May 6, 2022

सरस्वती

 




"ज्या देशात विद्येची देवता सरस्वती आहे, त्याच देशात स्त्रियांना शेकडो वर्षे शिक्षणांपासून वंचित ठेवले गेले."
असे वाक्य मी नेहमी म्हणत असते.
मात्र प्राचीन मंदिरे आणि लेण्या पाहत असताना, त्यात अनेक स्त्रिया एका हातात पेन आणि दुसऱ्या हातात कागद घेऊन लिहितानाच्या मूर्त्या आहेत. अनेक स्त्रिया नृत्य करताना, वाद्ये वाजवताना दिसतात. मुक्त शृंगार करताना दिसतात. अगदी सर्वसामान्य स्त्री आपल्या कडेवर मुल घेऊन रस्त्यावरची मिरवणूक बघते अशा मूर्त्या दिसतात. त्यात तिच्या डोक्यावर पदर नसतो, खालचे वस्त्र फक्त जेमतेम गुडघ्यापर्यंत, आताच्या बर्म्युडासदृश्य असते. अनेक मूर्त्यांच्या उरोभागावर वस्त्र नसते. 
प्राचीन मंदिरे, लेणी यातील कुठल्याही मूर्तीच्या चेहऱ्यावर बुरखा, घुंघट, पदर, स्कार्फ सारखे कोणतेही वस्त्र मी अजून तरी पाहिले नाही. 
हम्पीसारख्या ठिकाणी खुद्द राजाची पत्नी सणावारी सार्वजनिक ठिकाणी शास्त्रीय नृत्य करत होती याची माहिती गाईड देतो. मग असे नृत्य गरत्या बाईने करू नये, असे केव्हापासून समाजाच्या मनावर बिंबले असेल?
पुराणकथात कुठेही स्त्रिया घरी बसल्यात आणि फक्त पुरुष  ऍक्टीव्ह आहेत असे दिसत नाही. पांडवांबरोबर द्रौपदी फिरतेय, रामाबरोबर सीता फिरतेय. अशा जोड्याजोड्याच दिसतात. त्या कृष्णाशी चर्चा करतायत, युद्धावर बोलतायत, वेदना व्यक्त करतायत. जाब विचारतायत. 
असे जर असेल, तर नेमकं कुठल्या काळापासून भारतातील स्त्रिया घुंघट, पदर, बुरखा, पडदा घेऊ लागल्या असतील, अशिक्षित राहू लागल्या असतील, असा प्रश्न पडतो. हे अंधारयुग नेमकं कधी आणि का सुरू झालं असेल, यावर अभ्यासपुर्वक मांडणी केली जायला हवी.
मग सरस्वतीला उगा दोष देण्यात काय अर्थ?  समाज बाह्य परिस्थीतीने बदलतो, हतबल होतो, असहाय होतो असेही घडू शकते ना? 

Feb 6, 2022

सूरमयी..

 झोपडीपासून ते महालापर्यंत, चार पिढ्यांमधील सान-थोर सर्वांना एकाच दरात, किंबहुना जवळपास फुकट आनंद  देणारा एकच आवाज, किंवा एकच कुटुंब होतं म्हणू या... ते म्हणजे मंगेशकर घराणे.
हा आवाज कुठे नव्हता..?
पानाची टपरी, आदीवासी पाडे, जंगल, मंदिरे, बॉर्डर, बांधकाम ठिकाणे, लहान मोठी हॉटेल्स, लग्नं, पार्टी, वाढदिवस, प्रजासत्ताक दिवस, स्वातंत्र्य दिन, सण-वार, गणेशचतुर्थी, दत्तजयंती, दिवाळी And What not... ही सगळी ठिकाणे, प्रसंग लताचा आवाज नसता तर कसे साजरे झाले असते कोण जाणे?
बांधकामाच्या ठिकाणी, पानाच्या टपऱ्या इत्यादी ठिकाणी एक बारीकसा रेडीओ स्वर पाझरत राहायचा... आणि त्या तालावर मजूरांचे श्रम हलके होत राहायचे... अगदी जंगलात आदिवासी पाड्यांवर देखील  हा आवाज गुंजत राहिलेला मी पाहिलाय. 
कान्होपात्रा ते ज्ञानेश्वरांपर्यंत सर्व संत, ग्रेस ते भट सगळे कवी यांच्या अवघड रचना सोप्या करून सर्व सामान्यांपर्यंत पोचल्याच नसत्या, जर हे कुटुंब नसतं तर....
अगदी सर्वसामान्यांना शास्त्रीय राग, सूर यांची माहिती आणि आवड निर्माण नसती झाली, जर हे कुटुंब नसतं तर...
हा स्वर्गीय स्वर सर्वांना समान उपलब्ध होता.
सुखात, दुःखात, आनंदात, आजारपणात, प्रवासात, घरात, हॉल, पार्टी, हॉटेल ..... सगळीकडे हा आवाज नेहमी सोबतीला राहिला....
हा स्वर्गीय आवाज असूनही तो इतका स्वस्त दरात आणि इतका सहजपणे सर्वांना उपलब्ध होता की, लोकांना आपल्याला काही स्वर्गीय गोष्ट इतक्या सहजपणे उपलब्ध आहे, याची जाणीवही नव्हती. इतका तो आवाज गृहीत धरला गेला होता. 
कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वांना एका सूरात बांधू ठेवणारा हा आवाज होता. भारतात कुठेही गेले तरी हा सूर कानावर येतच राहायचा कुठून ना कुठून. आणि आपण आपलं घर, गाव, भाषा सोडून बाहेर आलोय असं वाटतच नसे.
या लोकांनी इतरांना पुढे येऊ दिलं नाही म्हणतात.... का येऊ द्यावं? त्यांचंही नाणं खणखणीत होतं म्हणून ते चार पिढ्यांपर्यंत वाजत राहिलं ना.... नसतं तर त्यांनाही सारून कुणीतरी आलंच असतं पुढे....
ते दळभद्री आणि छिद्रान्वेषीच, जे या कुटुंबाचेही दोष शोधून त्यांना शिव्या घालतात.... अशा कृतघ्न जीवांना कुठेच शांती नसते..........


