Oct 30, 2022

खंती...!

कॉमन गॅलरी असलेल्या मुंबईतील एका चाळीतल्या गॅलरीच्या कठड्याला टेकून ती खाली बसली होती. तिथून कठड्याच्या जाळीतून खालचा वाहता रस्ता दिसत होता. दूपारपासून ती त्या रस्त्याकडे अगदी डोळ्यांत प्राण आणून भाईची वाट पाहात होती. शेकडो माणसं जात होती नि येत होती त्या रस्त्यावर. पण भाई काही येताना दिसत नव्हता. 
ती आज मुंबईला येणार हे भाईला कळवलं होतं. तो तिला तिथे घ्यायला येणार होता. 
मुंबईला यायचं तर एका दूरच्या चुलत काकांकडे. दूरचे असले, तरी बऱ्यापैकी चांगले संबंध होते. मुंबईला अनेक कारणांनी यावं लागायचं. लग्नप्रसंग, अहमदाबादला जाताना वाटेवरचा थांबा म्हणून, स्थळं बघायला आणि बरीच कारणे...

भाईचंही लग्न व्हायचं होतं अजून. त्यामुळे तोही स्थिरावलेला नव्हता. कुठेतरी पेईंग गेस्ट म्हणून, किंवा मित्र मित्र असे राहत होते. मुंबईला आलं की भाई त्या काकांकडे सोडून यायचा. तिथे रोज भेटायला यायचा. आला की फिरायला न्यायचा, सिनेमाला न्यायचा. भरपूर गप्पा मारायचा. नवनवीन माहिती सांगायचा. क्वचित काही खरेदीला. कारण  त्याच्याकडेही खरेदी वगैरे करण्याइतके पैसे नसायचे. 

सकाळपासून वाट पाहूनही भाई आला नव्हता. मुंबईला येताना बहुतेकवेळा ती एकटीच यायची सरळ त्या काकांकडे. परंतु कधी कधी कुणा नातेवाईकांसोबत यायचं झालं तर आधी त्यांच्या सोबत ते जिथे जातील तिथे उतरावं लागायचं. तिथे भाई घ्यायला यायचा नि काकांकडे घेऊन जायचा. यावेळीही असंच झालं होतं. एका दूरच्या मावशीसोबत आली होती ती. ती मावशी देखील आपल्या मुंबईच्या भावाकडे, भावाच्या मुलीच्या लग्नासाठी म्हणून आली होती. तिच्याबरोबर ही आली होती. 

आता झालं असं होतं, की लग्नघरी ती अनाहूत पाहुणी झाली होती. दुसऱ्या दिवशी लग्न होतं. लग्न घर, तेही चाळीतलं त्यामुळे दोन खणांच्या त्या खोलीत फार गर्दी, वेगवेगळे हळद मेहंदीसारखे काहीबाही विधी चालू होते. सगळं घर लग्नाच्या रेशीम कपड्यांत सळसळत होतं. दागिन्यांनी चमकत होतं. घर म्हणायला चाळीतलं होतं, तरी ते व्यापारी माणसाचं घर होतं. बऱ्यापैकी सधन मंडळी होती.मुंबईत मोक्याच्या ठिकाणी असल्यामुळे चाळीतली घरंही धरून राहणारी माणसं तेव्हा होती. चाळीत राहत असली तरी सहज लखपती करोडपती असायचे. 

मात्र हिच्याजवळ लग्नाचे जाऊच दे. साधेही कपडे नव्हते जरा चांगले म्हणावे असे. साधीशी मॅक्सी अंगावर होती. एक दोन स्कर्ट ब्लाऊज. आईने एक कॉटन साडी दिली होती. कधी वेळ पडली तर आईची साडी नेसायची ती. तेव्हा अठरा विशीच्या वयात मुली साडी सर्रास नेसत. पण आईने दिलेली ती कॉटनची साडीही नवीन असली तरी अगदीच साधी होती. लग्नात नेसायसारखी अजिबातच नव्हती. दागिने वगैरे तर दूरच. 

खेड्यावर कुठे काही आर्टीफिशिअल ज्वेलरी सुद्धा मिळत होती तेव्हा?

'भाई अजून का येत नाही?' ती फार  वैतागली होती. 

त्या घरातल्या कुणीही मुली, स्त्रिया तिच्याशी फार बोलत नव्हत्या. कुणाचं तिच्याकडे फार लक्षही नव्हतं. जो तो लगीनघाईत होता. तिला मात्र फार कानकोंड्यासारखं झालं होतं. 'रात्री तरी येईल उशीरा भाई, काम आटपून.' असं वाटत होतं तिला. या घरातून तिला लवकरात लवकर बाहेर पडायचं होतं. बरं एकटं निघून जावं, तर भाई इकडे यायचा. चुकामूक व्हायची शक्यता. मावशीही जाऊ देत नव्हती.

'तुला काय घाई आहे? थांब. उद्या लग्न आहे. ते करून जा. भाई तिथेच येईल तुझा.'


तिला कशी सांगू माझी कुचंबणा?
थांबलं की दुसऱ्या दिवशी सकाळच्या लग्नात सामील व्हावं लागणार होतं. अनेक दूरदूरचे आणि जवळचेही नातेवाईक तिथे दिसणार होते, भेटणार होते. आणि लग्नात नेसण्यासारखा एकही कपडा अंगावर नव्हता. जवळ नव्हता. ना ड्रेस होता, ना साडी होती. ना दागिने होते.
आधीच लग्न वगैरेसारखे सोहळे, त्यातील ती गर्दी, निरर्थक हाहाहीहीहूहू, हे तिला नेहमीच कंटाळवाणं फार वाटायचं. ती आपल्या आपल्यातच असायची. सदैव डोक्यात विचारचक्रं सुरू असायची. काही भेदभाव तर तेव्हापासून ठळक जाणवायचे. लग्नात केलं जाणारं संपत्तीचं प्रदर्शन उबग आणायचं. आपल्या हिनपणाची जाणीव अधिकच व्हायची.

