भीती -
तीन महिने कड्क नियम पाळूनही परवा माझ्या मुलाला थंडी, ताप आणि सर्दी, अंगदुखी जोरदार झाली. नि आमच्या तोंडचे पाणी पळाले. खात्री होती की साधा, ऋतुबदलाचा ताप आहे, आणि वर्ष-दोन वर्षांतून त्याला एकदा येऊन जातो. तरीही मन चिंती ते वैरी न चिंतीप्रमाणे मन फणा काढतच होतं.
माझ्या स्वतःच्या बाबतीत म्हणायचं तर केवळ सोशल मिडियामुळे आणि मिलिंद पद्कीसारख्या लोकांच्या पोस्ट्स सुरुवातीपासून फॉलो केल्यामुळे नेमकी काळजी कशी आणि कुठे घ्यायला हवी ते कळले होते. बऱ्यापैकी काळजी अगदी सुरुवातीपासून घेत होते. आणि अजूनही घेतोच.
त्यामुळे गरम पाणी, सुंठ, हळद, काळी मिरी, तुळस इत्यादीचा काढा, ग्रीन टी हे त्याला सतत देत राहिले.गुळवेल पावडर दिली. हे सगळं करताना मी त्याला सारखं, 'तोंडाला चव आहे ना? जाणवते ना?" हे विचारत होते. तर तो म्हणायचा, "ह्या एवढ्या पावडरी खाल्ल्यावर काय तोंडाला चव राहणार आहे?" दोन तीन वेळा व्हिक्स आणि कोबीच्या पानांची वाफ दिली. आणि आमचे होमिओपॅथीचे फॅमिली डॉक्टर यांना फोन करून सल्ला घेतला. नि कुठल्याही डॉक्टरकडे न जाता घरीच त्याला तीन तीन तासांनी अर्सेनिक अल्ब.२०० नि ऱ्हस टॉक्स २०० च्या चार चार गोळ्या देत राहिलो.
डॉक्टरांनी सांगितलं होतं (नेहमीप्रमाणेच) की उद्या सकाळी ताप उतरेल. मला सारखं सारखं फोन करू नका आणि त्याप्रमाणेच दुसऱ्या दिवशी सकाळी ताप उतरला.
व्हिटॅमिन सी आणि इतर गोळ्या तर गेले तीन महिन्यापासून तिघेही घेतोय.
पण त्याच्यासाठी सतत नाचानाच करून आणि खड्या पायावर उभं राहून मला थकवा आला. नि काल मला सटासट शिंका सुरू झाल्या. नि पुन्हा भीतीने ये रे माझ्या मागल्या करत ग्रासले. पण मला तर बारा महिने तेरा काळ सर्दीचे विविध प्रकार सतत होत असतात. त्यामुळे गपगुमान राहून मीही अर्सेनिकचा एक डोस घेतला. वाफ घेतली. व्हिक्स चोपडले. आता बरे आहे.
एक महत्त्वाचे. घरच्यांना, जिवलगांना काही झाले तर आपण डिस्टन्सिंग पाळू शकत नाही. काय व्हायचे ते होवो. मुलाला दिवसभर जवळपास एक ताप राहिला. त्यामुळे त्याची कंबर नि डोके दुखत होते. ते चेपून देत मी त्याच्याजवळच बसून होते. तोंडाला मास्क लावून.. :D
या सगळ्यात नवऱ्याची साथ आणि धीर भक्कम आहे. घरात हे काम माझं, हे तुझं असं आधीही नव्हतं. आता तर बिचारा माझ्याहून दुप्पट कामं करतो. कारण त्याला माझ्यासारखा फेसबूकला वेळ द्यावा लागत नाही. त्यामुळे ते साहजिकच आहे. नाही का?

हे आता हसतेय, पण परवा माझंच तोंड बारीक झालं होतं.
सर्वेपि सुखिनः सन्तु,
सर्वे सन्तु निरामयः
सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित दुःखभाग भवेत्||
ओम शांतीः शांतीः शांतीः
हो,बरोबर आहे. ताप आला की कोरोनाचीच शंका येते
ReplyDeleteमाझ्या ब्लॉग वर ही पहिली कमेंट. वेलकम. आणि थँक्स
ReplyDelete