Nov 17, 2021

अविकास आणि हिंसा

 सामाजिक राजकिय विकास आणि त्या त्या ठिकाणचा समाज, माणसे यांची प्रगती यांचा थेट संबंध असतो का असा प्रश्न पडतो.

विकास नाही, शैक्षणिक सुविधा नाहीत म्हणून त्या त्या ठिकाणचे किंवा अमुक तमूक समाजाचे लोक हिंसेकडे वळतात यातही कितपत तथ्य आहे?
हिंसा ही प्रवृत्ती असते. ती वैयक्तिक असते, तशीच सामाजिकही असते. तिचा विकास, गरिबी, श्रीमंती याच्याशी फारसा संबंध नसावा. अपवाद वगळता.
विकास नाही म्हणून हिंसा, नक्सलवाद, विकास नाही म्हणून शेतकरी किंवा इतर आत्महत्या, विकास नाही म्हणून आंदोलन, मोर्चे, तोडफोड इत्यादी इत्यादी....
याचा थेट संबंध जोडणं शक्य नाही.
विकास नाही, म्हणून आर्थिक दरिद्री समजल्या जाणाऱ्या कोकणात एकाही शेतकऱ्याची आत्महत्या ऐकीवात आली नाही अन्यथा.
राजस्थान, गुजरात ही एकेकाळची अविकसित राज्ये. राजस्थान तर उजाड, पाण्याचे दुर्भिक्ष्य, वाळवंटी प्रदेश, शालेय शिक्षणाची वानवा. पण दोन्ही राज्यांतील मोठ्या समाजाने देशच नव्हे तर जग पादाक्रांत करत आर्थिक आघाडी मिळवलेली दिसते.
घरदार नि सारा संसार सोडून देशोधडीला लागलेला सिधी समाज मोर्चे, बंद, हरताळ, आरक्षण इत्यादी चळवळी न करता गेला तिथे स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी धडपडला आणि श्रीमंत समाजाच्या यादीत जाऊन बसला.
विकास नसलेल्या यूपी, बिहार सारख्या राज्यांतून अनेक कष्टकरी लोक बाहेर पडून मेहनतीची रोजी रोटी खाऊ लागले. तशीच देशोधडीला लागलेली कश्मीरी पंडीतांची मुलं भारतात लांबलांबच्या राज्यांमध्ये आरक्षणाच्या सीटा मिळवून उच्चशिक्षण घेऊ लागली. कुठेही बदला वृत्ती पाळून हाणामाऱ्या करत बसलेली ऐकिवात नाहीत.
विकास नाही म्हणून हुशार, होतकरू मुलं आक्रस्ताळेपणा न करता देशाबाहेर पडली, आणि परदेशातल्या आर्थिक प्रवाहात जम बसवून राहिली.
विकास दाराशी येत नसेल, तर विकासापर्यंत पोचावं लागतं. स्वतःच विकासाचा स्रोत होऊन वाहावं लागतं. हे अनेक समाजांनी, व्यक्तींनी, प्रांतांनी, परिसरांनी सिद्ध केलेय.
विकास नाही म्हणून मी हिंसा करतो, आत्महत्या करतो, गोंधळ घालतो ही पळवाट आहे, आपल्या परिस्थितीचं खापर दुसऱ्यावर फोडून सुटका मिळवणं आहे.
जीने की तमन्ना हो तो पत्थर फाड के भी पौधे निकलते है और फूल खिलाते है....
हिंसा ही वृत्ती आहे. राजकीय, सामाजिक नेत्यांचा स्वार्थ आहे.
तिचा विकासाशी फारसा संबंध नाही.

Nov 13, 2021

सात सुखांच्या खाली -

    


सात सुखांच्या खाली
दुःखाचा काटा सलतो
भरलेल्या पेल्यावरचा
उरलेला का डुचमळतो..


एकदा एका गोष्टीत तोतया राजकुमारी कोणती आणि खरी कोणती हे ओळखायचं असतं. तेव्हा राजाचा हुशार प्रधान ती जबाबदारी घेतो आणि रात्री त्या दोघींची एकसारख्या बेडरूममध्ये झोपायची सोय करतो. सारखेच शाही पलंग, एकावर एक अशा सात मऊ, रेशमी गाद्या, त्यावर रेशमी चादर, उशी, इत्यादी सारीच सारखी व्यवस्था.