फार राग येत होता मनात भाईचा. 
रस्ता पाहून पाहून डोळे दुखले. इतकी वाट त्यानंतर आयुष्यात तिने कधी कुणाची पाहिली नसेल, तितकी वाट पाहिली भाईची त्या दिवशी. फार परावलंबी झाल्यासारखं वाटू लागलं होतं.

पण भाई नाहीच आला. रात्र झाली. त्या दिड खणाच्या खोलीत रात्री झोपायलाही जागा नव्हती. आणि दुसऱ्या दिवशी हॉलवर निघायच्या तयारीत सारं घर रात्रभर जागं होतं. लाईटच्या प्रकाशात आणि आवाजांत झोपही येत नव्हती. दिवसभराचा एसटीचा प्रवास. थकलेपण. चीडचीड होत होती.

सकाळ झाली आणि सगळी प्रमुख मंडळी पटापट आंघोळी आवरून हॉलवर जायला रवाना होऊ लागली. मावशी अजून थांबली होती. कुणीतरी आपल्याला एखादी बऱ्यापैकी साडी नेसायला द्यावी असं चक्क वाटू लागलं होतं. मावशीला विचारलं.

 
'मावशी, तुझ्याजवळ एखादी साडी असेल तर दे मला नेसायला. मी तर काही आणलं नाही. काय नेसू?'


 मावशीजवळही काही नव्हतं फारसं. ती म्हणजे उघड्यापाशी दिगडं गेलं अशीच दोघींची परिस्थिती होती. त्यामुळे त्या लग्न घरी तिचे स्वागतही काही फार जोमाचे नव्हतेच. फक्त ती नवऱ्या मुलीची सख्खी आत्या होती. त्या घरातली एक तरूण सून फक्त कालपासून प्रेमाने थोडंतरी तिच्याशी बोलत होती. तिने सकाळी हॉलवर जाताना आपली आधीची साडी बदलून ती वरच्या दांडीवर टाकून दिली होती. ती साडी साधीच, प्लेन पण जॉर्जेटची होती. तिला जरीचे काठ होेते. हिची नजर सारखी त्या साडीकडे जात होती. 'सांगावं का तिला, मी नेसू का ती साडी म्हणून?' पण जीभ उचलत नव्हती. फार लाजिरवाणं वाटत होतं. 


सगळे निघून गेल्यावर मावशी म्हणाली, 'आटप, आंघोळ कर तूही आता. आपणही जाऊ या हॉलवर.' ती उठली. नाईलाजाने बॅग उघडून आईने दिलेली राणी कलरची प्लेन, निळ्या रंगाचे काठ असलेली सुती साडी काढून आंघोळ करून ती नेसली.
फार लाज वाटत होती. लग्नात अशी साडी कोण नेसतं? कामवाल्या बाईसारखं वाटू लागलं होतं तिला.  सगळ्यांच्या अंगावर भरजरी साड्या, दागिने होते. तिथून पळून जावं असं वाटत होतं. लग्न लागल्यानंतरही फार उशीरा भाई आला. थेट हॉलवर. त्याला काही कपड्या बिपड्याचं पडलं नव्हतं. असंही पुरुषांच्या कपड्यांकडे कोण पाहतं?  त्याला तिथून निघायची घाई नव्हती. 

'थांब गं, आता मस्त जेवूनच जाऊ. सगळ्यांना भेटून जाऊ.' तो सगळ्यांशी मस्त गप्पा मारत होता. लोकही त्याच्याशी बोलत होते. तो बोलका होता. आत्मविश्वास दांडगा होता त्याच्याजवळ. नातेवाईकांमध्ये लोकप्रिय होता. देखणा आणि बोलण्यात चतुर असल्याने (शिवाय होतकरू लग्नाळू मुलगाही असल्याने...) सगळे त्याला समोर होऊन बोलत होते. पण तिच्याकडे ढुंकून बघत नव्हते. 
---
किती वर्षे झाली या गोष्टीला..!
ती दांडीवरची साडी, आणि ती अंगावरची साडी...! दोन्ही तिच्या नजरेसमोर तरळू लागल्या.

 तिला अगदी रंग,पोतासह लख्ख आठवतात अजूनही त्या दोन साड्या. डोळ्यांसमोर दिसू लागतात. तारुण्याची उमेदीची वर्षे असताना मैत्रिणी, चुलत- मावस- मामे बहिणी यांचे विविध प्रकारचे कपडे, प्रसंगानुसार वेगवेगळे पाहून फार वाईट वाटायचं. लग्नादी प्रसंगात लाजिरवाणं वाटाचयं. मिटल्यासारखं व्हायचं. क्वचित चार पैसे हातात असले, तरी खरेदीची अक्कल नव्हती. नेमकं काय घ्यायचं? कुठून घ्यायचं? ते कळायचं नाही. कळलं तर खरेदीला सोबत कुणी असायचं नाही. शिवाय दागिन्यांची, खाण्यापिण्याची नव्हती, पण कपड्यांची फार आवड होती.
 
