Jul 12, 2020

संसार आणि कामाची विभागणी -

कामाची विभागणी-
अजूनही घरातलं काम कुणी करायचं, सैपाक कुणी करायचा, साफसफाई कुणी करायची याच्या चर्चा माध्यमांमधून जोरशोरसे झडत असतात.
लॉकडाऊन काळ सोडून द्या.
माझं लग्न होऊन तीस वर्ष उलटली.
आमच्या घरात कधीही हे काम बाईचं नि हे काम पुरुषाचं अशी विभागणी नव्हती. अशी भावना नव्हती.
अर्थात हे कदाचित आम्हीच दोघं आणि नंतर मुलगा असं स्वतंत्र कुटुंब असल्याने शक्य झालं असेल. एकत्र, अगदी सासू सासरे जरी असते फक्त सोबत, तरी तेव्हा हे कितपत शक्य झालं असतं ते सांगू शकत नाही.
लग्नानंतर मी जवळपास पूर्णवेळ गृहीणी राहण्याचे ठरवले. अधुनमधून पार्ट टाईम नोकऱ्या केल्या. पण त्या पॉकेटमनी मिळवून देण्यापुरत्याच होत्या.
त्यावेळी नवरा मात्र पूर्णवेळ नोकरी करत होता.
आणि तरीही तो घरची कामं सगळी माझ्या बरोबरीने करत होता. अगदी सैपाकासह. मला रात्री जागता येत होतं, तर त्याला सकाळी लवकर उठता येत होतं. साहजिकच सकाळी उठल्यावर पाणी भरून घेण्यापासून दूध, चहा, मुलाला आंघोळ घालून शाळेसाठी सोडून येणं हे त्याने वर्षानुवर्ष केलं. सहजपणे केलं. त्यानंतर मी उठायचे, आठ साडेआठ वाजता. नंतरची कामं मी करत असे आणि तो ऑफिसला निघत असे.
मुलाचा अभ्यास नेहमी मीच घेतला. त्याने क्वचितच गणित वगैरे शिकवलं असेल. मुलाच्या आजारपणात रात्री मी जागले. कारण त्याला रात्री जागवत नसे.
तेव्हापासून आजपर्यंत आम्ही दोघंही बाहेर सोफ्यावर लोळत टाईमपास करत असू, तरी मी बिनधास्त, 'अरे, जरा पाणी आण ना मला प्यायला', ते ग्रीन टी दे ना करून, औषधं दे ना आणून असं काहीही म्हणू शकते आणि तोही उठून आणून देऊ शकतो. देतो. वैतागला असेल, कंटाळला असेल, तर नाही देत, तुझी तू घे उठूनही म्हणू शकतो. आणि हे व्हाईस वर्साही असू शकतं.
सैपाकघरातली कामं अर्धवट सोडून मी मोबाईलवर टाईमपास करू शकते, माझी अनुवादाची कामं हातात घेऊ शकते. कविता वगैरे खरडत बसू शकते, आणि मी बराच वेळ उठत नाही हे पाहून तो सैपाकघरातील उर्वरीत कामं उरकून घेतो. सहजपणे. अगदी रात्री दही विरजण्यापर्यंत. मात्र त्याची त्याला आठवण करून द्यावी लागते. तो पूर्णवेळ नोकरी करत असल्याने अर्थात सगळी कामं करत असला तरी प्रामुख्याने सैपाकघर आणि त्यातली कामे याचे आयोजन, नियोजन माझ्याकडेच होते आणि अधिकतर सैपाकघरातली कामंही माझ्याकडेच असतात.
मी कोणत्याही दिवशी, कोणत्याही क्षणी माझे बाहेरचे कार्यक्रम ठरवते, ठरवू शकते. हवा तितका वेळ किंवा तितके दिवस बाहेर राहू शकते. अगदी मुलगा लहान होता तेव्हाही. आणि प्रत्येकवेळी हे बाहेरचे कार्यक्रम कामाचेच असतात असं नाही, तर मौजमजेसाठी जाणे, मित्रमैत्रिणींबरोबर फिरणे, माहेरच्या अडीअडचणींना धावणे, नातेवाईकांच्या समारंभांना हजर राहणे, नाटकसिनेमा पाहायला जाणे, असे कोणतेही असू शकतात. विशेष म्हणजे या काळात नवरा कधीही फोन करून हैराण करत नाही. 'कुठे आहेस, कधी येतेस' असे लाडानेही किंवा काळजीनेही कधी विचारत नाही. अगदीच अपवाद काही काम असलं तरच तो असे फोन करतो.
मी बाहेरगावाहून येणार असेल, तर जेवणाच्या वेळी वरणभात वांगीबटाटा भाजी (ही ठरलेली अशावेळी.) आणि विकतच्या पोळ्या आणून ठेवतो. मला कधीच आठवत नाही की तो घरी आहे आणि मी बाहेरून येऊन सैपाक केल्यावर तो जेवलाय. तो जेवणासाठी माझ्यावर अवलंबून नसतो. (इथेही कधी कधी बायका मुद्दाम पुरुषांना आपल्यावर डिपेन्डन्ट ठेवतात. त्यात त्यांना कुणीतरी आपल्यावर अवलंबून आहे याचाही एक आनंद मिळत असतो असं पाहिलंय.)
आजही मुलाचे लाड माझ्यापेक्षा तो जास्त करतो. त्याने काही खाण्याची फर्माईश केली आणि मी नाही म्हटले तर तो पुरी करतो. करण्याचा प्रयत्न करतो.
थोडक्यात एखादी स्त्री घर सांभाळून नोकरीही करते, तद्वतच माझ्या घरातील या सद्गृहस्थाने घरची बाहेरची कामं सांभाळून नोकरी केली. त्याची नोकरीही बैठी नव्हती. फिरायला, साईटवर जायला लागत असे. नोकरीच्या वेळा फिक्स नव्हत्या. तरीही.
विशेष म्हणजे जवळपास हेच वातावरण मला माहेरी मिळाले होते. याबद्दल मी यापूर्वीही लिहिलेले आहे वेळोवेळी. सुदैवाने तेच वातावरण मला लग्नानंतरही नवऱ्याने दिले.
कधी कधी तो माझ्या मित्रांच्या बाबतीत पझेसिव्ह झाला थोडा, नाही असं नाही. परंतु त्याचे स्वरुप फार टोकाचे झाले नाही. किंवा मला रोखण्याकडेही गेले नाही.

