Jun 6, 2020

सावित्रीची क्षमता -

सावित्रीची क्षमता -

सावित्रीची क्षमता -
सत्यवानाची सावित्री वटपौर्णिमा करत नव्हती, वड पुजत नव्हती नी उपास करत नव्हती.
ती यमाच्या मागे गेली होती, एकटी.. नि त्याच्याशी तर्कबद्ध वाद घालून त्याला परत घेऊन आली होती.. अगदी कथेप्रमाणे शब्दशः विचार केला तरी...
ही महत्त्वाची गोष्ट लोक विचारांतच घेत नाहीत..
बायकांना तर्कशुद्ध वाद घालायला शिकवा. पण ते तर समाजाला चालत नाही आता.. स्त्रियांनी वाद घातलेला. स्त्रियांनी वाद घातला तर तिला भांडकुदळ, आक्रस्ताळी अशी लेबलं लावायची. हो ला हो करणाऱ्या स्त्रियांना मेडलं द्यायची ही सामाजिक रीत आहे. त्यामुळे तिला वड पुजण्याची अनुमती असते, मात्र वाद घालण्याची नाही.
वटपौर्णिमेची पुजा करणाऱ्या स्त्रियांचे नवरे अर्ध्या रात्री हार्ट अटॅक येऊन पडले तर त्यातील किती स्त्रिया त्याला एकट्या उठून, कोणाचीही मदत न घेता हॉस्पिटलमध्ये नेऊ शकतील, दारातली गाडी चालवत किंवा इतर कोणती व्यवस्था तातडीने करून? की सावित्रीचा जप करत बसतील .. याचा सर्वे करायला हवा..
माझा नवरा लॉकडाऊनमध्ये एक महिना परक्या गावात परक्या ठिकाणी अडकून पडला होता. दिड महिन्यापूर्वीच, जेव्हा लॉकडाऊनचे नियम कडक होते तेव्हा, मी पोलिस स्टेशनला तीन चकरा मारून, चौकशा करून ऑनलाईन ईपास मिळवला आणि स्वतः गाडी चालवत एकटी जाऊन त्याला घेऊन आले. जर मी हे केलं नसतं, तर अजूनही तो तिथेच अडकून पडला असता. हे माझं कौतुक नाही. मला तर ही गोष्ट अगदीच सामान्य वाटते. पण माझ्या एका मैत्रिणीला ते फार कौतुकास्पद वाटलं. तिचं म्हणणं, की असे गट्स किती स्त्रियांमध्ये असतात...
मला स्वतःला यात काहीच कौतुक वाटत नाही. ही सामान्य बाब आहे आणि प्रत्येक मुलीला लहानपणापासून असं एकटं वावरायची, संकटं, अडचणी कोणत्याही पुरुषाच्या मदतीशिवाय अंगावर घेण्याची संधी आणि सवय मिळायला हव्यात.
मी वयाच्या सोळा- सतराव्या वर्षांपासून कोकणातून निघून मुंबई, अहमदाबाद करत एकटी गुजरातेतल्या खेड्यावर पोचायचे. काहीही मोबाईल इत्यादी साधने नसताना त्या काळात. मुख्य म्हणजे माझ्या घरचे मला तशी पाठवायचे. मुलगी एकटी कशी जाईल हा प्रश्न त्यांना पडला नव्हता. आणि लग्नानंतर बाळंतपणानंतर माहेरून माझ्या अडीच महिन्याच्या मुलालाही कोकणातून एसटीने घेऊन एकटी डोंबिवलीला आले होते. लहान मूल आहे तर माझ्या सोबतीला कुणी असावे असे ना माझ्या घरच्यांना वाटले होते, ना मला..तेवढा विश्वास त्यांचा माझ्या क्षमतेवर होता, आणि माझा माझ्यावर. (त्या प्रवासात अडचणी खूप आल्या होत्या, त्यावरही मी एकदा लिहिले होते.)
