May 31, 2020

धनगराची पोर -

धनगराची पोर -

ती धनगराची अलका म्हणूनच ओळखली जात होती आमच्या वर्तुळात. साधारण माझ्याच वयाची. एक दोन वर्ष मोठी असेल कदाचित. हे धनगर कोकणातले. डोंगरद-यांतून यांची वस्ती. उघड्या माळावर काही वरी नाचणी पिकवणं, क्वचित भात अन्यथा एखाद दुसरी गाय म्हैस पाळून त्याच्या दुधाचा धंदा. कोकणात दुध दुभत्याची तेव्हा वानवाच होती. असं एखादं दुसरं ढोर-जनावर पाळून असलेले लोकच दूध देत घरोघरी. तेही पाणी घातलेलं. आता मात्र दुधाच्या तयार पिशव्या सगळीकडेच पोचल्यात... 

डोंगर द-यांतून रोज दुधाची किटली घेऊन पाच पाच दहा दहा किमी. चालत तालुक्याच्या गावी येऊन हे धनगर घरोघरी दूध घालत. आजही रायगडाला भेट द्यायला गेलात तर वाटेत मटक्यात दही, ताक घेऊन हे धनगर लोक विकायला बसलेले दिसतील.

 ही तीस पस्तीस वर्षांपुर्वीची गोष्ट. अशाच वस्तीवर जन्मलेली आणि वाढलेली अलका. आज अजूनही जातीद्वेष, दुस-या जातीत लग्न केलं म्हणून मुलीला मारून टाकल्याची उदाहरणे जेव्हा वाचते, ऐकते तेव्हा ही मला अलका प्रकर्षाने आठवते..

 चार मोठ्या भावांची लाडकी अलका. वाडीवरच्याच शाळेत जात होती. बारा चौदा वर्षांची असतानाच समाजरितीप्रमाणे लग्न लावून टाकलं तिचं तिच्या आईबाबांनी. परंतु नवरा ठार अडाणी, निरक्षर. तिला अजिबातच आवडत नव्हता. जरा मोठी झाल्यावर तिने सासरी जाण्यास नकार दिला. तोपर्यंत ही नववी पास झाली होती. सासरी जाणार नाही हे तिने ठाम सांगितलं.

 तिला हौस होती छान, व्यवस्थित राहण्याची. शहरी जीवनाची. नवरा नोकरदार असावा याची..

 आईबाबांनीही तिच्या इच्छेपुढे नमतं घेतलं. तिला टेलरिंग शिकायला तालुक्याच्या गावी ठेवलं. कॉलेज बिलेज तर तालुक्याच्या गावीही नव्हतं तेव्हा. आमचीही शिक्षणं रखडली होती तर तिची काय कथा. तिच्या आईबाबांनी एका भल्या घरात जिथे ते दूध पोचवत होते अशा तालेवार घरात मागची एक खोली तिच्यासाठी भाड्याने घेतली आणि ती तिथं एकटी राहू लागली. पाच दहा रुपये भाडं तेव्हा. त्या छोट्या शहरात ती टेलरिग शिकली. आणि एका कापडदुकानासमोर अंगणात मशीन टाकून बसू लागली. भरपूर काम मिळू लागलं आणि पैसा पण. एकटीच राहायची आणि मस्त जगायची. भावांना, बाबांनाही मदत करायची. कुणाच्या अध्यात ना मध्यात. कुणाशी फार बोलणं नाही की वचवच नाही. आपण नवरा सोडलेली, एकटं राहणारी बाई (विशीतच )आहोत. जपून राहायला हवं, कोणी आपल्यावर आपल्या आईबाबांवर बोट दाखवता कामा नये याची तिला जाणीव होती...