हे सगळं सांगायचे कारण म्हणजे, हे सगळं सांगणं मला गरजेचं वाटतंय. वर सुरूवातीलाच सांगितलंय त्याप्रमाणे आजही हे पुरुषाचं काम, हे स्त्रीचं अशा चर्चा आणि त्यामागच्या व्यथा, वेदना, त्रास व्यक्त केल्या जातात, तेव्हा असे पुरुषही असतात हे सांगणं मला गरजेचं वाटतं. आणि नवऱ्याचा अभिमानही वाटतो. खरंतर यात अभिमानाची काही गोष्टच नाही. पण तो जर अपवादाने असेल असा, तर त्या अपवादाचा आणि त्यामुळे मला कंफर्टेबल आयुष्य लाभलं याचा आनंद नक्कीच आहे. कारण त्याने सोयी सोयीने, किंवा मला मदत म्हणून ही कामं केली नाही. किंवा मी स्त्रीवादी आहे आणि मी त्याला तसं करायला भाग पाडलंय म्हणून केलीत असंही नाही. तर घर माझंही आहे, आणि ही जबाबदारी माझीही आहे या भावनेतून त्याने ती केली.
सर्वसाधारणपणे लग्नाआधी जे पुरुष एकटे राहिलेले असतात कोणत्याही कारणाने, मग ते शिक्षणासाठी असेल, नोकरीसाठी असेल, असे पुरुष बरेचसे स्वावलंबी असतात. तसा माझा नवराही नोकरीनिमित्ताने बरीच वर्षे एकटा राहिलेला असल्याने लग्नाआधीच त्याला सगळं घरकाम करण्याची सवय होती. सैपाकासह. सुरुवातीच्या बेसिक सैपाकातील अनेक टिप्स तर त्यानेच मला दिल्या होत्या.
मात्र जे पुरुष आईच्या हाताखाली लाडोबाच राहिलेले असतात लग्न होईपर्यंत त्यांची रवानगी आता आईकडून बायकोकडे होते आणि ते इकडची काडी तिकडे करत नाहीत असा अनुभव आहे. तोही अनुभव माझ्या घरातच आहे. माझ्या मुलाच्या रुपाने.
लहानपणापासून बाबाला सगळी कामं घरात करताना पाहूनही तो मात्र इकडची काडी तिकडे करत नाही. आणि मी त्याच्यापुढे हात टेकलेत. दोन्ही टोकाची उदाहरणे माझ्या घरातच आहेत. त्यामुळे इथं माझं कौतुक सांगत नाहीए.
मात्र याचा अर्थ आमचा संसार अगदी आदर्श झाला, आणि आमच्यात भांडणं झाली नाहीत असं अजिबातच नाही. अगदी कडाक्याची झाली नि होतात. डिव्होर्स मागण्यापर्यंत जातात. तीस वर्षात ३० वेळा डिव्होर्स मागितला गेला असेल आजवर. पण त्याची कारणं वेगळी होती. वेगळी आहेत. इथं आत्ता आपण फक्त घरकामाबद्दल बोलत असल्याने त्या कारणांची चर्चा करण्याचं कारण नाही इतकंच.
मला सांगायला आवडेल, की माझ्या धाकट्या बहिणीला देखील असाच नवरा मिळाला. तो तर श्रीमंत आणि पारंपरिक घरातला मुलगा होता. परंतु घरकाम आणि मुलाचे संगोपन त्याने अनेकदा तिच्या बरोबरीने केले.
आणि हे मी तीस वर्ष पूर्वीपासून बघत, अनुभवत आले असल्याने मला ते सहज वाटतंय आणि सगळीकडे असंच असेल, किंवा असावं असंही वाटतं. परंतु तसं ते सगळीकडे आजही नाही ही वस्तुस्थिती आहे.
अनेकदा जेव्हा मी कट्टर स्त्रीवादी मतं मांडते, लेखन करते, तेव्हा अनेकदा लोकांना वाटतं की हिला घरातच असा त्रास झाला असणार, होत असणार. परंतु रुढार्थाने मला तेवढा त्रास झालाच नाही माझ्या स्वतःच्या घरात. आणि रुढार्थाने माझा नवरा स्त्रीवादी नाही. स्त्रीवादाबदद्ल तो काहीही सांगू शकणार नाही. तरीही तो वागला ते समानतेनेच.
तरीही पितृसत्ताक समाजरचनेच्या टोचण्या सासरी माहेरी मलाही कमी अधिक प्रमाणात टोचलेल्या आहेतच.
अर्धांगी नावाचा एक फेसबूक ग्रुप मी आणि माझ्या दोघी मैत्रिणी मिळून २०११ ते २०१६ पर्यंत जोमाने चालवत होतो. लोकांना खूप आवडतही होता तो ग्रुप. तिथं फक्त स्त्रिया नसून पुरुषही होते. अनेक पुरुषांनी तेव्हा तिथे आम्हाला नव्यानेच नाण्याची दुसरी बाजू समजतेय असं सांगितलं होतं. अनेक पुरुषांनी 'आम्ही आजवर देत असलेल्या स्त्रीवाचक शिव्या बंद केल्या आहेत आवर्जून' असंही येऊन सांगितलं होतं. आम्हा तिघी ग्रुप चालवणाऱ्या मैत्रिणींपैकी रुढार्थाने कुणालाच वर्चस्ववादी नवरा भेटलेला नव्हता. कोणती बंधने नव्हती. तिघींनाही मुलगेच होते. मुलगी असण्याच्या कथित समस्याही नव्हत्या. तरी आम्ही या विषयावर लिहित होतो. कारण या समस्या कुणा एकीच्या वैयक्तिक नसून त्या सामाजिक आहेत. कमी अधिक प्रमाणात. म्हणून त्या अनुभवावरून मला वाटतंय की सतत हा विषय चर्चिला गेला पाहिजे या उद्देशाने ही पोस्ट आहे. ही माझ्या नवऱ्याच्या कौतुकाची पोस्ट तर अजिबात नाही. तशा प्रतिक्रियाही मला अपेक्षित नाहीत. फक्त इतक्या सहजपणे घरकामाची विभागणी असायला हवी. आणि असते. असे पुरुषही असतात. त्यांना समाजासमोर आणायला हवे. जेणेकरून इतरांना त्यातून काही बोध मिळू शकेल. तिथे स्त्री-पुरुष असा भेद नसावा. दोघांनाही स्पेस असावी. आपले छंद, करीअर करण्याची. कधी संसार बिनधास्तपणे दुसऱ्याच्या भरोशावर टाकून हिंडण्याफिरण्याची, भटकण्याचीही मुभा मिळावी. तेव्हाच लग्न हे खऱ्या अर्थाने सहजीवन होते. नवरा बायको खऱ्या अर्थाने एकमेकांचे मित्र मैत्रिण होतात. पण आपल्याकडे खेकड्यासारखे एकमेकांच्या पायात पाय घालून एकमेकांना एकाच जागी जकडून ठेवण्याला, हे काम माझे, हे तुझे असे करण्याला दुर्दैवाने संसार म्हटलं जातं नि त्या खेकड्यांना नवरा बायको म्हटलं जातं. ना मी मुक्त राहणार, ना तुला राहू देणार. एकमेकांचं शेपूट बनून, ते सदैव धरून ठेवून एकमेकांना ओढत राहायचं. फरपटत राहायचं. व्यक्ती म्हणून एकमेकांचं स्वातंत्र्य दडपून टाकून नवरा म्हणजे पैसे कमवणारा भारवाही हमाल नि बायको म्हणजे घरातली मोलकरीण अशा तऱ्हेनेच बहुतांश संसार रेटले जाताना दिसत असतात. सुदैवाने मला वेगळे, स्वतंत्र आयुष्य लाभले.
- अलका गांधी-असेरकर

