बंडखोर
स्त्रिया-
रजियाचा फोन आला आज थेट लंडनहून
किती वर्षांनी तिच्याशी बोलणं झालं.. जवळपास तिसेक वर्ष
उलटली असतील..
मोबाईल युगामुळे, व्हाट्सप आदी सोशल माध्यमांमुळे हे शक्य
झालंय. कुणाकडून तरी तिने माझा नंबर मिळवला आणि थेट फोन करून, "वलख, कोन बोलताय...?’ साधारण अंदाज आला
पण पटकन नाव आठवेना.
ही कुणीतरी गावची मैत्रीण आहे नक्की. कोकणी मुस्लिम मराठी
भाषा. पण नाव चटकन तोंडावर येईना. तेवढ्यात तीच म्हणाली, “मी रजिया. वलकलास
नाय मना?”
“हो हो ओळखलं
ओळखलं. कुठे आहेस कुठे? लंडनलाच की आलेयस
इथं गावी?”
“नाय. लंडनशीच
बोलताय. आलू हुतू जनवरीत. मार्चच्या १५लाच परत घरी आलू. नि हा लॉकडाऊन लागला नाय..?”
नंतर तिचं धबधब्यासारखं बोलणं सुरू झालं. सगळ्या चौकशा करून
झाल्या. आपलं सांगून झालं. माझं विचारून झालं. हा काय करतो, ती काय म्हणते...
तिला तीन मुली नि एक मुलगा. सगळे तिथे छान शिकलेत. दोन मुली
डॉक्टर झाल्यात, एक डिझास्टर
मॅनेजमेंट शिकलीय, मुलगा वकील
झालाय. एक मुलगी एकटीच अमेरिकेत राहून नोकरी करतेय.
वाह, अवघ्या पाचवी
सातवी शिकलेल्या रजियाची ही प्रगती खासच होती. केवळ लंडनचा नवरा मिळाल्याने हे
शक्य झालं होतं. म्हणजे नवरा तर शेजारच्याच गावचा, पण लंडनला नोकरी करत होता. तोही फार काही शिकलेला
होता असं नाही. पण लंडन म्हणजे प्रश्नच नाही ना!... तेही तीस
चाळीस वर्षांपूर्वी म्हणजे.... शानच होती.
खूप छान वाटत होतं. बरेच दिवसांनी ही भाषा कानी पडत होती.
माझी भाषा बदलली. पण तिची अजून तीच आहे. म्हणजे मी काही ती भाषा बोलत नव्हते. पण
गावी असताना आम्ही सगळ्या मुली पण ‘आलो होतो’, ‘गेलो होतो’ असंच म्हणत असू.
ते तालुक्याच्या गावी शिक्षणाकरता आले तेव्हाच सुधारलं होतं माझं. आलो होतोचं 'आले होते' झालं. कधीचच.
गाव सोडून तर वर्षे लोटली. ती लग्न होऊन लंडनला गेली. मी
मुंबईत आले. तिचं जग वेगळं, माझं वेगळं. ते
तेव्हाही वेगळंच होतं. ती माझी खास मैत्रीण होती असं नाही. गाव सोडल्यावरही गावात
असणाऱ्या काकांकडे सुट्टीत जायची मी. तेव्हा या कंपूशी नव्याने ओळख झाली.
नव्याने अशासाठी, की तसं तर या सगळ्या मुली माझ्या बरोबरीच्या. थोड्या मागे
पुढे. शेजारी राहणाऱ्या, पण लहानपणापासून
मैत्री नव्हती. पिढ्यानपिढ्या
एकत्र राहूनही हिंदूमुस्लिम भेदामुळे एक स्पष्ट असा दुरावा होता. त्यांची शाळा
वेगळी. उर्दू माध्यमातली. आमची वेगळी. मराठी माध्यमातली. दोन्ही शाळा सातवी
पर्यंतच. मी सातवी झाल्यावर तालुक्याला मामाकडे पुढच्या शिक्षणासाठी आले. या मुली
तिथेच राहिल्या.. मग मी सुट्टीत गावी जाऊ लागले, तेव्हा यांच्याशी घसट वाढली. आम्ही सगळ्या तारुण्यात
पाऊल टाकत होतो. मी त्यांच्या कंपूत गप्पा मारण्यापुरती सामील होऊ लागले. मुसलमान
लोकांशी फार जवळीक करायची नाही, इत्यादी नियम असण्याचा काळ जरा मागे पडला होता. मुख्य
म्हणजे तसा दबाव निर्माण करणारे, रोखणारे जुन्या पिढीतील आजी आजोबा आता राहिले नव्हते.
