Jul 10, 2021

सायकल -

 

सायकल –

 

शिवा रोज ती सायकल बघायचा आणि त्याचा जीव खालीवर व्हायचा. रोज त्याच्या स्वप्नात ती छोटीशी, नाजूक, सुंदर सायकल यायची. आपण त्या सायकलवर बसून वाऱ्याच्या वेगाने ती सुसाट चालवतोय हे एकच स्वप्न तो रोज बघत होता. एखाद्या भुकेल्या माणसाला पंचपक्वान्न पाहून जसं होईल, तसंच त्याला होत होतं म्हणाना, ती सायकल पाहून. बाजूच्याच दोन सोसायटी सोडून तिसऱ्या सोसायटीतला त्याच्याएवढाच एक गोरापान, स्वच्छ, सुंदर मुलगा ती सायकल चालवत त्याच्या चहाच्या टपरीसमोरून अनेकदा जात होता. आणि त्या सायकलला पाहून शिवा कासावीस होत होता.

खरंतर शिवाला सायकल चालवताही येत नव्हती अजून. पण एकदा मिळाली, तर शिकायला असा काय वेळ लागणार? आपण ती सहज आणि लगेच शिकू असा त्याला आत्मविश्वासच होता.
आजही तो गोरा मुलगा ती सायकल चालवत त्याच्या समोरून गेला आणि शिवा जागेपणीच स्वप्नात हरवला. त्या सायकलवर बसला आणि सुसाट निघाला रस्त्यामागून रस्ते टाकत लांब.. लांब... कदाचित आपल्या गावापर्यंत.. जिथून तो आला होता. जिथून त्याच्या आईबापाने त्याला इतक्या लांब कमवण्यासाठी चहाच्या टपरीवर पाठवून दिलं होतं.
तेवढ्यात हाक आली, ‘शिवा, क्या कर रहा है उधर? चाय कौन तेरा बाप ले कर जाएगा क्या साले?’
तसा तो दचकला, भानावर आला आणि चहाचा क्रेट उचलून धावला.
त्याची चहाची टपरी म्हणजे तो ज्या चहाच्या टपरीवर पोऱ्या म्हणून काम करत होता ती.

शिवा फारतर आठदहा वर्षांचा असेल. काळासावळा, वयापेक्षा थोडा बुटका पण अंगाने भरलेला, अंगावर जुने विटके कपडे. कधी हाफ पॅन्ट तर कधी फुलपॅन्टही असायची. पण जुनेरीच.

चहाच्या टपरीवरून चहाचे भरलेले पेले असलेला जाळीचा ट्रे घेऊन तो आजुबाजूच्या दुकानवाल्यांना, रस्त्यावरच्या फेरीवाल्यांना त्यांच्या ऑर्डरचा चहा नेऊन द्यायचा. रस्त्याच्या अलिकडे-पलिकडे दोन्ही ठिकाणी त्याच्या फेऱ्या चालू असायच्या. मधला वाहता रस्ता सुसाट वाहनांची वर्दळ असलेला. त्याच्याएवढ्या एखाद्या चांगल्या घरच्या मुलाला त्याची आई अशा रस्त्यावर एकटाही पाठवणार नाही कदाचित, रस्ता क्रॉस करून जायचं असेल तर.
पण शिवा सरावला होता.
त्याला त्या कामाचाही सराव झाला होता. चहाचे पेलेच तर पोचवायचे असत. रस्त्यावरची किती गंमत पाहायला मिळायची. भरलेला बाजार, वर्दळ, रंगीबेरंगी माणसं. त्यात त्याला ते काम काही फार जड वाटत नव्हतं. शिवाय मालक त्याचा पगार त्याच्या आईबाबांना पोचवत होता आणि दोन्ही वेळ त्याला पोटभर जेवायलाही घालत होता. दुकानातच रात्रीचा इतर दोन कामगारांसोबत झोपायचीही सोय होती.
तरीही, समोरून त्याच्याच वयाची स्वच्छ, सुंदर मुलं पाठीवर स्कूल बॅग अडकवून मस्ती करत जाताना दिसली की तो त्यांच्याकडे एकटक पाहात राहायचा. रस्त्याच्या पुढच्याच वळणावर अनेक शाळांच्या विविध बसेस थांबायच्या. त्यातून चिवचिवाट करत लहान-मोठी मुलं चढता उतरताना दिसायची. तेव्हा मनातल्या मनात तोही त्या बसमध्ये जाऊन बसायचा.

कधी कधी स्वप्नांत तो पाठीला बॅग लावून सायकलवरून शाळेपर्यंत पोचायचा. तेव्हा ती शाळा त्याच्या गावातली त्याला अंधूक आठवणारी छोटीशी प्राथमिक शाळा असायची. त्या शाळेतली मुलं सगळी त्याच्या ओळखीची होती. त्याच्याच आजुबाजूला राहणारी, त्याच्यासोबत खेळणारी. ती सगळी मुलं त्याच्या त्या सायकलीभोवती गोळा होत. कौतुकाने बघत राहत. काही जण त्यावरून हात फिरवून बघत. शिवाला ते पाहून अजून आनंद होई. अशी सायकल त्या गावात कुणापाशीच नव्हती.
आता इथून पुन्हा त्या चहाच्या दुकानात जाणार नाही असं तो आईबाबांना सांगायचं ठरवून टाकी. आपण रोज ही सायकल घेऊन आपल्या या शाळेत जाऊ. पाठीला दप्तर लावून.

हे स्वप्नं पूर्ण होईपर्यंत पहाट व्हायची. पाच वाजल्यापासूनच दुकानात वर्दळ सुरू व्हायची. चहाचा मोठा स्टोव्ह ढणाढणा पेटायचा. मालक त्याच्या अंगावरची चादर ओढून, एखादी शीवी देतच त्याला उठायला भाग पाडायचा. शिवा स्वप्नं बाजूला सारून उठायचा आणि तोंडावर पाणी मारून कामाला लागायचा.


एकदा शिवा चहाचे पेले घेऊन रस्त्याकडेला असलेल्या दोन सोसायट्या सोडून तिसऱ्या सोसायटीत गेला. खरं तर चहाच्या टपरीवरून चहा मागवणारं त्या सोसायटीत कोणी नव्हतं. सगळी सोसायटी रहिवाशांची होती. तिथं कोणतंही दुकान नव्हतं. पण बहुधा सोसायटीची काही कामं चालू होती. ती कामं करणाऱ्या कामगारांसाठी तो चहा घेऊन आलेला होता. चहाचे पेले त्या कामगारांच्या हातात एकेक करून दिल्यावर त्यांचा चहा पिऊन होईपर्यंत तो इकडे तिकडे बघत तिथेच फिरत होता.