 

ती ज्यांच्या घरात राहायची भाड्याने ते माझे मामा होते. मी, माझी मामेबहीण आणि अलका अशा आम्ही तिघी जवळपास एकाच वयाच्या. आमची चांगली मैत्री झाली. अनेक गोष्टीत ती आमची गुरूच झाली. तिने भरपूर गोष्टी आम्हाला शिकवल्या. पहिली सिगरेट ओढायला, सायकल चालवायला, पोहायला. विहीरीत पोहायला...उड्या मारायला शिकवलं. आम्ही डबा बांधून उड्या मारत असू. तिला मात्र छान पोहता येत होतं सुरुवातीपासूनच. डोंगरकडे चढायला शिकवले. आम्हाला रायगडावर घेऊन गेली. रायगड चढणे हा तिच्यासाठी हातचा..सॉरी, पायाचा मळ होता. रायगडाच्या उतारावरच तर तिचं गाव होतं. अजूनही आठवतंय, रायगडावरील गेस्टाहाऊसमध्ये डिसेंबर महिन्याच्या भर थंडीत, पहाटे पाच वाजता पठ्ठी उठून आंघोळीला नळाखाली बसली होती. थंडगार पाण्याच्या. एकदम काटक. पाच पैशाची तक्रार नाही तब्येतीची कधी तिची...

 आज आश्चर्य वाटतं की डोंगरद-यात राहणारे जवळपास आदीवासींसारखेच धनगर समाजातले तिचे भाऊ, आईबाबा. पण त्यांनी तिला सासरी जाण्यासाठी फार जबरदस्ती केली नाही. नऊवारी साड्या नेसणा-या त्यांच्या समाजात ती एकटीच गोल आणि झुळझुळीत साड्या नेसायची. भावांच्या सायकलवर सुरुवातीला शहरात दूध घेऊन यायची. नीटनेटकी राहायची. परंतु भावांनी तिला कधी एक स्त्री म्हणून हे सगळं करण्यापासून रोखलं नाही. तिच्या घरचे म्हणायचे, "ती शिकलेय ना. तिला कसं आवडेल आमच्या समाजात राहायला"...

 आम्ही तिला कुटुंबातल्यासारखीच वागवतो याचं तिच्या घरच्यांना कौतुक होतं. जिव्हाळा होता. शहरातले काही भले तरूण तिच्या प्रेमातही पडले. तिलाही मोह होत होता. परंतु तिच्या मनात कुठेतरी खंत होती, की आपण आपल्या आईबाबांना खूप त्रास दिला. समाजनियमांच्या विरोधात जाऊन. आता निदान परजातीत लग्न तरी नको करायला. म्हणून तिने निग्रहाने आलेले प्रपोजल्स नाकारले. कोर्टात केस लढवून पहिल्या नव-यापासून डिव्होर्स घेतला. आणि एक दिवस जातीतलाच परंतु विवाहीत असलेल्या, एका मुलीचा बाप असलेल्या तरुणाशी तिने लग्न केलं. तो फॉरेस्ट खात्यात चतुर्थ श्रेणीवर नोकरीला होता. पगार चांगला होता. परंतु त्याचीही कथा तीच होती. लहानपणी लग्न झालेलं. हा शिकलेला. बायको निरक्षर. एक मुलगीच होती. मुलगा नव्हता. आणि त्याला मुलगा हवा होता...

 आम्हाला काही हे अर्थातच तेव्हा आवडलं नव्हतं. चांगली प्रथमवर तरूणांची मागणी येत होती. केवळ परजातीतले म्हणून तिने त्यांना नाकारलं. आणि एक मुलगा हवा असलेल्या विवाहीत पुरुषाशी तिने लग्न केलं....!! 

पण ती खुश होती. त्याच्या पहिल्या मुलीला तिने सांभाळलं.

पण लग्न झालं नि ती अल्लड अलका गायब झाली. विडी ओढून दाखवणारी, विहिरीत बेधडक उड्या मारणारी. सायकल चालवणारी. आता ती एका मागोमाग एक अशी तीनचार झालेल्या मुलांची आई झाली. त्यात छान राहण्याची आवड असल्याने अजून कमाई व्हावी म्हणून शिवणकामही करतच असे. आता तिची भेट कधीतरीच व्हायची. तिचा नवरा दूरच्या गावी कुठेतरी नोकरी साठी राहायचा. त्या तिच्या गावीही जाऊन आलो आम्ही. तिला खूप आनंद झाला आम्हाला बघून. पण आम्हाला वाईटच वाटलं. She deserved much more than that...  पण लग्नानंतर तथाकथित उच्चवर्णीय, सुशिक्षित बायांच्याही प्रगतीला आणि स्वातंत्र्याला खीळ बसते. मग हिची काय कथा. ती आता टिपिकल बाई झाली होती. मुलांचं लेंढार मागे लागलेली....

