Nov 2, 2022

झोला उठाकर चलो....

 गुगलमुळे आपल्या आपण ट्रिप आखून फिरणं सोपं झालंय खूप. त्यासाठी टूर कंपन्यांना अव्वाच्या सव्वा पैसे मोजावे लागणं आता कमी झालंय.

तरी देखील अजूनही खूप लोकांना स्वतःच्या ट्रिप स्वतः आखून जायचा कंटाळा येतो. बऱ्याचजणांना गुगलवरून माहिती कशी मिळवावी आणि ट्रिप कशा अरेंज कराव्या हे समजत नाही.
मी गेली जवळपास दहा वर्षे थोडं फार फिरले. भारतात आणि थोडं भारताबाहेरही. त्यात मोजक्या तीनचार ट्रिपच टूर कंपन्यांबरोबर गेले. बाकीच्या माझी मीच गुगल सर्च करून अरेंज केल्या आणि फिरलो.
बहुतेक ट्रिप मी आणि माझा नवरा असे दोघेच गेलो.
खरंतर त्या ट्रिपची तपशीलवार माहिती लिहून ती ब्लॉग किंवा फेसबूक इत्यादीवर टाकली असती तर लोकांना त्याचा फायदा झाला असता असे आता वाटू लागलेय.
म्हटलं तर अत्यंत सोपं आहे. अनेक हुशार लोकांना अशा माहितीची गरजही नाही. हे मला माहीती आहे. पण बरीच मोठी संख्या अशी आहे, त्यांना अजून हे नीट माहिती नसतं. त्यांच्यासाठी असे ब्लॉग उपयोगी पडू शकतात.
लिहू म्हटलं तर अनेकदा कंटाळाही असतो, अनेकदा असं वाटतं की या तर भारतातल्या सोप्या सोप्या ट्रिप्स, आपण आजवर गेलो नाही, पण बाकीचे अनेक लोक अनेकदा फिरून आले असतील या ठिकाणी. त्यांना कसले आलेय कौतूक...
तरी माझी मी अरेंज करताना खालील गोष्टी क्रमाने करत असते. हे माझ्यासारख्याच अज्ञ लोकांसाठी -
१. सर्वप्रथम मी त्या स्थळांच्या राज्यांची पर्यटन साईट उघडून ती स्थळं आणि त्यांची माहिती बघते. ती वाचत असतानाच त्यातील स्थळे एकमेकांपासून किती लांब आहेत हे मॅप उघडून बघून गेते. अशा जवळपासच्या स्थळांची एकत्र ट्रिप करण्याचे ठरवते.
२. त्या साईटवर त्या स्थळांचे हवामान, जाण्यासाठी कोणते ऋतु योग्य, जाण्यासाठीचे मार्ग, वाहने यांची माहिती असते. शिवाय प्रत्येक राज्याच्या पर्यटन खात्यांची राखीव हॉटेल्स असतात. त्यांची माहिती, त्यांचे रेट्स दिलेले असतात. ही हॉटेले बहुतेक ठिकाणी चांगली, बऱ्यापैकी, मध्यमवर्गीय लोकाना परवडतील अशी असतात. तिथला स्टाफ सहकार्य करणारा असतो. सुरक्षित असतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ती त्या त्या ठिकाणच्या मोक्याच्या ठिकाणी असतात. उदा. नैनीतालला कुमाऊ गेस्टहाऊस नैनी तळ्याच्या अगदी काठावर आहे.
३. जाण्याची तारीख ठरली, की रेल्वे किंवा फ्लाईट्सचे रिझर्वेशन करते. जाण्या येण्याचे. साधारण प्रत्येक ठिकाणी दोन ते तीन दिवस लागतील या अंदाजाने ट्रिप आखून घेते. एका स्थळाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचे रिझर्वेशन असेल तर तेही करून घेते. किंवा तिथे जाऊन मग टॅक्सी करतो. अनेकवेळा लोकल बसने इत्यादी देखील प्रवास करतो. (सामान एक मोठी आणि एक खांद्यावरची अशा दोनच बॅग ठेवतो अशावेळी. तर अशी इकॉनॉमी टूर करता येते.)
४. जाण्यायेण्याचे रिझर्वेशन झाल्यावर हॉटेल्सची बुकींग करते. भारतातल्या आणि जगातल्याही बहुतेक लहान मोठ्या शहरातल्या हॉटेल्स, मोटेल्स, झोस्टेल्स, होस्टेल्स इत्यादींची यादी, फोटो, आणि रेट गुगलवर अनेक साईट्सवर मिळतात.. अव्हेलेबिलिटी दिसते. शिवाय या सगळ्या साईट्समध्ये आपसात स्पर्धा असल्याने कमीत कमी रेटमध्ये हॉटेल्स मिळू शकतात. सर्च करत राहिल्याने वेगवेगळ्या साईट्सचे सतत बदलते रेट्स समोर येत राहतात. आपल्या आवा्क्यात असलेले, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले हॉटेल अत्यंत सहजपणे बुक करता येते. प्रत्यक्षात तिकडे जाऊन त्या हॉटेलचे असलेले रेट्स आणि ऑनलाईन बुकींगमध्ये असणारे रेट्स यात भरपूर फरक असतो. ऑनलाईन खूप स्वस्तात मिळतात.
