Sep 27, 2021
भटकंती.. कोकण.
Once again in kokan ..
कोकण अजूनही happening आहे.. निळेशार, स्वच्छ, नितळ समुद्रकिनारे, त्यावर दूरवर तरंगणाऱ्या होड्या, लोभस, रंगांची उधळण करत होणारे सूर्यास्त, हिरवागार आसमंत, झाडांनी गच्च भरलेले डोंगर- टेकड्या, पावला पावलावर दुथडी खळाळत वाहणाऱ्या नद्या, त्यावरील पुल, ठायी ठायी कोसळणारे धबधबे, वाऱ्यावर डोलणारे माड, मनाला सुकून देणारी ग्राम मंदिरे, त्यांची ऐसपैस प्रांगणे, त्यातील नजाकतीपूर्ण दीपमाळा, देवळासमोर मस्ट असलेले तळे, आणि या सर्वांवर कळस चढवणार निळेभोर विस्तीर्ण आकाश... एकूणच वातावरणात भरलेला निवांतपणा.. आणि एकदम सुरक्षित वातावरण.
सारं अजून तरी जसच्या तसं आहे.
एकेका ठिकाणावरून पाय हलत नाही. निघावस वाटत नाही.
कोकणात तुम्ही एकटे फिरू शकता अजून. स्त्री असूनही. अगदी खेडोपाडी देखिल, आणि आधुनिक कपड्यात देखील. कोकण सुरक्षित आहे. स्त्रियांकडे पाहण्याची नजर बहुतांश निर्मळ आहे. निकोप आहे.
आत्ता रत्नागिरी परिसरात आहे.
कर्णेश्वर हून येताना मस्त पाऊस आणि चिंब भिजणारा हिरवा आसमंत अनुभवला. कोकणातला पाउस हा एका मोठ्या निबंधाचा विषय होऊ शकतो.
बाकी उघडीप आहे. भटकायला योग्य असा मोसम आहे.
कोकण ही एक धुंद करणारी नशा आहे.
जुन्या कवितेच्या दोनच ओळी आठवतायत. पूर्ण कविता खूपदा शोधूनही सापडलेली नाही.
"कोकण दरिद्री बोलते कोण?
Sep 8, 2021
कोकण आणि वेड -
कोकणात बैल आहेत
पण पोळा नाही ..संपला विषय ( हायला इथे माणसाला खायला पुरणपोळी नाही. गहू नाही. बैलाला कुठून घालायची ?)
दिवाळी झाली की घाटावरून नंदी बैल घेऊन लोक कोकणात उतरायचे.
आमच्या ऑफिस मधला एक सहकारी ऑफिसमधल्या एका घाटी कलिगला फार चिडवत असे. "दिवाळी संपली. आता तुमचा घाट उतरेल खाली गुबु गुबू करत."
तो काळ भावना दुखावून घेणारा पोचट काळ नव्हता. आणि कोकणात तर जाता येता भावनेच्या पाठीत धपाटे घालणारे अंतू बरवा गावोगावी असल्याने लोकांच्या भावना घट्ट बनलेल्या असत. आपल्यावरचे विनोद देखील ते हसून साजरे करत.
एक राष्ट्रीय कीर्तनकार (पक्षी: संघी) येत.
ते म्हणायचे कोकणात भिकारी नाही. (दारिद्र्य असून) कोकणात महारोगी नाहीत. मात्र कोकणात वेडे फार. ( आणि वेड्या पण) प्रत्येक गावात सापडतील.
हे खरं होतं. पंचक्रोशीत प्रत्येक गावात एक दोन तरी दिसत. (आरशात दिसत का हे विचारू नका)
नंतर बरेच वर्षांनी जयवंत दळवी यांच्या लेखनात हे वाचले. त्यांच्या प्रत्येक साहित्यकृतीत वेडी पात्रे असतात.
असो
आम्ही आपले समाधान मानून घ्यायचो की वेड असणं केव्हाही चांगलं...
कारण या जगात वेड्या माणसांनीच परिवर्तन घडवलंय...
माजला सारा जगी हा खास वेड्यांचा पसारा...हे गाणं लिहिणारे वामनराव जोशी कोकणीच असणार ??
पण चांगला कवी लेखक कालातीत कसा लिहितो ते हे गाणं वाचून तुम्हाला कळेल.. शंभर वर्षापू्र्विचे हे गाणे आजच्या परिस्थितीला अगदी तंतोतंत जुळते बघा..
जगी हा खास वेड्यांचा पसारा माजला सारा
गमे या भ्रांत संसारी, ध्रुवाचा 'वेड' हा तारा !!
कुणाला वेड कनकाचे, कुणाला कामिनी जाचे
भ्रमाने राजसत्तेच्या, कुणाचे चित्त ते नाचे ।
*कुणाला देव बहकवी, कुणाला देश चळ लावी
कुणाची नजर धर्माच्या, नशेने धुंदली भारी ।*
अशा या विविध रंगाच्या, पिशांच्या लहरबहरींनी
दुरंगी दीन दुनियेची, जवानी रंगली सारी
- अलका
Jul 31, 2021
डोंगरातील वस्त्या..
दर पावसाळ्यात दरडी कोसळून डोंगरकुशीतली गावं धराशायी होण्याच्या बातम्या येत असतात.
मग छोट्या टेकड्या, छोटे डोंगर यांच्या उतारावर का रहात असतील लोक?
दरड कोसळण्याच्या शक्यता असून?
त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी प्रत्येकवेळी सरकारची असते का?
लोकसंख्या जबाबदार असते का? गरीबी जबाबदार असते का?
माझे गाव कोकणातील एक लहानसे गाव. चारी बाजूने डोंगर आणि मध्ये असलेल्या सपाटीवर शे-सव्वाशे घरांचे गाव. पक्क्या घरांचे. गरीब-श्रीमंत सगळ्यांची घरे जवळपास पक्की. पारंपरिक.
