अधुनमधून थोडी भटकंती केली की आत्मा फ्रेश होतो. त्यातही मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली अशा ठिकाणी तुम्ही राहत असाल, तर दोन चार महिन्यांतून तिथून पळून कुठेतरी निवांत, शुद्ध हवेच्या ठिकाणी चार आठ दिवस जाऊन डिटॉक्स होऊन येणं हे पुढील जगण्यासाठी आवश्यक असतं.
कोकणची भटकंती ही काही कुणाला नवीन सांगण्याची गोष्ट नाही. तरीही माझं कोकणावर प्रेम आहे. मी अजूनही मनाने केशवसूत, पेंडसे, दळवी यांच्या कोकणात वावरत असते. आणि तसं पाहायला गेलं तर अजूनही कोकण तसंच आहे. फार फरक पडलेला नाही.
तिथली हिरवाई, डोंगर, झरे, समुद्र, खाड्या, बारमास वाहणाऱ्या नद्या, देवळं, लाल माती, माड अजून तशीच सुशेगाद आहेत. स्वच्छ आहेत. निवांत आहेत.
कास पठारला जायचं होतं. मित्राने सांगितलं आधी माझ्याकडे रत्नागिरीत या. तिथून जाऊ पुढे. म्हणून आधी रत्नागिरीला गेलो. बरेच वर्षांनंतर. तिथला भगवतीचा किल्ला, भाट्येचा किनारा, गणपती पुळे, आरे-वारेचा किनारा हे सगळं भटकलो, भरपूर फोटो काढले, व्हिडिओज काढले, मस्ती केली.
दुसऱ्या दिवशी मार्लेश्वरला गेलो. डोंगरातला प्रचंड धबधबा आणि डोंगरातल्या गुहेत असलेलं मार्लेश्वराचं वास्तव्य. मंदिर असं नाहीच. गेलो तेव्हाच नेमकी आरती सुरू झाली. नि केशवसुतांच्या ओळी आठवल्या -
उंच नाहीत देवळे मुळी तेथे
परी डोंगर आहेत मोठ मोठे
देवळी त्या देवास बळे आणा
परी राही तो सृष्टीमध्ये राणा
उंच डोंगर ते उंच कडे भारी
पडे धो धो ज्यांचियावरून वारी........
देव बिव न मानणारे मन देखील नकळत नतमस्तक होतं सृष्टीचे ते रूप पाहून.
माझे आजोबा म्हणायचे, 'कोकणात जितके दगड तितके देव, जितका झाडोरा तितक्या भाज्या नि जितकी झाडं तितकी भूतं.'
कोकणी माणूस देवाला भिऊन असतो. नि भूतालाही. त्यामुळेच की काय कदाचित कोकण हे गुन्हेगारीच्या बातम्यात कमीच असतं.
मला आठवतंय, माझ्या बाबांचं किराणा दुकान होतं. तेलाचा ट्रक आला होता. आजुबाजूच्या प्रत्येक दुकानदारांनी आपल्याला हवे असलेले तेलाचे डबे विक्रीसाठी म्हणून घेतले. ट्रक निघून गेल्यानंतर बाबांनी आपण घेतलेल्या डब्यांपैकी दोन डबे उचलून दुकानात आणले. तिसरा घ्यायला गेले, तर तिथे डबा नाही. गायब! पंधरा किलो तेलाचा डबा गायब? ते हैराण झाले. त्यांचा संशय तिथल्याच समोरच्या टग्या दुकानदारावर होता. नक्की त्यानेच उचललाय. त्याला विचारलं तर त्याने सरळ कानावर हात ठेवले. एवढं नुकसान झालं म्हणून बाबा निराश झाले. आधीच छोटंसं दुकान.
आम्ही तिथे भाड्याने दुकान घेतलं होतं. त्या दुकानाच्या मालकीणबाई होत्या खमक्या. त्या म्हणाल्या. तुम्ही सर्वांना मोठ्याने जाहीर करून सांगा, 'माझा तेलाचा डबा ज्यांनी घेतलाय, त्यांनी मुकाट आणून द्यावा. नाहीतर मी वाकडाईला जाऊन नारळ देतो. तीच काय ते चोराचं बघून घेईल.'
वाकडाई म्हणजे ग्रामदैवत.. गावच्या वेशीवर गावाचं रक्षण करत सगळ्यांवर नजर ठेवून बसलेली.
