Showing posts with label कोरोना आणि लॉकडाऊन. Show all posts
Showing posts with label कोरोना आणि लॉकडाऊन. Show all posts

Aug 5, 2020

लॉकडाऊन मुलाखत

स्त्रीउवाचसाठी एक लॉकडाऊन मुलाखत.-

नाव- सीमा आनंद म्हस्के
शिक्षण – दहावी पास. (गावाकडे शिक्षण, पुढे लांब आणि चालत जावं लागत होतं म्हणून पुढचं शिक्षण घेतलं नाही. पण या कारणापेक्षाही तिच्याशी बोलताना अवेअरनेस कमी असल्याने शिक्षण पुढचं अपूर्ण राहिल्याचं अधिक जाणवत होतं.)
जात – नवबौद्ध.
सावळी, तरतरीत, हेल्दी दिसते बऱ्यापैकी. हुशारही आहे.
काम – सोसायटीतला कचरा गोळा करून म्युन्सिपाल्टीच्या गाडीत नेऊन टाकणं
मुळ गाव – जालना जिल्ह्यातलं सिद्धेश्वर पिंपळगाव
सध्या- डोंबिवलीत. तेलकोसवाडीतल्या झोपडपट्टीसदृश्य जागी वास्तव्य.

तिथे आजुबाजूला याच लोकांची वस्ती असावी. कारण वेचलेल्या कचऱ्यांची बाचकी मोठ्या संख्येत बाजूला रेल्वे रुळाजवळ टाकून ठेवलेली दिसतात.

वय – ३०

१९-२० व्या वर्षी लग्न

तीन बाळंतपणे

पैकी दोन मुलं जिवंत
नवरा – बिगारी कामगार, सध्या लॉकडाऊनमुळे घरी. काम नाही.
माहेरी आई-बाबा, चार बहिणी, एक भाऊ, बाबा बिगारी कामगार. बांधकाम व्यवसाय ठिकाणी. आई कचऱ्याचंच काम करते.

हिच्याजवळही आमच्या एकाच सोसायटीचे काम आहे. त्याचा पगार मिळतो – २०००/- महिना.

आई-बाबा बाजूलाच राहतात. आईला  कोरोना झाला होता. आता बरी झालेय. सरकारी दवाखान्यात राहून. अजूनही नातेवाईक असतील आजुबाजूला कदाचित.

लॉकडाऊन मधील बदल -
दिनचर्येत फारसा बदल नाही.

नवरा घरात काडीचीही मदत करत नाही.

मुलांचेही आवरत नाही.

उलट पसारा करून ठेवतो.

सध्या त्याला काम नाही. तंबाखूचं व्यसन आहे. दारूचं अजून तरी नाही.
नवरा काम करायचा तेव्हा पैसे घरात द्यायचा.

आर्थिक परिस्थितीत बदल – लॉकडाऊनमध्ये खराब. नवऱ्याचंही काम नसल्याने.

कामात बदल – सकाळी एका सोसायटीतलं कचरा, झाडूचं काम आटोपून मग दिवसभर घरातली कामं, पोरांची उस्तवार असते. बाकी कामात बदल नाही. आधीही तसंच होतं.

आराम मिळतो का? – हो, दुपारचा तास दीड तास मिळतो. झोपते. टिव्ही बघते. टिव्हीवर सावधान इंडिया, बातम्या, मराठी सिनेमा बघते.

 

मैत्रिणी आहेत का? – इथे नाहीत. गावाकडच्या आहेत गावाकडे. त्यांच्याशी फोनवर बोलते.
सुख-दुःख कुणाशी शेअर करते का? – नाही. कुणाला दुःख सांगत नाही. अगदी आईबाबानाही नाही. आतल्या आत घुसमटते.

 

आवडीचं खाणं करून खाते का? – होय.

फळं बिळं? – नाही फारसं. तेवढं परवडत नाही. मुलांनाही नाही. बिस्कीटं, टोस्ट इत्यादीही नाही फारसं.