आज दहा वीस हजाराची साडी घ्यायची म्हटलं तरी पटकन घेऊ शकण्याइतकी ऐपत आली. पण ती उमेदीची, तारूण्यात मिरवण्याची वर्षे निघून गेली. त्यामुळे आता घेतली तरी दहा हजाराच्या साडीचं कौतुक काही वाटत तर नाहीच, पण आज  पैशाची नसली तरी, अगदी साधे कपडे नेसूनही टेचात कोणत्याही प्रसंगात कुणाच्याही घरी जाण्याइतकी वैचारिक श्रीमंती वाढली. 

तरी सुद्धा ... त्या त्या वयाच्या गरजा असतात.. मानसिकही आणि शारिरीकही. आणि वय असतं परावलंबी.
आणि हो! गरिबी आणि लाचारी ही कुठल्या जातीची मक्तेदारी नसते. ती सगळीकडे असते.

- अलका गांधी-असेरकर




Oct 17, 2022

सौ. मंगळसूत्र साडी इत्यादी....

 सौ. लावणे, मंगळसूत्र घालणे, साडी नेसणे, सण-वार पाळणे...

फेमिनिझममध्ये हे सगळं मागास समजले जाते. ते योग्यही आहे. त्यासाठी कधीतरी टोचेल असं बोलून स्त्रियांना जागृत करण्याचा प्रयत्न जरूर करावा. परंतु प्रत्येक स्त्री ही बदलाच्या कुठल्या ना कुठल्या पायरीवर असते. सगळ्याच स्त्रियांना एकाच वेळी हे सगळं त्यागून बंधमुक्त होणं कठीण आहे.

 
साधं पोशाखाचं बंधन देखील स्त्रियांना त्यागणं फार कठीण होतं. ब्रिटीशांचं पाहून शंभर वर्षांपूर्वीच पुरुषांनी धोतरं सोडून पॅंटी चढवल्या. मात्र स्त्रियांना नऊवारीतून पॅंन्टीत नि पॅन्टीतून हाफ पॅन्टीत यायला तब्बल सहा पिढ्या लागल्या...नऊवारीला पाचवारीसाठी संघर्ष करावा लागला. टोमणे ऐकावे लागले. पाचवारीला सलवार कमीजसाठी तेच करावं लागलं. सलवारीला पॅन्टसाठी संघर्ष करावा लागला नि पॅन्टवालीला गुडघ्यापर्यंतचा प्रवास करायला एक पिढी लागली. म्हणूनच आजही समाजात एकाच वेळी एकाच शहरात स्त्रिया अजून नऊवारी ते हाफ पॅन्ट या सर्व प्रकारच्या कपड्यांत दिसत असतात... मात्र धोतरवाले पुरुष फार म्हणजे फारच विरळा झाले. 
महाराष्ट्रीयन समाजात मंगळसूत्राचे महत्त्व अतिशयोक्त इतके पहिल्यापासून आहे... त्यामुळे ते अजूनही टाकण्याची स्त्रियांची मानसिकता तयार होत नाही. यात हिंदू वगैरे असण्याचा काडीचा संबंध नाही. हिंदू म्हणून सौभाग्याची लक्षणे प्रत्येक राज्यात वेगळी आहेत. कुठे सिंदूर आहे, तर कुठे मंगळसूत्र आहे.. तर पंजाबसारख्या राज्यात काहीच नाही. कुंकू सुद्धा लावत नाहीत अनेक पंजाबी सरदार बायका. कदाचित तिथे मोगली सत्तेचा प्रभावामुळे कुंकू कमी झालं असू शकेल. तरी बाया सौभाग्याची चिन्हे कवटाळून बसतायत अजून हे खरं आहे. कधी कधी लोकांच्या प्रश्नांना उत्तर नको म्हणून, कधी सामाजिक प्रतिमा अबाधित राहावी म्हणून, कधी सासरच्यांचा धाक म्हणून...

तरी देखील बदलाची ही धीमी गती पुढच्या पिढीत जलद होताना दिसते. अशावेळी बदलाच्या प्रत्येक स्तरावर, प्रत्येक पायरीवर असलेल्या स्त्रीचे स्वागत करायला हवे. तिला स्वीकारायला हवे. समोरच्याचा बदल बघून कदाचित ती बदलणार नाही, पण पुढच्या पिढीसाठी तरी ती सौम्य होईल.

हीच गोष्ट सणावाराची... आज ज्या स्त्रिया, 'मी नाही बाई काही करत असलं..' म्हणत स्वतःतील सुधारणा किंवा वैचारिकता मिरवत असतात, त्या देखील या ना त्या कारणाने पाच पंचवीस वर्षांपूर्वी हे सगळं करतच होत्या. त्यांना लवकर जाग आली, लवकर स्वातंत्र्य मिळालं, घरात तशी पार्श्वभूमी मिळाली हे देखील बदलासाठी तेवढंच कारणीभूत आहे. सर्वांना तशी पार्श्वभूमी, तसे कुटुंब, तसे शहर, सुबत्ता मिळतेच असं नाही... साधं उदाहरण घ्यायचं तर सर्वांनाच तयार फराळ परवडत नाही. त्यांनी घरी केलं तर त्या फुकट राबताहेत म्हणणं कितपत योग्य आहे..? त्यांनी आपल्या मुलाबाळांना करून खायला घालायचे नाही का? अनेक घरात सणावाराची साफसफाई, फराळ, खरेदी यात घरचे पुरुषही भरपूर मदत करत असतात.... 

