Jul 7, 2020

पाऊस -

पाऊस दारात आला की पावसावरची कविता त्याच्या झोळीत टाकावी लागते. नवीन नसली तर जुन्या कपड्यांप्रमाणे जुनी द्यावी. पण त्याला विन्मुख पाठवू नये..
पाऊस-
मी पावसाळी धबधब्यासारखी बोलत गेले
तू दुष्काळी नदीसारखा आटत गेलास
निरोपाचे मेघ तुझ्यापर्यंत पोचलेच नाहीत
आणि स्नेहाचे कोंभ आपल्या मैत्रीतून रुजलेच नाहीत.......
पावसाला कळत नाही कुठे लिहावी अक्षरे
कुठे शाई ओघळत राहते तर कुठे पान कोरे
मी पावसाच्या कविता हल्ली करतच नाही
ऊनमाखल्या श्रावणसरी मनात भरत नाही
आभाळव्यापून असलेला कोरडा मेघ झरत नाही
मी दाराला इंद्रधनू टांगले
आणि माझे घर दृष्टावले
स्नेहीसोबती म्हणवणारे पांगले
तेव्हापासून मी छत्रीचा आडोसा करते
पावसाला माझ्यापासून चार हात दूरच ठेवते.....
माझी लेखणी पाऊस झरत असती
तर मी मराठवाड्यावर कविता केली असती
माझी लेखणी प्रसवते षंढ शब्दांची पिल्लं
जी टिचभर वहीत जन्म घेऊन
तिथंच मरण पावतात...........
मी हल्ली पावसाच्या कविता करतच नाही
आभाळव्यापून असलेला कोरडा मेघ झरत नाही..............
- अलका गांधी-असेरकर

Jul 4, 2020

आजची फेसबूक पोस्ट - (४-७-२०२०)

मंदिरं, देव इत्यादी ब्राह्मणांचे वर्चस्व आहे म्हटले तर गणेशोत्सव, नवरात्री आदी मंडळात ब्राम्हणी मंडळं फारशी दिसत नाहीत.
जर टिळक नावाच्या ब्राम्हणाने सार्वजनिक गणपतीचं स्तोम माजवलं तर त्यात ब्राम्हण अधिक का दिसत नाहीत?
अनेक सो कॉल्ड 'राजे' मंडळांचे पदाधिकारी हे बहुजन समाजातील आहेत आणि त्यांची तेथील दादागिरी, वर्चस्व बहुश्रुत आहे. अगदी भक्तांना ढकलून देणे, रपटे देणे, स्त्रियांचीही मानगूट धरून त्यांना बाजूला करणे इत्यादी प्रकार तिथे घडतात. अनेक गणेशोत्सव मंडळांच्या मागे दारू, पत्ते, जुगार यांचे अड्डे असतात. मिरवणुकीत दारू पिऊन धिंगाणे असतात. यात किती ब्राम्हण असतात? आणि अशा मंडळांवर कितीशी टिका होते?
शिवाय इथे इतके देव, धर्म आणि पंथ आहेत की त्या सगळ्या ठिकाणी ब्राम्हण नसतात. जंगम, गुरव, भंडारी, गोसावी आणि तत्सम अनेक लोकांच्या हातातही बरीच ठिकाणं असतात. त्यामुळे एकूणच देव, धर्मावर ब्राम्हणी सत्ता आहे म्हणणं चूकीचं आहे.
हीच गोष्ट विविध शैक्षणिक, सहकारी इत्यादी संस्थांची आहे.
अशा बहुतेक सामाजिक संस्था बहुजनसमाजाच्या हातात आहेत आणि तिथं तिथं त्यांचं जातवर्चस्व काम करतंय. मी स्वतः याचे बरेच अनुभव घेतलेले आहेत. ब्राम्हणी संस्था अशा फार कमी दिसतात. आणि ज्या काही थोड्याफार आहेत त्यांच्यात प्रमाणात उदारभाव अधिक दिसलेला आहे.
तरी देखील राग, फ्रस्ट्रेशन काढण्यासाठी सगळ्यांना ब्राम्हणच लागतो. नाहीतर शिताफीने ब्राम्हण्यवाद वगैरे नावं ठेवायची.
अगदी सुरुवातीपासून पाहाता राजकीय सत्ता ही क्षत्रियांच्या हातात राहिलीय. आणि त्यांच्याच घरात स्त्रियांचे स्थान अधिक दुय्यम दिसत आलेय. सीता, द्रौपदी ही उदाहरणं क्षत्रियांच्या घरातली आहेत, न की ब्राम्हणांच्या. ब्राम्हण असलेल्या रावणाच्या घरात मात्र स्त्रियांना अधिक स्वातंत्र्य होतं. आणि देव म्हणून प्रामुख्याने पुजले गेलेले राम कृष्ण शंकर ईत्यादीही क्षत्रिय आहेत.
वटपौर्णिमा, वैभवलक्ष्मी, संतोषीमाता, गुरुवार, मंगळवार, सत्यनारायण नि असली सगळी व्रतं करण्यात बहुजन स्त्रिया अधिक आघाडीवर आहेत. ब्राम्हण स्त्रियांपेक्षा.
आरएसएस ब्राम्हणी पक्ष म्हटला जातो, पण त्यात बहुतांश सगळ्याच समाजातील लोक दिसतात. खुद्द पंतप्रधान हे ओबीसी आहेत. अडवाणी पण बहुधा ब्राम्हण नाहीत.
जातीयवादात प्रत्येक समाज भरडला गेलाय इथं. शीखांचे हत्याकांड झालेय. तसेच ब्राम्हणांचेही झालेय. मुसलमानांचे झालेय नि हिंदूंचेही झालेय. जैनांचे झालेय नि बौद्धांचेही झालेय. तरीही सर्वसमावेशक न बोलता सगळे आपापली कार्डं खेळून राजकारण करण्यात पुढे असतात.
अर्थात माझ्या दृष्टीने यात ही सगळी पुरुषांची राजकारणं आहेत. त्यामुळे मी कुणाही एका समाजाच्या बाजूची नाही. हे समाज, ह्या जाती, हे धर्म, पंथ सगळी पुरुषांची सत्तास्थानं आहेत. आणि पुरुष पूर्वीपासूनच एकमेकांची डोकी फोडत आलेले आहेत, एकमेकांच्या बायका पळवत आले आहेत. युद्ध, दंगली, मारामाऱ्या, बलात्कार, स्त्रियांवर वर्चस्व गाजवणे, त्यांच्या शारीरिक स्थितीचा फायदा घेऊन त्यांना आपल्या टाचेखाली ठेवण्याचा प्रयत्न करत राहणे, हे खास पुरुषी प्रांत आहेत. त्यामुळे कुणीही नावाजण्यासारखे नाहीच. फारतर दगडापेक्षा वीट मऊ म्हणून तिथं डोकं फोडून घ्यायचं इतकंच.
अलका गांधी-असेरकर
Madhuri Ingle, Swati Bedekar and १४ others
३ Comments
1 Share

Jul 2, 2020

कोकणी पाऊस - (जुलै २०१९)