 

नवऱ्याचं प्रेम आहे का? – आहे.

 

सध्या भांडणं वाढलीत का? – होय. कारण मदत करत नाही. हिच्या श्रमाची किंमत नाही असं हिला वाटतं.

मारतो का? – हात उचलतो कधी कधी असं म्हणाली.

कितीदा रडली? – नाही रडत असं म्हणता म्हणता माझ्यासमोरच रडली. मग म्हणाली, हो रडते. पण कोणाशीही शेअर करत नाही. आईशीही नाही.

 

मदत कोण करतं? एरव्ही आई करते थोडी फार. सध्या सोसायटीकडून अपेक्षा होती. पण सोसायटीने अजून तरी जास्तीचा काही पैसा दिला नाहीए.

(मी तिला दोनदा पाच पाचशे रुपये आणि एकदा दोनशे रुपयाचे गहू भरून दिले.)

 

नवरा गावाकडे जायचं म्हणतोय सगळं सोडून. तिथे काही काम आहे का म्हटलं तर नाही म्हणाली. तिथे जाऊन शोधायचं. शेती बिती नाही. तिला म्हटलं, नको जाऊस. इतके दिवस काढलेस. तिथेही अनिश्चित आहे तर इथेच राहा. तिला इथेच राहायचंय. पण नवरा ऐकत नाही. जायचं जायचं म्हणतोय.

नवऱ्याला दुसरी कामं शोध म्हटलं, तर म्हणतो सवय नाही दुसऱ्या कामाची. अजून तरूण आहे तरी. मी सांगितलं आपला गुरखा नुसत्या गाड्या धूवून आणि सोसायट्यांचे पाणी सोडून दहा पंधरा हजार कमवतोय. आजुबाजूच्या सोसायटीतून गाड्या धुण्याचे काम मिळव विनंती करून. तर म्हणाली त्याला सवय नाही दुसऱ्या कामांची.

दहावी पास आहे आणि जातीचे आरक्षण, सुविधा आहेत तर खरंतर सरकारी नोकरी मिळू शकली असती. अजूनही मिळू शकते. पण सोर्सेस ठाऊक नाहीत. कुठे कसा प्रयत्न करायचा माहीत नाही. नवरा बहुधा दहावी पास नाही.

 

भविष्याबद्दल आशादायी आहे का? – तर हो म्हणाली.

पण भविष्य बदलणार कसं याचे उत्तर तिच्यापाशी नाही. तिला म्हटलं, हुशार, तरतरीत आहेस तर हे काम सोडून पोळी भाजी इत्यादीची कामं शोध. घरकाम शोध. पण कोण देणार असं तिला वाटतं? कारण कचरा कामं करणाऱ्यांना लोक सैपाकघरातल्या कामासाठी घेत नाहीत सहसा.

---------

बाई म्हणून मला तरी तिच्या परिस्थितीत इतर बायांपेक्षा काही फार वेगळी परिस्थिती वाटली नाही. एक आर्थिक परिस्थिती सोडता.
मध्ये मिळून साऱ्याजणींचे ऑनलाईन शिबीर होते. त्यातही बायकांनी हिंसाचार होत नाही असे म्हटले होते. त्या मध्यमवर्गीय बायका होत्या. नवऱ्याने मारलं तरी बाहेर सांगायचं नाही हा आपल्याकडे रिवाज आहे. ही सीमा सुद्धा खोदून विचारल्यावर हात उचलतो म्हणाली, रडते म्हणाली. अन्यथा नाहीच म्हणत होती आधी. तर इतर बायका काय म्हणणार? मध्यमवर्गीय संस्कार तर अजून कडक असतात. त्या काय शेअर करणार आपल्या व्यथा जाहीरपणे?

