ज्या गावात माझा जन्म झाला, आणि जिथे मी पहिली पंधरा-अठरा वर्षे वाढले, त्या माझ्या गावाचे नाव 'साई' आहे. कोकणातील रायगड जिल्ह्यातील हे अगदी छोटेसे गांव. या गावाचे नाव 'साई' का आणि कसे पडले असेल असा प्रश्नही कोणाला पडला नाही, आणि उत्तरही कुणाला माहीत नाही. साईबाबामधील साईचा आणि याचा दुरान्वयानेही संबंध आढळत नाही. ना तिथे त्यांचे कोणते मंदीर आहे, ना त्यांची कोणती दंतकथा त्या परिसरात ऐकायला मिळते.
गुजरातमधील तशाच एका खेड्यातून पंचवीस एक कुटुंबे महाराष्ट्रात व्यवसाय शोधत
साधारण सव्वाशे वर्षांपूर्वी स्थलांतरित झाली, त्यातली एक दोन नाही, तर चांगली
आठदहा कुटुंबे त्या इवल्याशा साई गावात येऊन राहिली. आणि एक दोन नव्हे, तर चांगली
पाच-सहा पिढ्या नांदली.
नांदली हाच शब्द
बरोबर आहे. ही कुटुंबे नुसती तिथे राहिली नाही, तर तिथल्या मातीशी एकरुप झाली.
तिथल्या भाषेशी, आहारविहाराशी तादात्म्य पावली. त्या मातीवर प्रेम करू लागली.
त्यांनी तिथे ऐसपैस कोकणी पद्धतीची, मागे पुढे अंगण, झाडे, विहिरी असलेली घरे
बांधली.
काय म्हणून तिथे इतक्या आडनीड ठिकाणी, अगदी खेड्यावर ती आली देव जाणे. सगळ्यांचा
एकजात किराणा मालाचा व्यवसाय. तो तिथे भरभरून चालावा अशी काही परिस्थिती नव्हती.
पोटापुरतं मिळेल एवढंच होतं. तरी हे लोक तिथे वर्षानुवर्ष राहिले. गुजराती
माध्यमाच्या शाळा असण्याचा प्रश्नच नव्हता तिथं. पण इंग्रजीचाही जमाना नव्हता.
त्यामुळे सगळ्या पिढ्या मराठी शाळेत शिकल्या. त्यात पुन्हा गावात मुस्लिम
बहुसंख्य. हिंदू कमी. कांदा लसूणही वर्ज्य असणारी ही कुटुंबे पूर्ण मांसाहारी,
मासेखाऊ गावात पिढ्यानपिढ्या राहिली.
मात्र गुजरातशी धागा जोडून राहिली. मुलामुलींची लग्ने करण्यासाठी गुजरातच गाठायचं.
या कोकणात आणि विशेषतः रायगड जिल्ह्यात या कुटुंबांच्या आधीही मोठ्या प्रमाणात
स्थलांतरित झालेली गुजराती कुटुंबे होती. ती दोन टप्प्यांत तिथे आली. आम्ही
तिसऱ्या टप्प्यात. आमची अजून गुजरातशी नाळ तुटलेली नव्हती. मात्र या पहिल्या दोन
टप्प्यांत आलेली कुटुंबे गुजरातपासून पूर्णपणे तुटलेली होती. त्यांचे तिथे
जाणे-येणे तर नव्हतेच. पण माझ्या माहितीप्रमाणे त्यांना गुजरातमधील आपली गावे पण
माहीत नव्हती. आपण नेमके कुठून आलो हे माहीत नव्हते.
त्यातील पहिल्या
टप्प्यात आलेला गट हा इथं पूर्णपणे मराठी झाला होता. त्यांना गुजराती जराही बोलता
येत नव्हते. फक्त मराठी बोलत. मात्र मागच्या पिढीपर्यंत स्त्रिया गुजराती पद्धतीने
साडी नेसत. लग्न कार्याचे बरेच रित रिवाज गुजराती पद्धतीचे. आम्ही शिवाजी
महाराजांच्या काळात आलो असे ते म्हणतात. तर दुसऱ्या टप्प्यात आलेला गट अजून तोडकं
मोडकं गुजराती बोलत होता. मात्र सगळ्याच टप्प्यांतले सारेच लोक बहुतांश किराणा
मालाच्या आणि इतर काही जोडधंद्यात होते. आणि सगळेच एकाच जातीतले, वाणिया समाजातले
होते. विशेष म्हणजे हे दोन्ही टप्पे इतक्या मोठ्या संख्येत इथे आले की त्यांना
आपल्या मुलाबाळांची लग्ने जमवण्यासाठीही गुजरातकडे जावे लागले नाही. इथल्या इथे
लग्ने जुळतील इतकी त्यांची संख्या पुरेशी होती. मात्र आमचा तिसरा टप्पा मर्यादित
संख्येत होता आणि तो दोन-तीन कुटुंबातून शाखा फुटत गेलेला असा असल्याने लग्नांसाठी
मुंबई-गुजरातवर अवलंबून होता.
