May 3, 2024

जा जरा उत्तरेकडे...

एका बाजूला पार आकाशात आपले सुळके घुसवून उभे असलेले भव्य पहाड, तर दुसऱ्या बाजूला खोल खोल दरी.. जिला दरी म्हणणे म्हणजे तिचा अपमान करणेच होय. खोल खोल पाताळ म्हणायला हवे..
दोन्हीं कडे पाहताना छाती दडपते. निसर्गाचे भव्य पण रौद्र सौंदर्य पाहून आनंदासह भीती वाटत राहते. 
मध्ये मध्ये असंख्य झरे, ओढे, तलाव आणि धबधबे..मध्येच बर्फाची पखरण.. उतरणीवरची छोटी छोटी गावे. दोन पहाडांमधून खोल खाली वाहणाऱ्या नद्या. मधूनच धुक्याने भरून जाणारा आसमंत...
हे उत्तर किंवा उत्तर पूर्व भारतातील अनेक ठिकाणांचे सार्थ वर्णन. बस एवढेच. पण तरीही पुन्हा पुन्हा मोहवते. साद घालते. 
या पहडांमधून गोल गोल फिरणाऱ्या  वळणदार रस्त्यांवरून आपली गाडी तिथले ड्रायव्हर शिताफीने चालवत राहतात. समोरून येणाऱ्या गाडीला ना थांबता वळसा घालून झरकन पुढे निघतात, तेव्हा आपल्या छातीचा ठोका चुकतो. तिथे स्थानिकच ड्रायव्हर हवेत. आपले काम नव्हे. बहुतेक ठिकाणी अपवाद वगळता रस्ते उत्तम आहेत.
शहरे आपल्या शहरांसारखीच झालीत आता सगळीकडे. पण वाटेत भेटणारी छोटी छोटी गावे आपले वेगळेपण अजून बऱ्यापैकी राखून आहेत.
थंड हवेत गुलाब खूप फुलत असावेत. जागोजागी घरांसमोर लाल गुलाब फुललेले असतात. एकेका झाडाला पन्नास शंभर गुलाब!

हे उत्तरेकडील पहाडी सौंदर्य हिंदी सिनेमाने पडद्यावर आपल्याला बरेच दाखवलेले आहे. पण प्रत्यक्षात अनुभवणे जास्त सुखद. सगळा स्ट्रेस पार दूर निघून जातो. मन ताजे तवाने होते. या भव्य निसर्गासमोर आपले खुजेपण, आपले हेवे दावे, आपली सुख दुःखे, आपले विचार सगळे ठेंगणे वाटू लागते. 
तवांग पासला १५५०० फूट उंचीवर आल्यावर आकाश अगदी हाताशी येतेय असे जवळ वाटत होते. असे इतके जवळ आकाश कधी पाहिले नव्हते. तर पहाडांच्या खूप खाली दरीत तरंगणारे पांढऱ्या ढगांचे मोठाले पुंजके..
आपल्या सह्याद्रीच्या रांगा, कडे, हे या हिमालयीन पहाडांसमोर अक्षरशः पिल्लू आहेत. कितीही वर वर गेलो, तरी पहाडांवर पहाड अंतहीन भेटतच जातात. एका ठिकाणाहून दुसरे ठिकाण गाठायला किमान आठ ते बारा तास गरगर प्रवास करावा लागतो. मात्र हे भव्य सौंदर्य आणि थंड हवामान यामुळे प्रवासाचा कंटाळा येत नाही. वाटेत छोटे छोटे कॅफे, धाबे प्रवासाचा शीण हलका करायला भेटतातच. या धाब्यांच्या दारात गुलाब फुललेले असतात.बहुतेक ठिकाणी हे कॅफे चालवणाऱ्या स्त्रिया मुलीच असतात. नॉर्थ इस्ट कडे सर्व दुकानांतून स्त्रियांचे राज्य. त्यामुळे की काय साडे आठ नऊला दुकाने बंद होतात. त्यांना घरी जाऊन घर सैपाक पण बघावे लागत असणार. लहान मुलांना पाठुंगळीच्या झोळीत बांधतात.
नॉर्थ इष्ट, भूतान, हिमाचल या ठिकाणी खूप सुंदर बौद्ध मॉनेस्ट्री भेटतात. सिक्किमला एके ठिकाणी एका उंच पहाडावर बुद्धाचा भव्य पुतळा, बाजूच्या दरीतून विहरणारे पांढरे ढग, त्यांना भेदून वर आलेले पहाडांचे सुळके, त्यावर बर्फाची पखरण आणि त्या गार सुखद वातावरणात जणू काही खोल दरीतून लहरत येत आल्यासारखे बौद्ध स्तोत्रांचे सूर...अवघे वातावरण परम शांती देणारे आणि आनंदित करणारे..तिथून हलुच नयेसे...
ही शांती, हे पावित्र्य, ही स्वच्छता कुठल्याच प्राचीन, अर्वाचीन मंदिरात मिळत नाही. अपवाद कोकण आणि दक्षिणेकडची काही मंदिरे थोडीशी...
मी पर्यटनात कुठल्याच मंदिरात जात नाही. रांगा लावून तर नाहीच. बाहेरून सहज बघता आली तरच. उत्तरेकडे तर अतिशय गलिच्छ. पंडे पुजारी यांनी वेढलेला, त्यांच्या तार स्वरातील कर्कश श्लोकानी  वैतागलेला देव स्वतः तर हळद कुंकू फुले अभिषेकात गुद्मरलेला.. त्याचे मूळ स्वरूप दिसतच नसते..! असो.
उत्तरेकडे निसर्गात आठ दहा दिवस जरी फिरून आलो तरी वर्ष भराची ऊर्जा मिळते. म्हणून तुम्हीही... जा जरा उत्तरेकडे....




No comments:

Post a Comment

किसी पिछले जनम की बात...

मुगले आजम हा सिनेमा पन्नास वर्षानंतर रंगीत झाला, त्यालाही आता जवळपास 20 एक वर्ष लोटली. 🤦काळ किती भराभर चाललाय...    तेव्हा टीव्हीवर दिलीप क...