कोकणातील इतर गावांप्रमाणेच जातीनिहाय विभाग. ही गवळआळी, ही जंगमआळी, हा कुंभारवाडा, हा महारवाडा, हा मुस्लिम मोहल्ला. असं पारंपरिक गाव.
माझ्या लहानपणापासून, किंवा त्याही आधीपासून गावात मुस्लिम लोकवस्ती थोडी अधिक होती. यातले मुस्लिम सगळे बोटीवर, गल्फ कंट्रीजमध्ये नोकरीला. भरपूर पैसा कमवणारे, सधन. हिंदू पारंपरिक व्यवसाय-शेती इत्यादी करत गावातच राहणारे. प्रमाणात हाता तोंडाची जेमतेम गाठ. शिक्षणाचे प्रमाण दोन्ही समाजात कमीच होते. दोन्ही समाजासाठी गावात सातवीपर्यंतच्याच शाळा होत्या. त्यांची उर्दू, यांची मराठी.
मुस्लिम वस्ती वाढत गेली आणि त्यांचा पैसाही. त्यांच्या वाढत्या वस्तीला जागा, घरं गावात कमी पडू लागली आणि त्यांनी हिंदूंना रग्गड पैशांची ऑफर देत त्यांची घरं खरेदी करण्याचा सपाटा चालवला. यात जबरदस्ती अजिबात नव्हती. पण आर्थिक ताकद काम करत होती.
लाखालाखाच्या किंमतीत आपली घरं जातायत हे पाहून गरजू हिंदूंनी आपली घरं त्यांच्या हवाली केली. मिळालेले पैसे कनवटीला लावले आणि गावाजवळच्या डोंगराची वाट धरली. डोंगरावरची जमीन माळरान. सरकारी मालकीचे. तिथं त्या जागेवर अनधिकृत अतिक्रमण करत त्यांनी तिथे पुन्हा कच्ची पक्की घरं बांधली. आणि गाव सोडून जवळपास ऐंशी टक्के हिंदू डोंगरपठारावर राह्यला निघून गेले.
आता हा डोंगर कधी घसरला, दरड बिरड कोसळली तर दोष कुणाचा? किती? कसा? हा प्रश्न उभा राहतो.
एकाच गावात हे हिंदूच गरीब का राहिले? मुसलमानांप्रमाणे ते गल्फला का गेले नाहीत? कारण एक मुसलमान दुसऱ्या मुसलमानाला हाताला धरून तिथे नोकरी मिळवून देत होता. तसा तो हिंदू माणसाला नेत नव्हता. हे एक. नेलं असतं तरी हे हिंदू किती गेले असते आणि तिथल्या कष्टाच्या नोकऱ्या त्यांना किती झेपल्या असत्या हे दुसरं. इथं कौशल्य, गट्स, परदेशात टिकून राहण्याची, पडेल ते काम करण्याची क्षमता हे सर्व जर एका समाजाचे वैशिष्ट्य असेल, आणि दुसऱ्या समाजात नसेल, तर समता आणि समानता यांची अपेक्षा कशी धरायची?
जेही असो.
यात सरकाचा दोष किती? सरकारने त्यांना मदत करायला हवी का? का? कशी?
प्रत्येक ठिकाणी डोंगराच्या कुशीत अशा वस्त्या दिसतात. त्यांचीही कारणं अशीच काहीबाही असतील ना?
एकाच परीसरात राहून एक समाज प्रगती करतो. तर दुसरा अधोगती. गावातले स्थान, आपली पक्की घरं, पारंपरिक विरासत सोडून सगळे हिंदू डोंगराकडे परागंदा झाले त्याचं वाईटही वाटतं. रागही येतो आणि ज्याची जशी लायकी तसे त्याचे स्थान असेही वाटते.
Jul 10, 2021
सायकल -
सायकल –
शिवा रोज ती सायकल
बघायचा आणि त्याचा जीव खालीवर व्हायचा. रोज त्याच्या स्वप्नात ती छोटीशी, नाजूक,
सुंदर सायकल यायची. आपण त्या सायकलवर बसून वाऱ्याच्या वेगाने ती सुसाट चालवतोय हे
एकच स्वप्न तो रोज बघत होता. एखाद्या भुकेल्या माणसाला पंचपक्वान्न पाहून जसं
होईल, तसंच त्याला होत होतं म्हणाना, ती सायकल पाहून. बाजूच्याच दोन सोसायटी सोडून तिसऱ्या सोसायटीतला
त्याच्याएवढाच एक गोरापान, स्वच्छ, सुंदर मुलगा ती सायकल चालवत त्याच्या चहाच्या
टपरीसमोरून अनेकदा जात होता. आणि त्या सायकलला पाहून शिवा कासावीस होत होता.
खरंतर शिवाला सायकल
चालवताही येत नव्हती अजून. पण एकदा मिळाली, तर शिकायला असा काय वेळ लागणार? आपण ती
सहज आणि लगेच शिकू असा त्याला आत्मविश्वासच होता.
आजही तो गोरा मुलगा ती सायकल चालवत त्याच्या समोरून गेला आणि शिवा जागेपणीच स्वप्नात
हरवला. त्या सायकलवर बसला आणि सुसाट निघाला रस्त्यामागून रस्ते टाकत लांब..
लांब... कदाचित आपल्या गावापर्यंत.. जिथून तो आला होता. जिथून त्याच्या आईबापाने
त्याला इतक्या लांब कमवण्यासाठी चहाच्या टपरीवर पाठवून दिलं होतं.
तेवढ्यात हाक आली, ‘शिवा, क्या कर रहा है उधर? चाय कौन तेरा बाप ले कर जाएगा क्या
साले?’
तसा तो दचकला, भानावर आला आणि चहाचा क्रेट उचलून धावला.