Jul 9, 2020

मर्द असाही असतो

turkish wedding dance
तो डान्स करतो तेव्हा निव्वळ मोहक दिसतो
बाथरूम मध्ये मोठ मोठ्याने गातो तेव्हा सेक्सी वाटतो
तो सैपाक करत असतो
तेव्हा सुंदर दिसतो
भाजी चिरताना लाजवाब दिसतो
तो मुलाला आंघोळ घालत असतो तेव्हा निर्मळ दिसतो
मुलीच्या केसांना रिबिनी बांधून देताना प्रेमळ दिसतो
तो घर आवरताना जबाबदार असतो
दुरुस्तीची कामे चटकन करताना जादूगार वाटतो
तो खेळताना कमाल असतो
आणि रडताना निष्पाप दिसतो
त्याचं घरात असणंही आश्वासक असतं
तो बाहेर असला की घर वाट पहात असतं
पुरुष आक्रमक होऊन
तलवार हातात घेऊन
फक्त लढताना मर्द असतो ही भ्रामक कल्पना आहे...
नि तो फक्त पैसे कमवणारा
भारवाही हमाल असतो ही बिचाऱ्यावर
लादलेली संकल्पना आहे.... त्याच्यावर मर्दपणा लादला नाही,
तर तो खरंच मर्द असतो........
- अलका गांधी-असेरकरwedding dance
Like
Comment

Jul 8, 2020

लॉकडाऊन कविता -

बा. सी. मर्ढेकरांची क्षमा मागून.. त्यांच्या 'कितीतरी दिवसांत नाही चांदण्यात गेलो' कवितेवर आधारित.. 

कितीतरी दिवसांत 
नाही मॉल मध्ये गेलो 
कितीतरी दिवसांत 
नाही गर्दीत घुसलो 

भरल्या बाजाराची ओढ 
आहे माझी ही जुनीच 
आणि धावत्या लोकलची
शीळ ओळखीची तीच 

केव्हातरी बाजारात 
पुन्हा जाऊन निर्भय 
लोकलच्या गर्दीत 
धक्के खाईन निर्मय 

आज अंतरात भीती 
खुल्या बाजाराची भारी 
आणि लोकलची गर्दी 
अंगावर काटा काढी 

बरा म्हणून हा इथे
एकांत या बिळातला 
बरी होम डिलिव्हरी 
आणि आधार गुगल पेचा 

- अलका असेरकर

Jul 7, 2020

पाऊस -

पाऊस दारात आला की पावसावरची कविता त्याच्या झोळीत टाकावी लागते. नवीन नसली तर जुन्या कपड्यांप्रमाणे जुनी द्यावी. पण त्याला विन्मुख पाठवू नये..
पाऊस-
मी पावसाळी धबधब्यासारखी बोलत गेले
तू दुष्काळी नदीसारखा आटत गेलास
निरोपाचे मेघ तुझ्यापर्यंत पोचलेच नाहीत
आणि स्नेहाचे कोंभ आपल्या मैत्रीतून रुजलेच नाहीत.......
पावसाला कळत नाही कुठे लिहावी अक्षरे
कुठे शाई ओघळत राहते तर कुठे पान कोरे
मी पावसाच्या कविता हल्ली करतच नाही
ऊनमाखल्या श्रावणसरी मनात भरत नाही
आभाळव्यापून असलेला कोरडा मेघ झरत नाही
मी दाराला इंद्रधनू टांगले
आणि माझे घर दृष्टावले
स्नेहीसोबती म्हणवणारे पांगले
तेव्हापासून मी छत्रीचा आडोसा करते
पावसाला माझ्यापासून चार हात दूरच ठेवते.....
माझी लेखणी पाऊस झरत असती
तर मी मराठवाड्यावर कविता केली असती
माझी लेखणी प्रसवते षंढ शब्दांची पिल्लं
जी टिचभर वहीत जन्म घेऊन
तिथंच मरण पावतात...........
मी हल्ली पावसाच्या कविता करतच नाही
आभाळव्यापून असलेला कोरडा मेघ झरत नाही..............
- अलका गांधी-असेरकर

Jul 4, 2020

आजची फेसबूक पोस्ट - (४-७-२०२०)

