Jun 18, 2024

 नॉस्टेल्जिया...


सहज मनात आलं की आजोळचे गाव बघून यावे. कोकणातले. रायगडाच्या अगदी पायथ्याशी असलेले हे पळसगाव. अगदी छोटे खेडे. ज्याचा उच्चार तिथले लोक फलसगाव आणि आम्ही गुजरातीत फलसगाम करत असू. आता तिथे कुणीच नाही. पडके घर आहे फक्त. 

गाडी काढली आणि मी, माझा मोठा भाऊ आणि चुलत बहीण असे तिघे गेलो. रस्त्यापासूनच बदल जाणवू लागला. एक काळ होता, जेव्हा इकडे गाडीतूनच येत होतो. पण बैलगाडीतून. तेही प्रचंड धक्के खात, हिंदकळत, कंबरेचे टाके ढिले होत पोचत घरी. वाटेत मोठा दगड, चढ आला की पुरुष माणसे बैलगाडीतून उतरून पायी चालू लागत तितकी वाट. शिवाय लाल माती प्रचंड उडून कपडे आणि शरीर या दोन्हींचा अवतार होऊन जात असे. 
आता मात्र पक्की गुळगुळीत सडक झालीय. मोटारगाड्या सुळकन जात येत असतात. गावात पोचल्यावर तर हेच का ते गाव असे आश्चर्यचकीत झालो. ओळखूच येईना. एके काळचे पाच पन्नास घरांचे ते वाडीवजा गाव आता चांगले वाढलेय. पक्की, टुमदार घरे बांधलीयत लोकांनी. 

आम्ही अनेक पिढ्या कोकणात राहिलो. त्यामुळे आजोळ, काका, मावश्या यांची गावे पण इथंच. भवताली. छोट्या छोट्या कोकणी खेड्यांवर. कोकणी पद्धतीचे मोठाली घरे, परसदार, झाडे, विहीर असा सगळा बारदाना होता. तर आईचे माहेर हे पळसगाव. आई माहेरची सधन होती. सासरी फार आर्थिक हाल काढले तिने. तिचे बाबा दिलदार होते. माहेरच्या सधनतेच्या आठवणी आणि किस्से ती नेहमी सांगत असे. आमच्या गावाहून देखील हे पळसगाव छोटे. एखाद्या वाडीसारखे. इथे मुस्लिम नव्हते. एकही घर नव्हते त्यांचे. त्यामुळे आमच्या गावापेक्षा इथले वातावरण वेगळे होते. आमच्या गावात चहलपहल होती. माणसांचे आवाज होते. इथे आजुबाजूला गर्द जंगल, झाडी. अगदी सत्तरच्या दशकापर्यंत तिथे विजेचा पत्ता नव्हता. रात्र झाली की मामा पेट्रोमॅक्सची बत्ती लावत. त्याचा उजेड भरपूर पडत असे. पण बाहेर मात्र किर्रर्र...

या मामाच्या घरी जायची इच्छा व्हायची. पण हौसेने गेल्यावर मात्र कुठून आलो.. इतका कंटाळा यायचा. इतके लहान खेडे. त्यात संध्याकाळ झाली की अजून उदास, कंटाळवाणे व्हायचे. वीज नसल्याने. मामाची मुलं सरावलेली होती. त्यांना तिथे करमत असे. जरी ती मुले देखील तालुक्यालाच शिक्षणासाठी राहत असली, तरी सुट्टीत त्यांना तिथे करमे. 

अंगणात बसले,की समोर रायगड किल्ला दिसत असे. त्यावरचा दिवा देखील.  आजुबाजूला अगदी गरीब, मातीची पण बऱ्यापैकी पक्की असलेली सुटी सुटी घरे , प्रत्येकाच्या अंगणार भरपूर झाडे. त्यात प्रामुख्याने आंबा आणि फणस. जरा दूर गेले की करवंदांच्या जाळी, काजूची, जांभळाची झाडे.  एक छोटी नदी. तिथे हुंदडायला दिवसा जरा बरे वाटे. पण रात्र झाली की ती एक रात्र युगाची वाटे. बाहेर बाथरूमला जायची पण प्रचंड भीती वाटे. मिट्ट काळोख भवताली. मामे बहीण मात्र अंधार पडल्यावर देखील हातात छोटा रॉकेलचा दिवा घेऊन आजुबाजूच्या घरातल्या मैत्रीणींना भेटायला, गप्पा मारायला जायची. तिथल्या कुणबी, मराठा घरात तिचे मायेचे बंध होते. तिथल्या आया बाया तिच्यावर खूप माया करत. इतकी की तेव्हा मला हेवा वाटे. मला मग तिथे अजूनच परके परके वाटू लागे.  