त्याची चहाची टपरी म्हणजे तो ज्या चहाच्या टपरीवर पोऱ्या म्हणून काम करत होता ती.
शिवा फारतर आठदहा
वर्षांचा असेल. काळासावळा, वयापेक्षा थोडा बुटका पण अंगाने भरलेला, अंगावर जुने
विटके कपडे. कधी हाफ पॅन्ट तर कधी फुलपॅन्टही असायची. पण जुनेरीच.
चहाच्या टपरीवरून चहाचे
भरलेले पेले असलेला जाळीचा ट्रे घेऊन तो आजुबाजूच्या दुकानवाल्यांना,
रस्त्यावरच्या फेरीवाल्यांना त्यांच्या ऑर्डरचा चहा नेऊन द्यायचा. रस्त्याच्या
अलिकडे-पलिकडे दोन्ही ठिकाणी त्याच्या फेऱ्या चालू असायच्या. मधला वाहता रस्ता
सुसाट वाहनांची वर्दळ असलेला. त्याच्याएवढ्या एखाद्या चांगल्या घरच्या मुलाला
त्याची आई अशा रस्त्यावर एकटाही पाठवणार नाही कदाचित, रस्ता क्रॉस करून जायचं असेल
तर.
पण शिवा सरावला होता.
त्याला त्या कामाचाही सराव झाला होता. चहाचे पेलेच तर पोचवायचे असत. रस्त्यावरची
किती गंमत पाहायला मिळायची. भरलेला बाजार, वर्दळ, रंगीबेरंगी माणसं. त्यात त्याला
ते काम काही फार जड वाटत नव्हतं. शिवाय मालक त्याचा पगार त्याच्या आईबाबांना पोचवत
होता आणि दोन्ही वेळ त्याला पोटभर जेवायलाही घालत होता. दुकानातच रात्रीचा इतर दोन
कामगारांसोबत झोपायचीही सोय होती.
तरीही, समोरून त्याच्याच वयाची स्वच्छ, सुंदर मुलं पाठीवर स्कूल बॅग अडकवून मस्ती
करत जाताना दिसली की तो त्यांच्याकडे एकटक पाहात राहायचा. रस्त्याच्या पुढच्याच
वळणावर अनेक शाळांच्या विविध बसेस थांबायच्या. त्यातून चिवचिवाट करत लहान-मोठी मुलं चढता
उतरताना दिसायची. तेव्हा मनातल्या मनात तोही त्या बसमध्ये जाऊन बसायचा.
कधी कधी स्वप्नांत तो
पाठीला बॅग लावून सायकलवरून शाळेपर्यंत पोचायचा. तेव्हा ती शाळा त्याच्या गावातली त्याला अंधूक आठवणारी छोटीशी प्राथमिक शाळा असायची. त्या शाळेतली मुलं सगळी
त्याच्या ओळखीची होती. त्याच्याच आजुबाजूला राहणारी, त्याच्यासोबत खेळणारी. ती
सगळी मुलं त्याच्या त्या सायकलीभोवती गोळा होत. कौतुकाने बघत राहत. काही जण
त्यावरून हात फिरवून बघत. शिवाला ते पाहून अजून आनंद होई. अशी सायकल त्या गावात
कुणापाशीच नव्हती.
आता इथून पुन्हा त्या चहाच्या दुकानात जाणार नाही असं तो आईबाबांना सांगायचं ठरवून
टाकी. आपण रोज ही सायकल घेऊन आपल्या या शाळेत जाऊ. पाठीला दप्तर लावून.
हे स्वप्नं पूर्ण होईपर्यंत पहाट व्हायची. पाच वाजल्यापासूनच दुकानात वर्दळ सुरू व्हायची. चहाचा मोठा स्टोव्ह ढणाढणा पेटायचा. मालक त्याच्या अंगावरची चादर ओढून, एखादी शीवी देतच त्याला उठायला भाग पाडायचा. शिवा स्वप्नं बाजूला सारून उठायचा आणि तोंडावर पाणी मारून कामाला लागायचा.
एकदा शिवा चहाचे पेले घेऊन रस्त्याकडेला असलेल्या दोन सोसायट्या सोडून तिसऱ्या सोसायटीत गेला. खरं तर
चहाच्या टपरीवरून चहा मागवणारं त्या सोसायटीत कोणी नव्हतं. सगळी सोसायटी
रहिवाशांची होती. तिथं कोणतंही दुकान नव्हतं. पण बहुधा सोसायटीची काही कामं चालू होती.
ती कामं करणाऱ्या कामगारांसाठी तो चहा घेऊन आलेला होता. चहाचे पेले त्या
कामगारांच्या हातात एकेक करून दिल्यावर त्यांचा चहा पिऊन होईपर्यंत तो इकडे तिकडे
बघत तिथेच फिरत होता.
तेवढ्यात... त्याची
दृष्टी एका कोपऱ्यात गेली. तीच सायकल! तिथं उभी होती. आणि तिला साखळी वगैरे काहीही
बांधलेली नव्हती. शिवाचे डोळे लकाकले. दिवसरात्र या सायकलीनेच तर त्याचा पिच्छा
पुरवला होता. म्हणजे तो गोरापान मुलगा याच इमारतीत राहात होता तर. शिवाला अगदी
राहवत नव्हतं. त्याने भराभर चहाचे रिकामे पेले गोळा केले. धावत जाऊन दुकानात ठेवले
आणि मालकाचा डोळा चुकवून तसाच सुसाट पळत तो पुन्हा त्या सोसायटीत आला. सगळ्यांची
नजर चुकवून त्याने ती सायकल हळूच बाहेर काढली, त्याचे दोन्ही हॅंडल धरून तो हळू हळू
सोसायटीच्या बाहेर पडू लागला. तो ती सायकल नेण्यात इतका तल्लीन झाला होता की तो
जराही इकडे तिकडेही बघत नव्हता. अगदी आपलीच नेहमीची सायकल असल्यागत सराईतपणे तो
गेटच्या बाहेर पडायला जाणार, इतक्यात,
‘ए मुला, सायकल घेऊन कुठं चाललास? ठेव ती सायकल जाग्यावर. सायकल चोरतोस काय?’ अशी
बाजूच्याच खिडकीतून हाक आली.
