विषयच निघाला आहे, तर पुन्हा मातृत्वाकडे वळू या..
मुल जन्माला घालणं, गरोदरपण, बाळंतपण इत्यादी सगळं फार कष्टदायक प्रकार आहे मानवी मादीच्या बाबतीत तरी.
म्हणजे आता निदान वैद्यकीय प्रगतीने तरी मदत केलीय म्हणून. अन्यथा पूर्वी बाळंतपणात मरणाऱ्या बायकांचं प्रमाण प्रचंड होतं. आणि नवजात अर्भकांचं. गरोदरपणा, बाळंतपण यातून वाचली तर जगली. नाही तर खपली हे गृहीत धरूनच बाळं जन्मायची. माझ्या घरी माझी विशीतली आत्या बाळंतपणात, तर पंचविशीतली काकी गरोदरपणात मेलेल्या आहेत.
याचाच अर्थ माणसाने आपल्या डोक्याचा वापर करून, विज्ञानाच्या मदतीने बाईमाणसाची बाळंतपणं सुखरूप केली आहेत बऱ्यापैकी. अन्यथा निसर्गाने मानवी मादीच्या बाबतीत तरी बाळंतपण आणि गरोदरपण या गोष्टी तिच्या जीवावर बेतणाऱ्याच करून ठेवलेल्या आहेत. इतर पशुपक्षी प्राण्यांप्रमाणे नैसर्गिक रित्या आपली आपण बाळं जन्माला घालता बाईला येत नाहीत. तिला कुणाची तरी मदत लागते.
आता वैद्यकीय मदती उपलब्ध असल्याने मरणाचे प्रमाण कमी झाले आहे. पण याचा अर्थ त्रासाचे प्रमाण कमी झाले आहे असे आजिबातच नाही.
गरोदर राहिल्या राहिल्या उलट्या होणे, चक्कर येणे, भूक मंदावणे इत्यादी त्रास मानवी बाईच्या बाबतीतच होतात. प्राण्यांमध्ये असे प्रकार दिसत नाहीत. तिथून त्रासाला सुरूवात होते. ती आजन्म पुरते म्हटले तरी चालेल.
त्याच्याही आधी या प्रजननासाठी मासिक पाळीचं चक्र निम्मं आयुष्य वागवावं लागतं. सहन करावं लागतं. त्याच्यातही अनेक समस्या असतात. गरोदरपणा नऊ महिन्याचा नि बाळंतपण तीनेक महिने म्हटलं तर एक पूर्ण वर्ष बाईला या प्रजननासाठी द्यावं लागतं. पुढे मुलाचं संगोपन हा तर वेगळाच विषय. गरोदरपणात सुखाने ऐसपैस झोपता येत नाही. सहाव्या महिन्यानंतर तर कुशीवरही झोपता येत नाही. शेवटचे दोन तीन महिने केवळ पाठीवर उताणंच झोपायचं. अतिशय अवघडलेपण घेऊन वावरावं लागतं. ना खाली वाकता येत, ना नीट बसता येत ना झोपता. शेवटच्या महिन्यात चीडचीड फार वाढते. या अवघडलेपणाने.
साधारणपणे वर वर बघता लोकांना वाटतं, की मुल जन्माला घालणं म्हणजे काही फार मोठे काम नाही. रोज जगात हजारो बाया बाळंत होतात. सगळ्यांना मुलं होतात. तुम्ही एकट्या काही नवलाच्या नाहीत.
पण प्रत्यक्षात चित्र काय आहे ते फक्त बायांनाच माहीत असते. तरी त्या मुकाट सोसत, त्यावर मात करत जगतात. बोलत नाहीत एवढंच.
जी मुलगी माहेरी असेपर्यंत, एक मासिक पाळीचा वेळ सोडल्यास साधं डोकंही दुखत नसतं, जी मुलांच्या बरोबरीने खेळात भाग घेते, उंडारते, उड्या मारते, ती मुलगी लग्नं होऊन एक मुल झालं की कायमची दुखणेकरी होऊन जाते. कंबरदुखी, पाठदुखी, विकनेस कायमचा मागे लागतो. याचे प्रमाण व्यक्तीपरत्वे भिन्न असते, पण असते. कुणाला कमी कुणाला जास्त इतकेच. व्यवस्थित सकस आहार, (बाळंतपणात तूप खाणं म्हणजे सकस आहार नाही.) वैद्यकीय उपचार, व्हिटॅमिन्स मिळाले तर त्यातल्या त्यात ही हानी भरून येते. अन्यथा ती जन्मभर मागे लागते. आणि भारतात सर्वच बायांना बाळंतपणानंतर असा सकस आहार, आराम, सुखसोयी मिळतातच असं नाही. फारतर परंपरेने खूप तूप घालून डिंकाचे लाडू जबरदस्ती खायला घातले जातात. त्यांने फक्त वजन वाढतं. ताकद वाढत नाही.