गाव मुस्लिमबहुल असलं, तरी आमच्या गावात बुरखा नव्हता, पडदाही नव्हता.
सगळ्या मुस्लिम मुली, बाया गावभर इतर
हिंदूं बायकांप्रमाणेच
बिनधास्त फिरत. सगळ्यांशी बोलत. पुरुषांशी गप्पा मारत. पण तरीही शेवटी
स्त्रियानी कसं वागावं, कसं बोलावं, चालावं याचे
अलिखित नियम सगळ्याच हिंदू मुस्लिम स्त्रियांसाठी होतेच.
पण हा पाचजणींचा कंपू काही वेगळाच होता. हा चारपाचजणींचा कंपू श्रीमंत
बापांचा होता. तसं तर गावच बऱ्यापैकी सधन होतं. अशा श्रीमंत बापांच्या मुली काही
कमी नव्हत्या दुसऱ्याही. पण या लाडावलेल्या होत्या. मुख्य म्हणजे कामाला आळशी होत्या. तशा
तर रुढार्थाने आळशीही म्हणता येणार नाहीत. पण नदीवर धुणं घेऊन जाणे, विहिरीवरून
पाणी भरून आणणे अशी श्रमाची कामं त्या करत नव्हत्या. यांच्या घरात बऱ्याच माम्या,
काकी, वहिन्या असत. त्या ही कामं करत. दिवसभर राबत. त्यामुळे यांना ती कामं
करावीही लागत नव्हती.
बाकीच्या मुली श्रीमंत घरच्या असल्या तरी नम्र असत. सासरी जाऊन कामं करावी लागतील
याच्या तयारीत असत.
पण हा
कंपू, ‘सासरी राबण्यासाठी जातात का? हॅट!’ या विचारसरणीचा होता.
गावात अशा स्त्रिया, मुली अजूनही भरपूर होत्या. स्वतंत्र बाण्याने जगणाऱ्या.
समाजाची फार पर्वा न करणाऱ्या. त्यासाठी टिकाटिप्पण्या सहन करणाऱ्या. तीस चाळीस
वर्षांपूर्वी. मुस्लिम असूनही!
गावात प्रेमप्रकरणंही भरपूर होत होती. त्यात सगळे प्रकार असायचे. पळून जाऊन लग्नं करणं, आत्महत्या करणं, श्रीमंत बापाच्या विरोधाला न जुमानता गरीब मुलाशी लग्न करणं, आईबाबा नाही म्हणत असूनही स्वतंत्र बाण्याच्या मुलीशी लग्न करणं, इज्जतीच्या नावाखाली मारून टाकणं. लग्न न करता आजन्म तसंच राहणं, लग्नं झाल्यावरही जबरदस्तीचं लग्न असल्याने नवऱ्याशी फटकून राहणं असे सगळे प्रकार असायचे त्या इवल्याशा गावात देखील. गाव म्हणजे जेमतेम पाचेकशे घराचं गाव असेल.
एकेकीची
कहाणी लिहायची, तर एकेकीवर सिनेमा निघू शकेल एक अख्खा. अशी उदाहरणं तीस चाळीस
वर्षांपूर्वी आमच्या गावात होती. त्याच गावच्या पाण्यावर वाढलेली मीही. कदाचित
त्यामुळेच ती बंडखोरी माझ्यातही आली असावी.
गावात पद्धत अशी होती, की मुलींना मुलांकडून मंगनी यावी लागत असे. मगच लग्नं होत.