तो दचकला, कावराबावरा झाला. थोडा घाबरला. खिडकीतली बाई फार जोरात ओरडत नव्हती.
किंवा फार रागाने बोलत नव्हती. पण तरीही त्याला काय बोलावं ते सुचेना.
खिडकीतली ती गोरीपान
बाई, ती त्या मुलासारखीच दिसत होती चेहऱ्याने. म्हणजे त्या मुलाची आईच असणार ती.
ती पुन्हा म्हणाली, ‘ठेव ती सायकल तिथे. सायकल चोरतोस का? सांगू का तुझ्या मालकाला
येऊन?’
तेव्हा मात्र तो घाबरला.
सायकल तिथेच भींतीला लावली आणि तो गेटबाहेर पळत सुटला.
-
-
-
शिवा पळून गेला.
पण इकडे खिडकीतल्या
बाईचा जीव कासावीस झाला. अगदी योगायोगाने ती खिडकीत यायला आणि त्याचवेळी शिवाच्या
हातात आपल्या मुलाची सायकल दिसायला एकच गाठ पडली होती. क्षणभर तर तिला त्या मुलाला काय बोलावं तेच
कळलं नाही. त्या मुलाला तिने जवळच असलेल्या चहाच्या टपरीवर अनेकदा पाहिलं होतं.
कारण त्या टपरीच्याच बाजूला त्यांचा नेहमीचा किराणावाला होता. असं कधी कुठल्या चोराला
हटकायचं कारण पडलं नव्हतं, जो आपल्या डोळ्यासमोर चोरी करून जाईल. त्यामुळे तीही
गोंधळली. पण लगेच तिने हाक मारली,
‘ए मुला, सायकल चोरतोस काय? ठेव ती जाग्यावर.’
तो मुलगा पळून गेला. पण नंतर तिच्या मनात कालवाकालव झाली. जाऊ द्यायला हवं होतं का
आपण त्याला सायकल घेऊन. तशीही ती दोनेक वर्ष जुनीच तर झाली होती. एवढुसं पोर, इतकं
धाडस करून सायकल नेतंय म्हणजे त्याचा किती जीव अडकला असेल त्या सायकलीत? आणि आपण
नेमकं त्याचवेळेला खिडकीत नसतो आलो, तर गेलीच असती ना सायकल चोरीला. मग आपण थोडंसं हळहळलो असतो फारतर. अजून काय मोठं होणार होतं?
पण त्याने ती सायकल नेऊन कुठं ठेवली
असती? त्याला त्याच्या चहाच्या टपरीवाल्या मालकाने हटकलं नसतं? ही सायकल कुठून
आणली म्हणून? कुठे लपवून ठेवू शकणार होता तो ती सायकल? आणि कुठे, कशी, कधी चालवू
शकणार होता?
अनेक वर्ष झाली. पण अजूनही बाईंना ती सायकल त्याला घेऊन जाऊ दिली नाही याचा
पश्चात्ताप होतोय. पण त्या आपल्याच मनाला समजावतात, की अशा चोराला इतर कुणी पाहिलं असतं तर धरून चोपलं असतं, हंगामा केला असता, शिवीगाळ केली असती. आपण निदान त्याला तसं काही केलं नाही.
आणि शिवा.... तो कुठे
आणि कसा असेल आता देवच जाणे....
- अलका गांधी-असेरकर
Jul 2, 2021
चिमण्या
सैपाकघराच्या खिडकीत चिमण्यांसाठी फिडर लावलं. पण फिडर लावलं की लगेच चिमण्या येत नसतात. कधी कधी तर दोन दोन महिने येत नाहीत. त्या अदमास घेतात. घाबरतात. पण धीर ठेवून वाट पाहात राहिलो की एक दिवस दबकत दबकत हळूच एखादी चिमणी येते. मग दुसरी येते.
मग बरेच दिवस या दोघीच येतात. यांना रोज बिनधास्त दाणे टिपताना पाहून मग बरेच दिवसांनी तिसरी येते. पण या दोघी तिला येऊ देत नाहीत. एकच कल्ला करतात आणि तिला हाकलून लावतात. त्यांचंही बरोबरच असतं. पहिली रिस्क त्यांनी घेतलेली असते, हे धान्याचं कोठार शोधून तिथे येण्याची. बसण्याची आणि जीवाला घाबरत घाबरत दाणे खाऊन बघण्याची. आता या मेल्या आयत्यावर रायतं करायला येणार का? हॅट आम्ही नाही येऊ देणार..
पण हळू हळू बाकीच्याही येतातच. भांडणं चालूच राहतात. आणि संधी मिळेल तसं एकमेकींना हुसकावत दाणे टिपणंही. अखंड चिवचिवाट...
सैपाकघरातील ओट्याच्या अगदी समोर दोन फुटावर तो फिडर असल्याने सुरुवातीला माझी चाहूल ओट्यापाशी लागली की त्या भूर्रकन उडून जायच्या. जोपर्यंत आपण तिथून दूर होत नाही तोपर्यंत परत येत नाहीत. नंतर मात्र हळू हळू त्या आपल्या उपस्थितीला सरावतात. इथं धोका नाही याची त्यांना हळू हळू खात्री वाटू लागते.
पण अजून एक वेगळीच गंमत आहे.