तेवढ्यात... त्याची दृष्टी एका कोपऱ्यात गेली. तीच सायकल! तिथं उभी होती. आणि तिला साखळी वगैरे काहीही बांधलेली नव्हती. शिवाचे डोळे लकाकले. दिवसरात्र या सायकलीनेच तर त्याचा पिच्छा पुरवला होता. म्हणजे तो गोरापान मुलगा याच इमारतीत राहात होता तर. शिवाला अगदी राहवत नव्हतं. त्याने भराभर चहाचे रिकामे पेले गोळा केले. धावत जाऊन दुकानात ठेवले आणि मालकाचा डोळा चुकवून तसाच सुसाट पळत तो पुन्हा त्या सोसायटीत आला. सगळ्यांची नजर चुकवून त्याने ती सायकल हळूच बाहेर काढली, त्याचे दोन्ही हॅंडल धरून तो हळू हळू सोसायटीच्या बाहेर पडू लागला. तो ती सायकल नेण्यात इतका तल्लीन झाला होता की तो जराही इकडे तिकडेही बघत नव्हता. अगदी आपलीच नेहमीची सायकल असल्यागत सराईतपणे तो गेटच्या बाहेर पडायला जाणार, इतक्यात,
‘ए मुला, सायकल घेऊन कुठं चाललास? ठेव ती सायकल जाग्यावर. सायकल चोरतोस काय?’ अशी बाजूच्याच खिडकीतून हाक आली.
तो दचकला, कावराबावरा झाला. थोडा घाबरला. खिडकीतली बाई फार जोरात ओरडत नव्हती. किंवा फार रागाने बोलत नव्हती. पण तरीही त्याला काय बोलावं ते सुचेना.

खिडकीतली ती गोरीपान बाई, ती त्या मुलासारखीच दिसत होती चेहऱ्याने. म्हणजे त्या मुलाची आईच असणार ती. ती पुन्हा म्हणाली, ‘ठेव ती सायकल तिथे. सायकल चोरतोस का? सांगू का तुझ्या मालकाला येऊन?’

तेव्हा मात्र तो घाबरला. सायकल तिथेच भींतीला लावली आणि तो गेटबाहेर पळत सुटला.
-

-

-

शिवा पळून गेला.

पण इकडे खिडकीतल्या बाईचा जीव कासावीस झाला. अगदी योगायोगाने ती खिडकीत यायला आणि त्याचवेळी शिवाच्या हातात आपल्या मुलाची सायकल दिसायला एकच गाठ पडली होती. क्षणभर तर तिला त्या मुलाला काय बोलावं तेच कळलं नाही. त्या मुलाला तिने जवळच असलेल्या चहाच्या टपरीवर अनेकदा पाहिलं होतं. कारण त्या टपरीच्याच बाजूला त्यांचा नेहमीचा किराणावाला होता. असं कधी कुठल्या चोराला हटकायचं कारण पडलं नव्हतं, जो आपल्या डोळ्यासमोर चोरी करून जाईल. त्यामुळे तीही गोंधळली. पण लगेच तिने हाक मारली,
‘ए मुला, सायकल चोरतोस काय? ठेव ती जाग्यावर.’
तो मुलगा पळून गेला. पण नंतर तिच्या मनात कालवाकालव झाली. जाऊ द्यायला हवं होतं का आपण त्याला सायकल घेऊन. तशीही ती दोनेक वर्ष जुनीच तर झाली होती. एवढुसं पोर, इतकं धाडस करून सायकल नेतंय म्हणजे त्याचा किती जीव अडकला असेल त्या सायकलीत? आणि आपण नेमकं त्याचवेळेला खिडकीत नसतो आलो, तर गेलीच असती ना सायकल चोरीला. मग आपण थोडंसं हळहळलो असतो फारतर. अजून काय मोठं होणार होतं? 

पण त्याने ती सायकल नेऊन कुठं ठेवली असती? त्याला त्याच्या चहाच्या टपरीवाल्या मालकाने हटकलं नसतं? ही सायकल कुठून आणली म्हणून? कुठे लपवून ठेवू शकणार होता तो ती सायकल? आणि कुठे, कशी, कधी चालवू शकणार होता?
अनेक वर्ष झाली. पण अजूनही बाईंना ती सायकल त्याला घेऊन जाऊ दिली नाही याचा पश्चात्ताप होतोय. पण त्या आपल्याच मनाला समजावतात, की अशा चोराला इतर कुणी पाहिलं असतं तर धरून चोपलं असतं, हंगामा केला असता, शिवीगाळ केली असती. आपण निदान त्याला तसं काही केलं नाही.

आणि शिवा.... तो कुठे आणि कसा असेल आता देवच जाणे....

- अलका गांधी-असेरकर

Jul 2, 2021

चिमण्या

 सैपाकघराच्या खिडकीत चिमण्यांसाठी फिडर लावलं. पण फिडर लावलं की लगेच चिमण्या येत नसतात. कधी कधी तर दोन दोन महिने येत नाहीत. त्या अदमास घेतात. घाबरतात. पण धीर ठेवून वाट पाहात राहिलो की एक दिवस दबकत दबकत हळूच एखादी चिमणी येते. मग दुसरी येते. 
मग बरेच दिवस या दोघीच येतात. यांना रोज बिनधास्त दाणे टिपताना पाहून मग बरेच दिवसांनी तिसरी येते. पण या दोघी तिला येऊ देत नाहीत. एकच कल्ला करतात आणि तिला हाकलून लावतात. त्यांचंही बरोबरच असतं. पहिली रिस्क त्यांनी घेतलेली असते, हे धान्याचं कोठार शोधून तिथे येण्याची. बसण्याची आणि जीवाला घाबरत घाबरत दाणे खाऊन बघण्याची. आता या मेल्या आयत्यावर रायतं करायला येणार का? हॅट आम्ही नाही येऊ देणार..
पण हळू हळू बाकीच्याही येतातच. भांडणं चालूच राहतात. आणि संधी मिळेल तसं एकमेकींना हुसकावत दाणे टिपणंही. अखंड चिवचिवाट... 
सैपाकघरातील ओट्याच्या अगदी समोर दोन फुटावर तो फिडर असल्याने सुरुवातीला माझी चाहूल ओट्यापाशी लागली की त्या भूर्रकन उडून जायच्या. जोपर्यंत आपण तिथून दूर होत नाही तोपर्यंत परत येत नाहीत. नंतर मात्र हळू हळू त्या आपल्या उपस्थितीला सरावतात. इथं धोका नाही याची त्यांना हळू हळू खात्री वाटू लागते. 
पण अजून एक वेगळीच गंमत आहे. 