मुंबईचा पाऊस ... ही अनुभवायची चीज आहे..
खरंतर मुंबईचा म्हणायचं... कोकण पट्ट्यात कुठेही..
सध्या लागलाय असाच मुंबईत... नेहमीचंच ते मुंबईची तुंबई होणे, गाड्या बंद पडणे.. सुटी घेऊन घरात बसणे.. शाळा बंद इत्यादी...
पण ह्या समस्या पावसाच्या नाहीत ना... व्यवस्थेच्या आहेत.. त्यासाठी इतक्या सुंदर पावसाला का दोष द्यायचा...
तो तर मस्त धुँवाधार कोसळतो... आसमंत चिंब करतो... तलाव भरतो...
काल बातमी होती की तलावात आठ की पंधरा दिवसच पुरेल इतकं पाणी आहे मुंबईकराना..
आज बहुधा वर्षभर पुरेल इतकं पाणी चारच दिवसात ओतून गेलाय तो...
मुंबईचा पावसाळी आसमंत नेमका बघायचा असेल, तर रीमझीम गिरे सावन हे अमिताभ मौसमीवर चित्रीत झालेलं गाणं बघा... सध्याही तोच आसमंत आहे...
पण मला आठवतोय तो कोकणातल्या खेड्यातला ३०-४० वर्षांपूर्वीचा... पाऊस...
पाऊस सुरू झाला, की तालुक्याशीही संपर्क तुटणार... निदान तीन महिने तरी... धो धो कोसळणार...
चार महिने लागणाऱ्या सर्व गरजेच्या वस्तू भरून ठेवायच्या... चुलीतल्या लाकडांपासून ते धान्यापर्यंत सारंच... त्याला आगोटी भरणे हे नाव असायचं.. मे अखेरीस जो तो आगोटी भरण्याच्या गडबडीत... घरं शाकारण्याच्या गडबडीत... एकदा झड सुरू झाली की आठ आठ दिवस अविरत, संतत कोसळणारा पाऊस हा महाराष्ट्राच्या अन्य भागात क्वचितच अनुभवास येत असेल... छोट्या छोट्या नद्यांना, वहाळांना पूर... आमच्या खेड्यावर सातवीपर्यंत शाळा... आजुबाजूच्या अजून छोट्या खेड्यांना जेमतेम पाचवीपर्यंत किंवा शाळाच नाही अशी स्थिती... ती मुलं सहावी सातवीसाठी आमच्या शाळेत येत.. हे वहाळ, ओढे, नद्या ओलांडून... शेताच्या बांधाबांधावर चालत... शिक्षणाची जागृती तेव्हाच झाली होती सुरू... मुली पण येत...
सहावी सातवीतली म्हणजे जेमतेम बाराचौदा वर्षांची मुलं... ना कोणी पालक येत सोडायला.. ना गाडी घोडे... पाच पाच किमीचं अंतर सोबती सोबतीने चालत येत... पण कधी कोणता अनवस्था प्रसंग ओढवला नाही.. कुठलं मूल गायब झालं नाही.. कुठली मुलगी अत्याचाराला बळी पडली नाही... यात सगळ्या जातीतली मुलं असायची..
की कधी कुठल्या मुलाला दप्तराचं ओझं झालं नाही..
आज आई सोडते बस स्टॅन्डवर.. नी बसमधून मुलं शाळेत जातात.. तरी त्यांच्या दप्तराच्या ओझ्याच्या बातम्या होतात... ही पोकळ पिझ्झा बर्गर वडापाववाली पिढी ... की हॉर्लिक्सवाली...?
असो... ते न दिवस राहिले आता... किंवा असतीलही कुठे कुठे अजून... किंवा आहेतही.. अनिल साबळेचे फोटो आणि पोस्ट दाखवतातच अजून... तेव्हा मला माझं खेडंच आठवतंय...
पावसाचं कौतुक तुम्हाला हो... गोरगरीबांचं काय असा गळा काढतीलच लोक...
बारीश का मिजाज हम से पुछिए
हम.. जो कच्चे मकान के वासी है....
हा शेर आहेच कुणाचा तरी...
पण हाल गरीबांचेच नसतात... मुंबईत कोटी रुपयाचा फ्लॅटही गळतो... ओल घेतो..फ्लॅट, चाळी यांच्या घरातही पाणी शिरते.. आयुष्यभराच्या कमाईचा सत्यानाश करते... मोसमच तसा आहे... इथे निसर्गाविरुद्ध धाब्याची घरं आली... पण धाबे गळतातच इथले... मुंबईत एकवेळ धाब्याला पर्याय नाही म्हणू... पण कोकणातही लोक धाब्याची घऱं का बांधतात देव जाणे... तिथे उतरत्या छपराची, कौलांचीच घरं हवी...
गोरगरीबांचे हाल सगळ्याच ऋतुत असतात... त्याला ऋतु नव्हे, तर माणसं आणि त्यांच्या सगळ्या व्यवस्थाच कारणीभूत असतात..
ऋतु सुंदर असतात..
हिमाचल प्रदेश, भूतान आदी ठिकाणी कधीही अवचित पडणारा पाऊस अनुभवलाय... पण नाही आवडला... तो बर्फासारखा गार, सुयांसारखा तीक्ष्ण पाऊस... एक थेंब पडला अंगावर तर हाडापर्यंत थंडी गेली... कोकणातला पाऊस तसा नाही.. रिमझिम पडो वा मुसळधार... तुम्ही बिनधास्त भिजू शकता... नव्हे भिजतोच आपण... छत्री नुसती असावी म्हणून असते हातात... घरात शिरल्यावर कपडे बदलावेच लागतात महाराज..आणि केस पुसावेच लागतात खसाखसा... आणि घरात कपड्यांचे ढीग साचतात....
असो.. मी या पावसावर कितीही आणि काहीही लिहू शकते.. एन्डलेस... पण वाचणाऱ्याला किती बोअर मारायचं याच्या मी काही मर्यादा ठरवून ठेवल्यात...
----

पाऊस म्हटला की अजून एक गोष्ट आठवते..
महर्षी धोंडो केशव कर्वे कोकणातल्या दापोलीजवळच्या मुरुडचे... छोटंसं खेडं...
त्यांच्या काळी मॅट्रीकची परीक्षा द्यायला कोकणातून मुंबईला यावं लागायचं... साल असेल १८५६-६६ च्या दरम्यानचं काहीतरी.. दिडशे वर्षांपूर्वी...
तेव्हा एसट्या नव्हत्या... रेल्वेचा प्रश्नच नव्हता.. कोकणातली माणसं मुंबईत यायची ती बोटीने फक्त... भाऊच्या धक्क्यावर. बोटीने पोचायलाही दोनदोन तीन तीन दिवस लागायचे...
जूनमध्ये परीक्षा होती बाळ कर्वेची... आणि कोकणातल्या पावसाने इंगा दाखवला.. असा कोसळू लागला की बोटी बंद झाल्या.. पुन्हा कधी सुरू होतील निश्चित नव्हते... परीक्षा जवळ येत चालली होती.. कर्वेंची तडफड सुरू झाली.. काय करावे...
अजूनही काही मुलं होती त्यांच्याबरोबरची..
तिघाचौघांनी ठरवले.. चालत जायचे... मुंबईला... (दापोली ते मुंबई, किमान चारशे किमी अंतर असेल माझ्या अंदाजे)
आणि निघाल्या स्वाऱ्या...
पोचल्या मुंबईला कदम कदम बढाए जा म्हणत... कधी?
आठ दिवसांनी....
पाय सुजून टम्म झाले होते.. पण परीक्षा मिळाली...
हे धडे का नसतात मुलांच्या पाठ्यपुस्तकात...?
(ब्राम्हणांच्या मुलांनाही सगळं सोपं नव्हतं, हेही लक्षात घ्यायला हवं.. भटाबामणांच्या नावाने करवादणाऱ्या लोकांनी. बामणांच्या पहिल्या पिढ्याही कष्टानेच शिकल्या.. माधुकरी मागून शिकल्या.. गाव घर सोडून कुठं कुठं राहून शिकल्या.)
आजच्या मुलांना दप्तराचं ओझं कमी करून हवंय...!
तक्रारींना अंत नसतो.. स्वीडनसारख्या देशाच्या सुविधा मिळाल्या तरी माणूस तक्रारखोर असेल तर तो समाधानी नाहीच राहणार...
आणि हे कर्वे तब्येतीने नाजूक म्हणून प्रसिद्ध होते तेव्हा बरं का.. हा मुलगा फार जगणार नाही असं म्हटलं जात होतं तेव्हा... तो मुलगा १०४ वर्षे जगला... आता बोला...
आणि नुसताच जगला नाही, तर असामान्य कार्य करत जगला.. समाजाच्या विरुद्ध सुधारणा करत जगला... र. धों. कर्वेंसारखा मुलगा जन्माला घालत जगला...
(मला हे कळतच नाही... जिथे शाळा तिथेच परीक्षा का नाही घेतल्या जात ते.. अजूनही शाळा वेगळी आणि परीक्षेचं सेंटर वेगळं...हा काय प्रकार आहे... माझ्यावेळीही दुसऱ्या गावात यायचं सेंटर. किती टेन्शनमध्ये असायची आमची चिमुकली मनं आणि डोकी... कसलंच साधन नसायचं... दिवसाकाठी दोन तीन चालणाऱ्या एसटी... बाकी काहीच नाही... ती बंद पडली की गेलं वर्ष वाया... मुलांसाठी काहीही सोयी केल्या जायच्या नाही तेव्हा... यायचं तर या परीक्षा द्यायला नाहीतर मरा तिकडे...)