एकदा असाच मामा सुट्टीत मला आणि भावाला घेऊन गेला. दोन दिवस बरे वाटले, पण नंतर जाम करमेना. परत जायचं होतं घरी. पण मामा जाऊ देईना. आणि जोपर्यंत तो गाडी जोतून देत नाही कुणाची तोपर्यंत आम्ही एकटे जाऊ शकत नाही असे किशोरावस्थेतले. आम्ही रोज मामाच्या विनंत्या करत होतो. पण तो आणखीच चिडवायचा. आता इथेच राहायचे. आता नाही परत जायचे. ते ऐकून मला त्याचे खरेच वाटायचे आणि रडू यायचे. भाऊ जरा मोठा कळता होता. तो माझे मन रमवण्याचा प्रयत्न करे. काहीतरी खेळ, कोडी इत्यादी खेळून. काळ असा की ना रेडीओ, ना टीव्ही, ना तिथे पुस्तके... फोनचा तर प्रश्नच नव्हता. त्यात मामी वारलेली. मामा एकटा राहात होता. 

नंतर काहीच वर्षात एसटी पण चालू झाली. प्रचंड लाल धुरळा उडवत एसटी गावात शिरायची. वीजही आली. मग मात्र कधीतरी जात असू. कारण आता जाणंयेणं मामावर अवलंबून नव्हतं. मनात आलं तर गेलं, मनात येईल तितकं राहीलं. की एसटीने परत. तरीही फार काही कधी आजोळी जाणं झालं नाही. आठवणीत पाचसहा वेळा गेलो असू. बास. पण आज स्मरणात मात्र ते जसंच्या तसं येतंय.

आता मामा नाही, त्याची मुलंही तिथे नाहीत. घर बेवारस, पार पडलेले एक दोन खोल्या पडक्या झडक्या शिल्लक आहेत फक्त. अनेक, जवळपास चाळीसेक वर्षांपूर्वी मामाने लावलेले चिकूचे झाड मात्र बहरलेले होते अजून. आम्ही गेल्यावर आजुबाजूचे गोळा झाले. त्यांनी अर्थात ओळखले नाही. त्यांना ओळख दिली. मग काही म्हाताऱ्या कोताऱ्यांना ओळख लागली. येत जा म्हणाले. 

काळ सरकतो, बदलतो, जे दिवस आणि जो परीसर तेव्हा कंटाळवाणा वाटत होता, तशाच परीसरात आज रिसॉर्ट शोधत काही हजार रुपये देऊन दोन दिवस घालवायला जातो... शहरी धकाधकीपासून दूर. 

ते खऱ्या अर्थाने मामाचे गाव होते. 



May 3, 2024

जा जरा उत्तरेकडे...

एका बाजूला पार आकाशात आपले सुळके घुसवून उभे असलेले भव्य पहाड, तर दुसऱ्या बाजूला खोल खोल दरी.. जिला दरी म्हणणे म्हणजे तिचा अपमान करणेच होय. खोल खोल पाताळ म्हणायला हवे..
दोन्हीं कडे पाहताना छाती दडपते. निसर्गाचे भव्य पण रौद्र सौंदर्य पाहून आनंदासह भीती वाटत राहते. 
मध्ये मध्ये असंख्य झरे, ओढे, तलाव आणि धबधबे..मध्येच बर्फाची पखरण.. उतरणीवरची छोटी छोटी गावे. दोन पहाडांमधून खोल खाली वाहणाऱ्या नद्या. मधूनच धुक्याने भरून जाणारा आसमंत...
हे उत्तर किंवा उत्तर पूर्व भारतातील अनेक ठिकाणांचे सार्थ वर्णन. बस एवढेच. पण तरीही पुन्हा पुन्हा मोहवते. साद घालते. 
या पहडांमधून गोल गोल फिरणाऱ्या  वळणदार रस्त्यांवरून आपली गाडी तिथले ड्रायव्हर शिताफीने चालवत राहतात. समोरून येणाऱ्या गाडीला ना थांबता वळसा घालून झरकन पुढे निघतात, तेव्हा आपल्या छातीचा ठोका चुकतो. तिथे स्थानिकच ड्रायव्हर हवेत. आपले काम नव्हे. बहुतेक ठिकाणी अपवाद वगळता रस्ते उत्तम आहेत.
शहरे आपल्या शहरांसारखीच झालीत आता सगळीकडे. पण वाटेत भेटणारी छोटी छोटी गावे आपले वेगळेपण अजून बऱ्यापैकी राखून आहेत.
थंड हवेत गुलाब खूप फुलत असावेत. जागोजागी घरांसमोर लाल गुलाब फुललेले असतात. एकेका झाडाला पन्नास शंभर गुलाब!
उत्तरेकडील प्रवासात हमखास आठवते ती प्रभाकर पाध्ये यांची 'रारंग ढांग' ही कादंबरी. 

