Sep 14, 2022

कादंबरी परीक्षण (रिक्त.. विरक्त.)

 रिक्त... विरक्त.

छाया कोरेगावकर




 

छाया कोरेगावकर ह्या कवी-लेखिकेची रिक्त विरक्त ही कादंबरी नुकतीच वाचली. तृतीय पुरुषी निवेदनात सावित्रीची ही कहाणी. ही सावित्री काहीशी कालच्या पिढीतलीच. सामाजिक चौकटीत बंदिस्त व्यक्ती किती काय काय भोगतात आयुष्यभर याचीच ही कहाणी.

एक आडनिड अल्लड वयातली मुलगी प्रेमाच्या आशेवर एका तरूण मुलाच्या आकर्षणात पळून जाऊन त्याच्याशी लग्न करते. परंतु तो चांगला निघत नाही. दारू, मारहाण, घराबाहेर हाकलून देणं असं करत प्रेमाचे पर्यवसान ऐन विशीत पदरात एक मूल घेऊन माहेरी परत असे होते.

सावित्री नंतर शिक्षण पूर्ण करते, स्वतःच्य पायावर उभी राहते, स्वतःचं घर घेते, मुलाला वाढवते...

म्हणजे समाजाच्या दृष्टीने बाई चांगलं जगते.. नवऱ्याने सोडलेल्या बाईने असंच जगायला हवं. हिंमतीने..

पण... इतकी वर्ष बाई आपल्या शरीराच्या भूका आणि प्रेमाची तहान मारून जगते. अगदी ऐन विशीपासून ते चाळीशी उलटेपर्यंत. याची खंत खेद ना कधी समाजाला असते, ना घरच्यांना, ना नातेवाईकांना...

याच जागी पुरुष असला, तर ... त्याच्या लग्नासाठी चहुकडून आग्रह धरला जातो.. सहानुभूती दर्शवली जाते.

सावित्रीच्या लग्नासाठी प्रयत्न जरी केले असते, तरी त्या काळात आणि अजूनही एक मूल पदरात असलेली आणि घटस्फोटीत स्त्रीचं दुसरं लग्न होणं, तेही चांगल्या स्थळाशी होणं हे अतिशय कठीण आहे.

अशा चाळीशी उलटलेल्या सावित्रीच्या आयुष्यात एक तिच्याहून थोडा मोठा म्हणजे पन्नाशीतला विवाहीत, दोन मुलांचा बाप असलेला पुरुष येतो आणि तिचं आयुष्य ढवळून निघतं. घरी, दारी, ऑफीसमध्ये निंदा, नालस्ती, चौकशा, बडतर्फ्या, बदल्या यांना सतत या दोघांना सामोरं जावं लागतं. त्याला आपल्या पहिल्या बायको मुलांचा तिरस्कार आणि हकालपट्टी सहन करावी लागते.  ऐंशी नव्वदचा काळ, मध्यमवर्गीय आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय पार्श्वभूमी, तसाच समाज, जातसंदर्भ.. व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यात विनाकारण ढवळाढवळ करणारा, त्याला सुखाने जगू न देणारा तेव्हाचा समाज. आजही ही परिस्थिती फारशी बदलली नसली, तरी थोडी निवळली आहे एवढंच..

दोघांचे एकमेकांवर प्रेम असते, आणि विचारसरणी सारखी असते एवढंच काय ते सूख... बाकी शरीरसुखाचा इथंही उजेडच असतो. जो पुरुष तिच्या आयुष्यात आलाय, तोही तिला शरीरसुख देऊ शकत नाहीच. थोडक्यात सावित्रीचं अख्खं आयुष्य शरीरसुखाला वंचित राहून जातं. प्रेमाची व्यक्ती आयुष्यात येऊनही ती उपाशीच राहते...रिक्त राहते.. विरक्त राहते... या अर्थाने कादंबरीचं शीर्षक अगदी नेमकं आहे.

