Jun 19, 2020

योगाला पर्याय नाही.


योगपरिचय - थोडक्यात.

आपण भारतीयांना योग हा शब्द सुपरिचित असतो. साधारण गेल्या वीसेक वर्षांपासून तर योग हा शब्द अगदी सर्वसामान्यांनाही माहीत झालेला आहे. आणि त्याला कारणीभूत म्हणजे रामदेवबाबांसारखे काही योगप्रचारक.
रामदेवबाबांच्या कार्याबाबत मतभेद असले, तरी त्यांनी योग हा घरोघरी पोचवला हे त्यांचे मोठे कार्य  आहे यात दुमत नाही. 
तोपर्यंत योगसाधना म्हणजे कुणी ऋषीमुनी, साधक, तापसी यांनीच करायची गोष्ट अशी समजूत असायची. 
आजही आणि अजूनही योग म्हणजे फार कठीण गोष्ट, ते आपलं काम नव्हे असे म्हणून हात झटकणारे लोकच अधिक पहावयास मिळतात.
 
त्याला कारणही तसेच होते. पूर्वी योग म्हणजे साधक, तपस्वी, ऋषी-मुनी यांनी करण्याचीच गोष्ट होती. 
याला कारण म्हणजे, योग हा मोक्षप्राप्तीकडे नेणारा मार्ग म्हणूनच त्याची आध्यात्मिक ओळख होती. त्याच हेतूने योग शिकला जायचा. आणि त्यासाठी संसाराकडे दुर्लक्ष करणे किंवा संसाराच्या भानगडीतच न पडणे, दूर हिमालयात किंवा जंगलात कुठेतरी एकांतवासात जाऊन गुरुच्या मार्गदर्शनाखाली त्याचा अभ्यास करणे आणि त्यातून खडतर तपश्चर्या करत मोक्षाची आस लावून बसणे हाच योगाचा हेतू असायचा. त्यामुळे अजूनही लोकांचा तसा ग्रह असल्यास नवल नाही. 
मात्र आता विज्ञानयुगात तसे फारसे राहिलेले नाही. म्हणजे हिमालयात योगसाधना, तपश्चर्या करणारे साधूमुनी अजूनही बरेच आहेत. पण याचा अर्थ असा नाही की योग ही फक्त मोक्षाच्याच हेतूने करण्याची साधना आहे.
उलट आता विज्ञानयुगात योगविद्येकडे वेगळ्या, आधुनिक वैज्ञानिक दृष्टीने पाहिले जात आहे. आणि या विद्येचा उपयोग सर्वसामान्यांना रोजचे आयुष्य सुखकारक करण्यासाठी केला जात आहे.  लोक अधिकाधिक योगविद्येकडे वळू लागले आहेत. केवळ भारतातच नव्हे, तर जगभर याचा प्रसार आणि अंगीकार मोठ्या जोरात चालू आहे. 

-----

मोक्ष, अध्यात्म, साधना इत्यादी जडजंबाल हेतूकडून योग सर्वसामान्यांकडे कसा आला?