 एकदा तिला गर्भाशयाचा कॅन्सर झाल्याची बातमी ऐकली. त्यानंतर तिची माझी आजतागायत भेट नाही. माझं लग्न होऊन मीही मोठ्या शहरात गेले आणि माझ्या संसारात रमले. आज प्रकर्षाने आठवण येतेय तिची. गावी गेल्यावर माहिती काढायला हवी. तेव्हा जाणवली नव्हती परंतु आता जाणवतेय. तिची कथा ही बरीचशी जैत रे जैत मधल्या चिंधीशीच मिळतीजुळती आहे की! अशी ही चिंधी आमची मैत्रीण होती. अगदी जवळची. पण आता दुरावलेली. कारण मधल्या काळात संपर्काची काहीच साधनं नव्हती. आतासारखे फोन नव्हते की मोबाईल्स नव्हते...

 आज कौतुक वाटतंय ते तिच्या आईबाबांचं, तिच्या भावांचं. पस्तीस-चाळीस वर्षांमागे समाजनिंदेची पर्वा न करता तिला हवे तसे निर्णय त्यांनी घेऊ दिले. तिच्या मर्जीप्रमाणे वागण्याचे स्वातंत्र्य दिले. अशिक्षित म्हणवणारी माणसंच अनेकदा फार धीराने आणि धोरणीपणाने वागतात. तर सुशिक्षित, शहरी म्हणवणा-यांचे इगोज् अनेक गोष्टींनी वेढून राहिलेले असतात........

 

  • अलका गांधी-असेरकर


 