माझा अनुभव सांगते. मला असं नाही म्हणायचं, की मला आला तसाच अनुभव सगळ्यांना येतो, पण जनरली पहिल्या बाळंतपणात बहुतांश स्त्रियांची हीच परिस्थिती असते.
मला दिवस भरल्यानंतर रात्री अडीच वाजता पोटात बारीक बारीक दुखायला लागलं. सकाळी साडेसात आठला हॉस्पिटलला गेले. कळा खूप येत नव्हत्या म्हणून औषधं इंजेक्शन्स इत्यादी दिले. आणि मला मुलगा झाला तो संध्याकाळी सव्वा पाच वाजता. १२ तास मी कळा देत होते. ठो ठो ओरडत होते. आईने कितीही सांगून ठेवलं होतं, आणि ओरडायचं नाही अशी मानसिक तयारी ठेवली होती, तरीही ते शक्य झालं नव्हतं. एक एक कळ जीवघेणी होती. पाठ कंबर मांड्या सगळं कामातून गेलं होतं. इतक्या तासांत बादलीभर रक्त वाहिलं असेल. कमीतकमी. निदान मला तरी असं वाटत होतं. सगळे कपडे रक्ताने भरले होते. इतके की न धुता ते फेकून देण्यात आले होते थेट.
नंतर डॉक्टरांनी सांगितलं की मुलाची वार त्याच्या गळ्यात अडकली होती म्हणून तो बाहेर येण्याचा प्रयत्न करूनही बाहेर येऊ शकत नव्हता. म्हणून मग त्याला चिमट्याने ओढून काढावा लागला. त्यासाठी योनीमार्गाला आतून बाहेरून चीर देण्यात आली. जवळपास सिझेरियनच. खूप टाके आले मला.
त्या टाक्यांमुळे जवळपास दीड दोन महिने मला नीट मांडी घालून बसता येत नव्हतं. त्याला घेता येत नव्हतं. विकनेस प्रचंड. इतका की पाण्याचा मोठा तांब्या देखील भरलेला उचलवत नव्हता. हात थरथरायचे. मी घाबरले होते. आईला म्हटलं मी कायम आता अशीच राहणार का. तेव्हा ती धीर देत म्हणाली, नाही गं, हळू हळू भरून निघेल विकनेस.
थोडं थोडं ब्लिडींग महिना पंधरा दिवस चालू होतं.
आता तर इतकं थांबतही नाहीत. बहुतेकजणींचे सिझेरियनच ऐकते. सिझेरियन सोपे फक्त वर वर दिसते कारण तेव्हा कळा सहन कराव्या लागत नाहीत. पण ते एकप्रकारचे ऑपरेशनच असते. टाके येतात. ते दुखत राहतात. ती जागा विक पडते नैसर्गिक मूळ असते त्यापेक्षा. तुम्ही मुळचे राहत नाही.
अर्थात स्त्रिया बाऊ करत नाहीत. आणि वैद्यकीय सुधारणाही खूप झाल्या असतील आता. पण याचा अर्थ असा नाही की त्या सहन करत नाहीत. त्या या सगळ्या चक्रातून जातात. फक्त जाहीर असं बोलत नाहीत. कुणालाच सांगत नाहीत. फारतर आईला सांगतात. त्यामुळे स्त्रिया या प्रजननप्रकारात काय सहन करतात हे कधी ठळकपणे पुरुषांना समजतच नाही अनेकदा.
यापैकी पुरुषाला काहीही सहन करावं लागत नाही. त्याला प्रजननप्रक्रियेत मिळतो तो केवळ आनंद. क्षणिक का असेना. म्हणून डिलीव्हरी होताना लेबररुममध्ये (याला लेबररूम म्हणतात त्यावरूनच ओळखा काय कष्ट करावे लागतात तिथे ते)बाईच्या नवऱ्यालाही हजर ठेवायला हवं. आता बरेच नवरे स्वतःहून हजर राहतात. असे पुरुष पुन्हा दुसरं मुल हवंय, मुलगाच हवा असं जन्मात कधी म्हणणार नाहीत. जर त्यांनी ती प्रक्रिया पाहिली तर...
मी तरी माझ्या पहिल्याच बाळंतपणात, आपल्याला दुसरं मूल नको, हे पक्कं केलं होतं.
हे त्रास नैसर्गिक असल्याने तक्रार कुणापाशी करणार?
