर्षे... कितीही..
 काळ बदलला होता. शिक्षण महत्त्वाचे होते. खेडं सोडणे गरजेचे होते.
काहींनी साईहून जवळच्या तालुक्याच्या गावी स्थलांतर केले. तिथे आता दहावीच्या पुढे शाळा कॉलेज होऊ लागले होते. तालुक्याच्या गावी देखील आम्ही साईवाले गुजराती म्हणूनच ओळखले गेलो. तिथे स्थलांतरित झालेले बहुतेक गुजराती आजुबाजूच्या खेड्यावरूनच आलेले होते आमच्याप्रमाणेच. माझे मामा पळसगाववाले, दुसरे एक लोणशीवाले, आम्ही साईवाले गुजराती म्हणून लोक ओळखू लागले. अजून तसेच ओळखतात. मला तिथे गेल्यावर साईवाल्या रसिकशेटची मुलगी म्हणून ओळख दिली की लोक लगेच ओळखतात.
हे गाव माझ्या नाळेत रुजलेले आहे. खरेतर पुढची तारूण्यातली वर्षे जिथे घालवली ते तालुक्याचे गाव मला अजूनही परकेच वाटते. मात्र साई अजून माझ्या रक्तातून वाहत असते. मी तर नंतर पूर्ण मराठी झाले. पण जी सख्खी-चुलत भावंडे साईहून सरकून मुंबई अहमदाबादकडे जाऊन पुढे पूर्ण गुजराती झाली, त्यांनाही साई अजून हाकारत असते. एवढेच नाही, तर जी आतेमामे भावंडे लहानपणी गुजरातहून सुट्ट्यांमध्ये आजोळी म्हणून यायची त्यांनाही साईची ओढ आहे. आठवणी आहेत. भेटी झाल्या नि साईच्या आठवणी निघाल्या नाहीत, असे कध्धीच होत नाही. एकदा जाऊ या म्हणून ठरते. जाणे मात्र फक्त माझे होते आताशा. मध्ये वीस वर्षांचा मोठा काळ मीही गेले नव्हते.
गाव फार सुंदर होते अशातला भाग नाही. पण भवताल खास कोकणी होता. चारी बाजूला टेकड्या, छोटे डोंगर, लहानशी नदी, विहिरी यांनी वेढलेले. कुठेही जायचे असले तरी एखादी टेकडी पार केल्याशिवाय जाता येत नव्हते. पहिल्या तीन पिढ्यांपर्यंत तर वाहनेच नव्हती. बैलगाडी किंवा पायी. सामान आणायला बैलगाडी. पुरुष तर पायीच चालून जायचे सहज पाच पंधरा मैल. अगदी लहान मुलेही चालत जात. माझा भाऊ तालुक्याहून दर शनीवारी चालत यायचा आणि सोमवारी परत चालून जायचा. कारण पावसाळ्यात चार सहा महिने एसटी बंद. माझ्या वेळी एसटीबसेस पावसाळ्यातही सुरू झाल्या. त्यामुळे मला कधी चालावे लागले नाही.
आता तिथे पहिल्या दुसऱ्या टप्प्यातील गुजराती लोक देखील किराणा व्यवसायात फार उरले नाहीत. पुढची पिढी वेगळ्या नोकरी व्यवसायांत शिरली. त्यांच्या जागी आता मारवाडी लोक मोठ्या संख्येने आलेत. मात्र ते आमच्याप्रमाणे इथे रुजतील असे वाटत नाही. कारण आता इंग्रजी माध्यमांच्या शाळा झाल्या. हिंदी बोलले तरी निभावून जाते आता. मराठीच बोलण्याची गरज राहिली नाही. इथेच राहून इथल्याच लोकांना तुच्छ लेखत अलिप्त राहण्याची कला आता पुढील गुजराती मारवाडी स्थलांतरितांनी शिकून घेतलेय.
मराठी टक्का मात्र कुठल्या व्यवसायात वाढला नाही तिथेही. कोकण्यांनाही मुंबई प्रिय आहे. गावात पन्नास कलमे असतील हापूसची आणि ऐसपैस जमीन. पण ती नेपाळी, बिहारी मुलांच्या हाती देऊन यांना मुंबई हवी. हळू हळू कोकण परकीयांच्या हाती जातंय नक्की.!

