समजा, उद्या माझं कवितांचं पुस्तक लैच गाजलं 😜 आणि त्याला वेगवेगळ्या पुरस्कारांसोबत एखाद्या मुस्लिम गटाकडून देखील पुरस्कार मिळाला 😝आणि त्या पुरस्कारावर उर्दूत (किंवा अरेबीत) 'अल्लाह' असं लिहिलेलं असेल, तर मी पुरस्कार स्वीकारावा की नाही?
Jan 15, 2021
सरस्वती -
Jan 7, 2021
घर आणि गृहिणी -
काल मी फेसबूकवर 'घर' ही माझी कविता पोस्ट केली. माझ्या 'कन्या-रास' या आगामी कवितासंग्रहातील ही कविता आहे. याच संग्रहात एक 'गृहीणी' या नावाची कविता देखील आहे.
मला स्वतःला गृहीणी हे पद आणि ही संकल्पना मान्य आहे. या पदाचं कार्यक्षेत्र फार मोठं आहे आणि या पदाचं केवळ कौटुंबिकच नव्हे, तर सामाजिक आणि राष्ट्रिय महत्त्व देखील मोठंच आहे.
"स्त्रियांचे कष्ट मोजले जातील, तेव्हा मानवी समाजाची सर्वात मोठी चोरी पकडली जाईल" असं कुणाचं तरी वाक्य आहे.
स्त्रिया जे घराकरता, कुटुंबाकरता राबतात त्या कष्टाचे पैशात मोल होत नाही. त्या घरात खाऊनपिऊन राबतात. कुटुंबाचा कर्ता श्रीमंत असेल, तर समाज त्या गृहीणीलाही श्रीमंत म्हणतो आणि तिला चांगलंचुंगलं खायला ल्यायला मिळू शकतं. याउलट जर कर्ता गरीब असेल, मध्यमवर्गीय असेल तर त्या प्रमाणातच तिला खायला ल्यायला राहायला मिळू शकतं. इथं तिच्या हातात चॉइस नाही. जोपर्यंत ती स्वतः कमवत नाही तोपर्यंत तिला स्वतःची गरीबी, श्रीमंती नाही. घरातील कर्त्या माणसाची जी आर्थिक स्थिती, तीच तिचीही.
अर्थात सामाजिक रचना आणि व्यवस्था अशा आहेत की यात कुणालाही काही वावगं वाटत नाही. ना त्या स्त्रीला, ना कुटुंबियांना, ना समाजाला. नवरा राखेल तसंच गृहीणीने राहावं. कमी पगार असेल, तर काटकसर करावी नि अधिक असेल, तर मिरवावं हे अगदी सर्वमान्य आहे, नव्हे तशीच सामाजिक अपेक्षा आहे.
इथपर्यंत ठिकही आहे. मात्र यात स्त्री ही पूर्णपणे परावलंबी आहे याची जाणीव फार कमी वेळा आणि कमी लोकांना होते. अगदी सगळा पगार जरी घरातला कर्ता पुरुष त्या स्त्रीच्या हातात आणून देत असेल, तिला खर्चाचे, निर्णयाचे स्वातंत्र्य देत असेल, तरीही .. तरीही जेव्हा वेळ येते तेव्हा तिचा त्या पैशांवर काडीचाही हक्क नसतो. ती असते केवळ खजिनदार. एक जबाबदार खजिनदार.!
