श्रावण, सोमवार आणि बरंच काही...
Aug 17, 2020
श्रावण, सोमवार आणि त्यानिमित्ताने बरंच काही...
Aug 15, 2020
विषय निघालाच आहे तर...
विषयच निघाला आहे, तर पुन्हा मातृत्वाकडे वळू या..
Aug 12, 2020
श्रावणाच्या २ कविता -
माझ्या चष्म्यांच्या काचांवरून डोळ्यात उतरतोय
ओल्या केसांमधून झिरपत
मेंदूची चावी फिरवतोय
आणि स्कूटरवरून बँकेत जायला निघालेली मी
थेट जाऊन पोचतेय
त्या खेड्यावर
जिथून तो मला दरवर्षी
साद घालत राहतो
तिथल्या टेकडीवरच्या
शंभू महादेवाच्या देवळातली
घंटा वाजवत राहतो
ओल्या लुसलुशीत गवतांतून
वहाळांतून
खळाळत राहतो..
गौरींच्या आगमनाची
चाहूल देत राहतो
गच्च रानात फुललेल्या तेरड्यांतून
मी भान विसरून फिरत राहते
सैरभैर त्याच्या खाणाखूणांतून
दरवर्षी हे असं होतं
दरवर्षी मन पिसं होतं
काम धाम विसरून
वा-यावरती पिसासारखं
श्रावणामागे दूर दूर
भूतकाळात लहरत जातं........
-अलका
पिवळा ज्वर..
माझ्या गावचा निरोप घेऊन येतात
हलक्या सरींतून..
श्रावण भाद्रपदातले वारे
सरी सरीतून
चमकदार पिवळ्या शाईने लिहिलेलं
स्वच्छ वाचता येतं मला
एकदा येऊन जा रे........... !
शब्दा-शब्दांतले त्याचे निश्वास
रुंजी घालत राहतात
कानापाशी
वाजवत राहतात
चिखलावर पसरलेल्या
भाताच्या सोनसळी पिवळ्या कोंड्यावर
नाचणा-या बाल्यांचे काळपट पितळी चाळ..
सकाळसांज कौलारू घराघरांतून
पिवळा पितांबर कैसा...च्या
तालावरचे लयबद्ध पितळी टाळ
पेरत राहतात मत्त गंध
माझ्या घ्राणेंद्रियांतून
केवड्याच्या पिवळ्याधमक पातीचा
जिच्या पायापाशी वाहिलंय तिला
त्या लखलखणा-या हळदपिवळ्या
गौरीच्या मुखवट्यावरच्या भेंडीच्या
पिवळ्या पिवळ्या फुलांचा
बोलवतात खेळायला
हिरव्यापिवळ्या उग्र गवतांवर
चमचमणा-या श्रावणी उन्हांतून
खेळ चतुरांच्या पकडापकडीचा
घेऊन जातात सोमवारी
गावाबाहेरील स्मशानात
पडक्या जुन्या शंभुमहादेवाच्या मंदिरात
माजलेलं हिरवंगार गवत आणि
बांधाबांधातून खळाळणा-या पाण्यातून
मला ओढत
प्रत्येक सोमवारी मग
रात्रीतून जागी होते मी घाबरून
परसातल्या केळीच्या पानांवर टपटपणा-या
पाण्याच्या आवाजाने..
बेडकांच्या ओरडण्याने
रातकिड्यांच्या किरकिरण्याने....
माडीवर आईच्या कुशीत डोळे गच्च मिटून
झोपण्याचा प्रयत्न करत राहते मी
अन् सकाळी उठल्यावर आरशात पाहते तेव्हा..
....तेव्हा दिसतात
माझ्या केवड्यासारख्याच
पिवळ्याधमक रेशमी कांतीवर पेरलेल्या..
आईने जाताना एवढ्यातच दिलेल्या....
... दोनचार सुरकुत्या
त्या गावावरही तर उगवल्याच असतील
ना आता तशा..............!
