रिमझिम गीरे सावन ...
दमदार पाऊस सुरू झाला की "रिमझिम गिरे सावन" या गाण्याची हमखास आठवण येते. कारण मुंबईचा आसमंत ओलाचिंब करून टाकणारा पाऊस या गाण्यात व्यवस्थित चित्रित झालाय. पाऊस अंगावर घेत, चिखल पाणी तुडवत अमिताभ आणि मौसमी मुंबई, मरीन ड्राईव्ह, आझाद मैदान, परिसरात वेड्यासारखे फिरत असतात, कट्ट्यावर समुद्राच्या लाटा अंगावर घेत असतात..
म्हणजे इतक्या सुंदर निसर्गाचे वर्णन असलेले गाणे चक्क मुंबईत, तेही सिग्नल, स्टेशन इत्यादी परिसरात चित्रित केले जाऊ शकेल यावर कुणाचा विश्वास देखील बसणार नाही. पण म्हणूनच आपली चित्रपट नगरी थोर आहे. जे ना सोचे हम तुम वो सोचे बॉलिवूड...
फक्त यात अमिताभ पूर्ण सुटाबुटात का भिजताना दाखवलाय ते माहीत नाही.. आणि साडी नेसून पावसात भिजणे, बर्फात धावणे आणि नाचणे हे केवळ बॉलिवूड अभिनेत्रीच करू जाणे... आम्हाला इथे घरापासून स्टेशन पर्यंत साडी नेसून चालायचे म्हटले तर परकर पायात अडकतो...🤦
मौसमी त्या काळातील स्त्रिया नेसत तशी टिपिकल प्रिंटेड शिफॉनची अत्यंत साधी साडी नेसून आहे तरी क्यूट दिसते. पण अमिताभ सुटात चिखल उडवत धावताना येडा दिसतो .. पण मुंबईसारख्या शहरात पाऊस अंगावर घेत धुंदीत पळण्याचे काम वेडेच करू शकतात .. नाही का?? बाकीच्यांनी बायकोला भजीच तळायला लावून गलासच घेऊन बसावे आणि कांदेनवमी साजरी करावी....!