निष्कर्षया वर्गात निदान अवेअरनेस जागृत करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांची गरज आहे. जात, शिक्षण, आरक्षण प्रमाणे नोकऱ्या मिळतात, मिळू शकतात. त्यासाठी काय करायला हवं याची माहिती देणारं कुणीतरी हवं. शिक्षणासाठी आग्रह धरणारे कार्यकर्ते हवेत. कुटुंब नियोजनाचा प्रभावी प्रचार करणारे लोक हवेत. त्यासाठी थोडीफार मामूली मदत मिळवून देणारे हवेत. तशी मिळूही शकते. हे काम त्या त्या जातीनेच अधिक केले तर उत्तम. कारण प्रत्येक जातीत एक शिक्षित, आर्थिक संपन्न, हुशार वर्ग असतोच. जातीच्या संघटना हे काम करू शकतात. मी असं म्हणत नाही, की जातीचं जातीने पाहावं म्हणून. किंवा सरकारकडून काही अपेक्षा ठेवूच नयेत असं. परंतु मी माझ्या आजुबाजूला बघते. उच्चवर्णियांच्या जात संघटना अशा प्रकारची कामं करत असतात. आपल्या समाजातील प्रमाणात गरीबांना, विद्यार्थ्यांना आर्थिक मदत, वैद्यकीय मदत, मिळवून देत असतात. फंड गोळा करत असतात. यात काही चुकीचं वाटत नाही. मग या तळागाळातल्या लोकांच्या जातसमाजानीही हे करायला हवे. तशा त्या करतात की नाही ते मला माहीत नाही.  
सहसा मी अशा लोकांना सरकारकडे रडताना अधिक पाहते. सरकारने करावे, त्यासाठी मोर्चे, आंदोलने, धरणे, संप, इत्यादींसाठी कार्यकर्ते गोळा करून त्यांच्या रिकामटेकडेपणात अधिक भर घातली जाते. त्याऐवजी अशी सकारात्मकता ठेवून जातबांधवांसाठी काही अशी मदत केली प्रत्येक प्रगती केलेल्या व्यक्तीने तर ते अधिक चांगले.

हेच शेतकरी वर्गातही व्हायला हवं. मोठ्या शेतकऱ्यांनी लहान शेतकऱ्यांच्या हितासाठी थोडी झीज सोसणे, त्यांच्यात प्रबोधन करणे, त्यांना जागरूक करणे, मदत मिळवून देणे ही कामे केली तरी जखमांवर बराच ईलाज होईल. जगण्याची, आधार असल्याची भावना निर्माण होईल. तसे होत आहे की नाही मला माहीत नाही.

- अलका गांधी-असेरकर

 

 




 

 



 


Jun 23, 2020

लॉकडाऊन आणि सैपाक -

संकटं आणि स्त्रिया - कंटाळल्यात बायका घरोघरी सैपाकघरात शिजवून. तरी शिजत राहतायत चुलीपुढे घामाच्या धारांतून. कंटाळ्यातून. चिडचिडीतून.
आता कुठं बिचाऱ्या या दशकात जरा जरा बाहेर पडू लागल्या होत्या सैपाकघरातून. बाहेर सगळं मिळू लागलं होतं आयतं वायतं आणि जरा बरं सुद्धा.
कंटाळा आला तर घेऊन येता येत होत्या कोपऱ्यावरच्या पोळीभाजी केंद्रावरून पोळ्या, गरमगरम भाकऱ्या आणि भाजी. एखाद्या संध्याकाळी निवांत जाऊन बसता येत होतं नवरा, पोरं घेऊन कोपऱ्यावरल्या बऱ्याशा हॉटेलात दोसा बिसा खाऊन येता येत होतं.

