Aug 2, 2020

दोन स्त्रियांमधील उत्तम मैत्री - आणि कुसुमाग्रजांची कविता.

दोन स्त्रियांमध्ये उत्तम मैत्री असू शकते का? -
साधारण मैत्रीचे दाखले, उदाहरणं दिली जातात ती पुरुषांच्याच मैत्रीची. मघा डॉ. सचीन लांडगे यांनी देखील ते लिहिलेय.
सहसा स्त्रियांच्या मैत्रीची उदाहरणे दिली जात नाहीत.
उलट स्त्रीच स्त्रीची कशी शत्रू असते वगैरे मीठमसाला लावून पसरवले जाते.
त्यावरून ...
परवा एका मैत्रिणीशी कुसुमाग्रजांच्या 'उषास्वप्न' या कवितेवर बोलणं चाललं होतं. मला खूप आवडते ती कविता. एकेकाळी तोंडपाठ होती मला ती मोठीच्या मोठी कविता. आताही बरीचशी आठवते म्हणताना..
त्यावर बोलत असताना तिला त्या उषा-अनिरुद्धच्या कहाणीत अधिक प्रकर्षाने जाणवला तो उषा आणि चित्रलेखा या दोघींच्यातला मैत्रीसंबंध. म्हणजे तिला उषा-अनिरुद्धच्या प्रेमापेक्षाही या दोघींच्या मैत्रीने अधिक भुरळ घातली.
आणि खरंही आहे
सहसा स्त्रिया आपल्या प्रियकराबद्दल मैत्रिणींशीही बोलत नाहीत. स्त्रियांमध्ये गुपितं राखली जात नाहीत, म्हणून त्या कुणाला सांगत नाहीत म्हणतात. शिवाय स्त्रिया जेलसही असतात. मैत्रिणीला एवढा चांगला बॉयफ्रेन्ड मिळाला तर त्या जळणार कदाचित. काड्या करतील कदाचित. अशीही भीती असते की काय कोण जाणे...
पण इथे ती आपल्या मैत्रिणीला, चित्रलेखाला आपल्या स्वप्नांत आलेल्या अनोळखी राजकुमाराबद्दल सांगते. तो आपल्याला हवाय हे सांगते. त्याच्याशिवाय मला सगळं उदास वाटतंय हेही सांगते. आणि चित्रलेखा एकेका राजकुमाराची चित्रं काढत जाते. ती उत्तम चित्रकार असते आणि ती पृथ्वी, स्वर्ग आणि पाताळ या तिन्ही लोकांतील सगळ्या राजकुमारांना ओळखत असते. (म्हणजे त्या काळात ती किती फिरत असणार हे बघा..)
जेव्हा अनिरुद्धचं चित्र ती काढते, तेव्हा उषा म्हणते की हाच तो. पण उषा-अनिरुद्ध यांच्या बापांचं वैर असतं. अनिरुद्ध हा कृष्णाचा नातू. आणि कृष्ण आणि बाणासूर हे तर शत्रू. हे लग्न कसं होणार?
मग चित्रलेखा आपल्या साथीदारांसह रात्रीची चोरमार्गाने अनिरुद्धच्या महालात शिरते. तिथे तो मंचकावर झोपलेला असतो. त्याला तसाच झोपलेला मंचकासह उचलून त्याला किडनॅप करून ती उषेच्या महालात आणून ठेवते.
अर्थात उषेला बघताक्षणी तोही तिच्या प्रेमात पडतो. दोघे तिथे गांधर्व विवाह करतात. आणि तो अनेक दिवस उषेच्या महालीच राहतो. आणि नंतर कृष्ण-बाणासूराचं युद्धं बिद्ध...
पण दोन स्त्रियांमध्येही अशी मैत्री असू शकते याचे हे उत्तम उदाहरण आहे. पुराणातल्याच श्रीकृष्ण-अर्जून, श्रीकृष्ण- द्रौपदी, दुर्योधन-कर्ण इत्यादींच्या मैत्रीची उदाहरणे उत्तम मैत्रीची म्हणून दिली जाताना, दोन स्त्रियांमधील या मैत्रीचं, उषा आणि चित्रलेखाचं उदाहरण का दिलं जात नाही?
कारण मग स्त्रियांना बदनाम कसं करता येईल ना?
-
-
-
'उषास्वप्न' या कुसुमाग्रजांच्या कवितेत ही पूर्ण कथा नाहीच. एवढ्या मोठ्या कवितेत उषा केवळ आपल्याला पडलेल्या स्वप्नाबद्दल, त्या स्वप्नातील राजकुमाराबद्दल आपल्या मैत्रिणीला सांगते एवढंच वर्णन आहे. (चित्रलेखाचंही नाव नाही त्यात) पण ते कुसुमाग्रजांच्या शब्दसंपदेचं विलक्षण दर्शन घडवणारं आहे. वाचकांना उषा-अनिरुद्धची प्रेमकहाणी ठाऊक असल्याचं गृहीत धरून ते लिहितात.
पृथ्वी वृत्तातली ही कविता मस्त चालीत म्हणता येते. आणि तेव्हाचे कवी वृत्तात लिहित असूनही किती सहज लिहीत, कुठेही ओढूनताणून शब्द बसवल्याचे किंवा काढल्याचे वाटत नाही. प्रत्येक ओळ चपखल. शब्द चपखल.
सर्वात महत्त्वाचे कवीने कुठे थांबायचे, हे त्यांना चांगलंच उमजलेलं असतं. सकाळी उठल्यावर सूर्याला कोसत चढत्या क्रमाने कविता उषेच्या रात्रीच्या स्वप्नांत पुढे पुढे सरकते, तेव्हा उषा-अनिरुद्धचा प्रणयही आता कवी शब्दात चितारणार असे वाटत असतानाच तिथे ते विवेकी चतुराईने थांबतात. त्या शेवटच्या ओळी -
गळून विनयापरी वसन गे पडे रेशमी
तशीच सरुनी पुढे विझविला सखे दिप मी
सखे विझविला दिवा विझविलेच सारे दिवे
भये मजसी जाग ये, सकळ लोपली वैभवे
कुठे न अनिरुद्ध तो, प्रणय ते कुठे मंदीर
कठोर पडला कळे किरण मात्र नेत्रांवर......
आणि इथे कविता संपते.
- अलका गांधी-असेरकर

1 comment:

  1. कुसुमाग्रज यांच्या या कवितेबद्दल पहिल्यांदाच वाचलं..समर्पक विश्लेषण...

    ReplyDelete

किसी पिछले जनम की बात...

मुगले आजम हा सिनेमा पन्नास वर्षानंतर रंगीत झाला, त्यालाही आता जवळपास 20 एक वर्ष लोटली. 🤦काळ किती भराभर चाललाय...    तेव्हा टीव्हीवर दिलीप क...