- अलका गांधी-असेरकर

Jul 1, 2020

मामी -

मामी -
मामा मोठा तालेवार.....या ओळीला साजेसा तो मामा होता. व्यापारी परंतु प्रामाणिक. कोणाच्या अध्यात ना मध्यात. मात्र देखणा आणि शैौकीन.. सिनेमांचा, रहस्यकथांचा, नवीन नवीन वस्तू खरेदी करण्याचा..1974 सालीच त्याने इम्पोर्टेड टीव्ही घेतलेला. 6000 रुपयात. तेव्हा सहा हजार काय पण सहा रुपयेही खिशात असणं म्हणजे भारी वाटण्याचा काळ. प्रिया स्कूटर घेतली. तेव्हा गावात पहिला टिव्ही आणि पहिली स्कूटर मामाकडे होती.
मामी सुंदर, हुशार,...
पण मुलबाळ नाही..
मामाचा भाऊ याच्या विरुद्ध. त्याला चार मुलं. दोन मुली, दोन मुलगे. सगळी मुलं लहान लहान असतानाच त्याची बायको वारली.
बायको वारल्यावर भावाच्या चारही मुलांना हा तालेवार मामा आपल्या घरी घेऊन आला. त्यातल्या सर्वात लहान मुलाला आपलं नाव लावलं. त्याचे खूप लाड केले.
मामामामीला मुलबाळ नाही. पण घर मुलंबाळं असलेल्या कुटुंबापेक्षा भरलेलं. नेहमीच.
मामा अगदी तरूण असतानाच त्याच्या मामाला, जो एकटा राहत होता, बायको सोडून गेली होती, आणि आता वय झालं होतं अशा त्याच्या मामालाही आपल्या घरी कायमचं घेऊन आला होता. कारण मामाची आईही त्याच्या लहानपणीच वारलेली. आणि सारी भावंडं आजोळी वाढलेली. तेव्हा त्याच्या या एकट्या पडलेल्या मामानेच सा-यांना आईप्रमाणे सांभाळलेलं.
तर अशा या मामाला तो आपल्या घरी घेऊन आलेला आणि मरेपर्यंत त्याला सांभाळलेलं.
नंतर ही चार मुलं आणून ठेवली.
त्याचवेळी दोन बहिणी खेड्यावर दिलेल्या. त्यांच्या मुलांना तिथं आठवी नंतर शाळा नाही म्हणून एक एक करत मॅट्रिक होईपर्यंत सगळ्यांना आपल्या घरी चार चार वर्ष ठेवून घेतलेलं.
त्यातच एक मीही होते तीन वर्ष. 8 वी ते 10 वी.
दुसरी बहीण गुजरातेत. विधवा झालेली. एकच मुलगा. त्याला शिक्षणासाठी मनीऑर्डर पाठवायचा.
-आता मी शीर्षक दिलंय 'मामी'.. आणि सांगतेय सगळं मामाबद्दल. परंतु खरी कहाणी मामीचीच आहे.
मुलबाळ नसतानाही मामीच्या घरात रोज पंधरा माणसं कमीत कमी जेवत असत.
व्यापार मोठा. त्यात एक मुनीमजी (हाही मामींचा लांबचा भाऊ. म्हणजे घरच्यासारखाच. तिथेच राहायचा.) दोन नोकर, दोन गडी, एक मोलकरीण यांच्यासह आम्ही पाच, आणि आलेला गेलेला सततचा. हे रोजचे जेवणारे.
या सर्वांचा सैपाक मामी एकटी करत असे.

कपाळावर एकही आठी नाही. मामाशी कधीच भांडण नाही. दोघांचं प्रेम होतं एकमेकांवर. त्या काळात बायकोला लाडाच्या नावाने बोलवायचा मामा. सगळ्यांच्या समोर. मुंबईहून झुळझुळीत साड्या आणायचा. बाकीच्यांशी वागताना तो कडक असायचा. पण कधी तिच्याशी मोठ्या आवाजात बोलायचा नाही. रागवायचा नाही.

हा सैपाक म्हणजे गडी नोकरांना लागणा-या रोज जाड भाकरी, मुलांसाठी चपात्या, आणि मामाला आवडतात म्हणून फुलके. हे सगळं रोज करावं लागायचं. सकाळ संध्याकाळ. सैपाकाला बाई वगैरे ठेवण्याची पद्धत नव्हती.
एकच होतं. मामीचं सतत डोकं दुखायचं. सतत कपाळाला करकचून आवळून बांधलेली पट्टी असायची. तिला रात्री झोप लागायची नाही. रोज झोपेची गोळी ठरलेली होती. कधी कधी तर दोन गोळ्या.
आणि आम्ही लहान. आईला असं हे दुखतंय ते दुखतंय करताना कधीच पाहिलेलं नव्हतं. आणि मामीचं दुःख समजून घेण्याएवढी अक्कल यायला तर मला पुढे अजून तिसेक वर्ष लागली. त्यामुळे तेव्हा मामीचा राग यायचा. सारखं डोकं धरून पडून राहते. झोपून राहते म्हणून. तरी बरं की आम्हाला काही फार काम करावं लागायचं नाही. मात्र वरकाम, थोडी मदत याची तिला अपेक्षा असायची.
असंही आम्ही घरात असायचोच कुठे. दिवसभर तर शाळा, ट्युशन्स. ती फार फार तर ओटा धुऊन घे. कूकर लावून दे एवढीच कामं आम्हाला सांगायची. तरी ते जीवावर यायचं.

आणखी एक होतं. मामीला देवदेव करण्याचं वेड लागलं होतं. अर्थात घरच्या घरीच. पण सकाळी दोन दोन तास तिला देवपुजेला लागत. तेही सोवळ्यात. मोठमोठ्याने भजनं म्हणत. साग्रसंगीत पुजा. नैवेद्य. देवपुजेची भांडी घासण्याचं काम सकाळी ते मुनिमजी करून देत. मामीचा सख्खा मामेभाऊच होता तो. त्याआधी मामाचे मामा करून देत. हे दोघेही तिला दुकानातून वेळ मिळाला की कामात मदत करत.
आणि मामीच्या नणंदा म्हणत, "ही त्या दोघांकडून कामं करून घेते."
मामा आपल्याला कापडचोपड करत नाही याचाही या दोघी बहिणींना राग यायचा. पण आपल्या मुलांना चार चार वर्ष सांभाळतोय याची मात्र त्यांना कदर दिसायची नाही.
तरी बरं, धाकट्या मामाची बायको वारल्यानंतर त्याच्या चार मुलांचं ही मामीच करत होती. सुरुवातीला त्यातल्या दोघांना मामीची एक एक नणंद आपल्या घरी घेऊन गेली होती. पण दोघींनी त्यांना जेमतेम वर्षभर रडतखडत सांभाळलं आणि नंतर ती मुलं सुट्टीत मामीकडे आली ती परत यांच्याकडे गेलीच नाहीत. नेहमी तिथेच राहिली.
यातली एक मुलगी थोडी मंदबुद्धी होती. ती मामींना मदत करायची. तिचं पुढे लग्नंही झालं नाही. की तिच्यावर फारसे उपचारही झाले नाहीत.