 

Apr 6, 2025

ऊन्हं

सकाळचं ऊन माझ्या घरात कोवळ्या बाळपावलांनी रांगत येतं..किलकिल्या उघड्या फटीतून डोकावतं. अगदी तस्संच, जसं एखादं नवीन आलेल्या शेजा-याचं तान्हं आपला दरवाजा उघडा पाहून हळूच डोकावत राहावं. आपल्या टुकु टुकु डोळ्यांनी न बोलता बघत राहावं..तसं..आणि दुसरं तान्हं बाळ पाहून आपल्या घरातील बाळही ज्याप्रमाणे उड्या मारून खिदळू लागतं; तसंच त्याला पाहून एकलदुकल कुंडीतला कोवळा वसंतही उल्हसित होऊन नाचू लागतो.

मी त्याला आपल्या हातात धरू बघते. त्याच्याशी काही क्षण खेळू पाहते. पण सकाळच्या कामाच्या धबडग्यात एवढा वेळ कुठं असतो त्याच्यात गुंतून राह्यला. मग मी त्याच्याकडे बघितल्या न बघितल्यासारखे करून आपल्या कामाला लागते. 

ते हिरमुसून परत फिरतं. मीही त्याला विसरून जाते. 

हे बाळऊन आता मोठं होत जाईल. पूर्व-पश्चिम योग्य दिशेत नसलेल्या माझ्या तिरपागड्या घरातही वाट वाकडी करून शिरू लागेल. कारण त्याला मी आवडते.. हुं ?..की मला ते आवडतं,  म्हणून असेल कदाचित. ऊन्हावर प्रेम करणारी माणसं वेडीच असतात नाहीतरी...
रंगपंचमीचे वेध त्याला आत्ताच लागू लागलेत. स्वच्छ निळ्या तलम आभाळावर प्रहरांचे रंग उधळू लागलंय. वा-यांच्या लहरींसोबत धुळवड खेळू लागलंय. पळस-पांगारा-काटेसावर त्याच्या स्वागताच्या तयारीत लागलेत. गुलमोहर, बहावा वाट पाहू लागलेत. त्याला पाहून ते अधिक रंगात येतील आणि त्यांना पाहून तेही अजून चमकू लागेल. 
चैत्रात त्याचं बारसं होईल. लोक त्याला उन्हाळा उन्हाळा म्हणू लागतील. कडूनिंबाच्या सावलीत डाळपन्हं खाऊ घालतील. कोकीळ गाऊ लागतील. आम्रमंजि-या डोलू लागतील.

जरा मोठं झालेलं हे व्रात्य ऊन माझ्या घरात सगळीकडे नाचू लागेल. दुपारचं जरा झोपू देणार नाही. मग त्याने घरात येऊ नये म्हणून मी हलकेच पडदे सरकावून घेईन, दारं खिडक्या लोटून घेईन. माझं मन थोडं खाईल, त्याला हे असं हुडूस हाडूस केल्यामुळे. पण आता ते इतकं मोठं झालंय की त्याला त्याचं काही वाटत नाही. कारण त्याला मज्जाव करून हवाहवासा अंधार बेडरूममध्ये करून मी दुपारची सुस्तावून ताणून देते आणि जेव्हा चारच्या ठोक्याला उठून सैपाकघरात चहाचं आधण ठेवायला जाते, तेव्हा ते सैपाकाच्या ओट्यावर पसरलेलं दिसतं. ओट्यावर घासूनपुसून, चमकावून पालथ्या घातलेल्या स्टीलच्या भांड्यांशी ऑंखमिचौली खेळत असतं. मी पुन्हा हरखून जाते. त्यालाही घोटभर चहा पाजते. आता माझ्यापाशी थोडा निवांत वेळ असतो. मी त्याच्याकडे एकटक पाहात राहते. त्याच्याशी गुजगोष्टी करते. त्याने अजून थांबावं म्हणून विनंती करते. पण आता त्याची पावलं पुन्हा त्याच्या घराकडे वळू लागलेली असतात. बराच वेळ खेळल्यानंतर अचानक आईची आठवण येऊन मुलाने घरात पळावं इतक्या घाईत  ते निघून जातं....
पण जाता जाता माझ्या घरात केशरसडा उधळून जाते.......

Apr 4, 2025

गणित आणि मी.

