Jul 7, 2020

पाऊस -

पाऊस दारात आला की पावसावरची कविता त्याच्या झोळीत टाकावी लागते. नवीन नसली तर जुन्या कपड्यांप्रमाणे जुनी द्यावी. पण त्याला विन्मुख पाठवू नये..
पाऊस-
मी पावसाळी धबधब्यासारखी बोलत गेले
तू दुष्काळी नदीसारखा आटत गेलास
निरोपाचे मेघ तुझ्यापर्यंत पोचलेच नाहीत
आणि स्नेहाचे कोंभ आपल्या मैत्रीतून रुजलेच नाहीत.......
पावसाला कळत नाही कुठे लिहावी अक्षरे
कुठे शाई ओघळत राहते तर कुठे पान कोरे
मी पावसाच्या कविता हल्ली करतच नाही
ऊनमाखल्या श्रावणसरी मनात भरत नाही
आभाळव्यापून असलेला कोरडा मेघ झरत नाही
मी दाराला इंद्रधनू टांगले
आणि माझे घर दृष्टावले
स्नेहीसोबती म्हणवणारे पांगले
तेव्हापासून मी छत्रीचा आडोसा करते
पावसाला माझ्यापासून चार हात दूरच ठेवते.....
माझी लेखणी पाऊस झरत असती
तर मी मराठवाड्यावर कविता केली असती
माझी लेखणी प्रसवते षंढ शब्दांची पिल्लं
जी टिचभर वहीत जन्म घेऊन
तिथंच मरण पावतात...........
मी हल्ली पावसाच्या कविता करतच नाही
आभाळव्यापून असलेला कोरडा मेघ झरत नाही..............
- अलका गांधी-असेरकर

No comments:

Post a Comment

किसी पिछले जनम की बात...

मुगले आजम हा सिनेमा पन्नास वर्षानंतर रंगीत झाला, त्यालाही आता जवळपास 20 एक वर्ष लोटली. 🤦काळ किती भराभर चाललाय...    तेव्हा टीव्हीवर दिलीप क...