मी जर खाली मान घालून माझं काम करत असेन ओट्यापाशी तरी त्या बिनधास्त चरत राहतात. येतात जातात भांडतात. पण मी त्यांच्याकडे नजर उचलून पाहिलं रे पाहिलं की लगेच भूर्रकन उडून जातात. मला फार आश्चर्य वाटायचं. हा काय प्रकार. अशा येतात. पण मी पाहिलं तर निघून जातात. फोटो देखील लपून छपून काढावे लागतात. जोपर्यंत मी नजर वर उचलून पाहत नाही तोपर्यंत त्या बिनधास्त असतात. मग मला असं लक्षात आलं की कदाचित माणसांचे डोळे पाहिल्यावर त्या घाबरत असतील. माणसाचे आणि त्यातही माझे ते भले मोठे काळे काळे डोळे पाहिले की त्या बिचकत असतील. कदाचित माणसांच्या डोळ्यांकडे त्यांचे लक्ष लवकर वेधले जात असेल. 

पण मला खात्री आहे, हळू हळू त्या माझ्या डोळ्यांनाही सरावतील. आणि मी त्यांच्याकडे एकटक बघत राहिले, तरी त्या बिनधास्त चरत बसतील. कारण, 
माझ्या माहेरी कोकणातल्या त्या मोठ्या घराच्या ओटीवर आजोबांनी एक मोठा, जवळपास दोन फुटाचा पत्र्याचा झोपाळा टांगला होता. चिमण्यांसाठी धान्य टाकायला म्हणून. चिमण्यांसाठीच स्वस्तातल्या भाताची एक दोन पोती घेऊन ठेवली जायची. त्यातले धान्य मूठमूठभर जाता येता घरातले कुणी ना कुणी टाकत राहायचे त्या झोपाळ्यात. आणि असंख्य चिमण्या यायच्या. आमची ओटी चिवचिवाटाने गजबजलेलीच असायची. जरा कुणी जवळ आले, ओटीपुढच्या अंगणातून कुणी जात असले, तर उडाल्यासारखं करून दुसऱ्याच सेकंदाला पुन्हा येऊन बसायच्या. तो झोपाळा चिमण्यांनी फुलून गेलेला असायचा. फक्त चार महिने. पावसाळ्यातले. पावसाळा संपला की त्या कुठे गायब व्हायच्या कोण जाणे. धान्य टाकलं तरी यायच्या नाही. आजोबा म्हणायचे आता त्यांना शेतात पडलेले दाणे मिळतात खायला. पावसात मिळत नाहीत. खरं खोटं कोण जाणे. 
दिवसभर चिमण्यांना भात, फक्त सकाळी एकदा छपरावर कबूतरांना ज्वारी, आणि समोरच्या रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या पथिकांसाठी ओटीवर, किंवा दुकानात भरून ठेवलेला पाण्याचा माठ ह्या आजोबांच्या पुण्याच्या कल्पना होत्या तेव्हा...!   



Jan 15, 2021

सरस्वती -

 समजा, उद्या माझं कवितांचं पुस्तक लैच गाजलं 😜 आणि त्याला वेगवेगळ्या पुरस्कारांसोबत एखाद्या मुस्लिम गटाकडून देखील पुरस्कार मिळाला 😝आणि त्या पुरस्कारावर उर्दूत (किंवा अरेबीत) 'अल्लाह' असं लिहिलेलं असेल, तर मी पुरस्कार स्वीकारावा की नाही?

काळजीने झोप येत नाहीए... काय निर्णय घ्यावा मी अशावेळी?
-
-
-
सध्या सरस्वतीवर गंडांतर आलंय.
या देशात सरस्वती विद्येची, लक्ष्मी धनाची आणि दुर्गा शक्तीची प्रतिक मानली गेली, पुजली गेली, तरी मध्यंतरीच्या शेकडो वर्षांच्या काळात स्त्रियांनाच (सर्वच वर्णजातीच्या) शिक्षण नाकारलं गेलं, आर्थिक स्वावलंबन नाकारलं गेलं, आणि अबला म्हणून हिणवलं गेलं...
मान्य...
पण त्यात या तिघींचा काय दोष... त्या स्वतःच बिचाऱ्या कैद केल्या गेल्या अंधाऱ्या गाभाऱ्यात.. दागदागिन्यांनी मढवून गोठवल्या गेल्या.
त्यांनी तर सांगितलं नव्हतं की माझी विद्या, माझी शक्ती, माझी संपत्ती कुणाला देऊ नका म्हणून?
कुणाला सोडा... त्यांच्याचकडून या तीन गोष्टी हिरावल्या गेल्या.
त्या बिचाऱ्यांचा राग करून काय उपयोग? अडाणी, निरक्षर बहिणाबाईही म्हणतात - माझी माय सरसोती, मला शिकवते बोली | लेक बहिणाच्या मनी किती गुपितं पेरली||
छोडो कल की बातें...
सरस्वतीच्या मांडीवर छान वीणा आहे... हातात पुस्तक आहे.. बाजूला मोर आहे, हंस आहे... लोभस आहे हे सगळं...
प्रतिकं चांगली असतात, माणसं त्यांचा गैरफायदा घेतात. गैरवापर करतात.
असो...
हिंदूंची सर्वच प्रतिकं नाकारायची, तर हिंदूंच्या कुठल्याच कार्यक्रमात सामील होता येणार नाही, आप्तस्वकीयांच्याही नाही.
उद्या तुमच्या घरात हिंदू मुलगी सून म्हणून आली, तर तुम्ही तिच्या श्रद्धांना नाकारणार? तिला नाकारायची सक्ती करणार?
होय कदाचित. भाऊ कदमने गणपती बसवल्याचा किस्सा आठवला. त्याची बायको जर हिंदू असेल, तर तिने आपल्या प्रथा परंपरा सणवार सोडून देण्याचा आग्रह तुम्ही कराल?
मग उद्या तुमची मुलगी हिंदू घरात गेली, तर तिलाही तिच्या प्रथा बाजूला ठेवायला सांगितले जाईल...
शेवटी तुम्हीही पितृसत्ताक धर्म, विचार यांची बाजू घेणार. अमलात आणणार...
असो - No issues.... थोडा विचार करता मनात आलं, की कदाचित रामाच्या नावाने मला पुरस्कार दिला, किंवा अगदी पुरस्काराच्या कागदावर रामाचं चित्र असेल, तर मीही नाकारेनच कदाचित....पिढ्यानपिढ्या सोसलेले, भोगलेले दुःख बंड करून उठतेच असे... पण पुन्हा मी विचार करेन, की रामावरच टिका केलेल्या माझ्या कविता जर रामभक्त वाचून मला पुरस्कार द्यायला तयार झाले असतील, तर काय हरकत आहे? माझ्याच विचारांचा तो विजय आहे.
पण..
या निमित्ताने माझी एक जुनी कविता -
आदिशक्ती -
त्याने दुर्गेची अमाप, अफाट शक्ती पाहिली
आणि तो घाबरला
त्याने सरस्वतीची अमाप, अचाट बुद्धी पाहिली
आणि तो हतबुद्ध झाला
त्याने लक्ष्मीची अमाप, अमर्याद सत्ता पाहिली
आणि तो हादरलाच..