नववी-दहावीचं वर्ष

दहावी बारावीचे रिझल्ट लागले की, ऐंशी टक्के न नव्वद टक्के शिवाय बोलतच नाही कुणी....गेला बाजार सत्तर टक्केच्या खाली सहसा नसतातच कोणी की काय असं वाटावं, असा माहौल दिसतो सगळीकडे. तेव्हा साहजिकच एकदा तरी स्वतःच्या दहावी बारावीचं वर्ष आठवतंच, नाही म्हटलं तरी.

 छोट्याशा तालुक्याच्या गावी आठवी ते दहावी शिक्षण झालं. त्याआधीचं त्याहुनही लहानशा खेड्यात.  त्यामुळे ते तालुक्याचं गावही शहर वाटायचं तेव्हा. न तिथल्या शाळेतली मुलं चकचकीत..!!... असे दिवस होते ते. 

आमच्या खेड्यावर तर पायात पायताणही नसायची कोणा विदयार्थ्याच्या. तालुक्याला पाहिलं, इथं तर प्रत्येकाच्या पायात चप्पल दिसते. मग आधी एक चप्पल विकत घेतली. पण सवय नसल्याने कुठंही काढून ठेवली, की तिथंच विसरायला व्हायची. सुदैवाने तेव्हा चप्पल चोर फारसे बोकाळले नव्हते. 

इंग्रजीचा गंध नाही सातवीपर्यंत. मग आठवीत आमच्यासारखे खेड्यावरून आलेले विद्यार्थी वेगळे बसवले जायचे. त्यांच्याकरिता इंग्रजीचा वेगळा कोर्स असायचा. 

ओ की ठो कळायचं नाही. 

घरी काही अभ्यासाचा, पास व्हायचा तगादा नसायचा. त्यामुळे रमत गमत अभ्यास होईल तेवढा करायचा. परंतु पालक जरी ठेवत नसले, तरी गणित आणि इंग्रजी हे दोन शत्रू सतत धाकात ठेवत. अशावेळी माझ्याचसारखे गरीब बिचारे असलेले, मराठी, इतिहास, हिंदीसारखे विषय मला टेकू देत. आधार देत. पास व्हायला मदत करत. 

मग नववी उजाडली. आणि बीजगणित नावाचा आधुनिक शत्रू डोक्यावर येऊन थयथयाट करू लागला. इथं दोन अधिक दोनची मारामार होती तिथं,  ए वर्ग अधिक बी अधिक सी चा घनं वगैरे घनघोर लढाईच सुरु केली शत्रूने एकदम. दाणादाण उडाली. पळता भुई झाली. 

नववीचा वर्ग जून मध्यावर सुरू झालेला. ऑगष्टच्या पहिल्या आठवड्यात पहिली चाचणी. सगळे गरीब बिचारे विषय आले आणि मुकाट गेले. पण गणिताचा पेपर अशा काही शस्त्रानिशी आला होता, की त्याच्याशी दोन तर जाऊ दे, एक हातही करता आला नव्हता. मला एक बोटही लावू दिलं नाही त्याने आपल्या अंगाला कुठंही. आला तसा कोरा करकरीत गेला. पण मला घायाळ करूनच.

साधारण आठेक दिवसांनी चाचणी परिक्षेचे पेपर तपासून मिळायचे. त्यात सारे हुशार (आगाऊ) विद्यार्थी आणि विद्यार्थिनी रोज सरांना, "सर सर ...पेपर नाही आणले का....कधी देणार?"... वगैरे विचारून आमचं टेन्शन अजून वाढवायचे. 'मरो ते पेपर...नाही दिले तर काय आकाश कोसळणार आहे का'....असं वाटत राहायचं. आणि सरही असे वस्ताद असायचे काही काही, की मुकाट ज्याच्या त्याच्या हातात पेपर देण्याऐवजी, त्याच्या मार्कांचा पुकारा करून, बोलवून द्यायचे. बरं आवाजही एकेकाचा असा दणदणीत लेकाचा, की त्याकाळी माईक वगैरे नसूनही अख्ख्या शाळेला ऐकायला जातील मार्क ....

तर असं गणिताचा पेपर कोरा गेल्यावर आठ दिवस उलटले, न आज पेपर मिळणार हे कळले होते. जीवाची नुसती उलघाल सुरू होती...(तेवढी तर नंतर इतक्या वेळा प्रेमात पडतानाही नाही झाली साली कधी..!!)...

