लेखनात काय लिहायचे आणि काय नाही याचे काही अलिखित नियम असतात. त्यातही महिलांसाठी हे नियम अधिक कडक असतात बहुधा.
परवा आकाशवाणीवर कविता सादर करायला गेले होते. एका कवितेत 'साला' शब्द होता. तिथल्या अधिकारी मॅडम म्हणाल्या हा शब्द काढून टाका. मी म्हटलं, अहो, मराठी साहित्याने नामदेव ढसाळ पचवलेत. 'साला' शब्दाने काय मोठं वादळ उठणार आहे?
त्या काही बोलल्या नाही. मी शब्द बदलला नाही. कदाचित त्या ती कविता सादरीकरणाच्या वेळी काढून टाकतील. त्यांनी तशी ती नाही काढली तर मला आनंद होईल.
'ग्राफिटी वॉल' या कविता महाजनच्या लेखांचं पुस्तक वाचताना त्यातील 'कविता आणि कॉण्डम' या लेखातले उतारे खाली देतेय.
वाचल्यावर खरंच आश्चर्याचा धक्का बसला. कविता महाजन यांची कविता येण्याआधीच नामदेव ढसाळ आणि अनेक विद्रोही कवींनी अतिशय जहाल आणि लैंगिकतेचा उल्लेख केलेल्या कविता येऊन गेल्यात. कवितेत केवळ कॉन्डोमचा उल्लेख आल्याने यात नमूद केलेली, स्वतःला परिवर्तनाच्या वाटेवरचे वाटसरू समजणारी मंडळी जर असा आक्षेप घेऊन ती कविता टाळत असतील तर काय म्हणावे?
म्हणजे हे नियम फक्त स्त्रियांच्याच साहित्याला आहेत म्हणायचे की काय? ही अलिखित सेन्सॉरशीप केवळ स्त्रियांनाच असते का? एरव्ही देखील लेखनात शिव्या, लैंगिकतेसंदर्भातले शब्द जर स्त्रियांच्या लेखनात आले, तर समाज अस्वस्थ होताना दिसतो. एकच वाक्य, पण जर ते पुरुषाने उच्चारले तर त्याकडे सहजपणे बघितले जाते, नव्हे कधी कधी तर कौतुकाने पाहिले जाते. पुरुष असाच असायला हवा, आक्रमक, दांडगाई करणारा, रांगडा. पण तेच वाक्य स्त्रीने लिहिले किंवा उच्चारले, तर, 'काय बाई आहे?' अशा नजरेने पाहिले जाते. अगदी अशी बायको असेल, तर 'नवऱ्याचं बिचाऱ्याचं काय ?' असे तारेही तोडले जातात.
बाई जर लैंगिक विषयावर लिहीत असेल, शृंगारिक लिहीत असेल, तर तिला गृहीतही धरले जातेच. अव्हेलेबलही समजले जाते.
अर्थात आता परिस्थिती बदलताना दिसतेय. बाया समाजाच्या नजरेला जुमानत नाहीत आता. त्यांना हवं तसं व्यक्त होऊ लागल्यात. पण समाजपुरुष मात्र अजून बदलायचे नाव घेत नाही.
अशावेळी एक चांगला अनुभव आलेलाही शेअर करावासा वाटतोय.
'अडकलेला पाऊस' या माझ्या कवितेत मी पावसात भिजत असलेल्या पुरुषाच्या निव्वळ देहाचे शृंगारिक वर्णन केले आहे. एकदा डोंबिवलीच्या गणपती मंदिरात कविसंमेलनात कविता सादर करण्याचे आमंत्रण होते. दोन कविता सादर करायच्या होत्या, त्यात मी ही कविता सादर करण्यासाठी निवडली होती, ती जरा भीत भीतच. लोक आक्षेप घेतील की काय? एक तर मंदिरासारखं सो कॉल्ड पवित्र आणि डोंबिवलीतलं वगैरे ठिकाण, संघासारखे ट्रस्टी.
कविता सादर केली. आणि कार्यक्रम संपल्यानंतर दोन मुख्य ट्रस्टी जे चांगलेच वयस्कर होते, त्यांनी येऊन आधी माझं कौतुक केलं. 'तुमची कविता नेहमीपेक्षा हटके होती' हे आवर्जून सांगितलं. तेव्हा आश्चर्याचा सुखद धक्काच बसला.
वरील दोन्ही उदाहरणे विसंगत वाटतात ना..?. म्हणजे जिथे स्वतःला आधुनिक कवितेच्या वाटेवरचे प्रवासी समजतात, तेच लोक सोवळेपणा दाखवताना दिसतायत. तर जिथे सोवळेपण अपेक्षित होते, त्यांनी मात्र ही बदलाची कविता सहजपणे स्वीकारली.
थोडक्यात काय, तर काही समजुती आपल्या मनात घट्ट असतात, पण तशा त्या असतातच असं नाही.
---
महिला खूप घाबरतात, जाहीरपणे काही लिहायला, व्यक्त व्हायला. त्यातही त्या प्रामुख्याने घाबरतात त्या आपल्या घरच्यांना, नातेवाईकांना, शेजारच्या पाजारच्या लोकांना. ते काय म्हणतील? आपल्याला काय समजतील? त्यांना काय वाटेल? याचा खूप बाऊ करतात महिला.
माझ्या एका लेखक मैत्रिणीने कादंबरी लिहायला घेतली. तिचं म्हणणं की ते तिचं आत्मवृत्तच आहे. मी तिला म्हटलं मग ते आत्मवृत्त म्हणूनच लिही. कादंबरी का? त्यावर तिचं म्हणणं होतं की यातली माझ्या आयुष्यातली पात्रं दुखावतील. आता काय बोलायचं? म्हणजे जे भोगलंय, सहन केलंय, आणि ज्यांच्यामुळे भोगलंय, सहन केलंय त्यांनाही न दुखावण्याची इतकी काळजी स्त्रिया घेतात. त्यांची बदनामी समाजात होऊ नये म्हणून काळजी घेतात. हे म्हणजे त्यांनी ्स्वतःच स्वतःवर लादून घेतलेली सेन्सॉरशीपच नव्हे काय?
---
बाया जाहीर भांडू लागल्या तरी त्यांना नावे ठेवली जातात. सोशल मिडीया असो की अजून कुठे, बाया जर पुरुषांच्या गोतावळ्यात वाद घालू लागल्या, आक्रमक होऊ लागल्या तर त्यांना उपहासाला, निंदेला सामोरं जावं लागतं. ही बाई जरा जास्तच दिसते असा ग्रह पुरुषच नाही, तर इतर बायाही करून घेतात. तसं बोलून दाखवतात. आक्रमक पुरुषाचं कौतुक, तर आक्रमक बाईची निंदा हे ठरलेलं असतं. मात्र बाया घरात, नळावर एकमेकींशी भांडत असतील तर मात्र त्यांच्या भांडणांची मजा घेतली जाते, त्यावर विनोद केले जातात, स्त्रीच स्त्रीची शत्रू कशी असते हे हिरीरीने सांगितलं जातं अशावेळी.
या सगळ्यात शेवटी काय, तर बाईने मृदू शब्द वापरावेत नेहमी. प्रेमाने बोलावे. सेक्सबद्दल बोलू नये, पुरुषांशी वाद घालू नयेत, आक्रमक होऊ नये... थोडक्यात बाईने कुठल्याच बाबतीत पुरुषांच्या वरचढ होण्याचा प्रयत्न करू नये....
- अलका गांधी-असेरकर