दुसऱ्या दिवशी दोघींना सकाळी तो विचारतो, "झोप लागली ना व्यवस्थित?' तेव्हा त्यातील एकजण म्हणते, 'हो मस्त झोप लागली.' तर दुसरी म्हणते 'नाही, रात्रभर मला गादीखाली काहीतरी टोचत होतं.'
तेव्हा प्रधान सांगतो, 'हीच खरी राजकुमारी. जी शांत झोपली रात्री ती तोतया आहे.'
बात अशी असते, की प्रधानाने रात्री दोघींच्या त्या रेशमी सात मऊ गाद्यांच्या खाली काही वटाण्याचे दाणे टाकून ठेवलेले असतात. खरी राजकुमारी, जिला कोणत्याच अशा गैरसोयींची सवय नसते, सुखासीन आयुष्याचीच सवय असते, तिला ते रात्रभर टोचत राहतात. ती निवांत झोपू शकत नाही. पण जी सामान्य मुलगी तोतया राजकुमारी बनून आली असते तिला मात्र ते ऐश्वर्य सुखाची झोप घेण्यास पुरेसं असतं.
तर आता प्रश्न असा आहे, की त्या राजकुमारीचं दुःख हे खोटं आहे का? तिचा तो माज आहे का?
अनेकदा आपण आपली भावनिक, मानसिक दुःखं, आपल्या समस्या, आपल्या गैरसोयी, अडचणी कुणाला सांगायला जावं, तर त्यांच्याकडून उपदेश येतो, की ज्या लोकांना एवढंही मिळत नाही त्यांच्याकडे पाहा. लोकांना दोन वेळ जेवायला मिळत नाही, रहायला छप्पर नाही, अंगावर कपडा नाही. त्यांची खरी दुःखं! तुम्हाला सुखासुखी सगळं मिळत असताना तुमच्या या समस्या म्हणजे चोचलेच आहेत रिकामपणाचे.
अन्न, वस्त्र, निवारा या तीन मुलभूत गोष्टी नक्कीच महत्त्वाच्या आहेत. त्या प्रत्येक माणसाला मिळायलाच हव्यात हेही तितकंच खरं. या मूलभूत गोष्टीही मिळत नसणारे दुर्दैवी जीव खरेच. अभागीच ते.
पण म्हणून या गोष्टी नीट मिळत असणाऱ्यांची भावनिक, मानसिक दुःखे खोटी कशी ? किंवा गैरसोयीच्या समस्या, खोट्या कशा?. मुलभूत गोष्टी मिळणे ही तर प्रत्येक प्राणीमात्राची गरज. वाघाला देखील शिकार केली की झोपायला गुहा लागतेच. ती मिळायला हवी.
पण या मुलभूत गरजांच्या नंतरच तर खऱ्या अर्थाने मानवी गरजा निर्माण होतात ना. मग सात गाद्यांच्या खालचा वाटाणाही टोचतोच. किंबहुना तो टोचतो तेव्हाच ती व्यक्ती जगण्याच्या प्राणीस्तरावरून जगण्याच्या माणूस स्तरावर पोचलेली असते. वाटाणा न टोचणारी मुलगी अभावातून आलेली आहे. दुर्दैवी आहे. पण म्हणून वाटाणा टोचणारीचं दुःखं हे दुःखच नाही किंवा ते कमी प्रतीचं आहे कसं म्हणायचं? तिने आपली रात्रीची झोप गमावली आहे हे सत्य उरतंच.

० 

Nov 7, 2021

भवताल -

 धार्मिक मंदपणा आणि पिडीत जनता -

विजेच्या काळात वाऱ्यावर लगेच विझणाऱ्या तेलाच्या पणत्या लावून तेल वाया घालवणे आणि दगडी मूर्तीवर दूधाचे अभिषेक करून दूध वाया घालवणे हे धार्मिक मतीमंदत्वाचे लक्षण आहे.
असे सावरकर म्हणून गेले. पण सावरकरांच्या भक्तांनाच ते पटत नसावे. 
नेते सोयीने वापरायचे असतात.

मग सणासुदीला तरी तेलाचे दिवे लावावे म्हणणाऱ्यांनी सणासुदीला तरी गॅस आणि लायटर्सचा वापर न करता दगडावर दगड घासून चकमकीने तीन दगडांची चूल पेटवून कंदमुळे शिजवून खावावीत. पाळायच्या तर सर्वच परंपरा आणि मूळापासून पाळाव्या. अशा अर्धवट कशाला?

असो.
यावरून एक गोष्ट आठवली लहानपणी ऐकलेली.


एका गावात एक सासुरवाशिण राहत होती. तीची सासू तिचा फार छळ करी. पोटभर खाऊपिऊ देत नसे. काम खूप करून घेई.
एके दिवशी सण असतो म्हणून घरात घारगे तळले जातात. मात्र सासू हिला खायला देत नाही. ही त्या घारग्यांच्या पीठातलं थोडं पीठ चोरून आपल्या पदरात लपवून ठेवते. कपडे धुवायला नदी किनारी जाताना नेहमीसारखी गावच्या वेशीवरील मारूतीच्या मंदिरात विश्रांतीला घटकाभर टेकते. 

त्या काळी मंदिरं निवांत असायची. लोक दिवसभर रांगा लावून देवाला निष्कारण त्रास देत नसत. एकदा सकाळी दिवा लावून गुरव गेला की देव निवांत निजायला मोकळा असायचा.
ही देवळात जाते. मारूतीसमोर एक मोठा दगडी दिवा पेटत असतो. तेल चांगले तापलेले असते. ही चोरून आणलेल्या पीठाचे चार वडे त्या दगडी पात्रातील तापलेल्या दिव्यात तळून खाते. 

हे पाहून मारूती राया अचंबित होतो. इतका की त्याचे बोट तोंडात जाते आणि तो चकीत होऊन तिच्याकडे वाकून पाहतो. 
हीचे मारूतीकडे लक्ष नसते. खाऊन झाल्यावर ही निघते. 
दुसऱ्या दिवशी गुरव देवळात येतो. तर त्या भव्य दगडी मारुतीचे बोट तोंडात आणि चेहरा चकीत होऊन खाली बघतोय. तो घाबरला. गावात येऊन त्याने हा चमत्कार सगळ्यांना सांगितला. लोक जमा झाले. हे असं कसं झालं. गावाचं पाप पाहून मारूतीने तोंडात बोट घातलं हे नक्की. कुणीतरी पाप्याने देवळात पाप केलं असणार. आता गावावर संकटं येणार.
 लोक मारूतीची माफी मागतात. पण त्याचं बोट तसंच. नि चेहरा चकीतच!
शेवटी गाववाले बैठक घेतात. ठरवतात की उद्या सकाळी बऱ्या बोलाने ज्याने पाप केलं असेल त्याने मारूतीसमोर जाऊन माफी मागावी. नाहीतर प्रत्येकाने एकेकटं जाऊन माफी मागावी. 
ही सासुरवाशिण घाबरते. पाप तर आपणच केलंय. आता लोकांना आणि मुख्य म्हणजे सासूला कळणार. ती अर्ध्या रात्री उठून लपत छपत देवळात जाते. मारुतीचा सोटा पडलेला असतो त्याच्या पायाशी. तो उचलते आणि मारूतीवर उगारून म्हणते, "मेल्या, मला माझी सासू खायला देत नाही, म्हणून मी दोन वडे तुझ्या तेलात तळून खाल्ले, तर त्यात तुला इतकं आश्चर्य वाटायला काय झालं? बऱ्या बोलाने बोट खाली घेतोस की हाणू हा सोटा तुझ्या डोक्यात?"
तिचे ते बोल ऐकून मारूती दचकतो, घाबरतो आणि पटकन आपले बोट तोंडातून काढून साळसूदासारखा वर पाहू लागतो. 
दुसऱ्या दिवशी लोक पुन्हा देवळात गोळा होतात. तर मारूती आपला निरागस. नेहमीसारखा. लोक हुश्श करतात. चला गावावरची अलाबला टळली.