मंदिरं, देव इत्यादी ब्राह्मणांचे वर्चस्व आहे म्हटले तर गणेशोत्सव, नवरात्री आदी मंडळात ब्राम्हणी मंडळं फारशी दिसत नाहीत.
जर टिळक नावाच्या ब्राम्हणाने सार्वजनिक गणपतीचं स्तोम माजवलं तर त्यात ब्राम्हण अधिक का दिसत नाहीत?
अनेक सो कॉल्ड 'राजे' मंडळांचे पदाधिकारी हे बहुजन समाजातील आहेत आणि त्यांची तेथील दादागिरी, वर्चस्व बहुश्रुत आहे. अगदी भक्तांना ढकलून देणे, रपटे देणे, स्त्रियांचीही मानगूट धरून त्यांना बाजूला करणे इत्यादी प्रकार तिथे घडतात. अनेक गणेशोत्सव मंडळांच्या मागे दारू, पत्ते, जुगार यांचे अड्डे असतात. मिरवणुकीत दारू पिऊन धिंगाणे असतात. यात किती ब्राम्हण असतात? आणि अशा मंडळांवर कितीशी टिका होते?
शिवाय इथे इतके देव, धर्म आणि पंथ आहेत की त्या सगळ्या ठिकाणी ब्राम्हण नसतात. जंगम, गुरव, भंडारी, गोसावी आणि तत्सम अनेक लोकांच्या हातातही बरीच ठिकाणं असतात. त्यामुळे एकूणच देव, धर्मावर ब्राम्हणी सत्ता आहे म्हणणं चूकीचं आहे.
हीच गोष्ट विविध शैक्षणिक, सहकारी इत्यादी संस्थांची आहे.
अशा बहुतेक सामाजिक संस्था बहुजनसमाजाच्या हातात आहेत आणि तिथं तिथं त्यांचं जातवर्चस्व काम करतंय. मी स्वतः याचे बरेच अनुभव घेतलेले आहेत. ब्राम्हणी संस्था अशा फार कमी दिसतात. आणि ज्या काही थोड्याफार आहेत त्यांच्यात प्रमाणात उदारभाव अधिक दिसलेला आहे.
तरी देखील राग, फ्रस्ट्रेशन काढण्यासाठी सगळ्यांना ब्राम्हणच लागतो. नाहीतर शिताफीने ब्राम्हण्यवाद वगैरे नावं ठेवायची.
अगदी सुरुवातीपासून पाहाता राजकीय सत्ता ही क्षत्रियांच्या हातात राहिलीय. आणि त्यांच्याच घरात स्त्रियांचे स्थान अधिक दुय्यम दिसत आलेय. सीता, द्रौपदी ही उदाहरणं क्षत्रियांच्या घरातली आहेत, न की ब्राम्हणांच्या. ब्राम्हण असलेल्या रावणाच्या घरात मात्र स्त्रियांना अधिक स्वातंत्र्य होतं. आणि देव म्हणून प्रामुख्याने पुजले गेलेले राम कृष्ण शंकर ईत्यादीही क्षत्रिय आहेत.
वटपौर्णिमा, वैभवलक्ष्मी, संतोषीमाता, गुरुवार, मंगळवार, सत्यनारायण नि असली सगळी व्रतं करण्यात बहुजन स्त्रिया अधिक आघाडीवर आहेत. ब्राम्हण स्त्रियांपेक्षा.
आरएसएस ब्राम्हणी पक्ष म्हटला जातो, पण त्यात बहुतांश सगळ्याच समाजातील लोक दिसतात. खुद्द पंतप्रधान हे ओबीसी आहेत. अडवाणी पण बहुधा ब्राम्हण नाहीत.
जातीयवादात प्रत्येक समाज भरडला गेलाय इथं. शीखांचे हत्याकांड झालेय. तसेच ब्राम्हणांचेही झालेय. मुसलमानांचे झालेय नि हिंदूंचेही झालेय. जैनांचे झालेय नि बौद्धांचेही झालेय. तरीही सर्वसमावेशक न बोलता सगळे आपापली कार्डं खेळून राजकारण करण्यात पुढे असतात.
अर्थात माझ्या दृष्टीने यात ही सगळी पुरुषांची राजकारणं आहेत. त्यामुळे मी कुणाही एका समाजाच्या बाजूची नाही. हे समाज, ह्या जाती, हे धर्म, पंथ सगळी पुरुषांची सत्तास्थानं आहेत. आणि पुरुष पूर्वीपासूनच एकमेकांची डोकी फोडत आलेले आहेत, एकमेकांच्या बायका पळवत आले आहेत. युद्ध, दंगली, मारामाऱ्या, बलात्कार, स्त्रियांवर वर्चस्व गाजवणे, त्यांच्या शारीरिक स्थितीचा फायदा घेऊन त्यांना आपल्या टाचेखाली ठेवण्याचा प्रयत्न करत राहणे, हे खास पुरुषी प्रांत आहेत. त्यामुळे कुणीही नावाजण्यासारखे नाहीच. फारतर दगडापेक्षा वीट मऊ म्हणून तिथं डोकं फोडून घ्यायचं इतकंच.
अलका गांधी-असेरकर
Madhuri Ingle, Swati Bedekar and १४ others
३ Comments
1 Share

Jul 2, 2020

कोकणी पाऊस - (जुलै २०१९)