खरंतर हे फार भयंकर आहे. एकदाच मिळालेल्या मानवी आयुष्यात एखाद्या व्यक्तीला अशा प्रकारे केवळ सामाजिक चौकटी, सामाजिक नीतीनियम, रितीरिवाज या कारणांनी आयुष्याच्या महत्त्वाच्या गोष्टींपासून वंचित राहावं लागत असेल, तर ते भयंकर आहे. विकृत आहे. पण... असं आपल्या समाजात सहन करणाऱ्या हजारो सावित्री असतील. असतात. अगदी पुराणकाळापासून आणि इतिहासकाळापासून हजारो बायका आपल्या शरीराच्या वासना कायमच्या मारून जगल्या. बाईच्या शरीराचा विचार तिच्या सुखासाठी कुणी कधी केलेला दिसलाच नाही. विधवा, घटस्फोटीता, कुमारिका यांच्या शरीरसुखाचा विचार कुणीच कधी केला नाही नि अजूनही कुणी फारसा करत नाही.

पण.... कादंबरी सावित्रीच्या जीवनाची ही बाजू मांडण्यात कमी पडलीय. आयुष्यात आलेल्या 
दुसऱ्या पुरुषामुळे सावित्रीला कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं लागलं याचा पाढा जास्त वाचला गेला आहे. याऊलट एका मोठ्या सुखाला कायमचं वंचित राहिल्यामुळे तिच्या मनात आणि शरीरातही उठणारी वादळे, कल्लोळ, तगमग, विद्रोह, येणारे विचार हे सगळं कादंबरीत कुठंच फारसं येत नाही. त्याबद्दल सावित्री फार बोलतच नाही. हे सगळं यायला हवं होतं. पण इथंही बाई आपल्या शरीरसुखाबद्दल मौन बाळगतेय. बाईची लैंगिक उपासमार, उपासाचे दुष्परिणाम, हे सगळं बारकाईने मांडण्याची संधी लेखिकेने गमावली आहे. आणि कादंबरी बाईपणाच्या मर्यादेच्या चौकटीतच राहिली.


आयुष्यात सुदैवाने आलेल्या दुसऱ्या पुरुषाकडूनही प्रेम मिळतं पण शरीरसुख मिळत नाही, तरी सावित्री त्याच्याऐवजी इतर पुरुषाचा विचार त्यासाठी करत नाही. 
कादंबरी ऐंशी नव्वदच्या काळातले मध्यमवर्गीय सामाजिक वास्तव, त्या काळातली स्त्रियांकडे, स्त्रीपुरुष संबंधांकडे पाहण्याची दृष्टी अधोरेखित करते. आजची सावित्री कदाचित वेगळी वागेल. स्वतःच्या शारिरीक वासनांची कोंडी ती इतकी करणार नाही.

ग्रंथाली प्रकाशनाची ही कादंबरी रसाळ आहे. वाचताना एक ओघ कायम राहतो. कंटाळवाणं होत नाही. त्यामुळे कादंबरी पूर्ण वाचून होते. हे या कादंबरीचं यशच म्हणायला हवं. 

 या निमित्ताने एक महत्त्वाची पण स्पष्ट अशी गोष्ट इथं सांगावीशी वाटते ती अशी की चाळीशी पन्नाशी उलटलेल्या पुरुषांकडून शरीरसुखाची अपेक्षा बाळगून त्याच्याकडे जाताना स्त्रियांनी देखील त्याच्या क्षमतेचा विचार करणे गरजेचे आहे. या वयातला पुरुष आपल्या शरीराच्या मागण्या किती पूर्ण करू शकेल याचा विचार सावित्रीच्या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक स्त्रीने नक्की करायला हवा. मुख्य म्हणजे लैंगिक सुख आणि विवाह यांची गल्लत करून आपली फरपट करून घेऊ नये. आणि लैंगिक सुख कुठल्याही पुरुषाकडून किंवा स्त्रीकडूनही मिळू शकेल हे गृहीत धरून चालू नये,  एवढं तरी या कादंबरीतून नक्कीच कळतं.  