त्यातल्या त्यात एकच जमेची आणि आनंदाची गोष्ट अशी होती, की माझ्या जोडीला अजून अशीच एक दुस-या खेड्यावरून आलेली मुलगी होती माझ्यासारखीच. (माझ्यासारखीच म्हणजे... माझ्यासारखीच देखणी,.. :P  माझ्यासारखीच गुजराती, माझ्यासारखीच मामाकडे राहून शिकणारी आणि माझ्यासारखाच गणित कोरा पाठवलेली...!!) हिंदीचा तास संपला. न आता गणिताचा सुरू होणार, त्याआधी आम्ही दोघी हळूच वर्गाबाहेर सटकलो.  आणि शाळेसमोर वाहतुकीचा, पण सुनसान रस्ता होता भरदुपारी, तिथं येऊन एका चिंचेच्या थोरल्या झाडाखाली उभ्या राहिलो. 
जाऊन जाणार कुठे...!! ते काही कॉलेज नव्हतं, कॅम्पस वगैरे भरलेलं. सारा आसमंत चिडीचूप होता. फक्त समोर शाळेतून सरांचे शिकवण्याचे आवाज थोडे येत होते. 

दिवस इतका वाईट होता, काय सांगू...!! भर ऑगष्टचा पहिला आठवडा...कोकणातला पावसाळा... अचानक धो धो पाऊस जो सुरू झाला...!! माझ्या जोडीदारणीने वर्गातून निघताना नशीब छत्री घेतली होती हातात. एका छत्रीत आम्ही दोघी त्या झाडाखाली पंचेचाळीस मिनिटे पाऊस झेलत उभ्या राहीलो. 
ती पंचेचाळीस मिनिटे पंचेचाळीस युगासारखी घालवली आम्ही. 

आणि शाळेच्या तासाचा टोल वाजला. हुश्श..
लांबून कानोसा घेतला. सर वर्गाबाहेर पडल्याचा. न चुपके से वर्गात शिरलो. साळसूदासारख्या. तर काय...!!...
बेंचेस बडवून की हो सा-या वर्गाने आमचं स्वागत केलं..!!. आम्ही मुकाट माना खाली घालून आपापल्या जागी जाऊन बसलो. कारण आम्ही समजून गेलो त्या स्वागतावरूनच, की जरी आम्ही वर्गात नव्हतो, तरी आमचे भोपळे सरांनी भर वर्गात फोडले होते. 

का असं करत असतील सर ? :P  ...

( का असं करतात ते आज कळतंय म्हणा...वर्गात शिकवताना... :P ...)
मागच्या वर्षीच एक माझा विद्यार्थी, कॉलेज सुरू झाल्यावर माझ्या जवळ आला. आणि मला म्हणाला, "मॅडम मी नापास होऊन पुन्हा या वर्गात आहे, हे बोलू नका प्लीज कोणासमोर वर्गात"..... 
घ्या... इथं तर माझ्या लक्षातही नव्हतं, की हा विद्यार्थी गेल्या वर्षीचाच आहे. कारण तो सठीसमासी कधीतरी उगवायचा न मावळायचा.  मी त्याला विचारलं, "तू गेल्या वर्षी माझ्या वर्गात होतास"..???....तसा तो एकदम कूल झाला..! 
"नाही लक्षात का मॅम..??.जाऊ द्या ..मग राहू द्या". म्हणत तो एकदम सुटकेचा श्वास सोडून निघून गेला...!!)

तर असं नववीचा पावसाळा हा असा बरसून गेला...डोक्यावरून, डोळ्यातून आणि गणिताच्या पेपरावरून...त्यामुळे तो कायमचा लक्षात राहीला. 

आणि असे हे गणित, इंग्रजी वगैरे घातकी शत्रू त्या त्या वेळी घात करून गेले. तरी आम्ही झाशीच्या राणीसारख्या लढलोच. आज मी महाविद्यालयात एक पेपर का होईना शिकवतेय.. त्या शत्रूंच्या नाकावर टिच्चून. आणि ती माझी देखणी (माझ्याहून जरा जास्तच) जोडीदार, बारावीलाच ह्या शत्रूंसमोर नांगी टाकून गावातल्या धनाढ्य आणि तालेवार माणसाची सून होऊन चांगली गाडीतून फिरू लागली..... तेही या शत्रूंच्या नाकावर टिच्चूनच............!!!