मुंबईचा पाऊस ... ही अनुभवायची चीज आहे..
खरंतर मुंबईचा म्हणायचं... कोकण पट्ट्यात कुठेही..
सध्या लागलाय असाच मुंबईत... नेहमीचंच ते मुंबईची तुंबई होणे, गाड्या बंद पडणे.. सुटी घेऊन घरात बसणे.. शाळा बंद इत्यादी...
पण ह्या समस्या पावसाच्या नाहीत ना... व्यवस्थेच्या आहेत.. त्यासाठी इतक्या सुंदर पावसाला का दोष द्यायचा...
तो तर मस्त धुँवाधार कोसळतो... आसमंत चिंब करतो... तलाव भरतो...
काल बातमी होती की तलावात आठ की पंधरा दिवसच पुरेल इतकं पाणी आहे मुंबईकराना..
आज बहुधा वर्षभर पुरेल इतकं पाणी चारच दिवसात ओतून गेलाय तो...
मुंबईचा पावसाळी आसमंत नेमका बघायचा असेल, तर रीमझीम गिरे सावन हे अमिताभ मौसमीवर चित्रीत झालेलं गाणं बघा... सध्याही तोच आसमंत आहे...
पण मला आठवतोय तो कोकणातल्या खेड्यातला ३०-४० वर्षांपूर्वीचा... पाऊस...
पाऊस सुरू झाला, की तालुक्याशीही संपर्क तुटणार... निदान तीन महिने तरी... धो धो कोसळणार...
चार महिने लागणाऱ्या सर्व गरजेच्या वस्तू भरून ठेवायच्या... चुलीतल्या लाकडांपासून ते धान्यापर्यंत सारंच... त्याला आगोटी भरणे हे नाव असायचं.. मे अखेरीस जो तो आगोटी भरण्याच्या गडबडीत... घरं शाकारण्याच्या गडबडीत... एकदा झड सुरू झाली की आठ आठ दिवस अविरत, संतत कोसळणारा पाऊस हा महाराष्ट्राच्या अन्य भागात क्वचितच अनुभवास येत असेल... छोट्या छोट्या नद्यांना, वहाळांना पूर... आमच्या खेड्यावर सातवीपर्यंत शाळा... आजुबाजूच्या अजून छोट्या खेड्यांना जेमतेम पाचवीपर्यंत किंवा शाळाच नाही अशी स्थिती... ती मुलं सहावी सातवीसाठी आमच्या शाळेत येत.. हे वहाळ, ओढे, नद्या ओलांडून... शेताच्या बांधाबांधावर चालत... शिक्षणाची जागृती तेव्हाच झाली होती सुरू... मुली पण येत...
सहावी सातवीतली म्हणजे जेमतेम बाराचौदा वर्षांची मुलं... ना कोणी पालक येत सोडायला.. ना गाडी घोडे... पाच पाच किमीचं अंतर सोबती सोबतीने चालत येत... पण कधी कोणता अनवस्था प्रसंग ओढवला नाही.. कुठलं मूल गायब झालं नाही.. कुठली मुलगी अत्याचाराला बळी पडली नाही... यात सगळ्या जातीतली मुलं असायची..
की कधी कुठल्या मुलाला दप्तराचं ओझं झालं नाही..
आज आई सोडते बस स्टॅन्डवर.. नी बसमधून मुलं शाळेत जातात.. तरी त्यांच्या दप्तराच्या ओझ्याच्या बातम्या होतात... ही पोकळ पिझ्झा बर्गर वडापाववाली पिढी ... की हॉर्लिक्सवाली...?
असो... ते न दिवस राहिले आता... किंवा असतीलही कुठे कुठे अजून... किंवा आहेतही.. अनिल साबळेचे फोटो आणि पोस्ट दाखवतातच अजून... तेव्हा मला माझं खेडंच आठवतंय...
पावसाचं कौतुक तुम्हाला हो... गोरगरीबांचं काय असा गळा काढतीलच लोक...
बारीश का मिजाज हम से पुछिए
हम.. जो कच्चे मकान के वासी है....
हा शेर आहेच कुणाचा तरी...
पण हाल गरीबांचेच नसतात... मुंबईत कोटी रुपयाचा फ्लॅटही गळतो... ओल घेतो..फ्लॅट, चाळी यांच्या घरातही पाणी शिरते.. आयुष्यभराच्या कमाईचा सत्यानाश करते... मोसमच तसा आहे... इथे निसर्गाविरुद्ध धाब्याची घरं आली... पण धाबे गळतातच इथले... मुंबईत एकवेळ धाब्याला पर्याय नाही म्हणू... पण कोकणातही लोक धाब्याची घऱं का बांधतात देव जाणे... तिथे उतरत्या छपराची, कौलांचीच घरं हवी...
गोरगरीबांचे हाल सगळ्याच ऋतुत असतात... त्याला ऋतु नव्हे, तर माणसं आणि त्यांच्या सगळ्या व्यवस्थाच कारणीभूत असतात..
ऋतु सुंदर असतात..
हिमाचल प्रदेश, भूतान आदी ठिकाणी कधीही अवचित पडणारा पाऊस अनुभवलाय... पण नाही आवडला... तो बर्फासारखा गार, सुयांसारखा तीक्ष्ण पाऊस... एक थेंब पडला अंगावर तर हाडापर्यंत थंडी गेली... कोकणातला पाऊस तसा नाही.. रिमझिम पडो वा मुसळधार... तुम्ही बिनधास्त भिजू शकता... नव्हे भिजतोच आपण... छत्री नुसती असावी म्हणून असते हातात... घरात शिरल्यावर कपडे बदलावेच लागतात महाराज..आणि केस पुसावेच लागतात खसाखसा... आणि घरात कपड्यांचे ढीग साचतात....
असो.. मी या पावसावर कितीही आणि काहीही लिहू शकते.. एन्डलेस... पण वाचणाऱ्याला किती बोअर मारायचं याच्या मी काही मर्यादा ठरवून ठेवल्यात...
----

पाऊस म्हटला की अजून एक गोष्ट आठवते..
महर्षी धोंडो केशव कर्वे कोकणातल्या दापोलीजवळच्या मुरुडचे... छोटंसं खेडं...
त्यांच्या काळी मॅट्रीकची परीक्षा द्यायला कोकणातून मुंबईला यावं लागायचं... साल असेल १८५६-६६ च्या दरम्यानचं काहीतरी.. दिडशे वर्षांपूर्वी...
तेव्हा एसट्या नव्हत्या... रेल्वेचा प्रश्नच नव्हता.. कोकणातली माणसं मुंबईत यायची ती बोटीने फक्त... भाऊच्या धक्क्यावर. बोटीने पोचायलाही दोनदोन तीन तीन दिवस लागायचे...
जूनमध्ये परीक्षा होती बाळ कर्वेची... आणि कोकणातल्या पावसाने इंगा दाखवला.. असा कोसळू लागला की बोटी बंद झाल्या.. पुन्हा कधी सुरू होतील निश्चित नव्हते... परीक्षा जवळ येत चालली होती.. कर्वेंची तडफड सुरू झाली.. काय करावे...
अजूनही काही मुलं होती त्यांच्याबरोबरची..
तिघाचौघांनी ठरवले.. चालत जायचे... मुंबईला... (दापोली ते मुंबई, किमान चारशे किमी अंतर असेल माझ्या अंदाजे)
आणि निघाल्या स्वाऱ्या...
पोचल्या मुंबईला कदम कदम बढाए जा म्हणत... कधी?
आठ दिवसांनी....
पाय सुजून टम्म झाले होते.. पण परीक्षा मिळाली...
हे धडे का नसतात मुलांच्या पाठ्यपुस्तकात...?
(ब्राम्हणांच्या मुलांनाही सगळं सोपं नव्हतं, हेही लक्षात घ्यायला हवं.. भटाबामणांच्या नावाने करवादणाऱ्या लोकांनी. बामणांच्या पहिल्या पिढ्याही कष्टानेच शिकल्या.. माधुकरी मागून शिकल्या.. गाव घर सोडून कुठं कुठं राहून शिकल्या.)
आजच्या मुलांना दप्तराचं ओझं कमी करून हवंय...!
तक्रारींना अंत नसतो.. स्वीडनसारख्या देशाच्या सुविधा मिळाल्या तरी माणूस तक्रारखोर असेल तर तो समाधानी नाहीच राहणार...
आणि हे कर्वे तब्येतीने नाजूक म्हणून प्रसिद्ध होते तेव्हा बरं का.. हा मुलगा फार जगणार नाही असं म्हटलं जात होतं तेव्हा... तो मुलगा १०४ वर्षे जगला... आता बोला...
आणि नुसताच जगला नाही, तर असामान्य कार्य करत जगला.. समाजाच्या विरुद्ध सुधारणा करत जगला... र. धों. कर्वेंसारखा मुलगा जन्माला घालत जगला...
(मला हे कळतच नाही... जिथे शाळा तिथेच परीक्षा का नाही घेतल्या जात ते.. अजूनही शाळा वेगळी आणि परीक्षेचं सेंटर वेगळं...हा काय प्रकार आहे... माझ्यावेळीही दुसऱ्या गावात यायचं सेंटर. किती टेन्शनमध्ये असायची आमची चिमुकली मनं आणि डोकी... कसलंच साधन नसायचं... दिवसाकाठी दोन तीन चालणाऱ्या एसटी... बाकी काहीच नाही... ती बंद पडली की गेलं वर्ष वाया... मुलांसाठी काहीही सोयी केल्या जायच्या नाही तेव्हा... यायचं तर या परीक्षा द्यायला नाहीतर मरा तिकडे...)