मग त्याने सुरू केली स्तुती
त्या तिघींच्या
तनुतील सौंदर्याची, उरातील वात्सल्याची, अन्
करातील कार्यक्षमतेची..
अन् बहाल करून टाकलं त्यांना देवत्व...

तेव्हापासून
त्या विसरल्या आपली शक्ती, बुद्धी, संपत्ती
आणि पडल्या प्रेमात
आपल्याच तनुतील सौंदर्याच्या,
उरातल्या वात्सल्याच्या अन् करातल्या कार्यकुशलतेच्या

घडलं हे त्याच्या मनाप्रमाणेच
उचलला याचा अचुक फायदा त्याने
आणि पटकावला ताबा त्यांच्या
शक्ती, बुद्धी, संपत्तीचा

नंतर तर हळू हळू
त्यांचा या गोष्टींवरील
हक्कही नाकारण्याइतपत मजल गेली त्याची

आणि त्या...
त्या आहेत अजूनही खुश
आपल्याला बहाल केलेल्या देवत्वावर
आणि वरून चिकटवण्यात आलेल्या गुणांवर.......... -अलका गांधी-असेरकर
·



Comments

Jan 7, 2021

घर आणि गृहिणी -

 काल मी फेसबूकवर 'घर' ही माझी कविता पोस्ट केली. माझ्या 'कन्या-रास' या आगामी कवितासंग्रहातील ही कविता आहे. याच संग्रहात एक 'गृहीणी' या नावाची कविता देखील आहे. 
मला स्वतःला गृहीणी हे पद आणि ही संकल्पना मान्य आहे. या पदाचं कार्यक्षेत्र फार मोठं आहे आणि या पदाचं केवळ कौटुंबिकच नव्हे, तर सामाजिक आणि राष्ट्रिय महत्त्व देखील मोठंच आहे. 
"स्त्रियांचे कष्ट मोजले जातील, तेव्हा मानवी समाजाची सर्वात मोठी चोरी पकडली जाईल" असं कुणाचं तरी वाक्य आहे. 
स्त्रिया जे घराकरता, कुटुंबाकरता राबतात त्या कष्टाचे पैशात मोल होत नाही. त्या घरात खाऊनपिऊन राबतात. कुटुंबाचा कर्ता श्रीमंत असेल, तर समाज त्या गृहीणीलाही श्रीमंत म्हणतो आणि तिला चांगलंचुंगलं खायला ल्यायला मिळू शकतं. याउलट जर कर्ता गरीब असेल, मध्यमवर्गीय असेल तर त्या प्रमाणातच तिला खायला ल्यायला राहायला मिळू शकतं. इथं तिच्या हातात चॉइस नाही. जोपर्यंत ती स्वतः कमवत नाही तोपर्यंत तिला स्वतःची गरीबी, श्रीमंती नाही. घरातील कर्त्या माणसाची जी आर्थिक स्थिती, तीच तिचीही. 

अर्थात सामाजिक रचना आणि व्यवस्था अशा आहेत की यात कुणालाही काही वावगं वाटत नाही. ना त्या स्त्रीला, ना कुटुंबियांना, ना समाजाला. नवरा राखेल तसंच गृहीणीने राहावं. कमी पगार असेल, तर काटकसर करावी नि अधिक असेल, तर मिरवावं हे अगदी सर्वमान्य आहे, नव्हे तशीच सामाजिक अपेक्षा आहे. 
इथपर्यंत ठिकही आहे. मात्र यात स्त्री ही पूर्णपणे परावलंबी आहे याची जाणीव फार कमी वेळा आणि कमी लोकांना होते. अगदी सगळा पगार जरी घरातला कर्ता पुरुष त्या स्त्रीच्या हातात आणून देत असेल, तिला खर्चाचे, निर्णयाचे स्वातंत्र्य देत असेल, तरीही .. तरीही जेव्हा वेळ येते तेव्हा तिचा त्या पैशांवर काडीचाही हक्क नसतो. ती असते केवळ खजिनदार. एक जबाबदार खजिनदार.!

