संकटं आणि स्त्रिया -
कंटाळल्यात बायका घरोघरी सैपाकघरात शिजवून. तरी शिजत राहतायत चुलीपुढे घामाच्या धारांतून. कंटाळ्यातून. चिडचिडीतून.
आता कुठं बिचाऱ्या या दशकात जरा जरा बाहेर पडू लागल्या होत्या सैपाकघरातून. बाहेर सगळं मिळू लागलं होतं आयतं वायतं आणि जरा बरं सुद्धा.
कंटाळा आला तर घेऊन येता येत होत्या कोपऱ्यावरच्या पोळीभाजी केंद्रावरून पोळ्या, गरमगरम भाकऱ्या आणि भाजी. एखाद्या संध्याकाळी निवांत जाऊन बसता येत होतं नवरा, पोरं घेऊन कोपऱ्यावरल्या बऱ्याशा हॉटेलात दोसा बिसा खाऊन येता येत होतं.
पण कोणतंही संकट आलं, की त्याचा आधी मार बायकापोरांवर बसतो म्हणतात. कोरोनाच्या ल़ॉकडाऊनने देखील बायांना पुन्हा सैपाकघरात लॉक करून टाकलं. उपाशी राहू शकत नाही, बाहेरचं आणू शकत नाही आणि बहुतांश घरातल्या पुरुषोत्तमांना तर कूकरचं झाकणही लावता उघडता येत नाही अशी स्थिती. त्यात पोरांच्या फरमाईशी. साधं वन डिश मिल फारतर एखाद दिवस चालवून घेतात ती. नंतर भुणभूण सुरू. हे बनव, ते बनव. घरात राहून अजून खाय खाय सुटलेय सगळ्यांना.
बाईची खरी मैत्रीण कोण असेल तर ती घरसखी. बाई करीअर, नोकऱ्या करते ते देखील घरच्यांच्या नव्हे तर, या घरसखींच्या जीवावर. आता तीही नाही. भांड्यांचे ढीग पडतायत. काही घरी पुरुष एकवेळची घासून देतात. पण यज्ञात सातत्याने आहुती पडत राहते तशी सिंकमध्ये सतत भांडी पडत नाही राहिली तर सिंकदेवता कोपत असावी बहुधा. शिवाय पुरुषांच्या घरातल्या मदतीकडे अजूनही बोनस म्हणूनच पाहिले जाते.. मिळाला तर वाहवा, न मिळाला तर वाहवा...
तरीही त्यातूनही काहीतरी नवीन म्हणून स्त्रियांनी यु ट्यूबवर नवीन रेसिपि शोधल्या. त्या ट्राय केल्या. पण शेवटी काय तर चुलीपुढेच शिजल्या.
छान राहणं, सजणं, नटणं, चांगलेचुंगले आवडते कपडे घालून फिरणं, मिरवणं, थोडंफार तरी शॉपिंग करणं, पार्लरला आठवड्या पंधरवड्यातून एकदा तरी भेट देणं, मैत्रिणींच्या घोळक्यात हेल्दी गॉसिपिंग करणं, एखादी छोटी मोठी पिकनिक करणं, ही बायकांच्या जगण्याची गरज आहे. विशेषतः गृहीणींची. नोकरीवर जाणाऱ्या बाया आपसूकच हे सगळं करत असतात. पण गृहींणींना अकारण सकारणही हे करावं लागतं. ती त्यांची मानसिक गरज असते. ते केलं नाही, तर त्यांचं सगळं आयुष्य पूर्वीच्या बायकांसारखं घराचा तर सोडाच पण सैपाकघराचा नि माजघराचाही उंबरा न ओलांडता असंच निघून जाईल. या दोनच खोल्यांत. कळकटलेल्या कपड्यांत. केसांच्या अवतारात. क्षणाची पत्नी नि आयुष्यभराची अन्नपुर्णा म्हणूनच गौरवल्या जातील नि मरतील त्या. कोरोनासारख्या परिस्थिती उद्भवत राहिल्या तर.
त्यातही ज्या स्त्रिया गेली दहा, पंधरा, वीस, तीस वर्षे गृहिणी म्हणून राहिल्या, त्या आता जरा काही कर्तव्यांतून बाहेर पडून बाहेरच्या दुनियेत रमू लागल्या होत्या. काही नवीन गोष्टी शिकू लागल्या होत्या. फिरू लागल्या होत्या. आपले छंद जोपासू लागल्या होत्या. त्या पुन्हा सैपाक घरात लॉक झाल्या. नि अधिक वैतागल्या.
पुरुषांच्या या गरजा नसतात. ते दोन जोड कपड्यांवर पूर्ण वर्ष काढू शकतात. तेही बाहेर. घरात तर पट्ट्यापट्यांचा एक बर्म्युडा आणि वर एक गंजिफ्रॉक यावर ते आठवडाच काय, आयुष्य काढू शकतात. कारण त्यांना सतत सैपाकघर नसतं. त्यांना बाहेरची दुनिया असते. मन रमवायला. प्रत्येक पुरुष बाहेरच्या दुनियेतले वेगवेगळे टक्केटोणपे सहन करतो. त्यातून समृद्ध होत जातो. मात्र प्रत्येक स्त्री, मग ती मजुराची बायको असो वा साहेबाची, तिला सैपाकघरात स्वतःला सिद्ध करावं लागतं. त्यातून वेळ मिळाला तर उडा. पण कोरोनाने ते पार्ट टाईम उडणं पण बंद करून टाकलंय गृहीणींचं.