Jul 8, 2022

रिमझिम गिरे सावन....

रिमझिम गीरे सावन ...

दमदार पाऊस सुरू झाला की "रिमझिम गिरे सावन" या गाण्याची हमखास आठवण येते. कारण मुंबईचा आसमंत ओलाचिंब करून टाकणारा पाऊस या गाण्यात व्यवस्थित चित्रित झालाय. पाऊस अंगावर घेत, चिखल पाणी तुडवत अमिताभ आणि मौसमी मुंबई, मरीन ड्राईव्ह, आझाद मैदान, परिसरात वेड्यासारखे फिरत असतात, कट्ट्यावर समुद्राच्या लाटा अंगावर घेत असतात..
म्हणजे इतक्या सुंदर निसर्गाचे वर्णन असलेले गाणे चक्क मुंबईत, तेही सिग्नल, स्टेशन इत्यादी परिसरात चित्रित केले जाऊ शकेल यावर कुणाचा विश्वास देखील बसणार नाही. पण म्हणूनच आपली चित्रपट नगरी थोर आहे. जे ना सोचे हम तुम वो सोचे बॉलिवूड...
फक्त यात अमिताभ पूर्ण सुटाबुटात का भिजताना दाखवलाय ते माहीत नाही.. आणि साडी नेसून पावसात भिजणे, बर्फात धावणे आणि  नाचणे हे केवळ बॉलिवूड अभिनेत्रीच करू जाणे... आम्हाला इथे घरापासून स्टेशन पर्यंत साडी नेसून चालायचे म्हटले तर परकर पायात अडकतो...🤦
मौसमी त्या काळातील स्त्रिया नेसत तशी टिपिकल प्रिंटेड शिफॉनची अत्यंत साधी साडी नेसून आहे तरी क्यूट दिसते. पण अमिताभ सुटात चिखल उडवत धावताना येडा दिसतो .. पण मुंबईसारख्या शहरात पाऊस अंगावर घेत धुंदीत पळण्याचे काम वेडेच करू शकतात .. नाही का?? बाकीच्यांनी बायकोला भजीच तळायला लावून गलासच घेऊन बसावे आणि कांदेनवमी साजरी करावी....!