तरी या तिन
टप्प्यांत आपसात लग्ने फारशी होत नव्हती. जात एक असली, तरी या तिघांच्या पोटशाखा
वेगळ्या होत्या म्हणून केवळ!
तर या छोट्याशा साई
गावाची नोंद अगदी गुजरातमधील आमच्या समाजात ठळकपणे घेतली गेली आणि जाते. कुठले
ऋणानुबंध कुठे जोडले जातात. आमची ही आठ दहा कुटुंबे आणि त्यांची मुलेबाळे ही
समाजात साईवाली कुटुंबे म्हणून गावावरून ओळखली जातात. अगदी सुरुवातीला आम्हाला
दख्खणी म्हटले जायचे. आमचा उपहासही केला जायचा. याला प्रमुख कारण एक तर इथे राहून
आम्ही काही म्हणावा तसा पैसा कमावला नाही, त्यामुळे पैशामुळे येणारी पतही
आमच्याजवळ नव्हती, जी प्रामुख्याने गुजराती वाणी समाजात महत्त्वाची असते. शिवाय आम्ही
अर्धे मराठळलेले होतो. भाषेत, खाण्यापिण्यात, वर्तनात सगळीकडे मराठीपण ठळकपणे
डोकावत होतं. त्यामुळे दख्खणी मुलींवर गुजराती संस्कार नसतात. म्हणून पसंतीसाठी
त्या अग्रक्रमावर नसायच्या. तरीही मुलींची लग्ने सहज व्हायची. मात्र मुलांना कुणी
इतक्या लांब दख्खनमध्ये मुली द्यायला तयार नसायचे.
हळू हळू पुढच्या पिढीतली मुले शिक्षण घेऊन बाहेर पडली. मुंबईकडे सरकली. साई या
गावातला गुजराती टक्का शून्य झाला. हिंदू टक्काही जवळपास संपत आला. कारण गाव हे
हळू हळू मुस्लिमबहुल झाले.
शिक्षणाचेही वांधे होते. कोकणात तेव्हा महाविद्यालये संपूर्ण जिल्ह्यात मिळून दोन
पाच असायची फारतर. साईला शाळा फक्त सातवीपर्यंत. पुढे पंचाईत. कुणी आपल्या मुलांना
गुजरातच्या नातेवाईकांकडे पुढील शिक्षणासाठी पाठवत. कुणी तालुक्याला असणाऱ्या इतर
गुजराती समाजात. गुजरातला गेलेल्या मुलांचे साहजिकच अर्धे शिक्षण मराठी तर अर्धे
गुजराती माध्यमांत झाले. थोडक्यात फरपटच. मी तालुक्याला राहणाऱ्या माझ्या मामाकडे
राहून आठवी ते दहावी शिकले. माझा भाऊ एका गुजराती कुटुंबात पेईंग गेस्ट राहून चार
वर्षे शिकला. एक चुलत भाऊ एका मराठी ब्राम्हण कुटुंबात चार वर्षे राहून शिकला.
बऱ्याच मुली तेव्हा तशा तालुक्यात असलेल्या आपल्या काकामामांकडे राहून शिकत
होत्या. आपल्या भाचरापुतण्यांना सांभाळणे हे त्या काळी कर्तव्यच समजले जात असे. आज
एक पाहुणा कुणाच्या घरात चार दिवस सहन होत नाही लोकांना. तेव्हा अशी सख्खी-चुलत
भाचरे पुतणे इतकेच नव्हे, तर ओळखीतले लोकही हक्काने येऊन राहत. महीने-वर्षे...
कितीही..
