May 3, 2024
जा जरा उत्तरेकडे...
स्त्रीवाद कुठे कुठे असतो...
रायगड जिल्ह्यात जमात आहे त्यांना कातकरी म्हणतात.
या कातकरी स्त्रिया रानावनातून काजूच्या बिया गोळा करून त्या फोडून त्यातले ओले काजूगर विकायला बाजारात येऊन बसतात. सोबत रातांबे, भाजीचे फणस, करवंद, कैऱ्या आणि अजून बराच रानमेवा देखील त्या आणतात विकायला.
काजूच्या बियांमधून निघणारा चीक खूप ऍसिडीक असतो. तो हाताला लागून या स्त्रियांचे हात त्या सहा महिन्यात सदैव काळ्या फोडांनी भाजल्यासारखे भरलेले असतात. सुजलेले असतात. त्यांच्या पुरुषांचे मात्र नसतात. याचाच अर्थ काजू बिया फोडायचं कष्टाचं आणि वेदनांचं काम स्त्रियाच करत असाव्यात.
ओले काजू देखील फार महाग असतात. हजार बाराशे रुपये किलो.
बाजारात या स्त्रिया टोपली घेऊन बसतात. आपण मोलभाव करतो. तिने एक भाव सांगितला की त्यावर ती टस की मस होत नसते. आपण कितीही सांगितले तरी. नंतर आपण अख्खी टोपली घेते. नीट भाव सांग म्हटलं की ती मान वर करून दोन फुटावर जवळच उभ्या असलेल्या एका पुरुषाकडे पाहते. तोपर्यंत आपल्या लक्षातच नसतं, की ही एकटी नसून हिच्यासोबत हिचा मालक देखील आहे. त्याचे लक्ष हिच्यावर असते.
तिने त्याच्याकडे पाहिलं की तो हो किंवा नाही वर मान हलवतो किंवा पुटपुटतो. त्याने हो म्हटलं, तर ती आपण सांगितलेल्या भावात माल देणार किंवा त्याने नाही म्हटलं तर नाहीच्च.
दिवसभर कष्ट करणार ही.. पण भाव ठरवणार तो... तिचा मालक..!
असे प्रत्येकीचे मालक बाजूला उभे असतात हे नंतर कळायला लागलं.
जानेवारी ते मे पर्यंत या ओल्या काजूवर हे लोक अगदी भरपूर पैसा कमवतात. लाखात देखील. आता सुधारणा झाल्यात. सरकारने त्यांना पक्की घरे दिलीत. मुलं शिकू लागलीत. बाया नीटनेटक्या राहू लागल्यात. पूर्वी केसांना कंगवा देखील लावलेला नसायचा.
एवढा पैसा मिळतो पण बहुतेकांचा तो संध्याकाळी दारूत उडायचा. तिथे मात्र नवरा बायको दोघेही देशी दारू पिऊन हंगामा घालायचे. एकमेकांना मारणे, ओढणे, शिवीगाळ करणे हे करतच घरी परतायचे. मात्र तोपर्यंत दिवसभर तो मालक नि ती कर्मचारी.
असेच एक उत्तरभारतीय जोडपे बसते शहरात. लिंबू मिरची आले विकत. थोड्या इतर भाज्या. गेली अनेक वर्षे बसतात. नवरा बायकोपेक्षा म्हातारा वाटतो. त्याला हिशोब येत नाहीत. निरक्षर वाटतो. पण तिला येतात. तरी दादागिरी त्याचीच. किती भावाने दिलेस? मग किती पैसे घेतलेस ? हे दरडावून तिला विचारणार. ती तीन तीनदा त्यालाच हिशोब समजावणार की या ताईंनी हे हे घेतले... त्याचे इतके इतके झाले. तो संशयाने तिच्याकडे बघत नाईलाजाने गप्प बसणार. दिवसभर ती त्याच्यासोबत उन्हातान्हात बसलेली असते. आणि घरी गेल्यावरही तिलाच सैपाकपाणी करत असावे लागणार यात काही पुराव्याची गरज नाही.
आता यात पितृसत्ता, पुरुषी वर्चस्ववाद तुम्हाला दिसत नसेल, तर तो तुमच्या आकलनाचा दोष........
किसी पिछले जनम की बात...
मुगले आजम हा सिनेमा पन्नास वर्षानंतर रंगीत झाला, त्यालाही आता जवळपास 20 एक वर्ष लोटली. 🤦काळ किती भराभर चाललाय... तेव्हा टीव्हीवर दिलीप क...
-
शरीफा नेहमीच जुम्म्याची वाट बघत असायची मनोमन. ज्याप्रमाणे नोकरदार लोक रविवारची वाट पाहात असतात तशीच. जुम्मेरातपासून म्हणजे गुरूवारपासूनच ति...
-
कोण अल्पसंख्य, कोण बहुसंख्य- माझं गाव हे कोकणातलं एक मुस्लिमबहुल गाव. एकेकाळी तिथं संमिश्र वस्ती होती. गवळ आळी, कुंभारवाडा, महारवाडा, जंगमआळ...
-
सकाळचं ऊन माझ्या घरात कोवळ्या बाळपावलांनी रांगत येतं..किलकिल्या उघड्या फटीतून डोकावतं. अगदी तस्संच, जसं एखादं नवीन आलेल्या शेजा-याचं तान्हं ...