पण कोणतंही संकट आलं, की त्याचा आधी मार बायकापोरांवर बसतो म्हणतात. कोरोनाच्या ल़ॉकडाऊनने देखील बायांना पुन्हा सैपाकघरात लॉक करून टाकलं. उपाशी राहू शकत नाही, बाहेरचं आणू शकत नाही आणि बहुतांश घरातल्या पुरुषोत्तमांना तर कूकरचं झाकणही लावता उघडता येत नाही अशी स्थिती. त्यात पोरांच्या फरमाईशी. साधं वन डिश मिल फारतर एखाद दिवस चालवून घेतात ती. नंतर भुणभूण सुरू. हे बनव, ते बनव. घरात राहून अजून खाय खाय सुटलेय सगळ्यांना. बाईची खरी मैत्रीण कोण असेल तर ती घरसखी. बाई करीअर, नोकऱ्या करते ते देखील घरच्यांच्या नव्हे तर, या घरसखींच्या जीवावर. आता तीही नाही. भांड्यांचे ढीग पडतायत. काही घरी पुरुष एकवेळची घासून देतात. पण यज्ञात सातत्याने आहुती पडत राहते तशी सिंकमध्ये सतत भांडी पडत नाही राहिली तर सिंकदेवता कोपत असावी बहुधा. शिवाय पुरुषांच्या घरातल्या मदतीकडे अजूनही बोनस म्हणूनच पाहिले जाते.. मिळाला तर वाहवा, न मिळाला तर वाहवा...
तरीही त्यातूनही काहीतरी नवीन म्हणून स्त्रियांनी यु ट्यूबवर नवीन रेसिपि शोधल्या. त्या ट्राय केल्या. पण शेवटी काय तर चुलीपुढेच शिजल्या.
छान राहणं, सजणं, नटणं, चांगलेचुंगले आवडते कपडे घालून फिरणं, मिरवणं, थोडंफार तरी शॉपिंग करणं, पार्लरला आठवड्या पंधरवड्यातून एकदा तरी भेट देणं, मैत्रिणींच्या घोळक्यात हेल्दी गॉसिपिंग करणं, एखादी छोटी मोठी पिकनिक करणं, ही बायकांच्या जगण्याची गरज आहे. विशेषतः गृहीणींची. नोकरीवर जाणाऱ्या बाया आपसूकच हे सगळं करत असतात. पण गृहींणींना अकारण सकारणही हे करावं लागतं. ती त्यांची मानसिक गरज असते. ते केलं नाही, तर त्यांचं सगळं आयुष्य पूर्वीच्या बायकांसारखं घराचा तर सोडाच पण सैपाकघराचा नि माजघराचाही उंबरा न ओलांडता असंच निघून जाईल. या दोनच खोल्यांत. कळकटलेल्या कपड्यांत. केसांच्या अवतारात. क्षणाची पत्नी नि आयुष्यभराची अन्नपुर्णा म्हणूनच गौरवल्या जातील नि मरतील त्या. कोरोनासारख्या परिस्थिती उद्भवत राहिल्या तर. त्यातही ज्या स्त्रिया गेली दहा, पंधरा, वीस, तीस वर्षे गृहिणी म्हणून राहिल्या, त्या आता जरा काही कर्तव्यांतून बाहेर पडून बाहेरच्या दुनियेत रमू लागल्या होत्या. काही नवीन गोष्टी शिकू लागल्या होत्या. फिरू लागल्या होत्या. आपले छंद जोपासू लागल्या होत्या. त्या पुन्हा सैपाक घरात लॉक झाल्या. नि अधिक वैतागल्या.
पुरुषांच्या या गरजा नसतात. ते दोन जोड कपड्यांवर पूर्ण वर्ष काढू शकतात. तेही बाहेर. घरात तर पट्ट्यापट्यांचा एक बर्म्युडा आणि वर एक गंजिफ्रॉक यावर ते आठवडाच काय, आयुष्य काढू शकतात. कारण त्यांना सतत सैपाकघर नसतं. त्यांना बाहेरची दुनिया असते. मन रमवायला. प्रत्येक पुरुष बाहेरच्या दुनियेतले वेगवेगळे टक्केटोणपे सहन करतो. त्यातून समृद्ध होत जातो. मात्र प्रत्येक स्त्री, मग ती मजुराची बायको असो वा साहेबाची, तिला सैपाकघरात स्वतःला सिद्ध करावं लागतं. त्यातून वेळ मिळाला तर उडा. पण कोरोनाने ते पार्ट टाईम उडणं पण बंद करून टाकलंय गृहीणींचं. वर्क फ्रॉम होम करणाऱ्या स्त्रिया तर दुहेरी चक्रात अडकल्यायत. घरचे नि बाहेरचे बॉस सांभाळताना तारेवरची कसरत करतायत.