संविधान हाच धर्म माना... सावित्रीबाईंनी तुम्हाला शिकवलं, त्यानाच पुजा..नवरात्रीत नऊरंग नेसू नका... ह्यॅव नि त्यॅव... अनेक उपदेश बायांना केले जातात. ते जरूर केले जावेत... परंतु त्यासाठी त्यांना हिणवले जाऊ नये.. स्वतःला पुरोगामी समजणाऱ्यांच्या घरातही शंभर टक्के याचे पालन होत नसते. कुठेतरी परंपराशरणता असतेच असते...त्याला वेगवेगळ्या रितीने ते समर्थन करू शकतात, इतकंच.

नटणं, सजणं, चांगलं दिसणं ही मानवी प्रवृत्ती आहे. पुरुष देखील याला अपवाद नाहीत. नाहीतर नैसर्गिक दाढ्या वाढू न देता विविध प्रकारे त्या कोरण्याची पद्धत त्यांनीही स्वीकारली नसती... बाया भुवया कोरतात म्हणून त्यांना हिणवणारे हे बघत नाहीत, की ते दाढ्या का कोरतात मग? का जंगली माणसाप्रमाणे केस, दाढ्या वाढू देत नाहीत?

सजायचं नाही, मेकअप करायचा नाही, लाजायचं नाही, नैसर्गिक राहायचं... ही आधुनिक बंधनं तर टाकली जात नाहीत ना स्त्रियांवर पुन्हा?

त्यामुळेच, प्रत्येक छोट्या बदलाचे देखील स्वागत व्हावे.. ज्यांनी या गोष्टी टाकल्या त्यांचे कौतुक जरूर व्हावे, पण ज्या टाकू शकल्या नाहीत, त्यांना बदलायला वेळ लागतोय, एवढे तरी समजून घ्यायला हवे. कारण आपणही एका रात्रीत बदललेलो नाही... आपल्या एकेका पिढीला बदलत आणलंय स्त्रीवादी चळवळीने... पण ही धीम्या गतीची असली तरी शंभर टक्के पुढे जाणारी चळवळ आहे हे नक्की... तिला आता मागे फिरवता कुणालाच येणार नाही... अगदी कुठल्याच धर्माच्या सनातनी प्रवृत्तीलाही नाही... कारण ईराणसारख्या देशातही स्त्रिया बुरखा जाळू लागल्या.... ही केवढी मोठी गोष्ट आहे..........

स्त्रियांना त्यांच्या गतीने बदलू द्या......पुरुषांत देखील सर्व स्तरावरची विविधता दिसते की... ते तरी कुठे सगळेच्या सगळे पुरोगामी आहेत........

जे पुरोगामी म्हणवतात स्वतःला ते देखील बायस्ड वागताना दिसतात.... पुरोगामींना देखील इस्लामचे नाव घ्यायला भीती वाटते, मग स्त्रियांना सासरच्यांची वाटणार नाही ....? हाहाहाहा........!

Sep 17, 2022

स्त्रियांच्या लेखनावरची सेन्सॉरशीप

 लेखनात काय लिहायचे आणि काय नाही याचे काही अलिखित नियम असतात. त्यातही महिलांसाठी हे नियम अधिक कडक असतात बहुधा.
परवा आकाशवाणीवर कविता सादर करायला गेले होते. एका कवितेत 'साला' शब्द होता. तिथल्या अधिकारी मॅडम म्हणाल्या हा शब्द काढून टाका. मी म्हटलं, अहो, मराठी साहित्याने नामदेव ढसाळ पचवलेत. 'साला' शब्दाने काय मोठं वादळ उठणार आहे?
त्या काही बोलल्या नाही. मी शब्द बदलला नाही. कदाचित त्या ती कविता सादरीकरणाच्या वेळी काढून टाकतील. त्यांनी तशी ती नाही काढली तर मला आनंद होईल.

'ग्राफिटी वॉल' या कविता महाजनच्या लेखांचं पुस्तक वाचताना त्यातील 'कविता आणि कॉण्डम' या लेखातले उतारे खाली देतेय. 





वाचल्यावर खरंच आश्चर्याचा धक्का बसला. कविता महाजन यांची कविता येण्याआधीच नामदेव ढसाळ आणि अनेक विद्रोही कवींनी अतिशय जहाल आणि लैंगिकतेचा उल्लेख केलेल्या कविता येऊन गेल्यात. कवितेत केवळ कॉन्डोमचा उल्लेख आल्याने यात नमूद केलेली, स्वतःला परिवर्तनाच्या वाटेवरचे वाटसरू समजणारी मंडळी जर असा आक्षेप घेऊन ती कविता टाळत असतील तर काय म्हणावे?


म्हणजे हे नियम फक्त स्त्रियांच्याच साहित्याला आहेत म्हणायचे की काय? ही अलिखित सेन्सॉरशीप केवळ स्त्रियांनाच असते का? एरव्ही देखील लेखनात शिव्या, लैंगिकतेसंदर्भातले शब्द जर स्त्रियांच्या लेखनात आले, तर समाज अस्वस्थ होताना दिसतो. एकच वाक्य, पण जर ते पुरुषाने उच्चारले तर त्याकडे सहजपणे बघितले जाते, नव्हे कधी कधी तर कौतुकाने पाहिले जाते. पुरुष असाच असायला हवा, आक्रमक, दांडगाई करणारा, रांगडा. पण तेच वाक्य स्त्रीने लिहिले किंवा उच्चारले, तर, 'काय बाई आहे?' अशा नजरेने पाहिले जाते. अगदी अशी बायको असेल, तर 'नवऱ्याचं बिचाऱ्याचं काय ?' असे तारेही तोडले जातात. 
बाई जर लैंगिक विषयावर लिहीत असेल, शृंगारिक लिहीत असेल, तर तिला गृहीतही धरले जातेच. अव्हेलेबलही समजले जाते. 