५. बस.. यानंतर काहीही करायचे नाही. त्या त्या स्थळांची माहिती गोळा करत राहायचे निवांत. तिथली बघण्यासारखी स्थळे, खाणं पिणं, खरेदी इत्यादी. आणि प्रत्यक्ष तिकडे गेल्यावर हॉटेलच्या काऊन्टरवर देखील भरपूर माहिती मिळते तोंड उचकटून विचारल्यावर. टॅक्सी, रिक्षा, बस काय योग्य आहे तेही कळते तिथे. त्याप्रमाणे दिवसभर भटकंती करावी. खावं प्यावं, शॉपिंग करावी.
इतकं सोपं आहे हे.
भारतातल्या भारतात फिरायला तर अगदी सोपं आहे. थोडी सावधानी, थोडी दक्षता, थोडी हुशारी राखली तर कुठेही फसवलं जात नाही. वाईट अनुभव येत नाहीत. त्यातही गुजरात, राजस्थान, पंजाब, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक, केरळ आदी साऊथची राज्ये ही तर आपल्या घरआंगनसारखी असतात. जेथे जाऊ तेथे आपलीच भावंडे दिसतात. आपल्याच शहरासारख्या बऱ्यावाईट सुविधा असतात. बस, रिक्षा, टॅक्सी आणि त्यांचं बारगेनिंग... सगळं असतं. मस्त घासाघीस करून ठरवावं. असं फिरण्याने त्या शहराचं अंतरंग बघता येतं, स्थानिक खानपान कळतं. टूर्ससोबत गेलो की हे शक्य नसतं. फक्त महत्त्वाच्या ईमारती बघून परत येतो. उदा. आता बघा, समजा मुंबईत कुणी फिरायला आलं बाहेरून तर टूर कंपन्या त्यांना काय दाखवणार? गेटवे.. गिरगाव चौपाटी, मरीन ड्राईव्ह आणि अमिताभचा बंगला.... पण मुंबई म्हणजे एवढंच आहे का? तर नाही. हे आपल्याला माहीत आहे... मुंबई म्हणजे लोकलचा प्रवास, वडापाव, दादर, क्रॉफर्ड, भुलेश्वर इत्यादी स्थळांवरील गर्दीतली पण स्वस्तात मस्त खरेदी... असं बरंच काही असतं ना... ते कसं अनुभवणार टूर्स सोबत... त्यासाठी स्वतंत्रच फिरायला हवं. तर असंच सगळ्या ठिकाणचं असतं. म्हणून स्वतंत्र फिरा... भारतातल्या बहुतांश राज्यांत अगदी एकटंही निर्धोक फिरता येतं. भाषेचा काही प्रश्न येत नाही.
हॉटेल्स चेकआऊट केल्यावर ट्रेनसाठी वेळ असेल, तर अनेक मुख्य रेल्वे स्टेशन्सवर सामान ठेवण्यासाठी लॉकर्स असतात. (त्यासाठी सोबत नेहमी आपली एक दोन छोटी कुलुपे आणि चावी जवळ ठेवावी.) वेटींग रूम असतात. रिटायरींग रूम असतात. या आयत्या वेळी देखील मिळतात. अगदी स्वतंत्र रुमदेखील असतात. मात्र त्याचं बुकींग आधी करावं लागतं. सामान लॉकर मध्ये टाकून तुम्ही ट्रेनच्या वेळेपर्यंत पुन्हा शहरात फिरून येऊ शकता... खान पान आटोपून येऊ शकता....
काही हॉटेल्सवाले तुम्हाला पिकअपची सोय देखील देतात. एअरपोर्टवर किंवा रेल्वे स्टेशन्सवर... त्यांना फोन करून सांगून ठेवावे.
मग... करून पाहा एखादी छोटीशी टूर आपली आपण.... एकतर पैसा वाचतो खूप...आणि दुसरं म्हणजे आपल्या मर्जीने हवं तिथे हवं तितक्या वेळ रेंगाळता येते. कुणाला प्राचीन स्थळांत रस असतो, कुणाला नैसर्गिक, कुणाला शॉपिंगमध्ये तर कुणाला निरुद्देश भटकण्यात.... आपण स्वतंत्रपणे गेलो तर यातलं आपल्या मर्जीने करता येतं. नको ते बघत इतरांसोबत फरपटावं लागत नाही..... प्रवासात सामान कमीत कमी, कपडे कमीत कमी ठेवले की आपलं आपण सामान उचलून धावता येतं. बसेस इत्यादी पकडता येतात. दोन दिवसाला एक जोड असेच कपडे ठेवावेत. अंतर्वस्त्रं (स्त्रियांची) आजकाल युज एन्ड थ्रो मिळतात. यात अनेक प्रकार असतात. ते वापरावेत. कपडे धुण्याच्या भानगडीत कुठेही पडू नये. मी पाहिलेय की बऱ्याच बाया टूरला गेल्यावर हॉटेलवर आल्यावर आधी बाथरूममध्ये कपड्यांचा ढिग धूत बसतात... अरे कशाला... यासाठी तुम्ही आलाय का इकडे... सोडा ते... घरी गेल्यावर बघा... दोन तीन दिवस एकच जीन्स आणि एकच टीशर्ट वापरा. आणि रात्रीची एखादी नाईटी. बास. सगळीकडे दिवसाला तीन तीन ड्रेस बदलायला आपण काही पडद्यावरच्या हिरोईन्स नाहीत की आपल्याला त्याचे पैसे मिळणार नाहीत. त्यांची टीम त्यांच्यासोबत असते ते सगळं उरकायला...
अलका गांधी -असेरकर
See insights
Like
Comment

1 comment:

किसी पिछले जनम की बात...

मुगले आजम हा सिनेमा पन्नास वर्षानंतर रंगीत झाला, त्यालाही आता जवळपास 20 एक वर्ष लोटली. 🤦काळ किती भराभर चाललाय...    तेव्हा टीव्हीवर दिलीप क...