मामाचं दुकान तालेवार दिसायचं. पण काळाच्या ओघात उतरती कळा लागली. याचं कारण मामाची तब्येत खालावली. बीपी, हार्ट यांची दुखणी सुरु झाली. त्यात लाचखोर भेसळप्रतिबंधक खात्यातील अधिकाऱ्यांनी लाच न दिल्यामुळे विनाकारणच त्याच्यावर भेसळीचा खटला भरला.
- मामाला आशा होती की भावाची सांभाळलेली मुलं आपला धंदा सांभाळतील. परंतु त्यांच्या कोणातच ती क्षमता नव्हती. पोरं शिकलीही नाहीत फार. एक मंदबुद्धी. एक मुलगा व्यसनी, चंगीभंगी झाला. मोठी मुलगी चांगली होती. तिचं मामीनेच तिच्यायोग्य मुलगा बघून गुजरातेत लग्नं करून दिलं.
दुकान मंद झालं. नोकर-चाकर उरले नाही. पैसा उरला नाही. त्या काळात बचतीची सवयच नव्हती लोकांना फारशी. मोठ्ठं घर मात्र बांधलेलं होतं. शेवटी मामीने दुकान ताब्यात घेतलं. जमेल तसं तीच चालवू लागली. जिथे मुंबई, पुणा, सांगली, सातारा इथून मालाचे ट्रक्स भरभरून येत. आणि आजूबाजूचे व्यापारी मामाचा हेवा, मत्सर करीत तिथे त्याच व्यापाऱ्यांकडून पाच पाच दहा दहा किलो माल विकत घेऊन मामी आपल्या दुकानात थोडं मार्जिन ठेवून विकू लागली. परंतु मामीने या गोष्टींचा कधी इगो बाळगला नाही. आपला काळ पडता आहे बघून त्याच व्यापाऱ्यांची मदत घेतली जे व्यापारी कधीकाळी मामांचा राग करीत असत.
मामाचं चांगलं चाललेलं असताना तो बँकेत कुणाच्या तरी कर्जाला जामीन राहिला होता. आणि त्या माणसाने कर्ज बुडवलं. वसूलीसाठी बँक मामाच्या मागे लागली. अशावेळी त्या कर्जबुडव्या माणसाच्या पाच किमी दूर असलेल्या घरी जमेल तसे खेटे मारून मामीने थोडीफार उधारी वसूल केली. मामी खमकी होती. अशा परिस्थितीतही चीडताना, भांडताना दिसली नाही. हसत म्हणायची,
"आज माझ्यावर वेळ आलेय म्हणून, नाहीतर या व्यापाऱ्यांच्या दारात तरी पाय़ ठेवला असता का मी कधी? आज तुझा मामा हतबल झालाय म्हणून, पण त्यांच्या राज्यात त्यांनी मला किती सुखात ठेवलं."
आज आश्चर्य वाटतंय, मामी कशात सुख बघत होती कोण जाणे. सतत दुखणारं डोकं, न येणारी झोप हे तिच्या स्वतःचं मुलबाळ नसल्याचंच लक्षण होतं का? मामाचं तिच्यावर असलेलं खूप प्रेम हेच तिला सुख वाटत होतं का?
मामाचा स्वाभिमान तिने नेहमी जपला.
मामा शेजारणीशी हसून खेळून बोलत असे, तिच्याशी चेष्टामस्करी करत असे. तर त्याच्या बहिणींना त्याचं तिच्याशी प्रकरण असल्याचं वाटायचं. तसं ते होतं की नव्हतं ते देवच जाणे. परंतु मामीने त्याबद्दल कधीच एका शब्दानेही आक्षेप घेतला नव्हता.

पण याचा अर्थ ती मामाच्या होला हो करणारी बाई होती आणि मामाच्या पुरुषी सत्तेपुढे वाकलेली होती असं अजिबातच नव्हतं. त्याचे सगळे निर्णय ती डोळे झाकून मान्य करत नव्हती. जेव्हा मामाने आपल्या धाकट्या विधुर भावाच्या लग्नाचा प्रस्ताव मांडला, तेव्हा तिने ठामपणे त्या गोष्टीला विरोध केला. एकतर तो भाऊ इतका सक्षम नव्हता. तिने म्हटलं, जर त्यांचं लग्न करायचं असेल, तर आपल्या मुलांना पण त्यांनी घेऊन जावं लागेल त्यांच्याजवळ. मग मी करणार नाही या मुलांचं काही. यावर दोन्ही मामा गप्प बसले होते. कारण चार मुलांचं करणारी बायको त्याला भेटणं कठीण होतं.
ती सगळी कामं कर्तव्य समजून कर्तृत्वाने पेलत होती. नाईलाज म्हणून करत नव्हती ती. आम्हा मुलांना तिचा धाक असे माफक. शिस्त होती. शिवाय तिचं सोवळं ओवळंही होतं थोडं. ते आम्हाला पाळावं लागे. गावातल्या इतर समवयीन स्त्रियांशी तिचे संंबंध माफक पण आदराचे होते. असंही श्रीमंत घरातली म्हणून तिला आदर होताच गावात. त्यात ती सुंदर, खंबीर, प्रभावी व्यक्तिमत्व असलेली. आवश्यक तिथे आणि तेवढ्यापुरतीच ती त्यांच्यात मिसळत असे.
मामीचं माहेरही तालेवार होतं. तिला पाठिंबा देणारं होतं. सर्व धबडग्याला कंटाळली की तीही आठ आठ दिवस माहेरी जाऊन राहायची. खरंतर जाताना ती सैपाकाला बाई ठेवून जायची. तरी आम्हाला ती सारखी माहेरी जाते याचा मनातून राग यायचा. पण तिलाही आरामाची, बदलाची गरज आहे हे कळण्याचं आमचं वय नव्हतं.
शेवटी अशाने दुकानही चालणारं नव्हतं. मामीने निर्णय घेतला. हे मोठ्ठं घर विकलं तर दहाएक लाख मिळणार होते. त्यातून बँकेची जामीन रक्कम भरता येईल. आणि उरलेले पैसे व्याजावर ठेवून भाड्याने राहता येईल. मोठ्या घरातून मामी समोरच व्यापाऱ्याने बांधलेल्या एका चाळीत तीन रुममध्ये भाड्याने राहायला गेली. चेहऱ्यावर कोणताही गिल्ट, दुःख, अपमानाची भावना नव्हती. परंतु व्यसनी मुलगा, जो दिराचा सांभाळलेला होता, ज्याला आपलं नाव लावलं होतं. तो काही न करता त्रास मात्र करत असे. आता हा त्रास कसा सोडवायचा. त्यात मामाचे आजार. तिने पुन्हा निर्णय घेतला. गुजरातला एका खेड्यावर पिढीजाद जुनं घर रिकामं पडलेलं होतं. ती म्हणाली,
"इथं भाड्याने राहाण्यापेक्षा मी तिथं चालली जाते यांना घेऊन."
आणि मामी ज्या परिसरात जन्मापासून वाढली तो सोडून गुजरातला निघून गेली. तेव्हा तिचं वय होतं सत्तरीच्या घरात. मुलाला सांगितलं तू कुठे तरी नोकरी बघ. माझ्यासोबत येऊ नकोस.
मामी आजही त्या खेड्यावर राहतेय. वयाची पंच्याऐंशी वर्ष उलटलेयत. ती राहते ते खेडं अगदीच खेडं आहे. गावातले अर्धे लोक घरं बंद करून शहरात निघून गेलेली आहेत. खेड्यावर दवाखाना पण नाही. बाजूच्या तालुक्याच्या गावी जावं लागतं. अशा खेड्यावर मामी मामाला घेऊन राहिली. सोबत त्या मंदबुद्धी पुतणीला घेतलं. ती खूप बडबड करते, पण मामीची काळजी घेते. चारेक हजार व्याज येतं. त्यात तिचं भागतं.
तिला मी विचारलं,
"मामी, भीती नाही वाटत इतक्या अशा आडगावी राहायला?"
"छे, भीती कसली! आणि आता या वयात बरंवाईट व्हायचंच आमचं. डॉक्टर काय करणार आहे, वेळ आल्यावर? माझा देव आहे की माझ्या पाठीशी. इथं शांत वाटतंय उलट."
आणि मामाची वेळ आली. मामीने दोन तासाच्या अंतरावर राहणाऱ्या पुतणीला, जावयाला बोलावून घेतले. त्यांनी येऊन मग मामाला तालुक्याच्या दवाखान्यात हलवले. चार दिवसांत मामा गेला.
मामा जाऊनही चार वर्षे झाली. मामी आपल्या छोट्या पुतणीसह तिथेच राहतेय. गावातल्या छोट्याशा मंदिरात दर्शनाला जाते. तब्येत नरमगरम राहते. पण मामीला भीती, कुढत राहणं ह्या गोष्टी ठाऊकच नाहीत. मोठ्या पुतणीकडे जाऊन राहण्याचा, तिची मदत घेण्याचा विचारही करत नाही.
मामीला सांगितलं, "या मंदबुद्धी पुतणीला कशाला जवळ ठेवताय? तिच्या मोठ्या बहिणीचंही कर्तव्य नाही का तिच्याप्रती? तिच्याकडे द्या पाठवून तिला."
तेव्हा मामी म्हणते, "त्या बिचारीचा संसार का खराब करू हिला तिच्याकडे पाठवून? मी मुलीसारखं वाढवलं तर ती माझीच जबाबदारी आहे. माझ्या पश्चात ती बघेल तिचं काय करायचं ते. मलाही सोबत होतेय तिची, त्रास असला तरी."
कुठून आलं असेल हे बळ मामीला.. आयुष्यात एवढी स्थित्यंतरं आली तरी कधी कशाबद्दल तक्रार, रडगाणी गायली नाहीत तिने. ती स्थित्यंतर खंबीरपणे पेलली.
मामी 'इदं न मम' या तत्वावरच जगली आयुष्यभर...
सुखदुःखे समे कृत्वा, लाभालाभौ जयाजयौ....हे तत्व नुसतं सुविचार म्हणून नव्हते तिच्यासाठी. तो तिचा स्वभावच होता. अडचणी आल्या की मी मामींना आठवते. मग मला माझ्या डोंगराएवढ्या अडचणी मोहरीएवढ्या वाटू लागतात. जगण्याचं बळ मिळतं.
-Alka Aserkar