- अलका गांधी-असेरकर
Aug 5, 2020
लॉकडाऊन मुलाखत
स्त्रीउवाचसाठी एक लॉकडाऊन मुलाखत.-
नाव- सीमा आनंद म्हस्के
शिक्षण – दहावी पास. (गावाकडे शिक्षण, पुढे लांब आणि चालत जावं लागत होतं म्हणून
पुढचं शिक्षण घेतलं नाही. पण या कारणापेक्षाही तिच्याशी बोलताना अवेअरनेस कमी
असल्याने शिक्षण पुढचं अपूर्ण राहिल्याचं अधिक जाणवत होतं.)
जात – नवबौद्ध.
सावळी, तरतरीत, हेल्दी दिसते बऱ्यापैकी. हुशारही आहे.
काम – सोसायटीतला कचरा गोळा करून म्युन्सिपाल्टीच्या गाडीत नेऊन टाकणं
मुळ गाव – जालना जिल्ह्यातलं सिद्धेश्वर पिंपळगाव
सध्या- डोंबिवलीत. तेलकोसवाडीतल्या झोपडपट्टीसदृश्य जागी वास्तव्य.
तिथे आजुबाजूला याच
लोकांची वस्ती असावी. कारण वेचलेल्या कचऱ्यांची बाचकी मोठ्या संख्येत बाजूला
रेल्वे रुळाजवळ टाकून ठेवलेली दिसतात.
वय – ३०
१९-२० व्या वर्षी लग्न
तीन बाळंतपणे
पैकी दोन मुलं जिवंत
नवरा – बिगारी कामगार, सध्या लॉकडाऊनमुळे घरी. काम नाही.
माहेरी आई-बाबा, चार बहिणी, एक भाऊ, बाबा बिगारी कामगार. बांधकाम व्यवसाय ठिकाणी.
आई कचऱ्याचंच काम करते.
हिच्याजवळही आमच्या एकाच सोसायटीचे काम आहे.
त्याचा पगार मिळतो – २०००/- महिना.
आई-बाबा बाजूलाच राहतात. आईला कोरोना झाला होता. आता बरी झालेय. सरकारी
दवाखान्यात राहून. अजूनही नातेवाईक असतील आजुबाजूला कदाचित.
लॉकडाऊन मधील बदल -
दिनचर्येत फारसा बदल नाही.
नवरा घरात काडीचीही मदत करत नाही.
मुलांचेही आवरत नाही.
उलट पसारा करून ठेवतो.
सध्या त्याला काम नाही. तंबाखूचं व्यसन आहे.
दारूचं अजून तरी नाही.
नवरा काम करायचा तेव्हा पैसे घरात द्यायचा.
आर्थिक परिस्थितीत बदल – लॉकडाऊनमध्ये खराब.
नवऱ्याचंही काम नसल्याने.
कामात बदल – सकाळी एका सोसायटीतलं कचरा, झाडूचं
काम आटोपून मग दिवसभर घरातली कामं, पोरांची उस्तवार असते. बाकी कामात बदल नाही.
आधीही तसंच होतं.
आराम मिळतो का? – हो, दुपारचा तास दीड तास मिळतो. झोपते. टिव्ही बघते. टिव्हीवर
सावधान इंडिया, बातम्या, मराठी सिनेमा बघते.
मैत्रिणी आहेत का? – इथे नाहीत. गावाकडच्या आहेत
गावाकडे. त्यांच्याशी फोनवर बोलते.
सुख-दुःख कुणाशी शेअर करते का? – नाही. कुणाला दुःख सांगत नाही. अगदी आईबाबानाही
नाही. आतल्या आत घुसमटते.
आवडीचं खाणं करून खाते का? – होय.
फळं बिळं? – नाही फारसं. तेवढं परवडत नाही.
मुलांनाही नाही. बिस्कीटं, टोस्ट इत्यादीही नाही फारसं.
नवऱ्याचं प्रेम आहे का? – आहे.
सध्या भांडणं वाढलीत का? – होय. कारण मदत करत
नाही. हिच्या श्रमाची किंमत नाही असं हिला वाटतं.
मारतो का? – हात उचलतो कधी कधी असं म्हणाली.
कितीदा रडली? – नाही रडत असं म्हणता म्हणता
माझ्यासमोरच रडली. मग म्हणाली, हो रडते. पण कोणाशीही शेअर करत नाही. आईशीही नाही.