थोडक्यात काय, अत्याचाराने पिडीत स्त्री मारूतीला सिधा करू शकते, तर महिलांनो आपण काय करू शकत नाही? सोचो... सोचो....

असो
विषय तेल वाया घालवायचा होता. पण कधी कधी मंद लोकांमुळे पिडीत लोकांचा फायदाही होतो. त्यामुळे मंद लोक स्वतःवरच खुश असतात. 

Nov 5, 2021

भवताल -

 गुजरातमध्ये वाणी समाज मोठ्या प्रमाणावर आहे. आणि त्यांच्यात जैन वाणी आणि वैष्णव वाणी असे दोन प्रकार आहेत. दोन्ही समाज व्यापार उद्योगात मोठ्या प्रमाणात आहे. या व्यापार उद्योगाच्या निमित्ताने ते भारतभरच नव्हे, तर जगभरही पसरलेले आहेत.
महाराष्ट्रात ज्याप्रमाणे भटाबामणांचा उल्लेख केला जातो तसाच गुजरातमध्ये वाणियाबामण असा केला जातो. कारण गुजरातमधील वाणी समाज हिंदू धर्माप्रमाणे वैश्य या तिसऱ्या वर्णात मोडत असला, तरी पैशाने ब्राम्हणांपेक्षाही समृद्ध असल्या कारणाने इथं बामणाच्याही आधी वाणीया लोकांचे नाव येते. पैसा बोलता है म्हणतात ते असं. (हे सर्व जातीवर्णांनी लक्षात घेणं योग्य ठरेल. सध्याचे युग हे पैशांचे. पैशाची जात सर्वात श्रेष्ठ. पैसा कमवा. मग तुम्हाला तुमची जात, धर्म विचारून कुणी तुच्छ लेखणार नाही.)
या वाणी, किंवा तिथे म्हटले जाते त्याप्रमाणे वाणिया समाजात बरेच गट आहेत. साधारण तालुका, जिल्हा, प्रांत याप्रमाणे त्यांचे वर्गीकरण होते आणि बरेच गट पडतात. पूर्वी सगळे व्यवहार गटागटातच होत. विशेषतः बेटी व्यवहार. मात्र आता दुसऱ्या गटातही सर्रास होऊ लागलेत. त्यात जैन आणि वैष्णव या दोघांमध्ये पूर्वीपासून बेटीव्यवहार होतात. जरी दोन्ही धर्म वेगळे असले तरी. ज्याप्रमाणे पंजाबमध्ये सिख आणि हिंदूमध्ये बेटीव्यवहार होतो तसेच. जैन वाणिया हे प्रमाणात वैष्णव वाणियांपेक्षा जास्त श्रीमंत आहेत. हिऱ्यांच्या व्यापारात जैन वाणिया मोठ्या प्रमाणात आहेत.
महाराष्ट्रात ज्याप्रमाणे वारकरी समाज आहे, तो शाकाहारी आहे आणि तुळसीमाळ गळ्यात घालतो तसेच श्रीकृष्णाचे विठोबा हे पंढरपूरचे एकमेव दैवत पुज्यनीय मानतो त्याचप्रमाणे गुजरातमधील वैष्णव वाणिया हे तुळसीमाळ घालणारे, शाकाहारी आणि राजस्थानमधील श्रीनाथजी हे श्रीकृष्णाचे एकमेव दैवत पुजणारे. 
या वैष्णवांमध्ये पुन्हा पुष्टिमार्गीय वैष्णव हा एक पंथ आहे. हा पुष्टिमार्ग स्वामी श्री वल्लभाचार्य यांनी पाचेकशे वर्षांमागे स्थापन केलेला आहे. उपरोक्त राजस्थानमधील श्रीनाथजी ही श्रीकृष्णाची मूर्ती जी आहे, ती गोवर्धन पर्वतावर एका गवळ्याला पाचेकशे वर्षांपूर्वी, म्हणजे साधारण अकबराच्या काळात सापडलेली मुर्ती आहे. ही तीन ते चार फूट उंचीची काळ्याभोर पाषाणातली मूर्ती आहे. ती श्रीकृष्णाची आहे असं फक्त समजायचं. रादर समजलं गेलं. नेहमीच्या श्रीकृष्णात आणि हिच्यात साम्य नाही. मात्र ती गोकुळ आणि मथुरेजवळील गोवर्धन पर्वतावर खोदकाम करताना सापडली म्हणून ती श्रीकृष्णाचीच मानली गेली असावी. ती मूर्ती सापडली तेव्हा तिची तिथे स्थापना केली. मात्र तेव्हा इस्लामच्या आक्रमणात मंदिरं मोठ्या प्रमाणावर तोडली जात होती. मुर्त्या फोडल्या जात होत्या म्हणून ती मूर्ती घेऊन एका बैलगाडीत घालून मोगली सरदारांपासून लपत छपत राजस्थानपर्यंत आणली गेली आणि उदयपूरजवळच्या एका गावात तिची स्थापना केली. ते गाव आज श्रीनाथद्वारा म्हणून ओळखले जाते. आणि तिथले हे मंदिर भारतातील अतीश्रीमंत मंदिरांपैकी एक समजले जाते. ती बैलगाडी अजूनही मंदिराच्या प्रांगणात उभी आहे.