अर्थात आता परिस्थिती बदलताना दिसतेय. बाया समाजाच्या नजरेला जुमानत नाहीत आता. त्यांना हवं तसं व्यक्त होऊ लागल्यात. पण समाजपुरुष मात्र अजून बदलायचे नाव घेत नाही.


अशावेळी एक चांगला अनुभव आलेलाही शेअर करावासा वाटतोय. 

'अडकलेला पाऊस' या माझ्या कवितेत मी पावसात भिजत असलेल्या पुरुषाच्या निव्वळ देहाचे शृंगारिक वर्णन केले आहे. एकदा डोंबिवलीच्या गणपती मंदिरात कविसंमेलनात कविता सादर करण्याचे आमंत्रण होते. दोन कविता सादर करायच्या होत्या, त्यात मी ही कविता सादर करण्यासाठी निवडली होती, ती जरा भीत भीतच. लोक आक्षेप घेतील की काय? एक तर मंदिरासारखं सो कॉल्ड पवित्र आणि डोंबिवलीतलं वगैरे ठिकाण, संघासारखे ट्रस्टी.

कविता सादर केली. आणि कार्यक्रम संपल्यानंतर दोन मुख्य ट्रस्टी जे चांगलेच वयस्कर होते, त्यांनी येऊन आधी माझं कौतुक केलं. 'तुमची कविता नेहमीपेक्षा हटके होती' हे आवर्जून सांगितलं. तेव्हा आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. 
वरील दोन्ही उदाहरणे  विसंगत वाटतात ना..?. म्हणजे जिथे स्वतःला आधुनिक कवितेच्या वाटेवरचे प्रवासी समजतात, तेच लोक सोवळेपणा दाखवताना दिसतायत. तर जिथे सोवळेपण अपेक्षित होते, त्यांनी मात्र ही बदलाची कविता सहजपणे स्वीकारली. 
थोडक्यात काय, तर काही समजुती आपल्या मनात घट्ट असतात, पण तशा त्या असतातच असं नाही.

---

महिला खूप घाबरतात, जाहीरपणे काही लिहायला, व्यक्त व्हायला. त्यातही त्या प्रामुख्याने घाबरतात त्या आपल्या घरच्यांना, नातेवाईकांना, शेजारच्या पाजारच्या लोकांना. ते काय म्हणतील? आपल्याला काय समजतील? त्यांना काय वाटेल? याचा खूप बाऊ करतात महिला. 
माझ्या एका लेखक मैत्रिणीने कादंबरी लिहायला घेतली. तिचं म्हणणं की ते तिचं आत्मवृत्तच आहे. मी तिला म्हटलं मग ते आत्मवृत्त म्हणूनच लिही. कादंबरी का? त्यावर तिचं म्हणणं होतं की यातली माझ्या आयुष्यातली पात्रं दुखावतील. आता काय बोलायचं? म्हणजे जे भोगलंय, सहन केलंय, आणि ज्यांच्यामुळे भोगलंय, सहन केलंय त्यांनाही न दुखावण्याची इतकी काळजी स्त्रिया घेतात. त्यांची बदनामी समाजात होऊ नये म्हणून काळजी घेतात. हे म्हणजे त्यांनी ्स्वतःच स्वतःवर लादून घेतलेली सेन्सॉरशीपच नव्हे काय?

---

बाया जाहीर भांडू लागल्या तरी त्यांना नावे ठेवली जातात. सोशल मिडीया असो की अजून कुठे, बाया जर पुरुषांच्या गोतावळ्यात वाद घालू लागल्या, आक्रमक होऊ लागल्या तर त्यांना उपहासाला, निंदेला सामोरं जावं लागतं. ही बाई जरा जास्तच दिसते असा ग्रह पुरुषच नाही, तर इतर बायाही करून घेतात. तसं बोलून दाखवतात. आक्रमक पुरुषाचं कौतुक, तर आक्रमक बाईची निंदा हे ठरलेलं असतं. मात्र बाया घरात, नळावर एकमेकींशी भांडत असतील तर मात्र त्यांच्या भांडणांची मजा घेतली जाते, त्यावर विनोद केले जातात, स्त्रीच स्त्रीची शत्रू कशी असते हे हिरीरीने सांगितलं जातं अशावेळी. 

या सगळ्यात शेवटी काय, तर बाईने मृदू शब्द वापरावेत नेहमी. प्रेमाने बोलावे. सेक्सबद्दल बोलू नये, पुरुषांशी वाद घालू नयेत, आक्रमक होऊ नये... थोडक्यात बाईने कुठल्याच बाबतीत पुरुषांच्या वरचढ होण्याचा प्रयत्न करू नये....


- अलका गांधी-असेरकर






Sep 14, 2022

कादंबरी परीक्षण (रिक्त.. विरक्त.)

 रिक्त... विरक्त.

छाया कोरेगावकर




 

छाया कोरेगावकर ह्या कवी-लेखिकेची रिक्त विरक्त ही कादंबरी नुकतीच वाचली. तृतीय पुरुषी निवेदनात सावित्रीची ही कहाणी. ही सावित्री काहीशी कालच्या पिढीतलीच. सामाजिक चौकटीत बंदिस्त व्यक्ती किती काय काय भोगतात आयुष्यभर याचीच ही कहाणी.

एक आडनिड अल्लड वयातली मुलगी प्रेमाच्या आशेवर एका तरूण मुलाच्या आकर्षणात पळून जाऊन त्याच्याशी लग्न करते. परंतु तो चांगला निघत नाही. दारू, मारहाण, घराबाहेर हाकलून देणं असं करत प्रेमाचे पर्यवसान ऐन विशीत पदरात एक मूल घेऊन माहेरी परत असे होते.