 

(दहावीच्या आणि बारावीच्या वर्षांची कहाणी पुन्हा केव्हातरी.........)

Mar 30, 2025

मी आणि सण वार..

दसरा दिवाळी आली, की दरवर्षी आई ही आठवण सांगायचीच..
अर्थात ती माझ्या जन्माच्याही आधीची असेल.. किंवा मी अगदीच लहान असतानाची..
आम्ही खूप लहान खेड्यावर राहत होतो...
गाव मुस्लिमबहुल... आणि हिंदू जे होते ते कष्टकरी.. प्रमाणात गरीब..
गावात हिंदू सणाचं असं काही वातावरणच नसे फार... फक्त गौरी गणपती आणि दहीहंडीला थोडंफार सोडून...
पण तिथं कोण राहात होतं त्यापेक्षा तो काळच दिखाऊपणाचा नव्हता.. सणावाराला अंगात वारं येण्याचा नव्हता.. 
आमच्या घरी तर कोणतीच कर्मकांडं नव्हती. येऊनजाऊन एक एकादशी.. ती फक्त आजी करायची... तेही मस्त खाऊन पिऊन... म्हणजे तिच्या एकादशीची आम्ही वाट बघत असू आणि ती देखील... कारण ती खाण्याची शौकीन होती...
आणि घरच्या देवांची सकाळी आणि संध्याकाळी अशी दोनदा आजोबा पुजा आरती करत. आजोबा वारल्यावर, दोन दोनदा पुजा करून बाळकृष्णाला त्रास द्यायचा नसतो या सबबी खाली आजीने संध्याकाळची पुजा बंद करून टाकली. (आईशप्पथ हेच कारण सांगितलं होतं. आजी असावी तर अशी... मी तिच्यावरच गेलेय...)
तर सांगायचं म्हणजे आमच्या घरात आधीच हा असा देवाच्या नावाने उजेड होता... सणावाराचं कौतुक नव्हतंच फारसं... आला काय नि गेला काय... खेड्यावर खरेदी नव्हती.. आणि केली तरी नटून दाखवायला तशी माणसं नव्हती... फारतर दिवाळीत भावाला फटाके उडवायची नि कंदीलं बनवून टांगायची हौस होती..
किस्सा आहे दसऱ्याचा...
गुजराती असलो, तरी नवरात्र आणि गरबा बिरब्याशी सुतराम संबंध राहिला नव्हता कोकणातल्या त्या खेड्यावर सहा पिढ्या घालवल्यानंतर.
तर असाच एके वर्षी दसरा आला. कुणाला त्याचा पत्ता नव्हता. घड्याळाच्या काट्यावर तर जाऊच दे, पण कॅलेंडरच्या तारखांवरही आयुष्य धावत नव्हते तेव्हा तिथे आमचे. त्यामुळे दसरा बिचारा गपगुमान येऊन गेला होता. आणि आजीने संध्याकाळी खिचडी रांधली. असंही गुजराती घरात आठवड्याला तीनदा खिचडी ही बनतेच. शास्त्र असतं ते त्यांचं. 
पण आजोबांजवळ पंचांग असे. ते कधीमधी बघत. त्या दिवशी त्यांच्याही संध्याकाळीच लक्षात आलं, की ते दिवसभर बाहेर होते काय कोण जाणे... पण संध्याकाळी जेवायला बसल्यावर ते भयंकर संतापले. घरातल्या बायकांवर... काय अकला आहेत की नाही तुम्हाला? दसऱ्याच्या दिवशी गोडधोड नाही, तर नाही. पण खिचडी कसली रांधताय. दळिंद्री कुठल्या...  आजी, आईंची तोंडं पडली. गप बसल्या बिचाऱ्या... 

