Showing posts with label फेसबूक पोस्ट. Show all posts
Showing posts with label फेसबूक पोस्ट. Show all posts

Apr 24, 2023

कोकणी मुस्लिम आणि उर्दू

 कोकणात मुस्लिम संख्येने खूप आहेत. विशेषतः समुद्रकिनाऱ्यानजिकच्या गावांत त्यांची बहुसंख्या आहे. अशाच एका गावात माझा जन्म आणि साधारण अठरा वीस वयापर्यंत वास्तव्य झालेलं आहे.

माझ्याही जन्माच्या आधीपासून गावात उर्दू शाळा होती. मुस्लिम बहुसंख्या असलेल्या बहुतांश, नव्हे जवळपास सर्वच गावांत त्यांच्यासाठी उर्दू माध्यमाच्या शाळा आहेत. हिंदूंसाठी मराठी माध्यम, तर मुस्लिम लोकांसाठी उर्दू माध्यमाची शाळा. 

या दोन वेगळ्या शाळांमुळे असे झाले, की आमच्या वर्गात एकही मुस्लिम विद्यार्थी नसे आणि त्यांच्या शाळेत एकही हिंदू  विद्यार्थी नसे. त्यामुळे एकत्र खेळणे, अभ्यास करणे, एकत्र मिळून शाळेत जाणे, गप्पा टप्पा, एकमेकाचं विश्व जाणून घेणे, हे कधी घडतच नव्हते. अजूनही तसेच आहे. बरं शाळाही दोन  वेगळ्या टोकाला. त्यांची मोहल्ल्यात तर आमची दुसरीकडे. 

आम्हीही काही मराठी नव्हतो. घरात गुजराती बोलणारे आम्ही, परंतु बाहेर गुजराती माध्यमाच्या शाळा नसल्याने आम्ही गेली सहा पिढ्यांपासून मराठी माध्यमांच्या शाळेतच शिकत होतो. त्याच्या परिणामी मराठी संस्कृती, खान-पान, साहित्य, प्रादेशिकता इत्यादींशी आमची नाळ आपोआप जुळत गेली. गुजराती घरी बोलण्यापुरती, तर मराठी भाषा ही व्यवहाराची, ज्ञानाची, माहितीची, मनोरंजनाची भाषा झाली. मातृभाषेपेक्षा ती अधिक जवळची झाली.

मात्र मुस्लिम मुलांची हालत अशी झाली, जशी आता इंग्रजी माध्यमातील ग्रामीण मुलांची होते. त्यांची मातृभाषा कोकणी-मराठी बोलीभाषा. पण शिक्षण उर्दूत. त्यामुळे ना मराठी सुधारली, ना उर्दू धड आली. मी कधीही गावातल्या कुठल्या मुस्लिम लोकांना आपसांत उत्तम उर्दूत संभाषण करताना पाहिलेले, ऐकलेले नाही. त्यांच्या कोकणी-मराठीतच ते बोलतात. या कारणाने ते आजही मुख्य धारेपासून वेगळे राहिलेत. ना उत्तम मराठी बोलत, ना उत्तम उर्दू. उर्दू माध्यमात शिकूनही ना तिथे कुणी उर्दू साहित्यिक झाले, ना शायर झाले, ना कधी गजल मुशायरे ऐकले. 

शिवाय शाळा उर्दू माध्यमातील असल्या तरी कॉलेजेस उर्दू माध्यमातील नाहीत. तेव्हा तरी नव्हते. त्यामुळे उच्च शिक्षणासाठी मराठी, किंवा इंग्रजीच घ्यावे लागे. त्या काळात उच्च शिक्षण घेतच नव्हते कुणी. आता घेत असतील, त्यांचे काय हाल असतील, ते त्यांनाच ठावे. 

आता मुस्लिम मराठी साहित्य संमेलने होतात. मी अशा एकाच संमेलनाला हजर होते. त्यात साहित्यावर कमी आणि मुस्लिम म्हणून काय परिस्थिती आहे याची रडगाणीच अधिक होती. त्यात कोकणाबाहेरील साहित्यिक अधिक होते. कारण कोकणाबाहेरील मराठी मुस्लिम बऱ्यापैकी मराठी माध्यमांत शिकणारे आहेत. उदा. सोलापूर, कोल्हापूर इत्यादी ठिकाणी.

माझे ते वेगळे या घेट्टो प्रवृत्तीमुळेही मुख्य धारेत सगळे येत नाहीत. त्याला सामाजिक मानसिकता ही अशी कारणीभूत ठरते. जर हे मुस्लिम मराठी मुस्लिम आहेत, तर त्यांचा नि उर्दूचा खरंतर काय संबंध? उर्दू कुठली पश्चिम उत्तरेकडची भाषा. महाराष्ट्रात काही संबंधच नाही खरं तर... त्यांनी मराठी माध्यमांतूनच शिकायला हवे. तर सामाजिक सलोखा, एकरुपता येण्यास अधिक मदत होऊ शकते. पण तसे झाले नाही, आणि होतही नाही.

२४-४-२३

Jul 31, 2021

डोंगरातील वस्त्या..

 

दर पावसाळ्यात दरडी कोसळून डोंगरकुशीतली गावं धराशायी होण्याच्या बातम्या येत असतात.

मग छोट्या टेकड्या, छोटे डोंगर यांच्या उतारावर का रहात असतील लोक?
दरड कोसळण्याच्या शक्यता असून?
त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी प्रत्येकवेळी सरकारची असते का? 

लोकसंख्या जबाबदार असते का? गरीबी जबाबदार असते का?

माझे गाव कोकणातील एक लहानसे गाव. चारी बाजूने डोंगर आणि मध्ये असलेल्या सपाटीवर शे-सव्वाशे घरांचे गाव. पक्क्या घरांचे. गरीब-श्रीमंत सगळ्यांची घरे जवळपास पक्की. पारंपरिक. 
कोकणातील इतर गावांप्रमाणेच जातीनिहाय विभाग.  ही गवळआळी, ही जंगमआळी, हा कुंभारवाडा, हा महारवाडा, हा मुस्लिम मोहल्ला. असं पारंपरिक गाव. 

माझ्या लहानपणापासून, किंवा त्याही आधीपासून गावात मुस्लिम लोकवस्ती थोडी अधिक होती. यातले मुस्लिम सगळे बोटीवर, गल्फ कंट्रीजमध्ये नोकरीला. भरपूर पैसा कमवणारे, सधन. हिंदू पारंपरिक व्यवसाय-शेती इत्यादी करत गावातच राहणारे. प्रमाणात हाता तोंडाची जेमतेम गाठ. शिक्षणाचे प्रमाण दोन्ही समाजात कमीच होते. दोन्ही समाजासाठी गावात सातवीपर्यंतच्याच शाळा होत्या. त्यांची उर्दू, यांची मराठी.
मुस्लिम वस्ती वाढत गेली आणि त्यांचा पैसाही. त्यांच्या वाढत्या वस्तीला जागा, घरं गावात कमी पडू लागली आणि त्यांनी हिंदूंना रग्गड पैशांची ऑफर देत त्यांची घरं खरेदी करण्याचा सपाटा चालवला. यात जबरदस्ती अजिबात नव्हती. पण आर्थिक ताकद काम करत होती. 
लाखालाखाच्या किंमतीत आपली घरं जातायत हे पाहून गरजू हिंदूंनी आपली घरं त्यांच्या हवाली केली. मिळालेले पैसे कनवटीला लावले आणि गावाजवळच्या डोंगराची वाट धरली. डोंगरावरची जमीन माळरान. सरकारी मालकीचे. तिथं त्या जागेवर अनधिकृत अतिक्रमण करत त्यांनी तिथे पुन्हा कच्ची पक्की घरं बांधली. आणि गाव सोडून जवळपास ऐंशी टक्के हिंदू डोंगरपठारावर राह्यला निघून गेले. 
आता हा डोंगर कधी घसरला, दरड बिरड कोसळली तर दोष कुणाचा? किती? कसा? हा प्रश्न उभा राहतो. 

एकाच गावात हे हिंदूच गरीब का राहिले? मुसलमानांप्रमाणे ते गल्फला का गेले नाहीत? कारण एक मुसलमान दुसऱ्या मुसलमानाला हाताला धरून तिथे नोकरी मिळवून देत होता. तसा तो हिंदू माणसाला नेत नव्हता. हे एक. नेलं असतं तरी हे हिंदू किती गेले असते आणि तिथल्या कष्टाच्या नोकऱ्या त्यांना किती झेपल्या असत्या हे दुसरं. इथं कौशल्य, गट्स, परदेशात टिकून राहण्याची, पडेल ते काम करण्याची क्षमता हे सर्व जर एका समाजाचे वैशिष्ट्य असेल, आणि दुसऱ्या समाजात नसेल, तर समता आणि समानता यांची अपेक्षा कशी धरायची?

जेही असो.
यात सरकाचा दोष किती? सरकारने त्यांना मदत करायला हवी का? का? कशी?

प्रत्येक ठिकाणी डोंगराच्या कुशीत अशा वस्त्या दिसतात. त्यांचीही कारणं अशीच काहीबाही असतील ना?

एकाच परीसरात राहून एक समाज प्रगती करतो. तर दुसरा अधोगती. गावातले स्थान, आपली पक्की घरं, पारंपरिक विरासत सोडून सगळे हिंदू डोंगराकडे परागंदा झाले त्याचं वाईटही वाटतं. रागही येतो आणि ज्याची जशी लायकी तसे त्याचे स्थान असेही वाटते. 

Jul 2, 2021

चिमण्या

 सैपाकघराच्या खिडकीत चिमण्यांसाठी फिडर लावलं. पण फिडर लावलं की लगेच चिमण्या येत नसतात. कधी कधी तर दोन दोन महिने येत नाहीत. त्या अदमास घेतात. घाबरतात. पण धीर ठेवून वाट पाहात राहिलो की एक दिवस दबकत दबकत हळूच एखादी चिमणी येते. मग दुसरी येते. 
मग बरेच दिवस या दोघीच येतात. यांना रोज बिनधास्त दाणे टिपताना पाहून मग बरेच दिवसांनी तिसरी येते. पण या दोघी तिला येऊ देत नाहीत. एकच कल्ला करतात आणि तिला हाकलून लावतात. त्यांचंही बरोबरच असतं. पहिली रिस्क त्यांनी घेतलेली असते, हे धान्याचं कोठार शोधून तिथे येण्याची. बसण्याची आणि जीवाला घाबरत घाबरत दाणे खाऊन बघण्याची. आता या मेल्या आयत्यावर रायतं करायला येणार का? हॅट आम्ही नाही येऊ देणार..
पण हळू हळू बाकीच्याही येतातच. भांडणं चालूच राहतात. आणि संधी मिळेल तसं एकमेकींना हुसकावत दाणे टिपणंही. अखंड चिवचिवाट... 
सैपाकघरातील ओट्याच्या अगदी समोर दोन फुटावर तो फिडर असल्याने सुरुवातीला माझी चाहूल ओट्यापाशी लागली की त्या भूर्रकन उडून जायच्या. जोपर्यंत आपण तिथून दूर होत नाही तोपर्यंत परत येत नाहीत. नंतर मात्र हळू हळू त्या आपल्या उपस्थितीला सरावतात. इथं धोका नाही याची त्यांना हळू हळू खात्री वाटू लागते. 
पण अजून एक वेगळीच गंमत आहे. 