जेव्हा कुठलीही इमर्जन्सी येते, त्या घरातल्या इतर व्यक्तींशी, विशेषतः घरातल्या कर्त्या व्यक्तीशी उर्फ नवऱ्याशी तिचं पटेनासं होतं, वादावादी होते तेव्हा तिला या सगळ्यावर पाणी सोडावं लागणार असतं. ते खजिनदाराचं पदही सोडावं लागणार असतं. किंबहुना प्रत्यक्ष घर सोडायचं नसेल, किंवा घटस्फोटही घ्यायचा नसेल, केवळ भांडणाच्या वेळी रागात बोलायचं असेल, की मला नाही राहायचं तुझ्याबरोबर... तेव्हा खरंतर त्या स्त्रीलाही माहीत असतं की नाही राहायचं हे खरं, पण एक रात्रही जायचं असेल रागवून तर जायचं कुठं? माहेरी? त्या घरावर तिचा कितपत हक्क असतो हे साऱ्यानाच ठाऊक आहे. माहेरी जायचं ते केवळ पाहुणी म्हणून असा समज आजही पक्का आहे. तेव्हा तिथं जाऊन राहाणं हे म्हणजे ना घर का ना घाट का अशी अवस्था असते हे प्रत्येक स्त्री जाणून असते. त्यात माहेरी फक्त आईबाबा असतील तर जरा तरी राहणं सोपं असतं. पण तिथे भावाचे कुटुंब असेल, तर पुन्हा तेही कठीणच. अगदी पाहुणी म्हणूनही तिथं राहणं किती अवघडलेपणाचं असतं ते एक स्त्रीच सांगू शकते. 
राहिला कायदेशीर हक्काचा प्रश्न. माहेर, सासर किंवा नवऱ्याचे घर यात कायदेशीर हक्क जरूर आहेत पण ते मिळवायचे म्हणजे संघर्ष आला. ते मिळवायचे म्हणजे शेवटचं तोडण्याचं टोक आलं. यात सहज हिस्सा असा कुठं आहे?
बऱ्यापैकी आर्थिक परिस्थिती असेल, तर त्यातल्या त्यात घरावर तिचंही नाव असतं. किंवा इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी तिच्या नावावरही काही मालमत्ता असते. पण त्या मालमत्तेची माहिती, कागदपत्रे इत्यादीचीही किती गृहीणींना माहिती असते आणि त्याचा उपभोग त्या नेमका किती घेतात हा प्रश्नच आहे. 
अनेकदा श्रीमंत घर पाहून मुलींची लग्नं केली जातात. पण ते सासरचं घर तिचं तर सोडाच, तिच्या नवऱ्याच्या नावावरही नसतं. ते असतं सासऱ्याच्या, चुलत सासऱ्याच्या, किंवा आजेसासऱ्यांच्या नावावर. आणि अशी कुटुंबे भारतात आजही बहुसंख्येने आहेत. तिथे तर ती अगदीच परावलंबी जीव असते. 
काल पोस्ट केलेली कविता होती.. 'घर'
या कवितेत प्रामुख्याने रोख होता तो अशा स्त्रियांवर. स्त्रियांना पुरुषांपेक्षा घर अधिक प्रिय असतं. घराची स्वप्नं पुरुषापेक्षा स्त्रीला अधिक मोहवत असतात. घर हे केवळ तिचं स्वप्नं नसतं. तिची सुरक्षितता असते. तिचं स्थैर्य असतं. असं असूनही स्त्रीला स्वतःचं, स्वतःच्या पैशांचं, स्वतःच्या नावावरचं घर असावं असं का वाटत नसेल? वयात आलेल्या प्रत्येक लग्नाळू मुलाच्या घराचा विचार केला जातो. एकतर त्याला त्याचे पालक घर घेण्यास मदत करतात, शक्य असेल, तर त्याला त्याच्या नावाचं स्वतंत्र घर करून देतात. नसेल, तर त्याला त्याच्या कमाईतून, कर्ज काढूनही एक घर घेण्यास अतीआग्रह केला जातो. आणि त्याचं आयुष्य सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र  मुलीच्या बाबतीत आजही हे होत नाही. आपल्या मुलीचं भवितव्य सुरक्षित असावं, तिच्या नावाचं स्वतंत्र घर असावं, तिने ते आपल्या कमाईतून घेण्याचा प्रयत्न करावा असं क्वचितच कुणा पालकांना वाटताना दिसलंय. 
तिच्या लग्नाचा विचार तिच्या लहानपणापासून केला जातो. त्यासाठी पैसे बाजूला काढले जातात. अगदी लाखो रुपये. लग्नाच्या एका दिवसात उडवले जातात. गरीबातला गरीब माणूस पण जास्तीतजास्त पैसे मुलींच्या लग्नावर खर्च करायला तयार असतात. ऋण काढूनही. पण त्याऐवजी त्याच पैशातून तिचं पूर्ण भवितव्य सुरक्षित होईल अशा विचाराने तिच्या नावाने छोटंसंही घर घेतलं जात नाही. अपवाद असतील. आणि यात कुणालाही काही खटकत नाही याचं वाईट अधिक वाटतं. 
माझ्या या संग्रहात तीनचार कविता या विषयावरच्या आहेत. दुसरी 'गृहीणी' या नावाची जी कविता आहे त्याचा अनुभव मी स्वतः अनेकदा घेतला. गृहीणीला तिच्या नावावर तिच्या नवऱ्याने, किंवा कर्त्या पुरुषाने घर घेऊन दिलं तरच ते होऊ शकतं. अन्यथा तिला तिच्या नावावर घरासाठी कर्ज मिळत नाही. तिला कोणत्याच कारणासाठी कर्ज मिळत नाही. इथंच स्त्रीचे गृहीणी या नात्याने असलेले पद पोकळ ठरते. तिच्या कष्टाला मोल नाही हे तेव्हा कळते. ती परावलंबी आहे हे तेव्हा कळते. 
परवाचीच गोष्ट आहे. एके ठिकाणी एक छोटंसं घर बुक करण्याचा प्रयत्न चालू आहे. अगदी विचार केला तर बहुसंख्य कुटुंबांमध्ये हक्काचं घर विकत घेण्यासाठी धडपड त्या कुटुंबातील स्त्रियाच अधिक करतात. त्यासाठी काटकसर करतात, प्लॅनिंग करतात. घरातल्या पुरुषाचा पिच्छा पुरवतात. पण आर्थिक नाड्या तिच्या हातात नसतात. कर्ज इत्यादी घरातील कमवत्या व्यक्तीच्या नावावरच मिळणार असतं. 
मी देखील हक्काचं घर व्हावं म्हणून नवऱ्यापेक्षा अधिक प्रयत्न केले नेहमी. म्हणून हे स्थैर्य कुटुंबाला मिळाले. पैसे जरी नवऱ्याने दिले तरी सारे आयोजन माझेच अधिक होते. धडपड माझीच राहीली. त्यासाठी त्याचं मन वळवणं हे माझंच (अतिशय मानसिक संघर्ष) होतं. आणि घर तर त्याच्याच नावावर झालं. पण मी त्याला नेहमी बोलते, की घर हे केवळ पैशानी होत नाही. हे घर उभं करण्यात माझा वाटा अधिक आहे. पण हे बोलणं व्यावहारिक दृष्ट्या निरर्थक आहे. हे मलाही माहीत आहे.
त्याप्रमाणेच आताही झालं. एके ठिकाणी सेकंड होम म्हणून घर घेण्याच्या इच्छेने प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी मुलाला कर्ज घ्यायला सांगितले आहे. पण त्यात पैसे माझा नवराही टाकणार आहे. साहजिकच आता हे घर माझ्या नावावर असावं असं मला वाटतंय. त्यासाठी फार पूर्वी नवऱ्याने माझ्या नावावर (तेही नाईलाजाने.. कारण काही कारणाने कागदोपत्री त्याला तो प्लॉट त्याच्या नावावर घेणं शक्य नव्हतं म्हणून.) एक छोटा प्लॉट घेऊन ठेवला होता. तो विकून त्याचे पैसेही मी या फ्लॅटमध्ये गुंतवायचे ठरवले. पण आता गोची अशी झाली आहे, की जी व्यक्ती आयुष्यात पहिल्यांदा घर घेईल तिला पंतप्रधान योजनेतून दोन लाख साठ हजार रुपये मदत मिळते. आता योजनेत अशी तरतूद आहे की त्यासाठी ते घर त्या व्यक्तीच्या नावावर असावं किंवा त्याच्याबरोबर त्याच्या बायकोचं चालेल. मात्र आईचं चालणार नाही. कारण आईच्या नवऱ्याचं जे घर आहे तेच तिचंही पहिलं घर आहे. त्यावर तिचं नाव असो की नसो. जर माझं नाव त्या घरावर लावलं तर माझ्या मुलाला ते अडीच लाख रुपये मदत मिळणार नाहीत. अडीच लाखाची रक्कम आमच्या सारख्या मध्यमवर्गीय, ईमानदारीने पगार एके पगारावर आयुष्य काढलेल्या, लाचलुचपतीने पैसा न कमवलेल्या कुटुंबाला मोठीच वाटत आहे. त्यावर पाणी सोडायला मन होत नाही. मात्र तसे केले तर घर हे फक्त मुलाच्या नावाने होणार. माझ्या नाही. 
म्हणजे मला सरकार कर्जही देणार नाही. मदतही देणार नाही. मुल्य कुणाला आहे? तर रोख कमावणाऱ्या व्यक्तीला फक्त. गृहीणी आयुष्यभर झिजत असेल, समाज उभारण्यात, पर्यायाने देश उभारणीसाठी स्थिर कुटुंब देण्यात ती कितीही मोलाचे काम करत असेल, तरी तिची आर्थिक किंमत शून्य आहे. हीच खंत माझ्या या 'गृहीणी' या कवितेत उतरलेली आहे. 
साहजिकच माझ्या पिढीतल्या स्त्रियांनी केली ती चूक पुढील पिढीतल्या मुलींनी करू नये. स्वतःचं हक्काचं घर करावं. नोकरी व्यवसाय करावा. फक्त नवऱ्याच्या घराची स्वप्नं आपण पाहू नये. नवरा लाखांनी कमवत असेल, तरी तुम्ही फक्त गृहीणी म्हणून न राहता चार पैसे हक्काचे मिळवायचा प्रयत्न करावा. आळशी कोकीळेप्रमाणे नवऱ्याच्या घरात अंडी घालून नवऱ्याच्या पैशावर मजा करण्याचे स्वप्नं पाहू नये. कारण ही मजा अधांतरी आहे. परावलंबी आहे. यात स्वाभिमानही नाही. कारण नवरा आणि सासर कितीही श्रीमंत आणि चांगलं असेल, तरी जोवर तुम्ही तिथं त्यांच्या मर्जीने नांदताय तोवरच ते तुमचं असणार आहे. ज्या क्षणी संघर्ष होईल त्या क्षणी तुम्ही कफल्लकच असणार आहात 