मी जर खाली मान घालून माझं काम करत असेन ओट्यापाशी तरी त्या बिनधास्त चरत राहतात. येतात जातात भांडतात. पण मी त्यांच्याकडे नजर उचलून पाहिलं रे पाहिलं की लगेच भूर्रकन उडून जातात. मला फार आश्चर्य वाटायचं. हा काय प्रकार. अशा येतात. पण मी पाहिलं तर निघून जातात. फोटो देखील लपून छपून काढावे लागतात. जोपर्यंत मी नजर वर उचलून पाहत नाही तोपर्यंत त्या बिनधास्त असतात. मग मला असं लक्षात आलं की कदाचित माणसांचे डोळे पाहिल्यावर त्या घाबरत असतील. माणसाचे आणि त्यातही माझे ते भले मोठे काळे काळे डोळे पाहिले की त्या बिचकत असतील. कदाचित माणसांच्या डोळ्यांकडे त्यांचे लक्ष लवकर वेधले जात असेल.
पण मला खात्री आहे, हळू हळू त्या माझ्या डोळ्यांनाही सरावतील. आणि मी त्यांच्याकडे एकटक बघत राहिले, तरी त्या बिनधास्त चरत बसतील. कारण,
माझ्या माहेरी कोकणातल्या त्या मोठ्या घराच्या ओटीवर आजोबांनी एक मोठा, जवळपास दोन फुटाचा पत्र्याचा झोपाळा टांगला होता. चिमण्यांसाठी धान्य टाकायला म्हणून. चिमण्यांसाठीच स्वस्तातल्या भाताची एक दोन पोती घेऊन ठेवली जायची. त्यातले धान्य मूठमूठभर जाता येता घरातले कुणी ना कुणी टाकत राहायचे त्या झोपाळ्यात. आणि असंख्य चिमण्या यायच्या. आमची ओटी चिवचिवाटाने गजबजलेलीच असायची. जरा कुणी जवळ आले, ओटीपुढच्या अंगणातून कुणी जात असले, तर उडाल्यासारखं करून दुसऱ्याच सेकंदाला पुन्हा येऊन बसायच्या. तो झोपाळा चिमण्यांनी फुलून गेलेला असायचा. फक्त चार महिने. पावसाळ्यातले. पावसाळा संपला की त्या कुठे गायब व्हायच्या कोण जाणे. धान्य टाकलं तरी यायच्या नाही. आजोबा म्हणायचे आता त्यांना शेतात पडलेले दाणे मिळतात खायला. पावसात मिळत नाहीत. खरं खोटं कोण जाणे.
दिवसभर चिमण्यांना भात, फक्त सकाळी एकदा छपरावर कबूतरांना ज्वारी, आणि समोरच्या रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या पथिकांसाठी ओटीवर, किंवा दुकानात भरून ठेवलेला पाण्याचा माठ ह्या आजोबांच्या पुण्याच्या कल्पना होत्या तेव्हा...!
Jan 15, 2021
सरस्वती -
समजा, उद्या माझं कवितांचं पुस्तक लैच गाजलं 😜 आणि त्याला वेगवेगळ्या पुरस्कारांसोबत एखाद्या मुस्लिम गटाकडून देखील पुरस्कार मिळाला 😝आणि त्या पुरस्कारावर उर्दूत (किंवा अरेबीत) 'अल्लाह' असं लिहिलेलं असेल, तर मी पुरस्कार स्वीकारावा की नाही?
काळजीने झोप येत नाहीए... काय निर्णय घ्यावा मी अशावेळी?
-
-
-
सध्या सरस्वतीवर गंडांतर आलंय.
या देशात सरस्वती विद्येची, लक्ष्मी धनाची आणि दुर्गा शक्तीची प्रतिक मानली गेली, पुजली गेली, तरी मध्यंतरीच्या शेकडो वर्षांच्या काळात स्त्रियांनाच (सर्वच वर्णजातीच्या) शिक्षण नाकारलं गेलं, आर्थिक स्वावलंबन नाकारलं गेलं, आणि अबला म्हणून हिणवलं गेलं...
मान्य...
पण त्यात या तिघींचा काय दोष... त्या स्वतःच बिचाऱ्या कैद केल्या गेल्या अंधाऱ्या गाभाऱ्यात.. दागदागिन्यांनी मढवून गोठवल्या गेल्या.
त्यांनी तर सांगितलं नव्हतं की माझी विद्या, माझी शक्ती, माझी संपत्ती कुणाला देऊ नका म्हणून?
कुणाला सोडा... त्यांच्याचकडून या तीन गोष्टी हिरावल्या गेल्या.
त्या बिचाऱ्यांचा राग करून काय उपयोग?
अडाणी, निरक्षर बहिणाबाईही म्हणतात - माझी माय सरसोती, मला शिकवते बोली | लेक बहिणाच्या मनी किती गुपितं पेरली||
छोडो कल की बातें...
सरस्वतीच्या मांडीवर छान वीणा आहे... हातात पुस्तक आहे.. बाजूला मोर आहे, हंस आहे... लोभस आहे हे सगळं...
प्रतिकं चांगली असतात, माणसं त्यांचा गैरफायदा घेतात. गैरवापर करतात.
असो...
हिंदूंची सर्वच प्रतिकं नाकारायची, तर हिंदूंच्या कुठल्याच कार्यक्रमात सामील होता येणार नाही, आप्तस्वकीयांच्याही नाही.
उद्या तुमच्या घरात हिंदू मुलगी सून म्हणून आली, तर तुम्ही तिच्या श्रद्धांना नाकारणार? तिला नाकारायची सक्ती करणार?
होय कदाचित. भाऊ कदमने गणपती बसवल्याचा किस्सा आठवला. त्याची बायको जर हिंदू असेल, तर तिने आपल्या प्रथा परंपरा सणवार सोडून देण्याचा आग्रह तुम्ही कराल?
मग उद्या तुमची मुलगी हिंदू घरात गेली, तर तिलाही तिच्या प्रथा बाजूला ठेवायला सांगितले जाईल...