तेव्हा या मंदिरात श्रीनाथजीबावांचे पुजारी किंवा सेवेकरी म्हणून वल्लभाचार्य सोबत होते. त्यांनी पुष्टीमार्ग या संप्रदायाची स्थापना केली. भक्तांना नियम आखून दिले. पुजेची पद्धत आखून दिली. ती या काळात आचरणे कठीण आहे, तरी अनेक भक्त ती आचरण्याचा प्रयत्न करतात. या संप्रदायाची भजनं तयार झाली. नैवेद्याचे प्रकार तयार झाले. दंतकथाही भरपूर आहेत या मूर्तीशी जोडलेल्या. वल्लभाचार्यांशी प्रभू स्वतः वार्तालाप करत होते असे भक्त मानतात. मुंबई युनिव्हर्सिटीत या पुष्टी संप्रदायाचा अभ्यासक्रम भारतीय तत्वज्ञान शाखे अंतर्गत समाविष्ट केलेला आहे. 
वल्लभाचार्यांनी देखील तेव्हा शंकराचार्यांप्रमाणे भारतभ्रमण केले. गावोगावी फिरून पुष्टिसंप्रदायाचा प्रसार आणि प्रचार केला. अशी चौऱ्यांशी ठिकाणी त्यांनी व्याख्यानं दिली. त्या चौऱ्याऐंशी ठिकाणाना चौऱ्याऐंशी बैठका म्हटलं जातं. भक्त त्या त्या ठिकाणच्या यात्रा करतात. वल्लभाचार्यांच्या नंतर त्यांच्या वारसांना भारतातील चार ठिकाणच्या प्रमुख मंदिराचे आचार्य बनवण्यात आले. वल्लभाचार्यांचे हे वारस अजूनही वेगवेगळ्या ठिकाणच्या हवेल्यांचे आचार्य म्हणून विराजमान असतात. ते तिथे राहत नाहीत. मुंबईसारख्या शहरांत आलिशान जीवन जगतात. मात्र तिथे जाऊन येऊन असतात. यांना बावाश्री म्हटले जाते. त्यांच्याकडून पुष्टीमार्गाची दिक्षा घेतली जाते. मंत्र घेतला जातो. हा मंत्र म्हणजे एक श्रीनाथजी सोडून मी इतर कोणत्याही देवाचे स्वामित्व मानणार नाही अशा अर्थाचा असतो. एकप्रकारे अनेक देवदेवतांचा बुजबुजाट झालेल्या काळात एका दैवताच्या अधिष्ठानाखाली सगळ्यांना एकत्र आणण्याचा, अहिंसेचं तत्वज्ञान शिकवण्याचा तो स्तुत्य प्रकार होता असं म्हणता येईल.
 जरी ते मंदिर राजस्थानात असले तरी श्रीनाथजींचे भक्त हे अधिकतर गुजराती आहेत. ते तिथे सढळ हस्ताने दान करत असतात. प्रत्यक्ष राजस्थानमध्ये जैन अधिक आहेत ते श्रीनाथजींचे भक्त नाहीत. आणि राजस्थानातील इतर क्षत्रीय इत्यादी हिंदू समाज आहे तो शिवभक्त आहे.
म्हणजेच राजस्थानमधील हे मंदिर श्रीमंत झाले आहे ते गुजराती वैष्णव वाणियांमुळे. तिथे पुरुष पुरुष खोलीच्या चार संगमरवरी टाक्या आहेत त्या सदैव देशी तुपाने भरलेल्या असतात. त्यातून रोजचा नैवेद्य रांधला जातो. या मंदिराबाहेरचे भिकारी देखील हे तुपाचे पदार्थ खाऊन माजलेले तगडे माजलेले असतात. कारण तिथे जाणाऱ्या गुजराती भक्तांना वाटतं की या भिकाऱ्यांना मंदिराचा प्रसाद विकत घेऊन खायला घातला की आपली दोन नंबरची सारी पापं धुवून निघणार... अर्थात सर्वच श्रीमंत मंदिरातील देवांच्या भक्तांच्या ह्याच धारणा असतात. एकेकाळी माझीही अशी होती. 
असो.
हे मंदिर फार जुने आहे. मुख्य म्हणजे याला भारतातील इतर मंदिराशी कोणतेही साम्य नाही. कळस, गाभारा, सभागृह, ओवरी आदी काही नाही. ते मंदिर म्हणजे राजस्थानातील एक जुनी मोठी हवेली आहे. त्यात श्रीनाथजींची स्थापना आहे. त्यामुळेच असेल, की श्रीनाथजींच्या त्या निवासस्थानाला मंदिर म्हटलं जात नाही. हवेली म्हटलं जातं. आणि मग श्रीनाथजींची इतर कुठेही मंदिरं असली, तरी त्यांना हवेलीच म्हणण्याची प्रथा आहे.  मूर्तीला भक्त अभिषेक, गंध, फुलं, नैवेद्या इत्यादी काहीही वाहू शकत नाहीत. इतकंच काय पण मूर्तीच्या जवळही जाऊ शकत नाहीत. पण त्यामुळे एक चांगली गोष्ट अशी झालीय, की ती मूर्ती अजूनही जैसे थे स्थितीत जशीच्या तशी आहे. पंढरपूरच्या विठोबाच्या मूर्तीप्रमाणे तिची झीज झालेली नाही. जे द्यायचे असेल ते मंदिराच्या व्यवस्थापनाकडे जमा करायचे. प्रसाद हवा असेल तर पैसे भरून प्रसाद घ्यायचा. चिमुटभर प्रसाद देखील फुकट मिळत नाही. मात्र भक्त पाच पाच हजाराचे दान करून भरपूर करंड्या भरभरून असली तूपाच्या मिठाया प्रसाद म्हणून घेऊन जातात. 