जेव्हा कुठलीही इमर्जन्सी येते, त्या घरातल्या इतर व्यक्तींशी, विशेषतः घरातल्या कर्त्या व्यक्तीशी उर्फ नवऱ्याशी तिचं पटेनासं होतं, वादावादी होते तेव्हा तिला या सगळ्यावर पाणी सोडावं लागणार असतं. ते खजिनदाराचं पदही सोडावं लागणार असतं. किंबहुना प्रत्यक्ष घर सोडायचं नसेल, किंवा घटस्फोटही घ्यायचा नसेल, केवळ भांडणाच्या वेळी रागात बोलायचं असेल, की मला नाही राहायचं तुझ्याबरोबर... तेव्हा खरंतर त्या स्त्रीलाही माहीत असतं की नाही राहायचं हे खरं, पण एक रात्रही जायचं असेल रागवून तर जायचं कुठं? माहेरी? त्या घरावर तिचा कितपत हक्क असतो हे साऱ्यानाच ठाऊक आहे. माहेरी जायचं ते केवळ पाहुणी म्हणून असा समज आजही पक्का आहे. तेव्हा तिथं जाऊन राहाणं हे म्हणजे ना घर का ना घाट का अशी अवस्था असते हे प्रत्येक स्त्री जाणून असते. त्यात माहेरी फक्त आईबाबा असतील तर जरा तरी राहणं सोपं असतं. पण तिथे भावाचे कुटुंब असेल, तर पुन्हा तेही कठीणच. अगदी पाहुणी म्हणूनही तिथं राहणं किती अवघडलेपणाचं असतं ते एक स्त्रीच सांगू शकते.
राहिला कायदेशीर हक्काचा प्रश्न. माहेर, सासर किंवा नवऱ्याचे घर यात कायदेशीर हक्क जरूर आहेत पण ते मिळवायचे म्हणजे संघर्ष आला. ते मिळवायचे म्हणजे शेवटचं तोडण्याचं टोक आलं. यात सहज हिस्सा असा कुठं आहे?
बऱ्यापैकी आर्थिक परिस्थिती असेल, तर त्यातल्या त्यात घरावर तिचंही नाव असतं. किंवा इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी तिच्या नावावरही काही मालमत्ता असते. पण त्या मालमत्तेची माहिती, कागदपत्रे इत्यादीचीही किती गृहीणींना माहिती असते आणि त्याचा उपभोग त्या नेमका किती घेतात हा प्रश्नच आहे.
अनेकदा श्रीमंत घर पाहून मुलींची लग्नं केली जातात. पण ते सासरचं घर तिचं तर सोडाच, तिच्या नवऱ्याच्या नावावरही नसतं. ते असतं सासऱ्याच्या, चुलत सासऱ्याच्या, किंवा आजेसासऱ्यांच्या नावावर. आणि अशी कुटुंबे भारतात आजही बहुसंख्येने आहेत. तिथे तर ती अगदीच परावलंबी जीव असते.
काल पोस्ट केलेली कविता होती.. 'घर'
या कवितेत प्रामुख्याने रोख होता तो अशा स्त्रियांवर. स्त्रियांना पुरुषांपेक्षा घर अधिक प्रिय असतं. घराची स्वप्नं पुरुषापेक्षा स्त्रीला अधिक मोहवत असतात. घर हे केवळ तिचं स्वप्नं नसतं. तिची सुरक्षितता असते. तिचं स्थैर्य असतं. असं असूनही स्त्रीला स्वतःचं, स्वतःच्या पैशांचं, स्वतःच्या नावावरचं घर असावं असं का वाटत नसेल? वयात आलेल्या प्रत्येक लग्नाळू मुलाच्या घराचा विचार केला जातो. एकतर त्याला त्याचे पालक घर घेण्यास मदत करतात, शक्य असेल, तर त्याला त्याच्या नावाचं स्वतंत्र घर करून देतात. नसेल, तर त्याला त्याच्या कमाईतून, कर्ज काढूनही एक घर घेण्यास अतीआग्रह केला जातो. आणि त्याचं आयुष्य सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र मुलीच्या बाबतीत आजही हे होत नाही. आपल्या मुलीचं भवितव्य सुरक्षित असावं, तिच्या नावाचं स्वतंत्र घर असावं, तिने ते आपल्या कमाईतून घेण्याचा प्रयत्न करावा असं क्वचितच कुणा पालकांना वाटताना दिसलंय.
