Dec 24, 2022

वय आणि त्याची गणितं

 अमुक वयात अमूक करावं आणि तमुक वयात तमूक 

याची गणितं आपणच मांडलेली असतात. बराच सामाजिक प्रभावही असतो त्यावर. या वयाची, वाढत्या वयाची दडपणं घेऊनच जगत असतो मग आपण. विशेषतः समाजात वावरताना आपण याबद्दल अनेकदा टारगेटही केले जातो. 
शिक्षणाचं वय, लग्नाचं वय, मुलंबाळं होण्याचं वय, काम करण्याचं वय, विशिष्ट कामं करण्याचं वय, विशिष्ट छंद किंवा आवडी जोपासण्याचं वय, विशिष्ट कपडे घालण्याचं वय, फॅशन करण्याचं वय..........

प्रत्येक गोष्टीसाठी वयाच्या अलिखित मर्यादा आपण आखून घेऊन जगत असतो. त्या त्या मर्यादेत त्या त्या गोष्टी नाही झाल्या तर समाज आपल्याला दडपणं देत राहतो, आणि आपणही ते दडपण घेत राहतो. बरं या मर्यादा कालसापेक्ष बदलत असतात, तरी आपण ते दडपण घेतोच. आता लग्नाचंच बघा ना, एकेकाळी मुलामुलींची लग्नं दहा ते बारा वयात न झाली, तर दडपण घेणारे पालक होतेच की.. आणि आता विशीत लग्नं झाली, तर एवढ्या लवकर? असं विचारलं जातं. पण तिशीनंतरही लग्नं नाही झालं तर पुन्हा जो तो हैराण करतो विचारून, काय मग लग्नं कधी करताय...? झालं, पालक आण मुलं दोघेही चिंतेत पडायला सुरूवात..

या वयाच्या मर्यादा आपल्या डोक्यात इतक्या घट्ट बसलेल्या असतात की आपणही त्या मर्यादेतच विचार करतो आणि त्याप्रमाणे  काय करायचं नि काय नाही करायचं याची गणितं मांडत राहतो. 
आता या वयात? लोक काय म्हणतील? याचा बागुलबुवा लोक काही म्हणण्याआधीच आपल्या मनाला खात राहतो.
मागच्याच महिन्यात मित्राने घेतलेल्या त्याच्या नवीन गाडीत बसले होते. त्याला वरती काचेचं ओपन होणारं रुफ टॉप होतं. त्याने मला ते उघडून दिलं आणि त्यातून डोकं काढून उभं राहायला सांगितलं. मी पण मजेत वर डोकं काढून वाऱ्याचा आनंद घेत उभी राहिले, नंतर दोनच मिनिटात मला वाटू लागलं, हे तर लहान मुलांसाठी असतं ना...आपण या वयात काय हे असल्या गमती करतोय...

त्यावर मित्र म्हणाला, की हेच चुकतं आपलं, आनंद घेण्यासाठी वयाच्या मर्यादा असतात का? जोपर्यंत शरीर साथ देतंय तोपर्यंत सगळ्याच गोष्टी करण्यासाठी मर्यादा का आखून घ्यायच्या? केवळ समाज काय म्हणेल या भीतीने?

तर वयाची गणितं आपल्या मनात असतात. त्यामुळे आपणच ठरवून टाकतो की अमुक वयानंतर हे होणार, शरीर थकणार, अमूक आजार होणार, मृत्यु येणार वगैरे...आपलं शरीर हे एखाद्या कम्प्युटरसारखे असते. तुम्ही जी कमांड देणार ते ते अंमलात आणत असते. तुम्ही मनाला आदेश दिलात की अमुक वयात तमुक होणार. तर ते होणारच ना... 

मी तर म्हणते की मरणाचे वय देखील आपणच ठरवत असतो. आपल्या मनाने. आता काय करायचंय जगून? असं तुम्ही स्वतःच म्हणालात तर ते जगणं लवकरच संपणार. तसं तर इतके दिवस देखील जगून काय केलं आपण? नसतो जगलो तर काय जग थांबणार होतं? मग आता तरी का म्हणायचं ते...

त्यामुळे लोक काही म्हणू दे... म्हातारचळ लागलाय म्हणू दे.. अर्धी लाकडं गेली म्हणू दे.. आता शोभतंय का म्हणू दे... काहीही बरळू दे...
डोक्यातली वयाची गणितं दूर फेकून मस्त जगा.. मस्त खा.. प्या.. प्रेम करा.. उड्या मारा.. खिदळा.. फॅशनी करा..छंद करा.. नवीन गोष्टी शिका. काय वाट्टेल ते करा..ज्यांना आपल्या या वागण्याचा त्रास होतो त्यांनी दूर राहावं आपल्यापासून.

समाज वयाचीच कशाला सगळीच गणितं आखून देतो आणि आपल्याला त्या चौकटीत कोंबण्याचा प्रयत्न करतो. आताच पठाण सिनेमा आलाय. त्यात किती त्या टिप्पण्या शाहरुखवर आणि दिपिकावर... खरंतर हेच स्टार अभिनेते लोक चौकटी मोडण्याचे काम करत असतात. तो आता म्हाताराच दिसतोय, दिपिका सपाट दिसतेय. सेक्सी दिसत नाही. काय नि काय.. नका बघू ना. तुम्हा ट्रेलर दिसला. सिनेमा नका बघूु. कोण जबरदस्ती करतोय का...अमुक फिगर म्हणजे सेक्सी, तमुक त्वचा म्हणजे तारुण्य, अमुक रंग म्हणजे सौंदर्य,  हे सगळं चौकटीत का बसवू पाहता तुम्ही..?  कुणाला डबल एक्सेल् फिगर सेक्सी वाटेल, तर कुणाला झिरो फिगर. कुणाला विशीतला जोडीदार आकर्षून घेईल, तर कुणाला प्रौढ. ज्याचं त्याला ठरवू द्या ना रे कसं जगायचं ते......तुमचं तुम्ही बघा. 

तसं तर विशी-तिशीतच म्हातारी झालेली मनं दिसतात आजुबाजूला.. नि नव्वदी उलटूनही रसरसून जगणारी माणसेही दिसतात... !

9 comments:

  1. खुप सुंदर लेखन

    ReplyDelete
  2. नमस्कार । आनंदात रहावे. (मजा करायला पैसे लागू शकतात) आनंदात राहायला पैसे नाहीत लागत.

    ReplyDelete
  3. Laughter is timeless. Imagination has no age. And dreams are forever... - Walt Disney

    ReplyDelete
  4. मुद्देसूद आणि अनोखं

    ReplyDelete

किसी पिछले जनम की बात...

मुगले आजम हा सिनेमा पन्नास वर्षानंतर रंगीत झाला, त्यालाही आता जवळपास 20 एक वर्ष लोटली. 🤦काळ किती भराभर चाललाय...    तेव्हा टीव्हीवर दिलीप क...