मी जर खाली मान घालून माझं काम करत असेन ओट्यापाशी तरी त्या बिनधास्त चरत राहतात. येतात जातात भांडतात. पण मी त्यांच्याकडे नजर उचलून पाहिलं रे पाहिलं की लगेच भूर्रकन उडून जातात. मला फार आश्चर्य वाटायचं. हा काय प्रकार. अशा येतात. पण मी पाहिलं तर निघून जातात. फोटो देखील लपून छपून काढावे लागतात. जोपर्यंत मी नजर वर उचलून पाहत नाही तोपर्यंत त्या बिनधास्त असतात. मग मला असं लक्षात आलं की कदाचित माणसांचे डोळे पाहिल्यावर त्या घाबरत असतील. माणसाचे आणि त्यातही माझे ते भले मोठे काळे काळे डोळे पाहिले की त्या बिचकत असतील. कदाचित माणसांच्या डोळ्यांकडे त्यांचे लक्ष लवकर वेधले जात असेल. 

पण मला खात्री आहे, हळू हळू त्या माझ्या डोळ्यांनाही सरावतील. आणि मी त्यांच्याकडे एकटक बघत राहिले, तरी त्या बिनधास्त चरत बसतील. कारण, 
माझ्या माहेरी कोकणातल्या त्या मोठ्या घराच्या ओटीवर आजोबांनी एक मोठा, जवळपास दोन फुटाचा पत्र्याचा झोपाळा टांगला होता. चिमण्यांसाठी धान्य टाकायला म्हणून. चिमण्यांसाठीच स्वस्तातल्या भाताची एक दोन पोती घेऊन ठेवली जायची. त्यातले धान्य मूठमूठभर जाता येता घरातले कुणी ना कुणी टाकत राहायचे त्या झोपाळ्यात. आणि असंख्य चिमण्या यायच्या. आमची ओटी चिवचिवाटाने गजबजलेलीच असायची. जरा कुणी जवळ आले, ओटीपुढच्या अंगणातून कुणी जात असले, तर उडाल्यासारखं करून दुसऱ्याच सेकंदाला पुन्हा येऊन बसायच्या. तो झोपाळा चिमण्यांनी फुलून गेलेला असायचा. फक्त चार महिने. पावसाळ्यातले. पावसाळा संपला की त्या कुठे गायब व्हायच्या कोण जाणे. धान्य टाकलं तरी यायच्या नाही. आजोबा म्हणायचे आता त्यांना शेतात पडलेले दाणे मिळतात खायला. पावसात मिळत नाहीत. खरं खोटं कोण जाणे. 
दिवसभर चिमण्यांना भात, फक्त सकाळी एकदा छपरावर कबूतरांना ज्वारी, आणि समोरच्या रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या पथिकांसाठी ओटीवर, किंवा दुकानात भरून ठेवलेला पाण्याचा माठ ह्या आजोबांच्या पुण्याच्या कल्पना होत्या तेव्हा...!   



Dec 27, 2020

शाम्पू आणि उवा

 सहावी सातवीत असेन.
खेड्यावर वास्तव्य आणि लांब केसांच्या करकचून आईने बांधून दिलेल्या वेण्या. 
डोक्यात उवांचं वास्तव्य असायचंच. 
आई त्यासाठी नको नको ते उपाय करायची कुणी सांगेल ते.
काय काय उपाय केले अघोरी ते सांगायलाही लाज वाटतेय आता. प्रतिमेला धक्का बसेल.😝

आमच्या गावात मुस्लिम खूप. त्यांच्यापाशी इम्पोर्टेड वस्तू खूप. 
अगदी सुका मेवा, चॉकलेट्स पासून चाकू-सुऱ्या सगळंच परदेशी असायचं त्यांच्या घरात भरभरून. 
गल्फ किंवा बोटीवरची नोकरी करून सुट्टीत येताना चार माणसं डोक्यावर वाहायला लागतील इतकी मोठी ट्रंक भरून सामान ते लोक आणायचे. 
त्यात कमीत कमी शंभरेक झुळझुळीत साड्या. पाचपंचवीस इंपोर्टेड रंगीत नाजूक छत्र्या, परफ्युम्स, सुका मेवा, कटलरी, चॉकलेट्स, साबण, शाम्पू, तेलं अन अजून बरंच काही. 
आम्हाला त्यांचा अजिबातच हेवा नसायचा. साधारणपणे कसं असतं की आपल्या नात्यात, जातीत, मैत्रीत कुणी खूप श्रीमंत असेल, तर माणसाला त्यांचा हेवा अधिक वाटतो. पण एकदम परके, जात-धर्मातही नसलेले लोक श्रीमंत असले काय नि गरीब असले काय, माणसाला फारसा फरक पडत नसावा. तसंच काहीसं होतं ते. 
असो. तर विषय तो नव्हता. 
विषय होता आई माझ्या केसांतल्या उवांसाठी काय काय प्रयत्न करायची. पण त्या जाम चिकट होत्या. हटत नव्हत्या. 
एकदा ती माझ्या उवा काढत ओटीवर बसलेली असताना आमच्या दुकानात एक मुस्लिम चौदा पंधरा वर्षांचा मुलगा काही विकत घेण्यास आला. आम्हाला बघून तो आईला म्हणाला, 'आमच्या घरी उवांचं औषध आहे इम्पोर्टेड. आणून देऊ का तुम्हाला थोडं. ते हिच्या केसांना लावून केस धुवून टाका. सगळ्या उवा मरून जातील.'
आईने होकार देताच तो लगेच त्याच्या घरी गेला आणि एका बाटलीत त्याने  ते औषध आणून दिलं. अर्थात मूळ बाटलीतून थोडं दुसऱ्या साध्या बाटलीत काढून आणलं होतं त्याने ते. 
आईने दुसऱ्या दिवशी माझ्या केसांना ते चोपडलं. चिकट चिकट आणि सुगंधी होतं. अर्ध्या एक तासाने केस धुवायला घेतले, तर केसांत फेसच फेस. सुगंधच सुगंध...
मी आईला म्हटलं, "आई, हा तर शाम्पू." आई म्हणाली, "म्हणजे काय?"
तोपर्यंत कधी शाम्पू वापरला नव्हता. पण वाचला होता. म्हणजे वाचन चांगलं असल्याने शाम्पूबद्दल माहिती होती. 
मग आईला सांगितलं की तो लिक्विड साबण येतो हल्ली केस धुण्यासाठी. तो आहे हा. उवांचं औषध बिवशध काही नाही हे. 
आमचं किराणा मालाचं दुकान. दुकानात कपडे धुण्याचा ५०१ साबण विकायला असे. आंघोळीचा साबण देखील विकायला नसे, तर शाम्पूचा काही प्रश्नच नव्हता. घेणार कोण विकत? जे गिऱ्हाईक होतं ते गरीब हिंदू होते. मुस्लिम तर सगळं बाहेरूनच आणत. 
आम्ही सगळे ५०१ कपडे धुण्याच्या साबणानेच आंघोळ करत असू. नि आजी तर धुण्याच्या सोड्याने केस धूत असे दर आठवड्याला. तरी तिचे केस वयाच्या ७२व्या वर्षी ती वारली तोपर्यंत काळेभोर होते. अन मला पुढे कॉलेजला गेल्यावर मैत्रिणी विचारायच्या, की तू काय लावतेस, तुझी स्कीन इतकी छान कशी दिसते?😂
बाबा तर साबणच लावायचे नाहीत. नुसतंच गरम पाण्याने अंग चोळून घ्यायचे. 
आणि घरात सगळे केवड्याची कांती असलेले गोरेपान. कुणाला साधा पिंपल देखील चेहऱ्यावर आला नाही. अशी मख्खन त्वचा सगळ्यांचीच.

तात्पर्य - साबण शाम्पू तेलं सर्व काही भ्रम आहे, मिथ्या आहे... आपले ओरिजिनल अवयव हेच सत्य आहे. 😂

आणि हां... त्या उवा... त्यांनी पिच्छा पुरवला लग्न होईपर्यंत. लग्नानंतर दोन तीन वर्षांनी मी केस पूर्ण कापून शोल्डर कट केला. केस मोकळेच राहू लागले नि अशा मोकळ्या तेलविरहीत रेशमी केसांतून उवांचे पाय सरकून त्या पडू लागल्या. ही जमीन काही आता आपल्या कामाची नाही म्हणत त्या निघून गेल्या कायमच्या... 😍

ते आमच्या वेळी लांब केस, नि त्याच्या घट्ट दोन वेण्या, रिबिनी, तेल लावून चपचप... हे सगळंच खरंतर उवांना आमंत्रण होतं. पण मुलींच्या सौंदर्याबाबतच्या भ्रामक कल्पना सर्वच काळात असतात. तशा त्या तेव्हाही होत्या. मुलींचे लांब केस, त्यांच्या घट्ट वेण्या, रिबिनी, मोठाले अंबाडे हे सगळं सौंदर्याच्या संकल्पना होत्या. एखादीचे बिचारीचे केस जरा तोकडे असतील, तर तिला खंत असायची. आता तो प्रकार तरी राहिला नाही हे बरंच झालं. 

तात्पर्य - उवांवर एकच उपाय - केस कापून तोकडे करून टाकणे.

Dec 26, 2020

तोहफे और यादें....बरसों से है आज भी वही..