May 30, 2020

बायकांचं गाव - त्यातील एका सुखी बाईची गोष्ट-

बायकांचं गाव -
त्यातील एका सुखी बाईची गोष्ट-
आपल्या घराच्या पुढच्या सोप्यात अमिनाबी ऊन खात निवांत बसलेय. हिवाळ्यातले कोवळे दिवस. तिच्या केवड्यासारख्या कांती असलेल्या चेह-यावर आता ब-याच सुरकुत्या दिसतायत. केसांमध्ये चंदेरी पसरलेय. साहजिकच आहे. आज अमिनाबीने वयाची पंचाहत्तरी ओलांडलेय. तिची मुलगी आणि पाच नातवंडे जी इंग्लंडहून सुट्टीसाठी आली होती, ती नुकतीच, तासाभरापूर्वीच्या एसटीने परत जाण्यासाठी मुंबईला रवाना झालीय.
अमिनाबी समाधानी आहे. तशी ती कधी नव्हती म्हणा..! अमिनाबीचं आयुष्य सुखातच गेलं होतं. भौतिक सुखांची साय चाखतच गेलं होतं. मुस्लिमबहुल छोट्याशा गावात तिचा जन्म आणि सारं आयुष्य गेलं होतं. तिची गोरीपान देखणी विधवा आई जी तिच्याहून केवळ 15-16 वर्षांनी मोठी होती ती आयुष्यभर तिच्यासोबत राहिली. सारं गाव तिला दादी नावाने ओळखत असे. आईच नव्हे तर दोन भाऊ, वहिन्या त्यांची कुटुंबंही तिच्याचसोबत राहिली. एकप्रकारे अमिनाबी आयुष्यभर माहेरीच राहीली म्हणू या. अमिनाबीचं लग्नंही ती सतरा अठराची असतानाच झालं. सासू सासरे लवकर वारले आणि नव-याला दुसरं कोणी जवळचं असं नव्हतं. बहिणींची लग्नं झालेली होती. अमिनाबीच्या माहेरचं सारं कुटुंब तिच्याच घरी येऊन राहिलं.
अमिनाबीचा नवरा गावातल्या इतर बहुतेक मुस्लिम पुरुषांप्रमाणेच बोटीवर खलाशी म्हणून काम करत होता. सहा महिने बोटीवर तर चार सहा महिने घरी. असं त्याचं येणंजाणं होतं. खरंतर ते गावच बायकांचं गाव होतं. एकेका घरात कमीत कमी सात आठ बायका, त्यांची भरपूरशी मुलं आणि घरात एक्कादुक्का पुरुष. बाकीचे सगळे बोटीवर नाहीतर अरब देशांत कामाला, मोलमजुरीला.. पण भरपूर पैसे कमवून वर्षाकाठी महिना दोन महिन्यासाठी येणारे. बहुतांश घरात हीच स्थिती. येताना सगळे घरातल्या बायकांना झुळझुळीत साड्या आणत. पोरांना तसेच कपडे आणत. रंगीबेरंगी छत्र्या आणत, सुका मेवा, चॉकलेट्स आणत. आणि असं बरंच काही...
गाव सधन होतं. मुस्लिम समाज गरीब असतो हे मला आता फेसबूकसारख्या वर आल्यानंतर डाव्यांकडून कळलं. आम्ही पाहिले ते चित्र उलटे होते. गावातले सगळे हिंदू, बारा बलुतेदार कफल्लक, लंगोटी लावून फिरणारे होते. तर मुस्लिम सुका मेवा खात , जन्नत-ए-फिर्दौस लावून झुळझुळीत कपड्यात वावरणारे होते.
अमिनाबीच्या नवऱ्याने शेजारच्या गावात दुसरी बायको पण करून ठेवलेली होती आणि तिलाही मुलं होती.
अमिनाबीला चार मुलं. दोन मुली दोन मुलगे. सर्वात मोठी महजबीन. माझ्या बरोबरीची. आमच्या दोघीत थोडी मैत्रीही होती. त्यामुळेच तिच्या घरी येणंजाणंही होतं.
अमिनाबीची चारी मुलं लहान लहान असतानाच अमिनाबीवर आभाळ कोसळलं. ज्या बोटीवर तिचा नवरा खलाशी होता ती बोट बुडाल्याची वार्ता एके दिवशी गावात येऊन थडकली. कम्युनिकेशनची कोणतीही साधने नसलेला तो काळ होता. बातमी तारेने आली होती. अमिनाबी लगेचच्या एसटीने भावाला घेऊन मुंबईला बोटीच्या कार्यालयात पोचली. बोट परदेशी कंपनीची होती. सारे बुडाले. कोणी सापडलं नाही. सापडले त्यात तिचा नवरा नव्हता. मात्र कंपनीने तगडी नुकसानभरपाई दिली. इतकी, की त्या काळात एवढा पैसा कोणी डोळ्यांनी क्वचितच पाहत असे. अमिनाबी पहिली बायको असल्याने तार तिच्याच नावाने आली होती. शेजारच्या गावी असलेल्या सवतीला काही पत्ता लागण्याआधी तर हिने मुंबई गाठून पैसा पदरात पाडून घेतला होता.

असं ऐकण्यात होतं की अमिनाबीच्या नव-याचे आपल्या सासूशीही शारीरिक संबंध होते. सासू फारतर त्याच्याहून दहाबारा वर्षांनी मोठी. देखणी. विधवा. तिच्याही शारिरीक गरजा होत्याच. खरं खोटं अल्ला जाणे. गाव आलं तिथं चहाड्या आल्याच! मुळातच अमिनाबीचा नवरा बोटीवर चांगली कमाई करत होता. बोटीवरून येताना इंपोर्टेड वस्तूंच्या ट्रंकच्या ट्रंक भरून आणत असे. त्यात शंभरेक तर झुळझुळीत साड्याच असत. मरण्याआधी बोटीवर गेला तेव्हा गावात टुमदार बंगला बांधूनच गेला होता. परंतु त्या घराचं सुख त्याच्या नशीबात नव्हतं.

