भारतीय संस्कृतीचा डांगोरा मोठा पिटला जातो.
पण ही संस्कृती अतिशय विसंगत, दांभिक आणि विकृत संस्कृती आहे.
इथं अध्यात्म, नीती-अनीती, पाप-पुण्य याच्या कल्पना विचित्र आहेत.
विशेषतः स्त्री-पुरुष संबंधांबाबत ही संस्कृती गंडलेली आहे.
इथं मंदिरांवर संभोगशिल्पे आहेत. त्यात ऍनिमल पॉर्नपासून गॅंगबॅंगपर्यंतच्या सर्व सेक्स कल्पना आणि भावना चित्रीत आहेत.
मात्र तरीही इथं सेक्सकडे गलिच्छ नजरेने पाहिलं जातं.
मुलं तिशी-चाळीशीत आली तरी लग्नाआधी सेक्स करण्याला जाहीर मान्यता नाही. त्यांना चोरूनच भेटावे लागते. लग्न होईपर्यंत मुलीला सेक्सबद्दल काहीही माहिती नसणं हे तिच्या मुर्खपणाचं द्योतक असायला हवं, परंतु तसं न होता अशा मुलीला पवित्र, निरागस इत्यादी समजून खुश होणारे तिच्यासारखेच मुर्ख तरूण अजूनही या देशात बहुसंख्येत आहेत.
भारतात सेक्स म्हणजे फक्त पोरं काढण्याचं माध्यम समजलं जातं. त्यातही मुलं झाली, की निदान महिलेला तरी सेक्स कशाला हवा, किंबहुना तिला तो नकोच असतो, किंवा नसावाच अशा फुल टू अपेक्षा भारतीय समाजात असतात.
मध्यंतरी स्टेशन परीसरातून मी एकदा जात होते. तिथे एक चाळीशीतली तरुणी आणि तिचा बारावीतला मुलगा, हे दोघे मिळून तीन चार पंचविशीतल्या तरुणांशी भांडताना दिसले. भांडण हमरीतुमरीवर आले होते. मी स्कूटरवर होते. मला वाटले की त्या बाईला ते तरूण त्रास देत आहेत. मी स्कूटर एका बाजूला लावून उतरले. भवताली गर्दी होती. पण कोणीही मध्ये पडत नव्हते. ती बाई धावून धावून त्या मुलांपैकी एकाला मारायला जात होती. बडबड करत होती. अर्थात मी तिच्या बाजूनेच होते. काही माहीत नसल्याने. मी तिला जरा एका बाजूला धरून विचारले. काय झालं?
आता हतबुद्ध होण्याची पाळी माझी होती. मला ती बाई म्हणाली, हा एका मुलीला स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर किस करत होता. सगळ्यांच्या समोर. यांना काही लाजा नाहीत का? लहान मुलं वगैरे बघतात इत्यादी इत्यादी..
मी म्हटलं ते जर राजीखुशीने करत असतील, तर त्यात आपला काय संबंध? तो जर त्या मुलीवर जबरदस्ती करत असेल, तर मध्ये पडणं ठिक. पण जर ती मुलगीही त्याची गर्लफ्रेन्ड असेल, नि राजी खुशीने त्याच्याबरोबर असेल, तर त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे. पण ती बाई संस्कृतीच्या नावाने पेटली होती. शेवटी तो मुलगा आणि त्याचे दोन मित्र हे मारामारीवर उतरले. रिक्षातून रॉड काढू लागले. मी त्या मुलाला समजावलं. त्याच्या रिक्षात बसलेल्या मित्राला समजावलं, की याला घेऊन निघून जा. त्या बाईच्या नादाला लागू नका.
आईशप्पथ सांगते, जर मी मध्ये पडले नसते, तर त्या बाईने नि तिच्या बारावीतल्या मुलाने त्या दिवशी मार खाल्ला असता. शिवाय लोक तिच्याच बाजून राहिले असते. कारण एक मुलगा आणि मुलगी राजीखुशीने सार्वजनिक जागी किस करत असतील, तरी यांची संस्कृती बुडते.
हीच बाई आणि हाच तिचा मुलगा, रस्त्यात कुणाला थुंकताना पाहून, कचरा टाकताना पाहून त्याला जाब विचारते झाले नसते. गपगुमान तिथून गेले असते.
कारण भारताच्या रस्त्यावर हगणं, मुतणं, कचरा टाकणं, थुंकणं हे सगळं केलेलं चालतं. मात्र कुणी प्रेम केलेलं चालत नाही. इथं बलात्कार आए दिन होतात. तशी पार्श्वभूमी घरात असते. वर्चस्वाची. तेव्हाच तिथे बलात्कारी पैदा होतात. मात्र प्रेमाची पार्श्वभूमी कोणत्याच घरात सहसा नसते. मुलीशी बोलायचं नाही, मुलांशी बोलायचं नाही. हे असले संस्कार चांगले संस्कार म्हणून ओळखले जातात.
आजही मी जेव्हा माझा मित्र म्हणून मी एखाद्याचा जाहीर उल्लेख करते, तेव्हा शेकडा नव्वद टक्के लोकांच्या, त्यातही महिलांच्या नजरा अधिक बदलतात. बाईला मित्र कसा काय असू शकतो? त्यातही माझ्याएवढ्या मोठ्या बाईला?.. मी काय आता कॉलेजला जाणारी मुलगी आहे का मला मित्र असायला?
ही परिस्थिती मुंबईसारख्या शहरात आहे. तर भारताच्या इतर राज्यांत आणि छोट्या गावांमध्ये तर विचारायलाच नको.
स्त्री पुरुष, तरुण-तरुणी प्रेमासाठी, सेक्ससाठी इथं चोरून भेटतात. घरांमधून जागा नसतात. बाहेर भेटलं की समाजाला चालत नाही. अनेकदा अशा गावाबाहेर, एकांत जागी चोरून भेटणाऱ्या तरुणतरुणींना, स्त्री-पुरुषांना इतर उपाशी, वखवखलेले तरूणच मागावर राहून त्रास देतात. ब्लॅकमेल करतात. कारण इथं प्रत्येक तरुण उपाशी आहे. त्याला प्रेम करायला, भिन्नलिंगी मैत्री करायला, त्यांच्याबरोबर जाहीर रित्या भटकायला, परवानगी नाही. किंवा त्याची स्वतःचीच एखाद्या मुलीबरोबर निखळ मैत्री असण्याएवढी त्याची लायकी नाही. पात्रता नाही. कारण पुन्हा तेच. घरीदारी असलेल्या स्त्रीपुरुष मैत्रीबाबतच्या दांभिक कल्पना. एखाद्या मुलीबरोबर एखादा तरुण दिसला, किंवा उलटही तर लगेच त्याच्या घरी जाऊन सांगण्याचे परमपुण्य काम मागच्या पिढीतले उपाशी ढुढ्ढाचार्य करत असतात. पोलिस देखील अशा तरुणतरुणींना त्रास करतात. दंड करतात.