हे उत्तरेकडील पहाडी सौंदर्य हिंदी सिनेमाने पडद्यावर आपल्याला बरेच दाखवलेले आहे. पण प्रत्यक्षात अनुभवणे जास्त सुखद. सगळा स्ट्रेस पार दूर निघून जातो. मन ताजे तवाने होते. या भव्य निसर्गासमोर आपले खुजेपण, आपले हेवे दावे, आपली सुख दुःखे, आपले विचार सगळे ठेंगणे वाटू लागते. 
तवांग पासला १५५०० फूट उंचीवर आल्यावर आकाश अगदी हाताशी येतेय असे जवळ वाटत होते. असे इतके जवळ आकाश कधी पाहिले नव्हते. तर पहाडांच्या खूप खाली दरीत तरंगणारे पांढऱ्या ढगांचे मोठाले पुंजके..
आपल्या सह्याद्रीच्या रांगा, कडे, हे या हिमालयीन पहाडांसमोर अक्षरशः पिल्लू आहेत. कितीही वर वर गेलो, तरी पहाडांवर पहाड अंतहीन भेटतच जातात. एका ठिकाणाहून दुसरे ठिकाण गाठायला किमान आठ ते बारा तास गरगर प्रवास करावा लागतो. मात्र हे भव्य सौंदर्य आणि थंड हवामान यामुळे प्रवासाचा कंटाळा येत नाही. वाटेत छोटे छोटे कॅफे, धाबे प्रवासाचा शीण हलका करायला भेटतातच. या धाब्यांच्या दारात गुलाब फुललेले असतात.बहुतेक ठिकाणी हे कॅफे चालवणाऱ्या स्त्रिया मुलीच असतात. नॉर्थ इस्ट कडे सर्व दुकानांतून स्त्रियांचे राज्य. त्यामुळे की काय साडे आठ नऊला दुकाने बंद होतात. त्यांना घरी जाऊन घर सैपाक पण बघावे लागत असणार. लहान मुलांना पाठुंगळीच्या झोळीत बांधतात.
अरुणाचल हे चीनच्या सीमेवरचे राज्य. त्यामुळे तिथे मिलिटरी कॅम्पस जागो जागी आहेत. बुमला पासला चिनी सैनिक समोर उभे होते. ते इकडच्या भारतीय सैनिकांशी गप्पा मारत उभे होते. 
इकडे 
नॉर्थ इष्ट, भूतान, हिमाचल या ठिकाणी खूप सुंदर बौद्ध मॉनेस्ट्री भेटतात. सिक्किमला एके ठिकाणी एका उंच पहाडावर बुद्धाचा भव्य पुतळा, बाजूच्या दरीतून विहरणारे पांढरे ढग, त्यांना भेदून वर आलेले पहाडांचे सुळके, त्यावर बर्फाची पखरण आणि त्या गार सुखद वातावरणात जणू काही खोल दरीतून लहरत येत आल्यासारखे बौद्ध स्तोत्रांचे भरून टाकणारे सूर...अवघे वातावरण परम शांती देणारे आणि आनंदित करणारे..तिथून हलुच नयेसे...
ही शांती, हे पावित्र्य, ही स्वच्छता कुठल्याच प्राचीन, अर्वाचीन हिंदू मंदिरात मिळत नाही. अपवाद कोकण आणि दक्षिणेकडची काही मंदिरे थोडीशी...
मी पर्यटनात कुठल्याच मंदिरात जात नाही. रांगा लावून तर नाहीच. बाहेरून सहज बघता आली तरच. उत्तरेकडे तर अतिशय गलिच्छ. पंडे पुजारी यांनी वेढलेला, त्यांच्या तार स्वरातील कर्कश श्लोकानी  वैतागलेला देव स्वतः तर हळद कुंकू फुले अभिषेकात गुद्मरलेला.. त्याचे मूळ स्वरूप दिसतच नसते..! असो.
उत्तरेकडे निसर्गात आठ दहा दिवस जरी फिरून आलो तरी वर्ष भराची ऊर्जा मिळते. म्हणून तुम्हीही... जा जरा उत्तरेकडे....




किसी पिछले जनम की बात...

मुगले आजम हा सिनेमा पन्नास वर्षानंतर रंगीत झाला, त्यालाही आता जवळपास 20 एक वर्ष लोटली. 🤦काळ किती भराभर चाललाय...    तेव्हा टीव्हीवर दिलीप क...