 वर्ष 1991-92

प्रसंग १ - Marriage anniversary. तिसरं किंवा चौथं वर्ष.
Gift - कोसा प्युअर सिल्क.. ओरिजिनल कोसा रंग, प्लेन मोतिया रंगाची सोबर साडी आणि बारीक भरतकाम केलेला पदर आणि किनार...
आणि 'लागू बंधू मोतीवाले'यांच्याकडून घेतलेल्या कल्चर्ड मोत्यांच्या पारंपरिक किलवर कुड्या.
कोसा म्हणजे काय हे मला माहित नव्हतं. साड्यांमधलं, कपड्यांमधलं फार कळत नव्हतं तेव्हा. नवरा म्हणाला कोसा सिल्क घेऊ तुझ्यासाठी. आणि त्याकाळच्या पद्धतीप्रमाणे खरेदीसाठी डोंबिवलीहून दादर मार्केटला गेलो. सर्व दुकाने फिरूनही कोसा सिल्क सापडत नव्हती. मी तर पाहिलीच नव्हती कधी. पण नवऱ्याच्या सांगण्यावरून तिथले साड्यांसाठी प्रसिद्ध असलेले दुकानदार साड्या दाखवत होते. पण त्याच्या काही त्या मनास येत नव्हत्या. "अहं, ही नाही, ती नाही" करत 'रंगोली' या दुकानात आलो. तिथे तुफान गर्दी होती. कोसा म्हटल्यावर तिथल्या एका सेल्समनने सांगितलं. थांबा थोडं. एक दोन पीस आहेत. आत गोदामात. मी आणून दाखवतो.
समोरचं गिऱ्हाईक आटपून तो आत गेला. काही वेळाने दोन तीन साड्या घेऊन आला. तीच ही साडी. बघताक्षणीच नवरा म्हणाला, हीच ती. आणि बघताक्षणीच मी त्या साडीच्या प्रेमात पडले. चमकदार मोतिया रंगाची प्लेन साडी, फक्त नाजूक भरलेली किनार आणि तसाच नाजूकसा भरलेला पदर... किंमत ११५०/- १९९२ साली. म्हणजे आता साडे अकरा हजारच धरून चाला कमीतकमी. कारण तेव्हा डोंबिवली स्टेशनला जाण्यासाठी शेअर रिक्षा माणशी एक रुपया घेत होत्या फक्त. आता दहा रुपये घेतात.
हा कोसा म्हणजे रेशमाचा एक विशिष्ट प्रकार. विशिष्ट रेशमाच्या किड्यांपासून तयार झालेला. त्याचा ओरिजिनल रंग हाच. पिवळसर. मोतिया. काहीशी सोनेरी झाक असलेला. बहुधा मध्यप्रदेश, छत्तीसगड येथील जंगलात मिळत असावा. किंवा तयार होत असावा. या कापडाचे पुरुषांना कुर्ते देखील फार छान दिसतात.
खूप नेसले ही साडी. खूप आवडायची. माझा स्कीन कलर आणि हिचा कलर एकरूप होऊन जायचे. आता विरलीय थोडी एका जागी. मात्र अजूनही इस्त्री केली की तीच चमक पुन्हा जैसे थे येते. या साडीवर मोत्याचे दागिने अफलातून उठून दिसतात.
त्याच वर्षी मोत्याच्या कुड्या केल्या. 'लागू बंधू मोतीवाले' हे नाव जाहीरातीत वाचत होतो. माझ्या एका दूरच्या जावेने सांगितले, की त्यांच्याकडचे मोती, हिरे आणि दागिने अभिजात असतात.
आज 'लागू बंधू' यांच्या ठिकठिकाणी शाखा दिसतात. तेव्हा मात्र दादरला एकच होती. कबुतरखान्याजवळ. एका जुन्या ईमारतीत वरच्या मजल्यावर एका छोट्याशा, साध्याशा गाळ्यात. शोधत शोधत गेलो. तेव्हा मोबाईल तर दूरच पण साधे फोनही नव्हते अजून.
त्यांनी डिझाईन दाखवले. हे पारंपरिक किलवर डिझाईन आम्ही पसंत केले. एका मोत्याची किंमत तेव्हा काहीतरी शंभर शंभर रुपये होती. दोन्ही कानात मिळून सहा मोती. आणि सोन्याची किंमत वेगळी. त्यांनी सांगितले की आमचे मोत्याचे दागिने कर्नाटकात जातात घडवण्यासाठी. मोती बांधण्याचे काम तिथेच होते. ते बनून यायला दोन महिने तरी लागतील. तोपर्यंत तुम्ही येऊ नका. कुड्या आल्या की आमचे तुम्हाला पत्र येईल. पत्र आले की मग या. कारण पुन्हा तेच. फोन नव्हते.
त्याप्रमाणे दीड दोन महिन्यानी त्यांचे पत्र आले. आम्ही गेल्यावर आमच्या हातात त्या पाणीदार कुड्या ठेवत ते म्हणाले, 'तुम्ही वापरून कंटाळाल, पण या कुड्यांना वर्षानुवर्षे काहीही होणार नाही.
अगदी तसंच झालंय. आजही या कुड्या तशाच्या तशाच पाणीदार आहेत. त्यावरचे मोती तसेच आहेत. सोनं, त्यात बसवलेले बारीक माणिक तसेच आहेत. तेव्हा नवऱ्याला पगार होता जेमतेम अडीच तीन हजार फक्त ! त्यातल्या निम्म्याची त्याने मला साडी घेतली नि निम्म्याच्या कुड्या ! कट टू प्रसंग २ - वर्ष १९८७
माझा वाढदिवस - लग्नाच्या आधी आम्ही प्रेमात होतो. घरच्यांनी लग्नाला संमती दिली पण अजून त्याच्याबरोबर कुठे जायचं म्हटलं तर नकारच असायचा, अशावेळी एक दिवस घरी न सांगताच माझ्या वाढदिवसाला कोकणातून सकाळच्या एसटीने आम्ही दोघे मुंबईला आलो. तिथून तो मला पेडर रोडवरील ब्रीच कॅन्डीजवळील सुप्रसिद्ध 'अमर सन्स' या दुकानात घेऊन गेला होता. मला तर ते दुकान ऐकूनही माहीत नव्हते. तिथे मणीपुरी कोटा सिल्क साडी त्याने मला घेऊन दिली. अतिशय सुंदर मजेंटा कलर. किंमत साडेचारशे रुपये. साल १९८७. साडी घेऊन लगेच मुंबई सेन्ट्रलला येऊन परत एसटी पकडून रात्री आठपर्यंत कोकणातल्या घरी!
नवऱ्याची आवड क्लासिक आहे. त्याला बरोबर कळतं की मला काय चांगलं दिसतं. आजही वेस्टर्न असो वा पारंपरिक, कपडे आणि दागिने त्याच्या मदतीशिवाय मी खरेदी करू शकत नाही. मला अजूनही त्याच्यातलं काही कळत नाही.
जेव्हा जेव्हा त्याला बरोबर न घेता, किंवा त्याचा सल्ला न मानता मी काही खरेदी केली ती नेहमी फसलेली आहे.







Dec 12, 2020

फुकटच्या अस्मिता - आणि मालवणी हिसका

 माझ्या नवऱ्याचा एक गावठी मित्र आहे. म्हणजे विदर्भातल्या गावाकडे राहणारा. चांगला इंजिनिअर आहे. बारा गावं फिरलेला आहे. पण मानसिकता मागास आहे.

तो नेहमी वैदर्भियन बोली भाषेतच बोलतो. कधी कधी माझ्यासारखी शहरी बाई बोलणारी समोर आली की अजून मुद्दामच वऱ्हाडी भाषेत बोलतो. चांगली मराठी येत असतानाही.
परवा त्याचा फोन आला.
अर्थात मला नाही, माझ्या नवऱ्यालाच.
पण नवरा फोन घरी ठेवून जरा बाहेर पडला होता.
फोन मी उचलला.
आयती त्याच्या तावडीत सापडले.
याचं झालं वऱ्हाडी भाषेत सुरू. परत मध्ये मध्ये विचारणं, चालेल ना मी वऱ्हाडीत बोललो तर..
मी सभ्यपणे म्हटलं, हो बोला, मला येत नसली तरी समजते.... पण मनातून चिडले होते. मी जर याला म्हटलं असतं, 'चालेल, तू बोल वऱ्हाडीत, मी मालवणी कोकणीत बोलते तुझ्याशी.. चालेल ना... रांxxxx... शिरा पडली तुझ्यार त्या.......'
😆😆😆
तर काय झालं असतं त्याचं....
कशाला लोक असं करतात. प्रमाण मराठी येते ना. तीच बोला ना इतरांशी बोलताना. वऱ्हाडी आला समोर तर वऱ्हाडी बोला, मालवणी आला, तर मालवणी बोला. उगाच चाळे कशाला करता? मला उत्तम कोकणी मुसलमानी मराठी येते, म्हणून ज्याच्या त्याच्यासमोर त्या भाषेत बोलू का मी?
Like
Comment

Dec 9, 2020

शेतकरी आंदोलनासंदर्भात जाणून घ्या काही गोष्टी -

 

शेतकरी आंदोलनासंदर्भात मी सरकास्टीक पोस्ट्स खूप टाकल्या. पण आता जरा गंभीर -
अर्थात त्या सरकास्टीक पोस्ट्स देखील आशयातून गंभीरच होत्या.
पण..
मी साधारण गेली दीड दोन वर्षे ‘किसानपुत्र आंदोलन’ या महाराष्ट्रातील शेतकी विषयक आंदोलनाच्या थोडीफार संपर्कात आहे.
मी स्वतः शेतकरी नाही. शेतीशी माझा काहीही संबंध नाही. तरीही या किसानपुत्र आंदोलनाच्या संपर्कातून मला काही गोष्टी कळल्या. मी अभ्यास केला असे मी म्हणणार नाही. पण काही गोष्टी जाणून नक्की घेतल्या.
मला असे वाटते की सध्या चालू असलेल्या देशातील हमीभाव आणि बाजारसमितीसंदर्भातल्या आंदोलनाला पाठींबा दर्शवताना, किंवा विरोधही करताना, त्या आधी या किसानपुत्र आंदोलनाची माहिती, त्यांचा हेतू, त्यांची कळकळ सर्वांनी आधी जाणून घ्यावी व मगच आपली भूमिका ठरवावी.
अमर हबीब सारख्या प्रामाणिक आणि गेली अनेक वर्षे शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या आदरणीय व्यक्तीने शेतकरी विरोधी कायदे या नावाची प्रश्नोत्तर स्वरुपात पुस्तिका लिहिलेली आहे. ती त्यांनी आज लिहीली नाही. छापील स्वरुपात मी ती जवळपास दोनेक वर्षांपूर्वीच वाचलेली आहे.
यात -
१. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमुख कारण कोणते?

२. कायदे लोककल्याणासाठी असतात मग शेतकरीविरोधी कायदे कसे?

३. संविधानातील परिशिष्ट ९ ही काय भानगड आहे?

४. कोणकणत्या घटनादुरुस्त्या शेतकरीविरोधी आहेत?

५. शेतकऱ्यांसंबंधीचे कोणकोणते कायदे शेतकरीविरोधी आहेत?

६. सिलिंग कायद्याला विरोध का आहे?

७. सिलिंग कायद्याचे नेमके स्वरुप काय आहे?

८. हा कायदा पक्षपात करतो ते कसे?

९. सिलिंग कायद्याचा उद्देश्य जमिनदारी संपविणे हा नव्हता काय?

१०. सिलिंग कायदा करण्यामागे काय हेतू असावा?

११. भुमिहिनांना जमिनी वाटप करण्यास विरोध आहे का?
१२. सिलिंग कायदा उठला तर भांडवलदार येऊन छोट्या शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेऊन संसार उघड्यावर पडतील त्याचे काय?

१३. सिलिंग कायदा उठल्याने शेतकऱ्यांचा काय फायदा?

१४. शेतकऱ्यांनी शेतरी करायचे सोडायचे काय?
१५. शेतीतून लोक बाहेर पडले तर शेती कोण करेल?

१६. सिलिंग कायदा रद्द करणे सरकारला राजकीय दृष्ट्या परवडत नसेल तर मधला मार्ग कोणता?

१७. जगातील अन्य देशांमध्ये जमीनधारणेची परिस्थिती कशी आहे?

१८. वारसा हक्काच्या कायद्यात काही बदल व्हावा का?

१९. जीवनावश्यक वस्तू कायद्याची पार्श्वभूमी काय आहे?
२०. आवश्यक वस्तू कायद्यात कोणत्या वस्तूंचा समावेश केला आहे?

२१. आवश्यक वस्तू कायद्यातून शेतीमाल वगळला तर?

२२. आवश्यक वस्तू कायद्याचा शेतकऱ्यांवर काय परिणाम झाला?

२३. या कायद्यात अन्य वस्तूही आहेत, त्यांच्यावर काय परिणाम झाला?

२४.जगातील अन्य कोणत्या देशांत असा कायदा आहे का?
२५. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी केली तर शेतकऱ्यांच्या समस्या सुटतील का?

२६. भूमी अधिग्रहण कायद्याची पार्श्वभूमी काय आहे?

२७. युपीए व एनडीए सरकारांनी भू-संपादन कायद्यात केलेल्या दुरुस्त्या शेतकऱ्यांच्या बाजूने आहेत का?
२८. भू-संपादन कायद्यावर आक्षेप काय आहेत व सूचना काय आहेत?

२९. भारतीय संविधान बदलायला हवे का?

३०. शेतकरीविरोधी कायद्यांना नेमके कोण जबाबदार आहेत?

३१. कोणत्या कायद्याचा, कोणत्या पिकाच्या शेतकऱ्यावर, कसा परिणाम झाला?

३२. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांपेक्षा बेरोजगारांच्या आत्महत्या जास्त होत आहेत, अशी आकडेवारी पुढे आली आहे, त्याबद्दल तुमचे मत काय आहे?

३३. शेतकरीविरोधी कायद्यांविरुद्ध न्यायालयात का जात नाहीत?