त्यातच मान होता. शिवाय गावातल्या मुलामुलींची लग्नं गावातच होणं यातही मोठेपणा
होता. ज्या मुलामुलींची लग्नं गावात जमत नसत, त्यांच्यासाठीच बाजूच्या गावात स्थळं
शोधली जात होती. ते कमीपणाचं मानलं जात असे. गावात लग्नं होतायत याचा अर्थ गावात
या घराला, त्यांच्या मुलामुलींना प्रतिष्ठा आहे असा त्याचा अर्थ होता. स्थळांना
तोटा नव्हता. असंही मुस्लिम लोकांत नात्यानात्यांतही बरीच लग्नं होत. पण
मुलामुलींच्या वर्तनावर प्रतिष्ठा होती.
त्यामुळे विशी उलटली तरी या कंपुतल्या मुलींना एकही चांगली मंगनी येत नव्हती. अठरा
विशीतल्या इतर नम्र, कामसू, गरीब मुलींना पटापट मंगन्या येऊन त्यांची लग्नं होऊ
लागली होती.
हा कंपू अरेला कारे करणारा होता. आपल्याच मर्जीने वागणारा होता. तोरा होता. शान
होती.
गावातल्या
सगळ्याच तरुण मुलांना या मुली आवडत नव्हत्या असं नाही. मुली श्रीमंत होत्या, सुंदर
होत्या, तरुण होत्या, मुख्य म्हणजे हुशार, तल्लख होत्या. पण त्या मुलांच्या आईवडिलांना,
पालकांना त्या मंजूर नव्हत्या. ते पालक आपल्या मुलांसाठी यांना मागणी घालणं शक्य
नव्हतं.
दिवसभर हिच्या तिच्या घरी अड्डा ठोकून गप्पा मारत बसणे, गावातल्या तरूण, देखण्या,
होतकरू मुलांवर डोळा ठेवून राहणे, त्यांच्या मागे पुढे करण्याच्या संधी शोधणे हा
उपक्रम धडाक्यात चालू होता यांचा. ही मैत्रीण, ती मैत्रीण, तिचा भाऊ, हिचा काका
अशा होतकरू स्थळांवर खडे टाकून बघायचे. त्यातील एकीला शायरीची, सिनेमांच्या
गाण्याची आवड होती. ती शायरी म्हणे, गाणी म्हणे. मुख्यतः मी त्यांच्या कंपूत सामील
झाले होते ते यासाठीच. तिथेच त्यांच्याबरोबर तेव्हा मी उर्दू लिहायला वाचायला
शिकले.
गाव चहाटळ होतं. लोक तरुण मुलांना विचारीत, “काय रं.. शादी नाय करस त्या अमकीशी?
म्होप देज मिलंल ना...”
त्यावर तो मुलगा किंवा त्याचे पालक म्हणत, ‘हो, म्होप देज मिलंल, पन आमचा घर नाय
ना तवरा म्होटा. त्या असबाब आनतील तो ठेवाय जागा हवी ना..”
या पाची
मुलींना त्याची पर्वा नव्हती. म्हणजे लग्न तर करायचं होतं, पण त्यासाठी तत्वं
मोडायची नव्हती. ते आपल्याच अटीवर करायचे होते. त्या बिनधास्त होत्या. आवडलेल्या
मुलाला स्वतः प्रपोज करीत, विचारीत, “शादी करशील?” मुलगे हसून टाळत. त्यांना
यांच्याशी लग्नं करायचं नव्हतं असं नाही. पण आईबाबांना नि घरच्यांना कोण समजावणार?
पण अर्थात कुणीही येरागबाळ्याने मंगनी टाकावी नि त्या मुलींनी किंवा त्यांच्या घरच्यांनी कबूल करावी अशीही परिस्थिती नव्हती. त्यामुळे मंगनी कुणाकडून येते याला महत्त्व होतंच.
एक मुलगा पाचींच्या नजरेत भरला होता. चांगला होता. त्याचं दुकान होतं. ते दुकान
थोडं गावाबाहेर, एकान्तात असं होतं. दिवसभर त्याचा बाबा दुकानात असे. नि हा मुलगा
शेतीबितीची कामं बघे. संध्याकाळी त्याचा बाबा नमाज पढायला निघून जाई तो पुन्हा येत
नसे. परस्पर घरी जाई त्या वेळेत हा मुलगा येऊन दुकानात बसे.
झालं.