शेवटी तुम्हीही पितृसत्ताक धर्म, विचार यांची बाजू घेणार. अमलात आणणार...
असो - No issues.... थोडा विचार करता मनात आलं, की कदाचित रामाच्या नावाने मला पुरस्कार दिला, किंवा अगदी पुरस्काराच्या कागदावर रामाचं चित्र असेल, तर मीही नाकारेनच कदाचित....पिढ्यानपिढ्या सोसलेले, भोगलेले दुःख बंड करून उठतेच असे... पण पुन्हा मी विचार करेन, की रामावरच टिका केलेल्या माझ्या कविता जर रामभक्त वाचून मला पुरस्कार द्यायला तयार झाले असतील, तर काय हरकत आहे? माझ्याच विचारांचा तो विजय आहे.
पण..
या निमित्ताने माझी एक जुनी कविता -
आदिशक्ती -
त्याने दुर्गेची अमाप, अफाट शक्ती पाहिली
आणि तो घाबरला
त्याने सरस्वतीची अमाप, अचाट बुद्धी पाहिली
आणि तो हतबुद्ध झाला
त्याने लक्ष्मीची अमाप, अमर्याद सत्ता पाहिली
आणि तो हादरलाच..
मग त्याने सुरू केली स्तुती
त्या तिघींच्या
तनुतील सौंदर्याची, उरातील वात्सल्याची, अन्
करातील कार्यक्षमतेची..
अन् बहाल करून टाकलं त्यांना देवत्व...
तेव्हापासून
त्या विसरल्या आपली शक्ती, बुद्धी, संपत्ती
आणि पडल्या प्रेमात
आपल्याच तनुतील सौंदर्याच्या,
उरातल्या वात्सल्याच्या अन् करातल्या कार्यकुशलतेच्या
घडलं हे त्याच्या मनाप्रमाणेच
उचलला याचा अचुक फायदा त्याने
आणि पटकावला ताबा त्यांच्या
शक्ती, बुद्धी, संपत्तीचा
नंतर तर हळू हळू
त्यांचा या गोष्टींवरील
हक्कही नाकारण्याइतपत मजल गेली त्याची
आणि त्या...
त्या आहेत अजूनही खुश
आपल्याला बहाल केलेल्या देवत्वावर
आणि वरून चिकटवण्यात आलेल्या गुणांवर..........
-अलका गांधी-असेरकर
·
Comments
Jan 7, 2021
घर आणि गृहिणी -
काल मी फेसबूकवर 'घर' ही माझी कविता पोस्ट केली. माझ्या 'कन्या-रास' या आगामी कवितासंग्रहातील ही कविता आहे. याच संग्रहात एक 'गृहीणी' या नावाची कविता देखील आहे.
मला स्वतःला गृहीणी हे पद आणि ही संकल्पना मान्य आहे. या पदाचं कार्यक्षेत्र फार मोठं आहे आणि या पदाचं केवळ कौटुंबिकच नव्हे, तर सामाजिक आणि राष्ट्रिय महत्त्व देखील मोठंच आहे.
"स्त्रियांचे कष्ट मोजले जातील, तेव्हा मानवी समाजाची सर्वात मोठी चोरी पकडली जाईल" असं कुणाचं तरी वाक्य आहे.
स्त्रिया जे घराकरता, कुटुंबाकरता राबतात त्या कष्टाचे पैशात मोल होत नाही. त्या घरात खाऊनपिऊन राबतात. कुटुंबाचा कर्ता श्रीमंत असेल, तर समाज त्या गृहीणीलाही श्रीमंत म्हणतो आणि तिला चांगलंचुंगलं खायला ल्यायला मिळू शकतं. याउलट जर कर्ता गरीब असेल, मध्यमवर्गीय असेल तर त्या प्रमाणातच तिला खायला ल्यायला राहायला मिळू शकतं. इथं तिच्या हातात चॉइस नाही. जोपर्यंत ती स्वतः कमवत नाही तोपर्यंत तिला स्वतःची गरीबी, श्रीमंती नाही. घरातील कर्त्या माणसाची जी आर्थिक स्थिती, तीच तिचीही.
अर्थात सामाजिक रचना आणि व्यवस्था अशा आहेत की यात कुणालाही काही वावगं वाटत नाही. ना त्या स्त्रीला, ना कुटुंबियांना, ना समाजाला. नवरा राखेल तसंच गृहीणीने राहावं. कमी पगार असेल, तर काटकसर करावी नि अधिक असेल, तर मिरवावं हे अगदी सर्वमान्य आहे, नव्हे तशीच सामाजिक अपेक्षा आहे.
इथपर्यंत ठिकही आहे. मात्र यात स्त्री ही पूर्णपणे परावलंबी आहे याची जाणीव फार कमी वेळा आणि कमी लोकांना होते. अगदी सगळा पगार जरी घरातला कर्ता पुरुष त्या स्त्रीच्या हातात आणून देत असेल, तिला खर्चाचे, निर्णयाचे स्वातंत्र्य देत असेल, तरीही .. तरीही जेव्हा वेळ येते तेव्हा तिचा त्या पैशांवर काडीचाही हक्क नसतो. ती असते केवळ खजिनदार. एक जबाबदार खजिनदार.!