Jul 6, 2022

संपन्न वारसा

हरप्पन संस्कृती मधील मोएनजो दरो आणि हरप्पा ही दोन गावे तर पाकिस्तानात गेली. ती बघायची खूप इच्छा असूनही ते शक्य नाही. पण याच संस्कृतीतील लोथल हे गाव अहमदाबाद जवळ असल्याने ते बघायचे कधीपासून मनात होते. ते आज पाहिले... 
साडेतीन हजार वर्षापूर्वी मातीत गडप झालेली ही गावे... त्यांचे बाथरूम, चुली, गोडाऊन, डॉकयार्ड, कारखाने... सगळ्यांच्या विटांच्या रांगा फक्त शिल्लक आहेत. गाईड म्हणाला की या भिंती दहा बारा फूट खोल होत्या. नंतर त्या मातीने भरून घेतल्या परत. तो proper गाईड नव्हता. तिथे काम करणारा माणूस होता. पण तो म्हणाला की आधीच्या पूर्ण भिंतींचे फोटो काढून म्युझियम मध्ये ठेवलेले आहेत. तो कितपत खर खोटं सांगत होता माहीत नाही. लोथल हे मुएंजो दरो आणि धोळा विरा प्रमाणे अजून युनेस्कोने जपायला घेतलेले नाही. त्यामुळे तिथे अनास्था दिसते. 
 म्युझियम दुरुस्ती साठी बंद असल्याने बघता आले नाही.
त्यात तिथे सापडलेल्या टेराकोटा, शंख शिंपले आदिपासून बनवलेल्या मण्यांच्या माळा, भांडी, खेळणी वगैरे ठेवलेली आहेत.
याशिवाय तांबे आणि ब्राँझच्या वस्तू... टेरकोटाच्या भांड्यांवर पेंटिंग आहे.
काल पाच - सात मजली विहिरी पाहिल्या. परवा मोढेराचे सूर्यमंदिर पाहिले. भारतात अशा प्राचीन वास्तू, शिल्पे, मंदिरे, मुर्त्या अनेक ठिकाणी पाहायला मिळतात.. 
प्रत्येक शिल्प कथेत सगळीकडे स्त्रिया, पुरुष, मुले सोबत बरोबरीने वावरताना दिसतात. कुठेही स्त्रिया घुंघट मध्ये दिसत नाहीत. 
शिल्पातील एकेका स्त्रीच्या अंगावरील आभूषणे, त्यांच्या केशभूषा बघता थक्क व्हायला होते. व्यवस्थित शेप दिलेल्या दाढीवाल्या पुरुषांची शिल्पे, स्त्रियांच्या हातात पर्स, आरसा, पुस्तक, लेखणी इत्यादी वस्तू.. कोरलेली वाक्ये, लिपी, भाषा ...हे सर्व पाहता भारतात दीड दोन काय, त्याहून कितीतरी अधिक वर्षे आधीपासून संपन्न, आधुनिक अशी नगरे होती, कारखाने होते, निर्मिती होती. ज्ञान होते. याचे ढळढळीत सूर्यप्रकाशा इतके लख्ख पुरावे ठायी ठायी आढळतात.
तरीही जेव्हा भारतात मोगल आणि इंग्रज येई पर्यंत काहीच, अगदी सुई देखील बनत नव्हती असे म्हणणारे, आणि बनत होते असे म्हणणाऱ्या लोकांना मंद, अंध भक्त इत्यादी म्हणणारे अतीशहाणे लोक किती खोटारडेपणा करतात ते कळतं...
अनेक प्राचीन मंदिरे भूगोल आणि खगोलशास्त्राच्या परफेक्ट ज्ञानावर अशा रीतीने स्थापित आहेत की सूर्यकिरणे ठराविक वेळी बरोबर गाभाऱ्यातील मूर्तीच्या पायावर येतात.
Harappan कालीन नगरात शास्त्रशुद्ध भुयारी गटार व्यवस्था होती. होड्या होत्या, जहाजे होती, व्यापार होता, कला होत्या, क्रीडा होत्या....
आपण अशा एका संपन्न वारशाचे वंशज आहोत. याचा आनंद वाटतो.

Jun 17, 2022

नाशिकची नवलाई -

कढी-वडा, कढी-समोसा, कढी-भेळ....