वर सांगितल्याप्रमाणे हे खरंच आहे, की योगमार्ग हा मोक्षाचा, आत्म्याकडून परमात्म्याकडे प्रवास करणारा मार्ग म्हणून भारतीय दर्शनशास्त्रात महत्त्वाचा होता. मात्र या प्रवासात योगाचा मधला टप्पा जो येतो, तो मानवी शरीराला निरोगी, सुडौल, चपळ, तरतरीत ठेवणारा आहे. एवढेच नव्हे, तर शरीराच्या जोडीला मनालाही स्वास्थ्य़ मिळवून देणारा आहे. मोक्षाच्या दिशेने वाटचाल ही मनावर नियंत्रण ठेवण्यापासून सुरू होते. आणि मोक्ष हा जरी हेतू नाही ठेवला तरी आताच्या धावपळीच्या, ताणतणावाच्या, स्पर्धेच्या युगात मनावर नियंत्रण हेच अधिक महत्त्वाचे झालेले आहे. 
आपण पाहतोय, की आज मानसोपचारतज्ज्ञांची गरज समाजात किती निर्माण झाली आहे ते? आणि हा मार्गही माणसाला पूर्ण मानसिक शांतता देऊ शकत नाही. गोळ्या औषधे, काऊन्सिलिंग इत्यादींनी तात्पुरते बरे वाटते. मात्र मनाचे स्वास्थ्य पूर्ण मिळत नाहीच. 
म्हणूनच योग आणि प्राणायाम हे शिकून घेऊन प्रत्येक व्यक्ती आपली आपण मनावर नियंत्रण ठेवायला आपोआप शिकू लागते. आणि ताणतणावांपासून मुक्त होते इतकंच नव्हे, तर चांगलं सुदृढ आयुष्य जगू लागते. आपल्याला ठाऊकच आहे, की बहुतेक शारीरिक व्याधी या आपल्या मनस्वास्थ्याशी निगडीत असतात. उदा. नव्या युगातील डायबेटीस, बीपी, कॉलेस्ट्रोल, थायरॉईड, कॅन्सर इत्यादीसारखे अनेक जीवघेणे आजार हे थेट आपल्या मनाशी, मानसिक ताणतणावांशी निगडीत आहेत. आधुनिक औषधांनीही ते नियंत्रणात राहतात मात्र पूर्ण बरे होत नाहीत. अशावेळी योग हाच एकमेव मार्ग तुम्हाला यातून सुटका मिळवून देऊ शकतो. अर्थात हे आजार होण्याआधीच ते होऊ नयेत म्हणून वेळीच योगमार्ग स्वीकारा आणि अशा आजारांना दूर ठेवा.

योगाचा हा शारीरिक, मानसिक स्वास्थ्य मिळवून देणारा टप्पाच आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आपण तेवढ्यापुरताच त्याचा विचार करायचा आहे. म्हणूनच यात देव, धर्म, श्रद्धा, आस्तिकता इत्यादी काहीही मध्ये न आणता सर्व जातीधर्मातल्या लोकांनी योगविद्येची कास धरायला हवी. 

----

योगाबद्दलचे गैरसमज -
आपण योगासने बघतो, ती तज्ज्ञांनी केलेली. यु ट्यूब, इतर कार्यक्रम यांतून आपण अवघड अवघड आसनं करणाऱ्या व्यक्ती पाहतो आणि आपण घाबरतो. हे आपल्याला जमणार नाही असे आपण मनाशीच ठरवतो. आणि योगविद्येबद्दल अनेक गैरसमज मनाशी बाळगून बसतो.

१. योग म्हटले की काहीतरी अवघड काम, शरीराला त्रास, शरीराला वेडेवाकडे वळवणे असा समज अनेकांचा असतो.
 (योग हे सोप्याकडून अवघडाकडे नेणारे शास्त्र आहे. सुरूवातीला अगदी सोपी सोपी आसने शिकवली जातात. ज्याप्रमाणे लहान बालकाला आधी पहिलीत घातले जाते. मग हळू हळू अभ्यास, मेहनत, परीक्षा याने तो पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत पोचतो. तसंच यातही आहे. आणि आपल्याला योग्य तेवढेच, आणि तितकेच यातून हवं ते घेऊ शकतो. ज्याप्रमाणे सगळे विद्यार्थी सायन्स, कॉमर्स आर्ट्स ह्या सगळ्या शाखातले ज्ञान घेत नाहीत. आणि सगळेच उच्चशिक्षणापर्यंत पोचत नाहीत. गरजेपुरतंच घेतात. तसंच यातही आपल्या गरजेपुरती आसनं शिकून त्याचाच सराव करू शकतो आणि स्वतःला फिट ठेवू शकतो. योग हा एक मोठी व्याप्ती असलेला विषय आहे. सागर आहे. त्यातच मास्टरी करायची म्हटली तरी एक जन्म पुरणार नाही. पण म्हणून आपल्याला ते सगळंच करायचं आहे असं नाही. आपल्याला फक्त आपल्या गरजेपुरतं पाणी त्यातून शेंदून घ्यायचं आहे.)

