सात सुखांच्या खाली
दुःखाचा काटा सलतो
भरलेल्या पेल्यावरचा
उरलेला का डुचमळतो..
एकदा एका गोष्टीत तोतया राजकुमारी कोणती आणि खरी कोणती हे ओळखायचं असतं. तेव्हा राजाचा हुशार प्रधान ती जबाबदारी घेतो आणि रात्री त्या दोघींची एकसारख्या बेडरूममध्ये झोपायची सोय करतो. सारखेच शाही पलंग, एकावर एक अशा सात मऊ, रेशमी गाद्या, त्यावर रेशमी चादर, उशी, इत्यादी सारीच सारखी व्यवस्था.
दुसऱ्या दिवशी दोघींना सकाळी तो विचारतो, "झोप लागली ना व्यवस्थित?' तेव्हा त्यातील एकजण म्हणते, 'हो मस्त झोप लागली.' तर दुसरी म्हणते 'नाही, रात्रभर मला गादीखाली काहीतरी टोचत होतं.'
तेव्हा प्रधान सांगतो, 'हीच खरी राजकुमारी. जी शांत झोपली रात्री ती तोतया आहे.'
बात अशी असते, की प्रधानाने रात्री दोघींच्या त्या रेशमी सात मऊ गाद्यांच्या खाली काही वटाण्याचे दाणे टाकून ठेवलेले असतात. खरी राजकुमारी, जिला कोणत्याच अशा गैरसोयींची सवय नसते, सुखासीन आयुष्याचीच सवय असते, तिला ते रात्रभर टोचत राहतात. ती निवांत झोपू शकत नाही. पण जी सामान्य मुलगी तोतया राजकुमारी बनून आली असते तिला मात्र ते ऐश्वर्य सुखाची झोप घेण्यास पुरेसं असतं.
तर आता प्रश्न असा आहे, की त्या राजकुमारीचं दुःख हे खोटं आहे का? तिचा तो माज आहे का?
अनेकदा आपण आपली भावनिक, मानसिक दुःखं, आपल्या समस्या, आपल्या गैरसोयी, अडचणी कुणाला सांगायला जावं, तर त्यांच्याकडून उपदेश येतो, की ज्या लोकांना एवढंही मिळत नाही त्यांच्याकडे पाहा. लोकांना दोन वेळ जेवायला मिळत नाही, रहायला छप्पर नाही, अंगावर कपडा नाही. त्यांची खरी दुःखं! तुम्हाला सुखासुखी सगळं मिळत असताना तुमच्या या समस्या म्हणजे चोचलेच आहेत रिकामपणाचे.
अन्न, वस्त्र, निवारा या तीन मुलभूत गोष्टी नक्कीच महत्त्वाच्या आहेत. त्या प्रत्येक माणसाला मिळायलाच हव्यात हेही तितकंच खरं. या मूलभूत गोष्टीही मिळत नसणारे दुर्दैवी जीव खरेच. अभागीच ते.
पण म्हणून या गोष्टी नीट मिळत असणाऱ्यांची भावनिक, मानसिक दुःखे खोटी कशी ? किंवा गैरसोयीच्या समस्या, खोट्या कशा?. मुलभूत गोष्टी मिळणे ही तर प्रत्येक प्राणीमात्राची गरज. वाघाला देखील शिकार केली की झोपायला गुहा लागतेच. ती मिळायला हवी.
पण या मुलभूत गरजांच्या नंतरच तर खऱ्या अर्थाने मानवी गरजा निर्माण होतात ना. मग सात गाद्यांच्या खालचा वाटाणाही टोचतोच. किंबहुना तो टोचतो तेव्हाच ती व्यक्ती जगण्याच्या प्राणीस्तरावरून जगण्याच्या माणूस स्तरावर पोचलेली असते. वाटाणा न टोचणारी मुलगी अभावातून आलेली आहे. दुर्दैवी आहे. पण म्हणून वाटाणा टोचणारीचं दुःखं हे दुःखच नाही किंवा ते कमी प्रतीचं आहे कसं म्हणायचं? तिने आपली रात्रीची झोप गमावली आहे हे सत्य उरतंच.
No comments:
Post a Comment