ही कल्पना फलद्रूप झाली. बाबांनी आजुबाजूच्या सर्व दुकानदारांना जाऊन सांगितलं. मुख्यत्वे शंका असलेल्याच दुकानदाराला सांगितलं. बाकीच्यांना फक्त तोंडदेखलंच. पण अर्ध्या तासात तो दुकानदार डबा घेऊन आला बाबांकडे आणि म्हणू लागला, 'काय तुम्ही पण, लगेच देवीला नारळ बिरळ द्यायला निघालात? मी मस्करी करत होतो तुमची.'
थोडक्यात काय, तर पठ्ठ्या घाबरला नि माल चुपचाप आणून दिला. तर असे कोकणातले लोक बरेचसे पापभीरू...
आमच्याकडे पूर्वी एक राष्ट्र्रीय किर्तनकार यायचे. ते म्हणायचे, 'कोकणात भिकारी नाही, कुष्ठरोगी नाही. पण वेडे भरपूर.'
त्याचे प्रत्यंतर आजही येते.
मार्लेश्वर असो, कर्णेश्वर असो, रत्नागिरीतलं ग्रामदैवत भैरीचं देऊळ असो. कुठेही नावालाही भिकारी दिसला नाही. निवांत, प्रशस्त प्रांगण, झाडंमाडं, सुंदर, देखण्या दिपमाळा आणि प्रत्येक मंदिरासमोर असलंच पाहिजे असं एक छानसं देखणं तळं.
मार्लेश्वरला अवघ्या पन्नास रुपयात तांदुळाची गरमागरम भाकरी, पिठलं, मटकीची उसळ, डाळ-भात, ताक असं जेवण जेवलो. त्यांना आवर्जून सांगितलं, की 'बाई हे बरं नाही. इतक्या स्वस्तात जेवण देऊ नका. शहरात दोन वडापाव खायलाच इतके पैसे घेतात. उडपी दोन इडल्यांचेच इतके घेतात.' तर म्हणाली, 'तो वर बसलाय, मार्लेश्वर. त्याच्या कृपेने काही कमी नाही. विनाकारण भाव वाढवणार नाही.'
मला सांगा, कुठल्या देशात पन्नास रुपयात इतकं भरपेट जेवण मिळेल?
एमपी, राजस्थान, उत्तराखंड सगळीकडे पन्नास रुपयात असंच ताजं, चविष्ट जेवण मिळालंय. एमपी आणि राजस्थानात तर पोळीवर साजूक तुपाची धार होती. याच रेटमध्ये.
पण आपण बोलत होतो भिकारींबद्दल. नॉर्थमधील सर्व देवळांच्या बाहेर भरपूर भिकारी. अगदी तगडे भिकारी. पूर्वी नेहमी राजस्थानच्या नाथद्वारा मंदिराला जात असू. एकदा एका भिकारी बाईला दहा रुपये दिले. फार चिकटली होती. भूक लागली, खायला घेऊन द्या म्हणून. आणि अरे बाप रे! लगेच भिकारणींची झुंडच चालून आली माझ्यावर. सगळ्या हात पुढे करून दबाव आणू लागल्या. मी पर्स काखेत दाबून पळाले तिथून. इतके त्यांचे वर्चस्व होते. सगळ्या तगड्या बाया होत्या. माझ्यापेक्षा ताकदवर. हातातली पर्स ओढून घेतायत की काय इतका जोर करत होत्या. नि या भिकारणी. काय म्हणायचं आता...
कोकणी माणूस स्वाभिमानी आहे. जगण्याला चिवट आहे. त्याची भूक कमी आहे. संतुष्ट आहे. तो मुंबईत चाकरमनी म्हणून काम करेल, हॉटेलात कपबशा विसळायचं काम करेल, पण हात पसरणार नाही शक्यतो. अपवाद असू शकतील.
तिथून गेलो कर्णेश्वरला. संगमेश्वरजवळीत कसबा येथे. तिथे शिलाहारकालीन प्राचीन मंदिर आहे. कर्णेश्वराचं. तिथंच आपल्या संभाजीराजेंना शेवटचं पकडलं होतं औरंगजेबाने. दगाफटक्याने. त्यांनी तिथल्या त्या प्राचीन मंदिरात अभिषेक केला, नंतर तिथल्या देसायांच्या वाड्यात काही बैठकीसाठी गेले. तिथेच पकडले गेले. ती सगळी ठिकाणं पाहताना गलबलून आलं.
पुढचे प्रवासवर्णन पुढील पोष्टीत......
सुंदर कोकणा ची सुंदर प्रस्तुती..
ReplyDelete