३४. हे कायदे रद्द व्हावे यासाठी किसानपुत्र आंदोलनाची भूमिका काय आहे?

३५. किसानपुत्रच का?

३६. किसानपुत्र आंदोलनाची वाटचाल कशी आहे?

३७. किसानपुत्र आंदोलनात सहभागी व्हायचे असेल तर काय करावे लागेल?

अशा सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील. ती जरूर वाचा, नंतरच आपली भूमिका ठरवा. जर तुम्हाला ही पुस्तिका हवी असेल, तर अमर हबीब यांच्या परवानीने मी तुम्हाला त्याची सॉफ्ट कॉपी ई-मेल करू शकेन. अथवा ८४११९०९९०९ या क्रमांकावर तुम्ही त्यांनाच फोन करूनही मागवू शकता. आणि तुमच्या शंका त्यांना विचारू शकता. अर्थात शंका आणि त्या विचारण्यामागचा हेतू प्रामाणिक असेल तरच.
देशातील सर्व भागातल्या शेतकऱ्यांच्या समस्या काही कॉमन आहेत, तर काही वेगवेगळ्या. कायद्याने कॉमन आहेत, तर पिकं, जमिन, पाणी इ. नुसार वेगळ्या. त्यामुळे सरसकट सगळ्यानाच पाठींबा देता येणार नाही किंवा विरोधही करता येणार नाही. कुठलेही सरकार एवढ्या मोठ्या संख्येत असणाऱ्या शेतकऱ्यांचे वाईट करून निर्णय घेऊ शकणार नाही. एक भांडवलदारापेक्षा अनेक सर्वसामान्यांच्या जोरावर सरकार निवडून येत असते. असे मला वाटते. त्यामुळे मोदी सरकारही शेतकऱ्यांचे वाईट करण्यासाठी कोणता निर्णय घेऊन स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेईल असे वाटत नाही. मात्र कुणीतरी वाईटपणा घेऊन कठोर निर्णय घेतले तरच शेती आणि शेतकरी सुधारतील. गुडी गुडी वागून जैसे थे परिस्थिती बदलत्या काळानुसार फार काळ ठेवता येणार नाही.

सध्या एक डिसेंबर ते १०  डिसेंबर या काळात या किसानपु्त्र आंदोलनातील सदस्यांचं ऑनलाईन शिबीरही झालं. मला शक्य झालं तितकं मीही सहभाग घेतला. 
किसानपुत्र आंदोलनाचा फेसबूक ग्रुप, फेसबूक पेजही आहे. तुम्ही तिथे सहभागी होऊन शेतकऱ्यांच्या समस्या, मागण्या, कायदे जाणून घेऊ शकता. 
निदान काही शेतकरी या कायद्यासाठी आंदोलन करत असताना काही या कायद्याविरोधात का आहेत हे तरी सर्वसामान्यांनी जाणून घेऊनच मग त्यावर बोलायला हवे. केवळ शिवाजी महाराज म्हटलं की जय म्हणायचं, नि शेतकरी, कामगार म्हटलं की सहानुभूती दाखवायची अशा वरवरच्या भावनांना अर्थ नाही.
  
अर्थात ज्यांना शेतकऱ्यांच्या आडून आपले राजकारणच करायचे आहे, नि आपआपले अजेंडेच पुढे करायचे आहेत त्यांच्यासाठी ही पोस्ट नाही.  

Dec 3, 2020

समाजवादी कावा -

महाराष्ट्रातले अनेक शेतकरी शेती कायद्यातल्या बदलावर खुश आहेत. त्यांना शेती समाजवादी कचाट्यातून पूर्ण मुक्त व्हावी असेच वाटतेय. ते कायदे रद्द व्हावेत म्हणून ते धडपडतायत.
आणि लेखक, विचारवंत विरोधात 🤦‍♀️ खरंतर यांना विचारवंत कितपत म्हणायचं हा प्रश्नच आहे.
ही पुरस्कारवापसी गॅंग पुन्हा सक्रीय झालेय. शेतकऱ्यांच्या विरोधात.
यांना मोदी विरोध करायचाय.. शेतीशी काही देणं घेणं नाही नि शेतकऱ्यांशी नाही. नवरा मेला तरी चालेल, पण सवत विधवा झाली पाहिजे ही यांची वृत्ती.
पंजाब मधील शेतकऱ्यांवर ( की दलालांवर?) थंड पाण्याचा मारा झाला म्हणून यांच्या लेखण्यांना कापरं भरलंय. पण आये दिन शेतकरी आत्महत्या करतो त्याची कारणे शोधायची नाहीत.. कमीत कमी शेतकी कायदे, याच्या समर्थनार्थ असलेल्या शेतकऱ्यांचे म्हणणे, विचार ऐकून घेणे, समजून घेणे एवढं करून मग हे विरोध करू लागले असते, तर समजू तरी शकतो. पण केवळ मोदीविरोधात जायला मिळतंय म्हणून एकही संधी सोडायची नाही नि भांडवलशाहीविरोधात गळे काढायचे. त्यात शेतकरी मेला तरी यांना सोयरसुतक नाही.
यांना शेतीमालाचे भाव वाढतील याची काळजी पडलेय. शेतकऱ्यांना चार पैसे मिळतील याचा आनंद नाही..यांना स्वस्त धान्य मिळावे म्हणून शेतीचे भांडवलीकरण नकोय यांना.. यातल्या कितीजणांना अर्थकारण कळतंय? किती जणांना शेतकऱ्यांचे खरे प्रश्न कळलेत?त्यांच्या समस्या माहीत आहेत? लेखणी चालवता येते नि चार पुस्तकं प्रकाशित झालीत एवढ्याच जोरावर राजकारण करत सुटायचं? सरकारी धोरणांचा विरोध जरूर करावा. मला बीजेपी नि कॉंग्रेस की अजून कोणता पक्ष, त्यांच्याशी काहीही देणंघेणं नाही. पण विरोध करताना त्यातलं भलंबुरं काही बघावं की केवळ आपलंच रेटावं? कोणत्याही शेतकऱ्याला ठराविक एकराच्या वर जमीन घेता येत नाही, शेती करायची नसेल, तरी विकता येत नाही असे कायदे आहेत, याचा तरी यापैकी किती जणांना पत्ता आहे?
गरीब शेतकऱ्यांची शेतीतून सुटका होऊ नये, तो तिथेच पिचून मरावा यासाठी हे संघटित होत आहेत. राजकारण करायला.
शेतीचा शही जाणून ना घेता केवळ आपला समाजवादी मुखवटा सतेज रहावा म्हणून ते शेतकऱ्यांच्याच विरोधात लेखण्या परजू लागलेत.. यात मग 'मला कवी म्हणा, 'मला सााहित्यिक म्हणा' वाले हौशे, नवशे, गवशे देखील सामील होऊन जातात. समाजवादी यात्रेत मिरवायला. कारण साहित्याच्या जगतात टिकून राहायचं तर सगळ्यांनाच हा समाजवादी मुखवटा चेहऱ्यावर बांधूनच राहावं लागतं. तो नाही धारण केला, तर तुम्ही जातीयवादी, धर्मवादी, भांडवलशाहीवादी, मानवताविरोधी, भक्त, संघी वगैरे वगैरे म्हणून शिताफीने तुम्हाला वाळीत टाकलं जाऊ शकतं. घरात हे लोक कामवाल्या बाईचेही खाडे कापतील. पण बाहेर गोरगरीबांबाबत कळवळे दाखवतील. लिहायला काय जातंय ? दांभिक वृत्ती असली की लेखन एक आणि कृृती एक सहजपणे करता येऊ शकते. ---
शेतीमालाचे भाव वाढायलाच हवेत. देशात सर्वात काय स्वस्त असेल तर तो शेतीमालच आहे. परवडत नसेल, तर मुलं, पुढची पिढी जन्माला घालताना विचार करा. लाखो रुपयांची शिक्षणं परवडतात, लाखो रुपयांची घरं परवडतात, गाड्या परवडतात, मोबाईल नि त्यातले नेट परवडते, नि कांदा दहा रुपयांनी वाढला तर परवडत नाही? आज घरकाम करणाऱ्या बायांकडेही टिव्ही असतो, फ्रिज असतो, मोबाईल असतात. नि सोसायटीचा केर काढणाऱ्या लोकांकडेही. पण त्यांना कांदा परवडत नाही? समजा नसेलही परवडत तर दोन, चार किंवा एक मुलही जन्माला घालताना विचार करावा लागेल त्यांना. तेवढं न कळण्याइतपत अडाणी आता कुणीच राहिलं नाही. केवळ अन्नधान्य स्वस्ताई आहे, रेशनिंगवरही मिळतं म्हणूनच मुलं जन्माला घातली जातात बिनधास्त. वर चोच देतो तो चारा देतो ही शिकवण. चोच देतो तो चारा देत नाही. इथले समाजवादी कायदे शेतकऱ्याची अडवणूक करून तुम्हाला चारा देतात. शेतकरी तुमची मुलं फुकटात पोसण्यासाठी नाहीत.
चार मुलं मलाही आवडत होती. पण त्यांना चांगलं जीवन देऊ शकणार नाही हे मला माहीत होतं. म्हणून मी जन्माला घातली नाही. हे जे शेतकी कायदे रद्द करण्याला विरोध करतात, त्यांनीही नाही घातली. त्यांनी एकच मूल जन्माला घालावं नि अमेरिकेला पाठवावं. शेतकऱ्यांनी आणि त्यांच्या पोराबाळांनी मात्र इथं गरीबांची मुलं पोसण्यासाठी शेतीत मरावं. अशी अपेक्षा. ---- जाता जाता - बिल्कीस दादी इतक्या म्हातारपणातही मोर्च्यात सामील झाली म्हणून तिचं कौतुक ? आणि मोदीची आई बँकेच्या रांगेत उभी राहीली तर मोदी नालायक?
आता म्हातारपणाचं भांडवल कोण करतंय आपल्या स्वार्थासाठी? तुमच्यात नि त्यांच्यात रत्तीभर फरक नाही. असता तर सर्वसामान्य तुमच्या पाठीशी उभे राहिले असते.

Dec 2, 2020

भारतीय दांभिक, उपाशी, वखवखलेली विकृत संस्कृती-

 भारतीय संस्कृतीचा डांगोरा मोठा पिटला जातो. 
पण ही संस्कृती अतिशय विसंगत, दांभिक आणि विकृत संस्कृती आहे.
इथं अध्यात्म, नीती-अनीती, पाप-पुण्य याच्या कल्पना विचित्र आहेत. 
विशेषतः स्त्री-पुरुष संबंधांबाबत ही संस्कृती गंडलेली आहे. 
इथं मंदिरांवर संभोगशिल्पे आहेत. त्यात ऍनिमल पॉर्नपासून गॅंगबॅंगपर्यंतच्या सर्व सेक्स कल्पना आणि भावना चित्रीत आहेत. 
मात्र तरीही इथं सेक्सकडे गलिच्छ नजरेने पाहिलं जातं. 
मुलं तिशी-चाळीशीत आली तरी लग्नाआधी सेक्स करण्याला जाहीर मान्यता नाही. त्यांना चोरूनच भेटावे लागते. लग्न होईपर्यंत मुलीला सेक्सबद्दल काहीही माहिती नसणं हे तिच्या मुर्खपणाचं द्योतक असायला हवं, परंतु तसं न होता अशा मुलीला पवित्र, निरागस इत्यादी समजून खुश होणारे तिच्यासारखेच मुर्ख तरूण अजूनही या देशात बहुसंख्येत आहेत.
भारतात सेक्स म्हणजे फक्त पोरं काढण्याचं माध्यम समजलं जातं. त्यातही मुलं झाली, की निदान महिलेला तरी सेक्स कशाला हवा, किंबहुना तिला तो नकोच असतो, किंवा नसावाच अशा फुल टू अपेक्षा भारतीय समाजात असतात. 