पुरुष घरात बसूनही ऑफिसची कामं करतायत. पगार घेतायत. उरल्या वेळात टाईमपास करतायत. सोमिवर. वेगवेगळ्या गोष्टी शिकतायत.
फार फार तर दारू मिळत नाही, नि मिळाली तर बसायला मित्रमंडळी घावत नाहीत. एवढीच काय ती खंत उरी बाळगत चारी ठाव गिळत तंगड्या पसरणं एवढीच गोची पुरुषांची या कोरोनाने केली असेल तर केलीय.
मी मध्यमवर्गापुरतं बोलतेय. इथं लगेच कामगार नि मजूर नि बेरोजगार घुसडू नका. प्रत्येक वर्गाच्या समस्या असतात. नि त्या वेगळ्या असतात.
आणि या सगळ्या गोष्टी माझ्यावरही आणू नका. मला हॉटेलातलं जेवणच चालत नाही ही माझी कोरोना नसतानाचीही स्थिती होती.
संकटांपुढे, मग ते संकट आस्मानी असो वा सुलतानी, आधी ढाल म्हणून उभं राहावं लागतं ते बायांना. पहिला हल्ला सहन करावा लागतो तो त्यांना. या लॉकडाऊनच्या काळात घरगुती हिंसाचाराचेही प्रमाण वाढलेय असं आकडेवारी सांगतेय. आधीच मार खात असलेल्या स्त्रिया आता जास्त मार खातायत. कारण त्यांचे पुरुषोत्तम आता दिवसरात्र त्यांच्या डोक्यावर घरातच बसलेले आहेत. ते त्यांचं सगळं फ्रस्ट्रेशन, नोकरी गेली असेल तर अधिकच, घरातल्या बायापोरांवर काढताहेत.
पुरुष रिटायर्ड होतात. नित्याच्या कामातून, वर्षानुवर्षाच्या कंटाळवाण्या चक्रातून सुटतात. पण बहुतांश स्त्रियांची आजही वय झालं तरी या ड्युटीतून सुटका नसते. त्या कधी सैपाकघरातून रिटायर्ड होतच नाहीत ही वास्तविकता आहे.
लॉकडाऊनच्या या काळात स्त्रिया अधिक डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता आहे. मात्र त्यांच्या डिप्रेशनकडे कधी आजवर गांभीर्याने बघितलंच गेलेलं नाही. त्यांच्या डिप्रेशनला नेहमी बायकांची बडबड, बायकांचे आजार, बायकांचा स्वभाव अशी लेबलं लावून त्याकडे दुर्लक्ष केलं गेलंय. अनेकदा तर आपण डिप्रेशनमध्ये आहोत हे स्त्रियांना स्वतःलाही कळत नाही. आपणच कुठे तरी घरच्यांच्या अपेक्षांना कमी पडतोय असा गिल्टही त्या बाळगून राहतात. आणि स्वतःकडे दुर्लक्ष करत त्याही तसंच रेटत राहतात. त्यामुळे आताही काही सांगितलं, तर कोरोनाची परिस्थिती काय फक्त स्त्रियाच सहन करतायत का? असे प्रश्न विचारले जातील. अपवाद सगळीकडे आहेत. सगळ्याच स्त्रियांची ही स्थिती नसेल, पण बहुतांश गृहिणींची सध्या हीच परिस्थिती आहे.
पुरुषही सहन करतायत. मात्र दोघांच्या समस्या वेगळ्या आहेत. यात पुरुषांना दोष देण्याचा अजिबात हेतू नाही माझा. निदान या पोस्टमध्ये तरी नाही. आणि ही परिस्थितीही आज ना उद्या बदलेल. मात्र सध्यातरी स्त्रियांच्या या समस्यांकडे गांभीर्याने बघून त्यांना काहीतरी चेंज देणं/मिळणं आवश्यक आहे. कारण आता सहनशक्तीच्या शेवटच्या टप्प्यात आहेत त्या. येत्या काळात अशा परिस्थिती पुन्हा पुन्हा उद्भवू शकतात. तेव्हा त्याची मानसिक आणि व्यावहारिक तयारी आतापासून करायला हवी नि काही बदल घडवायला हवेत. - अलका गांधी-असेरकर
Like
Comment