सावित्री नंतर शिक्षण पूर्ण करते, स्वतःच्य पायावर उभी राहते, स्वतःचं घर घेते, मुलाला वाढवते...

म्हणजे समाजाच्या दृष्टीने बाई चांगलं जगते.. नवऱ्याने सोडलेल्या बाईने असंच जगायला हवं. हिंमतीने..

पण... इतकी वर्ष बाई आपल्या शरीराच्या भूका आणि प्रेमाची तहान मारून जगते. अगदी ऐन विशीपासून ते चाळीशी उलटेपर्यंत. याची खंत खेद ना कधी समाजाला असते, ना घरच्यांना, ना नातेवाईकांना...

याच जागी पुरुष असला, तर ... त्याच्या लग्नासाठी चहुकडून आग्रह धरला जातो.. सहानुभूती दर्शवली जाते.

सावित्रीच्या लग्नासाठी प्रयत्न जरी केले असते, तरी त्या काळात आणि अजूनही एक मूल पदरात असलेली आणि घटस्फोटीत स्त्रीचं दुसरं लग्न होणं, तेही चांगल्या स्थळाशी होणं हे अतिशय कठीण आहे.

अशा चाळीशी उलटलेल्या सावित्रीच्या आयुष्यात एक तिच्याहून थोडा मोठा म्हणजे पन्नाशीतला विवाहीत, दोन मुलांचा बाप असलेला पुरुष येतो आणि तिचं आयुष्य ढवळून निघतं. घरी, दारी, ऑफीसमध्ये निंदा, नालस्ती, चौकशा, बडतर्फ्या, बदल्या यांना सतत या दोघांना सामोरं जावं लागतं. त्याला आपल्या पहिल्या बायको मुलांचा तिरस्कार आणि हकालपट्टी सहन करावी लागते.  ऐंशी नव्वदचा काळ, मध्यमवर्गीय आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय पार्श्वभूमी, तसाच समाज, जातसंदर्भ.. व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यात विनाकारण ढवळाढवळ करणारा, त्याला सुखाने जगू न देणारा तेव्हाचा समाज. आजही ही परिस्थिती फारशी बदलली नसली, तरी थोडी निवळली आहे एवढंच..

दोघांचे एकमेकांवर प्रेम असते, आणि विचारसरणी सारखी असते एवढंच काय ते सूख... बाकी शरीरसुखाचा इथंही उजेडच असतो. जो पुरुष तिच्या आयुष्यात आलाय, तोही तिला शरीरसुख देऊ शकत नाहीच. थोडक्यात सावित्रीचं अख्खं आयुष्य शरीरसुखाला वंचित राहून जातं. प्रेमाची व्यक्ती आयुष्यात येऊनही ती उपाशीच राहते...रिक्त राहते.. विरक्त राहते... या अर्थाने कादंबरीचं शीर्षक अगदी नेमकं आहे.

खरंतर हे फार भयंकर आहे. एकदाच मिळालेल्या मानवी आयुष्यात एखाद्या व्यक्तीला अशा प्रकारे केवळ सामाजिक चौकटी, सामाजिक नीतीनियम, रितीरिवाज या कारणांनी आयुष्याच्या महत्त्वाच्या गोष्टींपासून वंचित राहावं लागत असेल, तर ते भयंकर आहे. विकृत आहे. पण... असं आपल्या समाजात सहन करणाऱ्या हजारो सावित्री असतील. असतात. अगदी पुराणकाळापासून आणि इतिहासकाळापासून हजारो बायका आपल्या शरीराच्या वासना कायमच्या मारून जगल्या. बाईच्या शरीराचा विचार तिच्या सुखासाठी कुणी कधी केलेला दिसलाच नाही. विधवा, घटस्फोटीता, कुमारिका यांच्या शरीरसुखाचा विचार कुणीच कधी केला नाही नि अजूनही कुणी फारसा करत नाही.

पण.... कादंबरी सावित्रीच्या जीवनाची ही बाजू मांडण्यात कमी पडलीय. आयुष्यात आलेल्या 
दुसऱ्या पुरुषामुळे सावित्रीला कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं लागलं याचा पाढा जास्त वाचला गेला आहे. याऊलट एका मोठ्या सुखाला कायमचं वंचित राहिल्यामुळे तिच्या मनात आणि शरीरातही उठणारी वादळे, कल्लोळ, तगमग, विद्रोह, येणारे विचार हे सगळं कादंबरीत कुठंच फारसं येत नाही. त्याबद्दल सावित्री फार बोलतच नाही. हे सगळं यायला हवं होतं. पण इथंही बाई आपल्या शरीरसुखाबद्दल मौन बाळगतेय. बाईची लैंगिक उपासमार, उपासाचे दुष्परिणाम, हे सगळं बारकाईने मांडण्याची संधी लेखिकेने गमावली आहे. आणि कादंबरी बाईपणाच्या मर्यादेच्या चौकटीतच राहिली.


आयुष्यात सुदैवाने आलेल्या दुसऱ्या पुरुषाकडूनही प्रेम मिळतं पण शरीरसुख मिळत नाही, तरी सावित्री त्याच्याऐवजी इतर पुरुषाचा विचार त्यासाठी करत नाही. 
कादंबरी ऐंशी नव्वदच्या काळातले मध्यमवर्गीय सामाजिक वास्तव, त्या काळातली स्त्रियांकडे, स्त्रीपुरुष संबंधांकडे पाहण्याची दृष्टी अधोरेखित करते. आजची सावित्री कदाचित वेगळी वागेल. स्वतःच्या शारिरीक वासनांची कोंडी ती इतकी करणार नाही.