तिच्या लग्नाचा विचार तिच्या लहानपणापासून केला जातो. त्यासाठी पैसे बाजूला काढले जातात. अगदी लाखो रुपये. लग्नाच्या एका दिवसात उडवले जातात. गरीबातला गरीब माणूस पण जास्तीतजास्त पैसे मुलींच्या लग्नावर खर्च करायला तयार असतात. ऋण काढूनही. पण त्याऐवजी त्याच पैशातून तिचं पूर्ण भवितव्य सुरक्षित होईल अशा विचाराने तिच्या नावाने छोटंसंही घर घेतलं जात नाही. अपवाद असतील. आणि यात कुणालाही काही खटकत नाही याचं वाईट अधिक वाटतं.
माझ्या या संग्रहात तीनचार कविता या विषयावरच्या आहेत. दुसरी 'गृहीणी' या नावाची जी कविता आहे त्याचा अनुभव मी स्वतः अनेकदा घेतला. गृहीणीला तिच्या नावावर तिच्या नवऱ्याने, किंवा कर्त्या पुरुषाने घर घेऊन दिलं तरच ते होऊ शकतं. अन्यथा तिला तिच्या नावावर घरासाठी कर्ज मिळत नाही. तिला कोणत्याच कारणासाठी कर्ज मिळत नाही. इथंच स्त्रीचे गृहीणी या नात्याने असलेले पद पोकळ ठरते. तिच्या कष्टाला मोल नाही हे तेव्हा कळते. ती परावलंबी आहे हे तेव्हा कळते.
परवाचीच गोष्ट आहे. एके ठिकाणी एक छोटंसं घर बुक करण्याचा प्रयत्न चालू आहे. अगदी विचार केला तर बहुसंख्य कुटुंबांमध्ये हक्काचं घर विकत घेण्यासाठी धडपड त्या कुटुंबातील स्त्रियाच अधिक करतात. त्यासाठी काटकसर करतात, प्लॅनिंग करतात. घरातल्या पुरुषाचा पिच्छा पुरवतात. पण आर्थिक नाड्या तिच्या हातात नसतात. कर्ज इत्यादी घरातील कमवत्या व्यक्तीच्या नावावरच मिळणार असतं.
मी देखील हक्काचं घर व्हावं म्हणून नवऱ्यापेक्षा अधिक प्रयत्न केले नेहमी. म्हणून हे स्थैर्य कुटुंबाला मिळाले. पैसे जरी नवऱ्याने दिले तरी सारे आयोजन माझेच अधिक होते. धडपड माझीच राहीली. त्यासाठी त्याचं मन वळवणं हे माझंच (अतिशय मानसिक संघर्ष) होतं. आणि घर तर त्याच्याच नावावर झालं. पण मी त्याला नेहमी बोलते, की घर हे केवळ पैशानी होत नाही. हे घर उभं करण्यात माझा वाटा अधिक आहे. पण हे बोलणं व्यावहारिक दृष्ट्या निरर्थक आहे. हे मलाही माहीत आहे.