मदत कोण करतं? एरव्ही आई करते थोडी फार. सध्या
सोसायटीकडून अपेक्षा होती. पण सोसायटीने अजून तरी जास्तीचा काही पैसा दिला नाहीए.
(मी तिला दोनदा पाच पाचशे रुपये आणि एकदा दोनशे
रुपयाचे गहू भरून दिले.)
नवरा गावाकडे जायचं म्हणतोय सगळं सोडून. तिथे
काही काम आहे का म्हटलं तर नाही म्हणाली. तिथे जाऊन शोधायचं. शेती बिती नाही. तिला
म्हटलं, नको जाऊस. इतके दिवस काढलेस. तिथेही अनिश्चित आहे तर इथेच राहा. तिला इथेच
राहायचंय. पण नवरा ऐकत नाही. जायचं जायचं म्हणतोय.
नवऱ्याला दुसरी कामं शोध म्हटलं, तर म्हणतो सवय
नाही दुसऱ्या कामाची. अजून तरूण आहे तरी. मी सांगितलं आपला गुरखा नुसत्या गाड्या
धूवून आणि सोसायट्यांचे पाणी सोडून दहा पंधरा हजार कमवतोय. आजुबाजूच्या सोसायटीतून
गाड्या धुण्याचे काम मिळव विनंती करून. तर म्हणाली त्याला सवय नाही दुसऱ्या
कामांची.
दहावी पास आहे आणि जातीचे आरक्षण, सुविधा आहेत तर खरंतर सरकारी नोकरी मिळू शकली
असती. अजूनही मिळू शकते. पण सोर्सेस ठाऊक नाहीत. कुठे कसा प्रयत्न करायचा माहीत
नाही. नवरा बहुधा दहावी पास नाही.
भविष्याबद्दल आशादायी आहे का? – तर हो म्हणाली.
पण भविष्य बदलणार कसं याचे उत्तर तिच्यापाशी
नाही. तिला म्हटलं, हुशार, तरतरीत आहेस तर हे काम सोडून पोळी भाजी इत्यादीची कामं
शोध. घरकाम शोध. पण कोण देणार असं तिला वाटतं? कारण कचरा कामं करणाऱ्यांना लोक
सैपाकघरातल्या कामासाठी घेत नाहीत सहसा.
---------
बाई म्हणून मला तरी तिच्या परिस्थितीत इतर बायांपेक्षा काही फार वेगळी परिस्थिती
वाटली नाही. एक आर्थिक परिस्थिती सोडता.
मध्ये मिळून साऱ्याजणींचे ऑनलाईन शिबीर होते. त्यातही बायकांनी हिंसाचार होत नाही
असे म्हटले होते. त्या मध्यमवर्गीय बायका होत्या. नवऱ्याने मारलं तरी बाहेर
सांगायचं नाही हा आपल्याकडे रिवाज आहे. ही सीमा सुद्धा खोदून विचारल्यावर हात
उचलतो म्हणाली, रडते म्हणाली. अन्यथा नाहीच म्हणत होती आधी. तर इतर बायका काय
म्हणणार? मध्यमवर्गीय संस्कार तर अजून कडक असतात. त्या काय शेअर करणार आपल्या
व्यथा जाहीरपणे?
निष्कर्ष – या वर्गात निदान अवेअरनेस जागृत करणाऱ्या सामाजिक
कार्यकर्त्यांची गरज आहे. जात, शिक्षण, आरक्षण प्रमाणे नोकऱ्या मिळतात, मिळू
शकतात. त्यासाठी काय करायला हवं याची माहिती देणारं कुणीतरी हवं. शिक्षणासाठी
आग्रह धरणारे कार्यकर्ते हवेत. कुटुंब नियोजनाचा प्रभावी प्रचार करणारे लोक हवेत.