थोडक्यात इथली तरुण पिढी देखीलउपाशी आहे, नि प्रौढ पिढी देखील. पण बोलू शकत नाही. कारण त्याच्यावरही संस्कार नावाच्या च्युतियापाचे ओझे असते. मग इथला पुरुष बलात्कार करतो, ते जमलं नाही तर गर्दीत सापडलेल्या बाईच्या अंगाला नको तिथे स्पर्श करतो, धक्के मारतो, चिमटे काढतो. एखादी बरी बाई दिसली की तिच्याकडे एकटक उपाशी नजरेने बघत बसतो. इथं लहान लहान मुलींवर लैंगिक अत्याचार होतात, शरीरविक्रयाचे पाच रुपयांपासून ते पाच लाखांपर्यंतचे सौदे होणारे बाजार भरभरून वाहतात. तिथं पोरी पळवून आणल्या जातात, विकल्या जातात, या उपाशी भारतीय पुरुषांची वखवख शमवण्यासाठी त्या मुलींवर अमानुष अत्याचार केले जातात. त्याचं वैषम्य वरील उदाहरणातील बाईपासून कोणालाच वाटत नसते. त्यावर कुणी बोलत नसते. कारण देवदासीसारख्या प्रथा या आपल्याकडे धर्म आणि संस्कृतीच्या नावावर जाणीवपुर्वक तयार केल्या गेल्या आहेत.
इथं अजूनही बाई म्हणजे, 'माझ्या घरची ठेवायची झाकून, नि दुसऱ्याची बघायची वाकून' अशी वस्तू समजली जाते.
मला असा प्रश्न पडला, की वरील उदाहरणातील बाईचा मुलगा आता कॉलेजला जाईल, उद्या शिकण्यासाठी अमेरिका, युरोपला जाईल. तिथे तर सर्रास खुलेआम तरुण तरुणी एकमेकांच्यात हरवून बसलेले दिसतात. ठायी ठायी. अगदी एकमेकांच्या मांडीवर बसलेले असतात, एकमेकांच्या अंगावर पडलेले असतात. हगिंग, किसिंग सर्वांच्या समोर, सर्वांना विसरून सुरू असते. तिथे लहान मुलेही असतात. तरुणींच्या अंगावर वीतभर चड्डी नि अर्धा वीत कुडता असतो. पण या जोडप्यांकडे कुणीही ढुंकून बघत नाही. त्यांना त्रास करण्याचे तर दूरच. पण त्यांच्याकडे बघत बसणे हे देखील तिथे मॅनरलेस समजले जाते. तिथे तर जागांचेही प्रॉब्लेम नसतात त्यांना. बहुतेक तरुणतरुणी एकत्र लिव्ह इनमध्ये राहत असतात. तरीही जाहीर ठिकाणीही ते एकमेकांच्यात हरवून बसू शकतात. तेव्हा हा मुलगा त्या मुलांना मारायला धावेल का? याची ती संस्कृतीपुजक आई देखील त्या लोकांना मारायला धावेल का, जेव्हा ती आपल्या मुलाकडे तिथे जाईल तेव्हा?
आपल्याकडे तर नवराबायकोही हातात हात घेऊन फिरणं पाप समजतात, वाईट समजतात.
लोक म्हणतील, प्रेमाचं प्रदर्शन कशाला? ठिक मग, रस्त्यात हगून, थुंकून, कचरा टाकून घाणींचं प्रदर्शन मात्र चालतं का तुम्हाला? प्रेमाचं नको, घाणीचं प्रदर्शन चालतंय तुम्हाला.
आणि आपल्याकडे अजूनही मुलींच्या तोकड्या कपड्यांवर निरर्थक चर्चा झडतात. बलात्कारासारख्या घटनांचे समर्थन करत मुलींच्या कपड्यांवर आरोप केले जातात. मात्र आपल्या इथल्या मंदिरात, लेण्यांमध्ये सर्व शिल्प हे अत्यल्पवस्त्रांकीत तरुणींचे असतात. म्हणूनच भारतीय समाज दांभिक आहे. तो नीतीमान नाही, तर विकृत आहे. गंडलेला आहे.
आपल्याकडे (नीतीमान)पुरुष इतके वखवखलेले आहेत, की ते केवळ अल्पवस्त्रांकीत गोऱ्या युवती बघायला गोव्याला जातात. गोव्याचे सौंदर्य बघायला नाही. आणि घरच्या बाईला पूर्ण कपड्याची संस्कृती शिकवतात. भारतीय लोकांची डोकी इतकी बधीर झालेली आहेत की त्यांना साडी ही संस्कृती वाटते. त्यातून दिसणारं उघडं अंगं हे असंस्कृत वाटत नाही. मात्र पॅन्ट शर्ट घातलेली बाई दिसली की यांची संस्कृती बुडते. इतका मुर्ख समाज अजून कुठे असेल.
हे तर दूरचं झालं. इथं सोशल मिडीयावर देखील स्त्रियांना कपड्यांवरून, त्यांच्या लेखनावरून, त्यांच्या वयावरून, जज केलं जातं. त्यांना उपलब्ध समजलं जातं. इथं नवराबायको दोघेही सोशल मिडीयावर असले, तरी एकमेकांवर पहारा ठेवून राहतात. एकमेकांना स्पेस देत नाहीत. बहुसंख्य लोकांजवळ स्वतःचं असं सांगण्यासारखं, लिहिण्यासारखं काहीच नसतं. तेवढी वैचारीक समज नसते, क्षमता नसते. त्यामुळे इथं केवळ हा काय करतोय, ती काय करतेय, हा कुणाशी बोलतोय, ती कुणाबरोबर दिसतेय हेच गॉसिपिंग अधिक केलं जातं. त्यावरून त्या त्या व्यक्तीबद्दल आडाखे बांधले जातात. आणि हे करणारे अधिकतर पुरुष असतात.
पण पुरुषांनाच का नावं ठेवा, इथं स्त्रिया देखील प्रेमाच्या नावावर लांबच लांब पोष्टी टाकतील. हिंदी इंग्रजी सिनेमे, त्यातील नायकनायिकांचे प्रेम, प्रेमाची गाणी यावर लळूलळून लिहितील. त्यावर शेपाचशे प्रतिक्रिया पडतील. हजार बाराशे लाईक्स उठतील. पण हेच लोक एखादी वास्तवातली प्रेमकहाणी समोर आली तर तिला भरभरून शिव्या देतील. इथं प्रेम म्हणजे लग्न, प्रेम म्हणजे एकमेकांना खेकड्यासारखं अडकवून ठेवणं, प्रेम म्हणजे जबाबदाऱ्या, प्रेम म्हणजे पाप, प्रेम म्हणजे प्रदर्शन, प्रेम म्हणजे वंशाला वारस अशा आपणच आपल्या दांभिक मनाच्या सोयीसाठी तयार करून ठेवलेल्या व्याख्या आहेत.
अरे यार, प्रेम म्हणजे फक्त प्रेम. ते क्षणाचं असेल, महिन्याचं असेल, वर्षाचं किंवा जन्माचं. तुमच्या व्याख्या तुम्ही त्याला का लावताय? जे करतायत ते त्यांचं बघून घेतील. क्षणाचं करायचं की जन्माचं ते...