त्याप्रमाणेच आताही झालं. एके ठिकाणी सेकंड होम म्हणून घर घेण्याच्या इच्छेने प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी मुलाला कर्ज घ्यायला सांगितले आहे. पण त्यात पैसे माझा नवराही टाकणार आहे. साहजिकच आता हे घर माझ्या नावावर असावं असं मला वाटतंय. त्यासाठी फार पूर्वी नवऱ्याने माझ्या नावावर (तेही नाईलाजाने.. कारण काही कारणाने कागदोपत्री त्याला तो प्लॉट त्याच्या नावावर घेणं शक्य नव्हतं म्हणून.) एक छोटा प्लॉट घेऊन ठेवला होता. तो विकून त्याचे पैसेही मी या फ्लॅटमध्ये गुंतवायचे ठरवले. पण आता गोची अशी झाली आहे, की जी व्यक्ती आयुष्यात पहिल्यांदा घर घेईल तिला पंतप्रधान योजनेतून दोन लाख साठ हजार रुपये मदत मिळते. आता योजनेत अशी तरतूद आहे की त्यासाठी ते घर त्या व्यक्तीच्या नावावर असावं किंवा त्याच्याबरोबर त्याच्या बायकोचं चालेल. मात्र आईचं चालणार नाही. कारण आईच्या नवऱ्याचं जे घर आहे तेच तिचंही पहिलं घर आहे. त्यावर तिचं नाव असो की नसो. जर माझं नाव त्या घरावर लावलं तर माझ्या मुलाला ते अडीच लाख रुपये मदत मिळणार नाहीत. अडीच लाखाची रक्कम आमच्या सारख्या मध्यमवर्गीय, ईमानदारीने पगार एके पगारावर आयुष्य काढलेल्या, लाचलुचपतीने पैसा न कमवलेल्या कुटुंबाला मोठीच वाटत आहे. त्यावर पाणी सोडायला मन होत नाही. मात्र तसे केले तर घर हे फक्त मुलाच्या नावाने होणार. माझ्या नाही.
म्हणजे मला सरकार कर्जही देणार नाही. मदतही देणार नाही. मुल्य कुणाला आहे? तर रोख कमावणाऱ्या व्यक्तीला फक्त. गृहीणी आयुष्यभर झिजत असेल, समाज उभारण्यात, पर्यायाने देश उभारणीसाठी स्थिर कुटुंब देण्यात ती कितीही मोलाचे काम करत असेल, तरी तिची आर्थिक किंमत शून्य आहे. हीच खंत माझ्या या 'गृहीणी' या कवितेत उतरलेली आहे.
साहजिकच माझ्या पिढीतल्या स्त्रियांनी केली ती चूक पुढील पिढीतल्या मुलींनी करू नये. स्वतःचं हक्काचं घर करावं. नोकरी व्यवसाय करावा. फक्त नवऱ्याच्या घराची स्वप्नं आपण पाहू नये. नवरा लाखांनी कमवत असेल, तरी तुम्ही फक्त गृहीणी म्हणून न राहता चार पैसे हक्काचे मिळवायचा प्रयत्न करावा. आळशी कोकीळेप्रमाणे नवऱ्याच्या घरात अंडी घालून नवऱ्याच्या पैशावर मजा करण्याचे स्वप्नं पाहू नये. कारण ही मजा अधांतरी आहे. परावलंबी आहे. यात स्वाभिमानही नाही. कारण नवरा आणि सासर कितीही श्रीमंत आणि चांगलं असेल, तरी जोवर तुम्ही तिथं त्यांच्या मर्जीने नांदताय तोवरच ते तुमचं असणार आहे. ज्या क्षणी संघर्ष होईल त्या क्षणी तुम्ही कफल्लकच असणार आहात
गृहीणी -
अलका गांधी-असेरकर
Dec 27, 2020
शाम्पू आणि उवा
सहावी सातवीत असेन.
खेड्यावर वास्तव्य आणि लांब केसांच्या करकचून आईने बांधून दिलेल्या वेण्या.
डोक्यात उवांचं वास्तव्य असायचंच.
आई त्यासाठी नको नको ते उपाय करायची कुणी सांगेल ते.
काय काय उपाय केले अघोरी ते सांगायलाही लाज वाटतेय आता. प्रतिमेला धक्का बसेल.😝
आमच्या गावात मुस्लिम खूप. त्यांच्यापाशी इम्पोर्टेड वस्तू खूप.
अगदी सुका मेवा, चॉकलेट्स पासून चाकू-सुऱ्या सगळंच परदेशी असायचं त्यांच्या घरात भरभरून.
गल्फ किंवा बोटीवरची नोकरी करून सुट्टीत येताना चार माणसं डोक्यावर वाहायला लागतील इतकी मोठी ट्रंक भरून सामान ते लोक आणायचे.