Jun 13, 2020

लॉकडाऊन आणि जनरल प्रॅक्टीशनर-

लॉकडाऊन परिस्थिती आणि जनरल प्रॅक्टीशनर-
डोंबिवलीतले सारे ऍलोपथी एमबीबीएस फिजिशियन्स आपापले दवाखाने बंद करून बसलेत.
याऊलट, होमिओपॅथ, आयुर्वेदाचार्य यांनी आपले दवाखाने एकही दिवस बंद ठेवले नाहीत.
हे माझ्या परीसरातलं, माझ्या अनुभवातलं सांगतेय. दहा लाखाच्या डोंबिवली वस्तीत इतरत्र वेगळी परिस्थिती असेलही. मला माहीत नाही. परंतु माझ्या घरापासून ते स्टेशनपर्यंतच्या एक कीमी परीघातील परिस्थिती ही आहे.
त्यामुळे परिस्थिती खूप बिकट आहे. इतर कोणत्याही छोट्या मोठ्या आजारांसाठी नेहमीचे डॉक्टर्स अव्हेलेबल नाहीत.
अशावेळी होमिओपॅथ, आयुर्वेद हेच लोकांना धीर आणि औषध दोन्ही देणारे देवदूत वाटताहेत मला.
एरव्ही हे ऍलोपथी छोटे-मोठे सारे दवाखाने भरून, ओसंडून वाहात असतात. पण खऱ्या आणीबाणीतच ते बंद आहेत.
माझ्या परीसरातील हे सारे एमबीबीएस डॉक्टर्स साठीच्या वरचे आहेत. तेही कारण असू शकेल. मी त्यांना दोष अजिबातच देत नाही.
पण होमिओपॅथ डॉ्क्टरही त्याच वयाचे आहेत माझे. त्यांचा त्यांच्या औषधांवर इतका विश्वास आहे. मात्र ऍलोपॅथचा स्वतःवरच विश्वास नाही असं समजायचं का...?
मोठे हॉस्पिटल्स आहेत तिथले एम.डी, एम.एस. डॉक्टरही म्हणे आपल्या स्वतःच्या घरातून व्हिडिओवर संवाद साधतात पेशंटशी. प्रत्यक्ष येऊन तपासत नाहीत. बघत नाहीत.
परिस्थिती खूप बेकार आहे. या अशा पावसाच्या सुरुवातीच्या वातावरणात नेहमीचे आजार, ताप, संसर्ग इत्यादी उचल खातात आणि कोरोनाची भीती अधिक वाटते. अशावेळी त्या पेशंट्सनी जायचं कुठं? एरव्ही हा सिझन म्हणजे डॉक्टरांच्या कमाईचा सिझन. त्यांना आता आपल्या पेशंट्सविषयी आस्था नसेल का?
-अलका गांधी-असेरकर
-