प्रेम आणि सेक्स म्हणजे उदात्त, मंगल, पवित्र असलं काही नसतंय. इतर अनेक भावनांप्रमाणेच ती एक भावना आहे. गरज आहे. बास्स. इतकंच. माणसाला साधी पाणीपुरी खाताना सारं शरीर सुखमय, हवंहवं वाटत राहण्यासारखं होतं. भैय्या, और एक दो ना, एक तिख्खा दो, एक मिठा दो, चटणी जरा और डालो असं म्हणत एका प्लेटच्या जागी चार प्लेट हादडल्या जातात. मग पाणीपुरी खाणं हे उदात्त, मंगल, पवित्र, अध्यात्मिक वगैरे वगैरे वाटायला हवं का? प्रेम, सेक्स या उदात्त, मंगल, पवित्र इत्यादी नसून आनंद देणारी गोष्ट आहे. स्वतः आनंदी रहा, दुसऱ्याला राहू द्या. तुमची गळणारी नाकं तिथं नका खुपसू. बस इतनी सी बात है.
भारतात अजून दोनशे वर्षे तरी स्त्रीपुरुष निखळ संबंध, प्रेम-सेक्स इत्यादीबद्दलच्या भोंगळ कल्पना, समज गैरसमज बदलणार नाहीत.
बरं मनमर्जीने प्रेम आणि सेक्स सोडा, इथं लग्नं तरी प्रेमाने होऊ दिली जातात का? तर तेही नाही. पोरांची लग्नं हा पालकांचा स्वार्थ असतो. त्यांना त्यांची जात, धर्म, गोत्र, कुळ इत्यादी जपायचे असतात. पोरांना लवकरात लवकर पोरं होऊन वारस हवे असतात. इथल्या भिकाऱ्याला देखील खानदानाचा अभिमान असतो, नि वंशाला पोर हवं असतं. आपण पोरं काढली तितक्यावर लोकांचं समाधान नसतं. इथं पोरांनी पण पोरं काढून पालकांना कृतकृत्य करायचं असतं. नि तरी हे म्हातारे जिवंत राहिले, तर नातवंडांनीही पतवंडं देऊन यांना उपकृत करायचं असतं. सोन्याची फुलं उधळायची असतात.
थोडक्यात इथं प्रेम आणि सेक्स म्हणजे पोरं काढण्याचं माध्यम. ती पोरं पण आपल्या जातीची हवीत. धर्माची हवीत. तर ती गोड असतात. तशी ती नसली तर कडूच. पण ते माध्यपणम वाईट समजायचं. त्याची निंदा करायची.
म्हणूनच हा समाज विकृत समाज आहे. हा माणसाला नैसर्गिक जगू देत नाही. स्वतः जगत नाही.
Dec 2, 2020
भारतीय दांभिक, उपाशी, वखवखलेली विकृत संस्कृती-
Nov 30, 2020
टोळंभट्टाची गोष्ट -
टोळंभट्ट साधा तरुण असतो. इतका, की लोक त्याला बावळट समजतात अनेकदा. पण तसा तो बावळट नसतो. फक्त त्याला व्यावहारिक शहाणपण नसतं इतकंच.
टोळंभट्टाचं लग्न होतं. बायको लग्नानंतर पहिल्यांदा माहेरी जाते. आणि तिला आणायला टोळंभट्टाला जावे लागते. टोळंभट्टाच्या आईला काळजी वाटते. आपला मुलगा तिथे साधेपणाने वागेल नि त्याच्या सासुरवाडीचे लोक त्याला बावळट समजतील.
ती टोळंभट्टाला सल्ला देते. ती म्हणते, 'हे बघ, बाळा, तू सासुरवाडीला चाललायस तुझ्या. तिथं नीट शहाणपणाने वागायचं. आपला मान राखण्यासाठी तिथं उच्चासनावर बसायचं. खाली बसायचं नाही. बोलायचं कमी, नि ऐकायचं, बघायचं जास्त. जास्त बोलायचं नाही. फक्त निरीक्षण करायचं नि जेवढ्यास तेवढं बोलायचं.'
टोळंभट्ट तिची आज्ञा शीरसावंद्य मानून सासूरवाडीला जायला निघतो.
सासरी गेल्यावर बाहेर ओटीवरच भाताच्या गवताची गंज रचलेली असते. टोळंभट्ट त्यावर टुणकन उडी मारून बसतो. कारण आईने सांगितलेलं असतं, उच्चासनावर बसायचं. खाली बसायचं नाही. टोळंभट्टाची सासूरवाडीही गरीबच असते. खुर्च्या वगैरे नसतात बसायला. त्याला बसायला सासरच्या लोकांनी सतरंजी अंथरलेली असते घरात. पण टोळंभट्ट जाम पेंडीवरून उतरायला तयार नाही. कारण आईची आज्ञा. खाली बसलो तर आपण बावळट ठरू. शेवटी सासू सासरे आग्रह सोडून देतात. बसू दे त्याला तिथेच म्हणून.
आणि सासू आत सैपाकाला लागते. सैपाकघराची छोटीशी खिडकी बाहेरच्या ओटीवरच उघडत असते. तिथून सैपाकघरातले सगळे आवाज, हालचाली टोळंभट्टाला कळत असतात. त्याला आईचा दुसरा सल्ला आठवतो. निरीक्षण करायचं. बोलायचं नाही.
सासू आतमध्ये जावयासाठी घावन-घाटलं बनवायला घेते. घावन घालताना चुर्र आवाज येतो. असे ३२ आवाज येतात. टोळंभट्टाचं लक्ष असतं.
जेवण झाल्यावर भटाला आत जेवायला बोलावतात. तो जेवायला बसतो. निरीक्षण करत राहतो. कोणाला किती घावनं वाढली जातायत. तो मनातल्या मनात मोजतो. शेवटचं ३२ वं घावन त्याला वाढायला सासू येताच तो सासूला म्हणतो, 'अहो आई, हे तुमच्यासाठी राहू द्या. आता हे एकच उरलंय तर.'
सासू अवाक् होते. याला कसं कळलं ? तिला कौतुक वाटतं. तिला वाटतं आपला जावई चांगला ज्योतिषी आहे. ती गावभर, शेजारी पाजारी ही गोष्ट सांगत फिरते.
झालं, वदंता सगळीकडे पसरते. एक माणूस टोळंभट्टाकडे येतो, 'अहो, जावईबापू माझं गाढव सकाळपासून हरवलंय. कुठे असेल बरं जरा ज्योतिष बघून सांगता का?'
टोळंभट्ट विचारात पडतो. नाही म्हणावं तर आपल्याला बावळट म्हणतील, हो म्हणावं तर आपल्याला कुठं माहीत आहे गाढव कुठे आहे ते..
पण तो फार न बोलता संध्याकाळी सांगेन म्हणून वेळ निभावून नेतो. तो माणूस बरं म्हणून घरी जातो.
इकडे जेवून, एक झोप काढून टोळंभट्ट गावात चक्कर मारायला निघतो. गाढवाचं काय सांगावं या विचारात फिरता फिरता गावाबाहेर खूप लांब निघून येतो, माळावर. तिथे एक गाढव चरत असलेले त्याला दिसते. तो त्या गाढवाला तिथे एका झाडाशी बांधून ठेवतो.
घरी येतो, तर तो गाढवाचा मालका येऊनच बसलेला असतो, त्याला टोळंभट्ट सांगतो, 'माळावर अमुक अमुक दिशेला त्याला कोणीतरी बांधून ठेवलेले आहे.'.
गाढव सापडते, लोक टौळंभट्टाचं कौतुक करतात. म्हणता म्हणता त्याची ही किर्ती तिथल्या राजापर्यंत जाते. त्याला दरबारात बोलावण्यात येते. राजा त्याला विचारतो, 'तू म्हणे हुशार ज्योतिषी आहेस. माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. खरा ज्यातिषी असलास तर, नाहीतर लोकांना उल्लू बनवतोस हे कबूल कर आणि शीरच्छेदाला तयार हो.'