मध्यंतरी स्टेशन परीसरातून मी एकदा जात होते. तिथे एक चाळीशीतली तरुणी आणि तिचा बारावीतला मुलगा, हे दोघे मिळून तीन चार पंचविशीतल्या तरुणांशी भांडताना दिसले. भांडण हमरीतुमरीवर आले होते. मी स्कूटरवर होते. मला वाटले की त्या बाईला ते तरूण त्रास देत आहेत. मी स्कूटर एका बाजूला लावून उतरले. भवताली गर्दी होती. पण कोणीही मध्ये पडत नव्हते. ती बाई धावून धावून त्या मुलांपैकी एकाला मारायला जात होती. बडबड करत होती. अर्थात मी तिच्या बाजूनेच होते. काही माहीत नसल्याने. मी तिला जरा एका बाजूला धरून विचारले. काय झालं?
आता हतबुद्ध होण्याची पाळी माझी होती. मला ती बाई म्हणाली, हा एका मुलीला स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर किस करत होता. सगळ्यांच्या समोर. यांना काही लाजा नाहीत का? लहान मुलं वगैरे बघतात इत्यादी इत्यादी..
मी म्हटलं ते जर राजीखुशीने करत असतील, तर त्यात आपला काय संबंध? तो जर त्या मुलीवर जबरदस्ती करत असेल, तर मध्ये पडणं ठिक. पण जर ती मुलगीही त्याची गर्लफ्रेन्ड असेल, नि राजी खुशीने त्याच्याबरोबर असेल, तर त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे. पण ती बाई संस्कृतीच्या नावाने पेटली होती. शेवटी तो मुलगा आणि त्याचे दोन मित्र हे मारामारीवर उतरले. रिक्षातून रॉड काढू लागले. मी त्या मुलाला समजावलं. त्याच्या रिक्षात बसलेल्या मित्राला समजावलं, की याला घेऊन निघून जा. त्या बाईच्या नादाला लागू नका.
आईशप्पथ सांगते, जर मी मध्ये पडले नसते, तर त्या बाईने नि तिच्या बारावीतल्या मुलाने त्या दिवशी मार खाल्ला असता. शिवाय लोक तिच्याच बाजून राहिले असते. कारण एक मुलगा आणि मुलगी राजीखुशीने सार्वजनिक जागी किस करत असतील, तरी यांची संस्कृती बुडते. 
हीच बाई आणि हाच तिचा मुलगा, रस्त्यात कुणाला थुंकताना पाहून, कचरा टाकताना पाहून त्याला जाब विचारते झाले नसते. गपगुमान तिथून गेले असते. 
कारण भारताच्या रस्त्यावर हगणं, मुतणं, कचरा टाकणं, थुंकणं हे सगळं केलेलं चालतं. मात्र कुणी प्रेम केलेलं चालत नाही. इथं बलात्कार आए दिन होतात. तशी पार्श्वभूमी घरात असते. वर्चस्वाची. तेव्हाच तिथे बलात्कारी पैदा होतात. मात्र प्रेमाची पार्श्वभूमी कोणत्याच घरात सहसा नसते. मुलीशी बोलायचं नाही, मुलांशी बोलायचं नाही. हे असले संस्कार चांगले संस्कार म्हणून ओळखले जातात. 
आजही मी जेव्हा माझा मित्र म्हणून मी एखाद्याचा जाहीर उल्लेख करते, तेव्हा शेकडा नव्वद टक्के लोकांच्या, त्यातही महिलांच्या नजरा अधिक बदलतात. बाईला मित्र कसा काय असू शकतो? त्यातही माझ्याएवढ्या मोठ्या बाईला?.. मी काय आता कॉलेजला जाणारी मुलगी आहे का मला मित्र असायला? 
ही परिस्थिती मुंबईसारख्या शहरात आहे. तर भारताच्या इतर राज्यांत आणि छोट्या गावांमध्ये तर विचारायलाच नको. 
स्त्री पुरुष, तरुण-तरुणी प्रेमासाठी, सेक्ससाठी इथं चोरून भेटतात. घरांमधून जागा नसतात.  बाहेर भेटलं की समाजाला चालत नाही. अनेकदा अशा गावाबाहेर, एकांत जागी चोरून भेटणाऱ्या तरुणतरुणींना, स्त्री-पुरुषांना इतर उपाशी, वखवखलेले तरूणच मागावर राहून त्रास देतात. ब्लॅकमेल करतात. कारण इथं प्रत्येक तरुण उपाशी आहे. त्याला प्रेम करायला, भिन्नलिंगी मैत्री करायला, त्यांच्याबरोबर जाहीर रित्या भटकायला, परवानगी नाही. किंवा  त्याची स्वतःचीच एखाद्या मुलीबरोबर निखळ मैत्री असण्याएवढी त्याची लायकी नाही. पात्रता नाही. कारण पुन्हा तेच. घरीदारी असलेल्या स्त्रीपुरुष मैत्रीबाबतच्या दांभिक कल्पना. एखाद्या मुलीबरोबर एखादा तरुण दिसला, किंवा उलटही तर लगेच त्याच्या घरी जाऊन सांगण्याचे परमपुण्य काम मागच्या पिढीतले उपाशी ढुढ्ढाचार्य करत असतात. पोलिस देखील अशा तरुणतरुणींना त्रास करतात. दंड करतात. 

थोडक्यात इथली तरुण पिढी देखीलउपाशी आहे, नि प्रौढ पिढी देखील. पण बोलू शकत नाही. कारण त्याच्यावरही संस्कार नावाच्या च्युतियापाचे ओझे असते. मग इथला पुरुष बलात्कार करतो, ते जमलं नाही तर गर्दीत सापडलेल्या बाईच्या अंगाला नको तिथे स्पर्श करतो, धक्के मारतो, चिमटे काढतो. एखादी बरी बाई दिसली की तिच्याकडे एकटक उपाशी नजरेने बघत बसतो. इथं लहान लहान मुलींवर लैंगिक अत्याचार होतात, शरीरविक्रयाचे पाच रुपयांपासून ते पाच लाखांपर्यंतचे सौदे होणारे बाजार भरभरून वाहतात. तिथं पोरी पळवून आणल्या जातात, विकल्या जातात, या उपाशी भारतीय पुरुषांची वखवख शमवण्यासाठी त्या मुलींवर अमानुष अत्याचार केले जातात. त्याचं वैषम्य वरील उदाहरणातील बाईपासून कोणालाच वाटत नसते. त्यावर कुणी बोलत नसते. कारण देवदासीसारख्या प्रथा या आपल्याकडे धर्म आणि संस्कृतीच्या नावावर जाणीवपुर्वक तयार केल्या गेल्या आहेत.

इथं अजूनही बाई म्हणजे, 'माझ्या घरची ठेवायची झाकून, नि दुसऱ्याची बघायची वाकून' अशी वस्तू समजली जाते.

मला असा प्रश्न पडला, की वरील उदाहरणातील बाईचा मुलगा आता कॉलेजला जाईल, उद्या शिकण्यासाठी अमेरिका, युरोपला जाईल. तिथे तर सर्रास खुलेआम तरुण तरुणी एकमेकांच्यात हरवून बसलेले दिसतात. ठायी ठायी. अगदी एकमेकांच्या मांडीवर बसलेले असतात, एकमेकांच्या अंगावर पडलेले असतात. हगिंग, किसिंग सर्वांच्या समोर, सर्वांना विसरून सुरू असते. तिथे लहान मुलेही असतात. तरुणींच्या अंगावर वीतभर चड्डी नि अर्धा वीत कुडता असतो. पण या जोडप्यांकडे कुणीही ढुंकून बघत नाही. त्यांना त्रास करण्याचे तर दूरच. पण त्यांच्याकडे बघत बसणे हे देखील तिथे मॅनरलेस समजले जाते. तिथे तर जागांचेही प्रॉब्लेम नसतात त्यांना. बहुतेक तरुणतरुणी एकत्र लिव्ह इनमध्ये राहत असतात. तरीही जाहीर ठिकाणीही ते एकमेकांच्यात हरवून बसू शकतात. तेव्हा हा मुलगा त्या मुलांना मारायला धावेल का? याची ती संस्कृतीपुजक आई देखील त्या लोकांना मारायला धावेल का, जेव्हा ती आपल्या मुलाकडे तिथे जाईल तेव्हा? 
आपल्याकडे तर नवराबायकोही हातात हात घेऊन फिरणं पाप समजतात, वाईट समजतात. 
लोक म्हणतील, प्रेमाचं प्रदर्शन कशाला? ठिक मग, रस्त्यात हगून, थुंकून, कचरा टाकून घाणींचं प्रदर्शन मात्र चालतं का तुम्हाला? प्रेमाचं नको, घाणीचं प्रदर्शन चालतंय तुम्हाला. 

आणि आपल्याकडे अजूनही मुलींच्या तोकड्या कपड्यांवर निरर्थक चर्चा झडतात. बलात्कारासारख्या घटनांचे समर्थन करत मुलींच्या कपड्यांवर आरोप केले जातात. मात्र आपल्या इथल्या मंदिरात, लेण्यांमध्ये सर्व शिल्प हे अत्यल्पवस्त्रांकीत तरुणींचे असतात. म्हणूनच भारतीय समाज दांभिक आहे. तो नीतीमान नाही, तर विकृत आहे. गंडलेला आहे. 
आपल्याकडे (नीतीमान)पुरुष इतके वखवखलेले आहेत, की ते केवळ अल्पवस्त्रांकीत गोऱ्या युवती बघायला गोव्याला जातात. गोव्याचे सौंदर्य बघायला नाही. आणि घरच्या बाईला पूर्ण कपड्याची संस्कृती शिकवतात. भारतीय लोकांची डोकी इतकी बधीर झालेली आहेत की त्यांना साडी ही संस्कृती वाटते. त्यातून दिसणारं उघडं अंगं हे असंस्कृत वाटत नाही. मात्र पॅन्ट शर्ट घातलेली बाई दिसली की यांची संस्कृती बुडते. इतका मुर्ख समाज अजून कुठे असेल. 
हे तर दूरचं झालं. इथं सोशल मिडीयावर देखील स्त्रियांना कपड्यांवरून, त्यांच्या लेखनावरून, त्यांच्या वयावरून, जज केलं जातं. त्यांना उपलब्ध समजलं जातं. इथं नवराबायको दोघेही सोशल मिडीयावर असले, तरी एकमेकांवर पहारा ठेवून राहतात. एकमेकांना स्पेस देत नाहीत. बहुसंख्य लोकांजवळ स्वतःचं असं सांगण्यासारखं, लिहिण्यासारखं काहीच नसतं. तेवढी वैचारीक समज नसते, क्षमता नसते. त्यामुळे इथं केवळ हा काय करतोय, ती काय करतेय, हा कुणाशी बोलतोय, ती कुणाबरोबर दिसतेय हेच गॉसिपिंग अधिक केलं जातं. त्यावरून त्या त्या व्यक्तीबद्दल आडाखे बांधले जातात. आणि हे करणारे अधिकतर पुरुष असतात.
पण पुरुषांनाच का नावं ठेवा, इथं स्त्रिया देखील प्रेमाच्या नावावर लांबच लांब पोष्टी टाकतील. हिंदी इंग्रजी सिनेमे, त्यातील नायकनायिकांचे प्रेम, प्रेमाची गाणी यावर लळूलळून लिहितील. त्यावर शेपाचशे प्रतिक्रिया पडतील. हजार बाराशे लाईक्स उठतील. पण हेच लोक एखादी वास्तवातली प्रेमकहाणी समोर आली तर तिला भरभरून शिव्या देतील. इथं प्रेम म्हणजे लग्न, प्रेम म्हणजे एकमेकांना खेकड्यासारखं अडकवून ठेवणं, प्रेम म्हणजे जबाबदाऱ्या, प्रेम म्हणजे पाप, प्रेम म्हणजे प्रदर्शन, प्रेम म्हणजे वंशाला वारस अशा आपणच आपल्या दांभिक मनाच्या सोयीसाठी तयार करून ठेवलेल्या व्याख्या आहेत. 
अरे यार, प्रेम म्हणजे फक्त प्रेम. ते क्षणाचं असेल, महिन्याचं असेल, वर्षाचं किंवा जन्माचं. तुमच्या व्याख्या तुम्ही त्याला का लावताय? जे करतायत ते त्यांचं बघून घेतील. क्षणाचं करायचं की जन्माचं ते...

