विराज जगतापचा खून जातीयवादातून झाला. आज या घटनेकडे जातीभेदाच्या चष्म्यातूनच बघितले जाते. ते मान्यही आहे. जातप्रश्न उग्र आहेच. तरी देखील..
नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे दुर्लक्ष होतंय.
ती बाजू आहे मुलींची...
आपल्या घरातील मुलींनी कोणाशी लग्न करायचं, कोणावर प्रेम करायचं, कोणाशी मैत्री ठेवायची, कोणाशी नाही... हे अजूनही हा पितृप्रधान समाजच ठरवतोय.
आणि हा एकच किस्सा नाही.
अशा बातम्या दर दोन पाच महिन्यांनी येतच असतात.
शिवाय या उघडकीला येणाऱ्या बातम्या. न उघडकीला येणारे असे अनेक किस्से घडत असतील भारताच्या कानाकोपऱ्यात.
चारच दिवसांपूर्वी मी याच विषयावर एक पोस्ट लिहिली होती फेसबूकवर. की मुलींच्या किंवा स्त्रियांच्या बाबतीत जात, धर्म हेच केवळ महत्त्वाचे नाही ठरत. किंवा मुलींनी केवळ दुसऱ्या जातीत किंवा धर्मात लग्न करायचं म्हटलं तरच विरोध होतो असं नाही. तर अजूनही मुलींनी स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायचे म्हटले की घरच्यांना, कुटुंबियांना, समाजाला चालत नाही. अगदी स्वजातीत, स्वधर्मातही आपल्या मर्जीने लग्नं ठरवलेली घरच्यांना आणि विशेषतः घरातल्या पुरुषांना पसंत पडत नाहीत. हीच बहुसंख्य ठिकाणी वृत्ती दिसून येत असते.
तेव्हा त्या पोस्टवर अपेक्षेप्रमाणेच 'आता असं कुठं राहिलंय, तू कुठलं लिहितेस, कुठल्या काळातलं लिहितेस हे ठराविक आपल्या शहरी, सुखासीन कॉर्पोरेट जगात डोळे मिटून दूध पिण्याचं सुख घेणाऱ्या अनेक लोकांना वाटलं होतंच.
अर्थात झोपेचं सोंग घेणाऱ्यांना उठवून दुनिया दाखवता येत नाहीच.
त्यामुळे हे मी त्यांच्यासाठी लिहित नाहीच...
पण जेव्हा जेव्हा प्रेमप्रकरणात एखाद्या मुलाचा खून होतो, किंवा एखादा मुलगा मार खातो, तेव्हा तेव्हा त्यामागे एकेका मुलीचा दडपून टाकलेला निर्णय आणि दडपलेले निर्णयस्वातंत्र्यही असतं. त्यावर फारच कमी बोलले जाते.
म्हणजे अजूनही जात धर्म याच गोष्टी चर्चेसाठी महत्त्वाच्या ठरतात. स्त्रियांचे निर्णयस्वातंत्र्य ही चर्चेची गोष्टच नसते.
जर मुलाला मारता आले नाही, तर अशावेळी मुलींनाच मारून टाकले जाते. अगदी पोटच्या मुलीलाही. तर परक्या मुलाला मारणं त्यांना सहज असणार त्यात नवल ते काय? आता डिसेंबर २०१९ मधलीच कल्याणची तिवारी केस याचे उदाहरण आहे. बापाने मुलीचे प्रेमप्रकरण न पटल्याने तिला मारून तिचे तीन तुकडे करून ते बॅगेत भरून फेकून दिले होते...
आणि सख्ख्या भावाने, बापाने अशा प्रकरणात मुलींना मारून टाकल्याच्या अशा बातम्याही चार सहा महिन्याच्या अंतराने येतच असतात.. तेही महाराष्ट्रासारख्या राज्यात. तर इतर यूपी, बिहार, राजस्थान, हरयाणा सारख्या राज्यांतून काय काय घडत असेल? त्यांच्या तर बातम्याही होत नाहीत. अशा बातम्या या केवळ हिमनगाचे एक टोक असते.
पितृप्रधान समाजाला स्त्रियांचे स्वयंनिर्णयच मान्य नाहीत कुठले... यात जाती धर्माचा काही संबंधच नाही. मुलींनी यांच्या दाव्याला, खुंट्याला बांधून राहायचे. ते सांगतील तिथं जायचे ही वर्चस्ववादी वृत्ती समाजात अजूनही जैसे थे आहे. आणि त्याला कोणतीही जात नि कोणताही धर्म अपवाद नाही, अपवाद वगळता.
आमच्या लहानपणी तर, 'मारून टाकायला हवे अशा पोरींना' असं सहज बोलले जायचे. आमच्या समोरच. त्यामुळे मुलींवर एक धाक, एक दहशत आपोआप बसायची. लग्न तर आईबाबा म्हणतील तिथंच करायचे. ते सांगतील तेव्हाच घराबाहेर जायचे, नि ते सांगतील तसेच कपडे नेसायचे हेच मुलींचे संस्कार. तीच खरी आदर्श मुलगी. हे अगदी धातूवर कोरीव काम केल्याप्रमाणे ठसवले जायचे.
इतकंच कशाला, फेसबूकसारख्या सोशल माध्यमांवरून स्त्रीवादावरच्या चर्चेत देखील पुरुषच आक्रमकपणे निर्णय घेतात. कशाला स्त्रीवाद म्हणायचे नि कशाला नाही ते. स्त्रियांना काय हवे, त्यांच्यासाठी काय योग्य काय अयोग्य तेही पुरुषच ठरवू लागतात. आणि अनेक स्त्रियाही त्यांच्या होला हो करताना दिसतात. वरवर हे दिसायला सौम्य वाटते. परंतु यामागे पितृप्रधानतेची वर्चस्ववादी वृत्तीच असते, जी वेळ पडली की असे गंभीर स्वरूप धारण करते.
आजही, आणि अगदी मुंबई-पुणेसारख्या शहरातही, कित्येक मुलींनाआपल्या मर्जींनी लग्नं ठरवू दिली जात नाहीत. प्रेमात पडलेल्या मुलींना कधी धाकदपटशा, कधी मारहाण, कधी इमोशनल ब्लॅकमेलिंग करून निर्णयापासून परावृत्त केले जाते.
प्रेमप्रकरणात कित्येक वेळा मुली आत्महत्या करायच्या. अवतीभवती बरेच किस्से असे पाहतच मी मोठी झालेय. अशा प्रत्येकवेळी समाज हेच म्हणायचा, 'बरं झालं मेली.. आईबाबांची ईज्जत घालवण्यापेक्षा.'
या अशा यांच्या इज्जतीच्या व्याख्या.
ज्या लोकांना विराजचा खून दिसतो, त्या लोकांना समोर एक मुलीचा निर्णय दडपला गेलाय, कुणाशी मैत्री करायची नि कुणाशी नाही, इतके साधे निर्णय देखील ती घेऊ शकत नाही. जातीभेदाच्या बेड्या तोडू पाहणाऱ्या अशा स्त्रियांना दडपून ठेवले जातेय, तिच्या स्वातंत्र्याचाच बळी पडलाय ते दिसतच नाही. त्यावर चर्चाच नाही?
- अलका गांधी-असेरकर
वेगळा आणि विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा !
ReplyDeleteThank you Raj...
Delete