गृहीणी -








अलका गांधी-असेरकर



Dec 27, 2020

शाम्पू आणि उवा

 सहावी सातवीत असेन.
खेड्यावर वास्तव्य आणि लांब केसांच्या करकचून आईने बांधून दिलेल्या वेण्या. 
डोक्यात उवांचं वास्तव्य असायचंच. 
आई त्यासाठी नको नको ते उपाय करायची कुणी सांगेल ते.
काय काय उपाय केले अघोरी ते सांगायलाही लाज वाटतेय आता. प्रतिमेला धक्का बसेल.😝

आमच्या गावात मुस्लिम खूप. त्यांच्यापाशी इम्पोर्टेड वस्तू खूप. 
अगदी सुका मेवा, चॉकलेट्स पासून चाकू-सुऱ्या सगळंच परदेशी असायचं त्यांच्या घरात भरभरून. 
गल्फ किंवा बोटीवरची नोकरी करून सुट्टीत येताना चार माणसं डोक्यावर वाहायला लागतील इतकी मोठी ट्रंक भरून सामान ते लोक आणायचे. 
त्यात कमीत कमी शंभरेक झुळझुळीत साड्या. पाचपंचवीस इंपोर्टेड रंगीत नाजूक छत्र्या, परफ्युम्स, सुका मेवा, कटलरी, चॉकलेट्स, साबण, शाम्पू, तेलं अन अजून बरंच काही. 
आम्हाला त्यांचा अजिबातच हेवा नसायचा. साधारणपणे कसं असतं की आपल्या नात्यात, जातीत, मैत्रीत कुणी खूप श्रीमंत असेल, तर माणसाला त्यांचा हेवा अधिक वाटतो. पण एकदम परके, जात-धर्मातही नसलेले लोक श्रीमंत असले काय नि गरीब असले काय, माणसाला फारसा फरक पडत नसावा. तसंच काहीसं होतं ते. 
असो. तर विषय तो नव्हता. 
विषय होता आई माझ्या केसांतल्या उवांसाठी काय काय प्रयत्न करायची. पण त्या जाम चिकट होत्या. हटत नव्हत्या. 
एकदा ती माझ्या उवा काढत ओटीवर बसलेली असताना आमच्या दुकानात एक मुस्लिम चौदा पंधरा वर्षांचा मुलगा काही विकत घेण्यास आला. आम्हाला बघून तो आईला म्हणाला, 'आमच्या घरी उवांचं औषध आहे इम्पोर्टेड. आणून देऊ का तुम्हाला थोडं. ते हिच्या केसांना लावून केस धुवून टाका. सगळ्या उवा मरून जातील.'
आईने होकार देताच तो लगेच त्याच्या घरी गेला आणि एका बाटलीत त्याने  ते औषध आणून दिलं. अर्थात मूळ बाटलीतून थोडं दुसऱ्या साध्या बाटलीत काढून आणलं होतं त्याने ते. 
आईने दुसऱ्या दिवशी माझ्या केसांना ते चोपडलं. चिकट चिकट आणि सुगंधी होतं. अर्ध्या एक तासाने केस धुवायला घेतले, तर केसांत फेसच फेस. सुगंधच सुगंध...
मी आईला म्हटलं, "आई, हा तर शाम्पू." आई म्हणाली, "म्हणजे काय?"
तोपर्यंत कधी शाम्पू वापरला नव्हता. पण वाचला होता. म्हणजे वाचन चांगलं असल्याने शाम्पूबद्दल माहिती होती. 
मग आईला सांगितलं की तो लिक्विड साबण येतो हल्ली केस धुण्यासाठी. तो आहे हा. उवांचं औषध बिवशध काही नाही हे. 
आमचं किराणा मालाचं दुकान. दुकानात कपडे धुण्याचा ५०१ साबण विकायला असे. आंघोळीचा साबण देखील विकायला नसे, तर शाम्पूचा काही प्रश्नच नव्हता. घेणार कोण विकत? जे गिऱ्हाईक होतं ते गरीब हिंदू होते. मुस्लिम तर सगळं बाहेरूनच आणत. 
आम्ही सगळे ५०१ कपडे धुण्याच्या साबणानेच आंघोळ करत असू. नि आजी तर धुण्याच्या सोड्याने केस धूत असे दर आठवड्याला. तरी तिचे केस वयाच्या ७२व्या वर्षी ती वारली तोपर्यंत काळेभोर होते. अन मला पुढे कॉलेजला गेल्यावर मैत्रिणी विचारायच्या, की तू काय लावतेस, तुझी स्कीन इतकी छान कशी दिसते?😂
बाबा तर साबणच लावायचे नाहीत. नुसतंच गरम पाण्याने अंग चोळून घ्यायचे. 
आणि घरात सगळे केवड्याची कांती असलेले गोरेपान. कुणाला साधा पिंपल देखील चेहऱ्यावर आला नाही. अशी मख्खन त्वचा सगळ्यांचीच.