राजाने एक छोटा पक्षी प्रधानाच्या हातात लपवून ठेवलेला असतो. मुठीत. राजा टोळंभट्टाला सांगतो, 'प्रधानाच्या हातात कोणता पक्षी आहे ते न बघता सांग. तर तू खरा ज्योतिषी.'
आता आली पंचाईत. टोळंभट्ट घाबरतो, खूप विचार करतो, राजा त्याला पुन्हा विचारतो. तेव्हा भट घाबरून म्हणतो, 'आता कुठं जाशील, टोळंभट्टा?'
आणि काय आश्चर्य की राजा खूप खूश होतो. दरबारी सगळे खूश होतात. कारण प्रधानाच्या हातात लपवलेला पक्षी म्हणजे योगायोगाने टोळ असतो. राजाला वाटते की टोळंभट्टाने पक्षी ओळखला. तो त्याला दरबारात नोकरी देतो, वस्त्रालंकार देऊन सन्मान करतो. आणि अशारीतीने टोळंभट्ट सासूरवाडीत मानाचे स्थान मिळवून त्याच शहरात स्थायिक होतो.
असे टोळंभट्ट जागोजागी दिसतील. विशेषतः बाबा-बुवांच्या स्वरूपात गाद्या स्थापून बसलेले आणि लोक त्यांच्या चमत्कारावर भुललेले.
Nov 29, 2020
कोण अल्पसंख्य.. कोण बहुसंख्य..
कोण अल्पसंख्य, कोण बहुसंख्य-
माझं गाव हे कोकणातलं एक मुस्लिमबहुल गाव. एकेकाळी तिथं संमिश्र वस्ती होती. गवळ आळी, कुंभारवाडा, महारवाडा, जंगमआळी आणि मुस्लिम मोहल्ला, गुजराती व्यापारी घरे अशी व्यवस्थित पारंपरीक रचना असलेलं हे गाव.
पन्नास साठ वर्षात हळूहळू मोहल्ला वाढत गेला. इतका की बाकीच्या सगळ्या आळ्या नष्ट झाल्या. हिंदू गाव सोडून गावाबाहेर वसले.
कसे?
मी अनेकदा लिहिलेय, मुस्लिम परिस्थितीने गरीब असतात हे केवळ मी इथं वाचत आलेय. प्रत्यक्षात मी पाहिलेले मुस्लिम सर्व हिंदूंपेक्षा चांगले श्रीमंत होते. आहेत.
कोकणातील बहुतांश मुस्लिम हे सधन आहेत. बोटीवर, गल्फ कंट्रीजमध्ये पूर्वापर नोकऱ्या करणारे आहेत. त्यातून भरपूर पैसा कमवून गावात पक्की टोलेजंग घरे बांधणारे आहेत. त्यांच्या तुलनेत पर्यायाने अशा गाव खेड्यातले हिंदू गरीब आहेत.
माझ्या गावात वाढत्या मुस्लिम संख्येला घरं कमी पडू लागली नि त्यांनी गरीब हिंदूच्या घरांवर सरळसरळ डोळा ठेवला, तो पैशाच्या जोरावर.
गरीब हिंदूना आपल्या घराला लाखालाखात रकमा मिळू लागल्यावर जेमतेम खाऊन पिऊन किंवा तेही वांधे असलेले बरेच लोक आपली घरं मुस्लिमांना सोपवून रोख रकमा घेते झाले आणि त्यांनी गावाबाहेरच्या माळावर, सरकारी जागेत आपल्या झोपड्या, कच्ची घरे उभी केली. गावातून आता जवळपास नव्वद टक्के हिंदू गाव सोडून माळावर, टेकडीवर अशा प्रकारची जेमतेम घरे बांधून राहतायत. (ते पाहून शहरात अशाच जागांवर वसणाऱ्या झोपडपट्ट्याच डोळ्यासमोर येतात.) तसं पाहता हे सरकारी जागेवर अतिक्रमणच होतं. परंतु ते मोठ्या प्रमाणावर होत असताना शेवटी सरकारनेही त्यांना मान्यता दिली.
गाव कोकणातलं, आजुबाजूला जंगल, झाडं, नदी सगळं आहे. मात्र गावात एकही झाड दिसत नाही मोठं. कारण अगदी सिटीप्रमाणेच इंच न इंच जागा बळकावणे हा प्रकार चालू आहे. त्यात झाडांना जागा नाही. हिंदू होते तोपर्यंत त्यांच्या घराच्या मागेपुढे विस्तृत अंगणं आणि त्यात बऱ्यापैकी झाडं होती. विहीरी होत्या. गोठे होते, ते सगळं गेलं.
कोकणात अशी मुस्लिमबहुल गावे भरपूर आहेत. रायगड, रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यातल्या किनारपट्टीपासून पंचवीस तीस किमी परिसरात अशी भरपूर सधन गावे आहेत.
या मुस्लिमांच्या केवळ गावातच नव्हे, तर तालुक्याच्या गावी, जिल्ह्याच्या गावी देखील भरपूर प्रॉपर्ट्या आहेत. तिथे त्यांनी जमिनी घेऊन घरे, ईमारती, चाळी बांधून ठेवल्या आहेत. मात्र त्या ठिकाणी भाड्याने राहणारे हिंदू आहेत. हे मुस्लिम आपली गावे सोडून शहरात रहायला शक्यतो येत नाहीत. मात्र जमिनी घेऊन ठेवतात.
हिंदूंची पुढची पिढी शहराकडे स्थलांतरीत होते. हे देखील गावांतून त्यांची संख्या कमी होण्याचे एक कारण आहे.
थोडक्यात अल्पसंख्य, बहुसंख्य या सापेक्ष कल्पना आहेत, त्या स्थलकालपरिस्थितीप्रमाणे बदलत असतात.
असं म्हणतात, की कश्मीरमध्ये हिंदू अल्पसंख्य होते, पण श्रीमंत होते. तरी तिथे ते विस्थापित झाले.
माझ्या गावात हिंदू अल्पसंख्य होते आणि गरीबही... तरी ते तिथून विस्थापित झाले...
Nov 25, 2020
गिल्ट-
पाप-पुण्य, नीती-अनीती या संकल्पना माणसाने केवळ माणुसकीने वागावं, दुर्बळ मनुष्यालाही बऱ्यापैकी जगता यावं, सबलांकडून त्यांचे शोषण होऊ नये यासाठी तयार केलेल्या आहेत.
Oct 22, 2020
तलाश है, तलाश है....
तलाश है...
Aug 23, 2020
सहज आठवणी -
सहज आठवणी - पाणी
रायगड जिल्ह्यातल्या ज्या गावात राहात होतो. त्या परिसरात पाऊस प्रचंड. धो धो. अक्षरशः तीन महिने तर तो घरात लॉकडाऊन करून ठेवायचा. हलायचा नाही. कुठे जाणं नाही येणं नाही.
पण तेवढाच हा भाग पाण्यासाठी दुष्काळी म्हणूनही प्रसिद्ध होता. पावसाचं पाणी सगळं वाहून जायचं. ते साठवून ठेवण्यासाठी काहीही कुणी केलं नव्हतं.