Jun 28, 2020

लग्नाचे आमिष आणि त्या अनुषंगाने बरंच काही -

लग्नाचे आमिष आणि  'बलात्कार' -

खूपदा बातम्या वाचण्यात येतात. 'लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार' 'लग्नाचे आमिष दाखवून नऊ वर्षे बलात्कार'. तेव्हा ती बातमी फारच विनोदी वाटते. हो, अगदी मलाही. 
शिवाय अजून विनोद तर पुढेच आहे. अनेकदा या बातम्यांतील स्त्रियांचे वय तिशीच्या पुढे असते. पस्तीस, चाळीस, पंचेचाळीस ते अगदी पन्नासही. 
हा तर कळसच झाला अध्यायाचा. 
एकवेळ अज्ञान, (वयाने आणि शिक्षणानेही) मुलींच्या बाबतीत असं काही घडत असेल तर ते गांभीर्याने घेताही येईल.
पण तिशी उलटल्यानंतर लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार कसा काय होऊ शकतो?
पुन्हा कहर म्हणजे यातल्या स्वतःला व्हिक्टिम समजणाऱ्या स्त्रिया या अनेकदा डिव्होर्सी, विधवा, एकट्या राहणाऱ्या, मुलं असलेल्या, नवऱ्याशी न पटलेल्या अशाही असतात. म्हणजे जीवनाचा बऱ्यापैकी अनुभव घेतलेल्याही असतात. त्या जेव्हा एखादा पुरुष आपल्याशी लग्न करेल या आशेवर त्याच्याशी लैंगिक संबंध ठेवत असतील आणि तो पुरुष निघून गेल्यावर, वा त्याच्याशी न पटल्यावर त्याच्यावर 'लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार' हा आरोप लावत असतील तर कठीण आहे. मुळात असा आरोप कोर्टात  टिकतो? ह्याबद्दल उत्सुकता आहे. 
त्यातही  'लग्नाचं आमिष दाखवून अमुक वर्षे लैंगिक संबंध ठेवले' असा शब्दप्रयोग जरा तरी समजू शकतो. मात्र लग्नाचं आमिष दाखवून 'बलात्कार' कसा काय असू शकतो बुवा? बलात्कार हा बलात्कार असतो. त्यात कुठलंही आमिष कसं काय असू शकतं (वयाने अज्ञान मुलगी सोडल्यास)
वचन लग्नाचं असो वा सोबत राहण्याचं असो. हे जर काही मागणीवर आधारित असेल, तर तेव्हाच शंका यायला हवी. आणि तशी आली नसेल, तर असे संबंध त्या स्त्रीलाही तितकेच हवेहवेसे वाटले असणार. त्याशिवाय ती त्यात सहभागी होणार नाही. वयाची चाळीशी आली, तरी मानवी स्वभाव, त्यातही पुरुषी स्वभाव, वृत्ती ओळखता येत नसेल, तर आपल्यातच काहीतरी अज्ञान आहे अजूनही. आणि त्याला कारणीभूत आपण आणि आपला समाज आहे. 
त्याही पल्याड, या बातमीत अजून एक असे अधोरेखित होते, की जणू लैंगिक संबंध हे पुरुषालाच हवेसे वाटतात. त्यालाच त्याची गरज असते आणि स्त्री केवळ त्याला साधन म्हणून आपला देह त्याला सोपवते. तसा ती सोपवतही असते अनेकदा. पण तेही तिच्या इच्छेवर, प्रेमावर, समंजसपणावर  ती सोपवत असते. जबरीने नाही. जबरी आली तर बलात्कार आला हे मान्यच. पण प्रत्यक्षात असे नसते. जी स्त्री अमुक इतकी वर्षे लग्नाच्या आमिषावर एखाद्याशी असे संबंध ठेवते तेव्हा तिनेही त्याच्या इतकाच आनंद त्याच्याबरोबर घेतलेला  असतो. त्या त्या क्षणाला तो बलात्कार नसतोच. 
शिवाय यामुळे अजूनही असा एक गैरसमज पसरतो की लैंगिक संबंधात केवळ पुरुषच त्या स्त्रीचा उपभोग घेत असतो. आणि स्त्री मात्र बिचारी, उपभोगाचे साधन म्हणून वापरली जात असते. हा समज समाजात बऱ्यापैकी अजूनही दाट आहे. अनेकदा प्रेमात विशेषतः भारतीय मुलींना सावध केले जाते ते अशा शब्दांत, 'तो तुला वापरून फेकून देईल. सोडून देईल.' यातूनच स्त्रियांच्या मनातही हा समज घर करून असतो की लैंगिक संबंधात आपला 'वापर' केला जातो. आणि पुरुष हा केवळ उपभोगकर्ता असतो. असा समजच मनात किंवा डोक्यात असणं हे अतिशय वाईट आहे. असे संबंध हे एकाच वेळी दोघांनाही सारखाच आनंद देणारे असतात. त्याचे परिणाम किंवा दुष्परिणाम म्हणावे (गरोदरपणा, त्याच्यापासून आजार वगैरे) तर त्यालाही जबाबदार आपला निष्काळजीपणा असतो.
एकेकाळी वैज्ञानिक साधने उपलब्ध नसताना हे समजू शकतो की अशा संबंधांत स्त्रिया अधिक सफर होत होत्या. पण आता विज्ञान मदतीला असताना असं काही राहिलेलं नाही. तेव्हा असा कांगावा करण्यात काहीच अर्थ नाही. या बाबतीत तरी मी कोणत्याही प्रौढ बाईची तरी बाजू घेणार नाही. 
आणि अजूनही स्त्रिया या बाबतीत अज्ञानी, भोळ्या, निरागस किंवा सरळ मूर्ख म्हणू या, राहत असतील तर त्याला जबाबदार सर्वस्वी त्या स्वतः आहेत. एक तर माणूस ओळखायला शिका, किंवा माणूस ओळखूनही त्याच्याशी संबंध ठेवायचे असतील, तर त्याच्याप्रमाणेच आपला स्वार्थ साधायला शिका. 
थोडंसं हे मान्य आहे, की अशा संबंधात स्त्रियांची, मुलींची बदनामी अधिक होते. तिच्या चारित्र्याच्या नावाने डंका अधिक पिटला जातो. आणि पुरुष नेहमी नामानिराळा राहतो. त्याला फार बदनाम केले जात नाही. हे अगदीच मान्य आहे. पण या चारित्र्य नावाच्या बुजगावण्याला किती भीक घालायची हे आता स्त्रियांनी स्वतःच ठरवायची वेळ आलीय. घाबरलात तर तो भीतीदायक वाटेल, आणि फाट्यावर मारलंत तर ते बुजगावणं आहे हे सिद्ध होईल. 
मात्र अशी प्रकरणे घेऊन स्त्रिया कोर्टापर्यंत जात असतील, तर त्यांना तशी चारित्र्याचीही भीती वाटत असेल असं वाटत नाही. त्या पुरुषाला धडा शिकवण्यासाठीच हे पाऊल त्यांच्याकडून उचललं जातं आणि स्त्री असल्याचं व्हिक्टीम कार्ड खेळलं जातं अनेकदा.
काही वृत्ती या स्त्री आणि पुरुषांच्या नैसर्गिक आहेत. कदाचित नैसर्गिक नसल्या तरी त्या सामाजिकीकरणात का होईना, तशा घडलेल्या आहेत, आणि त्या ओळखता आल्या पाहिजेत. आणि मगच पुढचं पाऊल उचलायचं की नाही ते ठरवता यायला पाहिजे. 
पुरुषांनीही असे संबंध प्रस्थापित करताना लक्षात घ्यायला हवं, की असे संबंध जोडताना स्त्रिया लॉंग रिलेशनशीपची अपेक्षा ठेवतात. त्यांच्यासाठी हे नातं फक्त शारीरिक राहात नाही. ते भावनिकही बनतं. त्यामुळे नात्यात स्पष्टता ठेवा. आपण कितपत आणि किती साथ देऊ शकणार आहोत ते क्लिअर करा सुरुवातीलाच. खोटी आमिषं, जी पूर्ण करता येणार नाहीत अशी दाखवू नका.
थोडक्यात, मैत्री करा, प्रेमात पडा, लैंगिक संंबंध ठेवा. आनंद घ्या, द्या. मात्र परिस्थिती फिरली की व्हिक्टीम कार्ड खेळून स्वतःला आणि समोरच्यालाही त्रास देऊ नये असं वाटतं. नातं काचायला लागलं की सोडूनही देता यायला हवं. पुढचं वळण धरायला हवं. अगदी स्त्रियांनाही ते जमायला हवं... सोपं नाही. पण जमवायचा प्रयत्न नक्कीच करायला हवा. पुरुषापेक्षा स्त्रिया भावनिकरित्या अधिक गुंततात त्यामुळे त्यांना ते जड जातं. पण मैत्रिणींनो, आपल्याला जमायला हवं ते.   