त्यातल्या त्यात विज्ञानाने स्त्रियांना खूप मदत केलीय आता, पाळीच्या दुखण्यापासून ते गर्भ हवा, नको, सिझेरियनपर्यंत पर्याय आणि औषधं आता उपलब्ध आहेत. कुठल्याही देवाने, धर्माने ही मदत केलेली नसून केवळ विज्ञानाने ही मदत केलीय. केवळ विज्ञानामुळे बाई या चक्रातून बऱ्यापैकी सुटलेय आणि ती बाहेर पडून करीअर करू शकतेय. हे महत्त्वाचं आहे.
बाळंतपणानंतर वर्ष दीड वर्ष माझी पाठ प्रचंड दुखायची. ज्यांनी बाळंतपण केलं त्याच सर्जनला सांगितलं, तर बायांच्या पाठी दुखतातच असं म्हणून त्याने माझी बोळवण केली. त्यानंतरही अनेक मोठे डॉक्टर केले. पण बरं वाटत नव्हतं. शेवटी एका साध्या एमबीबीएस, छोटी डिस्पेन्सरी चालवणाऱ्या स्त्री डॉक्टरकडे गेले. तिने नेमकं सांगितलं. तुमचं बाळंतपण झालंय, त्याचा विकनेस आहे. व्हिटॅमिनच्या गोळ्या घ्या. त्यांनी लिहून दिल्या. त्या मी महिनाभर घेतल्या आणि पाठदुखी गेली. मी त्यांना म्हटलं, अहो बाळंतपण होऊन वर्ष दिड वर्ष झालं आता.
तेव्हा त्या म्हणाल्या, बाळंतपणातली झीज पूर्ण भरून यायला तीन ते पाच वर्ष लागतात. जेव्हाही विकनेस वाटेल, पाठ दुखेल तेव्हा तेव्हा या गोळ्या पंधराएक दिवस घ्या अधुनमधून.
पण हीच गोष्ट एमडी झालेला पुरुष सांगू शकला नाही मला इतके दिवस.
(आणि लोकांना अजून लगेच मुलं हवी असतात. मुलगा हवा असतो. त्यात मुलगी नको म्हणून ऍबॉर्शन्स सुरू असतात. काही नैसर्गिक मिसकॅरेजेस होत राहतात. बाई पिसत राहते या सगळ्यात. पण कुणाला दया येत नाही. बाईकडे मुलं काढायचं मशीन म्हणूनच पाहिलं जातं.)
आताच्या काळातही बाईला दिसताना एक किंवा दोनच मूलं दिसतात सुटसुटीत. पण जवळपास निम्म्या बाया या किती मिसकॅरेजेस, किती ऍबॉर्शन्समधून गेलेल्या असतात ते फक्त त्यांनाच ठाऊक असतं.
कदाचित या सगळ्यांमुळेच पूर्वीच्या स्त्रियांना बाहेर कर्तृत्व दाखवता येत नव्हतं. त्या घरात अडकून पडल्या. नि दुर्बल म्हणवल्या गेल्या.
ताजमहालमधल्या मुमताजच्या कबरीवर लिहिलेलं आहे, की तिचा चौदाव्या बाळंतपणात वयाच्या ३९व्या वर्षी मृत्यू झाला म्हणून!
स्वतः बाया पण या सगळ्या चक्रात पिसल्या तरी मुलं हवीत म्हणून मरत असतात कारण सामाजिक पगडाच तसा असतो. नैसर्गिक प्रेरणा नसतातच असं नाही, पण ऐंशी टक्के सामाजिक पगडाच अधिक असतो माणसांच्या बाबतीत तरी. कुटुंबव्यवस्थेची दृढताच अशी आहे की मेलो तरी बेहेत्तर पण मुलं हवीतच असा प्रकार असतो.
असो. माझ्यासारखाच अनुभव सगळ्यांचा असेल असं नाही. काहींचा थोडा सौम्य असेल, तर काहींचा याहून भयानक असतो. मी माझ्या घरसखीला हे सांगितलं तेव्हा ती म्हणाली, की ती तर तीन दिवस घरीच कळा देऊन हैराण झाली होती. तिसऱ्या दिवशी तिला मुलगी झाली होती.
मला वाटतं की बायांनी आपले अनुभव अगदी तपशिलासह जाहीर मांडायला हवे. पण त्यांच्यावर असं बिंबवलं गेलेलं असतं, की तू काय एकटी हे सहन करत नाहीस. हे तर नैसर्गिक आहे. हे तर सगळ्याच सहन करतात. यात काय बोलायचं. यात काय सांगायचं?..
- अलका गांधी-असेरकर
No comments:
Post a Comment