२. योग म्हटलं की बारीक, तरुण, सडसडीत लोकांचे काम, आपल्यासारख्या जाड्या लोकांचे, वय झालेल्यांचे ते काम नाही असे वाटणे.
 (कोणत्याही वयातली व्यक्ती आणि कितीही वजन असलेली व्यक्ती योग करू शकते. अगदी लहान मुले आणि गरोदर स्त्रिया, नुकतेच ऑपरेशन झालेल्या, आजारातून उठलेल्या व्यक्ती या सोडून बाकी अगदी ८० वर्षांची व्यक्तीही नव्याने योग शिकायला सुरूवात करू शकते.)

३. योग म्हणजे संसार सोडून, विरागी भाव अंगीकारणे असा एक गैरसमज. 
(आज तर संसारी माणसालाच योगविद्येची गरज अधिक आहे.)

४. योग म्हणजे खाण्यापिण्यावर बंधने, चमचमीत खाणंपिणं सोडून द्यावं लागणार असा एक गैरसमज.
(योग खाण्यापिण्यावर बंधने घालत नाही. तुम्हाला जर काही आजार नसतील, आणि त्या आजाराची पथ्य नसतील, तर योग हे खाऊ नका, ते खाऊ नका असलं काहीही सांगत नाही. अर्थात तुम्ही स्वतः होऊनच जर योग्य आहारविहार जपलात तर योगाचे फायदे अधिक मिळतील एवढंच.)

५. योग म्हणजे दूर कुठेतरी एकांतात राहून साधना करणे हा एक गैरसमज.
 (एक रुमच्या घरातही तुम्ही नित्यनेमाने योग करू शकता. 

६. योग म्हणजे खूप वेळ दयायला हवा, नोकरी व्यवसाय करणाऱ्या, मुलंबाळात व्यस्त असणाऱ्या गृहस्थी लोकांना वेळ कसा मिळणार असा एक गैरसमज बाळगणे.
(असा विचार केला तर आंघोळ, ब्रश करणे, आन्हिके उरकणे, घरातली साफसफाई करणे, शांतपणे बसून जेवणे ह्यातलेही काही करायला नको. हे सगळं जितकं महत्त्वाचं आणि दैनंदिन आहे तितका नि तेवढाच वेळ दैनंदिन योगाला दिला की झालं. त्यासाठी तासंतास काढायची गरज नाही.)

७. योगासाठी अमुकच प्रकारचे कपडे घालावे लागणार असं वाटणे.
 (अगदी साडीतही योग केला जाऊ शकतो.)

८. योग म्हणजे वजन कमी करण्याचा मार्ग - ( हा त्याचा एक परिणाम असू शकतो. मात्र वजन कमी करण्यासाठी योगविद्येचा उपयोग थेट आणि त्वरीत होत नाही.)

आज एवढं पुरे. पुढच्या लेखात भारतातील योगविद्येचा इतिहास, मागोवा, त्यांचे कर्ते, ग्रंथ इत्यादींचा थोडक्यात आढावा घेऊ. 
आणि त्याच्या पुढच्या लेखात योग आणि व्यायाम यातील फरक समजावून घेऊ.
आणि त्यापुढील लेखात भारतात योगविद्या शिकवणाऱ्या संस्था आणि वर्ग यांच्याबद्दल जुजबी माहीत घेऊ.

अलका गांधी-असेरकर.


No comments:

Post a Comment

किसी पिछले जनम की बात...

मुगले आजम हा सिनेमा पन्नास वर्षानंतर रंगीत झाला, त्यालाही आता जवळपास 20 एक वर्ष लोटली. 🤦काळ किती भराभर चाललाय...    तेव्हा टीव्हीवर दिलीप क...