- अलका गांधी-असेरकर

Jun 23, 2020

लॉकडाऊन आणि सैपाक -

संकटं आणि स्त्रिया - कंटाळल्यात बायका घरोघरी सैपाकघरात शिजवून. तरी शिजत राहतायत चुलीपुढे घामाच्या धारांतून. कंटाळ्यातून. चिडचिडीतून.
आता कुठं बिचाऱ्या या दशकात जरा जरा बाहेर पडू लागल्या होत्या सैपाकघरातून. बाहेर सगळं मिळू लागलं होतं आयतं वायतं आणि जरा बरं सुद्धा.
कंटाळा आला तर घेऊन येता येत होत्या कोपऱ्यावरच्या पोळीभाजी केंद्रावरून पोळ्या, गरमगरम भाकऱ्या आणि भाजी. एखाद्या संध्याकाळी निवांत जाऊन बसता येत होतं नवरा, पोरं घेऊन कोपऱ्यावरल्या बऱ्याशा हॉटेलात दोसा बिसा खाऊन येता येत होतं.

पण कोणतंही संकट आलं, की त्याचा आधी मार बायकापोरांवर बसतो म्हणतात. कोरोनाच्या ल़ॉकडाऊनने देखील बायांना पुन्हा सैपाकघरात लॉक करून टाकलं. उपाशी राहू शकत नाही, बाहेरचं आणू शकत नाही आणि बहुतांश घरातल्या पुरुषोत्तमांना तर कूकरचं झाकणही लावता उघडता येत नाही अशी स्थिती. त्यात पोरांच्या फरमाईशी. साधं वन डिश मिल फारतर एखाद दिवस चालवून घेतात ती. नंतर भुणभूण सुरू. हे बनव, ते बनव. घरात राहून अजून खाय खाय सुटलेय सगळ्यांना. बाईची खरी मैत्रीण कोण असेल तर ती घरसखी. बाई करीअर, नोकऱ्या करते ते देखील घरच्यांच्या नव्हे तर, या घरसखींच्या जीवावर. आता तीही नाही. भांड्यांचे ढीग पडतायत. काही घरी पुरुष एकवेळची घासून देतात. पण यज्ञात सातत्याने आहुती पडत राहते तशी सिंकमध्ये सतत भांडी पडत नाही राहिली तर सिंकदेवता कोपत असावी बहुधा. शिवाय पुरुषांच्या घरातल्या मदतीकडे अजूनही बोनस म्हणूनच पाहिले जाते.. मिळाला तर वाहवा, न मिळाला तर वाहवा...
तरीही त्यातूनही काहीतरी नवीन म्हणून स्त्रियांनी यु ट्यूबवर नवीन रेसिपि शोधल्या. त्या ट्राय केल्या. पण शेवटी काय तर चुलीपुढेच शिजल्या.
छान राहणं, सजणं, नटणं, चांगलेचुंगले आवडते कपडे घालून फिरणं, मिरवणं, थोडंफार तरी शॉपिंग करणं, पार्लरला आठवड्या पंधरवड्यातून एकदा तरी भेट देणं, मैत्रिणींच्या घोळक्यात हेल्दी गॉसिपिंग करणं, एखादी छोटी मोठी पिकनिक करणं, ही बायकांच्या जगण्याची गरज आहे. विशेषतः गृहीणींची. नोकरीवर जाणाऱ्या बाया आपसूकच हे सगळं करत असतात. पण गृहींणींना अकारण सकारणही हे करावं लागतं. ती त्यांची मानसिक गरज असते. ते केलं नाही, तर त्यांचं सगळं आयुष्य पूर्वीच्या बायकांसारखं घराचा तर सोडाच पण सैपाकघराचा नि माजघराचाही उंबरा न ओलांडता असंच निघून जाईल. या दोनच खोल्यांत. कळकटलेल्या कपड्यांत. केसांच्या अवतारात. क्षणाची पत्नी नि आयुष्यभराची अन्नपुर्णा म्हणूनच गौरवल्या जातील नि मरतील त्या. कोरोनासारख्या परिस्थिती उद्भवत राहिल्या तर. त्यातही ज्या स्त्रिया गेली दहा, पंधरा, वीस, तीस वर्षे गृहिणी म्हणून राहिल्या, त्या आता जरा काही कर्तव्यांतून बाहेर पडून बाहेरच्या दुनियेत रमू लागल्या होत्या. काही नवीन गोष्टी शिकू लागल्या होत्या. फिरू लागल्या होत्या. आपले छंद जोपासू लागल्या होत्या. त्या पुन्हा सैपाक घरात लॉक झाल्या. नि अधिक वैतागल्या.
पुरुषांच्या या गरजा नसतात. ते दोन जोड कपड्यांवर पूर्ण वर्ष काढू शकतात. तेही बाहेर. घरात तर पट्ट्यापट्यांचा एक बर्म्युडा आणि वर एक गंजिफ्रॉक यावर ते आठवडाच काय, आयुष्य काढू शकतात. कारण त्यांना सतत सैपाकघर नसतं. त्यांना बाहेरची दुनिया असते. मन रमवायला. प्रत्येक पुरुष बाहेरच्या दुनियेतले वेगवेगळे टक्केटोणपे सहन करतो. त्यातून समृद्ध होत जातो. मात्र प्रत्येक स्त्री, मग ती मजुराची बायको असो वा साहेबाची, तिला सैपाकघरात स्वतःला सिद्ध करावं लागतं. त्यातून वेळ मिळाला तर उडा. पण कोरोनाने ते पार्ट टाईम उडणं पण बंद करून टाकलंय गृहीणींचं. वर्क फ्रॉम होम करणाऱ्या स्त्रिया तर दुहेरी चक्रात अडकल्यायत. घरचे नि बाहेरचे बॉस सांभाळताना तारेवरची कसरत करतायत.
पुरुष घरात बसूनही ऑफिसची कामं करतायत. पगार घेतायत. उरल्या वेळात टाईमपास करतायत. सोमिवर. वेगवेगळ्या गोष्टी शिकतायत.
फार फार तर दारू मिळत नाही, नि मिळाली तर बसायला मित्रमंडळी घावत नाहीत. एवढीच काय ती खंत उरी बाळगत चारी ठाव गिळत तंगड्या पसरणं एवढीच गोची पुरुषांची या कोरोनाने केली असेल तर केलीय.
मी मध्यमवर्गापुरतं बोलतेय. इथं लगेच कामगार नि मजूर नि बेरोजगार घुसडू नका. प्रत्येक वर्गाच्या समस्या असतात. नि त्या वेगळ्या असतात.
आणि या सगळ्या गोष्टी माझ्यावरही आणू नका. मला हॉटेलातलं जेवणच चालत नाही ही माझी कोरोना नसतानाचीही स्थिती होती.
संकटांपुढे, मग ते संकट आस्मानी असो वा सुलतानी, आधी ढाल म्हणून उभं राहावं लागतं ते बायांना. पहिला हल्ला सहन करावा लागतो तो त्यांना. या लॉकडाऊनच्या काळात घरगुती हिंसाचाराचेही प्रमाण वाढलेय असं आकडेवारी सांगतेय. आधीच मार खात असलेल्या स्त्रिया आता जास्त मार खातायत. कारण त्यांचे पुरुषोत्तम आता दिवसरात्र त्यांच्या डोक्यावर घरातच बसलेले आहेत. ते त्यांचं सगळं फ्रस्ट्रेशन, नोकरी गेली असेल तर अधिकच, घरातल्या बायापोरांवर काढताहेत.
पुरुष रिटायर्ड होतात. नित्याच्या कामातून, वर्षानुवर्षाच्या कंटाळवाण्या चक्रातून सुटतात. पण बहुतांश स्त्रियांची आजही वय झालं तरी या ड्युटीतून सुटका नसते. त्या कधी सैपाकघरातून रिटायर्ड होतच नाहीत ही वास्तविकता आहे.
लॉकडाऊनच्या या काळात स्त्रिया अधिक डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता आहे. मात्र त्यांच्या डिप्रेशनकडे कधी आजवर गांभीर्याने बघितलंच गेलेलं नाही. त्यांच्या डिप्रेशनला नेहमी बायकांची बडबड, बायकांचे आजार, बायकांचा स्वभाव अशी लेबलं लावून त्याकडे दुर्लक्ष केलं गेलंय. अनेकदा तर आपण डिप्रेशनमध्ये आहोत हे स्त्रियांना स्वतःलाही कळत नाही. आपणच कुठे तरी घरच्यांच्या अपेक्षांना कमी पडतोय असा गिल्टही त्या बाळगून राहतात. आणि स्वतःकडे दुर्लक्ष करत त्याही तसंच रेटत राहतात. त्यामुळे आताही काही सांगितलं, तर कोरोनाची परिस्थिती काय फक्त स्त्रियाच सहन करतायत का? असे प्रश्न विचारले जातील. अपवाद सगळीकडे आहेत. सगळ्याच स्त्रियांची ही स्थिती नसेल, पण बहुतांश गृहिणींची सध्या हीच परिस्थिती आहे.
पुरुषही सहन करतायत. मात्र दोघांच्या समस्या वेगळ्या आहेत. यात पुरुषांना दोष देण्याचा अजिबात हेतू नाही माझा. निदान या पोस्टमध्ये तरी नाही. आणि ही परिस्थितीही आज ना उद्या बदलेल. मात्र सध्यातरी स्त्रियांच्या या समस्यांकडे गांभीर्याने बघून त्यांना काहीतरी चेंज देणं/मिळणं आवश्यक आहे. कारण आता सहनशक्तीच्या शेवटच्या टप्प्यात आहेत त्या. येत्या काळात अशा परिस्थिती पुन्हा पुन्हा उद्भवू शकतात. तेव्हा त्याची मानसिक आणि व्यावहारिक तयारी आतापासून करायला हवी नि काही बदल घडवायला हवेत. - अलका गांधी-असेरकर
Like
Comment

