Jun 17, 2020

तांदळाच्या भाकरी -

भाकरी नि मी.. तांदुळाच्या भाकरी.. फुटबॉल सारखी फुगली नाही तर ती भाकरीच नाही..
आठवीत असताना मी भाकरी करायला शिकले. म्हणजे 13 व्या वर्षी.
कोकणातल्या माझ्या गावी घरोघरी उरलेले पुरुष सकलशीच तांदलाच्या भाकरी नी कोरड्यास खाऊन निघायचे. उरलेले एवढ्यासाठी म्हणायचे की गावात बहुसंख्येने मुस्लिम. त्यातले घरोघरचे बहुतेक पुरुष बोटीवर, नाहीतर गल्फ कंट्रीजमध्ये कामाला. बाकी बायकांचंच राज्य. घरी इक्का-दुक्का पुरुष उरलेले असायचे. तेही आळीपाळीने काम मिळालं की बोटीवर जायचेच. मग हे उरलेले भैरव सकलच्या येष्टीनी तालुक्याच्या गावी निघायचे तांदळाच्या पांढऱ्या शुभ्र भाकरी खाऊन. अर्थात ते भाकरी न म्हणता, रोटी म्हणत. हे जवळपास रोजचच नैमित्तिक कर्तव्य होतं त्यांचं जणू. असलेली नसलेली कामं काढून तालुक्याच्या, जिल्ह्याच्या गावी फेरफटका मारून यायाचा. त्याने ते अपडेटही राहत त्या काळात. तिथं कोर्ट कचेऱ्या नी 12 भानगडी काय असतील त्या उरकून दीरच्या येस्टीन परत यायाचा नी मंग भात नी म्हावऱ्याचा कालवण खाऊनशान झोपायचा संध्याकाल पर्यंत.
काही थोडे बहुत भाकर खाऊन शेतावर जायचे. शेतं म्हणजे काय छोटी छोटी भाताची खाचरं. तिथं काय देशावरच्या शेतासारखी ट्रॅक्टर्स फिरत नव्हती. पण बैलं असायची. त्यांना चारायला, पाणी पाजायला, नांगरटणीला अशी कामं असायचीच थोडी फार.
तांदळाच्या भाकरी जिला एकदम पातळ, फुगलेल्या नि एकही काळा डाग नसलेल्या पांढऱ्या शुभ्र करता येतील ती सुगरण. लग्न कार्यात त्यांच्याकडे टोपले भरभरून भाकऱ्या थापल्या जायच्या नि एका बाजूला निवडायला बाई बसलेली असायची. जराही काळा डाग असलेली भाकरी बाजूला काढून ठेवायची. पुरुषांना, महत्त्वाच्या पाहुण्यांना त्या डागवाल्या रोट्या नाही वाढायच्या.
आमच्या घरी काही ही पद्धत नव्हती. आम्ही इतकी वर्ष राहूनही सकाळचा नाश्ता गुजराती थेपल्यांचाच करत होतो. या बाबतीत गुजराती लोक मुस्लिम लोकांहून कट्टर. पण तरीही संध्याकाळच्या जेवणात तांदळाच्या भाकरी नि कडधान्यांची आमटी खात असू. रोजच. नाईलाज होता. गहू फार मिळत नव्हते नि हिरव्या भाज्यांची वानवा होती म्हणून केवळ.
आठवीत तालुक्याच्या गावी मामांकडे राहायला आले. शिक्षणासाठी. मामी तर खूपच चांगल्या होत्या. तरी त्या आईसारखे लाड थोड्याच करणार होत्या. सातवीपर्यंत सकाळी नऊ वाजता उठल्यावर इथं आई हातावर मंजन आणून द्यायची. मग आम्ही दात घासण्याचे उपकार तिच्यावर करत असू.
आणि आठवीत थेट भाकरीच भाजायला शिकले मामीच्या हाताखाली. या अशा टम्म भाकरी कशा फुगवायच्या. तेही कोळशाच्या शेगडीवर हे मामींनी शिकवले. आणि आई करत असतानाचं निरीक्षण होतंच. मी पहिल्याच प्रयत्नात भाकरी मस्त फुगवली ते केवळ निरीक्षणाच्या जोरावर. आणि मामी पण आश्चर्यचकीत झाल्या. त्यांनी माझं तोंडभरून कौतुक केलं.
- तेव्हापासून आजवर भाकरी थापण्याशिवाय दुसरं काहीही उत्तम करता आलं नाही. गृहिणीपद चिकटलं ते आजतागायत.
पुढच्या जन्मी मात्र अजिबात सैपाकघरात जायचं नाहीय मला. पुढच्या जन्मी मला उद्योगपती व्हायचंय नि भरपूर पैसा कमवायचाय. स्वतःच्या जोरावर.
- अलका गांधी-असेरकर



No comments:

Post a Comment

किसी पिछले जनम की बात...

मुगले आजम हा सिनेमा पन्नास वर्षानंतर रंगीत झाला, त्यालाही आता जवळपास 20 एक वर्ष लोटली. 🤦काळ किती भराभर चाललाय...    तेव्हा टीव्हीवर दिलीप क...