त्यात कमीत कमी शंभरेक झुळझुळीत साड्या. पाचपंचवीस इंपोर्टेड रंगीत नाजूक छत्र्या, परफ्युम्स, सुका मेवा, कटलरी, चॉकलेट्स, साबण, शाम्पू, तेलं अन अजून बरंच काही.
आम्हाला त्यांचा अजिबातच हेवा नसायचा. साधारणपणे कसं असतं की आपल्या नात्यात, जातीत, मैत्रीत कुणी खूप श्रीमंत असेल, तर माणसाला त्यांचा हेवा अधिक वाटतो. पण एकदम परके, जात-धर्मातही नसलेले लोक श्रीमंत असले काय नि गरीब असले काय, माणसाला फारसा फरक पडत नसावा. तसंच काहीसं होतं ते.
असो. तर विषय तो नव्हता.
विषय होता आई माझ्या केसांतल्या उवांसाठी काय काय प्रयत्न करायची. पण त्या जाम चिकट होत्या. हटत नव्हत्या.
एकदा ती माझ्या उवा काढत ओटीवर बसलेली असताना आमच्या दुकानात एक मुस्लिम चौदा पंधरा वर्षांचा मुलगा काही विकत घेण्यास आला. आम्हाला बघून तो आईला म्हणाला, 'आमच्या घरी उवांचं औषध आहे इम्पोर्टेड. आणून देऊ का तुम्हाला थोडं. ते हिच्या केसांना लावून केस धुवून टाका. सगळ्या उवा मरून जातील.'
आईने होकार देताच तो लगेच त्याच्या घरी गेला आणि एका बाटलीत त्याने ते औषध आणून दिलं. अर्थात मूळ बाटलीतून थोडं दुसऱ्या साध्या बाटलीत काढून आणलं होतं त्याने ते.
आईने दुसऱ्या दिवशी माझ्या केसांना ते चोपडलं. चिकट चिकट आणि सुगंधी होतं. अर्ध्या एक तासाने केस धुवायला घेतले, तर केसांत फेसच फेस. सुगंधच सुगंध...
मी आईला म्हटलं, "आई, हा तर शाम्पू." आई म्हणाली, "म्हणजे काय?"
तोपर्यंत कधी शाम्पू वापरला नव्हता. पण वाचला होता. म्हणजे वाचन चांगलं असल्याने शाम्पूबद्दल माहिती होती.
मग आईला सांगितलं की तो लिक्विड साबण येतो हल्ली केस धुण्यासाठी. तो आहे हा. उवांचं औषध बिवशध काही नाही हे.
आमचं किराणा मालाचं दुकान. दुकानात कपडे धुण्याचा ५०१ साबण विकायला असे. आंघोळीचा साबण देखील विकायला नसे, तर शाम्पूचा काही प्रश्नच नव्हता. घेणार कोण विकत? जे गिऱ्हाईक होतं ते गरीब हिंदू होते. मुस्लिम तर सगळं बाहेरूनच आणत.
आम्ही सगळे ५०१ कपडे धुण्याच्या साबणानेच आंघोळ करत असू. नि आजी तर धुण्याच्या सोड्याने केस धूत असे दर आठवड्याला. तरी तिचे केस वयाच्या ७२व्या वर्षी ती वारली तोपर्यंत काळेभोर होते. अन मला पुढे कॉलेजला गेल्यावर मैत्रिणी विचारायच्या, की तू काय लावतेस, तुझी स्कीन इतकी छान कशी दिसते?😂
बाबा तर साबणच लावायचे नाहीत. नुसतंच गरम पाण्याने अंग चोळून घ्यायचे.
आणि घरात सगळे केवड्याची कांती असलेले गोरेपान. कुणाला साधा पिंपल देखील चेहऱ्यावर आला नाही. अशी मख्खन त्वचा सगळ्यांचीच.