हे नाशिकला मिळणारे पदार्थ आहेत...
यातील कढी-समोसा खाऊन पाहिला....
कढी भेळ खायला अजून मन घट्ट नाही झालं.
शिवाय वेगवेगळ्या अमृततुल्य चहांसोबतच गुळाचा चहा, देशी गुळाचा चहा, बासुंदी चहा, चुलीवरचा चहा,तंदूर चहा... हे पण आहेच.
एके ठिकाणी एकशे वीस प्रकारच्या मटक्यातल्या खिचड्या मिळतात. म्हणून घेतली, तर ती साध्याच भांड्यात नेहमीसारखी बनवलेली. फक्त पार्सल देताना ते मातीच्या मटक्यात भरून दिले....
मिसळी तर विचारूच नका.. आठवड्यातून दोनदा मिसळीचं पार्सल मागवून सहकुटुंब खाल्लं नाही, तर नाशिककरांना कायद्याने काहीतरी शिक्षा होत असावी बहुधा... इतकं नाशिककरांना मिसळीचं वेड आहे. मिसळीसोबत इथं पापड आणि गोड पदार्थ जिलबी इत्यादी देतात. त्यात द्राक्षाच्या मळ्यातली मिसळ, पेरूच्या बागेतली मिसळ अशा गंमतीजंमतीही आहेत.
इथं एक पाव-वडा हा पदार्थ सगळीकडे मिळतो. यात अख्खा पाव बेसनपीठात बुडवून तळलेला असतो. त्यात अगदी नावाला, बोटभर बटाट्याचे सारण भरलेले असते. ठिपक्याएवढे.... पिझ्झाचे सात तुकडे करतात, तसे त्या मोठ्या तळलेल्या पावाचे सात तुकडे कापून वर चटणी टाकून देतात.
हे असे चित्रविचित्र प्रकार केवळ मुंबई सोडून इतर शहरातच मिळू शकतात. मुंबईकर एक वडा-पाव, आणि दुसरं पावभाजी इतक्या दोनच पदार्थांवर खुश राहू शकतात. हॉटेलमध्ये गेल्यास फारतर इडली डोसा.... संपला कारभार.
मुंबईतून पोहा, थालिपीठ, साबुदाणा खिचडी, मिसळ हे मराठी पदार्थ तर जवळपास हद्दपार आहेत. क्वचितच कुठे मिळतात. शोधून शोधून खायला लागतात.
इथं नाशकात हॉटेलमध्ये गेलात की शेवभाजी आणि लसूनी मेथी सगळीकडे मिळते. त्यात दूध शेव भाजी हा एक महागडा पण चांगला प्रकार असतो. मुंबईला हॉटेलमधून न मिळणारा मराठी भाकरी हा प्रकार इथं सर्रास मिळतो. यात ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदूळ इत्यादी सर्व पीठांच्या उत्तम भाकरी मिळतात. जेवण तिखटच असतं इथं. ब्राम्हणी मिळमिळीत जेवण अजून तरी सापडलं नाही कुठे तिथे.
मात्र इथं डोंबिवलीसारखी ठायी ठायी पोळी-भाजी केंद्रे नाहीत.


May 6, 2022

सरस्वती

 




"ज्या देशात विद्येची देवता सरस्वती आहे, त्याच देशात स्त्रियांना शेकडो वर्षे शिक्षणांपासून वंचित ठेवले गेले."
असे वाक्य मी नेहमी म्हणत असते.
मात्र प्राचीन मंदिरे आणि लेण्या पाहत असताना, त्यात अनेक स्त्रिया एका हातात पेन आणि दुसऱ्या हातात कागद घेऊन लिहितानाच्या मूर्त्या आहेत. अनेक स्त्रिया नृत्य करताना, वाद्ये वाजवताना दिसतात. मुक्त शृंगार करताना दिसतात. अगदी सर्वसामान्य स्त्री आपल्या कडेवर मुल घेऊन रस्त्यावरची मिरवणूक बघते अशा मूर्त्या दिसतात. त्यात तिच्या डोक्यावर पदर नसतो, खालचे वस्त्र फक्त जेमतेम गुडघ्यापर्यंत, आताच्या बर्म्युडासदृश्य असते. अनेक मूर्त्यांच्या उरोभागावर वस्त्र नसते. 
प्राचीन मंदिरे, लेणी यातील कुठल्याही मूर्तीच्या चेहऱ्यावर बुरखा, घुंघट, पदर, स्कार्फ सारखे कोणतेही वस्त्र मी अजून तरी पाहिले नाही. 
हम्पीसारख्या ठिकाणी खुद्द राजाची पत्नी सणावारी सार्वजनिक ठिकाणी शास्त्रीय नृत्य करत होती याची माहिती गाईड देतो. मग असे नृत्य गरत्या बाईने करू नये, असे केव्हापासून समाजाच्या मनावर बिंबले असेल?
पुराणकथात कुठेही स्त्रिया घरी बसल्यात आणि फक्त पुरुष  ऍक्टीव्ह आहेत असे दिसत नाही. पांडवांबरोबर द्रौपदी फिरतेय, रामाबरोबर सीता फिरतेय. अशा जोड्याजोड्याच दिसतात. त्या कृष्णाशी चर्चा करतायत, युद्धावर बोलतायत, वेदना व्यक्त करतायत. जाब विचारतायत. 
असे जर असेल, तर नेमकं कुठल्या काळापासून भारतातील स्त्रिया घुंघट, पदर, बुरखा, पडदा घेऊ लागल्या असतील, अशिक्षित राहू लागल्या असतील, असा प्रश्न पडतो. हे अंधारयुग नेमकं कधी आणि का सुरू झालं असेल, यावर अभ्यासपुर्वक मांडणी केली जायला हवी.
मग सरस्वतीला उगा दोष देण्यात काय अर्थ?  समाज बाह्य परिस्थीतीने बदलतो, हतबल होतो, असहाय होतो असेही घडू शकते ना? 