तात्पर्य - साबण शाम्पू तेलं सर्व काही भ्रम आहे, मिथ्या आहे... आपले ओरिजिनल अवयव हेच सत्य आहे. 😂

आणि हां... त्या उवा... त्यांनी पिच्छा पुरवला लग्न होईपर्यंत. लग्नानंतर दोन तीन वर्षांनी मी केस पूर्ण कापून शोल्डर कट केला. केस मोकळेच राहू लागले नि अशा मोकळ्या तेलविरहीत रेशमी केसांतून उवांचे पाय सरकून त्या पडू लागल्या. ही जमीन काही आता आपल्या कामाची नाही म्हणत त्या निघून गेल्या कायमच्या... 😍

ते आमच्या वेळी लांब केस, नि त्याच्या घट्ट दोन वेण्या, रिबिनी, तेल लावून चपचप... हे सगळंच खरंतर उवांना आमंत्रण होतं. पण मुलींच्या सौंदर्याबाबतच्या भ्रामक कल्पना सर्वच काळात असतात. तशा त्या तेव्हाही होत्या. मुलींचे लांब केस, त्यांच्या घट्ट वेण्या, रिबिनी, मोठाले अंबाडे हे सगळं सौंदर्याच्या संकल्पना होत्या. एखादीचे बिचारीचे केस जरा तोकडे असतील, तर तिला खंत असायची. आता तो प्रकार तरी राहिला नाही हे बरंच झालं. 

तात्पर्य - उवांवर एकच उपाय - केस कापून तोकडे करून टाकणे.

Dec 26, 2020

तोहफे और यादें....बरसों से है आज भी वही..