- अलका गांधी-असेरकर

Jul 1, 2020

मामी -

मामी -
मामा मोठा तालेवार.....या ओळीला साजेसा तो मामा होता. व्यापारी परंतु प्रामाणिक. कोणाच्या अध्यात ना मध्यात. मात्र देखणा आणि शैौकीन.. सिनेमांचा, रहस्यकथांचा, नवीन नवीन वस्तू खरेदी करण्याचा..1974 सालीच त्याने इम्पोर्टेड टीव्ही घेतलेला. 6000 रुपयात. तेव्हा सहा हजार काय पण सहा रुपयेही खिशात असणं म्हणजे भारी वाटण्याचा काळ. प्रिया स्कूटर घेतली. तेव्हा गावात पहिला टिव्ही आणि पहिली स्कूटर मामाकडे होती.
मामी सुंदर, हुशार,...
पण मुलबाळ नाही..
मामाचा भाऊ याच्या विरुद्ध. त्याला चार मुलं. दोन मुली, दोन मुलगे. सगळी मुलं लहान लहान असतानाच त्याची बायको वारली.
बायको वारल्यावर भावाच्या चारही मुलांना हा तालेवार मामा आपल्या घरी घेऊन आला. त्यातल्या सर्वात लहान मुलाला आपलं नाव लावलं. त्याचे खूप लाड केले.
मामामामीला मुलबाळ नाही. पण घर मुलंबाळं असलेल्या कुटुंबापेक्षा भरलेलं. नेहमीच.
मामा अगदी तरूण असतानाच त्याच्या मामाला, जो एकटा राहत होता, बायको सोडून गेली होती, आणि आता वय झालं होतं अशा त्याच्या मामालाही आपल्या घरी कायमचं घेऊन आला होता. कारण मामाची आईही त्याच्या लहानपणीच वारलेली. आणि सारी भावंडं आजोळी वाढलेली. तेव्हा त्याच्या या एकट्या पडलेल्या मामानेच सा-यांना आईप्रमाणे सांभाळलेलं.
तर अशा या मामाला तो आपल्या घरी घेऊन आलेला आणि मरेपर्यंत त्याला सांभाळलेलं.
नंतर ही चार मुलं आणून ठेवली.
त्याचवेळी दोन बहिणी खेड्यावर दिलेल्या. त्यांच्या मुलांना तिथं आठवी नंतर शाळा नाही म्हणून एक एक करत मॅट्रिक होईपर्यंत सगळ्यांना आपल्या घरी चार चार वर्ष ठेवून घेतलेलं.
त्यातच एक मीही होते तीन वर्ष. 8 वी ते 10 वी.
दुसरी बहीण गुजरातेत. विधवा झालेली. एकच मुलगा. त्याला शिक्षणासाठी मनीऑर्डर पाठवायचा.
-आता मी शीर्षक दिलंय 'मामी'.. आणि सांगतेय सगळं मामाबद्दल. परंतु खरी कहाणी मामीचीच आहे.
मुलबाळ नसतानाही मामीच्या घरात रोज पंधरा माणसं कमीत कमी जेवत असत.
व्यापार मोठा. त्यात एक मुनीमजी (हाही मामींचा लांबचा भाऊ. म्हणजे घरच्यासारखाच. तिथेच राहायचा.) दोन नोकर, दोन गडी, एक मोलकरीण यांच्यासह आम्ही पाच, आणि आलेला गेलेला सततचा. हे रोजचे जेवणारे.
या सर्वांचा सैपाक मामी एकटी करत असे.

कपाळावर एकही आठी नाही. मामाशी कधीच भांडण नाही. दोघांचं प्रेम होतं एकमेकांवर. त्या काळात बायकोला लाडाच्या नावाने बोलवायचा मामा. सगळ्यांच्या समोर. मुंबईहून झुळझुळीत साड्या आणायचा. बाकीच्यांशी वागताना तो कडक असायचा. पण कधी तिच्याशी मोठ्या आवाजात बोलायचा नाही. रागवायचा नाही.

हा सैपाक म्हणजे गडी नोकरांना लागणा-या रोज जाड भाकरी, मुलांसाठी चपात्या, आणि मामाला आवडतात म्हणून फुलके. हे सगळं रोज करावं लागायचं. सकाळ संध्याकाळ. सैपाकाला बाई वगैरे ठेवण्याची पद्धत नव्हती.
एकच होतं. मामीचं सतत डोकं दुखायचं. सतत कपाळाला करकचून आवळून बांधलेली पट्टी असायची. तिला रात्री झोप लागायची नाही. रोज झोपेची गोळी ठरलेली होती. कधी कधी तर दोन गोळ्या.
आणि आम्ही लहान. आईला असं हे दुखतंय ते दुखतंय करताना कधीच पाहिलेलं नव्हतं. आणि मामीचं दुःख समजून घेण्याएवढी अक्कल यायला तर मला पुढे अजून तिसेक वर्ष लागली. त्यामुळे तेव्हा मामीचा राग यायचा. सारखं डोकं धरून पडून राहते. झोपून राहते म्हणून. तरी बरं की आम्हाला काही फार काम करावं लागायचं नाही. मात्र वरकाम, थोडी मदत याची तिला अपेक्षा असायची.
असंही आम्ही घरात असायचोच कुठे. दिवसभर तर शाळा, ट्युशन्स. ती फार फार तर ओटा धुऊन घे. कूकर लावून दे एवढीच कामं आम्हाला सांगायची. तरी ते जीवावर यायचं.