Feb 6, 2022

सूरमयी..

 झोपडीपासून ते महालापर्यंत, चार पिढ्यांमधील सान-थोर सर्वांना एकाच दरात, किंबहुना जवळपास फुकट आनंद  देणारा एकच आवाज, किंवा एकच कुटुंब होतं म्हणू या... ते म्हणजे मंगेशकर घराणे.
हा आवाज कुठे नव्हता..?
पानाची टपरी, आदीवासी पाडे, जंगल, मंदिरे, बॉर्डर, बांधकाम ठिकाणे, लहान मोठी हॉटेल्स, लग्नं, पार्टी, वाढदिवस, प्रजासत्ताक दिवस, स्वातंत्र्य दिन, सण-वार, गणेशचतुर्थी, दत्तजयंती, दिवाळी And What not... ही सगळी ठिकाणे, प्रसंग लताचा आवाज नसता तर कसे साजरे झाले असते कोण जाणे?
बांधकामाच्या ठिकाणी, पानाच्या टपऱ्या इत्यादी ठिकाणी एक बारीकसा रेडीओ स्वर पाझरत राहायचा... आणि त्या तालावर मजूरांचे श्रम हलके होत राहायचे... अगदी जंगलात आदिवासी पाड्यांवर देखील  हा आवाज गुंजत राहिलेला मी पाहिलाय. 
कान्होपात्रा ते ज्ञानेश्वरांपर्यंत सर्व संत, ग्रेस ते भट सगळे कवी यांच्या अवघड रचना सोप्या करून सर्व सामान्यांपर्यंत पोचल्याच नसत्या, जर हे कुटुंब नसतं तर....
अगदी सर्वसामान्यांना शास्त्रीय राग, सूर यांची माहिती आणि आवड निर्माण नसती झाली, जर हे कुटुंब नसतं तर...
हा स्वर्गीय स्वर सर्वांना समान उपलब्ध होता.
सुखात, दुःखात, आनंदात, आजारपणात, प्रवासात, घरात, हॉल, पार्टी, हॉटेल ..... सगळीकडे हा आवाज नेहमी सोबतीला राहिला....
हा स्वर्गीय आवाज असूनही तो इतका स्वस्त दरात आणि इतका सहजपणे सर्वांना उपलब्ध होता की, लोकांना आपल्याला काही स्वर्गीय गोष्ट इतक्या सहजपणे उपलब्ध आहे, याची जाणीवही नव्हती. इतका तो आवाज गृहीत धरला गेला होता. 
कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वांना एका सूरात बांधू ठेवणारा हा आवाज होता. भारतात कुठेही गेले तरी हा सूर कानावर येतच राहायचा कुठून ना कुठून. आणि आपण आपलं घर, गाव, भाषा सोडून बाहेर आलोय असं वाटतच नसे.
या लोकांनी इतरांना पुढे येऊ दिलं नाही म्हणतात.... का येऊ द्यावं? त्यांचंही नाणं खणखणीत होतं म्हणून ते चार पिढ्यांपर्यंत वाजत राहिलं ना.... नसतं तर त्यांनाही सारून कुणीतरी आलंच असतं पुढे....
ते दळभद्री आणि छिद्रान्वेषीच, जे या कुटुंबाचेही दोष शोधून त्यांना शिव्या घालतात.... अशा कृतघ्न जीवांना कुठेच शांती नसते..........