जेव्हा कुठलीही इमर्जन्सी येते, त्या घरातल्या इतर व्यक्तींशी, विशेषतः घरातल्या कर्त्या व्यक्तीशी उर्फ नवऱ्याशी तिचं पटेनासं होतं, वादावादी होते तेव्हा तिला या सगळ्यावर पाणी सोडावं लागणार असतं. ते खजिनदाराचं पदही सोडावं लागणार असतं. किंबहुना प्रत्यक्ष घर सोडायचं नसेल, किंवा घटस्फोटही घ्यायचा नसेल, केवळ भांडणाच्या वेळी रागात बोलायचं असेल, की मला नाही राहायचं तुझ्याबरोबर... तेव्हा खरंतर त्या स्त्रीलाही माहीत असतं की नाही राहायचं हे खरं, पण एक रात्रही जायचं असेल रागवून तर जायचं कुठं? माहेरी? त्या घरावर तिचा कितपत हक्क असतो हे साऱ्यानाच ठाऊक आहे. माहेरी जायचं ते केवळ पाहुणी म्हणून असा समज आजही पक्का आहे. तेव्हा तिथं जाऊन राहाणं हे म्हणजे ना घर का ना घाट का अशी अवस्था असते हे प्रत्येक स्त्री जाणून असते. त्यात माहेरी फक्त आईबाबा असतील तर जरा तरी राहणं सोपं असतं. पण तिथे भावाचे कुटुंब असेल, तर पुन्हा तेही कठीणच. अगदी पाहुणी म्हणूनही तिथं राहणं किती अवघडलेपणाचं असतं ते एक स्त्रीच सांगू शकते.
राहिला कायदेशीर हक्काचा प्रश्न. माहेर, सासर किंवा नवऱ्याचे घर यात कायदेशीर हक्क जरूर आहेत पण ते मिळवायचे म्हणजे संघर्ष आला. ते मिळवायचे म्हणजे शेवटचं तोडण्याचं टोक आलं. यात सहज हिस्सा असा कुठं आहे?
बऱ्यापैकी आर्थिक परिस्थिती असेल, तर त्यातल्या त्यात घरावर तिचंही नाव असतं. किंवा इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी तिच्या नावावरही काही मालमत्ता असते. पण त्या मालमत्तेची माहिती, कागदपत्रे इत्यादीचीही किती गृहीणींना माहिती असते आणि त्याचा उपभोग त्या नेमका किती घेतात हा प्रश्नच आहे.
अनेकदा श्रीमंत घर पाहून मुलींची लग्नं केली जातात. पण ते सासरचं घर तिचं तर सोडाच, तिच्या नवऱ्याच्या नावावरही नसतं. ते असतं सासऱ्याच्या, चुलत सासऱ्याच्या, किंवा आजेसासऱ्यांच्या नावावर. आणि अशी कुटुंबे भारतात आजही बहुसंख्येने आहेत. तिथे तर ती अगदीच परावलंबी जीव असते.
काल पोस्ट केलेली कविता होती.. 'घर'
या कवितेत प्रामुख्याने रोख होता तो अशा स्त्रियांवर. स्त्रियांना पुरुषांपेक्षा घर अधिक प्रिय असतं. घराची स्वप्नं पुरुषापेक्षा स्त्रीला अधिक मोहवत असतात. घर हे केवळ तिचं स्वप्नं नसतं. तिची सुरक्षितता असते. तिचं स्थैर्य असतं. असं असूनही स्त्रीला स्वतःचं, स्वतःच्या पैशांचं, स्वतःच्या नावावरचं घर असावं असं का वाटत नसेल? वयात आलेल्या प्रत्येक लग्नाळू मुलाच्या घराचा विचार केला जातो. एकतर त्याला त्याचे पालक घर घेण्यास मदत करतात, शक्य असेल, तर त्याला त्याच्या नावाचं स्वतंत्र घर करून देतात. नसेल, तर त्याला त्याच्या कमाईतून, कर्ज काढूनही एक घर घेण्यास अतीआग्रह केला जातो. आणि त्याचं आयुष्य सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र मुलीच्या बाबतीत आजही हे होत नाही. आपल्या मुलीचं भवितव्य सुरक्षित असावं, तिच्या नावाचं स्वतंत्र घर असावं, तिने ते आपल्या कमाईतून घेण्याचा प्रयत्न करावा असं क्वचितच कुणा पालकांना वाटताना दिसलंय.
तिच्या लग्नाचा विचार तिच्या लहानपणापासून केला जातो. त्यासाठी पैसे बाजूला काढले जातात. अगदी लाखो रुपये. लग्नाच्या एका दिवसात उडवले जातात. गरीबातला गरीब माणूस पण जास्तीतजास्त पैसे मुलींच्या लग्नावर खर्च करायला तयार असतात. ऋण काढूनही. पण त्याऐवजी त्याच पैशातून तिचं पूर्ण भवितव्य सुरक्षित होईल अशा विचाराने तिच्या नावाने छोटंसंही घर घेतलं जात नाही. अपवाद असतील. आणि यात कुणालाही काही खटकत नाही याचं वाईट अधिक वाटतं.
माझ्या या संग्रहात तीनचार कविता या विषयावरच्या आहेत. दुसरी 'गृहीणी' या नावाची जी कविता आहे त्याचा अनुभव मी स्वतः अनेकदा घेतला. गृहीणीला तिच्या नावावर तिच्या नवऱ्याने, किंवा कर्त्या पुरुषाने घर घेऊन दिलं तरच ते होऊ शकतं. अन्यथा तिला तिच्या नावावर घरासाठी कर्ज मिळत नाही. तिला कोणत्याच कारणासाठी कर्ज मिळत नाही. इथंच स्त्रीचे गृहीणी या नात्याने असलेले पद पोकळ ठरते. तिच्या कष्टाला मोल नाही हे तेव्हा कळते. ती परावलंबी आहे हे तेव्हा कळते.
परवाचीच गोष्ट आहे. एके ठिकाणी एक छोटंसं घर बुक करण्याचा प्रयत्न चालू आहे. अगदी विचार केला तर बहुसंख्य कुटुंबांमध्ये हक्काचं घर विकत घेण्यासाठी धडपड त्या कुटुंबातील स्त्रियाच अधिक करतात. त्यासाठी काटकसर करतात, प्लॅनिंग करतात. घरातल्या पुरुषाचा पिच्छा पुरवतात. पण आर्थिक नाड्या तिच्या हातात नसतात. कर्ज इत्यादी घरातील कमवत्या व्यक्तीच्या नावावरच मिळणार असतं.