Jun 9, 2020

भीती -

भीती - 

भीती -
तीन महिने कड्क नियम पाळूनही परवा माझ्या मुलाला थंडी, ताप आणि सर्दी, अंगदुखी जोरदार झाली. नि आमच्या तोंडचे पाणी पळाले. खात्री होती की साधा, ऋतुबदलाचा ताप आहे, आणि वर्ष-दोन वर्षांतून त्याला एकदा येऊन जातो. तरीही मन चिंती ते वैरी न चिंतीप्रमाणे मन फणा काढतच होतं.
माझ्या स्वतःच्या बाबतीत म्हणायचं तर केवळ सोशल मिडियामुळे आणि मिलिंद पद्कीसारख्या लोकांच्या पोस्ट्स सुरुवातीपासून फॉलो केल्यामुळे नेमकी काळजी कशी आणि कुठे घ्यायला हवी ते कळले होते. बऱ्यापैकी काळजी अगदी सुरुवातीपासून घेत होते. आणि अजूनही घेतोच.
त्यामुळे गरम पाणी, सुंठ, हळद, काळी मिरी, तुळस इत्यादीचा काढा, ग्रीन टी हे त्याला सतत देत राहिले.गुळवेल पावडर दिली. हे सगळं करताना मी त्याला सारखं, 'तोंडाला चव आहे ना? जाणवते ना?" हे विचारत होते. तर तो म्हणायचा, "ह्या एवढ्या पावडरी खाल्ल्यावर काय तोंडाला चव राहणार आहे?" दोन तीन वेळा व्हिक्स आणि कोबीच्या पानांची वाफ दिली. आणि आमचे होमिओपॅथीचे फॅमिली डॉक्टर यांना फोन करून सल्ला घेतला. नि कुठल्याही डॉक्टरकडे न जाता घरीच त्याला तीन तीन तासांनी अर्सेनिक अल्ब.२०० नि ऱ्हस टॉक्स २०० च्या चार चार गोळ्या देत राहिलो.
डॉक्टरांनी सांगितलं होतं (नेहमीप्रमाणेच) की उद्या सकाळी ताप उतरेल. मला सारखं सारखं फोन करू नका आणि त्याप्रमाणेच दुसऱ्या दिवशी सकाळी ताप उतरला.
व्हिटॅमिन सी आणि इतर गोळ्या तर गेले तीन महिन्यापासून तिघेही घेतोय.
पण त्याच्यासाठी सतत नाचानाच करून आणि खड्या पायावर उभं राहून मला थकवा आला. नि काल मला सटासट शिंका सुरू झाल्या. नि पुन्हा भीतीने ये रे माझ्या मागल्या करत ग्रासले. पण मला तर बारा महिने तेरा काळ सर्दीचे विविध प्रकार सतत होत असतात. त्यामुळे गपगुमान राहून मीही अर्सेनिकचा एक डोस घेतला. वाफ घेतली. व्हिक्स चोपडले. आता बरे आहे.
एक महत्त्वाचे. घरच्यांना, जिवलगांना काही झाले तर आपण डिस्टन्सिंग पाळू शकत नाही. काय व्हायचे ते होवो. मुलाला दिवसभर जवळपास एक ताप राहिला. त्यामुळे त्याची कंबर नि डोके दुखत होते. ते चेपून देत मी त्याच्याजवळच बसून होते. तोंडाला मास्क लावून.. :D
या सगळ्यात नवऱ्याची साथ आणि धीर भक्कम आहे. घरात हे काम माझं, हे तुझं असं आधीही नव्हतं. आता तर बिचारा माझ्याहून दुप्पट कामं करतो. कारण त्याला माझ्यासारखा फेसबूकला वेळ द्यावा लागत नाही. त्यामुळे ते साहजिकच आहे. नाही का?🏃‍♀️🏃‍♀️
हे आता हसतेय, पण परवा माझंच तोंड बारीक झालं होतं. सर्वेपि सुखिनः सन्तु,
सर्वे सन्तु निरामयः
सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित दुःखभाग भवेत्||
ओम शांतीः शांतीः शांतीः

किसी पिछले जनम की बात...

मुगले आजम हा सिनेमा पन्नास वर्षानंतर रंगीत झाला, त्यालाही आता जवळपास 20 एक वर्ष लोटली. 🤦काळ किती भराभर चाललाय...    तेव्हा टीव्हीवर दिलीप क...