धनगराची पोर -
ती धनगराची अलका म्हणूनच ओळखली जात होती
आमच्या वर्तुळात. साधारण माझ्याच वयाची. एक दोन वर्ष मोठी असेल कदाचित. हे धनगर
कोकणातले. डोंगरद-यांतून यांची वस्ती. उघड्या माळावर काही वरी नाचणी पिकवणं, क्वचित भात अन्यथा
एखाद दुसरी गाय म्हैस पाळून त्याच्या दुधाचा धंदा. कोकणात दुध दुभत्याची तेव्हा
वानवाच होती. असं एखादं दुसरं ढोर-जनावर पाळून असलेले लोकच दूध देत घरोघरी. तेही
पाणी घातलेलं. आता मात्र दुधाच्या तयार पिशव्या सगळीकडेच पोचल्यात...
डोंगर द-यांतून रोज दुधाची किटली घेऊन पाच पाच दहा दहा किमी. चालत तालुक्याच्या गावी येऊन हे धनगर घरोघरी दूध घालत. आजही रायगडाला भेट द्यायला गेलात तर वाटेत मटक्यात दही, ताक घेऊन हे धनगर लोक विकायला बसलेले दिसतील.
ही तीस पस्तीस वर्षांपुर्वीची
गोष्ट. अशाच वस्तीवर जन्मलेली आणि वाढलेली अलका. आज अजूनही जातीद्वेष, दुस-या जातीत लग्न
केलं म्हणून मुलीला मारून टाकल्याची उदाहरणे जेव्हा वाचते, ऐकते तेव्हा ही मला अलका
प्रकर्षाने आठवते..
चार मोठ्या भावांची लाडकी अलका. वाडीवरच्याच शाळेत जात होती. बारा चौदा वर्षांची असतानाच समाजरितीप्रमाणे लग्न लावून टाकलं तिचं तिच्या आईबाबांनी. परंतु नवरा ठार अडाणी, निरक्षर. तिला अजिबातच आवडत नव्हता. जरा मोठी झाल्यावर तिने सासरी जाण्यास नकार दिला. तोपर्यंत ही नववी पास झाली होती. सासरी जाणार नाही हे तिने ठाम सांगितलं.
तिला हौस होती छान, व्यवस्थित
राहण्याची. शहरी जीवनाची. नवरा नोकरदार असावा याची..
आईबाबांनीही तिच्या इच्छेपुढे नमतं
घेतलं. तिला टेलरिंग शिकायला तालुक्याच्या गावी ठेवलं. कॉलेज बिलेज तर
तालुक्याच्या गावीही नव्हतं तेव्हा. आमचीही शिक्षणं रखडली होती तर तिची काय
कथा. तिच्या आईबाबांनी एका भल्या घरात जिथे ते दूध पोचवत होते अशा तालेवार घरात मागची एक खोली
तिच्यासाठी भाड्याने घेतली आणि ती तिथं एकटी राहू लागली. पाच दहा रुपये भाडं तेव्हा. त्या छोट्या शहरात ती टेलरिग शिकली. आणि
एका कापडदुकानासमोर अंगणात मशीन टाकून बसू लागली. भरपूर काम मिळू लागलं आणि पैसा
पण. एकटीच राहायची आणि मस्त जगायची. भावांना, बाबांनाही मदत करायची. कुणाच्या अध्यात
ना मध्यात. कुणाशी फार बोलणं नाही की वचवच नाही. आपण नवरा सोडलेली, एकटं राहणारी बाई
(विशीतच )आहोत. जपून राहायला हवं, कोणी आपल्यावर आपल्या
आईबाबांवर बोट दाखवता कामा नये याची तिला जाणीव होती...
ती ज्यांच्या घरात राहायची भाड्याने ते
माझे मामा होते. मी, माझी मामेबहीण आणि अलका अशा आम्ही तिघी जवळपास एकाच वयाच्या. आमची चांगली मैत्री झाली. अनेक गोष्टीत ती आमची गुरूच
झाली. तिने भरपूर गोष्टी आम्हाला शिकवल्या. पहिली सिगरेट ओढायला, सायकल चालवायला, पोहायला. विहीरीत
पोहायला...उड्या मारायला शिकवलं. आम्ही डबा बांधून उड्या मारत असू. तिला मात्र
छान पोहता येत होतं सुरुवातीपासूनच. डोंगरकडे चढायला शिकवले. आम्हाला रायगडावर
घेऊन गेली. रायगड चढणे हा तिच्यासाठी हातचा..सॉरी, पायाचा मळ
होता. रायगडाच्या उतारावरच तर तिचं गाव होतं. अजूनही आठवतंय, रायगडावरील
गेस्टाहाऊसमध्ये डिसेंबर महिन्याच्या भर थंडीत, पहाटे पाच वाजता पठ्ठी उठून आंघोळीला
नळाखाली बसली होती. थंडगार पाण्याच्या. एकदम काटक. पाच पैशाची तक्रार नाही
तब्येतीची कधी तिची...