Nov 17, 2021

अविकास आणि हिंसा

 सामाजिक राजकिय विकास आणि त्या त्या ठिकाणचा समाज, माणसे यांची प्रगती यांचा थेट संबंध असतो का असा प्रश्न पडतो.

विकास नाही, शैक्षणिक सुविधा नाहीत म्हणून त्या त्या ठिकाणचे किंवा अमुक तमूक समाजाचे लोक हिंसेकडे वळतात यातही कितपत तथ्य आहे?
हिंसा ही प्रवृत्ती असते. ती वैयक्तिक असते, तशीच सामाजिकही असते. तिचा विकास, गरिबी, श्रीमंती याच्याशी फारसा संबंध नसावा. अपवाद वगळता.
विकास नाही म्हणून हिंसा, नक्सलवाद, विकास नाही म्हणून शेतकरी किंवा इतर आत्महत्या, विकास नाही म्हणून आंदोलन, मोर्चे, तोडफोड इत्यादी इत्यादी....
याचा थेट संबंध जोडणं शक्य नाही.
विकास नाही, म्हणून आर्थिक दरिद्री समजल्या जाणाऱ्या कोकणात एकाही शेतकऱ्याची आत्महत्या ऐकीवात आली नाही अन्यथा.
राजस्थान, गुजरात ही एकेकाळची अविकसित राज्ये. राजस्थान तर उजाड, पाण्याचे दुर्भिक्ष्य, वाळवंटी प्रदेश, शालेय शिक्षणाची वानवा. पण दोन्ही राज्यांतील मोठ्या समाजाने देशच नव्हे तर जग पादाक्रांत करत आर्थिक आघाडी मिळवलेली दिसते.
घरदार नि सारा संसार सोडून देशोधडीला लागलेला सिधी समाज मोर्चे, बंद, हरताळ, आरक्षण इत्यादी चळवळी न करता गेला तिथे स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी धडपडला आणि श्रीमंत समाजाच्या यादीत जाऊन बसला.
विकास नसलेल्या यूपी, बिहार सारख्या राज्यांतून अनेक कष्टकरी लोक बाहेर पडून मेहनतीची रोजी रोटी खाऊ लागले. तशीच देशोधडीला लागलेली कश्मीरी पंडीतांची मुलं भारतात लांबलांबच्या राज्यांमध्ये आरक्षणाच्या सीटा मिळवून उच्चशिक्षण घेऊ लागली. कुठेही बदला वृत्ती पाळून हाणामाऱ्या करत बसलेली ऐकिवात नाहीत.
विकास नाही म्हणून हुशार, होतकरू मुलं आक्रस्ताळेपणा न करता देशाबाहेर पडली, आणि परदेशातल्या आर्थिक प्रवाहात जम बसवून राहिली.
विकास दाराशी येत नसेल, तर विकासापर्यंत पोचावं लागतं. स्वतःच विकासाचा स्रोत होऊन वाहावं लागतं. हे अनेक समाजांनी, व्यक्तींनी, प्रांतांनी, परिसरांनी सिद्ध केलेय.
विकास नाही म्हणून मी हिंसा करतो, आत्महत्या करतो, गोंधळ घालतो ही पळवाट आहे, आपल्या परिस्थितीचं खापर दुसऱ्यावर फोडून सुटका मिळवणं आहे.
जीने की तमन्ना हो तो पत्थर फाड के भी पौधे निकलते है और फूल खिलाते है....
हिंसा ही वृत्ती आहे. राजकीय, सामाजिक नेत्यांचा स्वार्थ आहे.
तिचा विकासाशी फारसा संबंध नाही.

किसी पिछले जनम की बात...

मुगले आजम हा सिनेमा पन्नास वर्षानंतर रंगीत झाला, त्यालाही आता जवळपास 20 एक वर्ष लोटली. 🤦काळ किती भराभर चाललाय...    तेव्हा टीव्हीवर दिलीप क...