होळी झाली की, किंवा कधी कधी होळी येण्याआधीच, मार्चमध्ये पाण्याची बोंबाबोंब सुरू व्हायची. ते पाऊस पडेपर्यंत पाण्याचे हाल असायचे.
गावातली छोटीशी, इवलासा जीव असलेली एक नदी पण आटत आटत संकोचून जायची. नदीचं पाणी असंही प्यायला वापरत नसत लोक.
गावात जातीप्रमाणे विहिरी होत्या.
मुसलमानांच्या दोन, हिंदूंच्या दोन, दलित वस्तीत एक.
यात मुसलमानांची एक विहीर आटायची आणि दुसऱ्या विहिरीत बऱ्यापैकी पाणी उरायचं. निगुतीने वापरलं तर मोहल्ल्याला पुरायचं. पण त्या विहिरीवर बाकी कुणी पाणी भरायला जात नसे. आणि हिंदूंच्या विहिरीवर ते येत नसत.
तसंच हिंदूंची नेहमीची एक बाव आटून जायची.
दुसरी गावापासून दीड दोन मैलांवर होती. ती माझ्या पणजोबांनीच बांधून घेतली होती.
त्या विहीरीला झरा होता खाली. उन्हाळ्यातही तो झरा जिवंत असायचा.
नेहमीच्या विहीरीला हौदाची बाव म्हटलं जायचं. आज विचार करता वाटतंय की त्यात हौदाप्रमाणे केवळ पावसाचे पाणी साठून राहायचे आणि झरे आटून जायचे म्हणून हौदाची बाव म्हटलं जात असेल. हौदाची बाव गावाच्या जवळ होती. नदीच्या किनारीच होती. तरी तिचे झरे आटून जायचे उन्हाळ्यात. तर दुसरी जी झऱ्याची बाव होती तिला तळईची बाव म्हटलं जायचं. बहुधा तळाला पाणी मिळायचं म्हणून तळईची बाव. हीच माझ्या पणजोबांनी बांधलेली. पण ती गावाला अर्पण करून टाकलेली. त्यावर सगळ्या गावाचाच नव्हे, तर बाजूच्या गावचा पण हक्क होता. ती गुजराची बाव म्हणून पण ओळखली जायची.
तशी तर मागच्या परसदारी पण एक विहीर होती. ती माझ्या आजोबांनी बांधायला घेतली. पण बरीच खोल खणून देखील तिला झरा लागला नाही. शेवटी तिचा वापरही हौदासारखा झाला. पावसाचे पाणी राहायचे. जानेवारी फेब्रुवारी पर्यंत जेमतेम. साचणीचं पाणी पिण्यासाठी उपयोगी नसायचे. धुण्यापुरतं वापरायचं. मग ती न बांधता तशीच खड्ड्यासारखी सोडून दिली होती. पण फार खोल होती. कुणी पडू नये म्हणून वरून लाकडं, लोखंडी पोलचे तुकडे वगैरे टाकून बंद करून ठेवली होती. फक्त पोहऱ्याने पाणी ओढता येईल एवढा चौकोन सोडून.
लोक तळईच्या विहिरीवरून पाणी आणत. विहीर फार खोल नव्हती. चांगली बांधून घेतलेली होती. उतरायला पायऱ्या होत्या. त्यात खाली उतरून त्या झऱ्याचं साठलेलं पाणी वाटी वाटीने हंड्यात भरून घ्यायचे. मग तो हंडा वरती सोबत आलेल्या दुसऱ्या व्यक्तीच्या हातात द्यायचा. किंवा तसाच कंबरेत घेऊन पायऱ्या चढायच्या.
तोपर्यंत वरती नंबर लागलेले असत. सगळ्यांना मिळायला हवे. थोडी भांडणंही होत. फार नाही. शेजारच्या छोट्या छोट्या गावांचे लोक पण येत हंडे घेऊन. ते रात्री येत कारण रात्री गावातले लोक फार जात नसत. तेव्हा झऱ्याला पाणी भरपूर साठे. अनेकदा तर बाहेरच्या गावातले लोक येऊन तिथे नंबर लावून कडेच्या रस्त्यांवर झोपून जात रात्री. एवढी पाण्याची हलाखी होती.
एकदा का पाऊस पडायला लागला की मग कोणी या विहिरीकडे आठ महिने ढुंकूनही बघत नसे. पागोळ्यांनाच इतकं बदाबदा पाणी पडे की एक मोठा पिंप लावून ठेवला की तो सतत भरलेला राही. शिवाय या विहिरीत एका बाईने फार पूर्वी जीव दिला होता. अहिल्या नावं असावं तिचं. कारण आयलीने जीव दिलाय या विहीरीत असं म्हटलं जायचं. पण पाण्याची हलाखी इतकी होती, की त्यापुढे आयलीच्या भुताला घाबरायचे कारण उरले नव्हते.
काही लोक आपल्या शेतात डवरे खणून ठेवत. असे दहा-पाच डवरे असतील गावात फारतर. ते खाजगी मालकीचे असत. त्यांनी त्या जागा अशा शोधून काढलेल्या होत्या, जिथे छोटासा का होईना झरा लागलेला असायचा. डोहरे वरून डवरे झालं असेल. छोटे छोटे डोह होते. ज्यांच्या मालकीचे असत ते लोक त्याला भवताली काटेरी निवडुंगाचं, थोड्याशा तारेचं कुंपण नि कुलुप लावून ठेवायचे. ते कुलूप फोडून कुणी पाणी चोरत नसे. कारण त्या डोहऱ्यांनाही उन्हाळ्यात एका कुटुंबाची जेमतेम गरज भागवण्याइतकाच जीव असे. चोरून काही उपयोग नसे. फुकट शिव्याशाप खायला लागणार. तळईच्या विहिरीजवळच असा एक एका मुस्लिम कुटुंबाचा डवरा होता. पण कुणी त्यातून पाणी चोरत नव्हतं.
ठरवलं असतं तर माझे पणजोबा देखील त्या विहिरीला कुंपण घालू शकले असते. स्वतःच्या कुटुंबापुरती ठेवू शकले असते. पण पाण्यात पुण्य शोधणारे गुजराती होते ते. गुजरातमधून येताना देखील ते दुष्काळी भागातूनच आलेले. त्यामुळे पाणी सगळ्यांना मिळायला हवं असे त्यांचे विचार होते. प्याऊ बांधणे हे पुण्याचे काम समजायचे गुजराती मारवाडी लोक. आम्ही गेलो तरी रांगेतच पाणी घेत होतो. आम्हाला कुणी तुमची विहीर आहे, तुम्ही आधी घ्या म्हणत नव्हते.
हे असं गावात वर्षानुवर्ष चालू होतं. बाया आणि काही पुरुष सुद्धा दोन किमीवरच्या विहिरीतून डोक्यावर हंड्यातून पाणी वाहून आणत. नळ आले ते फार उशीरा. म्हणजे मी गाव सोडल्यानंतर. मी साधारण विशीत आल्यावर गावात नळ आले. तेही सार्वजनिक. त्याला दिवसातून मर्यादित वेळ पाणी येत असे. ते शेजारच्या एका गावी जिवंत झऱ्यांच्या तुडुंब विहीरी होत्या तिथून बहुधा पाईप टाकून वाहून आणलेले होते. नक्की माहीत नाही कुठून आले.