वर्क फ्रॉम होम करणाऱ्या स्त्रिया तर दुहेरी चक्रात अडकल्यायत. घरचे नि बाहेरचे बॉस सांभाळताना तारेवरची कसरत करतायत.
पुरुष घरात बसूनही ऑफिसची कामं करतायत. पगार घेतायत. उरल्या वेळात टाईमपास करतायत. सोमिवर. वेगवेगळ्या गोष्टी शिकतायत.
फार फार तर दारू मिळत नाही, नि मिळाली तर बसायला मित्रमंडळी घावत नाहीत. एवढीच काय ती खंत उरी बाळगत चारी ठाव गिळत तंगड्या पसरणं एवढीच गोची पुरुषांची या कोरोनाने केली असेल तर केलीय.
मी मध्यमवर्गापुरतं बोलतेय. इथं लगेच कामगार नि मजूर नि बेरोजगार घुसडू नका. प्रत्येक वर्गाच्या समस्या असतात. नि त्या वेगळ्या असतात.
आणि या सगळ्या गोष्टी माझ्यावरही आणू नका. मला हॉटेलातलं जेवणच चालत नाही ही माझी कोरोना नसतानाचीही स्थिती होती.
संकटांपुढे, मग ते संकट आस्मानी असो वा सुलतानी, आधी ढाल म्हणून उभं राहावं लागतं ते बायांना. पहिला हल्ला सहन करावा लागतो तो त्यांना. या लॉकडाऊनच्या काळात घरगुती हिंसाचाराचेही प्रमाण वाढलेय असं आकडेवारी सांगतेय. आधीच मार खात असलेल्या स्त्रिया आता जास्त मार खातायत. कारण त्यांचे पुरुषोत्तम आता दिवसरात्र त्यांच्या डोक्यावर घरातच बसलेले आहेत. ते त्यांचं सगळं फ्रस्ट्रेशन, नोकरी गेली असेल तर अधिकच, घरातल्या बायापोरांवर काढताहेत.
पुरुष रिटायर्ड होतात. नित्याच्या कामातून, वर्षानुवर्षाच्या कंटाळवाण्या चक्रातून सुटतात. पण बहुतांश स्त्रियांची आजही वय झालं तरी या ड्युटीतून सुटका नसते. त्या कधी सैपाकघरातून रिटायर्ड होतच नाहीत ही वास्तविकता आहे.
लॉकडाऊनच्या या काळात स्त्रिया अधिक डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता आहे. मात्र त्यांच्या डिप्रेशनकडे कधी आजवर गांभीर्याने बघितलंच गेलेलं नाही. त्यांच्या डिप्रेशनला नेहमी बायकांची बडबड, बायकांचे आजार, बायकांचा स्वभाव अशी लेबलं लावून त्याकडे दुर्लक्ष केलं गेलंय. अनेकदा तर आपण डिप्रेशनमध्ये आहोत हे स्त्रियांना स्वतःलाही कळत नाही. आपणच कुठे तरी घरच्यांच्या अपेक्षांना कमी पडतोय असा गिल्टही त्या बाळगून राहतात. आणि स्वतःकडे दुर्लक्ष करत त्याही तसंच रेटत राहतात. त्यामुळे आताही काही सांगितलं, तर कोरोनाची परिस्थिती काय फक्त स्त्रियाच सहन करतायत का? असे प्रश्न विचारले जातील.
अपवाद सगळीकडे आहेत. सगळ्याच स्त्रियांची ही स्थिती नसेल, पण बहुतांश गृहिणींची सध्या हीच परिस्थिती आहे.
पुरुषही सहन करतायत. मात्र दोघांच्या समस्या वेगळ्या आहेत. यात पुरुषांना दोष देण्याचा अजिबात हेतू नाही माझा. निदान या पोस्टमध्ये तरी नाही. आणि ही परिस्थितीही आज ना उद्या बदलेल. मात्र सध्यातरी स्त्रियांच्या या समस्यांकडे गांभीर्याने बघून त्यांना काहीतरी चेंज देणं/मिळणं आवश्यक आहे. कारण आता सहनशक्तीच्या शेवटच्या टप्प्यात आहेत त्या. येत्या काळात अशा परिस्थिती पुन्हा पुन्हा उद्भवू शकतात. तेव्हा त्याची मानसिक आणि व्यावहारिक तयारी आतापासून करायला हवी नि काही बदल घडवायला हवेत.
- अलका गांधी-असेरकर
अतिशय समतोल, वास्तववादी नि अभिनिवेश विरहित मांडणी ! संपूर्ण सहमत !!
ReplyDeleteधन्यवाद प्रवीणजी...
ReplyDelete