आणखी एक होतं. मामीला देवदेव करण्याचं वेड लागलं होतं. अर्थात घरच्या घरीच. पण सकाळी दोन दोन तास तिला देवपुजेला लागत. तेही सोवळ्यात. मोठमोठ्याने भजनं म्हणत. साग्रसंगीत पुजा. नैवेद्य. देवपुजेची भांडी घासण्याचं काम सकाळी ते मुनिमजी करून देत. मामीचा सख्खा मामेभाऊच होता तो. त्याआधी मामाचे मामा करून देत. हे दोघेही तिला दुकानातून वेळ मिळाला की कामात मदत करत.
आणि मामीच्या नणंदा म्हणत, "ही त्या दोघांकडून कामं करून घेते."
मामा आपल्याला कापडचोपड करत नाही याचाही या दोघी बहिणींना राग यायचा. पण आपल्या मुलांना चार चार वर्ष सांभाळतोय याची मात्र त्यांना कदर दिसायची नाही.
तरी बरं, धाकट्या मामाची बायको वारल्यानंतर त्याच्या चार मुलांचं ही मामीच करत होती. सुरुवातीला त्यातल्या दोघांना मामीची एक एक नणंद आपल्या घरी घेऊन गेली होती. पण दोघींनी त्यांना जेमतेम वर्षभर रडतखडत सांभाळलं आणि नंतर ती मुलं सुट्टीत मामीकडे आली ती परत यांच्याकडे गेलीच नाहीत. नेहमी तिथेच राहिली.
यातली एक मुलगी थोडी मंदबुद्धी होती. ती मामींना मदत करायची. तिचं पुढे लग्नंही झालं नाही. की तिच्यावर फारसे उपचारही झाले नाहीत.

मामाचं दुकान तालेवार दिसायचं. पण काळाच्या ओघात उतरती कळा लागली. याचं कारण मामाची तब्येत खालावली. बीपी, हार्ट यांची दुखणी सुरु झाली. त्यात लाचखोर भेसळप्रतिबंधक खात्यातील अधिकाऱ्यांनी लाच न दिल्यामुळे विनाकारणच त्याच्यावर भेसळीचा खटला भरला.
- मामाला आशा होती की भावाची सांभाळलेली मुलं आपला धंदा सांभाळतील. परंतु त्यांच्या कोणातच ती क्षमता नव्हती. पोरं शिकलीही नाहीत फार. एक मंदबुद्धी. एक मुलगा व्यसनी, चंगीभंगी झाला. मोठी मुलगी चांगली होती. तिचं मामीनेच तिच्यायोग्य मुलगा बघून गुजरातेत लग्नं करून दिलं.
दुकान मंद झालं. नोकर-चाकर उरले नाही. पैसा उरला नाही. त्या काळात बचतीची सवयच नव्हती लोकांना फारशी. मोठ्ठं घर मात्र बांधलेलं होतं. शेवटी मामीने दुकान ताब्यात घेतलं. जमेल तसं तीच चालवू लागली. जिथे मुंबई, पुणा, सांगली, सातारा इथून मालाचे ट्रक्स भरभरून येत. आणि आजूबाजूचे व्यापारी मामाचा हेवा, मत्सर करीत तिथे त्याच व्यापाऱ्यांकडून पाच पाच दहा दहा किलो माल विकत घेऊन मामी आपल्या दुकानात थोडं मार्जिन ठेवून विकू लागली. परंतु मामीने या गोष्टींचा कधी इगो बाळगला नाही. आपला काळ पडता आहे बघून त्याच व्यापाऱ्यांची मदत घेतली जे व्यापारी कधीकाळी मामांचा राग करीत असत.
मामाचं चांगलं चाललेलं असताना तो बँकेत कुणाच्या तरी कर्जाला जामीन राहिला होता. आणि त्या माणसाने कर्ज बुडवलं. वसूलीसाठी बँक मामाच्या मागे लागली. अशावेळी त्या कर्जबुडव्या माणसाच्या पाच किमी दूर असलेल्या घरी जमेल तसे खेटे मारून मामीने थोडीफार उधारी वसूल केली. मामी खमकी होती. अशा परिस्थितीतही चीडताना, भांडताना दिसली नाही. हसत म्हणायची,
"आज माझ्यावर वेळ आलेय म्हणून, नाहीतर या व्यापाऱ्यांच्या दारात तरी पाय़ ठेवला असता का मी कधी? आज तुझा मामा हतबल झालाय म्हणून, पण त्यांच्या राज्यात त्यांनी मला किती सुखात ठेवलं."
आज आश्चर्य वाटतंय, मामी कशात सुख बघत होती कोण जाणे. सतत दुखणारं डोकं, न येणारी झोप हे तिच्या स्वतःचं मुलबाळ नसल्याचंच लक्षण होतं का? मामाचं तिच्यावर असलेलं खूप प्रेम हेच तिला सुख वाटत होतं का?
मामाचा स्वाभिमान तिने नेहमी जपला.
मामा शेजारणीशी हसून खेळून बोलत असे, तिच्याशी चेष्टामस्करी करत असे. तर त्याच्या बहिणींना त्याचं तिच्याशी प्रकरण असल्याचं वाटायचं. तसं ते होतं की नव्हतं ते देवच जाणे. परंतु मामीने त्याबद्दल कधीच एका शब्दानेही आक्षेप घेतला नव्हता.