आज आश्चर्य वाटतं की डोंगरद-यात राहणारे
जवळपास आदीवासींसारखेच धनगर समाजातले तिचे भाऊ, आईबाबा. पण त्यांनी तिला सासरी
जाण्यासाठी फार जबरदस्ती केली नाही. नऊवारी साड्या नेसणा-या त्यांच्या
समाजात ती एकटीच गोल आणि झुळझुळीत साड्या नेसायची. भावांच्या सायकलवर सुरुवातीला
शहरात दूध घेऊन यायची. नीटनेटकी राहायची. परंतु भावांनी तिला कधी एक स्त्री
म्हणून हे सगळं करण्यापासून रोखलं नाही. तिच्या घरचे म्हणायचे, "ती शिकलेय ना. तिला कसं आवडेल आमच्या
समाजात राहायला"...
आम्ही तिला कुटुंबातल्यासारखीच
वागवतो याचं तिच्या घरच्यांना कौतुक होतं. जिव्हाळा होता. शहरातले काही
भले तरूण तिच्या प्रेमातही पडले. तिलाही मोह होत होता. परंतु तिच्या मनात
कुठेतरी खंत होती, की आपण आपल्या
आईबाबांना खूप त्रास दिला. समाजनियमांच्या विरोधात जाऊन. आता निदान परजातीत लग्न
तरी नको करायला. म्हणून तिने निग्रहाने आलेले प्रपोजल्स नाकारले. कोर्टात केस
लढवून पहिल्या नव-यापासून डिव्होर्स घेतला. आणि एक दिवस जातीतलाच परंतु विवाहीत
असलेल्या, एका मुलीचा बाप
असलेल्या तरुणाशी तिने लग्न केलं. तो फॉरेस्ट खात्यात चतुर्थ श्रेणीवर नोकरीला
होता. पगार चांगला होता. परंतु त्याचीही कथा तीच होती. लहानपणी लग्न
झालेलं. हा शिकलेला. बायको निरक्षर. एक मुलगीच होती. मुलगा नव्हता. आणि त्याला
मुलगा हवा होता...
आम्हाला काही हे अर्थातच तेव्हा आवडलं
नव्हतं. चांगली प्रथमवर तरूणांची मागणी येत होती. केवळ परजातीतले म्हणून तिने
त्यांना नाकारलं. आणि एक मुलगा हवा असलेल्या विवाहीत पुरुषाशी तिने लग्न
केलं....!!
पण ती खुश होती. त्याच्या पहिल्या मुलीला तिने सांभाळलं.
पण लग्न झालं नि ती अल्लड अलका गायब
झाली. विडी ओढून दाखवणारी, विहिरीत बेधडक उड्या
मारणारी. सायकल चालवणारी. आता ती एका मागोमाग एक अशी तीनचार झालेल्या मुलांची आई
झाली. त्यात छान राहण्याची आवड असल्याने अजून कमाई व्हावी म्हणून शिवणकामही करतच असे. आता तिची भेट कधीतरीच व्हायची. तिचा नवरा दूरच्या गावी कुठेतरी नोकरी साठी राहायचा. त्या तिच्या गावीही जाऊन आलो आम्ही. तिला खूप आनंद झाला आम्हाला बघून. पण आम्हाला वाईटच वाटलं. She deserved much more than that... पण लग्नानंतर तथाकथित
उच्चवर्णीय, सुशिक्षित बायांच्याही प्रगतीला आणि स्वातंत्र्याला खीळ
बसते. मग हिची काय कथा. ती आता टिपिकल बाई झाली होती. मुलांचं लेंढार मागे
लागलेली....
एकदा तिला गर्भाशयाचा कॅन्सर झाल्याची बातमी ऐकली. त्यानंतर तिची माझी आजतागायत भेट नाही. माझं लग्न होऊन मीही मोठ्या शहरात गेले आणि माझ्या संसारात रमले. आज प्रकर्षाने आठवण येतेय तिची. गावी गेल्यावर माहिती काढायला हवी. तेव्हा जाणवली नव्हती परंतु आता जाणवतेय. तिची कथा ही बरीचशी जैत रे जैत मधल्या चिंधीशीच मिळतीजुळती आहे की! अशी ही चिंधी आमची मैत्रीण होती. अगदी जवळची. पण आता दुरावलेली. कारण मधल्या काळात संपर्काची काहीच साधनं नव्हती. आतासारखे फोन नव्हते की मोबाईल्स नव्हते...
आज कौतुक वाटतंय ते तिच्या आईबाबांचं, तिच्या भावांचं. पस्तीस-चाळीस वर्षांमागे समाजनिंदेची पर्वा न करता तिला हवे तसे निर्णय त्यांनी
घेऊ दिले. तिच्या मर्जीप्रमाणे वागण्याचे स्वातंत्र्य दिले. अशिक्षित म्हणवणारी माणसंच अनेकदा फार धीराने आणि धोरणीपणाने
वागतात. तर सुशिक्षित, शहरी म्हणवणा-यांचे
इगोज् अनेक गोष्टींनी वेढून राहिलेले असतात........
- अलका
गांधी-असेरकर
No comments:
Post a Comment