अमिनाबी आता मिळालेला तगडा पैसा आणि माहेरचा कुटुंबकबिला घेऊन नवीन बंगल्यात शिफ्ट झाली. नवरा गेल्याच्या दुःखापेक्षा सुखासमाधानाचं आयुष्य लाभल्याचा आनंद तिच्या चेह-यावर अधिकाधिक परावर्तित होत गेला. तिची पाच मुलं, आई, दोन जानजवान भाऊ. असं भरलं, नांदतं घर!. नव-याची कमी अशीही त्या गावातल्या घरांमधून फारशी जाणवायची नाही. सवय होती. नवरा वर्ष वर्ष बोटीवर किंवा अरबी देशात नोकरीला जाण्याची. अमिनाबीचे भाऊ पण आलटून पालटून जात असत. थोडीफार कमाई करून येत असत.
अमिनाबीने दोन्ही भावांची लग्नं लावली. दोन्ही भाऊ आणि आई अमिनाबीच्या शब्दाबाहेर नसत. तिच्याच जीवावर तर सा-यांची मजा होती. दोन्ही भावांनी एकेक लग्नं बहिणीच्या खुशीने केलं. आणि एकेक लग्नं आपल्या मर्जीने केलं. दोघांच्या चार बायका. पहिल्याची पहिली बायको दिवसभर सैपाकघरात राबत असे. तर दुसरी बायको प्रेमात माहेरून पळून आलेली. ती सकाळपासून दिवसभर एवढ्या मोठ्या कुटुंबाला लागणारं पाणी गावाबाहेरील विहिरीतून डोक्यावरून वाहून आणत असे. आमच्या दारावरून पाण्याची खेप घेऊन ती जातायेता दिसली की माझी आई म्हणायची, “हे बघा प्रेमाचं फळ..!.पळून जाऊन केलेल्या लग्नाचे परिणाम ! पाणी भरून भरून टाळू पण झिजली हिची” खरंतर ती पण माहेरची श्रीमंताघरची लेक होती. पण पळून जाऊन लग्नं करणा-या बाईला सासरीमाहेरी दोन्हीकडे फारशी किंमत नसायची. तिला तक्रार करायाल कुठेही जागा उरायची नाही. दुस-याची पहिली बायको घरातली इतर कामे सांभाळत असे. दर शुक्रवारी आठवड्याभराचे सगळ्यांचे कपडे नदीवर जाऊन धूऊन आणणे. घरातील पोरवडा सांभाळणे इत्यादी कामे तिच्या अंगावर असत. मात्र त्याची दुसरी प्रेमाची बायको हे सगळं आधीच ठाऊक असल्याने तिच्या माहेरीच अधिक राहत असे. येऊन जाऊन असे. नवरा बोटीवरून आला की यायचे नि गेला की माहेरी निघून जायचे.
अशा भरल्या घरात सगळ्यांना कामं सोपवून देऊन अमिनाबी दिवसभर बंगल्याच्या मधल्या खोलीत खाटेवर पडून असे. कुणाला तरी धरून गप्पा मारत बसणे. ओटीवर बसून येणा-या जाणा-याला हाक मारून चौकशा करत बसणे. घरातील सर्वांवर लक्ष ठेवणे. हे महत्त्वाचे काम तिला असे. मुळातच देखणी असलेली कांती अधिकच तुकतुकीत झाली होती. गुलाबी झाली होती.

करता करता अमिनाबीची मुलं मोठी झाली. मुली जवान झाल्या. परंतु मुलीना मंगनी येत नव्हती. कारण मुली काहीच काम करत नव्हत्या. आईप्रमाणेच आरामात राहत होत्या. तो-यात वागत होत्या. अशा श्रीमंती मुलींना लग्न करून आणून त्या काय कामाच्या..! महजबीनला आपल्यासारख्याच रिकामटेकड्या मैत्रिणी होत्या. दिवसभर त्यांच्यासोबत गप्पा मारत बसणे, गावातल्या तरूण मुलांविषयी बोलत बसणे, संध्याकाळी फिरायला जाणे यातच तिचे दिवस पसार होत होते. गावात तेव्हा पर्दा, बुर्का नावालाही नव्हता. कोकणातल्या इतर स्त्रियांप्रमाणेच मुस्लिम स्त्रियांना देखील बऱ्यापैकी स्वातत्र्य होतं. समानता होती.