प्रेम आणि सेक्स म्हणजे उदात्त, मंगल, पवित्र असलं काही नसतंय. इतर अनेक भावनांप्रमाणेच ती एक भावना आहे. गरज आहे. बास्स. इतकंच. माणसाला साधी पाणीपुरी खाताना सारं शरीर सुखमय, हवंहवं वाटत राहण्यासारखं होतं. भैय्या, और एक दो ना, एक तिख्खा दो, एक मिठा दो, चटणी जरा और डालो असं म्हणत एका प्लेटच्या जागी चार प्लेट हादडल्या जातात. मग पाणीपुरी खाणं हे उदात्त, मंगल, पवित्र, अध्यात्मिक वगैरे वगैरे वाटायला हवं का? प्रेम, सेक्स या उदात्त, मंगल, पवित्र इत्यादी नसून आनंद देणारी गोष्ट आहे. स्वतः आनंदी रहा, दुसऱ्याला राहू द्या. तुमची गळणारी नाकं तिथं नका खुपसू. बस इतनी सी बात है. 

भारतात अजून दोनशे वर्षे तरी स्त्रीपुरुष निखळ संबंध, प्रेम-सेक्स इत्यादीबद्दलच्या भोंगळ कल्पना, समज गैरसमज बदलणार नाहीत.

बरं मनमर्जीने प्रेम आणि सेक्स सोडा, इथं लग्नं तरी प्रेमाने होऊ दिली जातात का? तर तेही नाही. पोरांची लग्नं हा पालकांचा स्वार्थ असतो. त्यांना त्यांची जात, धर्म, गोत्र, कुळ इत्यादी जपायचे असतात. पोरांना लवकरात लवकर पोरं होऊन वारस हवे असतात. इथल्या भिकाऱ्याला देखील खानदानाचा अभिमान असतो, नि वंशाला पोर हवं असतं. आपण पोरं काढली तितक्यावर लोकांचं समाधान नसतं. इथं पोरांनी पण पोरं काढून पालकांना कृतकृत्य करायचं असतं. नि तरी हे म्हातारे जिवंत राहिले, तर नातवंडांनीही पतवंडं देऊन यांना उपकृत करायचं असतं. सोन्याची फुलं उधळायची असतात. 
थोडक्यात इथं प्रेम आणि सेक्स म्हणजे पोरं काढण्याचं माध्यम.  ती पोरं पण आपल्या जातीची हवीत. धर्माची हवीत. तर ती गोड असतात. तशी ती नसली तर कडूच. पण ते माध्यपणम वाईट समजायचं. त्याची निंदा करायची. 
म्हणूनच हा समाज विकृत समाज आहे. हा माणसाला नैसर्गिक जगू देत नाही. स्वतः जगत नाही.

Nov 29, 2020

कोण अल्पसंख्य.. कोण बहुसंख्य..

कोण अल्पसंख्य, कोण बहुसंख्य-

माझं गाव हे कोकणातलं एक मुस्लिमबहुल गाव. एकेकाळी तिथं संमिश्र वस्ती होती. गवळ आळी, कुंभारवाडा, महारवाडा, जंगमआळी आणि मुस्लिम मोहल्ला, गुजराती व्यापारी घरे अशी व्यवस्थित पारंपरीक रचना असलेलं हे गाव. 
पन्नास साठ वर्षात हळूहळू मोहल्ला वाढत गेला. इतका की बाकीच्या सगळ्या आळ्या नष्ट झाल्या. हिंदू गाव सोडून गावाबाहेर वसले. 
कसे?
मी अनेकदा लिहिलेय, मुस्लिम परिस्थितीने गरीब असतात हे केवळ मी इथं वाचत आलेय. प्रत्यक्षात मी पाहिलेले मुस्लिम सर्व हिंदूंपेक्षा चांगले श्रीमंत होते. आहेत. 
कोकणातील बहुतांश मुस्लिम हे सधन आहेत. बोटीवर, गल्फ कंट्रीजमध्ये पूर्वापर नोकऱ्या करणारे आहेत. त्यातून भरपूर पैसा कमवून गावात पक्की टोलेजंग घरे बांधणारे आहेत. त्यांच्या तुलनेत पर्यायाने अशा गाव खेड्यातले हिंदू गरीब आहेत. 
माझ्या गावात वाढत्या मुस्लिम संख्येला घरं कमी पडू लागली नि त्यांनी गरीब हिंदूच्या घरांवर सरळसरळ डोळा ठेवला, तो पैशाच्या जोरावर. 
गरीब हिंदूना आपल्या घराला लाखालाखात रकमा मिळू लागल्यावर जेमतेम खाऊन पिऊन किंवा तेही वांधे असलेले बरेच लोक आपली घरं मुस्लिमांना सोपवून रोख रकमा घेते झाले आणि त्यांनी गावाबाहेरच्या माळावर, सरकारी जागेत आपल्या झोपड्या, कच्ची घरे उभी केली. गावातून आता जवळपास नव्वद टक्के हिंदू गाव सोडून माळावर, टेकडीवर अशा प्रकारची जेमतेम घरे बांधून राहतायत. (ते पाहून शहरात अशाच जागांवर वसणाऱ्या झोपडपट्ट्याच डोळ्यासमोर येतात.) तसं पाहता हे सरकारी जागेवर अतिक्रमणच होतं. परंतु ते मोठ्या प्रमाणावर होत असताना शेवटी सरकारनेही त्यांना मान्यता दिली. 
गाव कोकणातलं, आजुबाजूला जंगल, झाडं, नदी सगळं आहे. मात्र गावात एकही झाड दिसत नाही मोठं. कारण अगदी सिटीप्रमाणेच इंच न इंच जागा बळकावणे हा प्रकार चालू आहे. त्यात झाडांना जागा नाही. हिंदू होते तोपर्यंत त्यांच्या घराच्या मागेपुढे विस्तृत अंगणं आणि त्यात बऱ्यापैकी झाडं होती. विहीरी होत्या. गोठे होते, ते सगळं गेलं. 
कोकणात अशी मुस्लिमबहुल गावे भरपूर आहेत. रायगड, रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यातल्या किनारपट्टीपासून पंचवीस तीस किमी परिसरात अशी भरपूर सधन गावे आहेत. 
या मुस्लिमांच्या केवळ गावातच नव्हे, तर तालुक्याच्या गावी, जिल्ह्याच्या गावी देखील भरपूर प्रॉपर्ट्या आहेत. तिथे त्यांनी जमिनी घेऊन घरे, ईमारती, चाळी बांधून ठेवल्या आहेत. मात्र त्या ठिकाणी भाड्याने राहणारे हिंदू आहेत. हे मुस्लिम आपली गावे सोडून शहरात रहायला शक्यतो येत नाहीत. मात्र जमिनी घेऊन ठेवतात. 
हिंदूंची पुढची पिढी शहराकडे स्थलांतरीत होते. हे देखील गावांतून त्यांची संख्या कमी होण्याचे एक कारण आहे.
थोडक्यात अल्पसंख्य, बहुसंख्य या सापेक्ष कल्पना आहेत, त्या स्थलकालपरिस्थितीप्रमाणे बदलत असतात. 
असं म्हणतात, की कश्मीरमध्ये हिंदू अल्पसंख्य होते, पण श्रीमंत होते. तरी तिथे ते विस्थापित झाले. 
माझ्या गावात हिंदू अल्पसंख्य होते आणि गरीबही... तरी ते तिथून विस्थापित झाले...
 

Nov 25, 2020

गिल्ट-

 पाप-पुण्य, नीती-अनीती या संकल्पना माणसाने केवळ माणुसकीने वागावं, दुर्बळ मनुष्यालाही बऱ्यापैकी जगता यावं, सबलांकडून त्यांचे शोषण होऊ नये यासाठी तयार केलेल्या आहेत.

प्रत्यक्षात करावे तसे भरावे ही बाळबोध संकल्पना आहे. जंगलातला सिंह हरणाला मारून खातो, म्हणून त्याला कुणी मारून खात नाही, किंवा या पापामुळे तो हाल हाल होऊन मरतो असलं काही घडत नाही. कारण सिंहाला गिल्ट नसतो.