मी देखील हक्काचं घर व्हावं म्हणून नवऱ्यापेक्षा अधिक प्रयत्न केले नेहमी. म्हणून हे स्थैर्य कुटुंबाला मिळाले. पैसे जरी नवऱ्याने दिले तरी सारे आयोजन माझेच अधिक होते. धडपड माझीच राहीली. त्यासाठी त्याचं मन वळवणं हे माझंच (अतिशय मानसिक संघर्ष) होतं. आणि घर तर त्याच्याच नावावर झालं. पण मी त्याला नेहमी बोलते, की घर हे केवळ पैशानी होत नाही. हे घर उभं करण्यात माझा वाटा अधिक आहे. पण हे बोलणं व्यावहारिक दृष्ट्या निरर्थक आहे. हे मलाही माहीत आहे.
त्याप्रमाणेच आताही झालं. एके ठिकाणी सेकंड होम म्हणून घर घेण्याच्या इच्छेने प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी मुलाला कर्ज घ्यायला सांगितले आहे. पण त्यात पैसे माझा नवराही टाकणार आहे. साहजिकच आता हे घर माझ्या नावावर असावं असं मला वाटतंय. त्यासाठी फार पूर्वी नवऱ्याने माझ्या नावावर (तेही नाईलाजाने.. कारण काही कारणाने कागदोपत्री त्याला तो प्लॉट त्याच्या नावावर घेणं शक्य नव्हतं म्हणून.) एक छोटा प्लॉट घेऊन ठेवला होता. तो विकून त्याचे पैसेही मी या फ्लॅटमध्ये गुंतवायचे ठरवले. पण आता गोची अशी झाली आहे, की जी व्यक्ती आयुष्यात पहिल्यांदा घर घेईल तिला पंतप्रधान योजनेतून दोन लाख साठ हजार रुपये मदत मिळते. आता योजनेत अशी तरतूद आहे की त्यासाठी ते घर त्या व्यक्तीच्या नावावर असावं किंवा त्याच्याबरोबर त्याच्या बायकोचं चालेल. मात्र आईचं चालणार नाही. कारण आईच्या नवऱ्याचं जे घर आहे तेच तिचंही पहिलं घर आहे. त्यावर तिचं नाव असो की नसो. जर माझं नाव त्या घरावर लावलं तर माझ्या मुलाला ते अडीच लाख रुपये मदत मिळणार नाहीत. अडीच लाखाची रक्कम आमच्या सारख्या मध्यमवर्गीय, ईमानदारीने पगार एके पगारावर आयुष्य काढलेल्या, लाचलुचपतीने पैसा न कमवलेल्या कुटुंबाला मोठीच वाटत आहे. त्यावर पाणी सोडायला मन होत नाही. मात्र तसे केले तर घर हे फक्त मुलाच्या नावाने होणार. माझ्या नाही.
म्हणजे मला सरकार कर्जही देणार नाही. मदतही देणार नाही. मुल्य कुणाला आहे? तर रोख कमावणाऱ्या व्यक्तीला फक्त. गृहीणी आयुष्यभर झिजत असेल, समाज उभारण्यात, पर्यायाने देश उभारणीसाठी स्थिर कुटुंब देण्यात ती कितीही मोलाचे काम करत असेल, तरी तिची आर्थिक किंमत शून्य आहे. हीच खंत माझ्या या 'गृहीणी' या कवितेत उतरलेली आहे.
साहजिकच माझ्या पिढीतल्या स्त्रियांनी केली ती चूक पुढील पिढीतल्या मुलींनी करू नये. स्वतःचं हक्काचं घर करावं. नोकरी व्यवसाय करावा. फक्त नवऱ्याच्या घराची स्वप्नं आपण पाहू नये. नवरा लाखांनी कमवत असेल, तरी तुम्ही फक्त गृहीणी म्हणून न राहता चार पैसे हक्काचे मिळवायचा प्रयत्न करावा. आळशी कोकीळेप्रमाणे नवऱ्याच्या घरात अंडी घालून नवऱ्याच्या पैशावर मजा करण्याचे स्वप्नं पाहू नये. कारण ही मजा अधांतरी आहे. परावलंबी आहे. यात स्वाभिमानही नाही. कारण नवरा आणि सासर कितीही श्रीमंत आणि चांगलं असेल, तरी जोवर तुम्ही तिथं त्यांच्या मर्जीने नांदताय तोवरच ते तुमचं असणार आहे. ज्या क्षणी संघर्ष होईल त्या क्षणी तुम्ही कफल्लकच असणार आहात
गृहीणी -
अलका गांधी-असेरकर
Subscribe to:
Comments (Atom)
किसी पिछले जनम की बात...
मुगले आजम हा सिनेमा पन्नास वर्षानंतर रंगीत झाला, त्यालाही आता जवळपास 20 एक वर्ष लोटली. 🤦काळ किती भराभर चाललाय... तेव्हा टीव्हीवर दिलीप क...
-
शरीफा नेहमीच जुम्म्याची वाट बघत असायची मनोमन. ज्याप्रमाणे नोकरदार लोक रविवारची वाट पाहात असतात तशीच. जुम्मेरातपासून म्हणजे गुरूवारपासूनच ति...
-
कोण अल्पसंख्य, कोण बहुसंख्य- माझं गाव हे कोकणातलं एक मुस्लिमबहुल गाव. एकेकाळी तिथं संमिश्र वस्ती होती. गवळ आळी, कुंभारवाडा, महारवाडा, जंगमआळ...
-
सकाळचं ऊन माझ्या घरात कोवळ्या बाळपावलांनी रांगत येतं..किलकिल्या उघड्या फटीतून डोकावतं. अगदी तस्संच, जसं एखादं नवीन आलेल्या शेजा-याचं तान्हं ...