महजबीनची तीशी उलटली तरी मंगनी येत नव्हती. खरंतर गावातच लग्नं होणं हे आदराचं, सन्मानाचं समजलं जाई. परंतु गावात अशारितीने बदनाम असलेल्या मुलामुलींना ..विशेषतः मुलींना लग्नं जमणं कठीणच जाई. त्यांच्यासाठी बाहेरच्या, शेजारच्या गावात खटपट केली जाई. परंतु त्या गावातलेही आधी शंका काढत, की यांची त्यांच्या गावात का लग्नं जमत नाहीत.! म्हणजे कुठंतरी पाणी मुरतंय. मग तिथंही कठीणच जाई लग्नं जमणं. मात्र म्हसोबाला नाही बायको आणि सटवाईला नाही नवरा अशा प्रकारची दोन्हीकडे काही मजबूरी असलेली पात्रे मिळून जात. त्यातच एके दिवशी महजबीनचं लग्नं शेजारच्या गावातल्या परंतु लंडनला राहत असलेल्या एका स्थळाशी जुळलं.

अमिनाबीची एक जबाबदारी कमी झाली. मुलांचीही लग्ने लावली. त्यांच्या बायका घरातील कामाला लागल्या. भावांची आणि विशेषतः त्यांच्या चार बायकांची आता गरज नव्हती. त्यांना वेगळे काढले. त्यांच्या त्यांच्या कुटुंबासहीत. दादी केव्हाच वारलीय. वहिन्यांच्या जागी आता सुना राबताहेत. आयुष्य मागील पानाहून सुखासीनपणे पुढील पानावर चालू आहे. दुस-या मुलीचं लग्नं मात्र अजून झालं नाही. तिची चाळीशी उलटलीय. पण तोरा मात्र उलटलेला नाही. बाहेर वाळत घातलेल्या वाळवणाशी बसून कोणा मैत्रिणीशी गप्पा छाटत बसलीय ती समोरच. आयुष्य आपल्याच अटीवर जगायची तिची तयारी आहे. महजबीन लकी निघाली असं म्हणायचं. लंडनला तिचं कसं चाललंय माहीत नाही. पण पाच पोरांचा पोरवडा आहे तिलाही; म्हणजे बाई सुखी आहे असं समजायचं ! बाईसाठी अजून सुख ते काय असतं दुसरं......
- अलका गांधी-असेरकर


May 29, 2020

पाळीचा एक भयंकर अनुभव

मासिक पाळीचा असाही अनुभव आज काहीतरी मासिक पाळी स्वच्छता दिन वगैरे आहे म्हणतात. बऱ्याच पोस्ट त्यावर दिसल्या.
त्याचप्रमाणे काल एका मीम ग्रुपवर देखील मासिक पाळी हा विषय देऊन मीम्स बनवायला सांगितले होते. खूप लोकांनी तिथे चांगले मिम्स बनवून टाकले होते. मीही चार पाच बनवून टाकले.
मीम वगैरे बनवणे हे जरा कौशल्याचे, सर्जनशील आणि तांत्रिक माहितीचेच काम असते नाही म्हटले तरी. त्यामुळे चांगला मिम बनवता आला की त्याचाही आनंद होतो. अर्थात मिम ग्रुपवर सारा यंग क्राऊडच अधिक असतो नि त्यांचा या बाबतीत हातखंडा असतो.

तर दोन दिवस हा विषय असा सतत इथं चर्चिला जात असताना मला माझ्या आयुष्यातली एक मासिक पाळीच्या संदर्भातली एक गोष्ट आठवते जी आता शेअर कराविशी वाटतेय.
कदाचित एक अनुभव म्हणून त्याचा अनेकींना सावध राहण्यासाठी उपयोगही होईल म्हणूनही हा अनुभव लिहिण्याचा प्रपंच..