या आमच्या पाची मैत्रिणी संध्याकाळी फिरत फिरत त्याच्या दुकानावर पोचत. त्यावेळी
फार गर्दी नसे. तिथं गप्पा, हंसीमजाक चाले. दुकानात बाबा दिसला तर लांबूनच कल्टी
मारायची. शेवटी तो मासा त्यातील एकीच्या गळाला लागला. बाकीच्या बाजूला झाल्या.
मैत्रिणींमध्ये स्पर्धा नको. तिचं भलं झालं. ती गेली. तो खमक्या निघाला. आपल्या
घरच्यांना त्याने पटवलं.
दुसरीच्या प्रेमात एक गावातला देखणा, राजबिंडा तरुण पडला. गल्फमध्ये चांगला
कमावता. पण त्याच्या घरचे तयार होणं शक्यच नव्हतं. या कंपुतल्या मुली कुणालाच नको
होत्या गावात. नाकापेक्षा मोती जड. तो म्हणाला, “पळून जाऊ. अलिबागला जाऊन
कोर्टमॅरेज करू.” पण ही तयार नव्हती.
गावात
अशी प्रेमलग्नं होत होती तेव्हाही. अगदी मुस्लिम गावातही. कारण एकाच धर्मात असलं
तरी आईबाबांची परवानगी नसायची. आम्ही असताना परस्पर लग्न ठरवतात म्हणजे काय? आईबाप
अडवणुकीचं धोरण अवलंबत. मुलं मग पळून जात. कोर्ट मॅरेज करून आलेल्या मुलांना झक
मारत घरात घेत. पण त्या मुलीला आयुष्यभर हाडुतहुडूत केले जाई, पळपुटी म्हणून
हिणवले जाई. आईबाबांच्या परवानगीशिवाय आली म्हणून मान मिळत नसे.
यासाठीच ही तयार नव्हती त्याच्याबरोबर पळून जायला. लग्न करायचं असेल, तर आईबाबांना
पटव. मंगनी टाक. रितसर लग्न कर.
इकडे
हिचा स्वाभिमान जागृत, तिकडे त्याचे आईबाप हट्टी. शेवटी त्याच्या आईबाबांनी गरीब,
सालस, कामसू, नम्र अशी आपल्या अपेक्षेत बसणारी मुलगी निवडली आणि त्याचं लग्नं
जमवलं.
हिला
प्रचंड आघात बसला. डिप्रेशन आलं. मनातल्या भावना व्यक्त करायला फक्त आमचा कंपू
होता. तिथे ती रडायची. खरंतर ही सुद्धा त्याच्यासमोर जेमतेम होती दिसायला. तरी
म्हणायची, ‘आवरा देखणा, सुनहरे बालोंवाला दुल्हा त्या बावळट बाईच्या दारात बारात घेऊन जाईल. तिच्या अंगणाची शोभा वाढवेल. लायकी तरी हाय काय तिची?’
लग्नाच्या
आदल्या रात्री, आमच्या समोर त्याने तिला शेवटचा प्रस्ताव ठेवला, ‘अजूनही चल. पळून
जाऊ. अलिबागला जाऊन कोर्टात लग्न करू. आईबाबांचं काय करायचं ते मी बघेन.’ पण ती
निश्चयाला ठाम. प्रचंड स्वाभिमानी. पळून येणार नाही. स्वाभिमान गहाण टाकणार नाही.
पळून गेलं की आयुष्यभर ऐकावं लागेल. रीतसर झालं तर स्वतःच रुबाबात म्हणता येतं, की
तुम्हीच मंगनी टाकली होती मला नि आणली होती.
दुसऱ्या
दिवशी त्याचं लग्नं झालं, नी हिने स्वतःला शायरीच्या गममध्ये बुडवून घेतलं. बऱ्याच
वर्षांनंतर मग तिला शेजारच्या गावच्या एका थोराड व्यक्तीची मंगनी आली. तिने रुकार
दिला आणि ती लग्न होऊन दुसऱ्या गावी निघून गेली.
तिसरी एका मुलाच्या प्रेमात पडली. पण मुलगा निकम्मा होता. हिचे बाबा तयार नव्हते.
