सौ. लावणे, मंगळसूत्र घालणे, साडी नेसणे, सण-वार पाळणे...
फेमिनिझममध्ये हे सगळं मागास समजले जाते. ते योग्यही आहे. त्यासाठी कधीतरी टोचेल असं बोलून स्त्रियांना जागृत करण्याचा प्रयत्न जरूर करावा. परंतु प्रत्येक स्त्री ही बदलाच्या कुठल्या ना कुठल्या पायरीवर असते. सगळ्याच स्त्रियांना एकाच वेळी हे सगळं त्यागून बंधमुक्त होणं कठीण आहे.
साधं पोशाखाचं बंधन देखील स्त्रियांना त्यागणं फार कठीण होतं. ब्रिटीशांचं पाहून शंभर वर्षांपूर्वीच पुरुषांनी धोतरं सोडून पॅंटी चढवल्या. मात्र स्त्रियांना नऊवारीतून पॅंन्टीत नि पॅन्टीतून हाफ पॅन्टीत यायला तब्बल सहा पिढ्या लागल्या...नऊवारीला पाचवारीसाठी संघर्ष करावा लागला. टोमणे ऐकावे लागले. पाचवारीला सलवार कमीजसाठी तेच करावं लागलं. सलवारीला पॅन्टसाठी संघर्ष करावा लागला नि पॅन्टवालीला गुडघ्यापर्यंतचा प्रवास करायला एक पिढी लागली. म्हणूनच आजही समाजात एकाच वेळी एकाच शहरात स्त्रिया अजून नऊवारी ते हाफ पॅन्ट या सर्व प्रकारच्या कपड्यांत दिसत असतात... मात्र धोतरवाले पुरुष फार म्हणजे फारच विरळा झाले.
महाराष्ट्रीयन समाजात मंगळसूत्राचे महत्त्व अतिशयोक्त इतके पहिल्यापासून आहे... त्यामुळे ते अजूनही टाकण्याची स्त्रियांची मानसिकता तयार होत नाही. यात हिंदू वगैरे असण्याचा काडीचा संबंध नाही. हिंदू म्हणून सौभाग्याची लक्षणे प्रत्येक राज्यात वेगळी आहेत. कुठे सिंदूर आहे, तर कुठे मंगळसूत्र आहे.. तर पंजाबसारख्या राज्यात काहीच नाही. कुंकू सुद्धा लावत नाहीत अनेक पंजाबी सरदार बायका. कदाचित तिथे मोगली सत्तेचा प्रभावामुळे कुंकू कमी झालं असू शकेल. तरी बाया सौभाग्याची चिन्हे कवटाळून बसतायत अजून हे खरं आहे. कधी कधी लोकांच्या प्रश्नांना उत्तर नको म्हणून, कधी सामाजिक प्रतिमा अबाधित राहावी म्हणून, कधी सासरच्यांचा धाक म्हणून...
तरी देखील बदलाची ही धीमी गती पुढच्या पिढीत जलद होताना दिसते. अशावेळी बदलाच्या प्रत्येक स्तरावर, प्रत्येक पायरीवर असलेल्या स्त्रीचे स्वागत करायला हवे. तिला स्वीकारायला हवे. समोरच्याचा बदल बघून कदाचित ती बदलणार नाही, पण पुढच्या पिढीसाठी तरी ती सौम्य होईल.
हीच गोष्ट सणावाराची... आज ज्या स्त्रिया, 'मी नाही बाई काही करत असलं..' म्हणत स्वतःतील सुधारणा किंवा वैचारिकता मिरवत असतात, त्या देखील या ना त्या कारणाने पाच पंचवीस वर्षांपूर्वी हे सगळं करतच होत्या. त्यांना लवकर जाग आली, लवकर स्वातंत्र्य मिळालं, घरात तशी पार्श्वभूमी मिळाली हे देखील बदलासाठी तेवढंच कारणीभूत आहे. सर्वांना तशी पार्श्वभूमी, तसे कुटुंब, तसे शहर, सुबत्ता मिळतेच असं नाही... साधं उदाहरण घ्यायचं तर सर्वांनाच तयार फराळ परवडत नाही. त्यांनी घरी केलं तर त्या फुकट राबताहेत म्हणणं कितपत योग्य आहे..? त्यांनी आपल्या मुलाबाळांना करून खायला घालायचे नाही का? अनेक घरात सणावाराची साफसफाई, फराळ, खरेदी यात घरचे पुरुषही भरपूर मदत करत असतात....
संविधान हाच धर्म माना... सावित्रीबाईंनी तुम्हाला शिकवलं, त्यानाच पुजा..नवरात्रीत नऊरंग नेसू नका... ह्यॅव नि त्यॅव... अनेक उपदेश बायांना केले जातात. ते जरूर केले जावेत... परंतु त्यासाठी त्यांना हिणवले जाऊ नये.. स्वतःला पुरोगामी समजणाऱ्यांच्या घरातही शंभर टक्के याचे पालन होत नसते. कुठेतरी परंपराशरणता असतेच असते...त्याला वेगवेगळ्या रितीने ते समर्थन करू शकतात, इतकंच.
नटणं, सजणं, चांगलं दिसणं ही मानवी प्रवृत्ती आहे. पुरुष देखील याला अपवाद नाहीत. नाहीतर नैसर्गिक दाढ्या वाढू न देता विविध प्रकारे त्या कोरण्याची पद्धत त्यांनीही स्वीकारली नसती... बाया भुवया कोरतात म्हणून त्यांना हिणवणारे हे बघत नाहीत, की ते दाढ्या का कोरतात मग? का जंगली माणसाप्रमाणे केस, दाढ्या वाढू देत नाहीत?
सजायचं नाही, मेकअप करायचा नाही, लाजायचं नाही, नैसर्गिक राहायचं... ही आधुनिक बंधनं तर टाकली जात नाहीत ना स्त्रियांवर पुन्हा?
त्यामुळेच, प्रत्येक छोट्या बदलाचे देखील स्वागत व्हावे.. ज्यांनी या गोष्टी टाकल्या त्यांचे कौतुक जरूर व्हावे, पण ज्या टाकू शकल्या नाहीत, त्यांना बदलायला वेळ लागतोय, एवढे तरी समजून घ्यायला हवे. कारण आपणही एका रात्रीत बदललेलो नाही... आपल्या एकेका पिढीला बदलत आणलंय स्त्रीवादी चळवळीने... पण ही धीम्या गतीची असली तरी शंभर टक्के पुढे जाणारी चळवळ आहे हे नक्की... तिला आता मागे फिरवता कुणालाच येणार नाही... अगदी कुठल्याच धर्माच्या सनातनी प्रवृत्तीलाही नाही... कारण ईराणसारख्या देशातही स्त्रिया बुरखा जाळू लागल्या.... ही केवढी मोठी गोष्ट आहे..........
स्त्रियांना त्यांच्या गतीने बदलू द्या......पुरुषांत देखील सर्व स्तरावरची विविधता दिसते की... ते तरी कुठे सगळेच्या सगळे पुरोगामी आहेत........
जे पुरोगामी म्हणवतात स्वतःला ते देखील बायस्ड वागताना दिसतात.... पुरोगामींना देखील इस्लामचे नाव घ्यायला भीती वाटते, मग स्त्रियांना सासरच्यांची वाटणार नाही ....? हाहाहाहा........!