त्यासाठी थोडीफार मामूली मदत मिळवून देणारे हवेत. तशी मिळूही शकते. हे काम त्या
त्या जातीनेच अधिक केले तर उत्तम. कारण प्रत्येक जातीत एक शिक्षित, आर्थिक संपन्न,
हुशार वर्ग असतोच. जातीच्या संघटना हे काम करू शकतात. मी असं म्हणत नाही, की जातीचं
जातीने पाहावं म्हणून. किंवा सरकारकडून काही अपेक्षा ठेवूच नयेत असं. परंतु मी माझ्या आजुबाजूला बघते. उच्चवर्णियांच्या जात
संघटना अशा प्रकारची कामं करत असतात. आपल्या समाजातील प्रमाणात गरीबांना,
विद्यार्थ्यांना आर्थिक मदत, वैद्यकीय मदत, मिळवून देत असतात. फंड गोळा करत असतात.
यात काही चुकीचं वाटत नाही. मग या तळागाळातल्या लोकांच्या जातसमाजानीही हे करायला
हवे. तशा त्या करतात की नाही ते मला माहीत नाही.
सहसा मी अशा लोकांना सरकारकडे रडताना अधिक पाहते. सरकारने करावे, त्यासाठी मोर्चे,
आंदोलने, धरणे, संप, इत्यादींसाठी कार्यकर्ते गोळा करून त्यांच्या रिकामटेकडेपणात अधिक
भर घातली जाते. त्याऐवजी अशी सकारात्मकता ठेवून जातबांधवांसाठी काही अशी मदत केली
प्रत्येक प्रगती केलेल्या व्यक्तीने तर ते अधिक चांगले.
हेच शेतकरी वर्गातही व्हायला हवं. मोठ्या
शेतकऱ्यांनी लहान शेतकऱ्यांच्या हितासाठी थोडी झीज सोसणे, त्यांच्यात प्रबोधन करणे,
त्यांना जागरूक करणे, मदत मिळवून देणे ही कामे केली तरी जखमांवर बराच ईलाज होईल.
जगण्याची, आधार असल्याची भावना निर्माण होईल. तसे होत आहे की नाही मला माहीत नाही.
- अलका गांधी-असेरकर
Aug 2, 2020
दोन स्त्रियांमधील उत्तम मैत्री - आणि कुसुमाग्रजांची कविता.
Jul 31, 2020
ईमरोज - थोडा माझ्याही वाट्याला.
Jul 21, 2020
हर्डीकर
घराजवळचा किराणा दुकानदार मला म्हणाला.
वाईट वाटलं.
उत्पन्न आणि खर्च यांचा रेशो तोच राहिला.
हर्डीकर, हर्डीकर...
हर्डीकरला डिमान्ड खूप होती. लोक त्याला शोधत असायचे. हर्डीकर दिसला का? कुणी म्हणायचं आत्ता होता इथं, त्या गल्लीतल्या इमारतीत गेलाय काही कामासाठी. अजून आलाच नाही आज. इत्यादी उत्तरं मिळायची. कोपऱ्यावरच्या पानवाल्याकडे त्याच्यासाठी निरोप ठेवून द्यायचा. फोन नव्हते तेव्हा. की अमुक एका सोसायटीत बोलावलंय म्हणून सांगा. पानवाला त्याला बरोबर निरोप द्यायचा. नंतर त्याने मोबाईल घेतला. आणि तो सतत वाजत राहिला. कामाला कमी नव्हती. पण कामं ही अशीच फुटकळ पाच पन्नास रुपये मिळवून देणारी. तो सगळी कामं करत असला, तरी तो त्यातील एकाही कामात एक्सपर्ट नव्हता. तात्पुरती गरज भागायची इतकंच. कुठे फ्यूज उडालाय, कुठे नळ गळतोय, कुठे बल्ब बदलून हवाय. कुठे गटार तुंबलंय...
