Mar 30, 2025

मी आणि सण वार..

दसरा दिवाळी आली, की दरवर्षी आई ही आठवण सांगायचीच..
अर्थात ती माझ्या जन्माच्याही आधीची असेल.. किंवा मी अगदीच लहान असतानाची..
आम्ही खूप लहान खेड्यावर राहत होतो...
गाव मुस्लिमबहुल... आणि हिंदू जे होते ते कष्टकरी.. प्रमाणात गरीब..
गावात हिंदू सणाचं असं काही वातावरणच नसे फार... फक्त गौरी गणपती आणि दहीहंडीला थोडंफार सोडून...
पण तिथं कोण राहात होतं त्यापेक्षा तो काळच दिखाऊपणाचा नव्हता.. सणावाराला अंगात वारं येण्याचा नव्हता.. 
आमच्या घरी तर कोणतीच कर्मकांडं नव्हती. येऊनजाऊन एक एकादशी.. ती फक्त आजी करायची... तेही मस्त खाऊन पिऊन... म्हणजे तिच्या एकादशीची आम्ही वाट बघत असू आणि ती देखील... कारण ती खाण्याची शौकीन होती...
आणि घरच्या देवांची सकाळी आणि संध्याकाळी अशी दोनदा आजोबा पुजा आरती करत. आजोबा वारल्यावर, दोन दोनदा पुजा करून बाळकृष्णाला त्रास द्यायचा नसतो या सबबी खाली आजीने संध्याकाळची पुजा बंद करून टाकली. (आईशप्पथ हेच कारण सांगितलं होतं. आजी असावी तर अशी... मी तिच्यावरच गेलेय...)
तर सांगायचं म्हणजे आमच्या घरात आधीच हा असा देवाच्या नावाने उजेड होता... सणावाराचं कौतुक नव्हतंच फारसं... आला काय नि गेला काय... खेड्यावर खरेदी नव्हती.. आणि केली तरी नटून दाखवायला तशी माणसं नव्हती... फारतर दिवाळीत भावाला फटाके उडवायची नि कंदीलं बनवून टांगायची हौस होती..
किस्सा आहे दसऱ्याचा...
गुजराती असलो, तरी नवरात्र आणि गरबा बिरब्याशी सुतराम संबंध राहिला नव्हता कोकणातल्या त्या खेड्यावर सहा पिढ्या घालवल्यानंतर.
तर असाच एके वर्षी दसरा आला. कुणाला त्याचा पत्ता नव्हता. घड्याळाच्या काट्यावर तर जाऊच दे, पण कॅलेंडरच्या तारखांवरही आयुष्य धावत नव्हते तेव्हा तिथे आमचे. त्यामुळे दसरा बिचारा गपगुमान येऊन गेला होता. आणि आजीने संध्याकाळी खिचडी रांधली. असंही गुजराती घरात आठवड्याला तीनदा खिचडी ही बनतेच. शास्त्र असतं ते त्यांचं. 
पण आजोबांजवळ पंचांग असे. ते कधीमधी बघत. त्या दिवशी त्यांच्याही संध्याकाळीच लक्षात आलं, की ते दिवसभर बाहेर होते काय कोण जाणे... पण संध्याकाळी जेवायला बसल्यावर ते भयंकर संतापले. घरातल्या बायकांवर... काय अकला आहेत की नाही तुम्हाला? दसऱ्याच्या दिवशी गोडधोड नाही, तर नाही. पण खिचडी कसली रांधताय. दळिंद्री कुठल्या...  आजी, आईंची तोंडं पडली. गप बसल्या बिचाऱ्या... 

ही आठवण आई दरवर्षी नंतर हसत हसत सांगायची. ती सांगताना तिला हसू आवरायचे नाही. खूप हसायची. म्हणायची, 'अगं, नवरात्र आलं कधी नि गेलं कधी पत्ता नसायचा.. गावात कोण करतंय असले सण नि बिण? आम्हाला दोघींनाही लक्षातच नाही आले त्या दिवशी दसरा आहे ते. तेव्हापासून खिचडी करायची झाली की आम्ही दोघी बघून घ्यायचो आज काही शुभ वार बिर तर नाही ना.'
आता तिची तीच आठवण मी दरवर्षी सांगत असते सगळ्यांना. मला फार आवडतंय ते.. किती साधं राहाणं होतं त्याकाळी लोकांचं...आणि कर्मकांडांचं अवडंबरही नव्हतं..माझ्या घरी तर देवदेव नव्हतंच..उपासतापास, व्रत-वैकल्यं, पुजा, सत्यनारायण.. काही करता काही नव्हतं.. माझी गोरीपान आजी अगदी साधी राहायची. अंगावर एकही दागिना नव्हता. कुंकू नाही. (आजोबा असतानाही) म्हणजे घरात सोनं नव्हतं असं नाही. पण घालायच्याच नाही त्या... आईच्या अंगावर पण मोजकेच. 

तोच वारसा मी चालवतेय. 

- अलका गांधी-असेरकर

No comments:

Post a Comment

किसी पिछले जनम की बात...

मुगले आजम हा सिनेमा पन्नास वर्षानंतर रंगीत झाला, त्यालाही आता जवळपास 20 एक वर्ष लोटली. 🤦काळ किती भराभर चाललाय...    तेव्हा टीव्हीवर दिलीप क...