मी आज डोंबिवलीसारख्या बिग सिटीत राहते. आणि माझ्या अवतीभवती, ओळखीत आजही अशा अनेक स्त्रिया, मुली आहेत, ज्यांना बँकेत जाऊन साधे पैसे कसे भरायचे, काढायचे हे माहीत नाही. त्या जात नाहीत. त्यांना जावंसं वाटत नाही. घरचे पुरुषच जातात. अजूनही लांबचा प्रवास कुणा पुरुषाच्या सोबतीशिवाय एकट्याने करू शकत नाहीत. त्यामुळे आता असं काही राहीलं नाही नि तुम्हीच एकट्या काही कौतुकाच्या नाही असं मला म्हणू नका. आजही एकूण लोकसंख्येच्या तुलनेत आत्मनिर्भर स्त्रिया फार म्हणजे फारच कमी सापडतील.
गेल्याच महिन्यात हैदराबादची एक मुस्लिम महिला लॉकडाऊनमध्ये सहाशे किमी दूर अडकलेल्या आपल्या तरूण मुलाला घ्यायला ई-पास वगैरे व्यवस्थित काढून आपल्या छोट्याशा स्कूटीवर गेली आणि जाऊन येऊन जवळपास १२ -१४शे किमी प्रवास करून त्याला घेऊन आली. ही खरी सावित्री. त्यासाठी तिला वड पुजायची गरज नव्हती. नि नाही.
अर्थात हे सगळ्या स्त्रिया करू शकतात. सर्वच स्त्रियांमध्ये या क्षमता असतात. प्रश्न हा आहे की त्यांनी हे करावं, असं स्वतंत्र वावरावं अशी संधी आणि सूट त्यांना कितीशी दिली जाते. तिथे मात्र तिला परावलंबीच ठेवले जाते. मुलग्यांना मात्र लहानपणापासूनच असं एकटं वावरायची संधी आणि उत्तेजन दोन्ही दिलं जातं. त्याने उपास तापास करत बसावं अशा अपेक्षा त्याच्याकडून ठेवल्या जात नाहीत. जे लोक अशा व्रतांमागची (नसलेली) शास्त्रीय कारणं सांगून, मग ही व्रतं केली तर काय बिघडलं असा प्रश्न विचारतात, त्यांना मग पुरुष, मुलगे असं एकही व्रत का करत नाहीत? त्यांच्यासाठी अशी कोणतीच व्रतं का नाहीत असे प्रश्न पडत नाहीत नि ते यावरअजिबातच विचार करताना दिसत नाहीत.
बहुतेक मुलींना लहानपणापासून नको तितकं जपून ती अधिकाधिक घरातच कशी राहील अशीच व्यवस्था केली जाते. नोकऱ्या बिकऱ्या देखील सुरक्षित आणि घर सांभाळून वगैरे सोयीच्या असतील तितक्याच करू दिल्या जातात. मात्र वडपौर्णिमा, करवा चौथ, हरतालिका नि काय काय अशी निर्बुद्ध व्रतं करायला मात्र जोरशोरसे उत्तेजनं दिली जातात. मग, बघा आमच्या मुली, बायका उच्चशिक्षित असूनही कशा संस्कृती सांभाळतात म्हणून गौरवं केली जातात. कारण त्यात पितृप्रधान समाजाचा इगो सुखावत असतो. आपल्या बायकोला आपणच सात जन्म हवे आहोत. अशी योनिशुद्ध बायको आपल्याला मिळालीय याचा इगो आज २१ व्या शतकातही काही कमी तीव्र नसतो.


No comments:

Post a Comment

किसी पिछले जनम की बात...

मुगले आजम हा सिनेमा पन्नास वर्षानंतर रंगीत झाला, त्यालाही आता जवळपास 20 एक वर्ष लोटली. 🤦काळ किती भराभर चाललाय...    तेव्हा टीव्हीवर दिलीप क...