कपडे धुवायला नदीवर. नदीही आटत आटत वर जायची. ती जितकी वर वर जाईल तिथे पाणी शोधत जायचं. वर.. वर.. तिथून कपडे धुवून आणायचे.
अतीच झालं तर पाच सात किमीवरच्या उसर या छोट्याशा गावी जायचे. तिथे दोन पाण्याच्या विहिरी बारा महिने तुडुंब भरलेल्या असायच्या. पण रोज एवढ्या लांब जायचं खाऊ काम नव्हतं. पाच किमी जायचं नि पाच किमी यायचं.
पावसाळी भात शेती व्हायची थोडी. गाव डोंगराळ भागात होतं. दुष्काळी होतं, तरीही सधन होतं. कारण मुस्लिम सगळे बोटीवर खलाशी म्हणून किंवा आखाती देशांत नोकरीला असायचे.
-अलका गांधी-असेरकर.
Aug 18, 2020
पाचा उत्तराची कहाणी -
बंडखोर
स्त्रिया-
रजियाचा फोन आला आज थेट लंडनहून
किती वर्षांनी तिच्याशी बोलणं झालं.. जवळपास तिसेक वर्ष
उलटली असतील..
मोबाईल युगामुळे, व्हाट्सप आदी सोशल माध्यमांमुळे हे शक्य
झालंय. कुणाकडून तरी तिने माझा नंबर मिळवला आणि थेट फोन करून, "वलख, कोन बोलताय...?’ साधारण अंदाज आला
पण पटकन नाव आठवेना.
ही कुणीतरी गावची मैत्रीण आहे नक्की. कोकणी मुस्लिम मराठी
भाषा. पण नाव चटकन तोंडावर येईना. तेवढ्यात तीच म्हणाली, “मी रजिया. वलकलास
नाय मना?”
“हो हो ओळखलं
ओळखलं. कुठे आहेस कुठे? लंडनलाच की आलेयस
इथं गावी?”
“नाय. लंडनशीच
बोलताय. आलू हुतू जनवरीत. मार्चच्या १५लाच परत घरी आलू. नि हा लॉकडाऊन लागला नाय..?”
नंतर तिचं धबधब्यासारखं बोलणं सुरू झालं. सगळ्या चौकशा करून
झाल्या. आपलं सांगून झालं. माझं विचारून झालं. हा काय करतो, ती काय म्हणते...
तिला तीन मुली नि एक मुलगा. सगळे तिथे छान शिकलेत. दोन मुली
डॉक्टर झाल्यात, एक डिझास्टर
मॅनेजमेंट शिकलीय, मुलगा वकील
झालाय. एक मुलगी एकटीच अमेरिकेत राहून नोकरी करतेय.
वाह, अवघ्या पाचवी
सातवी शिकलेल्या रजियाची ही प्रगती खासच होती. केवळ लंडनचा नवरा मिळाल्याने हे
शक्य झालं होतं. म्हणजे नवरा तर शेजारच्याच गावचा, पण लंडनला नोकरी करत होता. तोही फार काही शिकलेला
होता असं नाही. पण लंडन म्हणजे प्रश्नच नाही ना!... तेही तीस
चाळीस वर्षांपूर्वी म्हणजे.... शानच होती.
खूप छान वाटत होतं. बरेच दिवसांनी ही भाषा कानी पडत होती.
माझी भाषा बदलली. पण तिची अजून तीच आहे. म्हणजे मी काही ती भाषा बोलत नव्हते. पण
गावी असताना आम्ही सगळ्या मुली पण ‘आलो होतो’, ‘गेलो होतो’ असंच म्हणत असू.
ते तालुक्याच्या गावी शिक्षणाकरता आले तेव्हाच सुधारलं होतं माझं. आलो होतोचं 'आले होते' झालं. कधीचच.
गाव सोडून तर वर्षे लोटली. ती लग्न होऊन लंडनला गेली. मी
मुंबईत आले. तिचं जग वेगळं, माझं वेगळं. ते
तेव्हाही वेगळंच होतं. ती माझी खास मैत्रीण होती असं नाही. गाव सोडल्यावरही गावात
असणाऱ्या काकांकडे सुट्टीत जायची मी. तेव्हा या कंपूशी नव्याने ओळख झाली.
नव्याने अशासाठी, की तसं तर या सगळ्या मुली माझ्या बरोबरीच्या. थोड्या मागे
पुढे. शेजारी राहणाऱ्या, पण लहानपणापासून
मैत्री नव्हती. पिढ्यानपिढ्या
एकत्र राहूनही हिंदूमुस्लिम भेदामुळे एक स्पष्ट असा दुरावा होता. त्यांची शाळा
वेगळी. उर्दू माध्यमातली. आमची वेगळी. मराठी माध्यमातली. दोन्ही शाळा सातवी
पर्यंतच. मी सातवी झाल्यावर तालुक्याला मामाकडे पुढच्या शिक्षणासाठी आले. या मुली
तिथेच राहिल्या.. मग मी सुट्टीत गावी जाऊ लागले, तेव्हा यांच्याशी घसट वाढली. आम्ही सगळ्या तारुण्यात
पाऊल टाकत होतो. मी त्यांच्या कंपूत गप्पा मारण्यापुरती सामील होऊ लागले. मुसलमान
लोकांशी फार जवळीक करायची नाही, इत्यादी नियम असण्याचा काळ जरा मागे पडला होता. मुख्य
म्हणजे तसा दबाव निर्माण करणारे, रोखणारे जुन्या पिढीतील आजी आजोबा आता राहिले नव्हते.
गाव मुस्लिमबहुल असलं, तरी आमच्या गावात बुरखा नव्हता, पडदाही नव्हता.
सगळ्या मुस्लिम मुली, बाया गावभर इतर
हिंदूं बायकांप्रमाणेच
बिनधास्त फिरत. सगळ्यांशी बोलत. पुरुषांशी गप्पा मारत. पण तरीही शेवटी
स्त्रियानी कसं वागावं, कसं बोलावं, चालावं याचे
अलिखित नियम सगळ्याच हिंदू मुस्लिम स्त्रियांसाठी होतेच.
पण हा पाचजणींचा कंपू काही वेगळाच होता. हा चारपाचजणींचा कंपू श्रीमंत
बापांचा होता. तसं तर गावच बऱ्यापैकी सधन होतं. अशा श्रीमंत बापांच्या मुली काही
कमी नव्हत्या दुसऱ्याही. पण या लाडावलेल्या होत्या. मुख्य म्हणजे कामाला आळशी होत्या. तशा
तर रुढार्थाने आळशीही म्हणता येणार नाहीत. पण नदीवर धुणं घेऊन जाणे, विहिरीवरून
पाणी भरून आणणे अशी श्रमाची कामं त्या करत नव्हत्या. यांच्या घरात बऱ्याच माम्या,
काकी, वहिन्या असत. त्या ही कामं करत. दिवसभर राबत. त्यामुळे यांना ती कामं
करावीही लागत नव्हती.
बाकीच्या मुली श्रीमंत घरच्या असल्या तरी नम्र असत. सासरी जाऊन कामं करावी लागतील
याच्या तयारीत असत.
पण हा
कंपू, ‘सासरी राबण्यासाठी जातात का? हॅट!’ या विचारसरणीचा होता.
गावात अशा स्त्रिया, मुली अजूनही भरपूर होत्या. स्वतंत्र बाण्याने जगणाऱ्या.