काळ बदलला होता. शिक्षण महत्त्वाचे होते.
खेडं सोडणे गरजेचे होते.
काहींनी साईहून जवळच्या तालुक्याच्या गावी स्थलांतर केले. तिथे आता दहावीच्या पुढे
शाळा कॉलेज होऊ लागले होते. तालुक्याच्या गावी देखील आम्ही साईवाले गुजराती
म्हणूनच ओळखले गेलो. तिथे स्थलांतरित झालेले बहुतेक गुजराती आजुबाजूच्या
खेड्यावरूनच आलेले होते आमच्याप्रमाणेच. माझे मामा पळसगाववाले, दुसरे एक
लोणशीवाले, आम्ही साईवाले गुजराती म्हणून लोक ओळखू लागले. अजून तसेच ओळखतात. मला
तिथे गेल्यावर साईवाल्या रसिकशेटची मुलगी म्हणून ओळख दिली की लोक लगेच ओळखतात.
हे गाव माझ्या नाळेत रुजलेले आहे. खरेतर पुढची तारूण्यातली वर्षे जिथे घालवली ते
तालुक्याचे गाव मला अजूनही परकेच वाटते. मात्र साई अजून माझ्या रक्तातून वाहत
असते. मी तर नंतर पूर्ण मराठी झाले. पण जी सख्खी-चुलत भावंडे साईहून सरकून मुंबई
अहमदाबादकडे जाऊन पुढे पूर्ण गुजराती झाली, त्यांनाही साई अजून हाकारत असते. एवढेच
नाही, तर जी आतेमामे भावंडे लहानपणी गुजरातहून सुट्ट्यांमध्ये आजोळी म्हणून यायची
त्यांनाही साईची ओढ आहे. आठवणी आहेत. भेटी झाल्या नि साईच्या आठवणी निघाल्या
नाहीत, असे कध्धीच होत नाही. एकदा जाऊ या म्हणून ठरते. जाणे मात्र फक्त माझे होते
आताशा. मध्ये वीस वर्षांचा मोठा काळ मीही गेले नव्हते.
गाव फार सुंदर होते अशातला भाग नाही. पण भवताल खास कोकणी होता. चारी बाजूला
टेकड्या, छोटे डोंगर, लहानशी नदी, विहिरी यांनी वेढलेले. कुठेही जायचे असले तरी
एखादी टेकडी पार केल्याशिवाय जाता येत नव्हते. पहिल्या तीन पिढ्यांपर्यंत तर
वाहनेच नव्हती. बैलगाडी किंवा पायी. सामान आणायला बैलगाडी. पुरुष तर पायीच चालून
जायचे सहज पाच पंधरा मैल. अगदी लहान मुलेही चालत जात. माझा भाऊ तालुक्याहून दर
शनीवारी चालत यायचा आणि सोमवारी परत चालून जायचा. कारण पावसाळ्यात चार सहा महिने एसटी
बंद. माझ्या वेळी एसटीबसेस पावसाळ्यातही सुरू झाल्या. त्यामुळे मला कधी चालावे
लागले नाही.
आता तिथे पहिल्या दुसऱ्या टप्प्यातील गुजराती लोक देखील किराणा व्यवसायात फार उरले
नाहीत. पुढची पिढी वेगळ्या नोकरी व्यवसायांत शिरली. त्यांच्या जागी आता मारवाडी
लोक मोठ्या संख्येने आलेत. मात्र ते आमच्याप्रमाणे इथे रुजतील असे वाटत नाही. कारण
आता इंग्रजी माध्यमांच्या शाळा झाल्या. हिंदी बोलले तरी निभावून जाते आता. मराठीच
बोलण्याची गरज राहिली नाही. इथेच राहून इथल्याच लोकांना तुच्छ लेखत अलिप्त
राहण्याची कला आता पुढील गुजराती मारवाडी स्थलांतरितांनी शिकून घेतलेय.
मराठी टक्का मात्र कुठल्या व्यवसायात वाढला नाही तिथेही. कोकण्यांनाही मुंबई प्रिय
आहे. गावात पन्नास कलमे असतील हापूसची आणि ऐसपैस जमीन. पण ती नेपाळी, बिहारी
मुलांच्या हाती देऊन यांना मुंबई हवी. हळू हळू कोकण परकीयांच्या हाती जातंय
नक्की.!