खरंतर ही एकुलती एक मुलगी त्यांची पण ती पळून गेली त्याच्यासोबत. मग त्यांनी
तिच्याशी संबंध तोडले. पण तो चांगला निघाला नाही. सासरी भरपूर जाच झाला. त्रास
झाला. नि एक मुलगी लहान पदरात असताना तिने स्वतःला जाळून घेतले. मुलीला तिची आई
आपल्या घरी घेऊन आली.
चौथीची
कहाणी वेगळीच. ही त्या शायरीवालीची सख्खी लहान बहीणच. हिला काही मंगनी येणार नाही.
मंगनीची वाट पाहात वर्षे घालवण्यापेक्षा तिचं घरातल्याच चुलतभावाशी लग्नं ठरवण्यात
आलं. तो मुलगा पण गल्फला चांगली नोकरी करत होता. कमवत होता. स्वभावाने सरळ होता.
पण हिला ते मंजूर नव्हतं. घरातल्या घरात तिला लग्नं करायचं नव्हतं. पण घरातले ऐकत
नव्हते. रोज आमच्या ग्रुपमध्ये बसून ती रडायची. तिला बाकीच्या समजवायच्या, “शादी
झैल्यावर वाटंल तो तुला न्हवऱ्यासारखा आपसूक.” मी म्हणायचे, “का नाही म्हणतेस? का
नको म्हणतेस त्याला? चांगला तर आहे तो?” पण ती काहीच बोलत नव्हती. फक्त म्हणायची
की तो मला भावासारखाच वाटतो. मला त्याच्याबद्दल काही भावना नाही निर्माण होत.
तिचं
जबरदस्तीने लग्नं लावण्यात आलं. पण ती नवऱ्याबरोबर एक दिवसही नांदली नाही. लग्न
झालं की होईल सगळं नीट, आपसूक असं वाटणाऱ्या सगळ्यांना तिनं खोटं ठरवलं. ती बधली
नाही. शेवटी नवऱ्याने दुसरं लग्नं केलं दोनतीन वर्षे वाट पाहून. आणि तो आपल्या
दुसऱ्या बायकोला घेऊन गल्फला निघून गेला. ही तशीच राहिली. आईबाबा, काकाकाकी वारले.
ही अजूनही एकटीच आहे. मात्र तो तिला खर्चाला पैसे पाठवतो.
अनेक वर्षांनी कोडं उलगडलं. ज्या देखण्या सुनहऱ्या बालोवाल्यावर मोठ्या आपाचं
प्रेम होतं. तोच हिलाही मनोमन आवडत होता. त्या विषयाने पुढे अजून वेगळंच वळण
घेतलं. ती कहाणी अजून वेगळीच होईल.
आणि पाचवी ही रजिया. सगळ्यात शेवटी तिचं लग्न झालं. शेजारच्या गावातला लंडनला
नोकरीला असलेला मुलगा तिच्या आईने शोधला. तिला वडिल नव्हते. पण वडिलांनी जाताना
भरपूर ठेवलेला पैसा होता. ती लग्न करून लंडनला गेली. तिथेच स्थायिक झाली. चार मुलं
झाली. ती मुलं, आणि मुलीही इतक्या उच्चशिक्षित झाल्या. काल तिचा फोन आला तेव्हा
आवाजात अजूनही बेदरकारी तशीच आहे. आत्मविश्वास तसाच ठासून भरलेला आहे. याचा अर्थ
तिचं तिथं सुशेगाद चालू आहे. नवरा मुठीत आहे.
खरंतर या सगळ्या घटना घडत होत्या त्या त्यांच्या विशीपंचवीशीत. सगळ्या तिशीच्या
आतच बोहल्यावर चढल्या. पण त्या काळात तो उशीर होता. जिथे अठरा वीस फारतर बावीस
वर्षात पोरी उजवल्या जात होत्या. तिथे यांना केवळ आपला स्वभाव, स्वातंत्र्य आणि
बंडखोरी यामुळे लग्नासाठी संघर्ष करावा लागत होता. चाहे जो भी हो जाए या झुकायला
तयार नव्हत्या. आपल्या तत्वांना मुरड घालायला तयार नव्हत्या. त्या जगल्या, मेल्या
त्या आपल्याच मर्जीने, आपल्याच मतांवर ठाम राहून.
- अलका गांधी-असेरकर.