माणसाला त्याचा गिल्ट मारतो. कुरतडतो. आणि तो खंगून मरतो. दोन हजार माणसांना मारूनही, किंवा दरोडा घालूनही गिल्ट नसेल, तर त्या व्यक्तीला असल्या कोणत्याही संकल्पनांमुळे वाईट आयुष्य किंवा वाईट मरण येत नसतं. वाल्या कोळ्यालाही त्या वाटसरूने गिल्ट दिला. पापाचा. म्हणून त्याने चोरी सोडली. अन्यथा काही कारण नव्हते. (तो चोरच राहिला असता, तर बरं होतं. हे रामायण आपल्या माथी मारले गेले नसते.ते वेगळं.😄)
अनेक गुन्हेगार लोक पापभीरू माणसाहून चांगले आयुष्य जगत असतात. (आणि त्यांचं चांगलं आयुष्य पाहून इतर जळत असतात, चीडत असतात😂
हा गिल्ट आणण्याचं काम धार्मिक कल्पना करतात. पाप-पुण्य, नीती-अनीती, स्वर्ग-नरक इत्यादी. आणि शेकडा नव्वद टक्के तरी लोक त्याला बळी पडून माणुसकीने वागण्याचा प्रयत्न करतात.
लोक भिकाऱ्याला भीक देतात, संस्थांना दान देतात तेही या गिल्टमधूनच. आपण पैसा कमवलाय म्हणजे काहीतरी वाईट केलंय, आणि याला त्यातला काही वाटा दिला नाही, तर उद्या त्याची हाय लागून आपल्यावरही याच्यासारखी पाळी येईल हा गिल्ट माणसाला घाबरवतो. आणि तो शेअरींग करू लागतो. करुणा वगैरे भावना देखील संताबिंतांनी प्रवचनांतून सातत्याने जागृत केलेल्या भावना आहेत. त्या उपजतच सगळ्यांमध्ये असतात असं नाही.
ही भावना इतकी प्रबळ आहे, की माझ्या ओळखीत काही लोक असे आहेत, जे सर्रास काळा पैसा कमवतात आणि अमुक इतकं दान केलं की पाप राहात नाही असं मानतात.😆😆इतके पापभीरू लोक असल्यामुळेच माणसातल्या दुर्बल जमातीही टिकून राहतात.
मार्क्सवाद हा अतिरेकी धर्म आहे. तो सिंहालाही उंदीर करू पाहतो. कारण उंदरांना नीट जगता यावं. तो उंदराला सिंह बनवत नाही. कारण ते शक्य नसतं. सिंहाला गिल्ट देऊन उंदीर करता येईल. उंदराला सिंह कसं बनवणार?
हाच गिल्ट स्त्रियांना दिला जातो. प्रत्यक्षात देहविक्रय करणाऱ्या (वेश्याच नव्हे, तर मॉडेल्स, अभिनेत्री इत्यादी हाय प्रोफाईल स्त्रिया, ज्या आपल्या दैहीक माध्यमातूनच पैसा कमवतात.) अशा हाय प्रोफाईल स्त्रिया अधिक स्वतंत्र, अधिक चांगले आयुष्य जगत असतात. जगू शकतात. परंतु इतर (वड पुजणाऱ्या) स्त्रियांना त्याचा गिल्ट देण्यात येतो. पावित्र्य-चारित्र्य इत्यादी. आणि त्या हाच गिल्ट आयुष्यभर बाळगून दैहीक एकनिष्ठता, योनिशुचिता, पडदा इत्यादीलाच चारित्र्य मानून मन मारून जगत असतात. कारण यात पितृप्रधान समाजाचा स्वार्थ असतो.
एकपत्नी वा एकपती हा नियम देखील खोल विचार करता, समाजातील प्रत्येकाला किमान एकतरी जोडीदार मिळावा यासाठीच केलेला दिसेल. अन्यथा जे बलवान पुरुष असतील (सत्ता, संपत्ती, बळ इत्यादी सर्व असलेले) तेच अधिकाधिक बायका मिळवतील आणि समाजातील दुर्बळ पुरुष लग्नाविना (किंवा जोडीदाराविना) राहून जातील. व्हाईस वर्सा ज्या सुंदर, उपजाऊ, स्त्रिया असतील, त्यांनाच अधिक आणि चांगले पुरुष मिळतील आणि बाकीच्या राहून जातील. पण हा नियम देखील पूर्वी चारित्र्याच्या नावावर तर आता कायद्याच्या जोरावर गिल्ट देऊनच अधिक राबवला जातो.
हा गिल्ट दुधारी शस्त्र आहे. तो योग्य प्रमाणात असेल, तर त्यातून माणूस घडतो. अती झाला तर खंगतो, मन मारून अनैसर्गिक जगतो आणि अजिबात नसला, तर तो माणूसकीला, मानवी समाजाला घातक ठरतो. मानवी समाजात पुरुषापेक्षा स्त्रियांना अधिक गिल्ट देण्यात येतात. सर्व सामान्य पुरुषाला दिलेले गिल्ट तर यात येतातच. शिवाय स्त्री असल्याचे अनेक इतर गिल्टही हेतूपुरस्सर देऊन ठेवलेले असतात.

-अलका गांधी-असेरकर

Aug 23, 2020

सहज आठवणी -

 सहज आठवणी - पाणी

रायगड जिल्ह्यातल्या ज्या गावात राहात होतो. त्या परिसरात पाऊस प्रचंड. धो धो. अक्षरशः तीन महिने तर तो घरात लॉकडाऊन करून ठेवायचा. हलायचा नाही. कुठे जाणं नाही येणं नाही. 

पण तेवढाच हा भाग पाण्यासाठी दुष्काळी म्हणूनही प्रसिद्ध होता. पावसाचं पाणी सगळं वाहून जायचं. ते साठवून ठेवण्यासाठी काहीही कुणी केलं नव्हतं. 
होळी झाली की, किंवा कधी कधी होळी येण्याआधीच, मार्चमध्ये पाण्याची बोंबाबोंब सुरू व्हायची. ते पाऊस पडेपर्यंत पाण्याचे हाल असायचे. 

गावातली छोटीशी, इवलासा जीव असलेली एक नदी पण आटत आटत संकोचून जायची. नदीचं पाणी असंही प्यायला वापरत नसत लोक. 
गावात जातीप्रमाणे विहिरी होत्या. 
मुसलमानांच्या दोन, हिंदूंच्या दोन, दलित वस्तीत एक. 
यात मुसलमानांची एक विहीर आटायची आणि दुसऱ्या विहिरीत बऱ्यापैकी पाणी उरायचं. निगुतीने वापरलं तर मोहल्ल्याला पुरायचं. पण त्या विहिरीवर बाकी कुणी पाणी भरायला जात नसे. आणि हिंदूंच्या विहिरीवर ते येत नसत. 

तसंच हिंदूंची नेहमीची एक बाव आटून जायची. 

दुसरी गावापासून दीड दोन मैलांवर होती. ती माझ्या पणजोबांनीच बांधून घेतली होती. 

त्या विहीरीला झरा होता खाली. उन्हाळ्यातही तो झरा जिवंत असायचा. 

नेहमीच्या विहीरीला हौदाची बाव म्हटलं जायचं. आज विचार करता वाटतंय की  त्यात हौदाप्रमाणे केवळ पावसाचे पाणी साठून राहायचे आणि झरे आटून जायचे म्हणून हौदाची बाव म्हटलं जात असेल. हौदाची बाव गावाच्या जवळ होती. नदीच्या किनारीच होती. तरी तिचे झरे आटून जायचे उन्हाळ्यात. तर दुसरी जी झऱ्याची बाव होती तिला तळईची बाव म्हटलं जायचं. बहुधा तळाला पाणी मिळायचं म्हणून तळईची बाव. हीच माझ्या पणजोबांनी बांधलेली. पण ती गावाला अर्पण करून टाकलेली. त्यावर सगळ्या गावाचाच नव्हे, तर बाजूच्या गावचा पण हक्क होता. ती गुजराची बाव म्हणून पण ओळखली जायची. 

तशी तर मागच्या परसदारी पण एक विहीर होती. ती माझ्या आजोबांनी बांधायला घेतली.  पण बरीच खोल खणून देखील तिला झरा लागला नाही. शेवटी तिचा वापरही हौदासारखा झाला. पावसाचे पाणी राहायचे. जानेवारी फेब्रुवारी पर्यंत जेमतेम. साचणीचं पाणी पिण्यासाठी उपयोगी नसायचे. धुण्यापुरतं वापरायचं. मग ती न बांधता तशीच खड्ड्यासारखी सोडून दिली होती. पण फार खोल होती. कुणी पडू नये म्हणून वरून लाकडं, लोखंडी पोलचे तुकडे वगैरे टाकून बंद करून ठेवली होती. फक्त पोहऱ्याने पाणी ओढता येईल एवढा चौकोन सोडून. 

लोक तळईच्या विहिरीवरून पाणी आणत. विहीर फार खोल नव्हती. चांगली बांधून घेतलेली होती. उतरायला पायऱ्या होत्या. त्यात खाली उतरून त्या झऱ्याचं साठलेलं पाणी वाटी वाटीने हंड्यात भरून घ्यायचे. मग तो हंडा वरती सोबत आलेल्या दुसऱ्या व्यक्तीच्या हातात द्यायचा. किंवा तसाच कंबरेत घेऊन पायऱ्या चढायच्या. 

तोपर्यंत वरती नंबर लागलेले असत. सगळ्यांना मिळायला हवे. थोडी भांडणंही होत. फार नाही. शेजारच्या छोट्या छोट्या गावांचे लोक पण येत हंडे घेऊन. ते रात्री येत कारण रात्री गावातले लोक फार जात नसत. तेव्हा झऱ्याला पाणी भरपूर साठे. अनेकदा तर बाहेरच्या गावातले लोक येऊन तिथे नंबर लावून कडेच्या रस्त्यांवर झोपून जात रात्री. एवढी पाण्याची हलाखी होती. 
एकदा का पाऊस पडायला लागला की मग कोणी या विहिरीकडे आठ महिने ढुंकूनही बघत नसे. पागोळ्यांनाच इतकं बदाबदा पाणी पडे की एक मोठा पिंप लावून ठेवला की तो सतत भरलेला राही. शिवाय या विहिरीत एका बाईने फार पूर्वी जीव दिला होता. अहिल्या नावं असावं तिचं. कारण आयलीने जीव दिलाय या विहीरीत असं म्हटलं जायचं. पण पाण्याची हलाखी इतकी होती, की त्यापुढे आयलीच्या भुताला घाबरायचे कारण उरले नव्हते. 

काही लोक आपल्या शेतात डवरे खणून ठेवत. असे दहा-पाच डवरे असतील गावात फारतर. ते खाजगी मालकीचे असत. त्यांनी त्या जागा अशा शोधून काढलेल्या होत्या, जिथे छोटासा का होईना झरा लागलेला असायचा. डोहरे वरून डवरे झालं असेल. छोटे छोटे डोह होते. ज्यांच्या मालकीचे असत ते लोक त्याला भवताली काटेरी निवडुंगाचं, थोड्याशा तारेचं कुंपण नि कुलुप लावून ठेवायचे. ते कुलूप फोडून कुणी पाणी चोरत नसे. कारण त्या डोहऱ्यांनाही उन्हाळ्यात एका कुटुंबाची जेमतेम गरज भागवण्याइतकाच जीव असे. चोरून काही उपयोग नसे. फुकट शिव्याशाप खायला लागणार. तळईच्या विहिरीजवळच असा एक एका मुस्लिम कुटुंबाचा डवरा होता. पण कुणी त्यातून पाणी चोरत नव्हतं. 
ठरवलं असतं तर माझे पणजोबा देखील त्या विहिरीला कुंपण घालू शकले असते. स्वतःच्या कुटुंबापुरती ठेवू शकले असते. पण पाण्यात पुण्य शोधणारे गुजराती होते ते. गुजरातमधून येताना देखील ते दुष्काळी भागातूनच आलेले. त्यामुळे पाणी सगळ्यांना मिळायला हवं असे त्यांचे विचार होते. प्याऊ बांधणे हे पुण्याचे काम समजायचे गुजराती मारवाडी लोक. आम्ही गेलो तरी रांगेतच पाणी घेत होतो. आम्हाला कुणी तुमची विहीर आहे, तुम्ही आधी घ्या म्हणत नव्हते.
हे असं गावात वर्षानुवर्ष चालू होतं. बाया आणि काही पुरुष सुद्धा दोन किमीवरच्या विहिरीतून डोक्यावर हंड्यातून पाणी वाहून आणत. नळ आले ते फार उशीरा. म्हणजे मी गाव सोडल्यानंतर. मी साधारण विशीत आल्यावर गावात नळ आले. तेही सार्वजनिक. त्याला दिवसातून मर्यादित वेळ पाणी येत असे. ते शेजारच्या एका गावी जिवंत झऱ्यांच्या तुडुंब विहीरी होत्या तिथून बहुधा पाईप टाकून वाहून आणलेले होते. नक्की माहीत नाही कुठून आले. 

कपडे धुवायला नदीवर. नदीही आटत आटत वर जायची. ती जितकी वर वर जाईल तिथे पाणी शोधत जायचं. वर.. वर.. तिथून कपडे धुवून आणायचे. 
अतीच झालं तर पाच सात किमीवरच्या उसर या छोट्याशा गावी जायचे. तिथे दोन पाण्याच्या विहिरी बारा महिने तुडुंब भरलेल्या असायच्या. पण रोज एवढ्या लांब जायचं खाऊ काम नव्हतं. पाच किमी जायचं नि पाच किमी यायचं.
पावसाळी भात शेती व्हायची थोडी. गाव डोंगराळ भागात होतं. दुष्काळी होतं, तरीही सधन होतं. कारण मुस्लिम सगळे बोटीवर खलाशी म्हणून किंवा आखाती देशांत नोकरीला असायचे. 