 वर्ष 1991-92

प्रसंग १ - Marriage anniversary. तिसरं किंवा चौथं वर्ष.
Gift - कोसा प्युअर सिल्क.. ओरिजिनल कोसा रंग, प्लेन मोतिया रंगाची सोबर साडी आणि बारीक भरतकाम केलेला पदर आणि किनार...
आणि 'लागू बंधू मोतीवाले'यांच्याकडून घेतलेल्या कल्चर्ड मोत्यांच्या पारंपरिक किलवर कुड्या.
कोसा म्हणजे काय हे मला माहित नव्हतं. साड्यांमधलं, कपड्यांमधलं फार कळत नव्हतं तेव्हा. नवरा म्हणाला कोसा सिल्क घेऊ तुझ्यासाठी. आणि त्याकाळच्या पद्धतीप्रमाणे खरेदीसाठी डोंबिवलीहून दादर मार्केटला गेलो. सर्व दुकाने फिरूनही कोसा सिल्क सापडत नव्हती. मी तर पाहिलीच नव्हती कधी. पण नवऱ्याच्या सांगण्यावरून तिथले साड्यांसाठी प्रसिद्ध असलेले दुकानदार साड्या दाखवत होते. पण त्याच्या काही त्या मनास येत नव्हत्या. "अहं, ही नाही, ती नाही" करत 'रंगोली' या दुकानात आलो. तिथे तुफान गर्दी होती. कोसा म्हटल्यावर तिथल्या एका सेल्समनने सांगितलं. थांबा थोडं. एक दोन पीस आहेत. आत गोदामात. मी आणून दाखवतो.
समोरचं गिऱ्हाईक आटपून तो आत गेला. काही वेळाने दोन तीन साड्या घेऊन आला. तीच ही साडी. बघताक्षणीच नवरा म्हणाला, हीच ती. आणि बघताक्षणीच मी त्या साडीच्या प्रेमात पडले. चमकदार मोतिया रंगाची प्लेन साडी, फक्त नाजूक भरलेली किनार आणि तसाच नाजूकसा भरलेला पदर... किंमत ११५०/- १९९२ साली. म्हणजे आता साडे अकरा हजारच धरून चाला कमीतकमी. कारण तेव्हा डोंबिवली स्टेशनला जाण्यासाठी शेअर रिक्षा माणशी एक रुपया घेत होत्या फक्त. आता दहा रुपये घेतात.
हा कोसा म्हणजे रेशमाचा एक विशिष्ट प्रकार. विशिष्ट रेशमाच्या किड्यांपासून तयार झालेला. त्याचा ओरिजिनल रंग हाच. पिवळसर. मोतिया. काहीशी सोनेरी झाक असलेला. बहुधा मध्यप्रदेश, छत्तीसगड येथील जंगलात मिळत असावा. किंवा तयार होत असावा. या कापडाचे पुरुषांना कुर्ते देखील फार छान दिसतात.
खूप नेसले ही साडी. खूप आवडायची. माझा स्कीन कलर आणि हिचा कलर एकरूप होऊन जायचे. आता विरलीय थोडी एका जागी. मात्र अजूनही इस्त्री केली की तीच चमक पुन्हा जैसे थे येते. या साडीवर मोत्याचे दागिने अफलातून उठून दिसतात.
त्याच वर्षी मोत्याच्या कुड्या केल्या. 'लागू बंधू मोतीवाले' हे नाव जाहीरातीत वाचत होतो. माझ्या एका दूरच्या जावेने सांगितले, की त्यांच्याकडचे मोती, हिरे आणि दागिने अभिजात असतात.
आज 'लागू बंधू' यांच्या ठिकठिकाणी शाखा दिसतात. तेव्हा मात्र दादरला एकच होती. कबुतरखान्याजवळ. एका जुन्या ईमारतीत वरच्या मजल्यावर एका छोट्याशा, साध्याशा गाळ्यात. शोधत शोधत गेलो. तेव्हा मोबाईल तर दूरच पण साधे फोनही नव्हते अजून.
त्यांनी डिझाईन दाखवले. हे पारंपरिक किलवर डिझाईन आम्ही पसंत केले. एका मोत्याची किंमत तेव्हा काहीतरी शंभर शंभर रुपये होती. दोन्ही कानात मिळून सहा मोती. आणि सोन्याची किंमत वेगळी. त्यांनी सांगितले की आमचे मोत्याचे दागिने कर्नाटकात जातात घडवण्यासाठी. मोती बांधण्याचे काम तिथेच होते. ते बनून यायला दोन महिने तरी लागतील. तोपर्यंत तुम्ही येऊ नका. कुड्या आल्या की आमचे तुम्हाला पत्र येईल. पत्र आले की मग या. कारण पुन्हा तेच. फोन नव्हते.
त्याप्रमाणे दीड दोन महिन्यानी त्यांचे पत्र आले. आम्ही गेल्यावर आमच्या हातात त्या पाणीदार कुड्या ठेवत ते म्हणाले, 'तुम्ही वापरून कंटाळाल, पण या कुड्यांना वर्षानुवर्षे काहीही होणार नाही.
अगदी तसंच झालंय. आजही या कुड्या तशाच्या तशाच पाणीदार आहेत. त्यावरचे मोती तसेच आहेत. सोनं, त्यात बसवलेले बारीक माणिक तसेच आहेत. तेव्हा नवऱ्याला पगार होता जेमतेम अडीच तीन हजार फक्त ! त्यातल्या निम्म्याची त्याने मला साडी घेतली नि निम्म्याच्या कुड्या ! कट टू प्रसंग २ - वर्ष १९८७
माझा वाढदिवस - लग्नाच्या आधी आम्ही प्रेमात होतो. घरच्यांनी लग्नाला संमती दिली पण अजून त्याच्याबरोबर कुठे जायचं म्हटलं तर नकारच असायचा, अशावेळी एक दिवस घरी न सांगताच माझ्या वाढदिवसाला कोकणातून सकाळच्या एसटीने आम्ही दोघे मुंबईला आलो. तिथून तो मला पेडर रोडवरील ब्रीच कॅन्डीजवळील सुप्रसिद्ध 'अमर सन्स' या दुकानात घेऊन गेला होता. मला तर ते दुकान ऐकूनही माहीत नव्हते. तिथे मणीपुरी कोटा सिल्क साडी त्याने मला घेऊन दिली. अतिशय सुंदर मजेंटा कलर. किंमत साडेचारशे रुपये. साल १९८७. साडी घेऊन लगेच मुंबई सेन्ट्रलला येऊन परत एसटी पकडून रात्री आठपर्यंत कोकणातल्या घरी!
नवऱ्याची आवड क्लासिक आहे. त्याला बरोबर कळतं की मला काय चांगलं दिसतं. आजही वेस्टर्न असो वा पारंपरिक, कपडे आणि दागिने त्याच्या मदतीशिवाय मी खरेदी करू शकत नाही. मला अजूनही त्याच्यातलं काही कळत नाही.
जेव्हा जेव्हा त्याला बरोबर न घेता, किंवा त्याचा सल्ला न मानता मी काही खरेदी केली ती नेहमी फसलेली आहे.







Dec 12, 2020

फुकटच्या अस्मिता - आणि मालवणी हिसका

 माझ्या नवऱ्याचा एक गावठी मित्र आहे. म्हणजे विदर्भातल्या गावाकडे राहणारा. चांगला इंजिनिअर आहे. बारा गावं फिरलेला आहे. पण मानसिकता मागास आहे.

तो नेहमी वैदर्भियन बोली भाषेतच बोलतो. कधी कधी माझ्यासारखी शहरी बाई बोलणारी समोर आली की अजून मुद्दामच वऱ्हाडी भाषेत बोलतो. चांगली मराठी येत असतानाही.
परवा त्याचा फोन आला.
अर्थात मला नाही, माझ्या नवऱ्यालाच.
पण नवरा फोन घरी ठेवून जरा बाहेर पडला होता.
फोन मी उचलला.
आयती त्याच्या तावडीत सापडले.
याचं झालं वऱ्हाडी भाषेत सुरू. परत मध्ये मध्ये विचारणं, चालेल ना मी वऱ्हाडीत बोललो तर..
मी सभ्यपणे म्हटलं, हो बोला, मला येत नसली तरी समजते.... पण मनातून चिडले होते. मी जर याला म्हटलं असतं, 'चालेल, तू बोल वऱ्हाडीत, मी मालवणी कोकणीत बोलते तुझ्याशी.. चालेल ना... रांxxxx... शिरा पडली तुझ्यार त्या.......'
😆😆😆
तर काय झालं असतं त्याचं....
कशाला लोक असं करतात. प्रमाण मराठी येते ना. तीच बोला ना इतरांशी बोलताना. वऱ्हाडी आला समोर तर वऱ्हाडी बोला, मालवणी आला, तर मालवणी बोला. उगाच चाळे कशाला करता? मला उत्तम कोकणी मुसलमानी मराठी येते, म्हणून ज्याच्या त्याच्यासमोर त्या भाषेत बोलू का मी?
Like
Comment

किसी पिछले जनम की बात...

मुगले आजम हा सिनेमा पन्नास वर्षानंतर रंगीत झाला, त्यालाही आता जवळपास 20 एक वर्ष लोटली. 🤦काळ किती भराभर चाललाय...    तेव्हा टीव्हीवर दिलीप क...