समाजाची फार पर्वा न करणाऱ्या. त्यासाठी टिकाटिप्पण्या सहन करणाऱ्या. तीस चाळीस
वर्षांपूर्वी. मुस्लिम असूनही!
एकेकीची
कहाणी लिहायची, तर एकेकीवर सिनेमा निघू शकेल एक अख्खा. अशी उदाहरणं तीस चाळीस
वर्षांपूर्वी आमच्या गावात होती. त्याच गावच्या पाण्यावर वाढलेली मीही. कदाचित
त्यामुळेच ती बंडखोरी माझ्यातही आली असावी.
गावात पद्धत अशी होती, की मुलींना मुलांकडून मंगनी यावी लागत असे. मगच लग्नं होत.
त्यातच मान होता. शिवाय गावातल्या मुलामुलींची लग्नं गावातच होणं यातही मोठेपणा
होता. ज्या मुलामुलींची लग्नं गावात जमत नसत, त्यांच्यासाठीच बाजूच्या गावात स्थळं
शोधली जात होती. ते कमीपणाचं मानलं जात असे. गावात लग्नं होतायत याचा अर्थ गावात
या घराला, त्यांच्या मुलामुलींना प्रतिष्ठा आहे असा त्याचा अर्थ होता. स्थळांना
तोटा नव्हता. असंही मुस्लिम लोकांत नात्यानात्यांतही बरीच लग्नं होत. पण
मुलामुलींच्या वर्तनावर प्रतिष्ठा होती.
त्यामुळे विशी उलटली तरी या कंपुतल्या मुलींना एकही चांगली मंगनी येत नव्हती. अठरा
विशीतल्या इतर नम्र, कामसू, गरीब मुलींना पटापट मंगन्या येऊन त्यांची लग्नं होऊ
लागली होती.
हा कंपू अरेला कारे करणारा होता. आपल्याच मर्जीने वागणारा होता. तोरा होता. शान
होती.
गावातल्या
सगळ्याच तरुण मुलांना या मुली आवडत नव्हत्या असं नाही. मुली श्रीमंत होत्या, सुंदर
होत्या, तरुण होत्या, मुख्य म्हणजे हुशार, तल्लख होत्या. पण त्या मुलांच्या आईवडिलांना,
पालकांना त्या मंजूर नव्हत्या. ते पालक आपल्या मुलांसाठी यांना मागणी घालणं शक्य
नव्हतं.
दिवसभर हिच्या तिच्या घरी अड्डा ठोकून गप्पा मारत बसणे, गावातल्या तरूण, देखण्या,
होतकरू मुलांवर डोळा ठेवून राहणे, त्यांच्या मागे पुढे करण्याच्या संधी शोधणे हा
उपक्रम धडाक्यात चालू होता यांचा. ही मैत्रीण, ती मैत्रीण, तिचा भाऊ, हिचा काका
अशा होतकरू स्थळांवर खडे टाकून बघायचे. त्यातील एकीला शायरीची, सिनेमांच्या
गाण्याची आवड होती. ती शायरी म्हणे, गाणी म्हणे. मुख्यतः मी त्यांच्या कंपूत सामील
झाले होते ते यासाठीच. तिथेच त्यांच्याबरोबर तेव्हा मी उर्दू लिहायला वाचायला
शिकले.
गाव चहाटळ होतं. लोक तरुण मुलांना विचारीत, “काय रं.. शादी नाय करस त्या अमकीशी?
म्होप देज मिलंल ना...”
त्यावर तो मुलगा किंवा त्याचे पालक म्हणत, ‘हो, म्होप देज मिलंल, पन आमचा घर नाय
ना तवरा म्होटा. त्या असबाब आनतील तो ठेवाय जागा हवी ना..”
या पाची
मुलींना त्याची पर्वा नव्हती. म्हणजे लग्न तर करायचं होतं, पण त्यासाठी तत्वं
मोडायची नव्हती. ते आपल्याच अटीवर करायचे होते. त्या बिनधास्त होत्या. आवडलेल्या
मुलाला स्वतः प्रपोज करीत, विचारीत, “शादी करशील?” मुलगे हसून टाळत. त्यांना
यांच्याशी लग्नं करायचं नव्हतं असं नाही. पण आईबाबांना नि घरच्यांना कोण समजावणार?
पण अर्थात कुणीही येरागबाळ्याने मंगनी टाकावी नि त्या मुलींनी किंवा त्यांच्या घरच्यांनी कबूल करावी अशीही परिस्थिती नव्हती. त्यामुळे मंगनी कुणाकडून येते याला महत्त्व होतंच.
एक मुलगा पाचींच्या नजरेत भरला होता. चांगला होता. त्याचं दुकान होतं. ते दुकान
थोडं गावाबाहेर, एकान्तात असं होतं. दिवसभर त्याचा बाबा दुकानात असे. नि हा मुलगा
शेतीबितीची कामं बघे. संध्याकाळी त्याचा बाबा नमाज पढायला निघून जाई तो पुन्हा येत
नसे. परस्पर घरी जाई त्या वेळेत हा मुलगा येऊन दुकानात बसे.
झालं.
या आमच्या पाची मैत्रिणी संध्याकाळी फिरत फिरत त्याच्या दुकानावर पोचत. त्यावेळी
फार गर्दी नसे. तिथं गप्पा, हंसीमजाक चाले. दुकानात बाबा दिसला तर लांबूनच कल्टी
मारायची. शेवटी तो मासा त्यातील एकीच्या गळाला लागला. बाकीच्या बाजूला झाल्या.
मैत्रिणींमध्ये स्पर्धा नको. तिचं भलं झालं. ती गेली. तो खमक्या निघाला. आपल्या
घरच्यांना त्याने पटवलं.
दुसरीच्या प्रेमात एक गावातला देखणा, राजबिंडा तरुण पडला. गल्फमध्ये चांगला
कमावता. पण त्याच्या घरचे तयार होणं शक्यच नव्हतं. या कंपुतल्या मुली कुणालाच नको
होत्या गावात. नाकापेक्षा मोती जड. तो म्हणाला, “पळून जाऊ. अलिबागला जाऊन
कोर्टमॅरेज करू.” पण ही तयार नव्हती.
गावात
अशी प्रेमलग्नं होत होती तेव्हाही. अगदी मुस्लिम गावातही. कारण एकाच धर्मात असलं
तरी आईबाबांची परवानगी नसायची. आम्ही असताना परस्पर लग्न ठरवतात म्हणजे काय? आईबाप
अडवणुकीचं धोरण अवलंबत. मुलं मग पळून जात. कोर्ट मॅरेज करून आलेल्या मुलांना झक
मारत घरात घेत. पण त्या मुलीला आयुष्यभर हाडुतहुडूत केले जाई, पळपुटी म्हणून
हिणवले जाई. आईबाबांच्या परवानगीशिवाय आली म्हणून मान मिळत नसे.
यासाठीच ही तयार नव्हती त्याच्याबरोबर पळून जायला. लग्न करायचं असेल, तर आईबाबांना
पटव. मंगनी टाक. रितसर लग्न कर.
इकडे
हिचा स्वाभिमान जागृत, तिकडे त्याचे आईबाप हट्टी. शेवटी त्याच्या आईबाबांनी गरीब,
सालस, कामसू, नम्र अशी आपल्या अपेक्षेत बसणारी मुलगी निवडली आणि त्याचं लग्नं
जमवलं.