ग्रंथाली प्रकाशनाची ही कादंबरी रसाळ आहे. वाचताना एक ओघ कायम राहतो. कंटाळवाणं होत नाही. त्यामुळे कादंबरी पूर्ण वाचून होते. हे या कादंबरीचं यशच म्हणायला हवं. 

 या निमित्ताने एक महत्त्वाची पण स्पष्ट अशी गोष्ट इथं सांगावीशी वाटते ती अशी की चाळीशी पन्नाशी उलटलेल्या पुरुषांकडून शरीरसुखाची अपेक्षा बाळगून त्याच्याकडे जाताना स्त्रियांनी देखील त्याच्या क्षमतेचा विचार करणे गरजेचे आहे. या वयातला पुरुष आपल्या शरीराच्या मागण्या किती पूर्ण करू शकेल याचा विचार सावित्रीच्या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक स्त्रीने नक्की करायला हवा. मुख्य म्हणजे लैंगिक सुख आणि विवाह यांची गल्लत करून आपली फरपट करून घेऊ नये. आणि लैंगिक सुख कुठल्याही पुरुषाकडून किंवा स्त्रीकडूनही मिळू शकेल हे गृहीत धरून चालू नये,  एवढं तरी या कादंबरीतून नक्कीच कळतं.  

Jul 8, 2022

रिमझिम गिरे सावन....

रिमझिम गीरे सावन ...

दमदार पाऊस सुरू झाला की "रिमझिम गिरे सावन" या गाण्याची हमखास आठवण येते. कारण मुंबईचा आसमंत ओलाचिंब करून टाकणारा पाऊस या गाण्यात व्यवस्थित चित्रित झालाय. पाऊस अंगावर घेत, चिखल पाणी तुडवत अमिताभ आणि मौसमी मुंबई, मरीन ड्राईव्ह, आझाद मैदान, परिसरात वेड्यासारखे फिरत असतात, कट्ट्यावर समुद्राच्या लाटा अंगावर घेत असतात..
म्हणजे इतक्या सुंदर निसर्गाचे वर्णन असलेले गाणे चक्क मुंबईत, तेही सिग्नल, स्टेशन इत्यादी परिसरात चित्रित केले जाऊ शकेल यावर कुणाचा विश्वास देखील बसणार नाही. पण म्हणूनच आपली चित्रपट नगरी थोर आहे. जे ना सोचे हम तुम वो सोचे बॉलिवूड...
फक्त यात अमिताभ पूर्ण सुटाबुटात का भिजताना दाखवलाय ते माहीत नाही.. आणि साडी नेसून पावसात भिजणे, बर्फात धावणे आणि  नाचणे हे केवळ बॉलिवूड अभिनेत्रीच करू जाणे... आम्हाला इथे घरापासून स्टेशन पर्यंत साडी नेसून चालायचे म्हटले तर परकर पायात अडकतो...🤦
मौसमी त्या काळातील स्त्रिया नेसत तशी टिपिकल प्रिंटेड शिफॉनची अत्यंत साधी साडी नेसून आहे तरी क्यूट दिसते. पण अमिताभ सुटात चिखल उडवत धावताना येडा दिसतो .. पण मुंबईसारख्या शहरात पाऊस अंगावर घेत धुंदीत पळण्याचे काम वेडेच करू शकतात .. नाही का?? बाकीच्यांनी बायकोला भजीच तळायला लावून गलासच घेऊन बसावे आणि कांदेनवमी साजरी करावी....!