Jun 20, 2020

योगाला पर्याय नाही - २

योगपरिचय -

योग आणि व्यायाम यात फरक -

योग असो वा व्यायाम, आधी तर तुम्हाला फिटनेसची आवड हवी. आपलं स्वतःवर प्रेम हवं. prevention is better than cure या उक्तीवर विश्वास हवा. हे जात्याच नसेल, तर जबरदस्तीने किंवा तात्पुरतं यातील काहीही केल्याने एक परसेंटही फायदा होणार नाही. 
तहान लागली म्हणून विहीर खणायला घेत नसतात, तद्वतच काहीतरी आजार झाला, समस्या झाली म्हणून लगेच योग किंवा व्यायाम यापैकी काहीही केल्याने लगेच फायदा मिळणार नसतो. तरीदेखील काही किरकोळ आजार, उदा. गुडघेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी इत्यादींवर योगाने त्वरीत आराम मिळतोही अनेकदा. 
परंतु योग असो वा व्यायाम यांना आपल्या दैनंदिन जीवनात रोजच्या आन्हीकांप्रमाणे किंवा दिनचर्येप्रमाणे स्थान दिले तरच तुम्हाला त्याचा सर्वांगीण फायदा मिळू शकतो. 
थोडक्यात 'तुरंत दान महापुण्य' असे हे प्रकार नाहीत. 

दोन्हीतला फरक जाणून घेण्याआधी आपण दोन्हीचे महत्त्व पाहू या. 
योग आणि व्यायाम या दोन्ही संपूर्ण भिन्न गोष्टी आहेत. हे नेहमी लक्षात ठेवायला हवं. त्यांचा परस्परांशी काहीही संबंध नाही. मात्र त्यातील साम्य बघितलं तर ते एकच आहे ते म्हणजे दोन्हींची आपल्या जीवनात नितांत गरज आहे. योग केला म्हणजे व्यायामाची गरज नाही असं नाही, आणि व्यायाम केला म्हणजे योग करण्याची गरज नाही असंही नाही. दोन्ही आपापल्या ठिकाणी वेगवेगळ्या पण आरोग्यासाठीच फायदा मिळवून देणाऱ्या गोष्टी आहेत. 

योग, व्यायाम, चालणं आणि प्राणायाम या चारी गोष्टी वेगवेगळ्या आहेत आणि चारी आपापल्या जागी महत्त्वाच्या आणि फायदेशीर आहेत. त्यामुळे या चारी गोष्टींचा आपल्या दिनचर्येत सहभाग हवा. यासाठी दिवसभरातून आपल्या सोयीने कमीत कमी एक ते सव्वा तास काढला तरी पुरेसा ठरतो. मात्र ह्या सगळ्या गोष्टी एकाच वेळात करू नये. सकाळी योग आणि प्राणायाम तर संध्याकाळी चालणँ आणि व्यायाम असं अर्धा अर्धा तास विभागणी करू शकतो. 

योग आणि व्यायाम यातील फरक -

१. योग केल्याने शरीरातील स्नायू लवचिक होतात. तर व्यायामाने ते स्नायू मजबूत होतात. 

२. योगाने चपळता वाढते, तर व्यायामाने स्टॅमिना वाढतो. 

३. योग शरीराबरोबरच मनस्वास्थ्यही देते. किंबहुना योग मनस्वास्थ्यावरच अधिक भर देतो. तर व्यायामाचा आणि मनस्वास्थ्याचा तसा काही थेट संबंध नसतो. 

४. योग करत असताना मन एकाग्र करण्यावर अधिक भर असतो. तर व्यायाम करताना आपलं शरीर सगळ्या हालचाली करत असतं, पण तेव्हा मन स्थिर असेलच असं नाही. व्यायाम शिकवणारे देखील तुम्हाला मन केंद्रित करा असं सांगत नाहीत सहसा. त्यामुळे तुम्ही एका बाजूला वेट ट्रेनिंग करत असाल मात्र मन तेव्हा सैरभैर इकडे तिकडे फिरत असेल. त्यामुळे तुमचे ताणतणाव, अस्वस्थता हे तसेच राहतील.