ही आठवण आई दरवर्षी नंतर हसत हसत सांगायची. ती सांगताना तिला हसू आवरायचे नाही. खूप हसायची. म्हणायची, 'अगं, नवरात्र आलं कधी नि गेलं कधी पत्ता नसायचा.. गावात कोण करतंय असले सण नि बिण? आम्हाला दोघींनाही लक्षातच नाही आले त्या दिवशी दसरा आहे ते. तेव्हापासून खिचडी करायची झाली की आम्ही दोघी बघून घ्यायचो आज काही शुभ वार बिर तर नाही ना.'
आता तिची तीच आठवण मी दरवर्षी सांगत असते सगळ्यांना. मला फार आवडतंय ते.. किती साधं राहाणं होतं त्याकाळी लोकांचं...आणि कर्मकांडांचं अवडंबरही नव्हतं..माझ्या घरी तर देवदेव नव्हतंच..उपासतापास, व्रत-वैकल्यं, पुजा, सत्यनारायण.. काही करता काही नव्हतं.. माझी गोरीपान आजी अगदी साधी राहायची. अंगावर एकही दागिना नव्हता. कुंकू नाही. (आजोबा असतानाही) म्हणजे घरात सोनं नव्हतं असं नाही. पण घालायच्याच नाही त्या... आईच्या अंगावर पण मोजकेच. 

तोच वारसा मी चालवतेय. 

- अलका गांधी-असेरकर

Jun 18, 2024

 नॉस्टेल्जिया...


सहज मनात आलं की आजोळचे गाव बघून यावे. कोकणातले. रायगडाच्या अगदी पायथ्याशी असलेले हे पळसगाव. अगदी छोटे खेडे. ज्याचा उच्चार तिथले लोक फलसगाव आणि आम्ही गुजरातीत फलसगाम करत असू. आता तिथे कुणीच नाही. पडके घर आहे फक्त. 

गाडी काढली आणि मी, माझा मोठा भाऊ आणि चुलत बहीण असे तिघे गेलो. रस्त्यापासूनच बदल जाणवू लागला. एक काळ होता, जेव्हा इकडे गाडीतूनच येत होतो. पण बैलगाडीतून. तेही प्रचंड धक्के खात, हिंदकळत, कंबरेचे टाके ढिले होत पोचत घरी. वाटेत मोठा दगड, चढ आला की पुरुष माणसे बैलगाडीतून उतरून पायी चालू लागत तितकी वाट. शिवाय लाल माती प्रचंड उडून कपडे आणि शरीर या दोन्हींचा अवतार होऊन जात असे. 
आता मात्र पक्की गुळगुळीत सडक झालीय. मोटारगाड्या सुळकन जात येत असतात. गावात पोचल्यावर तर हेच का ते गाव असे आश्चर्यचकीत झालो. ओळखूच येईना. एके काळचे पाच पन्नास घरांचे ते वाडीवजा गाव आता चांगले वाढलेय. पक्की, टुमदार घरे बांधलीयत लोकांनी. 

आम्ही अनेक पिढ्या कोकणात राहिलो. त्यामुळे आजोळ, काका, मावश्या यांची गावे पण इथंच. भवताली. छोट्या छोट्या कोकणी खेड्यांवर. कोकणी पद्धतीचे मोठाली घरे, परसदार, झाडे, विहीर असा सगळा बारदाना होता. तर आईचे माहेर हे पळसगाव. आई माहेरची सधन होती. सासरी फार आर्थिक हाल काढले तिने. तिचे बाबा दिलदार होते. माहेरच्या सधनतेच्या आठवणी आणि किस्से ती नेहमी सांगत असे. आमच्या गावाहून देखील हे पळसगाव छोटे. एखाद्या वाडीसारखे. इथे मुस्लिम नव्हते. एकही घर नव्हते त्यांचे. त्यामुळे आमच्या गावापेक्षा इथले वातावरण वेगळे होते. आमच्या गावात चहलपहल होती. माणसांचे आवाज होते. इथे आजुबाजूला गर्द जंगल, झाडी. अगदी सत्तरच्या दशकापर्यंत तिथे विजेचा पत्ता नव्हता. रात्र झाली की मामा पेट्रोमॅक्सची बत्ती लावत. त्याचा उजेड भरपूर पडत असे. पण बाहेर मात्र किर्रर्र...

या मामाच्या घरी जायची इच्छा व्हायची. पण हौसेने गेल्यावर मात्र कुठून आलो.. इतका कंटाळा यायचा. इतके लहान खेडे. त्यात संध्याकाळ झाली की अजून उदास, कंटाळवाणे व्हायचे. वीज नसल्याने. मामाची मुलं सरावलेली होती. त्यांना तिथे करमत असे. जरी ती मुले देखील तालुक्यालाच शिक्षणासाठी राहत असली, तरी सुट्टीत त्यांना तिथे करमे. 