तात्पर्य - साबण शाम्पू तेलं सर्व काही भ्रम आहे, मिथ्या आहे... आपले ओरिजिनल अवयव हेच सत्य आहे. 😂
आणि हां... त्या उवा... त्यांनी पिच्छा पुरवला लग्न होईपर्यंत. लग्नानंतर दोन तीन वर्षांनी मी केस पूर्ण कापून शोल्डर कट केला. केस मोकळेच राहू लागले नि अशा मोकळ्या तेलविरहीत रेशमी केसांतून उवांचे पाय सरकून त्या पडू लागल्या. ही जमीन काही आता आपल्या कामाची नाही म्हणत त्या निघून गेल्या कायमच्या... 😍
ते आमच्या वेळी लांब केस, नि त्याच्या घट्ट दोन वेण्या, रिबिनी, तेल लावून चपचप... हे सगळंच खरंतर उवांना आमंत्रण होतं. पण मुलींच्या सौंदर्याबाबतच्या भ्रामक कल्पना सर्वच काळात असतात. तशा त्या तेव्हाही होत्या. मुलींचे लांब केस, त्यांच्या घट्ट वेण्या, रिबिनी, मोठाले अंबाडे हे सगळं सौंदर्याच्या संकल्पना होत्या. एखादीचे बिचारीचे केस जरा तोकडे असतील, तर तिला खंत असायची. आता तो प्रकार तरी राहिला नाही हे बरंच झालं.
तात्पर्य - उवांवर एकच उपाय - केस कापून तोकडे करून टाकणे.
Dec 26, 2020
तोहफे और यादें....बरसों से है आज भी वही..
वर्ष 1991-92
Dec 12, 2020
फुकटच्या अस्मिता - आणि मालवणी हिसका
माझ्या नवऱ्याचा एक गावठी मित्र आहे. म्हणजे विदर्भातल्या गावाकडे राहणारा. चांगला इंजिनिअर आहे. बारा गावं फिरलेला आहे. पण मानसिकता मागास आहे.
Dec 9, 2020
शेतकरी आंदोलनासंदर्भात जाणून घ्या काही गोष्टी -
शेतकरी आंदोलनासंदर्भात
मी सरकास्टीक पोस्ट्स खूप टाकल्या. पण आता जरा गंभीर -
अर्थात त्या सरकास्टीक पोस्ट्स देखील आशयातून गंभीरच होत्या.
पण..
मी साधारण गेली दीड दोन वर्षे ‘किसानपुत्र आंदोलन’ या महाराष्ट्रातील शेतकी विषयक
आंदोलनाच्या थोडीफार संपर्कात आहे.
मी स्वतः शेतकरी नाही. शेतीशी माझा काहीही संबंध नाही. तरीही या किसानपुत्र
आंदोलनाच्या संपर्कातून मला काही गोष्टी कळल्या. मी अभ्यास केला असे मी म्हणणार
नाही. पण काही गोष्टी जाणून नक्की घेतल्या.
मला असे वाटते की सध्या चालू असलेल्या देशातील हमीभाव आणि बाजारसमितीसंदर्भातल्या
आंदोलनाला पाठींबा दर्शवताना, किंवा विरोधही करताना, त्या आधी या किसानपुत्र
आंदोलनाची माहिती, त्यांचा हेतू, त्यांची कळकळ सर्वांनी आधी जाणून घ्यावी व मगच
आपली भूमिका ठरवावी.
अमर हबीब सारख्या प्रामाणिक आणि गेली अनेक वर्षे शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या
आदरणीय व्यक्तीने शेतकरी विरोधी कायदे या नावाची प्रश्नोत्तर स्वरुपात पुस्तिका
लिहिलेली आहे. ती त्यांनी आज लिहीली नाही. छापील स्वरुपात मी ती जवळपास दोनेक वर्षांपूर्वीच
वाचलेली आहे.
यात -
१. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमुख कारण कोणते?
२. कायदे लोककल्याणासाठी
असतात मग शेतकरीविरोधी कायदे कसे?
३. संविधानातील परिशिष्ट
९ ही काय भानगड आहे?