पण याचा अर्थ ती मामाच्या होला हो करणारी बाई होती आणि मामाच्या पुरुषी सत्तेपुढे वाकलेली होती असं अजिबातच नव्हतं. त्याचे सगळे निर्णय ती डोळे झाकून मान्य करत नव्हती. जेव्हा मामाने आपल्या धाकट्या विधुर भावाच्या लग्नाचा प्रस्ताव मांडला, तेव्हा तिने ठामपणे त्या गोष्टीला विरोध केला. एकतर तो भाऊ इतका सक्षम नव्हता. तिने म्हटलं, जर त्यांचं लग्न करायचं असेल, तर आपल्या मुलांना पण त्यांनी घेऊन जावं लागेल त्यांच्याजवळ. मग मी करणार नाही या मुलांचं काही. यावर दोन्ही मामा गप्प बसले होते. कारण चार मुलांचं करणारी बायको त्याला भेटणं कठीण होतं.
ती सगळी कामं कर्तव्य समजून कर्तृत्वाने पेलत होती. नाईलाज म्हणून करत नव्हती ती. आम्हा मुलांना तिचा धाक असे माफक. शिस्त होती. शिवाय तिचं सोवळं ओवळंही होतं थोडं. ते आम्हाला पाळावं लागे. गावातल्या इतर समवयीन स्त्रियांशी तिचे संंबंध माफक पण आदराचे होते. असंही श्रीमंत घरातली म्हणून तिला आदर होताच गावात. त्यात ती सुंदर, खंबीर, प्रभावी व्यक्तिमत्व असलेली. आवश्यक तिथे आणि तेवढ्यापुरतीच ती त्यांच्यात मिसळत असे.
मामीचं माहेरही तालेवार होतं. तिला पाठिंबा देणारं होतं. सर्व धबडग्याला कंटाळली की तीही आठ आठ दिवस माहेरी जाऊन राहायची. खरंतर जाताना ती सैपाकाला बाई ठेवून जायची. तरी आम्हाला ती सारखी माहेरी जाते याचा मनातून राग यायचा. पण तिलाही आरामाची, बदलाची गरज आहे हे कळण्याचं आमचं वय नव्हतं.
शेवटी अशाने दुकानही चालणारं नव्हतं. मामीने निर्णय घेतला. हे मोठ्ठं घर विकलं तर दहाएक लाख मिळणार होते. त्यातून बँकेची जामीन रक्कम भरता येईल. आणि उरलेले पैसे व्याजावर ठेवून भाड्याने राहता येईल. मोठ्या घरातून मामी समोरच व्यापाऱ्याने बांधलेल्या एका चाळीत तीन रुममध्ये भाड्याने राहायला गेली. चेहऱ्यावर कोणताही गिल्ट, दुःख, अपमानाची भावना नव्हती. परंतु व्यसनी मुलगा, जो दिराचा सांभाळलेला होता, ज्याला आपलं नाव लावलं होतं. तो काही न करता त्रास मात्र करत असे. आता हा त्रास कसा सोडवायचा. त्यात मामाचे आजार. तिने पुन्हा निर्णय घेतला. गुजरातला एका खेड्यावर पिढीजाद जुनं घर रिकामं पडलेलं होतं. ती म्हणाली,
"इथं भाड्याने राहाण्यापेक्षा मी तिथं चालली जाते यांना घेऊन."
आणि मामी ज्या परिसरात जन्मापासून वाढली तो सोडून गुजरातला निघून गेली. तेव्हा तिचं वय होतं सत्तरीच्या घरात. मुलाला सांगितलं तू कुठे तरी नोकरी बघ. माझ्यासोबत येऊ नकोस.
मामी आजही त्या खेड्यावर राहतेय. वयाची पंच्याऐंशी वर्ष उलटलेयत. ती राहते ते खेडं अगदीच खेडं आहे. गावातले अर्धे लोक घरं बंद करून शहरात निघून गेलेली आहेत. खेड्यावर दवाखाना पण नाही. बाजूच्या तालुक्याच्या गावी जावं लागतं. अशा खेड्यावर मामी मामाला घेऊन राहिली. सोबत त्या मंदबुद्धी पुतणीला घेतलं. ती खूप बडबड करते, पण मामीची काळजी घेते. चारेक हजार व्याज येतं. त्यात तिचं भागतं.
तिला मी विचारलं,
"मामी, भीती नाही वाटत इतक्या अशा आडगावी राहायला?"
"छे, भीती कसली! आणि आता या वयात बरंवाईट व्हायचंच आमचं. डॉक्टर काय करणार आहे, वेळ आल्यावर? माझा देव आहे की माझ्या पाठीशी. इथं शांत वाटतंय उलट."
आणि मामाची वेळ आली. मामीने दोन तासाच्या अंतरावर राहणाऱ्या पुतणीला, जावयाला बोलावून घेतले. त्यांनी येऊन मग मामाला तालुक्याच्या दवाखान्यात हलवले. चार दिवसांत मामा गेला.
मामा जाऊनही चार वर्षे झाली. मामी आपल्या छोट्या पुतणीसह तिथेच राहतेय. गावातल्या छोट्याशा मंदिरात दर्शनाला जाते. तब्येत नरमगरम राहते. पण मामीला भीती, कुढत राहणं ह्या गोष्टी ठाऊकच नाहीत. मोठ्या पुतणीकडे जाऊन राहण्याचा, तिची मदत घेण्याचा विचारही करत नाही.
मामीला सांगितलं, "या मंदबुद्धी पुतणीला कशाला जवळ ठेवताय? तिच्या मोठ्या बहिणीचंही कर्तव्य नाही का तिच्याप्रती? तिच्याकडे द्या पाठवून तिला."
तेव्हा मामी म्हणते, "त्या बिचारीचा संसार का खराब करू हिला तिच्याकडे पाठवून? मी मुलीसारखं वाढवलं तर ती माझीच जबाबदारी आहे. माझ्या पश्चात ती बघेल तिचं काय करायचं ते. मलाही सोबत होतेय तिची, त्रास असला तरी."
कुठून आलं असेल हे बळ मामीला.. आयुष्यात एवढी स्थित्यंतरं आली तरी कधी कशाबद्दल तक्रार, रडगाणी गायली नाहीत तिने. ती स्थित्यंतर खंबीरपणे पेलली.
मामी 'इदं न मम' या तत्वावरच जगली आयुष्यभर...
सुखदुःखे समे कृत्वा, लाभालाभौ जयाजयौ....हे तत्व नुसतं सुविचार म्हणून नव्हते तिच्यासाठी. तो तिचा स्वभावच होता. अडचणी आल्या की मी मामींना आठवते. मग मला माझ्या डोंगराएवढ्या अडचणी मोहरीएवढ्या वाटू लागतात. जगण्याचं बळ मिळतं.
-Alka Aserkar


किसी पिछले जनम की बात...

मुगले आजम हा सिनेमा पन्नास वर्षानंतर रंगीत झाला, त्यालाही आता जवळपास 20 एक वर्ष लोटली. 🤦काळ किती भराभर चाललाय...    तेव्हा टीव्हीवर दिलीप क...