Jul 21, 2020

हर्डीकर

हर्डीकर गेला..
घराजवळचा किराणा दुकानदार मला म्हणाला.
वाईट वाटलं. 
या परिसरात राहायला येऊन तीसच्या वर वर्ष झाली. त्या दिवसापासून त्याची ओळख झाली. 
परिसरातील सर्वांच्या घरातील छोटी मोठी प्लबिंगची कामं, इलेक्ट्रिकल कामे, घराची दिवाळीची स्वच्छता ते सोसायटींमधली तुंबलेली गटारे साफ करणे इथपर्यंत सगळी कामं करणे हा त्याचा व्यवसाय. पैसे तुम्ही द्याल तेवढे. फार झिगझिग नाही. अगदीच कमी दिले तर बोलणार. अन्यथा ठिक आहे म्हणून जाणार.
माझ्या घराला लागून असलेल्या एका चाळवजा ईमारतीत तो राहत होता जिन्याच्या खालच्या खोलीत. पहिली बायको वारली. त्यानंतर बरीच वर्षे एकटाच राहत होता. मुलबाळ नव्हतं. 
आता गेला तेव्हा त्याचं वय साठीच्या आसपास असेल फारतर. आतच. बाहेर शक्यता कमी. 
दहा एक वर्षापूर्वी त्याने दुसरं लग्न केलं. आणि तो इथून बदलापूरला राहायला गेला. तिथे त्याच्या सासऱ्याची छोटी चार रुमची चाळ होती. म्हाताऱ्या सासू सासऱ्यांना त्यानेच सांभाळलं. तिथून तो डोंबिवलीला कामासाठी येत असे. 

त्याची परिस्थिती मात्र आम्ही राहायला आलो, तेव्हा होती तशीच राहिली. ना त्याहून वाईट झाली. ना चांगली झाली.

अर्थात आमची तरी काय फारशी बदलली नाही परिस्थिती या तीस वर्षात.
उत्पन्न आणि खर्च यांचा रेशो तोच राहिला. 
हर्डीकर, हर्डीकर...
हर्डीकरला डिमान्ड खूप होती. लोक त्याला शोधत असायचे. हर्डीकर दिसला का? कुणी म्हणायचं आत्ता होता इथं, त्या गल्लीतल्या इमारतीत गेलाय काही कामासाठी. अजून आलाच नाही आज. इत्यादी उत्तरं मिळायची. कोपऱ्यावरच्या पानवाल्याकडे त्याच्यासाठी निरोप ठेवून द्यायचा. फोन नव्हते तेव्हा. की अमुक एका सोसायटीत बोलावलंय म्हणून सांगा. पानवाला त्याला बरोबर निरोप द्यायचा. नंतर त्याने मोबाईल घेतला. आणि तो सतत वाजत राहिला. कामाला कमी नव्हती. पण कामं ही अशीच फुटकळ पाच पन्नास रुपये मिळवून देणारी. तो सगळी कामं करत असला, तरी तो त्यातील एकाही कामात एक्सपर्ट नव्हता. तात्पुरती गरज भागायची इतकंच. कुठे फ्यूज उडालाय, कुठे नळ गळतोय, कुठे बल्ब बदलून हवाय. कुठे गटार तुंबलंय... 

हर्डीकर जातीने ब्राम्हण होता. कानडी ब्राम्हण. तरी देखील संडासच्या टाक्या साफ करण्यापासून, गटारं उपसण्यापासून सगळी कामं करत होता. ती कामं करताना त्याचा अवतारही तसाच असे. कपडेही तसेच मळके, घाणेरडे असत. कधी जोडीला रस्त्यावरील गटार साफ करणाऱ्यांना घेऊन येत असे मदतीला. या कामात तो ब्राम्हण होता म्हणून काही लोक त्याला वेगळी वागणूक देत नव्हते. लोक जेव्हा म्हणत एक तरी ब्राम्हण दाखवा गटार साफ करणारा असतो का? तेव्हा हे माझ्या समोरच असलेलं उदाहरण मी त्यांना देत होते. जर माझ्यासमोर एक उदाहरण होतं तर अन्यत्रही असणारच ना? कामाला जात नसते. कामाला मेहनत असते फक्त.

एका सोसायटीत लाकडी फळकुटावर बसून दुसऱ्या मजल्यावरच्या भींतीचं काहीतरी दुरुस्तीचं काम करत असताना पडला. पाय मोडला. महिना दोन महिने घरी बसला. पण पुन्हा कामं सुरू केली. घरी बसून चालणार नव्हतं. 

बरेच दिवसात दिसला नव्हता. घरातही त्याचं फारसं काम पडलं नव्हतं. त्यात गेले चार सहा महिने तर लॉकडाऊनच्या गोंधळाने कुणालाच बोलावता येत नव्हतं. त्यामुळे हर्डीकरची आठवण नव्हती. 

आज बातमी कळली की तो आजारी होता नि त्यातच गेला. काल की परवा काहीतरी. त्याच्या घरच्यांशी काहीच संबंध नाही. अशी बरीच माणसं आपल्या अवती भवती असतात. कधी त्यांच्यावाचून खूप अडतं. त्यांना शोधत फिरावं लागतं. पण ती वेळ निभावली की मग आपण विसरतो त्यांना. 
हर्डीकर पण तसाच. लोकांत असून नसलेला. परिसरात असून नसलेला. बहुधा आपण सगळेच असेच असतो. समोर दिसतो तोपर्यंत लोकांच्या आठवणीत असतो. बाजूला झालो की विस्मरणात होतो. अगदी मोठा साहेब देखील खुर्चीत असेपर्यंत त्याची जी हुजुरी करणारे लोक असतात. तो एकदा का रिटायर्ड झाला की नंतर लोकांच्या खिजगणतीत राहत नाही. 
हर्डीकर आमच्या सोबतच म्हातारा होत गेला इथं. पण अजून तितकाही म्हातारा नव्हता. अजून म्हातारपणाच्या पहिल्या पायरीवर पाय ठेवला होता नि तो गेला. 
थोडं मनात येतं की संपर्कात असता, तर काही मदत हवी का विचारता आलं असतं. मदतीची गरज होती का त्याला हे देखील कळले नाही. त्यांचं वाईट वाटतं. आजुबाजूला दिसणाऱ्या लोकांना विचारत राहते, काही मदत हवीय का? यात कचरेवाली, कामवाली, पोळीवाली, समोरचा भाजीवाला, गुरखा इत्यादी येतात. पण हा आता जवळ राहत नव्हता. समोर दिसत नव्हता. तर त्याची आठवणच नाही राहिली. याची खंत वाटतेय.

- अलका गांधी-असेरकर

No comments:

Post a Comment

किसी पिछले जनम की बात...

मुगले आजम हा सिनेमा पन्नास वर्षानंतर रंगीत झाला, त्यालाही आता जवळपास 20 एक वर्ष लोटली. 🤦काळ किती भराभर चाललाय...    तेव्हा टीव्हीवर दिलीप क...