Jul 31, 2020

ईमरोज - थोडा माझ्याही वाट्याला.

रमा नाडगौडाची फेसबूक पोस्ट वाचल्यावर आठवण म्हणून कमेंट केली तिथे.. तीच इथं देते.
पोस्ट होती, एका आईने मुलाबरोबरच दहावीची परीक्षा दिल्याबद्दल..
त्यावरून सहज आठवणी आल्या..
मी देखील मुलगा शाळेत जायला लागल्यावर म्हणजे साधारण ३१ व्या वर्षी बीए फर्स्ट ईयरला प्रवेश घेतला. त्यानंतर बी.ए. एम.ए. सेट इत्यादी होईपर्यंतची सात आठ वर्षे मुलगा आणि मी सोबतच शिकत होतो, परीक्षा देत होतो.
दोघांच्या परीक्षा सोबत यायच्या. नि बाबाची तारांबळ उडायची.
माझी परीक्षा आली की मी घरातल्या कामांकडे अजिबात बघायची नाही आठ पंधरा दिवस.
दिवसभर हातात पुस्तक. अगदी टॉयलेटला जातानाही. तेवढा वेळही वाया घालवायचा नाही.
म्हणजे फार अभ्यासू होते असं नाही. पण पहिल्यापासून आयत्यावेळच्या अभ्यासावर अवलंबून. परत मुलाचाही अभ्यास मीच घेत असे. त्यातही वेळ जायचा.
बाबा मग रजा घ्यायचा. आठ दिवसांची. सैपाकपाणी सांभाळायचा.
सेटची परीक्षा होती. कलिना विद्यापीठात. तशी तेव्हा मुंबईत थोडीशी नवीन होते. पण एवढीही नाही. तरी मी नको म्हणतानाही तो माझ्या सोबत आला.
मुलाला मैत्रिणीकडे सोडले. मुलगा तेव्हा दहाबारा वर्षांचा होता.
परीक्षेचे तीन पेपर होते. एक एक तासाचे. आणि दोन पेपरच्या मध्ये एक तासाची गॅप. असे पाच तास म्हणजे जवळपास दिवस मोडणार होता तिथे. मोबाईल वगैरे नव्हते तेव्हा काही.
इतका वेळ तो बाहेर बसून राहिला. मधल्या वेळेत खायला सोबत डबा घेतला होता. पण तो माझा पेपर चालू असताना विद्यापीठाच्या बाहेर जाऊन (जे बरंच अंतर होतं तसं.) डब्यासोबत खायला वडे, सामोसे, चहा, पाणी इत्यादी घेऊन यायचा.
मधल्या सुट्टीत मी पुढच्या पेपरचा अभ्यास करत बसायचे. बाबाने आणलेलं आयतं खात.
यातला बाबा म्हणजे माझ्या मुलाचा बाबा..
That way my hubby is very much caring husband. मी भरपूर काही काही शिकत राहिले. बारीक सारीक क्लासेस करत राहिले. छंद जोपासत राहिले. ते सगळे त्याच्याच जीवावर.
ईमरोजशी तुलना नाही. ईमरोजच्या कथाही नंतर उशीराने वाचण्यात आल्या. पण हा बराचसा तसाच नवरा मिळाला मला. तुलना यासाठी नाही, की त्याच्या काही गोष्टींचा, सवयींचा मला त्रासही झाला बराच. पण तरीही तो इतर टिपिकल नवऱ्यांहून फार वेगळा आहे. हेही तितकंच खरं.
- अलका गांधी-असेरकर

2 comments:

  1. समाजात अशा इमरोज ची संख्या वाढो, ही अपेक्षा नि सदिच्छा!

    ReplyDelete

किसी पिछले जनम की बात...

मुगले आजम हा सिनेमा पन्नास वर्षानंतर रंगीत झाला, त्यालाही आता जवळपास 20 एक वर्ष लोटली. 🤦काळ किती भराभर चाललाय...    तेव्हा टीव्हीवर दिलीप क...