-अलका गांधी-असेरकर.


Aug 17, 2020

श्रावण, सोमवार आणि त्यानिमित्ताने बरंच काही...

 श्रावण, सोमवार आणि बरंच काही...

माझं माहेर वैष्णव. तिथं फक्त श्रीकृष्ण भजला जात होता. देवी, शंकर, इतकंच कशाला विष्णूची इतर रुपं पण वर्ज्य होती. राम बिम कुछ नही. श्रीकृष्ण एके श्रीकृष्ण. 'जय श्रीकृष्ण' हे आजही भेटल्यावर बोलायचं गुजराती वैष्णवांचं परवलीचं वाक्य. पण आता ते माझ्या तोंडून येत नाही. कारण मी मराठी झालेय आता.
त्यामुळे घरात बाकी उपास तापास, व्रतं, वैकल्यं, पुजा, कर्मकांडं काही करता काही नव्हतं. एकादशी तीही फक्त घरातले म्हातारे कोतारे करायचे. तेही खाऊन पिऊन. वर म्हणायचं, देहाला कष्ट द्यायचे नाहीत, असं कृष्णाने सांगितलंय.
अर्थातच श्रावण बिवण नव्हता, नि त्यातले कोणते वारही नव्हतेच.
पण कोकणात राहात होतो. त्यामुळे वाण नाही पण गुण लागला होता. गाव तर जवळपास मुस्लिमांचं. एकेकाळी ते हिंदूबहुल असेल कदाचित. कारण गावात तीन मंदिरं होती. एक वरच्या अंगाला मारूतीचं. दुसरं खालच्या अंगाला काळभैरवाचं. नि तिसरं गावच्या कोंडावर. तिथूनही पुढे गावाच्या बाहेर. एक छोट्याशा टेकडीवर शंकराचं.
तिन्ही मंदीरं निवांत होती. कोणी भक्त अकारण सकारण तिन्ही देवांच्या वाटेला जात नव्हते. मारुतीला फक्त चैत्रात जत्रा भरायची त्याच्या नावे म्हणून. काळभैरवाच्या मंदिरात श्रावणात भागवत सप्ताह वाचला जायचा. तेही रात्री. दिवसा कोणी रिकामटेकडे नव्हते. नि शंकराला श्रावणात कदाचित जात असतील लोक. कदाचित एवढ्यासाठी की मी तरी पाहिलं नव्हतं कुणाला जाताना.
मात्र शंकराच्या मंदिराभवती स्मशान होतं. अगदी त्याच्या पायरीला लागूनही पुरलेल्या माणसांच्या समाध्या होत्या.
पुरलेल्या?
बहुधा होच. त्यावेळी त्या गावातले हिंदू सगळे गरीब होते. कुणी मेलं तर जाळायला तेवढी लाकडं नसायची. विकत मिळायला सोय नव्हती. त्यामुळे शंकराच्या टेकडीवर पुरून मोकळं व्हायचं. ज्यांना शक्य होत असेल ते जाळतही असतील कदाचित. देव जाणे. गाव फार लहान. पाचेकशे घरांचं असेल फारतर. मुस्लिम लोकांचं कब्रस्तान लांब होतं फार. हिंदू तर गिनेचुनेच उरले होते.
त्यात आम्हा गुजरात्यांची सात-आठ घरं. श्रीमंत नव्हती. तीही गरीबच होती. पण खाऊन पिऊन होती. आणि गुजरात्यांच्या आवारात मागल्या दारी लाकडांची सोय करून ठेवलेली असायची. घरात म्हातारी कोतारी माणसं असायची. ऐनवेळी लाकडं कुठून आणणार म्हणून. मोठाली लाकडं राखीव ठेवून दिलेली असायची.
आज मागे वळून पाहता वाटतं, किती प्रॅक्टीकल होते तेव्हाचे लोक. आपला क्रूस आपल्यासोबत म्हणतात ते हेच का? अशा त्या खेड्यावर आम्ही एक दोन वर्ष नव्हे, तर पाच पिढ्या राहिलो.
तर विषय होता श्रावणी सोमवारचा. घरात शंकराचं प्रस्थ नव्हतं. पण ज्येष्ठात पाऊस बसला की कंपलसरी लॉकडाऊन असायचा सगळ्यांना. फक्त शेतावर काम करणारे लोक सोडून. म्हणून श्रावणात जरा पाऊस कमी झाला की घरातल्या बायकांना बाहेर पडण्यासाठी एक निमित्त असायचं. चला शंकराच्या मंदिरात जाऊ सोमवारी. मग एका सोमवारी सगळ्या गुजराती बायका निघायच्या. दुपारी चारच्या सुमारास.
सोबत दुकानातलाच नारळ घ्यायचा एक फक्त. बास.
आधी कोंडावर जायचं. कोंडावर ब्राम्हणाचं एक घर. जोशीबुवा, त्यांची बायको आणि एकुलता एक मुलगा.
तेही त्या गावातले नव्हतेच.
लोक आता म्हणतात ब्राम्हणांनी यंव केलं नि त्यंव केलं.
मागे वळून पाहता मला आठवतंय तोपर्यंत मी ब्राम्हणांची घरं फार कमी पाहिलीत माझ्या लहानपणी. त्या खेड्यावर तर पंचक्रोशात एकही ब्राम्हण नाही. एकाच छोट्या खेड्यावर डांगे म्हणून खोत होते. त्यांना गांधीहत्येनंतर उसळलेल्या दंगलीत पळवून लावलेलं. आणि तेही धार्मिक कार्य करणारे ब्राम्हण नव्हतेच. पळाले, तेही घरात तरुण मुलगी होती तिच्या इज्जतीच्या भीतीने पळाले. पण पुन्हा त्या गावात परतलेच नाहीत कधी. त्यांचं मनच उठलं. विटलं. जिथे सोबत राहिलो अशी चार घरंच उलटली, त्या गावात काय जायचं पुन्हा? त्यांची घरं, केळीच्या छोट्या बागा तशाच सोडून गेले.
पंचक्रोशीत ब्राम्हण नव्हते, तर मग धार्मिक कार्य करणार कोण? मुळात धार्मिक कार्य करतच कोण होतं? कुणीच नाही. आमच्या खेड्यावर मी कोणतेच सणवार पाहिले नाहीत तेव्हा. एक जत्रा भरायची नि एक दहीहंडी बारकीशी खेळली जायची. आणि हां, एक होळी. तिन्ही देवळात पुजारी बिजारी नव्हते. गावात जंगमांची घरं होती. त्यातील कुणीतरी संध्याकाळी देवळात दिवा लावून यायचं. बाकी पुजा अभिषेक ... ते काय असतं? अशी स्थिती होती.
पण लग्नकार्य असायचं. त्यात सत्यनारायण असायचा. कुणी गेलं तर दिवसकार्य असायचे थोडे फार. त्यासाठी ब्राम्हण कुठून आणायचा आता?
म्हणून तळा या तालुक्याच्या गावाहून या जोशीबुवांना आमच्या गावच्या कोंडावरच्या ग्रामस्थांनी आग्रहाने आणून ठेवलं होतं. त्यांना रहायला एक रिकामं, मोठं फुकट घर दिलं होतं. शेतात काही भात बित पिकेल, तेही त्यांना दिलं जायचं थोडंफार. ते जोशीबुवा आणि त्यांची बायको अत्यंत सालस, गरीब, अगदी गोष्टीतल्या गरीब ब्राम्हणांसारखे कुटुंब होते. त्या कोंडावर पाच पंचवीस सगळी घरं हिंदू मराठांची होती. तिथे मुस्लिम नव्हते अजून तेव्हा.
तर वर टेकडीवरच्या शंकराला जाताना किंवा येताना त्या जोशीबुवांकडे या सगळ्या बाया (सोबत मी..) थांबायच्या. त्यांना भेटायला. त्यांनाही आनंद व्हायचा. गुजर बाया त्यांना भेटायला आल्या. काकू चहा करायच्या. काहीतरी गोड वडी बिडी सगळ्यांच्या हातावर द्यायच्या. सगळ्यांना कौतुक होतं ते त्यांच्या परसदारात त्यांनी लावलेल्या विविध फुलझाडांचं. वर सगळ्या म्हणायच्या, "ही सगळी ब्राम्हण बायांचीच कामं हो. रांगोळी, फुलं वगैरे..."
शिवाय आमच्या सगळ्यांच्या घरात सोवळं असायचं. कारण गाव सगळं मांसाहारी. त्यात पुन्हा मुस्लिमबहुल. मग विचारायलाच नको. आम्ही पडलो कांदालसूणही वर्ज्यवाले. त्यामुळे कोणाकडेच काही खायचा प्यायचा अनुभव नाही. एकच हे घर होतं जोशीबुवांचं. जिथे या सगळ्या बायका बिन्धास्त चहा प्यायच्या. बसायच्या. काही थोडं खाऊ शकायच्या.
तिथून मग स्वाऱ्या शंकराच्या मंदिराकडे. तिथे जाताना कोंडावरच्या एखाद्या माणसाला सोबत घ्यायचं. मंदिरात गेल्यावर कुणी नारळ फोडायला हवं म्हणून. बायकांनी नारळ फोडायचा नसतो म्हणून.
शंकराची टेकडी चढतानाच भीती वाटायची. सगळीकडे समाध्याच समाध्या. अगदी त्या चुकवत चुकवत पाय ठेवावा लागायचा. भकास मंदिर. प्रसन्न वाटण्यासारखं काही नाही. पिंडी, बाहेर दोन पाच कसकसल्या मुर्त्या. सगळं वातावरण रामसे बंधुंच्या सिनेमाला पुरक असं अगदी...
कधी एकदा या बायांचं आटोपतंय आणि घरी जातोय असं व्हायचं.
त्या दिवशी रात्री लवकर झोप यायची नाही. परसातले रातकिडे, बेडकं यांचा आवाज भयप्रद वाटायचा. काय या बायांना त्या भणंग मंदिरात जायचा सोस तो महादेवच जाणे.
पण त्या आनंदात असायच्या. त्यांची श्रावणी पिकनिक झालेली असायची. आता त्या वाट पाहायच्या कृष्णाष्टमीची. तेवढाच एक उपास आणि थोडा सोहळा असायचा. पुन्हा सगळ्या जमायला. दोन चार भजनं म्हणायला नि कृष्णाचा पाळणा सजवायला. आम्हाला कौतुक असायचं ते रात्री बारा वाजता थेपले आणि तळलेल्या मिरच्या खाऊन उपास साोडण्याचं...
यात प्रश्न एकच पडतो की या सगळ्यात ब्राम्हण कुठून आले शिव्या खायला मध्येच? बिचारे पंचक्रोशीतही नसायचे नावाला.
आणि अचानक देव, धर्म, उपास तापास कुठून वाढले? मंदिरांची प्रस्थं कशी वाढली?
गावात हिंदू देखील बिचारे देवाच्या वाटेला जात नव्हते... तू शांत तिथे तुझ्या देवळात बस. आम्ही आमच्या घरी. दोघंही एकमेकांना त्रास देत नव्हते. कारण दोघांपाशीही एकमेकांना द्यायला काही नव्हतं. दोघेही भणंग.
- अलका असेरकर
Like
Comment

किसी पिछले जनम की बात...

मुगले आजम हा सिनेमा पन्नास वर्षानंतर रंगीत झाला, त्यालाही आता जवळपास 20 एक वर्ष लोटली. 🤦काळ किती भराभर चाललाय...    तेव्हा टीव्हीवर दिलीप क...