या मंदिराला पारंपरिक, प्राचीन मंदिराचे स्वरूप नसल्याने आणि आता ती हवेली देखील फार जुनी झालेली असल्याने तिथे भव्य मंदिर बांधावे असे भक्तांना नक्कीच वाटते. अंबाणी उद्योगपती हे वैष्णव वाणिया आणि या श्रीनाथजींचे भक्त. अंबाणी भाभीने आपल्या मुलीच्या लग्नात या मंंदिराची प्रतिकृती आपल्या  घरी मुंबईत उभी करून तिथे वैष्णव भजनांवर डान्स करून आपली हौस भागवून घेतली. (युट्यूबवर हे डान्स बघायला मिळतील.)
गांधीजी देखील वैष्णव वाणिया होते. म्हणूनच त्यांना नरसिंह मेहतांचे वैष्णव जन तो ... हे भजन प्रिय होते. गांधीजी हे कच्छी गुजराती होते. गुजरातमधील कच्छ प्रांतात राहणारे लोक कच्छी म्हणून ओळखले जातात. त्यांची कच्छी ही बोली भाषा सिंधी बोलीभाषेशी साम्य दर्शवणारी आहे. दोन्ही प्रांत जवळ असल्याने हे असेल. मात्र कच्छी ही आपल्या इथल्या मालवणीप्रमाणे किंवा अहिराणीप्रमाणे बोलीभाषा आहे. लिखित नाही. 

असे ऐकले की अंबाणी बंधूंनी म्हणे ऑफर दिली, की श्रीनाथजीचे नवीन भव्य मंदिर आम्ही बांधून देऊ, पण त्या मंदिराला नाव श्रीमती कोकीलाबेन धीरूभाई अंबाणी मंदिर असे लावले जाईल. साहजिकच ट्रस्टींनी नकार दिला. म्हणून श्रीनाथजीबावा अजून त्या जुन्या हवेलीतच आहेत. 
मला धोंडो केशव कर्वेंची आठवण झाली. त्यांच्या शाळेला ठाकरसी या श्रीमंत गुजरात्याने मोठी देणगी दिली आणि विद्यालय मोठं करू म्हणून शब्द दिला, मात्र या विद्यालयाला नाव आमच्या आईचे लागेल, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी. कर्वे हे खरे त्यागी. त्यांनी आपल्या नावाला महत्त्व दिले नाही. विद्यालय मोठे होणे महत्त्वाचे. नाव कोणाचे का असेना. आज हे विद्यापीठ नाथीबाई ठाकरसी नावाने ओळखले जाते. त्यामागे कर्वेंचे कष्ट होते हे कुणाला ठाऊकही नाही. 
तद्वतच मंदिर श्रीनाथजींचे राहावे, कोकीलाबेनचे होऊ नये अशी भावना अजून तरी ट्रस्टींची असावी. खरे खोटे श्रीनाथ जाणे.


Oct 12, 2021

भटकंती - लॉकडाऊन अनुभव

 ....रत्नागिरीहून कास पठारला जाण्यासाठी निघालो. नि वाटेत एक दिवस महाबळेश्वरला थांबलो.
खूप पाऊस, प्रचंड धुकं. या अशा ऋतुमध्ये महाबळेश्वरला दुसऱ्यांदा येत होते. दहा पावलांवरचं दिसेना इतकं धुकं. खरंतर ते धुकं नसून ढग असतात. 

उन असो, ढग असो वा पाऊस.. महाबळेश्वरला आल्यावर शॉपिंग हे मस्ट आहे. तिथलं मार्केट भुलावतंच आपल्याला. चपला, शाली, स्वेटर्स, रजया, बॅगा, चिक्की, टॉफीज्, मसाला चणे नि काय काय. एकही वस्तू न घेता तिथून परत जाणारा माणूस योगीच असू शकतो. त्यामुळे यथासांग खरेदी झाली. मका पॅटीस, स्ट्रॉबेरी शेक सगळं खाऊन झालं. 

दुसऱ्या दिवशी सकाळी पाऊस जरासा कमी झाला, किंचित उघडीप दिसू लागली नि हत्ती पॉइंटवर जाता आलं. छान स्वच्छ वातावरण मिळालं. थोडं सूर्यदर्शनही झालं. त्यामुळे पॉइंट्सवरच्या सगळ्या  ऍक्टीव्हीटीज करता आल्या.  अगदी घोडेस्वारीपासून माकडांच्या त्रासापर्यंत सगळं.

महाबळेश्वर हे सर्व ऋतुत  अनुभवण्याचं ठिकाण आहे. प्रचंड जंगल, लिंगमळा, तिथले धबधबे, विविध पक्षी, विविध पॉइंट्स, शॉपिंग. शिवाय महाबळेश्वर सुरक्षित आहे. तुम्ही एकट्यानेही तिथं भटकंती करू शकता. अगदी स्त्रिया देखील. अर्थात स्त्रियांना सदासर्वकाळ सगळीकडेच जसं एक सिक्स्थ सेन्स वापरतच जगावं लागतं तो वापरून अखंड सावध राहूनच कुठंही वावरणं श्रेयस्कर!

माझ्या मते स्त्रियांनी सोलो ट्रीप्स करायला हव्या. एकट्याने बाहेर निघायला हवं. थोडी भटकंती करायला हवी. मला तर अगदी सोळा सतराच्या वयापासून एकटीने प्रवास करण्याची सवय आहे. भटकंती मी कोणत्याही प्रकारे करू शकते. एकटीने, नवऱ्यासोबत, मित्रमैत्रिणींसोबत अथवा टूर कंपनीच्या ग्रुपसोबतही. प्रत्येक अनुभव वेगळा असतो. मी कुठेही कंटाळत नाही सहसा. सगळ्यांत राहूनही अलिप्त राहण्याचा स्वभाव मुळचाच आहे. त्यामुळे माझा प्रवास हा माणसात असला तरी सोलोच असतो. तसं तर प्रत्येक व्यक्तिचा प्रवास हा सोलोच असतो. "कहने को साथ अपने दुनिया चलती है.. पर चुपके इस दिल में तनहाई पलती है".............या ओळी प्रत्येकालाच लागू पडतील. 