४. कोणकणत्या
घटनादुरुस्त्या शेतकरीविरोधी आहेत?
५. शेतकऱ्यांसंबंधीचे
कोणकोणते कायदे शेतकरीविरोधी आहेत?
६. सिलिंग कायद्याला
विरोध का आहे?
७. सिलिंग कायद्याचे
नेमके स्वरुप काय आहे?
८. हा कायदा पक्षपात
करतो ते कसे?
९. सिलिंग कायद्याचा
उद्देश्य जमिनदारी संपविणे हा नव्हता काय?
१०. सिलिंग कायदा
करण्यामागे काय हेतू असावा?
११. भुमिहिनांना जमिनी
वाटप करण्यास विरोध आहे का?
१२. सिलिंग कायदा उठला तर भांडवलदार येऊन छोट्या शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेऊन
संसार उघड्यावर पडतील त्याचे काय?
१३. सिलिंग कायदा
उठल्याने शेतकऱ्यांचा काय फायदा?
१४. शेतकऱ्यांनी शेतरी
करायचे सोडायचे काय?
१५. शेतीतून लोक बाहेर पडले तर शेती कोण करेल?
१६. सिलिंग कायदा रद्द
करणे सरकारला राजकीय दृष्ट्या परवडत नसेल तर मधला मार्ग कोणता?
१७. जगातील अन्य
देशांमध्ये जमीनधारणेची परिस्थिती कशी आहे?
१८. वारसा हक्काच्या
कायद्यात काही बदल व्हावा का?
१९. जीवनावश्यक वस्तू
कायद्याची पार्श्वभूमी काय आहे?
२०. आवश्यक वस्तू कायद्यात कोणत्या वस्तूंचा समावेश केला आहे?
२१. आवश्यक वस्तू
कायद्यातून शेतीमाल वगळला तर?
२२. आवश्यक वस्तू
कायद्याचा शेतकऱ्यांवर काय परिणाम झाला?
२३. या कायद्यात अन्य
वस्तूही आहेत, त्यांच्यावर काय परिणाम झाला?
२४.जगातील अन्य कोणत्या
देशांत असा कायदा आहे का?
२५. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी केली तर शेतकऱ्यांच्या समस्या
सुटतील का?
२६. भूमी अधिग्रहण
कायद्याची पार्श्वभूमी काय आहे?
२७. युपीए व एनडीए
सरकारांनी भू-संपादन कायद्यात केलेल्या दुरुस्त्या शेतकऱ्यांच्या बाजूने आहेत का?
२८. भू-संपादन कायद्यावर आक्षेप काय आहेत व सूचना काय आहेत?
२९. भारतीय संविधान
बदलायला हवे का?
३०. शेतकरीविरोधी
कायद्यांना नेमके कोण जबाबदार आहेत?
३१. कोणत्या कायद्याचा,
कोणत्या पिकाच्या शेतकऱ्यावर, कसा परिणाम झाला?
३२. शेतकऱ्यांच्या
आत्महत्यांपेक्षा बेरोजगारांच्या आत्महत्या जास्त होत आहेत, अशी आकडेवारी पुढे आली
आहे, त्याबद्दल तुमचे मत काय आहे?
३३. शेतकरीविरोधी
कायद्यांविरुद्ध न्यायालयात का जात नाहीत?
३४. हे कायदे रद्द
व्हावे यासाठी किसानपुत्र आंदोलनाची भूमिका काय आहे?
३५. किसानपुत्रच का?
३६. किसानपुत्र
आंदोलनाची वाटचाल कशी आहे?
३७. किसानपुत्र आंदोलनात
सहभागी व्हायचे असेल तर काय करावे लागेल?
अशा सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील. ती जरूर वाचा, नंतरच आपली भूमिका
ठरवा. जर तुम्हाला ही पुस्तिका हवी असेल, तर अमर हबीब यांच्या परवानीने मी
तुम्हाला त्याची सॉफ्ट कॉपी ई-मेल करू शकेन. अथवा ८४११९०९९०९ या क्रमांकावर तुम्ही
त्यांनाच फोन करूनही मागवू शकता. आणि तुमच्या शंका त्यांना विचारू शकता. अर्थात शंका
आणि त्या विचारण्यामागचा हेतू प्रामाणिक असेल तरच.