हर्डीकर जातीने ब्राम्हण होता. कानडी ब्राम्हण. तरी देखील संडासच्या टाक्या साफ करण्यापासून, गटारं उपसण्यापासून सगळी कामं करत होता. ती कामं करताना त्याचा अवतारही तसाच असे. कपडेही तसेच मळके, घाणेरडे असत. कधी जोडीला रस्त्यावरील गटार साफ करणाऱ्यांना घेऊन येत असे मदतीला. या कामात तो ब्राम्हण होता म्हणून काही लोक त्याला वेगळी वागणूक देत नव्हते. लोक जेव्हा म्हणत एक तरी ब्राम्हण दाखवा गटार साफ करणारा असतो का? तेव्हा हे माझ्या समोरच असलेलं उदाहरण मी त्यांना देत होते. जर माझ्यासमोर एक उदाहरण होतं तर अन्यत्रही असणारच ना? कामाला जात नसते. कामाला मेहनत असते फक्त.
एका सोसायटीत लाकडी फळकुटावर बसून दुसऱ्या मजल्यावरच्या भींतीचं काहीतरी दुरुस्तीचं काम करत असताना पडला. पाय मोडला. महिना दोन महिने घरी बसला. पण पुन्हा कामं सुरू केली. घरी बसून चालणार नव्हतं.
बरेच दिवसात दिसला नव्हता. घरातही त्याचं फारसं काम पडलं नव्हतं. त्यात गेले चार सहा महिने तर लॉकडाऊनच्या गोंधळाने कुणालाच बोलावता येत नव्हतं. त्यामुळे हर्डीकरची आठवण नव्हती.
आज बातमी कळली की तो आजारी होता नि त्यातच गेला. काल की परवा काहीतरी. त्याच्या घरच्यांशी काहीच संबंध नाही. अशी बरीच माणसं आपल्या अवती भवती असतात. कधी त्यांच्यावाचून खूप अडतं. त्यांना शोधत फिरावं लागतं. पण ती वेळ निभावली की मग आपण विसरतो त्यांना.
हर्डीकर पण तसाच. लोकांत असून नसलेला. परिसरात असून नसलेला. बहुधा आपण सगळेच असेच असतो. समोर दिसतो तोपर्यंत लोकांच्या आठवणीत असतो. बाजूला झालो की विस्मरणात होतो. अगदी मोठा साहेब देखील खुर्चीत असेपर्यंत त्याची जी हुजुरी करणारे लोक असतात. तो एकदा का रिटायर्ड झाला की नंतर लोकांच्या खिजगणतीत राहत नाही.
हर्डीकर आमच्या सोबतच म्हातारा होत गेला इथं. पण अजून तितकाही म्हातारा नव्हता. अजून म्हातारपणाच्या पहिल्या पायरीवर पाय ठेवला होता नि तो गेला.
थोडं मनात येतं की संपर्कात असता, तर काही मदत हवी का विचारता आलं असतं. मदतीची गरज होती का त्याला हे देखील कळले नाही. त्यांचं वाईट वाटतं. आजुबाजूला दिसणाऱ्या लोकांना विचारत राहते, काही मदत हवीय का? यात कचरेवाली, कामवाली, पोळीवाली, समोरचा भाजीवाला, गुरखा इत्यादी येतात. पण हा आता जवळ राहत नव्हता. समोर दिसत नव्हता. तर त्याची आठवणच नाही राहिली. याची खंत वाटतेय.
किसी पिछले जनम की बात...
मुगले आजम हा सिनेमा पन्नास वर्षानंतर रंगीत झाला, त्यालाही आता जवळपास 20 एक वर्ष लोटली. 🤦काळ किती भराभर चाललाय... तेव्हा टीव्हीवर दिलीप क...
-
शरीफा नेहमीच जुम्म्याची वाट बघत असायची मनोमन. ज्याप्रमाणे नोकरदार लोक रविवारची वाट पाहात असतात तशीच. जुम्मेरातपासून म्हणजे गुरूवारपासूनच ति...
-
कोण अल्पसंख्य, कोण बहुसंख्य- माझं गाव हे कोकणातलं एक मुस्लिमबहुल गाव. एकेकाळी तिथं संमिश्र वस्ती होती. गवळ आळी, कुंभारवाडा, महारवाडा, जंगमआळ...
-
सकाळचं ऊन माझ्या घरात कोवळ्या बाळपावलांनी रांगत येतं..किलकिल्या उघड्या फटीतून डोकावतं. अगदी तस्संच, जसं एखादं नवीन आलेल्या शेजा-याचं तान्हं ...