भटकंती आवडत असली, तरी मी भटकी नाही. मला स्थैर्य पसंत आहे. मी मनाने आणि सवयीनेही अगदी शहरी आणि घर प्रिय असणारी बाई आहे. पण थोडंफार भटकण्याने तुम्ही अनुभवसमृद्ध होता, फ्रेश होता, आपल्या विहिरीबाहेरही अफाट जग आहे याची आपल्या बेडूकमनाला थोडी तरी जाणीव होते. त्यातही एकटं फिरून पहा. मजा असते. 

गेल्या वर्षीची गंमत सांगते. कर्नाटकातील कूर्गचं प्लॅनिंग केलं होतं. मी आणि नवरा. दोघेच. (आम्ही दोघे दोघेच अधिक फिरलोय. टिपिकल मराठी मध्यमवर्गीय.) पण नवऱ्याचा नंबर विपश्यना कोर्समध्ये लागला (जो लागायला अनेकदा बराच काळ लागतो.) आणि तो तिकडे गेला. मी रेल्वे, हॉटेल बुकींग करून ठेवलं होतं. (मीच. कारण आम्ही दोघं फिरत असलो, तरी सारं प्लॅनिंग, बुकींग हे मीच करत असते. फार तर मुलाची मदत घेऊन. नवरा फक्त ममं म्हणत निर्धास्त ट्रिप एन्जॉय करत असतो. माझ्यावर विसंबून.)
नवऱ्याला म्हटलं. तू जा विपश्यनेला. मी सगळी तिकीटं रद्द करून घेते कूर्गला नंतर जाऊ पुन्हा कधीतरी. ही गोष्ट मार्च २०२०ची.  नवरा गेला. मी तिकीटं रद्द करणार, एवढ्यात माझा मुलगा म्हणाला, 'आई रद्द कशाला करतेस. तू जा की फिरून ये.' मी दुविधेत पडले. जावंसं तर वाटत होतं. पण नवरा परतेल, तेव्हा त्याला काय वाटेल? त्यालाही यायचं होतं. नि आपण एकटीनेच मजा करून यायचं? पण मोह जिंकला नि मी फक्त त्याचं तिकीट रद्द करून मी एकटीच निघाले. कूर्गला जायला. काहीतरी तेरा मार्च वगैरे होती. आसपास.  कल्याण टू मॅंगलोर ट्रेनचं बुकींग होतं. तिथून कूर्गला टॅक्सी करून जाणार होतो. 

पण त्याच सुमारास कोविडचा प्रसार वाढत होता. अजून इथं सुरूवात होती. बातम्या येत होत्या. मास्क बांधा, सॅनिटायझर लावा, लोकांपासून लांब राहा. मी म्हटलं, अशा परीस्थितीत कसं जायचं रे, पण मुलगा म्हणे, त्याला काय होतंय. जा. 
ठिक आहे, चला तर मग. 

तोपर्यंत अजून जागोजागी मास्क मिळत नव्हते. मुलाचा ट्रेकमास्क होता. तो सोबत घेतला. सॅनिटायझर घेतलं. 

ट्रेनमध्येच पुढील परिस्थितीची चुणूक आली. ट्रेन बहुतांश रिकामी होती. लोकांनी आपली रिझर्वेशन्स रद्द करून घेतली असावीत.  पण तरी फार काही वाटलं नाही. सकाळी मॅंगलोरला उतरले. हॉटेल मॅंगलोर शहराबाहेर दहा किमीवर होतं. रिसॉर्ट बुक केलं होतं दोन दिवसांसाठी. रिक्शा करून गेले. तर ते एका उंच टेकडीवजा जागी पार जंगलातच होतं. त्यात माझं कॉटेज अगदी एका बाजूला. भवतीने झाडी. सामान टाकलं नि रिसेप्शन काऊन्टरला विचारलं, गावात कसं जायचं? तिने पर्याय सांगितले. त्यात एक भाड्याने स्कूटर मिळते हेही सांगितलं. हे कधी केलं नव्हतं. म्हटलं, चला स्कूटर घेऊन आपलं आपण फिरू. स्वस्तही पडेल नि मस्तही. 
काय बघायचं? इथे सगळंच बंद आहे कोविडमुळे. झू, पार्क सगळंच. गावात फिरा.

कॉटेजच्या बाहेर येऊन तिथून रिक्शा करून स्कूटरच्या दुकानात गेले. तिथे स्कूटर भाड्याने घेतली. दोनशे रुपये भाडं काहीतरी दिवसभराचं.  विचारत विचारत निघाले. पण गाव फारच लांब होतं. तिथे पोचून ठरवलेली ठिकाणे पाहू म्हटलं, तर एक मंदिर, दोन रेस्टॉरंट्स एवढंच पाहता आलं. तोवरच संध्याकाळ होत आली. परतायला हवं म्हणत आल्या रस्त्याने गुगल मॅप लावून निघाले. वाटेतच काळोख झाला. नि जसं जसं गावाच्या बाहेर आले तसं सगळं सुनसान होत गेलं. रस्त्यावर काळोख. आणि मंजिल काही येईचना. असं वाटत होतं की अंतहीन चालत राहिलोय आपण आणि कुठेतरी भरकटलोय. थोडी घाबरले. मध्ये कुणीतरी भेटायचं चुकून त्यांना विचारत गेले. शेवटी एकदाच आलं स्कूटरचं दुकान. स्कूटर जमा केली. पण रिसॉर्टपर्यंत जायला रिक्शा गरजेची होती. ती बराच वेळ सापडेना. एकदाची सापडली. बिचारा भला होता. किमान पैशात पोचवलं. त्या जंगलात आल्यावर त्या कॉटेजमध्ये एकटं राहायला भीती वाटू लागली. जनावरं, भूतं, हडळी आठवू लागल्या. रिसॉर्टवाल्याला म्हटलं, बाबा रे रिसेप्शनच्या इथेच दे ना एखादी रूम जवळ. तर नाहीए म्हणाला. तिथे भीतीसारखं काही नाही म्हणाला. काही वाटलं तर आम्हाला फोन करा. आम्ही जागेच आहोत. 