तर माझं लग्नं झालं त्या वर्षीची ही घटना. माझं लग्न झालं मे मध्ये. लग्न झाल्यानंतरही मी माझ्या नोकरीमुळे जवळपास दोन वर्षे माझ्या आईकडेच राहत होते नि नवरा डोंबिवलीला. आठ पंधरा दिवसांनी कधी मी डोंबिवलीला येत असे, तर कधी तो माझ्या आईच्या गावी येत असे. असे चालले होते.

लग्न झालं नि तिसऱ्याच महिन्यात माझी पाळी चुकली. पाळीची तारीख उलटून सात-आठ दिवस झाले तरी पाळी येत नाही म्हटल्यावर माझ्या आईनेही सांगितले, की बहुधा तुला दिवस गेले असावेत. अजून आठच दिवस वर झाले असल्याने तशी काही खात्री नव्हती आणि तेव्हा असं तातडीने डॉक्टरकडे जाण्याची पद्धतही नव्हती. आईपण म्हणाली वाट बघ थोडी अजून, मग डॉक्टरकडे जाऊ.
अजून दोनेक दिवस गेले आणि पाळी सुरू झाली. जेमतेम आठच दिवस वर झाले होते. त्यामुळे आईला पण वाटले की पाळीच आहे. आणि मलाही तसंच वाटलं. रेग्युलर पाळीप्रमाणेच सारं सुरु होतं. मात्र थोडं पोटात अधिक दुखत होतं. कळ मारल्यासारखं आणि ब्लिडींग नेहमीपेक्षा थोडं अधिक होत होतं इतकंच. आठ दिवस उशीराने पाळी आली म्हणून ब्लिडींग जास्त होत असावं असा समज होता. मी जॉबला जात होते.

असे दोन दिवस गेल्यावर शुक्रवार आला. कसलीतरी सुट्टी होती.. यावेळी माझा नवरा येणार नव्हता. मग आईला म्हटले शुक्रवार धरून तीन दिवस मिळतायत सुट्टीचे. तर मी जाते डोंबिवलीला. आई पण बरं म्हणाली.
पण त्या दिवशी ब्लिडींग जास्तच होत होतं. तिसरा की चौथा दिवस होता. अनुक्रमे कमी कमी होत जाणारं ब्लिडींग जास्त जास्त होत होतं. पण तो काळ असा होता, की आईशीही या विषयावर इतकं मोकळेपणी बोललं जात नव्हतं. शिवाय मला तसं काही वाटलंही नव्हतं. आता आठवतही नाही, की आईला हे मी सांगितलं होतं की नाही ते.
दुसऱ्या दिवशी सकाळची एसटी बस पकडून डोंबिवलीला जायची तयारी करून मी झोपले. जूलै की ऑगस्ट महिना होता काहीतरी. पावसाचे दिवस. कोकणातला भरपूर पाऊस आणि पहाटे साधारण चार वाजता मला शू लागल्यासारखे वाटले म्हणून उठले आणि बाथरूममध्ये गेले. तिथे बसताच एकदम पिशवीभरून काहीतरी गपकन पडल्यासारखे पडले. अगदी ढीगच झाला. रक्ताचा. एकदम घट्ट रक्ताचा.

ते पाहून मी घाबरले. मी पाहिलेही फक्त एक नजर. जास्त पाहिलेही नाही त्या गोष्टीकडे. आणि रक्ताची धार लागलेली. तशीच आईच्या खोलीत जाऊन तिला उठवलं. मी खूप घाबरले होते आणि आईला म्हटलं आई तिकडे बाथरूममध्ये बघ. काहीतरी पडलंय.