५. योग हा संथ, सावकाश आणि स्थिर प्रकार आहे. तर व्यायाम हा जलदगती आणि न थांबता करण्याचा प्रकार आहे. 

६. योग करताना मध्ये मध्ये विश्रांती आवश्यक असते. शरीराला पूर्ण विश्रांती देऊनच दुसरं, पुढचं योगासन केलं जातं. व्यायामात मात्र मध्ये अशी विश्रांती फारशी घेतली जात नाही. एकदा का शरीर वॉर्म अप झालं की एका मागोमाग एक व्यायाम जलदगतीने केले जातात.

७. संथ आणि स्थिर गतीने केल्यामुळे योग हा प्रकार दुर्बल, वृद्ध, आजारी, स्त्रिया अशा सगळ्या व्यक्ती करू शकतात. नव्याने शिकू शकतात. मात्र व्यायाम करताना दुर्बल, वृद्ध, स्त्रिया, आजारी यांच्यावर बंधनं येतात. त्यांना सगळ्यांना व्यायाम झेपेलच असं नाही. योग मात्र लहान मुलं सोडल्यास कोणत्याही वयातील व्यक्ती करू शकतात. अगदी ऐंशीच्या घरातील व्यक्तीही योग शिकू शकतात. अर्थात त्यांनी करण्याचे वा नव्याने शिकण्याचे प्रकार वेगळे आणि तज्ज्ञांच्या देखरेखीखाली असतात.

योगदर्शनात श्लोकच आहे - 
युवावृद्धोतीवृद्धो वा, व्याधितो दुर्बलोsपि वा |
अभ्यासात्सिदधिमाप्नोती सर्वयोगेष्वतंद्रितः || 

म्हणजेच, तरुण, वृद्ध, अतीवृद्ध, व्याधीग्रस्त, दुर्बल असे सर्व लोक प्रयत्नांनी योग साध्य करू शकतात असे 'हठप्रदिपिका' या योगसंबंधी असलेल्या महत्त्वाच्या ग्रंथात स्पष्ट सांगितलेले आहे. 

८. योग हा शब्द 'युज्' या धातूपासून आलेला आहे. युज् म्हणजे जोडणे. योग जोडण्याचे काम करतो. हे मूळ जोडणे आत्म्याशी परमात्म्याला स्वरुपातले आहे. अर्थात त्यासाठी आधी माणसाने माणसाशी जोडून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे योग माणसामाणसाला जवळ आणतो. व्यायामात तसा काही हेतू नसतो. उलट स्नायू बलवान झाले की अहंकार आणि इतरांवर ताकदीचे प्रयोग करण्याची इच्छा होऊ शकते. 

९. व्यायाम केल्यानंतर थकवा येतो. आरामाची गरज भासते. तर योग केल्यानंतर थकवा न येता अजून ताजेतवाने वाटते. योग केल्यानंतर आरामाची गरज नसते. तुम्ही लगेच आपल्या कामाला लागू शकता.

वरील फरकातून व्यायामाला कमी लेखण्याचा अजिबात हेतू नाही. मी वरती आधीच सांगितलेले आहे, की व्यायामही शरीराला तितकाच गरजेचा आहे. मात्र व्यायाम आणि योग हे दोन्ही पूर्णपणे भिन्न आहेत, दोन्हीचे फायदे वेगळे आहेत. हे समजून घ्यायला हवे. 

अर्थात योग असो वा व्यायाम, या दोन्ही गोष्टी दैनंदिन जीवनात जीवनावश्यक गोष्टी म्हणून त्यांचा कायमसाठी स्वीकार केल्यासच निरामय जीवनाचा आनंद मिळू शकतो. या कधीतरी सवडीने करण्याच्या गोष्टी नव्हेत.

तरीदेखील मनुष्यस्वभाव म्हटल्यावर आपल्याला या गोष्टींचा आळस येतोच. कंटाळा येतो. आज नको उद्या करू असेही होते. मानवी प्रवृत्ती पाहता ही गोष्ट अशी नाहीच, की एकदम उत्साह येईल आणि आपण ती करायला सदैव तयार असू. त्यासाठी मानसिक तयारी करत राहावी लागते. मनाला बजावत राहावं लागतं. हे नाही केलं तर शरीर लवकर साथ सोडू लागेल हे चित्र डोळयासमोर येत राहायला हवं. आज उठता बसताना त्रास होतोय, उद्या चालायला होईल, परवा अंथरुण धरून बसावं लागेल. असे चित्र (ज्यात बऱ्यापैकी वास्तवही आहेच) डोळ्यासमोर आणले की लगेच आपण मॅट टाकून तयारी करतो हा माझा स्वानुभव आहे. आज तर चाळीशीतच लोकांना अनेक व्याधी जडू लागल्या आहेत. 
त्यामुळे या आळसावर आणि नकारात्मकतेवर प्रत्येकाने आपापल्या परीने उपाय शोधून काढायचा आहे.

काही गोष्टी मी सुचवते. त्या केल्यास बऱ्यापैकी खंड न पडता या गोष्टी केल्या जातात.

उदा. 
  • सकाळी उठल्यापासूनच मनाला एकदोनदा बजावून ठेवायचे की सकाळी (किंवा संध्याकाळी, सोयीनुसार) व्यायाम/योग करायचा आहे. 
  • दोन तीन वेळा जाता येता घरातल्यांशी बोलायचे, 'अजून योग/व्यायाम राहिलाय. करायचाय.'
  • योग मॅट/सतरंजी जे असेल ते टाकून ठेवायचे. ते जाता येता दिसल्याने सवड झाली की लगेच करण्याची इच्छा होते. 
  • एखाद दिवस खंड पडल्यास दुसऱ्या दिवशी मनाला बजावायचे. काल राहिलं, आज चालणार नाही. करायलाच हवं.
  • कधी वेळ कमी असेल, तर रोजची सगळी आसने किंवा प्रकार न करता मोजकेच काही प्रकार का होईना पण करून घ्यायचे. संपूर्ण सुट्टी मारायची नाही. 
अशाप्रकारे मानसिक तयारी केली तर आठवड्यातून चार दिवस तरी व्यायाम/योग हे केले जातातच. ते केले नाही तर अस्वस्थ वाटेल त्या दिवशी आपण जिंकलो असं समजायचं. योग/व्यायाम यांच्यावर प्रेम बसलं पाहिजे. ज्याप्रमाणे प्रेमाची व्यक्ती क्षणभरही आपल्या मनातून दूर होत नाही, तसंच हे प्रकार आपल्या मनात ठाण मांडून बसले पाहिजेत. किंवा ज्याप्रमाणे बीपीची गोळी एकदा लागली की आयुष्यभर नाईलाजाने, आठवणीने घेत राहावी लागते. सोडून चालत नाही, त्याचप्रमाणे एकदा योग स्वीकारला की तो सोडायचा नाही असे ठरवून टाकले की होतेच. बाय द वे, योगसाधनेने बीपी शंभर टक्के बरा होतो आणि बीपीची गोळी सुटते. डायबेटीस कंट्रोल मध्ये राहतो. दम्याच्या विकारात आराम मिळतो, थायरॉईड बरा होतो. थायरॉईडची गोळीही सुटते. हे सत्य आहे. 
त्यामुळे स्वतः योग करा आणि स्वतः त्याची प्रचिती घ्या. 

हे बिनपैशाचे औषध आहे. सुखी निरामय जीवनासाठी. व्यायामासाठी तरी जिम लागते, जिमचे पैसे भरावे लागतात मात्र योगसाधनेसाठी लागते ती फक्त एक मॅट किंवा सतरंजी आणि थोडा आपला वेळ. बाकी पाच पैसेही लागत नाहीत.

जिस को खुद से हो प्यार... वो योग से कैसे करे इन्कार...?


किसी पिछले जनम की बात...

मुगले आजम हा सिनेमा पन्नास वर्षानंतर रंगीत झाला, त्यालाही आता जवळपास 20 एक वर्ष लोटली. 🤦काळ किती भराभर चाललाय...    तेव्हा टीव्हीवर दिलीप क...