अंगणात बसले,की समोर रायगड किल्ला दिसत असे. त्यावरचा दिवा देखील.  आजुबाजूला अगदी गरीब, मातीची पण बऱ्यापैकी पक्की असलेली सुटी सुटी घरे , प्रत्येकाच्या अंगणार भरपूर झाडे. त्यात प्रामुख्याने आंबा आणि फणस. जरा दूर गेले की करवंदांच्या जाळी, काजूची, जांभळाची झाडे.  एक छोटी नदी. तिथे हुंदडायला दिवसा जरा बरे वाटे. पण रात्र झाली की ती एक रात्र युगाची वाटे. बाहेर बाथरूमला जायची पण प्रचंड भीती वाटे. मिट्ट काळोख भवताली. मामे बहीण मात्र अंधार पडल्यावर देखील हातात छोटा रॉकेलचा दिवा घेऊन आजुबाजूच्या घरातल्या मैत्रीणींना भेटायला, गप्पा मारायला जायची. तिथल्या कुणबी, मराठा घरात तिचे मायेचे बंध होते. तिथल्या आया बाया तिच्यावर खूप माया करत. इतकी की तेव्हा मला हेवा वाटे. मला मग तिथे अजूनच परके परके वाटू लागे.  

एकदा असाच मामा सुट्टीत मला आणि भावाला घेऊन गेला. दोन दिवस बरे वाटले, पण नंतर जाम करमेना. परत जायचं होतं घरी. पण मामा जाऊ देईना. आणि जोपर्यंत तो गाडी जोतून देत नाही कुणाची तोपर्यंत आम्ही एकटे जाऊ शकत नाही असे किशोरावस्थेतले. आम्ही रोज मामाच्या विनंत्या करत होतो. पण तो आणखीच चिडवायचा. आता इथेच राहायचे. आता नाही परत जायचे. ते ऐकून मला त्याचे खरेच वाटायचे आणि रडू यायचे. भाऊ जरा मोठा कळता होता. तो माझे मन रमवण्याचा प्रयत्न करे. काहीतरी खेळ, कोडी इत्यादी खेळून. काळ असा की ना रेडीओ, ना टीव्ही, ना तिथे पुस्तके... फोनचा तर प्रश्नच नव्हता. त्यात मामी वारलेली. मामा एकटा राहात होता. 

नंतर काहीच वर्षात एसटी पण चालू झाली. प्रचंड लाल धुरळा उडवत एसटी गावात शिरायची. वीजही आली. मग मात्र कधीतरी जात असू. कारण आता जाणंयेणं मामावर अवलंबून नव्हतं. मनात आलं तर गेलं, मनात येईल तितकं राहीलं. की एसटीने परत. तरीही फार काही कधी आजोळी जाणं झालं नाही. आठवणीत पाचसहा वेळा गेलो असू. बास. पण आज स्मरणात मात्र ते जसंच्या तसं येतंय.

आता मामा नाही, त्याची मुलंही तिथे नाहीत. घर बेवारस, पार पडलेले एक दोन खोल्या पडक्या झडक्या शिल्लक आहेत फक्त. अनेक, जवळपास चाळीसेक वर्षांपूर्वी मामाने लावलेले चिकूचे झाड मात्र बहरलेले होते अजून. आम्ही गेल्यावर आजुबाजूचे गोळा झाले. त्यांनी अर्थात ओळखले नाही. त्यांना ओळख दिली. मग काही म्हाताऱ्या कोताऱ्यांना ओळख लागली. येत जा म्हणाले. 

काळ सरकतो, बदलतो, जे दिवस आणि जो परीसर तेव्हा कंटाळवाणा वाटत होता, तशाच परीसरात आज रिसॉर्ट शोधत काही हजार रुपये देऊन दोन दिवस घालवायला जातो... शहरी धकाधकीपासून दूर. 

ते खऱ्या अर्थाने मामाचे गाव होते. 



किसी पिछले जनम की बात...

मुगले आजम हा सिनेमा पन्नास वर्षानंतर रंगीत झाला, त्यालाही आता जवळपास 20 एक वर्ष लोटली. 🤦काळ किती भराभर चाललाय...    तेव्हा टीव्हीवर दिलीप क...