आईने जाऊन पाहिले. ती अनुभवी बाई. आम्ही तीन भावंडे आणि त्याशिवाय अजून न जगलेली, मिस कॅरेज झालेली अशा कितीतरी वेळा अनुभवलेली स्त्री.
तिने ते पाहूनच लगेच म्हटलं. ' याचा अर्थ तुला दिवसच राहिले होते. ते पडून गेलंय.' क्षणभर वाईट वाटलं. पण इकडे पोटातून कळा येत होत्या नि ब्लिडींग इतकं होत होतं की मोठाले परकर फाडून पॅडसारखे घेऊनही ते पंधरा वीस मिनिटात भिजून जात होते. नॉर्मल पॅड वगैरे म्हणजे त्यासमोर किस झाड की पत्ती होते.

एकीकडे भीतीही वाटत होती. पण दोनेक तास तसेच काढून सहा वाजता चांगलं उजाडल्यावर हॉस्पिटल गाठलं. नि तिथे सोनोग्राफी वगैरे केल्यावर कळलं की गर्भ पडून गेलेला आहे.
तरीही पोटात खूपच दुखत असल्याने क्युरेटींग करावं लागणार होतं. ते सगळं निस्तरण्यात नंतर बरेच दिवस गेले. महिनाभर ऑफिसमधून सु्ट्टी काढली. सगळं व्यवस्थित झालं.
थोडीशी आईवरही चिडले, की तिला कसं कळलं नाही की ही पाळी नाही, काही वेगळं आहे म्हणून... तेव्हा ती बिचारी शांतपणे बोलली, 'या गोष्टी सगळ्या बेभरोशी असतात गं. कुणीच याबद्दल काही ठाम सांगू शकत नाही. अगदी डॉक्टरला दाखवून नक्की निदान कळलं असतं, तरी व्हायचं ते झालंच असतं.'
प्रश्न मूल गमावण्याचा फार वाटत नव्हता मला तेव्हा... एका भीतीने अंगाचा थरकाप होत होता. की दैव बलवत्तर म्हणून त्या रात्री पहाटेच ते सगळं मी घरी असतानाच झालं. जर मी सकाळी उठून डोंबिवलीला यायला एसटीत बसले असते, नि वाटेत कुठे ते घडलं असतं तर माझं काय झालं असतं? मी काय केलं असतं? गावाहून डोंबिवलीला घरी येईपर्यंत कमीत कमी पाचेक तास लागत होते.
ते आठवलं की अजूनही मला अंगावर काटा येतो.
अर्थात मी तशी खमकी होते तेव्हाही. जिथे ते सुरू झालं असतं तिथेच एखाद्या स्टॉपला उतरून गेले असते नि तिथला दवाखाना गाठला असताच. पण ते सगळं ब्लिडींग, तो गर्भ पडलेला... त्या सगळ्याचं काय? समजा एसटीतच ते झालं असतं तर मग?

अवघ्या आठ दिवसाचा खेळ होता सारा. केवळ आठ दिवसात एवढं ध्यानी मनी नसलेलं नाट्य घडून गेलं होतं..
खरंच बाईच्या बाबतीत हे सगळं अगदी बेभरोशी आणि अकल्पित असतं. कितीही काळजी घेतली तरी या गोष्टी कधी आणि कशा घडतील ते सांगता येत नाही. पाळी हा प्रकारच बेभरोशी आहे.
खरंतर मागच्या आठवड्यात ती एक बाई लॉकडाऊनमुळे गावी चालत जायला निघाली असताना रस्त्यातच बाळंत झाली, ती बातमी ऐकली तेव्हापासूनच ही घटना पुन्हा इतक्या वर्षांनी सारखी आठवत होती. लिहाविशी वाटत होती. पण नाही लिहिली. मात्र दोन दिवसांपासून पाळीचा विषय इथं सोशल मिडियावर चर्चिला जात असल्याने वाटलं, लिहायलाच हवं.. इतर कुणाला यातून सावध राहता येईल.

-अलका गांधी-असेरकर.

किसी पिछले जनम की बात...

मुगले आजम हा सिनेमा पन्नास वर्षानंतर रंगीत झाला, त्यालाही आता जवळपास 20 एक वर्ष लोटली. 🤦काळ किती भराभर चाललाय...    तेव्हा टीव्हीवर दिलीप क...