हिला
प्रचंड आघात बसला. डिप्रेशन आलं. मनातल्या भावना व्यक्त करायला फक्त आमचा कंपू
होता. तिथे ती रडायची. खरंतर ही सुद्धा त्याच्यासमोर जेमतेम होती दिसायला. तरी
म्हणायची, ‘आवरा देखणा, सुनहरे बालोंवाला दुल्हा त्या बावळट बाईच्या दारात बारात घेऊन जाईल. तिच्या अंगणाची शोभा वाढवेल. लायकी तरी हाय काय तिची?’
लग्नाच्या
आदल्या रात्री, आमच्या समोर त्याने तिला शेवटचा प्रस्ताव ठेवला, ‘अजूनही चल. पळून
जाऊ. अलिबागला जाऊन कोर्टात लग्न करू. आईबाबांचं काय करायचं ते मी बघेन.’ पण ती
निश्चयाला ठाम. प्रचंड स्वाभिमानी. पळून येणार नाही. स्वाभिमान गहाण टाकणार नाही.
पळून गेलं की आयुष्यभर ऐकावं लागेल. रीतसर झालं तर स्वतःच रुबाबात म्हणता येतं, की
तुम्हीच मंगनी टाकली होती मला नि आणली होती.
दुसऱ्या
दिवशी त्याचं लग्नं झालं, नी हिने स्वतःला शायरीच्या गममध्ये बुडवून घेतलं. बऱ्याच
वर्षांनंतर मग तिला शेजारच्या गावच्या एका थोराड व्यक्तीची मंगनी आली. तिने रुकार
दिला आणि ती लग्न होऊन दुसऱ्या गावी निघून गेली.
तिसरी एका मुलाच्या प्रेमात पडली. पण मुलगा निकम्मा होता. हिचे बाबा तयार नव्हते.
खरंतर ही एकुलती एक मुलगी त्यांची पण ती पळून गेली त्याच्यासोबत. मग त्यांनी
तिच्याशी संबंध तोडले. पण तो चांगला निघाला नाही. सासरी भरपूर जाच झाला. त्रास
झाला. नि एक मुलगी लहान पदरात असताना तिने स्वतःला जाळून घेतले. मुलीला तिची आई
आपल्या घरी घेऊन आली.
चौथीची
कहाणी वेगळीच. ही त्या शायरीवालीची सख्खी लहान बहीणच. हिला काही मंगनी येणार नाही.
मंगनीची वाट पाहात वर्षे घालवण्यापेक्षा तिचं घरातल्याच चुलतभावाशी लग्नं ठरवण्यात
आलं. तो मुलगा पण गल्फला चांगली नोकरी करत होता. कमवत होता. स्वभावाने सरळ होता.
पण हिला ते मंजूर नव्हतं. घरातल्या घरात तिला लग्नं करायचं नव्हतं. पण घरातले ऐकत
नव्हते. रोज आमच्या ग्रुपमध्ये बसून ती रडायची. तिला बाकीच्या समजवायच्या, “शादी
झैल्यावर वाटंल तो तुला न्हवऱ्यासारखा आपसूक.” मी म्हणायचे, “का नाही म्हणतेस? का
नको म्हणतेस त्याला? चांगला तर आहे तो?” पण ती काहीच बोलत नव्हती. फक्त म्हणायची
की तो मला भावासारखाच वाटतो. मला त्याच्याबद्दल काही भावना नाही निर्माण होत.
तिचं
जबरदस्तीने लग्नं लावण्यात आलं. पण ती नवऱ्याबरोबर एक दिवसही नांदली नाही. लग्न
झालं की होईल सगळं नीट, आपसूक असं वाटणाऱ्या सगळ्यांना तिनं खोटं ठरवलं. ती बधली
नाही. शेवटी नवऱ्याने दुसरं लग्नं केलं दोनतीन वर्षे वाट पाहून. आणि तो आपल्या
दुसऱ्या बायकोला घेऊन गल्फला निघून गेला. ही तशीच राहिली. आईबाबा, काकाकाकी वारले.
ही अजूनही एकटीच आहे. मात्र तो तिला खर्चाला पैसे पाठवतो.
अनेक वर्षांनी कोडं उलगडलं. ज्या देखण्या सुनहऱ्या बालोवाल्यावर मोठ्या आपाचं
प्रेम होतं. तोच हिलाही मनोमन आवडत होता. त्या विषयाने पुढे अजून वेगळंच वळण
घेतलं. ती कहाणी अजून वेगळीच होईल.
आणि पाचवी ही रजिया. सगळ्यात शेवटी तिचं लग्न झालं. शेजारच्या गावातला लंडनला
नोकरीला असलेला मुलगा तिच्या आईने शोधला. तिला वडिल नव्हते. पण वडिलांनी जाताना
भरपूर ठेवलेला पैसा होता. ती लग्न करून लंडनला गेली. तिथेच स्थायिक झाली. चार मुलं
झाली. ती मुलं, आणि मुलीही इतक्या उच्चशिक्षित झाल्या. काल तिचा फोन आला तेव्हा
आवाजात अजूनही बेदरकारी तशीच आहे. आत्मविश्वास तसाच ठासून भरलेला आहे. याचा अर्थ
तिचं तिथं सुशेगाद चालू आहे. नवरा मुठीत आहे.
खरंतर या सगळ्या घटना घडत होत्या त्या त्यांच्या विशीपंचवीशीत. सगळ्या तिशीच्या
आतच बोहल्यावर चढल्या. पण त्या काळात तो उशीर होता. जिथे अठरा वीस फारतर बावीस
वर्षात पोरी उजवल्या जात होत्या. तिथे यांना केवळ आपला स्वभाव, स्वातंत्र्य आणि
बंडखोरी यामुळे लग्नासाठी संघर्ष करावा लागत होता. चाहे जो भी हो जाए या झुकायला
तयार नव्हत्या. आपल्या तत्वांना मुरड घालायला तयार नव्हत्या. त्या जगल्या, मेल्या
त्या आपल्याच मर्जीने, आपल्याच मतांवर ठाम राहून.
- अलका गांधी-असेरकर.
किसी पिछले जनम की बात...
मुगले आजम हा सिनेमा पन्नास वर्षानंतर रंगीत झाला, त्यालाही आता जवळपास 20 एक वर्ष लोटली. 🤦काळ किती भराभर चाललाय... तेव्हा टीव्हीवर दिलीप क...
-
शरीफा नेहमीच जुम्म्याची वाट बघत असायची मनोमन. ज्याप्रमाणे नोकरदार लोक रविवारची वाट पाहात असतात तशीच. जुम्मेरातपासून म्हणजे गुरूवारपासूनच ति...
-
कोण अल्पसंख्य, कोण बहुसंख्य- माझं गाव हे कोकणातलं एक मुस्लिमबहुल गाव. एकेकाळी तिथं संमिश्र वस्ती होती. गवळ आळी, कुंभारवाडा, महारवाडा, जंगमआळ...
-
सकाळचं ऊन माझ्या घरात कोवळ्या बाळपावलांनी रांगत येतं..किलकिल्या उघड्या फटीतून डोकावतं. अगदी तस्संच, जसं एखादं नवीन आलेल्या शेजा-याचं तान्हं ...