देशातील सर्व भागातल्या शेतकऱ्यांच्या समस्या काही कॉमन आहेत, तर काही वेगवेगळ्या.
कायद्याने कॉमन आहेत, तर पिकं, जमिन, पाणी इ. नुसार वेगळ्या. त्यामुळे सरसकट
सगळ्यानाच पाठींबा देता येणार नाही किंवा विरोधही करता येणार नाही. कुठलेही सरकार
एवढ्या मोठ्या संख्येत असणाऱ्या शेतकऱ्यांचे वाईट करून निर्णय घेऊ शकणार नाही. एक
भांडवलदारापेक्षा अनेक सर्वसामान्यांच्या जोरावर सरकार निवडून येत असते. असे मला
वाटते. त्यामुळे मोदी सरकारही शेतकऱ्यांचे वाईट करण्यासाठी कोणता निर्णय घेऊन
स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेईल असे वाटत नाही. मात्र
कुणीतरी वाईटपणा घेऊन कठोर निर्णय घेतले तरच शेती आणि शेतकरी सुधारतील. गुडी गुडी
वागून जैसे थे परिस्थिती बदलत्या काळानुसार फार काळ ठेवता येणार नाही.
सध्या एक डिसेंबर ते १० डिसेंबर या काळात या किसानपु्त्र आंदोलनातील सदस्यांचं ऑनलाईन शिबीरही झालं. मला शक्य झालं तितकं मीही सहभाग घेतला.
किसानपुत्र आंदोलनाचा फेसबूक ग्रुप, फेसबूक पेजही आहे. तुम्ही तिथे सहभागी होऊन शेतकऱ्यांच्या समस्या, मागण्या, कायदे जाणून घेऊ शकता.
निदान काही शेतकरी या कायद्यासाठी आंदोलन करत असताना काही या कायद्याविरोधात का
आहेत हे तरी सर्वसामान्यांनी जाणून घेऊनच मग त्यावर बोलायला हवे. केवळ शिवाजी
महाराज म्हटलं की जय म्हणायचं, नि शेतकरी, कामगार म्हटलं की सहानुभूती दाखवायची
अशा वरवरच्या भावनांना अर्थ नाही.
अर्थात ज्यांना शेतकऱ्यांच्या आडून आपले राजकारणच करायचे आहे, नि आपआपले अजेंडेच
पुढे करायचे आहेत त्यांच्यासाठी ही पोस्ट नाही.
Dec 3, 2020
समाजवादी कावा -
किसी पिछले जनम की बात...
मुगले आजम हा सिनेमा पन्नास वर्षानंतर रंगीत झाला, त्यालाही आता जवळपास 20 एक वर्ष लोटली. 🤦काळ किती भराभर चाललाय... तेव्हा टीव्हीवर दिलीप क...
-
शरीफा नेहमीच जुम्म्याची वाट बघत असायची मनोमन. ज्याप्रमाणे नोकरदार लोक रविवारची वाट पाहात असतात तशीच. जुम्मेरातपासून म्हणजे गुरूवारपासूनच ति...
-
कोण अल्पसंख्य, कोण बहुसंख्य- माझं गाव हे कोकणातलं एक मुस्लिमबहुल गाव. एकेकाळी तिथं संमिश्र वस्ती होती. गवळ आळी, कुंभारवाडा, महारवाडा, जंगमआळ...
-
सकाळचं ऊन माझ्या घरात कोवळ्या बाळपावलांनी रांगत येतं..किलकिल्या उघड्या फटीतून डोकावतं. अगदी तस्संच, जसं एखादं नवीन आलेल्या शेजा-याचं तान्हं ...