मग दारं खिडक्या आतून घट्ट लावून झोपले. काही फोन केले. दुसऱ्या दिवशी इथे राहायचं नाही ठरवलं. शिफ्ट व्हायचं गावातल्या हॉटेलमध्ये. सकाळी उठून नाश्ता करून गावात आले. चौकशा करून एक हॉटेल मध्यवर्ती ठिकाणी शोधून काढले. कोविडची भीती वाटत होतीच. माझ्याजवळच्या सॅनिटायझरने मीच रूम क्लीन करून घेतली. बेड चादरी ब्लॅंकेट सगळ्यावर मारून घेतले. उडपी रेस्टॉरन्ट शोधून तिथे जेवून घेतले. दुसऱ्या दिवशी कूर्गला जायचं होतं त्यासाठी बस सोयीची पडणार होती. एकटीने टॅक्सी करून जाण्यापेक्षा. थोडा आराम करून राहिलेली ठिकाणं बघू नि बस स्टॅन्डवर जाऊन बसची चौकशी करू म्हणून निघाले. मॅंगलोर तसं मोठं शहर आहे. एक एक ठिकाण बरंच लांब होतं. एसटी स्टॅन्डवर जाऊन बसची चौकशी केली. तिथून बीचवर जायला निघाले.
मध्ये मध्ये कोविडसंबधित बातम्या येतच होत्या. मेसेजमध्ये, फोनवर. लॉकडाऊनच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. बीचवर गेल्यावर कोविडची खरी चुणूक जाणवली. बीच बंद केला होता. पोलिस कुठूनही आत जाऊ देत नव्हते. 

बीचवर जाण्यासाठी देखील एका मोटरबोटमधून जावे लागत होते. तिकीट काऊन्टरवरची म्हणाली की तिथे जाऊ देत नाहीत. तरी माझ्या सारख्या अजून काही प्रवाशांनी बोटीची तिकीटं हट्टाने मागितली. तिने ती वैतागून दिली. तिकडे गेलो खरे पण पोलिसांनी उतरूच दिलं नाही. आल्या पावली परत. तेव्हा कोविडचं गांभीर्य जाणवू लागलं. तिथेच दोन मित्रांचे फोन आले. की रेल्वे देखील बंद होणार आहेत. तू काळजी घे. तरी वाटत होतं, छे.. एवढ्या रेल्वे कशा बंद करतील? पण एका मित्राने कोणत्या गाड्या बंद केल्यात त्याची यादीच पाठवली. मग मी हबकले. मॅंगलोरमधले मॉल वगैरे बंद होते ते कळले. संध्याकाळी हॉटेलवर आल्यावर वेगात हालचाली केल्या. कूर्गवाल्याला फोन करून विचारले, तिकडे परिस्थिती कशी आहे? तोही म्हणाला सार्वजनिक ठिकाणं बंद केलीत कालपासून. मग लगेच दुसऱ्या दिवसाची परतीची एखादी ट्रेन सापडते का पाहिले. सुदैवाने दुपारी एकची सापडली. लगेच तिचं परतीचं रिझर्वेशन करून टाकलं. ते मिळाल्यावर हायसं वाटलं. मग आधीचं परतीचं रद्द केलं. 

मग मात्र निवांत झाले. आरामात झोपले. दुसऱ्या दिवशी गावातल्या प्रसिद्ध उडपी रेस्टॉरन्टमध्ये जाऊन भरपेट खाल्लं. आणि स्वारी गाशा गुंडाळून बॅक टू पॅव्हिलियन. आल्यावर मुलावर जरा रागावून घेतलं. भलत्याच परिस्थितीत मी नाही म्हणत असताना मला जा जा करून पाठवलं म्हणून. काहीतरी सतरा की अठरा मार्चला परत आले नि २१ पासून कडक लॉकडाऊन लागला. काळ आला होता पण वेळ आली नव्हती माझ्याबाबतीत हेच खरं. हाहाहा....

अंगावर जरा काटा आला होता. जर अजून बेसावध राहिले असते नि सगळ्या ट्रेन, गाड्या, हॉटेलं बंद झाल्या असत्या, तर मी तिकडे काय केलं असतं?  तरीही कानाला खडा वगैरे लावण्याइतकी मी भ्यायले नव्हते. मी काही ना काही मार्ग काढलाच असता. शेवटी भारतातच तर होतो. मॅंगलोर असं कोणतं परग्रहावर आहे बा?

इकडे नवराही तर अडकलाच सेंटरवर. त्याला घ्यायलाही  मीच ऑनलाईन परवानग्या वगैरे काढून गाडी घेऊन गेलेच की तिथून आल्यावर. हाय काय नि नाय काय...
मै क्या हिरकणी से कम हुं के......आपण साऱ्याच हिरकण्या आहोत. संकटात, अडचणीत अधिक उजळून निघणाऱ्या. संकटात हतबल व्हायला आपण काय पुरुषोत्तम थोड्याच आहोत..
हेच तर अनुभव असतात जीवनाचे. यातूनच तर आत्मविश्वास दृग्गोच्चर होत जातो. कुणावर अवलंबून राहण्याची भित्री वृत्ती कमी होत जाते. म्हणूनच, बायांनो एकट्या फिरा. झोला उठाओ, और निकल पडो....डर के आगेही जीत है........

अरे, पण... कास पठारला जाता जाता मी कूर्गचाच अनुभव सांगत बसले की..... आता कास पठार पुन्हा केव्हातरी...!


किसी पिछले जनम की बात...

मुगले आजम हा सिनेमा पन्नास वर्षानंतर रंगीत झाला, त्यालाही आता जवळपास 20 एक वर्ष लोटली. 🤦काळ किती भराभर चाललाय...    तेव्हा टीव्हीवर दिलीप क...