Jul 6, 2022

संपन्न वारसा

हरप्पन संस्कृती मधील मोएनजो दरो आणि हरप्पा ही दोन गावे तर पाकिस्तानात गेली. ती बघायची खूप इच्छा असूनही ते शक्य नाही. पण याच संस्कृतीतील लोथल हे गाव अहमदाबाद जवळ असल्याने ते बघायचे कधीपासून मनात होते. ते आज पाहिले... 
साडेतीन हजार वर्षापूर्वी मातीत गडप झालेली ही गावे... त्यांचे बाथरूम, चुली, गोडाऊन, डॉकयार्ड, कारखाने... सगळ्यांच्या विटांच्या रांगा फक्त शिल्लक आहेत. गाईड म्हणाला की या भिंती दहा बारा फूट खोल होत्या. नंतर त्या मातीने भरून घेतल्या परत. तो proper गाईड नव्हता. तिथे काम करणारा माणूस होता. पण तो म्हणाला की आधीच्या पूर्ण भिंतींचे फोटो काढून म्युझियम मध्ये ठेवलेले आहेत. तो कितपत खर खोटं सांगत होता माहीत नाही. लोथल हे मुएंजो दरो आणि धोळा विरा प्रमाणे अजून युनेस्कोने जपायला घेतलेले नाही. त्यामुळे तिथे अनास्था दिसते. 
 म्युझियम दुरुस्ती साठी बंद असल्याने बघता आले नाही.
त्यात तिथे सापडलेल्या टेराकोटा, शंख शिंपले आदिपासून बनवलेल्या मण्यांच्या माळा, भांडी, खेळणी वगैरे ठेवलेली आहेत.
याशिवाय तांबे आणि ब्राँझच्या वस्तू... टेरकोटाच्या भांड्यांवर पेंटिंग आहे.
काल पाच - सात मजली विहिरी पाहिल्या. परवा मोढेराचे सूर्यमंदिर पाहिले. भारतात अशा प्राचीन वास्तू, शिल्पे, मंदिरे, मुर्त्या अनेक ठिकाणी पाहायला मिळतात.. 
प्रत्येक शिल्प कथेत सगळीकडे स्त्रिया, पुरुष, मुले सोबत बरोबरीने वावरताना दिसतात. कुठेही स्त्रिया घुंघट मध्ये दिसत नाहीत. 
शिल्पातील एकेका स्त्रीच्या अंगावरील आभूषणे, त्यांच्या केशभूषा बघता थक्क व्हायला होते. व्यवस्थित शेप दिलेल्या दाढीवाल्या पुरुषांची शिल्पे, स्त्रियांच्या हातात पर्स, आरसा, पुस्तक, लेखणी इत्यादी वस्तू.. कोरलेली वाक्ये, लिपी, भाषा ...हे सर्व पाहता भारतात दीड दोन काय, त्याहून कितीतरी अधिक वर्षे आधीपासून संपन्न, आधुनिक अशी नगरे होती, कारखाने होते, निर्मिती होती. ज्ञान होते. याचे ढळढळीत सूर्यप्रकाशा इतके लख्ख पुरावे ठायी ठायी आढळतात.
तरीही जेव्हा भारतात मोगल आणि इंग्रज येई पर्यंत काहीच, अगदी सुई देखील बनत नव्हती असे म्हणणारे, आणि बनत होते असे म्हणणाऱ्या लोकांना मंद, अंध भक्त इत्यादी म्हणणारे अतीशहाणे लोक किती खोटारडेपणा करतात ते कळतं...
अनेक प्राचीन मंदिरे भूगोल आणि खगोलशास्त्राच्या परफेक्ट ज्ञानावर अशा रीतीने स्थापित आहेत की सूर्यकिरणे ठराविक वेळी बरोबर गाभाऱ्यातील मूर्तीच्या पायावर येतात.
Harappan कालीन नगरात शास्त्रशुद्ध भुयारी गटार व्यवस्था होती. होड्या होत्या, जहाजे होती, व्यापार होता, कला होत्या, क्रीडा होत्या....
आपण अशा एका संपन्न वारशाचे वंशज आहोत. याचा आनंद वाटतो.

Jun 17, 2022

नाशिकची नवलाई -

कढी-वडा, कढी-समोसा, कढी-भेळ....


हे नाशिकला मिळणारे पदार्थ आहेत...
यातील कढी-समोसा खाऊन पाहिला....
कढी भेळ खायला अजून मन घट्ट नाही झालं.
शिवाय वेगवेगळ्या अमृततुल्य चहांसोबतच गुळाचा चहा, देशी गुळाचा चहा, बासुंदी चहा, चुलीवरचा चहा,तंदूर चहा... हे पण आहेच.
एके ठिकाणी एकशे वीस प्रकारच्या मटक्यातल्या खिचड्या मिळतात. म्हणून घेतली, तर ती साध्याच भांड्यात नेहमीसारखी बनवलेली. फक्त पार्सल देताना ते मातीच्या मटक्यात भरून दिले....
मिसळी तर विचारूच नका.. आठवड्यातून दोनदा मिसळीचं पार्सल मागवून सहकुटुंब खाल्लं नाही, तर नाशिककरांना कायद्याने काहीतरी शिक्षा होत असावी बहुधा... इतकं नाशिककरांना मिसळीचं वेड आहे. मिसळीसोबत इथं पापड आणि गोड पदार्थ जिलबी इत्यादी देतात. त्यात द्राक्षाच्या मळ्यातली मिसळ, पेरूच्या बागेतली मिसळ अशा गंमतीजंमतीही आहेत.
इथं एक पाव-वडा हा पदार्थ सगळीकडे मिळतो. यात अख्खा पाव बेसनपीठात बुडवून तळलेला असतो. त्यात अगदी नावाला, बोटभर बटाट्याचे सारण भरलेले असते. ठिपक्याएवढे.... पिझ्झाचे सात तुकडे करतात, तसे त्या मोठ्या तळलेल्या पावाचे सात तुकडे कापून वर चटणी टाकून देतात.
हे असे चित्रविचित्र प्रकार केवळ मुंबई सोडून इतर शहरातच मिळू शकतात. मुंबईकर एक वडा-पाव, आणि दुसरं पावभाजी इतक्या दोनच पदार्थांवर खुश राहू शकतात. हॉटेलमध्ये गेल्यास फारतर इडली डोसा.... संपला कारभार.
मुंबईतून पोहा, थालिपीठ, साबुदाणा खिचडी, मिसळ हे मराठी पदार्थ तर जवळपास हद्दपार आहेत. क्वचितच कुठे मिळतात. शोधून शोधून खायला लागतात.
इथं नाशकात हॉटेलमध्ये गेलात की शेवभाजी आणि लसूनी मेथी सगळीकडे मिळते. त्यात दूध शेव भाजी हा एक महागडा पण चांगला प्रकार असतो. मुंबईला हॉटेलमधून न मिळणारा मराठी भाकरी हा प्रकार इथं सर्रास मिळतो. यात ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदूळ इत्यादी सर्व पीठांच्या उत्तम भाकरी मिळतात. जेवण तिखटच असतं इथं. ब्राम्हणी मिळमिळीत जेवण अजून तरी सापडलं नाही कुठे तिथे.
मात्र इथं डोंबिवलीसारखी ठायी ठायी पोळी-भाजी केंद्रे नाहीत.


किसी पिछले जनम की बात...

मुगले आजम हा सिनेमा पन्नास वर्षानंतर रंगीत झाला, त्यालाही आता जवळपास 20 एक वर्ष लोटली. 🤦काळ किती भराभर चाललाय...    तेव्हा टीव्हीवर दिलीप क...